शेगाव! तीर्थक्षेत्र शेगाव. गजाननमहाराजांचं शेगाव. हजारो भाविक-भक्त
असोशीनं तिथं जातात, जाण्याची आस बाळगून असतात ते शेगाव.
शेगावला जाण्याचा
योग सात-आठ वर्षांपूर्वी अचानक जुळून आला. आंध्र प्रदेशातील (आता तेलंगणात) बासर
इथं सरस्वतीदेवीचं दर्शन घेतलं. तिथून शेगावला जाण्याचं ठरवलं. तोवर शेगावबद्दल
फार काही माहीत नव्हतं. म्हणजे ते गजाननमहाराजांचं गाव आहे, याची कल्पना होती.
पुण्यातल्या छोट्या-छोट्या दुकानांवर ‘शेगाव
कचोरी’चे फलक पाहिले होते. पण आपल्याकडची टम्म कचोरीच नेहमी
पाहण्यात (आणि कधी तरीच खाण्यात) असल्यानं अन् ती फारशी आवडत नसल्यानं तिकडे कधी
फिरकलो नाही.
शेगावचा पहिलाच
अनुभव प्रसन्न करणारा ठरला. आनंदसागरनं त्या प्रसन्नतेला वेगळीच झालर चढवली.
पुन्हा एकदा, जमेल तेव्हा शेगावला जायचंच असं तेव्हा ठरवलं होतं.
दरम्यानच्या
काळात ‘व्हॉट्सॲप’ नावाचं
नवं माध्यम उपलब्ध झालं. त्यावर अधूनमधून गजाननमहाराजांविषयी काही काही येत
राहिलं. ते सगळंच्या सगळं काही वाचलं नाही; पण चाळत राहिलो.
संस्थानाचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचा कारभार, त्यांचे सहकारी आणि
सेवेकरी यांच्याबद्दल बरंच काही (सातत्यानं चांगलंच!)
वाचायला मिळालं. वडिलांनी सुनेजवळ ‘एकदा शेगावला जायचं आहे’ असं कधी तरी बोलून दाखवलं. शेगावला पुन्हा जायचंच, असं पुन्हा एकदा ठरवून
टाकलं.
![]() |
शिखराचे दर्शन... |
दिवाळीनंतर
महिन्याभरानं बायकोनं सांगितलं - या महिन्यात शेगावला जायचं. तो निर्णयच होता.
त्यामुळं तयारी सुरू केली. पहिल्यांदा गेलो, तेव्हा मंदिराजवळच्या भक्तनिवासात
राहिलो होतो. त्याच वेळी पाहिलं होतं की, भक्तांच्या निवासाची सोय करण्यासाठी अजून
बऱ्याच इमारती उभ्या राहत आहेत. आनंदसागर परिसरामध्ये अशा भव्य इमारती झाल्याचंही
ऐकलं होतं. मध्यंतरी एकदा सहज संस्थानाच्या संकेतस्थळाला भेट दिली. ‘ऑनलाईन बुकिंग’ करता येत असल्याचं तेव्हा
समजलं. मग आता तेच करावं म्हणून आठ दिवस आधी संकेतस्थळावर गेलो, तर तशी काही सोय
नसल्याचं दिसलं. त्याची चौकशी करावी म्हणून सहज ‘इ-मेल’ पाठविली. उत्तर कधी येईल, याची काहीच कल्पना नव्हती. पण त्याच दिवशी
सायंकाळी, अवघ्या साडेतीन तासांनंतर उत्तर आलं - ‘श्री गजानन
महाराज संस्थानच्या खोल्या आरक्षित करण्याची पद्धत नाही. येथे आलेल्या भाविकांना
उपलब्ध असलेल्या खोल्या क्रमवार पद्धतीने देण्यात येतात.’ सोबत
संपर्कासाठी चार-पाच दूरभाष क्रमांकही दिले होते. साध्या-सोप्या भाषेत, थोडक्यात
पण व्यवस्थित माहिती होती त्यात.
त्याच महिन्यात कधी
तरी जळगावचे श्री. प्रदीप रस्से शेगावला दर्शनासाठी जाऊन आलं होते. तो अनुभव
त्यांनी लिहिला होता, म्हणून त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं, ‘अवश्य जाऊन या. खोल्या मिळतात; कदाचित
थोडं थांबावं लागतं, पण राहण्याची सोय नक्की होते.’ हा मोठाच
दिलासा होता. आम्ही जाणार तेव्हा सुट्या नव्हत्या, शाळाही नुकत्याच चालू झाल्या
होत्या. त्यामुळे फार गर्दी नसणार, याची कल्पना होतीच.
आणखी एक गमतीची
किंवा योगायोगाची गोष्ट म्हणजे, आम्ही जाण्याच्या दोन-तीन दिवसांपूर्वीच ‘व्हॉट्सॲप’च्या एका गटावर शेगावचा अनुभव
पडलेला. मुंबईच्या विनित वर्तक यांनी जे काही लिहिलं होतं, त्यामुळे जाण्याची ओढ
अधिकच वाढली.
![]() |
भक्तनिवास संकुलातील आरामदायी राहण्याची सोय. |
औरंगाबादहून
सकाळी अकराच्या सुमारास निघालो आणि वाटेत दोनदा रस्ता थोडा चुकत संध्याकाळी
शेगावला पोचलो. वाहनानं थेट आनंदविहार भक्तनिवास संकुलातच पोहोचलो. तिथं सगळीकडे
व्यवस्थित माहिती फलक असल्यामुळं चुकण्याचा प्रश्नच नाही. तरीही चाचपडायला झालं,
म्हणून एक-दोघांना विचारल्यावर त्यांनी अदबीनं लगेच माहिती दिली. खोली घेण्यासाठी
म्हणून गेलो, तर तिथं अजिबात गर्दी नव्हती. आम्हीच फक्त. तिथल्या कर्मचाऱ्यानं
किती जण आहेत याची चौकशी करून लगेच पाच जणांसाठी एक प्रशस्त खोली सुचविली - फक्त
950 रुपये. आवश्यक ती कागदपत्र देताच पावती फाडत त्या माउलीनं लगेच खोलीची किल्ली
दिल्ली आणि ती कुठं हेही सांगितलं. प्रशस्त खोली होती. सहा जणांना आरामात राहता
येईल अशी. स्वच्छ पलंगपोस पांघरलेल्या गाद्या असलेले चार पलंग, चकाचक स्वच्छतागृह,
त्यात साबण-टॉवेल, चालू असलेले विजेचे दिवे. जवळच चहा-कॉफीचं यंत्र. सात रुपयांत
चहा आणि नऊ रुपयांत कॉफी. ती देणारा एक सेवेकरी.
गजाननमहाराजांच्या
दर्शनासाठीच आलो होतो. त्यामुळे लगेच संध्याकाळी मंदिरात गेलो. त्या वेळीही
बऱ्यापैकी गर्दी होती. कसं जायचं, कुठून जायचं असले काही प्रश्न फलकांनी सोडविले
होते. पादत्राणं ठेवायला जागा, तिथंही सेवेकरी. सहज म्हणून एका माउलीला विचारलं,
तर त्यानं दिलेली माहिती थक्क करणारी होती - त्या तिथे नऊ हजार पादत्राणांच्या
जोड्या ठेवण्याची सोय होती. म्हणजेच एका वेळी किमान नऊ हजार भाविकांना सहजपणे
सामावून घेण्याची मंदिराच्या परिसराची क्षमता. समाधीच्या दर्शनासाठी जातानाही
फलकांचं आणि आत्मीय भावनेनं तिथं ‘सेवेकरी’ म्हणून थांबलेल्या माणसांचं व्यवस्थित मार्गदर्शन होतंच. माझ्या वयस्कर
वडिलांचा जिना चढायचा त्रास टाळण्यासाठी दोन सेवेकरी माउलींनी आवर्जून वेगळी वाट
दाखविली. समाधीच्या मार्गावर असलेला डिजिटल फलक दर्शनासाठी किती वेळ लागेल, हे
दाखवित होता. एक गट सोडला की, ती वेळ बदलली जायची. कसलाही गोंधळ, ढकलाढकली न होता
दर्शन व्यवस्थित झालं. तिथला अजून एक अनुभव - फोटो काढायला शिकायचं म्हणून हौसेनं
कॅमेरा जवळ ठेवलेला. मंदिराच्या परिसरातील वेगवेगळी छायाचित्रं टिपली. (चुकीमुळं
ती आलीच नाहीत, हा भाग वेगळा!) अन्य कोणत्याही
देवस्थानाप्रमाणं इथंही गाभाऱ्याची, मूर्तीची, समाधीची छायाचित्रं काढण्यास
परवानगी नाही. रांगेत उभं असताना एका माउलीनं विनयानं कॅमेऱ्याकडं बोट दाखवलं. ‘कॅमेरा राहू देतो. छायाचित्रं काढणार नाही,’ या
शब्दांवर विश्वास ठेवून त्यानं मला सहज आत जाऊ दिलं.
त्या दिवशी
एकादशी होती. मंदिराच्या परिसरातील प्रसादालयात त्या दिवशी फक्त फराळ मिळत होता.
अवघ्या 35 रुपयांत एकादशीचा फराळ ‘पोटभर’!
भक्तनिवास संकुलातील भोजनकक्षात 50 रुपयांमध्ये उत्तम जेवणाची सोय
होतीच.
दोन दिवसांच्या
दर्शनानंतर काही गोष्टी 'खटकल्या'. त्याही मांडायला हव्यात - कोणत्याही
तीर्थक्षेत्री मंदिरात जाण्याआधी हार-नारळ-प्रसादाच्या विक्रेत्यांचा ससेमिरा
असतो. काही ठिकाणी त्याचे भाव अवाच्या सवा असतात. काही वेळा हे विक्रेते अंगचटीला
येतात. इथंही तसे विक्रेते होते; पण त्यांचा ससेमिरा
नव्हता. त्यांच्याकडच्या वस्तूंचे दरही वाजवीच. चांगला हार ते पाच ते दहा रुपयांना
विकत होते. मंदिराच्या आवारातील स्वच्छतेबाबत खूप जणांनी लिहिलं आहे. तशी ती होतीच
होती. दर्शनाचा ताण नाही, कोणतीही गैरसोय नाही. आपल्या तीर्थक्षेत्रांची ज्याबद्दल
‘प्रसिद्धी’ आहे, त्याच्या अगदीच
विपरीत अनुभव! देव असाही प्रसन्न होत असतो तर!!
दर्शनानंतर
जाताना कचोरीची आठवण झाली. ‘दहा रुपयांना दोन’, ‘दहा रुपयांना तीन’ अशा
फलकांचा आणि मोठमोठ्या दुकानांचा मोह टाळून चौकशी केली. ‘बेस्ट
शेगाव कचोरी कुठे मिळते?’ जाण्यापूर्वी आंतरजालावर शोध
घेतलाच होता. चौकशीनंतर ‘तीरथराम शर्मा’ या नावावर शिक्कामोर्तब झालं. ताजी, गरमागरम कचोरी फक्त सहा रुपयांना. ‘शेगाव कचोरी’ एवढी प्रसिद्ध आणि चटक लावणारी कशी,
याचं उत्तर रेल्वेस्थानकाजवळील त्या छोटेखानी दुकानात मिळालं.
![]() |
आनंदसागर... एका सुखद सहलीचा प्रारंभ. |
महाराजांचं
मनोभावे दर्शन झाल्यानंतर आनंदसागर उद्यानाला भेट देणं अपरिहार्यच असतं. तिथं
जाण्याआधीच प्रशस्त अल्पोपाहारगृह दिसतं. नाना तऱ्हेचे खाद्यपदार्थ आणि पेयं तिथं
मिळतात. अतिशय अल्प दरामध्ये. त्यामुळं पोटपूजा करणं आवश्यकच.
त्यानंतरच 325 एकरांवर असलेल्या उद्यानात जाणं श्रेयस्कर. या उद्यानात बरंच काही
पाहण्यासारखं आहे. हिरवळ, झाडी, फुलांचे प्रसन्न ताटवे, मत्स्यालय, झुलता पूर...
असं खूप काही. पाहण्यात, फोटो काढण्यात वेळ कसा जातो, हे कळतच नाही. धुरांच्या
रेषा हवेत सोडणारी झुकझुक गाडीही तिथं आहे. हे उद्यान आणि त्यातील ध्यानकेंद्र मन
प्रसन्न करणारं, आखीव-रेखीव, सारं काही टापटिपीचं. एवढं निसर्गरम्य वातावरण असताना
तिथं पुलावरून जाताना ऐकविला जाणारा पक्ष्यांचा कृत्रिम किलबिलाट, छोट्या
रेल्वेगाडीतून प्रवास करताना बाजूला दिसणाऱ्या प्राण्यांच्या भव्य प्रतिकृती
खटकतात. सहज, नैसर्गिक वातावरणाला तीट लावल्यासारखं वाटतं.
शेगाव तीर्थस्थळ
आहेच; पण देवस्थानाच्या कारभाऱ्यांनी त्याला
प्रयत्नपूर्वक, हेतुपूर्वक सुंदर पर्यटनस्थळही बनवलं आहे. निवासाची-अल्पोपाहाराची-भोजनाची
उत्तम सोय; अगदी पाण्याची बाटलीही जेमतेम 8 रुपयांना.
मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय आणि त्याहून खालच्या आर्थिक स्तरातील कुटुंबांसाठी
दोन दिवसांची छान सहल होण्यासारखी. कोणताही आर्थिक ताण न येता दोन दिवस इथं मजेत
घालवून, गजाननमहाराजांच दर्शन घेऊन ती प्रसन्नता बरोबर घेऊन जाता येते.
शेगावमधील
सेवेकरी हा एक वेगळाच प्रकार आहे. त्याबद्दल वेळोवेळी लिहून आलं आहे. डोक्यावर
पांढरी टोपी असलेल्या कोणत्याही माणसाला ‘माउली’ अशी प्रेमानं साद घातली की, तो झटपट तुमच्या मदतीला येतो. त्यांचं वागणं,
त्यांचं बोलणं, मदत करण्याची वृत्ती हे सगळंच विलक्षण. भुरळ पाडणारं. त्यांच्या या
वागण्याचा इतरांवरही कळत-नकळत प्रभाव पडलेला जाणवतो. पहिल्या दिवशी संध्याकाळी
दर्शनासाठी जाताना वाटेत आमचं वाहन पोलिसांनी अडवलं. चालकाकडं सगळी कागदपत्र
व्यवस्थित होती. तरुण वाहतूक पोलिसानं कागदपत्रं बारकाईनं पाहिली. नंतर ती
व्यवस्थित ठेवायला चालकाला सांगितलं. गाडी सुरू करताना तो म्हणाला, ‘‘उद्याही कदाचित गाड्यांची तपासणी चालू राहील. उद्या कुणी अडवलंच तर काल
तपासणी झाली, असं सांगा. म्हणजे लगेच सोडतील.’’ वाहतूक
पोलिसानं परगावचं वाहनं अडवलं आणि सर्व काही व्यवस्थित आहे, हे पाहून लगेच सोडलं,
असा हा पहिलाच अनुभव.
शेगाव... तिथली
व्यवस्था, ती पाहणारं विश्वस्त मंडळ, भाविकांची काळजी घेणारी सारी यंत्रणा, मदतीला
तत्पर असलेली ‘माउली’मंडळी...
देशभरातल्या तीर्थस्थळांनी शेगावला गुरू केलं पाहिजे, असंच सगळं!
....
#ShivShankarBhau #Shegaon #GajananMaharaj #Pilgrimage #AnandSagar #Mauli #Tourism #ReligiousTourism #Maharashtra #Vidarbha
सहज सोप्या ओघवत्या शब्दातून शेगावचे दर्शन झाले. मी एकदा धावती भेट दिली होती.पण हे सर्व वाचून मला पुन्हा एकदा निवांतपणे जावे असे वाटायला लागले आहे
ReplyDeleteआज सर्वत्र भाविकांची गर्दी वाढत्या प्रमाणात आहे असे आढळते आणि तेथील अंधश्रद्धा व कर्मकांडे पाहून माझ्यासारखा आस्तिक माणूस तेथे जायला कचरतो. या पार्श्वभूमीवर सतीश यांचा अनुभव खरोखर अत्यंत आनंददायी आहे.
ReplyDeleteमंगेश नाबर
आवडली शेगावची ओळख. एवढे दिवस नुसतं ऐकून होतो. पण, नीट-सलग असं पहिल्यांदाच वाचायला मिळालं.
ReplyDeleteमस्तच!
- विवेक विसाळ, पुणे
खूप सुंदर आणि योग्य शब्दांत वर्णन! आवडले!
ReplyDelete-एक वाचक
अतिशय सुंदर वर्णन, एकदा तरी भेट देण्याची आस मनात निर्माण करणारे. धन्यवाद.
ReplyDelete-मुकुंद कर्णिक,दुबई
आतापर्यंत शेगावबद्दल खूप (चांगलंच) ऎकलं होतं पण इतकं व्यवस्थित व मुद्देसूद मार्गदर्शन पहिल्यांदाच मिळाले. सर, आपला लेख वाचून शेगावला जाण्याची ओढ आणखी वाढली.
ReplyDeleteसतीश राव छान वर्णन केलं आहे. तीर्थस्थळी किंवा पर्यटनस्थळी जाताना मध्यम आणि निम्नवर्गातील कुटुंबांचे सारे लक्ष बजेटवर असते, त्यामुळे पर्यटनाचा खरा आनंद घेऊ शकत नाहीत, पण आपण केलेल्या वर्णनामुळे मोकळेपणाने तो आनंद घेता येईल. आमचेही जाणे राहिले आहे, आता लवकर जाऊन येवू. विशेष धन्यवाद....
ReplyDeleteएकदम छान. मी पूर्ण लेख लगेच वाचून काढला.
ReplyDelete- राजगुरू पारवे, औसा (जि. लातूर)
खूप सुंदर लिहिलं आहे. वाचताना असं वाटतं की, आपण खुद्द तिथे आहोत की काय!
ReplyDelete- ज्योती थोरात, नगर
लेख वाचला आणि नजरेसमोर साक्षात शेगाव आलं. आनंदसागर, तिथलं निसर्गसौंदर्य, भक्तांच्या हाकेला तत्काळ 'ओ' देणारे सेवेकरी, अर्थात 'माउली'मंडळी, कमालीची स्वच्छता, मन वेधून घेणाऱ्या भक्तनिवासाच्या आकर्षक इमारती, दिशादर्शक फलक, स्वादिष्ट कचोरी आणि श्री गजाननमहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला परिसर... एकंदरित सगळं चित्र डोळ्यांसमोर उभं राहिलं. 'खिडकी'तून एका दृष्टिक्षेपात सर्व काही दिसलं.
ReplyDeleteआपण ज्या विषयावर लिहिता, त्याचे चित्रच डोळ्यांसमोर उभे राहिल्याशिवाय राहत नाही, हे मात्र खात्रीने सांगतो! सध्या रात्रीचे साडेआठ वाजले आहेत. मी बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शहाजहानपूर या छोट्याशा खेड्यात पाहुण्यांकडे आलो आहे. गावात अंधाराचे साम्राज्य आहे. या अंधारातही आपल्या लेखावर माझी भावना व्यक्त करीत आहे.
- बालाजी ढोबळे, परतूर (जि. जालना)
शेगावला जाऊन आल्याचा क्षणभर भास झाला. उत्कृष्ट वर्णन!
ReplyDelete- निरंजन आगाशे, पुणे
वा बढिया! हे वाचून आता नक्कीच शेगावला जाणार...
ReplyDelete- मंगेश कुलकर्णी, पुणे
अप्रतिम!
ReplyDelete- संगमेश्वर जनगावे, चाकूर
अतिशय सुंदर माहिती. अलीकडे शेगावला जाऊन आलेले भाविक, मित्र व कुटुंबीय देवस्थानाविषयी, तिथल्या सोयी-सुविधांबद्दल आदराने बोलतात. शेगावला जाऊन आल्याचे प्रासादिक भाव त्यांच्या चेहऱ्यावर सहज दिसतात, जाणवतात.
ReplyDelete- संजय आढाव, नगर
अप्रतिम... प्रतिक्रियेसाठी शब्दच नाहीत!
ReplyDelete- जगदीश निलाखे, सोलापूर
मलाही दर्शन घडले आणि सहल झाली. खूप नेमके, सहज व सोपे वर्णन केले आहेत.
ReplyDelete- भरत वेदपाठक, नगर
'खिडकी'तून शेगावदर्शन छान. पूर्ण वाचून होईपर्यंत थांबावेच वाटत नाही. वाचत असताना आपण शेगावमध्ये आहोत, असे वाटते. तेथे जाण्याचा योग सप्टेंबरमध्येच आला होता.
ReplyDelete- संदिपान तोंडे, किल्ले धारूर (जि. बीड)
किती सहज, सोप्या व सुंदर भाषेत गजाननमहाराजांच्या शेगावचे वर्णन तू केले आहेस! वाचताना सतत शेगावमध्येच आहोत, असा भास होत होता. आजपर्यंत शेगावमधील सेवेकरी माउलीबद्दल कोठे प्रसिद्धी नव्हती. या माउलीच्या सेवेचे तू विनम्रतेने कौतुक केले आहेस. खूपच छान लेख! जय गजानन!!
ReplyDelete- रवींद्र तु. चव्हाण, पुणे
छान प्रांजळ लिहील आहे , जाण्याची ओढ लागावी असे.
ReplyDelete--विनय गुणे
खुपच सुरेख वर्णन. महाराजांच्या योगशक्तीमध्ये जितकी ताकद आहेत, त्याच धर्तीवरच या शब्दांमध्ये ताकद आहे. त्यांचा वरदहस्त तुमच्यावर असल्याचे लेखनातून जाणवत राहले. धन्यवाद शेअर केल्याबद्दल.
Deleteश्रीराम ओक, पुणे
छान लिहिलंय. शेवगावला आम्ही गेलो होतो साधारण तीन वर्षांपूर्वी. खूप प्रसन्न वातावरण आहे तिथं. लेख वाचून आठवणी ताज्या झाल्या. मनाने पुन्हा शेगावला गेल्यासारखं वाटलं.
ReplyDeleteआणि कचोरी प्रकाराबाबत आपलं मत सारखंच आहे. मला तर तिथेही नाही आवडली. तीव्र वास येतो त्या कचोरीला. असो! प्रवासवर्णन छानच!
- श्वेता बंगाळ, नगर
superb naration sir...........
ReplyDeleteशेगावबद्दल खूप जणांकडून ऐकत आलोय! त्यांचं अनुकरण इतर तीर्थक्षेत्री झाले पाहिजे. लेखासाठी आभार!
ReplyDelete- पुंडलिक वझे
This is a detailed description n it is very much useful for those who wish to visit Shegaav.
ReplyDeleteI m very happy that everything of Shegaav is covered in this guide- line.
I frequently take Darshan n every time i get something new.
Oh ! Shegaon.....
- Pradeep Rasse.
टिप्पणीत एका वाचकानं म्हटल्याप्रमाणे खरोखर शेगावच्या सहलीचं हे वर्णन वाचून एकदा तरी तिथे जाऊन यावं असं वाटतं. छान आहे हा लेख.
ReplyDeleteलेख पुन्हा एकदा नीट पाहिल्यावर लक्षात आलं की, तुम्ही स्वतःच्या कॅमेऱ्यावर काढलेले फोटो आलेच नाही असं म्हणता. पण लेखात दिलेले सर्वच फोटो सुंदर आले आहेत. ते कुणाचे?
- मृदुला जोशी
ते पहिल्या दिवशीचे फोटो होते. दुसऱ्या दिवशी, सूर्यप्रकाशातील छायाचित्रे मीच काढूनही बरी आली आहेत, मृदुलाताई!
DeleteAwesome experience shared by Satishji ..!!!
ReplyDeleteसुंदर लेख. 'देशभरातील देवस्थानांनी शेगाव संस्थानला गुरू करावं', ही टिपण्णी अप्रतिम आणि सत्यच. मला नेहमीच चांगले अनुभव शेगावला मिळालेत. देवाचे दर्शन प्रसन्न वातावरणात व्हावे, ही इच्छा शेगावला निश्चितच पूर्ण होते.
ReplyDeleteआनंदसागर अनुभवणे हा एक वेगळाच आनंद आहे. तिथल्या 'ट्रेन' सफारीत मधल्या जंगलातले प्राणी मलाही खटकले होते. पण त्या मागच्या विचाराचा आढावा घेतला तर त्यांची प्रामाणिक तळमळच दिसून येते.
मी ध्यानमंदिरात बसलो, तेव्हा जाणवलं की कुठल्याही देवस्थानात आपली खूपच हाड्याहाड्या होते. तुच्छतेचीच वागणूक मिळते. त्यामुळे शेगावचा अनुभव हा विपरीत वाटायला लागतो. आपल्याला विश्वासच वाटत नाही. आणि मग आपण त्यात काहीतरी खोट शोधायला लागतो. असो!
मुख्य मंदिरात ५० रुपये अभिषेकाची पावती केली, तर आनंदसागरचे तिकीट काढावे लागत नाही. फक्त ती पावती दाखवली तरी चालते.
हैदराबादला गोवळकोंड्याजवळ चिलकूर बालाजी म्हणून एक मंदिर आहे. तिथला पुजारी तर देवासमोर पैसे ठेवू देत नाही. आपण पैसे ठेवले, तर हातात परत देतो. देवासमोर हात जोडले की, नकळत डोळे मिटले जातात. तर इथला पुजारी म्हणाला, 'डोळे उघडे ठेवा आणि मूर्ती मन भरून पाहा. एवढ्या लांबून आलात आणि देवासमोर आल्यावर डोळे मिटून घेता. काय उपयोग?' हे ऐकून तर मला चक्कर यायचीच बाकी राहिली होती.
- प्रशांत पिंपळनेरकर
सर, एकदम सुंदर
ReplyDeleteसुरेख लिहिलंय. छान. उपयुक्त माहितीदेखील मिळाली
ReplyDeleteनिर्माल्य, फोडलेल्या नारळाचा वास, कोंबड्या-बकऱ्यांचा बळी यापासून मुक्त असलेलं शेगावच्या गजानन महाराजांच मंदिर. आनंदसागर म्हणजे या मंदिरावर कळस. आपण, मला, माझ्या सर्व कुटुंबालाच नव्हे तर सर्व वाचकांना खिडकीत बसवून शेगावची सफर घडविली. धन्यवाद!
ReplyDelete- श्रीराम वांढरे, नगर
अवर्णनीय वर्णन !
ReplyDeleteSunder....
ReplyDeleteAnil KOkil