Wednesday 10 January 2018

विदर्भाचे वाघ

फैज फजल त्या दिवशी काही क्षण खरंच गडबडला असेल का? मनात आलेला निर्णय प्रत्यक्षात उतरवताना त्याची द्विधा अवस्था झाली असेल का? इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिलं षट्क टाकण्यासाठी विदर्भाचा कर्णधार फजलने आदित्य ठाकरे याच्याकडे चेंडू सोपवण्याचा तो निर्णय.

देशातल्या क्रिकेटमधील सर्वांत महत्त्वाच्या आणि अर्थातच प्रतिष्ठेच्या रणजी स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाचा संघ पहिल्यांदाच पोहोचला होता. समोर दिल्लीसारखा प्रतिस्पर्धी. सात वेळा करंडक जिंकलेल्या दिल्लीनं तब्बल दशकानंतर अंतिम फेरी गाठलेली. अवघं १९ वय असलेल्या आदित्य ठाकरेचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधला तो पहिलाच सामना. छत्तीस कसोटी खेळलेला उमेश यादव दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेल्याने आदित्यला संधी मिळालेली. त्यानं पहिलाच चेंडू नो-बॉल टाकल्यावर फैजची पुन्हा चलबिचल झाली असेल का? आणि त्याच षट्कातल्या चौथ्या चेंडूवर पहिल्या स्लिपमध्ये कुणाल चंदेलाचा झेल पकडताना फैजला दुप्पट आनंद झाला असेल का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फैज फजलने रणजी करंडक स्वीकारण्याच्या काही वेळ आधी दिली. या मोसमात विदर्भाचा हुकमी एक्का ठरलेल्या रजनीश गुरबानी यानं डावातलं दुसरं षट्क टाकावं, अशी कर्णधाराची इच्छा होती. कारण ते संघासाठी लकी असतं, असं तो मानतो. म्हणून तर त्यानं सामन्यातल्या पहिल्या षट्काची जबाबदारी आदित्यवर सोपविली होती. तो एक प्रकारचा जुगार होता का, हे नाही सांगता येणार. पण फैज आणि त्याचा संघ निर्विवादपणे जिंकले, हे खरं! विदर्भवासीयांचं आणि तिथल्या क्रिकेटपटूंचं अनेक वर्षांचं स्वप्न फैज, गुरबानी, अक्षय वाडकर, आदित्य सरवटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी साकार केलं. फेव्हरिट मानल्या जाणाऱ्या, गौतम गंभीर, ऋषभ पंत, नितीश राणा, नवदीप सैनी यांच्यासारखे खेळाडू असलेल्या दिल्लीवर निर्णायक विजय. नऊ गडी राखून दणदणीत जय!

रणजी करंडक जिंकल्याचा जल्लोष (छायाचित्र www.bcci.tv यांच्या सौजन्याने)
हल्ली सगळं काही नागपूर, विदर्भाकडंच चाललं आहे, अशी काहीशी मिश्कील टिप्पणी, म्हटलं तर टीका एका विरोधी नेत्यानं गेल्याच आठवड्यात केली. तिला दुजोरा देताना विदर्भाच्या वाघांनी रणजी करंडकही पटकाविला. महाराष्ट्राचा संघ प्राथमिक फेरीतच गटात तिसऱ्या स्थानावर ढेपाळल्यावर आणि मुंबईचं कथित आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत कर्नाटकानं डावानं मोडीत काढल्यावर रणजी करंडकाचा विचार (अखंड) महाराष्ट्रानं सोडला होता. क्रिकेटमध्ये तरी स्वतंत्र असलेल्या विदर्भातले चाहतेही त्याबाबत कदाचित फार आशावादी नसतील. अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळाच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या याचीच साक्ष देतात. बहुतेक वृत्तपत्रांमध्ये पहिल्या दिवशीची बातमी घडीखाली, आटोपशीर आहे. असं असताना विदर्भाची आगेकूच मात्र पद्धतशीर सुरू होती. अंडरडॉग्ज म्हणविल्या गेलेल्या कपिलदेवच्या संघानं १९८३मध्ये विश्वचषक स्पर्धेत जे कर्तृत्व दाखविलं, त्याच्याशीच विदर्भाच्या यंदाच्या कामगिरीची तुलना केली, तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भानं मोसमाच्या पहिल्या दिवसापासून आखणी आणि त्यानुसार अंमलबजावणी सुरू केली. रणजी करंडक आपलाच असा संकल्प सोडून विदर्भानं सुरुवात केली आणि संकल्पसिद्धीनं मोसमाची सांगता केली. गटात चार निर्णायक विजय आणि ३१ गुणांसह विदर्भानं पहिलं स्थान मिळविलं. साखळी सामन्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध पहिल्या डावात आघाडी मिळविण्यात फक्त छत्तीसगडला यश आलं. पहिल्या डावात पिछाडीवर राहण्याची वेळ विदर्भावर नंतर आली ती बलाढ्य कर्नाटकविरुद्धच्या उपान्त्य सामन्यात. पण ११६ धावांनी मागे पडल्यानंतर विदर्भानं बाजी मारलीच. अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचं पारडं जवळपास समान होतं. पण त्यानंतरचे तिन्ही दिवस वर्चस्व राहिलं ते विदर्भाचं.

अंतिम सामन्यातल्या विदर्भाच्या निर्णायक, बिनतोड यशाचं श्रेय कुणाकुणाला? तर दुसऱ्या दिवशी हॅटट्रिक घेऊन दिल्लीचा डाव गुंडाळणाऱ्या रजनीश गुरबानीला, त्यानंतर चांगली सलामी देणाऱ्या फैज-संजय रामास्वामी जोडीला आणि डावाला आकार देणाऱ्या वासिम जफरला. सातव्या क्रमांकावर येऊन शतक झळकावणाऱ्या अक्षय वाडकरला. अक्षयला साथ मिळाली ती आठव्या क्रमांकावरच्या आदित्य सरवटेची आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या सिद्धेश नेरळची. या तिघांनी दोन गड्यांसाठी केलेल्या सव्वा आणि दीड शतकी भागी निर्णायक ठरल्या. या तिघांनी मिळून २८६ धावा केल्या. विदर्भाच्या एकूण धावांपैकी ५२ टक्के आणि दिल्लीच्या पहिल्या डावाच्या धावसंख्येपेक्षा फक्त नऊ कमी. प्रथम श्रेणी क्रिकेटचा पहिलाच मोसम खेळणाऱ्या यष्टिरक्षक वाडकरचं हे पहिलंच शतक. अगदी मोक्याच्या क्षणी. करंडकावर विदर्भाची पकड घट्ट करणारं. आणखी श्रेय द्यायचंच झालं, तर ते दिल्लीकरांनाही द्यावं लागेल. सिद्धेशला बाद करणारे तिन्ही नो-बॉल कळत-नकळत पडल्याबद्दल; दुसऱ्या डावात फटकेबाजीच्या नादात एका मागोमाग एक बाद होत विदर्भाला सहज विजय देऊ केल्याबद्दल.

विदर्भाचा हा विजय नशिबाचा नव्हता, तर प्रयत्नवादाचा होता, हे अनेक प्रकारे सिद्ध करता येईल. धावफलकही त्याची साक्ष देईल. रणजी स्पर्धेत खेळलेल्या नऊपैकी सात सामन्यांमध्ये निर्णायक विजय; पहिल्या डावातील पिछाडी दोनदा आणि तीही निर्णायक न ठरलेली. स्पर्धा गाजविणाऱ्या पहिल्या सहा फलंदाज-गोलंदाजांमध्ये विदर्भाचे प्रत्येकी दोन-दोन. संघाच्या चार फलंदाजांनी यंदा पन्नासहून अधिक सरासरीने धावा केल्या. त्यात  कर्णधार फैज अव्वल क्रमांकावर आहे. त्याने ९ सामन्यांतील १४ डावांमध्ये ७०.१५च्या सरासरीने ९१२ धावा केल्या. त्यात त्याची पाच शतकं. तेवढीच तोलाची साथ दिली त्याचा सलामीचा साथीदार संजय रामास्वामीनं. त्यानं तेवढेच सामने आणि डावांत तीन शतकं झळकावतं ६४.५८ या सरासरीने ७७५ धावा केल्या. गणेश सतीश यानंही हंगामात दोन शतकं ठोकली. त्यानं ९ सामन्यांतील १२ डावांमध्ये ६३८ धावा करताना सरासरी राखली ती ५८ एवढी. अनुभवी वासिम जफरनं नऊ सामन्यांतील १३ डावांमध्ये ५४.०९ या सरारीने ५९५ धावा केल्या.

विदर्भाचे गोलंदाजही सरस ठरले. त्यात सर्वाधिक छाप उमटली ती रजनीश गुरबानीची. रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक साधणारा तो दुसरा गोलंदाज. त्याच्या आधी हा पराक्रम तमीळनाडूच्या कल्याणसुंदरमने मुंबईविरुद्ध १९७२-७३मध्ये केला होता. गुरबानीनं यंदा सहा सामन्यांतील १२ डावांमध्ये १७.१२ एवढ्या अल्प सरासरीने ३९ खेळाडू बाद केले. डावात पाच बळी घेण्याची कर्तबगारी त्यानं पाच वेळा आणि सामन्यात १० बळी घेण्याची कामगिरी एकदा केली. निर्णायक, बाद पद्धतीच्या सामन्यांमध्ये तर त्याची कामगिरी अधिक उठून दिसणारी. उपान्त्यपूर्व लढतीत केरळविरुद्ध ७, कर्नाटकविरुद्धच्या उपान्त्य सामन्यात १२ आणि अंतिम सामन्यात ८ बळी! स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या रजनीशने आपल्या या चतुरस्र कामगिरीचं श्रेय प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक सुव्रत (सुब्रतो) बॅनर्जी यांना दिलं. उमेश यादवएवढा वेग नसताना रजनीशनं चेंडू हवेत हवा तसा वळवून ही करामत केली.

रजनीशप्रमाणे अक्षय वखरे आणि आदित्य सरवटे यांचाही वाटा सिंहाचा आहेच आहे. डावखुरी फिरकी टाकणाऱ्या आदित्यने सहा सामन्यांतील १२ डावांमध्ये १६.६५च्या सरासरीने २९ बळी मिळविले. डावात पाच किंवा त्याहून अधिक गडी बाद करण्याची कामगिरी त्यानं दोनदा केली. अक्षय वखरे याच्या ऑफ ब्रेक गोलंदाजीनेही धमाल उडविली. अक्षयचा ईसपीएनक्रिकइन्फो संकेतस्थळावरचा फोटो धोनीची आठवण करून देतो. अक्षयनं आठ सामन्यांतील १५ डावांमध्ये ३४ बळी घेतले ते २१.७६ या सरासरीने आणि त्यात एकदा सामन्यात १० बळी.

विदर्भाच्या या विजयाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो भूमिपुत्रांचा संघ आहे. मुंबईकडून दीर्घ काळ खेळलेला वासिम जफर, कर्नाटकाकडून खेळायला सुरुवात केलेला आणि नंतर विदर्भात स्थिरावलेला गणेश सतीश आणि वाराणशीत जन्मलेला संजय रामास्वामी सोडले, तर अंतिम सामन्यात खेळलेले बाकी आठ खेळाडू विदर्भातीलच आहेत. अपूर्व वानखेडे अमरावतीचा, तर आदित्य अकोल्याचा. बाकी सारे नागपूरचे. फैज, वासिम आणि अक्षय तिशीपुढचे; बाकी सारे त्याच्या आतीलच. याच वाघांनी विदर्भाचा ६१ वर्षांचा अनुशेष एका फटक्यात दूर केला!

विदर्भानं रणजी करंडक जिंकल्याची बातमी
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या संकेतस्थळावर
तब्बल चार दिवसांनी झळकली.
या साऱ्याला दृष्ट लागू नये म्हणून की काय काळ्या तिटाचे काही ठिपकेही दिसले. अंतिम सामन्यातील विदर्भाचा लक्षणीय विजय पाहण्यासाठी प्रेक्षक अभावानेच होते. हाच सामना जामठा मैदानावर खेळविला गेला असता, तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. विदर्भ क्रिकेट संघटनेनं बक्षिसाच्या दोन कोटी रुपयांमध्ये तीन कोटींची भर घालून ते खेळाडू व संघ व्यवस्थापनातील सर्व सदस्यांना देण्याचं जाहीर केलं व त्याची अंमलबजावणीही केली. पण रणजी करंडक जिंकल्याचा आनंद संघटनेच्या संकेतस्थळावर तीन जानेवारीपर्यंत तरी काही दिसला नाही. करंडक जिंकल्यानंतर दोन दिवस व्हीसीएचं संकेतस्थळ आजही जुन्या-पुराण्याच बातम्या आणि माहिती मिरवताना दिसत होतं. चौथ्या दिवशी त्यावर केवळ विजेत्या संघाचं एक छायाचित्र आणि दोन ओऴींची माहिती एवढंच होतं.

भारतीय क्रिकेटचा केंद्रबिंदू काही वर्षांत झपाट्यानं पंढरी, मक्का-मदिना आणि लॉर्ड्स म्हणविल्या जाणाऱ्या, वर्षानुवर्षं वर्चस्व गाजविणाऱ्या शहरापासून सरकतो आहे. सौराष्ट्रानं दोन वर्षांपूर्वी अंतिम फेरी गाठून आणि गेल्या मोसमात मुंबईला हरवून करंडक जिंकणाऱ्या गुजरातनं ते दाखवून दिलं आहे. केरळनं यंदा बाद फेरीपर्यंत धडक मारली. हे चित्र क्रिकेट किती दूरपर्यंत पोहोचलं आहे, हे सांगणारं. वाढलेल्या दर्जाबद्दल आश्वासक आणि आनंददायी.


(सांख्यिकी तपशील espncrickinfo.com crickbuzz.com या संकेतस्थळांच्या सौजन्याने)

10 comments:

  1. विदर्भाची क्रिकेटमधील प्रगती स्तुत्य आहे. पण फार उशिरा ही वाटचाल सुरू झाली असं वाटतं कारण लवकरच संपूर्ण महाराष्ट्राची एकच टीम होईल. सुप्रीम कोर्टाचा आदेशच तसा आहे. तोवर वाघांनी शिकारीवर ताव मारावा.

    ReplyDelete
  2. उत्तम विश्लेषण.! क्रिकेटवरचं लेखन हा वेगळाच पैलू!!

    ReplyDelete
  3. फारच सुंदर विवेचन!
    - जयंत येलूलकर, नगर

    ReplyDelete
  4. मस्त लिहिलं आहे...
    - आदित्य नाडगौडा, पुणे

    ReplyDelete
  5. खुप छान.अभ्यासपूर्ण विवेचन.
    - नीमा कुलकर्णी, नांदेड

    ReplyDelete
  6. अप्रतीम लिखाण
    - गणेश साबळे, द. कोरिया

    ReplyDelete
  7. रणजी ट्रॉफी मॅचेस व कधीतरी भारतात येणाऱ्या टेस्ट मॅचेस म्हणजे माझ्या लहानपणी जणू राजापूरची गंगा!

    चंदू सरवटे, मुश्ताक अली, दत्तू फडकर, विजय हजारे, विनू मंकड, सुभाष गुप्ते हे तेव्हाचे हीरो. पुढे वानखेडे स्टेडियमच्या स्थापनेत खारीसारखा वाटा असल्याने खंडू रांगणेकर, कर्नल हेमू अधिकारी ह्यांची भेट व्हायची झाली. ह्या सगळ्यांची आठवण लेखामुळे जागृत झाली. यंदा विदर्भाने हा बहुमान पटकावला ही आनंदाची सत्यता.

    धन्यवाद,
    - भाल पाटणकर

    ReplyDelete
  8. क्रिकेटमध्येही आपण सिक्सर मारली. खो-खो, कबड्डी, कुस्ती या मर्दानी भारतीय खेळांकडेही मोर्चा वळवावा, ही अपेक्षा.
    - श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)

    ReplyDelete
  9. ओघवते,अप्रतिम विश्लेषण.

    ReplyDelete
    Replies
    1. Very well written article. Felt proud of the Vidarbha cricket team.

      Delete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...