सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३

धावांच्या पावसात धडाडलेली तोफ

 विश्वचषकातील सर्वोत्तम - 

(ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड - २०१५)

स्पर्धेत एकूण शतकं झाली ३८. प्रत्येक अडीच डावांमागं एक तरी शतक. अर्धशतकांची संख्या होती १११. तीन डावांमध्ये संघाची धावसंख्या चारशेच्या पलीकडं गेली. स्पर्धेतील २८ डावांमध्ये संघाची धावसंख्या तीनशेचा टप्पा ओलांडून गेलेली. प्रत्येक सामन्यात किमान १० षट्कार ठोकलेले. स्पर्धा फलंदाजांची, फलंदाजांसाठीच होती जणू.
...तरीही विश्वचषकातील सर्वोत्तम ठरला एक गोलंदाज - मिचेल स्टार्क!


अंतिम सामना. मॅककलम बाद. मिचेल स्टार्कच्या इनस्विंगरवर
मॅककलमची दांडी गुल. (छायाचित्र सौजन्य : www.cricket.com.au)
...............................................................................

अंतिम सामना झाला. अकराव्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक जाहीर झालं. पत्रकारांना आणि समीक्षकांना नवल वाटत होतं. अर्थात त्यात कौतुकाचा भाग जास्त होता.

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्क विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला होता. त्याच्या क्षमतेबद्दल कुणाला शंका नव्हती. त्याची स्पर्धेतली कामगिरी ह्या पारितोषिकाला साजेशी अशीच- आठ सामन्यांमध्ये २२ बळी, १०.१८ सरासरी, षटकामागे दिलेल्या धावा ३.५. साधारणपणे दर साडेसतरा चेंडूंमागे एक बळी.

स्टार्कच्या तोफखान्यातून असा अचूक आणि लक्ष्यभेदी मारा झालेला असतानाही त्याच्या पारितोषिकाबद्दल कौतुकमिश्रित आश्चर्य का वाटावं बुवा?

फलंदाजांची स्पर्धा
ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड यांनी दुसऱ्यांदा संयुक्तपणे आयोजित केलेली ही विश्वचषक स्पर्धा (१४ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१५) त्या अर्थाने फलंदाजांची होती. स्पर्धेतील ४९ सामन्यांमध्ये (त्यातला एक पावसामुळे झाला नाही.) शतकं झाली ३८. प्रत्येक अडीच डावांमागं किमान एक शतक. एकूण अर्धशतकांची संख्या होती १११.

एकूण तीन डावांमध्ये संघाची धावसंख्या चारशेच्या पलीकडं गेली. म्हणजे षटकामागे किमान ८ धावा. एकूण २८ डावांमध्ये संघाची धावसंख्या तीनशेचा टप्पा ओलांडून गेलेली. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या, स्पर्धेत एकही विजय मिळविता न आलेल्या स्कॉटलंडनेही हा पल्ला एकदा गाठला. प्रत्येक सामन्यात किमान १० षट्कार ठोकलेले.

जाता जाता एक गोष्ट - पहिल्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये तीनशेहून अधिक धावसंख्या असलेले अवघे आठ सामने आहेत. तेही सर्व साखळीतले. दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत तर कोणत्याही संघाला तीनशेच्या वर धावा करणं साधलं नाही. हे उदाहरण दिलं याचं कारण या तिन्ही स्पर्धांमधील षटकांची मर्यादा ५० नव्हती, तर ६० होती.

आकडेवारी सांगते ते खरंच आहे - स्पर्धा फलंदाजांची, फलंदाजांसाठी होती. उपान्त्य सामन्यात पराभूत झाल्यावर भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं गोलंदाजांबद्दल व्यक्त केलेली सहानुभूती, क्षेत्ररक्षणाच्या निर्बंधाबद्दल केलेली टीका खोटी नव्हती.

स्टार्कला म्हणून सलाम...
फलंदाजांना अधिक संधी देणाऱ्या, चौकार-षट्कारांची लयलूट झालेल्या आणि गोलंदाजांना सापत्न वागणूक मिळालेल्या ह्या विश्वचषक स्पर्धेत एक गोलंदाज सर्वोत्तम ठरला. त्याबद्दल त्याला सगळे सलाम करीत होते.

मायदेशात चषक जिंकण्याची संधी भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियानंही साधली. त्यात मोठा वाटा होता स्टार्कच्या भेदक गोलंदाजीचा आणि स्टिव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल ह्यांच्या फलंदाजीचा.


न्यू झीलंडविरुद्ध भेदक मारा. सहा बळी. निकाल मात्र पराभूत!
(छायाचित्र सौजन्य : www.dailytelegraph.com.au)
.....................................................
स्टार्कनं प्रत्येक सामन्यात किमान दोन बळी मिळविले. त्याचा सर्वाधिक भेदक मारा होता गटातील न्यू झीलंडविरुद्धच्या सामन्यात. त्यानं २८ धावा देऊन ६ गडी बाद केले. त्यात रॉस टेलर व ग्रँट एलियट यांच्यासह तळातल्या दोन फलंदाजांच्या त्याने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. पण हा सामना न्यू झीलंडनं एका धावेनं जिंकला! स्पर्धेत स्टार्कएवढेच बळी मिळविणाऱ्या ट्रेंट बोल्टनं (५-२७) तिथं तरी बाजी मारली होती.

सहभागी १४ देशांची दोन गटांमध्ये विभागणी, प्रत्येक गटातील चार संघ उपान्त्यपूर्व फेरीसाठी पात्र, असं स्पर्धेचं स्वरूप होतं. याच स्पर्धेतून अफगाणिस्ताननं पदार्पण केलं. दोन्ही सहयजमान एकाच गटात आले. न्यू झीलंडने सर्व सामने जिंकले, तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

दुसऱ्या गटात भारतानं सर्व सामने जिंकून अव्वल स्थान मिळविलं. बड्या देशांपैकी एकट्या इंग्लंडला गटाच्या बाहेर पडता आलं नाही आणि ती संधी बांग्ला देशानं साधली.

विश्वविजेतेपदाची हॅटट्रिक केलेल्या कांगारूंना २०११च्या स्पर्धेत उपान्त्य फेरी काही गाठता आली नव्हती. त्याचा वचपा काढण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली होती. सलामीला इंग्लंडला १११ धावांनी हरवून त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला. या सामन्यात स्टार्कनं दोन गडी बाद केले. सलामीचा मोईन अली व तळाचा स्टुअर्ट ब्रॉड यांचे बळी त्यानं मिळविले. त्याच्याहून प्रभावी ठरला तो पाच बळी घेणारा मिचेल मार्श.

बांग्ला देशाविरुद्धचा सामना पावसामुळं रद्द झाला. परिणामी ऑस्ट्रेलियाला दोन गुणांना आणि स्टार्कला काही बळींना मुकावं लागलं.

डावखुऱ्या गोलंदाजांची छाप
ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंड ह्यांच्यातील गटातील लढत कमी धावांची, चुरशीची झाली. स्टार्क व बोल्ट ह्या डावखुऱ्या गोलंदाजांची छाप त्यावर स्पष्ट उमटली. ऑस्ट्रेलियानं जेमतेम १५१ धावा केल्या. ते लक्ष्य गाठताना दमछाक झालेल्या न्यू झीलंडनंही नऊ गडी गमावले. खरं तर न्यू झीलंडने चांगली सुरुवात केली होती. कर्णधार ब्रेंडन मॅककलम व केन विल्यम्सन यांची जोडी फुटल्यावर स्टार्कनं धुमाकूळ घातला!

एक विजय, एक पराभव व एक सामना रद्द अशी परिस्थिती असलेल्या ऑस्ट्रेलियावर आता काहीसं दडपण आलं होतं. पण पुढच्या सामन्यातला प्रतिस्पर्धी अगदीच नवखा होता. डेव्हिड वॉर्नरच्या (१७८) तुफानी फटकेबाजीमुळं त्यांनी ४१७ धावांचा डोंगर रचला. मिचेल जॉन्सन (४ बळी), स्टार्क व जोश हेझलवूड (प्रत्येकी २ बळी) यांच्यापुढं अफगाणिस्तानचा निभाव लागला नाही.

श्रीलंकेविरुद्ध स्टार्कच्या नावापुढे बळी दिसतात ते तळाच्या सीक्कुगे प्रसन्न व सचित्र सेनानायके यांचे. पण सुरुवातीला त्याच्या धारदार माऱ्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांवर काहीसं दडपण राहिलं होतं, हे मुद्दाम सांगितलं पाहिजे.

स्कॉटलंडच्या फलंदाजांची मात्र स्टार्कपुढे भंबेरी उडाली. सलामीची जोडी, मधल्या फळीतला एक आणि तळातला एक असे चार बळी स्टार्कने घेतले ते फक्त चार षट्कं चार चेंडूंमध्ये १४ धावा देऊन. स्पर्धेत पहिल्यांदाच तो सामन्याचा मानकरी बनला.

उपान्त्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाची गाठ होती पाकिस्तानशी. सर्फराझ अहमदला शेन वॉटसनकडे झेल द्यायला लावून स्टार्कनं सलामीची जोडी फोडली. या सामन्यात त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण होतं : १०-१-४०-२.

हेझलवूडपुढे शरणागती
स्टार्कला अगदी सावधपणे, जपून खेळताना पाकिस्तानी फलंदाज हेझलवूडपुढे शरण गेले. त्यानं ३५ धावांमध्ये चार गडी बाद केले. स्मिथ व वॉटसन ह्यांच्या अर्धशतकांमुळे यजमान संघाने सहा गडी राखून विजय मिळवित उपान्त्य फेरी गाठली.

एकाही सामन्यात पराभूत न होता उपान्त्य फेरी गाठलेल्या भारताचं आव्हान कांगारूंपुढे होतं. एरॉन फिंच व शतकवीर स्टिव्ह स्मिथ यांच्यामुळे त्यांनी सात गडी गमावून ३२८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली.

रोहित शर्मा व शिखर धवन यांनी पाऊण शतकी सलामी दिल्यानंतरही भारताचा डाव गडगडला. कोहली बाद झाल्यावर मैदानात आलेला अजिंक्य रहाणे जबाबदारीनं खेळत होता आणि त्याची महेंद्रसिंह धोनीशी चांगली जोडी जमली होती. ती फोडण्यासाठी कर्णधारानं चेंडू दिला स्टार्कच्या हातात.

विश्वास सार्थ ठरवला

कर्णधारानं टाकलेला विश्वास सार्थ ठरवला स्टार्कनं.
 (छायाचित्र सौजन्य : www.cricket.com.au)
..............................................................

पहिल्या टप्प्यातील पाच षटकांत फक्त १५ धावा दिलेला स्टार्क कर्णधाराला पावला. त्यानं रहाणेला हॅडिनकडं झेल द्यायला लावलं. रहाणेचं अर्धशतक हुकलं आणि तिथून पुढे भारताच्या आशा मावळत गेल्या. उमेश यादवचा त्रिफळा उडवून स्टार्कनं विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यानं ८.५ षटकांत फक्त २८ धावा देऊन २ गडी बाद केले. जेम्स फॉकनरची (३ बळी) त्याला चांगली साथ मिळाली.

न्यू झीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम सामन्याचं तिकीट निश्चित केलं. सलग दुसऱ्या स्पर्धेत दोन यजमान संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार होती. मॅककलम आणि मार्टीन गुप्टील ही त्यांची सलामीची जोडी भरात होती.

ह्या सामन्याची सुरुवातच सनसनाटी झाली. पहिल्याच षट्कातल्या दुसऱ्या चेंडूवर गुप्टीलनं एक धाव घेतल्यावर मॅककलम खेळायला आला. त्याला स्टार्कनं सलग दोन चेंडूंवर चकवलं. नंतरचा चेंडू इनस्विंगर होता. तो मॅककलमला कळला खरा; पण थोडा उशीरच झाला होता. त्याची बॅट खाली येईपर्यंत चेंडूनं ऑफ स्टंप उखडला गेला होता!

अंतिम सामन्यातला हा सर्वांत महत्त्वाचा बळी आणि त्यानंच निकाल बदलला, असं म्हटलं जातं. स्टार्कनं आठ षटकांत फक्त २० धावा देऊन दोन गडी बाद केले.

अंतिम सामन्यानंतर कांगारूंचा कर्णधार मायकेल क्लार्क ह्यानं स्टार्कचं आणि अन्य गोलंदाजांचं मनापासून कौतुक केलं. तो म्हणाला, ‘‘गोलंदाजांनी आम्हाला विश्वचषक जिंकून दिला आहे. स्टार्कची कामगिरी अफलातून होती. त्यामुळं सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक निःसंशयपणे त्याचंच आहे.’’

खुद्द स्टार्कला ही स्पर्धा अभूतपूर्व अशी वाटली. ते स्वाभाविकच! विश्वचषक स्पर्धेच्या आधी झालेल्या ऑस्ट्रेलिया-भारत-इंग्लंड स्टार्कनं सांगितलं. ऑस्ट्रेलियाकडून सर्वोत्तम ठरलेला तो दुसरा खेळाडू. ग्लेन मॅकग्राच्या पावलावर पाऊल टाकून त्यानं आठ वर्षांनंतर ही कामगिरी बजावली होती.

फॉकनरमुळे घसरगुंडी 
गटातील सामन्यात एका धावेने ऑस्ट्रेलियाला चकविणारा न्यू झीलंडचा संघ विजेतेपदाचं स्वप्न पाहत होता. सुरुवातीच्या घसरणीनंतर एलियट व टेलर यांनी चौथ्या जोडीसाठी १११ धावांची भागीदारी केली. टेलरला हॅडीनकरवी झेलबाद करून जेम्स फॉकनरने ही जोडी फोडली. लगेचच त्याने कोरी अँडरसनचा त्रिफळा उडवला. एलिटलाही त्यानंच बाद केलं. परिणामी न्यू झीलंडचा डाव १८३ धावांतच संपला.

एवढी कमी धावसंख्या असूनही चषक जिंकण्याचा पराक्रम लॉर्ड्सवर ३२ वर्षांपूर्वी झाला होता. न्यू झीलंडला तसाच चमत्कार अपेक्षित होता. पण त्याची साधी चाहूलही वॉर्नर, स्मिथ व मायकेल क्लार्क ह्या त्रिकुटानं लागू दिली नाही. ऑस्ट्रेलियानं सात गडी राखून लढत व चषकही जिंकला. डावखुऱ्या मध्यमगतीने न्यू झीलंडची मधली फळी कापून काढणाऱ्या फॉकनरची सामन्याचा मानकरी म्हणून निवड झाली.
.................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक2023 #विश्वचषक2015 #मिचेल_स्टार्क #मायकेल_क्लार्क #स्टिव्ह_स्मिथ #डेव्हिड_वॉर्नर #ऑस्ट्रेलिया #न्यूझीलंड #भारत #पाकिस्तान #बांग्लादेश #स्पर्धेतील_सर्वोत्तम #सामन्याचा_मानकरी #एमएस_धोनी #फलंदाजांची_स्पर्धा

#CWC #CWC2023 #CWC20015 #ODI #Mitchell_Starc #bowler #Michael_Clarke #Steve_Smith #David_Warner #Aurstralia #India #Bharat #NewZealand #MS_Dhoni #Pakistan #BanglaDesh #icc #Best_Player #MoM #batter's_paradise
.................

(‘झी मराठी दिशा’ साप्ताहिकात १ जून २०१९ रोजी प्रकाशित झालेला लेख अधिक माहितीसह आणि विस्तारित स्वरूपात.)
.................

आधीचा लेख इथे वाचता येतील - 

https://khidaki.blogspot.com/2019/06/WcupCrowe.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/WC-Jaysurya.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/cwc-LanceKlusener.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/Sachin2003.html

https://khidaki.blogspot.com/2023/09/McGrath2007.html

https://khidaki.blogspot.com/2019/06/Yuvraj-CWC.html
.................

मालिकेतील पुढच्या लेखांसाठी कृपया फॉलो करा...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...