Friday 13 October 2023

‘सप्तपदी’नंतर आवृत्ती आठवी

 

‘विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानचा पराभव ही विश्वातली
अटळ गोष्ट आहे,’ अशी मार्मिक टिप्पणी ‘मिरर’ ह्या इंग्लंडमधील दैनिकानं मागच्या स्पर्धेच्या वेळी केली. त्याच अटळ गोष्टीची अहमदाबामध्ये पुनरावृत्ती होईल, असं कोट्यवधी क्रिकेटरसिकांना वाटतंय. अहमदाबादमध्ये 
शनिवारी होणाऱ्या लढतीनिमित्त विश्वचषकातील
भारताच्या ‘सप्तपदी’ची झलक. 
----------------------------------------------------

गोष्ट आहे सहा वर्षांपूर्वीची. म्हणजे १८ जून २०१७ रोजीची. इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकाची अंतिम लढत होती. त्यासाठी समोरासमोर उभे ठाकले होते कट्टर प्रतिस्पर्धी – भारत आणि पाकिस्तान.

टीव्ही. वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग वाढतो, जाहिरातींचा महसूल वाढतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या गल्ल्यात भर पडते, तिकिटांचा काळा बाजार होतो आणि सट्टाबाजार गरम होतो, अशी ही लढत.

‘बीबीसी’च्या हिंदी सेवेमध्ये दीर्घ काळ काम केलेल्या विजय राणा यांनी त्या लढतीच्या आदल्या दिवशी ‘फेसबुक’वर पोस्ट टाकली होती – ‘Indian media can’t differentiate between cricket and war.’

हाच मजकूर ‘री-पोस्ट’ करण्याचा मोह विजय राणा यांना कदाचित होईलही. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत मोठी लढत शनिवारी होत आहे. त्याकडे तमाम भारतीयाचं लक्ष लागलेलं असेल.

अहमदाबादेत ‘अष्टक’
विराट कोहलीच्या संघानं इंग्लंडमध्ये ‘सप्तपदी’ पूर्ण केली. सलग सातव्या वेळी विश्वचषकात भारतानं पाकिस्तानला हरविलं. आता रोहितच्या नेतृत्वाखाली ‘अष्टक’ पूर्ण होण्याची उत्सुकता भारतीयांना आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या ह्या सामन्याचा थाट काही और असेल. स्पर्धेचं उद्घाटन भारतीयांना हव्या असलेल्या उत्सवी आणि उत्साही स्वरूपाचं झालं नाहीच. तीच कसर अहमदाबादेत भरून काढली जाईल.

अमिताभ बच्चन, रजनीकांत, सचिन तेंडुलकर अशा ‘सुवर्ण तिकीट धारकां’साठी सामन्याच्या दीड तास आधी संगीताचा कार्यक्रम होईल. सव्वा लाख क्षमतेचं स्टेडियम ओसंडून वाहील, असा अंदाज आहे. तिकिटं, हॉटेलात जागा मिळविण्यासाठी झालेल्या लटपटी-खटपटीच्या बातम्या आल्याच आहेत.

दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. आधीचे दोन्ही सामने जिंकले असल्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात ‘...काम बिघाडा’ होऊ नये, अशीच संघांची इच्छा असणार.

खुन्नस आणि जिगर
‘अन्य कोणत्याही क्रिकेट सामन्यासारखंच आम्ही हा सामना खेळतो,’ असं दोन्ही बाजूंचे खेळाडू सांगतात, बोलतात. पण तो उपचार असावा. दोन्ही संघांमध्ये खुन्नस असते आणि जिंकण्याची जिगर दिसून येते.

विश्वचषक स्पर्धांमध्ये आतापर्यंत सात वेळा दोन्ही संघ एकमेकांशी खेळले आहेत. जिंकण्याचा एकही ‘मौका’ आतापर्यंत पाकिस्तानला लाभलेला नाही, हे विशेष! भारताच्या विजयी मालिकेबद्दल टीव्ही. वाहिन्यांवर आलेल्या जाहिराती चांगल्याच गाजल्या आहेत.

विश्वचषकाच्या पहिल्या चार स्पर्धांमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने आलेच नाहीत. इंग्लंडमध्ये झालेल्या तिन्ही प्रुडेन्शियल चषक स्पर्धांमध्ये दोन्ही संघ वेगळ्या गटांत होते. पहिल्या दोन स्पर्धांमध्ये भारताची अवस्था दयनीय होती. कपिलदेवच्या संघांनं विश्वचषक जिंकला तेव्हा पाकिस्तान संघाशी गाठ पडलीच नाही.

भारत आणि पाकिस्तान संयुक्त यजमान असलेल्या रिलायन्स चषकाची (१९९६) अंतिम लढत दोन यजमानांमध्ये होईल, ही अनेकांची अपेक्षा होती. पण अपेक्षाभंग झाला. उपान्त्य फेरी गाठूनही तेथेच दोन्ही संघांचा प्रवास संपला. भारताला इंग्लंडनं आणि पाकिस्तानला ऑस्ट्रेलियानं हरवलं.

विजयमालिका सुरू
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये १९९२मध्ये झालेल्या बेन्सन अँड हेजेस चषक स्पर्धेत त्यांची पहिल्यांदा गाठ पडली. सलामीची ही लढत भारतानं ४३ धावांनी जिंकली. सामन्याचा मानकरी ठरलेल्या सचिन तेंडुलकरनं नाबाद ५४ धावा केल्या व एक बळी मिळविला.


जावेद मियाँदादच्या माकडउड्या. पाकिस्तानने चषक
जिंकला; पण भारताकडून हारच झाली.
...........................
विश्वचषकातील विजयमालिकेची ही सुरुवात होती. हा सामना लक्षात राहतो तो जावेद मियाँदादच्या माकडउड्यांमुळे! अपील करणाऱ्या यष्टिरक्षक किरण मोरे याला खिजवण्यासाठी त्यानं अशा उड्या मारल्या.

आशियात दुसऱ्यांदा झालेल्या विल्स विश्वचषक स्पर्धेच्या (१९९६) उपान्त्यपूर्व सामन्यात पाकिस्तानच्या नशिबी पुन्हा एकदा लिहिलेला होता पराभव – ह्या वेळी ३९ धावांनी. भारताच्या विजयाचे मानकरी ठरले नवज्योतसिंग सिद्धू (९३) व व्यंकटेश प्रसाद (तीन बळी).

बंगलोरच्या ह्याच सामन्यात प्रसाद व आमिर सोहेलची चकमक गाजली. प्रसादच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरला चौकार मारल्यावर आमिरने त्याला ‘जा घेऊन ये तो चेंडू’ असंच जणू खुणावलं.

आक्रमक व्यंकटेश प्रसाद

जशास तसे... व्यंकटेश प्रसादचा बाणा
........................................
प्रसादचा पुढचा चेंडू. पुन्हा तसाच फटका मारू पाहणाऱ्या सोहेलचा त्रिफळा उडाला! मग आक्रमक झालेल्या प्रसादनं त्याला पॅव्हिलियनची दिशा दाखविली! ह्या पराभवानंतर पाकिस्तानात पुतळे जाळणे, टीव्ही. संच फोडणे अशा प्रतिक्रिया उमटल्या. ‘मौका’ जाहिरातीच्या जन्मकथेचं बीज ते असावं.

भारतानं विजयाची हॅटट्रिक साजरी केली, पहिल्या आयसीसी विश्वचषक (इंग्लंड – १९९९) स्पर्धेमध्ये. मँचेस्टर येथे झालेल्या ‘सुपर सिक्स’च्या लढतीत भारतानं ४७ धावांनी विजय मिळविला.

तेंडुलकर, राहुल द्रविड व महंमद अजहरुद्दीन ह्यांच्या अर्धशतकांमुळे भारतानं सव्वादोनशे धावांची मजल मारली. पुन्हा एकदा व्यंकटेशचा ‘प्रसाद’ पाकिस्तानी फलंदाजांना मिळाला. त्याच्या भेदक माऱ्यापुढे (५-२७) पाकिस्तानचे प्रयत्न साफ अपुरे पडले.

दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेतही ‘मागील पानावरून पुढे चालू’ अशीच कथा पाकिस्तानसाठी राहिली. सेंच्युरियन इथं १ मार्च २००३ रोजी झालेल्या ह्या सामन्यात भारताचा विजय अधिक अधिकारवाणीचा, बराच मोठा होता.

शोएबच्या दर्पोक्तीला सचिनचं उत्तर
सामन्याच्या आधी शोएब अख्तरनं दर्पोक्ती केली होती. त्याला तेंडुलकरनं (पाऊणशे चेंडूंमध्ये ९८) चोख उत्तर दिलं. त्याच्या साथीला वीरेंद्र सेहवाग होताच. युवराजसिंगनं नाबाद ५० धावा केल्या. भारतानं सहा गडी राखून आरामात विजय मिळविला.

वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या स्पर्धेत या दोन्ही संघांची मैदानावर भेट झालीच नाही. दोन्ही संघ गटातच बाद झाले, हे त्याचं कारण. दोन्ही संघांसाठी ही स्पर्धा ‘आठवणही नका काढू त्याची’ एवढी वाईट ठरली.

भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला तो घरच्या मैदानावर. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली युवराजसिंग ह्यानं लाडक्या सचिन तेंडुलकरला दिलेली भेट ती. स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात पाकिस्तानचा अडथळा दूर लीलया दूर करीत भारतानं दिमाखात अंतिम फेरी गाठली.


मोहालीत पाकिस्तानला मात आणि अंतिम फेरी गाठली.
विश्वचषक आपलाच होता!
......................................
मोहालीमध्ये ३० मार्च २०११ रोजी झालेल्या ह्या सामन्यात पाकिस्तानला पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर (८५) व वीरेंद्र सेहवाग (३८) ह्यांनी त्रास दिला. ह्या जोडीने ३५ चेंडूंमध्ये ४८ धावांची सलामी दिली होती. पाकिस्तानची मधली फळी गडगडल्याने पुन्हा पराभव पत्करावा लागला.

कोहलीचं शतक
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड ह्यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या २०१५मधील विश्वचषक स्पर्धेत भारताची सलामीची लढतच पाकिस्तानशी झाली. विराट कोहलीनं शतक झळकावलं. पाकिस्तानविरुद्धचं विश्वचषकातील हे कोणत्याही भारतीय फलंदाजाचं पहिलंच शतक होतं.


विराट कोहलीचं शानदार शतक.
विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध भारतीय फलंदाजाचं पहिलंच शतक हे.
...................................................
महंमद शमीच्या माऱ्याला त्या दिवशी वेगळीच धार चढली होती. त्यानं घेतलेल्या चार बळींमुळे पाकिस्तानचा डाव २२४ धावांमध्ये संपला. सलग सहाव्या लढतीत पराभव – या वेळचं अंतर अधिक मोठं, ७६ धावांचं!

एव्हाना विश्वचषक स्पर्धेत ह्या दोन देशांमधील सामन्याला ‘महाअंतिम लढत’ असं स्वरूप केव्हाच आलं. अब्जावधी प्रेक्षक डोळ्यांत प्राण आणून बघतात, ज्या सामन्यावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जातो, जाहिरात कंपन्या मालामाल होतात, असा हा सामना. मागच्या विश्वचषक स्पर्धेत (२०१९) तो चौथ्या आठवड्यात झाला.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळला गेलेला भारत-पाकिस्तान सामना थेट पाहणाऱ्या प्रेक्षकांपेक्षा अधिक मजा लुटली ती सोशल मीडियातील ‘ट्रोलर’नी! जांभई देणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराचं चित्र प्रातिनिधिक होतं.

पराभूत मनोवृत्ती
विश्वचषकात पाकिस्तानला सलग सातव्यांदा पराभूत करताना रोहित, विराट, कुलदीप यांनी कुठलीही कसर सोडली नाही. पाकिस्तानी खेळाडू पराभूत मनोवृत्तीनं खेळत असल्याचं सामन्याच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या देहबोलीतून दिसून येत होतं.

पावसानं व्यत्यय आणूनही निकाली झालेल्या ह्या लढतीचा वृत्तान्त प्रसिद्ध करताना इंग्लंडमधील ‘मिरर’ वृत्तपत्रानं लिहिलं की, There are only three certainties in this world. Death, taxes and an Indian victory over Pakistan in the Cricket World Cup.

ह्या सामन्यात उत्कृष्ट दर्जाचा खेळ दिसला; पण तो एकाच बाजूनं – भारताकडूनच! सामन्यातल्या नऊपैकी सात टप्प्यांमध्ये भारताचं निर्विवाद वर्चस्व दिसलं.

देशाला एकदा विश्वचषक जिंकून देणाऱ्या तेव्हाच्या पंतप्रधानांनी - इम्रान खान - ‘खेळपट्टी दमट नसल्यास नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी घे’ असा दिलेला आदेश कर्णधार सर्फराज अहमदनं का कानाआड केला? कुणास ठाऊक!

रोहितचं आक्रमक शतक

मँचेस्टरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध शतक. रोहितच्या आनंदात
कर्णधार विराटही सहभागी.
.....................................................
रोहित शर्मा आणि के. एल. राहुल ह्यांनी सावध सुरुवात करीत शतकी सलामी दिली. बॅटच्या आतील कडेला चाटून चेंडू यष्ट्यांजवळून जाताना रोहित चार वेळा वाचला. नशिबानं जी साथ दिली, त्याचा फायदा घेत त्यानं आक्रमक शतक केलं.

विराटनंही जणू मागच्या स्पर्धेतला डावच पुढं खेळायला सुरुवात केली. डावखुऱ्या महंमद अमिरनं दुसऱ्या टप्प्यात अधिक धारदार गोलंदाजी करूनही भारतानं ३३६ अशी चांगली धावसंख्या केली.

डावरा फखर झमान (६२ धावा) व उजवा बाबर आझम (४८) ह्यांनी दुसऱ्या जोडीसाठी शतकी भागीदारी करून पाकिस्तानसाठी थोडी आशा निर्माण केली होती. त्यातच स्नायू दुखावल्याने भुवनेश्वरकुमार मैदानात नव्हता.

कुलदीपची कमाल

कुलदीपचा आनंद गगनात मावेना...
...................................
आणि नेमक्या वेळी कुलदीप यादवनं कमाल केली. त्याचा चेंडू एवढा अफलातून होता की, तो चेंडू-बॅटमधल्या फटीतून कसा जाऊन यष्ट्यांवर आदळला, हे बाबरला समजलंच नाही!

मग हार्दिक पंड्यानं षट्कात दोन बळी घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडलं. पावसानं व्यत्यय आणला, तेव्हाही डकवर्थ-लुईस नियमावलीनुसार पाकिस्तान विजयापासून फार लांब होतं.

विश्वचषक स्पर्धेचा इतिहास पाकिस्तानला विसरावा वाटणारा असाच आहे. त्याची पुनरावृत्ती अहमदाबादेत करायला रोहित, विराट, हार्दिक पंड्या ह्यांना आवडेलच.
-----------------

खिलाडू कोहली आणि चिडके बिब्बे!

खेळाडूपणा आणि चिडकेपणा ह्याची दोन उदाहरणं ह्या सामन्यात पाहायला मिळाली. चेंडू टाकल्यानंतर खेळपट्टीवर धावत जात असल्याबद्दल अमिर व वहाब रियाझ यांना पंचांनी दोन वेळा ताकीद दिली. पंचांनी स्पष्टपणे दाखवूनही आपण काही चुकीचं करत आहोत, असं वाटत नसल्यासारखाच त्यांचा आविर्भाव होता.

ह्याच सामन्यात ११ हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या कोहलीनं खिलाडूपणाचं उदाहरण घालून दिलं. हूकचा प्रयत्न फसून चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात गेल्यावर पंचाच्या निर्णयाची वाट न पाहता तो सरळ चालू लागला. खरं तर दमट वातावरणामुळं बॅटचं हँडल किंचित सैल होऊन त्याचा किंचित आवाज येतो. हा आवाज बॅटचा चेंडूला स्पर्श झाल्याचा आहे, असाच विराटचा समज झाला.
.................

(छायाचित्रं - विविध संकेतस्थळांच्या सौजन्याने)
..................

#क्रिकेट #विश्वचषक #विश्वचषक23 #भारत_पाकिस्तान #सप्तपदी #सचिन_तेंडुलकर #वीरेंद्र_सेहवाग #विराट_कोहली #व्यंकटेश_प्रसाद #रोहित_शर्मा #मौका_मौका

#cricket #ODI #CWC #CWC2023 #India_Pakistan #Sachin_Tendulkar #Virendra_Sehwag #Virat_Kohli #Rohit_Sharma #Venkatesh_Prasad #maukaa_maukaa

No comments:

Post a Comment

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...