शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

स्वप्न ‘हायजिन सिटी’चं!

खाद्यसाधन हे एक प्रकारचे योगसाधन आहे. अनेक इंद्रियांवर विजय मिळवून खावे लागते. त्यांत मुख्य आवरावे लागते ते स्वच्छतेचे इंद्रिय. त्यानंतर आरोग्यविषयक पाणचट कल्पना...
माझे खाद्यजीवन’ : ‘हसवणूक’, पु. ल. देशपांडे

वाचताना हा मजकूर खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत वाटतो खरा. हसूही येतं. वर्षानुवर्षं आपण ऐकत असलेल्या चव आणि स्वच्छता या व्यस्त प्रमाणाला पु. ल. यांच्यासारख्या मोठ्या लेखकानं दिलेलं हे प्रमाणपत्र वाचून बरं वाटतं. भज्यांचा घाणा तळताना कपाळावरचा घाम मनगट-तळव्यानं निपटत तोच कढईत टाकून तेल पुरेसं तापलं की नाही, हे पाहणारा भट्टीवाला आपण ऐकून असतो. बेकरीतले कारागीर पावाचा मैदा कसा कुंभारासारखा पायानं तुडवतात, याचे किस्सेही कोणी कधी तरी सांगितलेले असतात. त्यामुळंच चवीची स्वच्छतेशी सांगड घालण्याचं कारण नाही, असा (गैर)समज खोलवर रुजलेला असतो.

ऐकून-वाचून हसण्यापुरतं हे ठीक आहे. प्रत्यक्षात पोटपूजा करताना चित्र थोडं विचित्र असलं, तर कपाळावर आठ्या उमटतात.स्वच्छतेचे इंद्रिय आवरण्याचा सल्ला देणारे पु. ल. याच लेखात पुढे लिहितात,  मथुरेची रबडी ही कशी दिसते हे मी अजूनही पाहू शकलो नाही. त्या भांड्यावर सहस्रावधी मक्षिकांचा कुंभमेळा जमलेला असतो. हलवाई हा मुख्यतः मक्षिकापालन करतो. मला वाटते, माशा हाकलण्यासाठी तो सारखा हात हलवत असतो, म्हणूनच त्याला 'हलवाई' म्हणत असावेत.

ही गोष्ट नगरची. पाव आणण्यासाठी एक गृहिणी बेकरीत गेली होती. तिथं तिला दिसलं की, एका कर्मचाऱ्याला सोरायसिस आहे. त्यानं बनवलेला पाव मुलांना द्यायचा? आपण खायचा? कल्पनेनं तिच्या अंगावर काटा आला. एका उपाहारगृहात काम करणाऱ्या मावशींनी स्वच्छता, पाणी, भाज्या बनविणं याबाबत कशी बेफिकिरी असते, ते सांगितलं आणि नंतर एका उपाहारगृहात दिसलेलं (अस्वच्छ) चित्र पाहून ही गृहिणी अधिकच अस्वस्थ झाली. हे सारं बदललं पाहिजे असं तिला मनापासून वाटू लागलं. ग्राहकब्रँडबद्दल एवढे आग्रही असतात, मग त्यांनी खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत का आग्रह धरू नये? मेन्यूएवढंच महत्त्व ते पदार्थ बनविताना स्वच्छता-आरोग्य पाळण्याला का नसावं? याबाबत जागरूकता का नाही? बाईंच्या मनात असे प्रश्न उभे राहिले. ते छळू लागले.
 
प्रेरक तंत्राचा लँडमार्क हा अभ्यासक्रम औरंगाबाद येथे करताना या गृहिणीपुढं एक संधी चालून आली. त्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट उद्दिष्ट मनात ठेवून प्रकल्प करायचा होता. मनात प्रश्न होतेच. त्यातूनच कल्पना सुचली आणि ठरलं - फूड हायजिनबद्दल काम करायचं. अन्नपदार्थ स्वच्छ कसे मिळतील, एवढ्याचसाठी काम करायचं!

अस्वस्थ असलेल्या त्या गृहिणीला - वैशाली रोहित गांधी यांना ही कल्पना सुचली आणि हायजिन फर्स्टचा जन्म झाला. या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नगरसारख्या मध्यम शहरात पावणेतीन वर्षांमध्ये मूलभूत आणि लक्षणीय काम होताना दिसत आहे. खाद्यपदार्थ बनविताना-विकताना स्वच्छता हवी, हे पटवून देणं हाच संस्थेचा उद्देश. हातगाडीपासून हॉटेलापर्यंत स्वच्छता पाळण्याचा आग्रह, त्यासाठी जागृती आणि प्रबोधन. अशा मुद्द्यांवर काम करणारी ही नगरमधली पहिली आणि एकमेव संस्था. नगरमध्ये गेल्या पंधरवड्यात झालेल्या कार्यक्रमात हॉटेल आयरिस प्रीमियरला या वर्षीचं हायजिन फर्स्ट - फाइव्ह स्टार मानांकन देण्यात आलं. स्वच्छता-आरोग्यपूर्ण वातावरण एवढाच या मानांकनाचा निकष होता. त्यासाठी हायजिन फर्स्टच्या सदस्यांनी वेळोवेळी तिथे जाऊन पाहणी केली.
हायजिन फर्स्टकडून पंचतारांकित मानांकन मिळविणाऱ्या नगरच्या हॉटेल आयरिस प्रीमियरचे कर्मचारी प्रमाणपत्र आनंदाने दाखविताना.
वैशाली गांधी यांना संस्था सुरू करून असं काम करावं वाटलं आणि त्याला घरातून पाठिंबा मिळाला. पती डॉ. रोहित व सासूबाईंसह इतरांनी त्यांना त्यासाठी मोकळीक दिली. असं काम करण्याचा उद्देश बोलून दाखविला आणि हायजिन फर्स्टच्या टीममध्ये लगेच मनीष बोरा, विजय देशपांडे, नवीन दळवी, रूपाली बिहाणी, सविता कटारिया, वैशाली झंवर, निर्मल गांधी, दीपाली चुत्तर, अन्न निरीक्षक आदिनाथ बाचकर आदी सहभागी झाले. पत्नीला साथ द्यायला डॉ. रोहित गांधी होतेच. सध्या संस्थेच्या कामकाजात जवळपास २५ जण नियमितपणे भाग घेतात. त्यामध्ये स्वच्छतादूत डॉ. आश्लेषा भांडारकर, वैशाली झंवर, प्रा. गिरीश कुकरेजा, वैशाली मुनोत, कीर्ती शिंगवी, रजत दायमा, सागर शर्मा, पियूष शिंगवी, मयूर राहिंज, मेहेर प्रकाश तिवारी, ईश्वर बोरा, अशोक सचदेव, प्रसाद बेडेकर आदींचा समावेश आहे. वैशाली गांधी यांनी ट्रस्ट म्हणून संस्थेची नोंदणी केली आहे.

मिठाया, विशेषतः दुधापासून बनविलेल्या मिठायांबाबत फार काळजी घ्यावी लागते. दुग्धजन्य पदार्थ अनेकदा त्रासदायक ठरतात. त्याला काही वेळा भेसळीचं निमित्त असलं, तरी पदार्थ बनविताना स्वच्छतेची काळजी न घेणं हेही महत्त्वाचं कारण असतं. हे लक्षात घेऊनच हायजिन फर्स्टने पहिला कार्यक्रम ठरविला मिठाई उत्पादकांसाठी. संस्थेने मिठाई व्यावसायिकांसाठी कार्यशाळा घेतली. त्यात स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगितलं. कार्यशाळेनंतर पाठपुरावा ठेवला. या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं, अशी अपेक्षा होती. शहरातील प्रसिद्ध बंबईवाला मिठाई दालनाचा या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. चहाची टपरी, खाद्यपदार्थांची हातगाडी, मिठायांची दालनं, भोजनशाळा, उपाहारगृहं... जिथं-जिथं खाद्यपदार्थ तयार करून विकले जातात, अशा प्रत्येक प्रकारासाठी रोल मॉडेल तयार करण्याचं संस्थेनं ठरवलं. आरोग्याचे-स्वच्छतेचे सगळे निकष पूर्ण करील, अशा निवडक व्यावसायिकांना 'हायजिन फर्स्ट अॅप्रसिएशन अॅवॉर्ड'ने सन्मानित करण्याचा प्रयोग पहिल्याच वर्षी करण्यात आला. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते १२ डिसेंबर २०१५ रोजी या प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं.
चटपटीत भेळेचा आनंद आता अधिकच वाढला.
चोख स्वच्छता आणि त्याबद्दल प्रमाणपत्र.
वैशाली गांधी  व दीपाली चुत्तर यांनी आनंद भेळच्या
संचालकांना प्रमाणपत्र दिले.
एकदा प्रमाणपत्र देऊन गौरवून चालणार नाही; त्यातून मोहिमेचं यश आणि होणारी जागृती तेवढ्यापुरतीच राहील, असं हायजिन फर्स्टमध्ये काम करणाऱ्यांच्या लक्षात आलं. या उपक्रमाबद्दल व्यावसायिकांना नेहमीच आस्था वाटावी आणि त्यांनी स्वच्छतेचं तत्त्व कायमस्वरूपी अंगीकारावं, यासाठी मग स्टार रेटिंगची कल्पना पुढे आली. या उपक्रमाची जबाबदारी स्वीकारली अशोक सचदेव यांनी. त्यात प्रत्येक गोष्टीसाठी गुणांकन ठरवण्यात आलं. म्हणजे कर्मचाऱ्यांचे कपडे स्वच्छ असतील तर एक गुण, अॅप्रन असेल तर एक गुण, तो स्वच्छ असेल तर अजून एक गुण... या प्रमाणे. त्यासाठी टप्प्यानुसार वाटचालही ठरवून देण्यात आली. उपाहारगृहांसाठी ३५ दिवसांचे पाच टप्पे ठरविण्यात आले. त्यात काय अपेक्षित आहे, हे नक्की करण्यात आलं. हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांसाठी १५ दिवसांचे तीन टप्पे होते. त्यानुसार अंमलबजावणी होते का, याची प्रत्येक टप्प्यात पाहणी करण्यात आली.

हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांसाठी हायजिन फर्स्टने गेल्या डिसेंबरमध्ये एक वेगळीच स्पर्धा आयोजित केली - स्वच्छ अन्नपदार्थ पुरवा आणि हमखास बक्षीस मिळवा!’ त्यात नगरच्या तीन विभागांमधील तब्बल ५५ व्यावसायिकांनी भाग घेतला. स्वच्छतेचं महत्त्व पटावं, सवय लागावी म्हणून या व्यावसायिकांना कचराकुंड्या देण्यात आल्या; तिथं काम करणाऱ्यांना अॅप्रन, टोपी असं साहित्य पुरविण्यात आलं. स्वच्छतेचं पालन होतं की नाही, हे ग्राहकांनी कळवावं म्हणून मिस्ड कॉल देण्याची सोयही करण्यात आली. या उपक्रमाचं फलित म्हणजे प्रोफेसर कॉलनी चौकातील व्यावसायिकांनी स्वच्छतेचा वसा केवळ स्पर्धेपुरता नव्हे, तर कायमचा म्हणून स्वीकारला! मोहिमेला आलेलं हे मोठंच यश, असं वैशाली गांधी मानतात.

संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील बचपन स्कूलमध्ये
जागृतीपर कार्यक्रम. प्रा. गिरीश कुकरेजा यांनी 
छोट्या मित्रांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

हातगाडीवाले, उपाहारगृहे यांना मोहिमेत थेट सहभागी करून घेतानाच, हायजिन फर्स्टने प्रबोधन-जनजागृती या पातळ्यांवरही काम सुरू ठेवलं. संस्थेच्या सदस्यांनी नगरमधील व जिल्ह्यांतील काही शाळांमध्ये, दादी-नानी क्लबसारख्या सामाजिक संस्थांमध्ये जाऊन खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेचं महत्त्व पटवलं. स्वच्छतेबद्दल डॉक्टरांएवढं अधिकारवाणीनं कोण सांगणार आणि त्यांनी सांगितलं की, ते कोण टाळणार? संस्थेनं हे ओळखलं आणि आपल्या या कामात नगरमधील डॉक्टरांना सहभागी करून घेतलं. स्वच्छतेचा संदेश देण्याच्या या कामात शहरातील १०० डॉक्टर आनंदानं सहभागी झाले. हायजिन फर्स्टची तशी माहितीपर प्रबोधनात्मक भित्तीपत्रकं त्यांनी आपल्या दवाखान्यात-रुग्णालयात लावली.

हायजिन फर्स्टचा स्वच्छतेचा आग्रह केवळ खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांपुरताच नाही. समाजाशी असलेली बांधिलकी खऱ्या अर्थाने जपण्यासाठी संस्थेनं अंगणवाड्याही गाठल्या. छोट्या मुलांना पोषणआहार देणाऱ्या अंगणवाड्यांमध्येही स्वच्छता जपली गेली पाहिजे; तिथं तर ती अधिक महत्त्वाची आहे, हे लक्षात घेऊन नगर तालुक्यातील ५३ अंगणवाड्यांमध्ये काम सुरू आहे. त्याला जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा, पदाधिकारी-अधिकाऱ्यांचा मनापासून पाठिंबा मिळाला. सर्वांच्या प्रयत्नांमधून तिथं हे काम जोमात आणि मनापासून सुरू आहे.
अंगणवाडीपर्यंत पोहोचले हायजिन फर्स्ट. नगर तालुक्यातील निंबोळी येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अॅप्रन, टोप्या आणि कचरापेट्यांचेही वाटप करण्यात आले.
हायजिन फर्स्ट एक टीम म्हणून काम करते हे खरंच. पण या संघाला तेवढाच चतुरस्र कर्णधार लाभला आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं. या अघोषित कर्णधारपदाची जबाबदारी वैशाली गांधी मोठ्या आवडीने पार पाडत आहेत. हे आयुष्यभराचं काम आहे, असं मानणाऱ्या गांधी त्यासाठी आठवड्यातले किमान तीन दिवस देतात. ते करताना घरातल्या कोणत्याच जबाबदारीकडे दुर्लक्ष होऊ न देण्याचं भानही त्या बाळगून असतात. त्या म्हणाल्या, ‘‘सकाळी झोपेतून उठल्यावर पहिला विचार येतो तो याच कामाचा. हायजिन फर्स्ट माझं तिसरं मूलच आहे! या मोहिमेत महिलांनी आपणहून सहभागी व्हावं, ही लोकचळवळ व्हावी. अन्नपदार्थाचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी सरकारनं स्वच्छतेच्या नियमांचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ तयार होतात ती मंगल कार्यालयं, वसतिगृहं, भोजनशाळा इथं स्वच्छता महत्त्वाची आहेच. या प्रवासात नरेंद्र फिरोदिया यांचे भरपूर सहकार्य मिळाले. डॉ. किरण दीपक आणि डॉ. वैशाली किरण यांचीही खूप मदत झाली. 'चितळे बंधू मिठाईवाले'चे गिरीश चितळे यांनी वेळोवेळी कौतुक करून महत्त्वाच्या सूचना केल्या.’’

पंतप्रधान या नात्यानं लाल किल्ल्यावरून केलेल्या पहिल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानची संकल्पना बोलून दाखविली. त्याच्याशी नातं सांगणारा हायजिन फर्स्ट उपक्रम साधारण सात महिन्यांतच नगरमधून सुरू झाला. 'स्वच्छ भारत' मोहिमेत देशभरातील ४३४ शहरांची पाहणी करण्यात आली. त्याची यादी यंदाच्या मेमध्ये जाहीर झाली. त्यात नगरचा क्रमांक बऱ्यापैकी खालचा, म्हणजे १८३ होता. याच नगरला हायजिन सिटी बनविण्याचं स्वप्न वैशाली गांधी आणि त्यांचे सारे सहकारी पाहत आहेत. अथक धडपड करीत, न थांबता पुढे पुढे जात, संवाद साधत, प्रबोधन करीत स्वप्नपूर्ती करण्याची मनीषा हायजिन फर्स्ट बाळगून आहे.

लेख किंवा त्यातील अंश पूर्वपरवानगीशिवाय वापरू नये, ही विनंती. )

१४ टिप्पण्या:

  1. फारच छान आणि अनुकरणीय उपक्रम. वैशाली गांधी यांचे विशेष अभिनंदन. याला अधिक व्यापक प्रसिद्धी द्यायला हवी. सतीश तुझे ही अभिनंदन आणि धन्यवादही..

    उत्तर द्याहटवा
  2. 'हायजिन सिटी'साठी 'हायजित फर्स्ट' करीत असलेले काम फर्स्ट क्लास आहे! किमान त्यासाठी तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इतिहासात नोंद घेतली जाईल.
    - विवेक विसाळ, पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. कुठलंही विधायक काम करायला फार मोठी कौटुंबिक किंवा इतर पार्श्वभूमी हवी, असं मुळीच नाही. प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी, समाजाबद्दल उत्तरदायित्व असल्याची भावना असेल, तर एक सर्वसाधारण महिला काय करू शकते, याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
    - दिलीप वैद्य, पुणे

    उत्तर द्याहटवा
  4. खऱ्या अर्थाने ही प्रबोधन करणारी चळवळ आहे. यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.
    - अपर्णा देवगावकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  5. अन्नपदार्थांच्या स्वच्छतेची मोहीम आखणारी संघटना व तिचा परिचय करून देणारे, दोन्ही ग्रेट!
    - संजीवनी कुलकर्णी, चिंचवड, पुणे

    उत्तर द्याहटवा
  6. लेख वाचला, छान वाटले! वाचल्यावर मला पहिल्यांदा कळले की, नगरमध्ये असा काही उपक्रम चालू आहे. पण तो सर्व नगरमध्ये दिसला पाहिजे.
    - ज्योती थोरात, नगर

    उत्तर द्याहटवा
  7. प्रसिद्ध डॉक्टरांनी लिहिलेले 'आहार व आरोग्य' पुस्तक वाचण्यात आले होते. 'परंतु आजकाल काय खावे आणि काय खाऊ नये हा डॉक्टरांनाही पडलेला प्रश्न आहे,' असं म्हणून डॉक्टरांनी पुस्तक संपवले होते. अशा परिस्थितीत खारीच्या वाट्याने स्वच्छतेचा सेतू उभारणीत सहभाग दिला जात आहे व त्यावर आपण 'खिडकी'तून प्रकाश टाकून सहभागास उभारी दिली आहे. आपला लेख 'Charity Begins at Home' हाच संदेश देत आहे.
    - श्रीराम वांढरे, भिंगार, नगर

    उत्तर द्याहटवा
  8. Thank you for appreciation. We need your support and cooperation firbthe same. Thank you once again.

    उत्तर द्याहटवा
  9. अन्नपदार्थांच्या स्वच्छते विषयी मोहिम हा उपक्रम हाती घ्यावा हा विचारच मुळात क्रांतिकारी आहे. तो तुम्ही सर्वांनी उचलून धरलात आणि त्यातून एक विधायक चळवळ सुरू केलीत​ त्याबद्दल तुमचे अभिनंदन. या उपक्रमाला यश मिळो आणि तुमचे हे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून स्वच्छते विषयी जागरूकता​ पसरो हि सदिच्छा.
    -नम्रता पठारे

    उत्तर द्याहटवा
  10. उत्तम लेख . अतिशय स्तुत्य उपक्रम. मुख्य म्हणजे लेखामधील 'स्वच्छ' मराठी . अशी भाषा अलीकडे क्वचितच वाचायला मिळते.

    उत्तर द्याहटवा
  11. Sundar Lekh

    --
    Gajanan Ghodake,
    Assistant Professor,
    Dongguk University-Seoul

    उत्तर द्याहटवा
  12. मुकुंद कर्णिक, दुबई१० जानेवारी, २०१८ रोजी ४:३९ PM

    'हायजिन फर्स्ट' या अभियानाबद्दल प्रणेत्या सौ वैशाली गांधी आणि त्यांचे सर्व सहकारी अभिन॔दनाचे आणि कौतुकाचे हक्कदार आहेत.या अभियानासारखा उपक्रम इतरही शहरांत, गावागावांत राबवला जाईल तर स्वच्छ भारताबरोबर स्वस्थ भारतही जगाला दिसेल. माझ्याकडून अभिनंदन आणि अभिवादनही! श्री सतीशराव कुलकर्णी यांनी हा सुंदर माहितीपूर्ण लेख लिहून जनजागृती करण्यातील खारीचा आपला वाटा उचलला त्यासाठी त्यांचेदेखील मी अभिनंदनपूर्वक आभार मानतो. शभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  13. Yesss! Personal hygiene only will help us live better. No matter at home or office or elsewhere!!
    - Dr. Jyoti R. Patil, Karhaad (Satara)

    उत्तर द्याहटवा
  14. खिडकीतून बघायला तसा उशीरच झाला. आपली लेखणी नेहमीच भुरळ घालत आली आहे. 'हायजीन फर्स्ट'परिवाराचं केवळ कौतुकच नव्हे तर खूप अभिमान वाटतो. पंतप्रधानांनी आग्रह धरावा, दिल्लीच्या तख्तावरून साद घालावी इतके आपण आपल्या स्वच्छतेबदल जागरूक आहोत!
    पुलंच्या खुसखुशीत संदर्भानं आणि आपल्या पावभजींच्या अनुभवाने काही आठवणी ताज्या झाल्या.
    आमच्याकडे खांडसरी साखर कारखाना होता. (आता बंद पडलाय!आधुनिक तंत्रज्ञान युगात असे कैक व्यवसाय बंद पडलेत!) तिथे साखर वाळवण्यासाठी मोठ्या मैदानात पसरून ठेवली जायची. बायका या कडेपासून त्या कडेपर्यंत पायाने साखर पसरवत. चालताना तंबाखूची पिचकारी बिनधास्त त्या साखरेत मिसळून टाकत.म्हणूनच खांडसरी साखर पांढरी शुभ्र नसावी!हे दृष्य 'उघडा डोळे बघा नीट'असे साठवून ठेवलेले. नंतर आख्ख्या आयुष्यात खांडसरी साखर खायची हिंमत झाली नाही.
    गावोगावी 'हायजीन फर्स्ट'रुजवणं गरजेचं आहे. नगरचा वारसा नांदेडला यावा ही प्रार्थना.
    खिडकीतून भटकंतीचा आनंद औरच!
    धन्यवाद आणि शुभेच्छा...

    उत्तर द्याहटवा

प्रतापराव....

प्रतापरावांचं हे छायाचित्र त्यांच्या गावच्या शिवारातील. आम्ही हुरडा खायला गेलो होतो, त्या वेळचं. त्यांच्या खांद्याला अडकवलेली पिशवी माझी आहे...