मोसम थंडीचा आहे आणि मोसम हुरड्याचाही आहे. थंडीनं या आठवड्यात दडी मारली. संक्रांतीनंतर तिळातिळानं घटते थंडी;
यंदा ती रेवड्या-रेवड्यानं कमी झाली! असं असलं तरी हुरडा
खाण्याची मजा अजून कमी झालेली नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात किंवा दिवस कलताना
शेतात बसून हुरडा खाण्याचा अनुभव घ्यायलाच हवा असा असतो.
ज्वारीचं पीक. याच कणसांचा होतो हुरडा. ती फार कोवळी नसावीत किंवा निबरही. |
फेसबुक, ब्लॉग, वृत्तपत्रे, नियतकालिके यांमधून गेल्या १० वर्षांमध्ये हुरड्यावर बऱ्याच जणांनी बरंच काही लिहिलं. त्यात स्मृतिरंजन होतं, ‘गेले ते दिन गेले...’चा हळवा सूर होता.
हे असं लिहिणारे प्रामुख्याने आता ५० ते ७० वयोगटात मोडणारे. त्यातल्या बऱ्याच जणांनी
स्वतःच्या मळ्यात किंवा वाटेकऱ्याकडं, मामा-आत्याकडं हुरडा खाल्लेला. बैलगाडीचा
प्रवास, बोरं-डहाळा वगैरे वगैरे...
बदलता जमाना बैलगाडीतून शेतावर जाऊन हुरडा खाण्याचा कमी आणि
आलिशान गाडीतून ‘हुरडा पार्टी’साठी
जाऊन फेसबुकवर फोटो शेअर करण्याचा आहे. पुणे-औरंगाबाद रस्त्यावर सुपे सोडल्यानंतर
थेट औरंगाबादपर्यंत रस्त्याच्या कडेला पाट्या दिसतात - ‘हुरडा
पार्टी’. नगरच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी हुरडा पार्टीची
सोय आहे. तिथं हुरड्यासोबत फरसाण, वेगवेगळ्या चटण्या, उसाचा रस, बोरं, गोडी शेव,
रेवड्या, बर्फाचा गोळा, दही असं खूप काही असतं. नंतर पिठलं-भाकर-भरीत-ठेचा असं ‘अस्सल गावरान’ जेवण असतं.
एरवी ज्वारी २० रुपये किलो आणि असा हुरडा किमान २५० रुपये
किलो. हा भाव चोळलेल्या हुरड्याचा नाही, तर हुरड्याच्या कणसांचा असतो. चटणीसह
प्रत्येक गोष्टीचे वेगळे पैसे मोजावे लागतात. काही ठिकाणी मात्र जेवणासह ‘पॅकेज’ असतं चारशे ते पाचशे रुपये माणशी.
हा झाला नगरच्या परिसरातला दर. पुण्यात तो नक्कीच किती तरी अधिक आहे.
चघळचोथा आणि गोवऱ्यांनी पेटलेली आगटी. |
या आगटीत कणसं भाजायची.
|
भाजलेली कणसं अशी हातावर चोळून हुरडा काढायचा. |
आगटीत कणसं घालणं, ती फिरवत राहणं आणि कणीस भाजलं हे ओळखून ते
हातावर किंवा दोन दगडांमध्ये चोळून गरमागरम हुरडा खाऊ घालणं, ही सारी विशेष
कौशल्याची कामं. हुरडा खायला बसलेल्यांपैकी प्रत्येकाला दोन-चार घासानंतर ‘हा जरा कवळा आहे...’, ‘तो द्या ठेवून. हा घ्या गरमगरम’ असं कणसं
चोळणाऱ्यांनी म्हटलं पाहिजे. चोळलेला हुरडा तसाच खाऊ लागलात की, तुमच्या
अडाणीपणावर शिक्कामोर्तब होतं. तो फुंकून, त्यातलं गोंड काढून मग ते दाणे तोंडात
टाकायचे. जोडीला मिरी कुटून केलेलं मीठ, लसणाची किंवा तत्सम झणझणीत चटणी असली की
बास. गूळ आणि भुईमुगाच्या शेंगा सोबत असल्यावर त्याची लज्जत अजून वाढते. दही वगैरे
प्रकार अधिक खानदानी आणि उच्चभ्रू! शेव-चिवडा, फरसाण,
साखरेच्या रेवड्या, शेंगदाणे-फुटाणे, वेफर्स आदी पदार्थ हुरड्यासोबत खायचे नाहीतच
मुळी. हल्ली हुरड्यापेक्षा या सटरफटर गोष्टींचंच कौतुक अधिक वाढलंय. म्हणजे खाणं
कमी आणि मचमच फार असं!
हुरडा खाण्याची मजा...
|
हुरड्यासोबत डहाळा हवाच.
|
पोटाला तडस लागल्यानंतर हुरड्याचे पुन्हा आग्रहाचे
पाच-सात घास खावेच लागतात. एव्हाना तहानेची भावना जागी झालेली असते. पण पोटभर
हुरडा खाल्ल्यावर घटाघटा पाणी पिणं म्हणजे अपचनाला आमंत्रण. पूर्वी तिथं कामाला
यायची ज्वारीची ताटं. ती उसासारखीच सोलून खायची. एव्हाना आगटीतला हार शांत होऊ
लागलेला असतो. त्यात मग डहाळा भाजून घ्यायचा. हुरड्याची तयारी होईपर्यंत ओला
हरभरा, बोरं असं खायचं. हुरड्यानंतर भाजलेला हरभरा. नंतरच्या जेवणातल्या भरतासाठी
वांगी, कांदे भाजून घ्यायचे.
हुरडा खाल्ल्यानंतर अर्धा-पाऊण तास शेतात किंवा
मळ्यात चक्कर मारून यायची. नंतरच मग जेवणाची पंगत बसायची. पूर्वी काही शेतकरी या
दिवसात व्रत पाळायचे. या मोसमात ते सकाळ-संध्याकाळ फक्त हुरडाच खायचे. सकाळी
पाच-सात कणसांचा आणि दिवस मावळताना पुन्हा तसाच. त्याशिवाय जेवण वगैरे काही नाही! हे काही
व्रत वगैरे नसून, ‘ज्या दिवसात जे मिळतं, तेच खाणं पथ्यकारक’ अशी जुन्या जमान्यातली शहाणीव असावी, असं वाटतं. यंदा खूप वर्षानंतर शेतात जाऊन हुरडा खाण्याचा योग आला.
मित्र निर्मलचंद्र थोरात याच्यामुळे मिरजगाव येथे जाऊन डॉ. विलास कवळे यांच्या शेतात
हुरड्याचा बेत रंगला. त्यामुळं आठवणी जाग्या झाल्या एवढंच...
हुरड्याविषयी एवढी रंजक माहिती पहिल्यांदाच वाचली. फारच छान!
उत्तर द्याहटवाव्यावसायिक हुरडा पार्टी मला पण कधीच नाही आवडली. आजोळी शेतावर प्रेमानं हुरडा खाऊ घालतात, त्याची मजा इथे कधीच येत नाही.
एकूण, हुरड्याचा लेख पौष्टिकच!!
- संजय आढाव, नगर
फारच छान!
उत्तर द्याहटवाहुरडा असा खायचा असतो, हे आज पहिल्यांदा कळालं. पूर्वी कधी तरी खाल्ला होता; पण त्यानंतरचं 'पथ्य-पाणी' असं असतं, हे माहीत नाही. शिवाय बाकीचे पदार्थही खाल्लेले आठवत नाही. कदाचित तेव्हा ती फॅशन नसावी. हो पण कांदा आणि ठेचा होता.
उत्तर द्याहटवाबाकी मस्तच! अलीकडे बऱ्याच वर्षांत हुरडा खाल्ला नाही. शहरात राहतोय ना..!
-विवेक विसाळ, पुणे
वा! छान! हुरडा काय असतो, हे आताच्या तरुण पिढीला अभावानेच माहीत आहे. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आहे अशांनाच याची जाणीव आहे. तरीही आपल्या राज्याची खाद्यसंस्कृती अद्यापि टिकून आहे ही बाब निश्चितच आनंददायी आहे. त्यात तुम्ही या संस्कृतीला रसाळ भाषेत शब्दबद्ध करून त्याला चिरंजीव केलं आहे. अभिनंदन!
उत्तर द्याहटवाप्रा. सुरेश जाधव, नांदेड
जुन्या आठवणी जाग्या केल्यास. मस्त.
उत्तर द्याहटवा- धनंजय देशपांडे, उस्मानाबाद
lai manaje laich bhaari
उत्तर द्याहटवाछानच अनुभव.
उत्तर द्याहटवाहुरड्यावरील लेख वाचून तोंड चाळवले गेले. नेहमीप्रमाणे उत्तम लेखन. मलाही हुरडा खायचा आहे.
उत्तर द्याहटवाशेखर जोशी
Nivval SUREKH !
उत्तर द्याहटवाएकदम आगळावेगळा विषय. संपूर्ण (एवढं मोठं) आयुष्य शहरांमध्ये गेलं. हुरडा कधी खाल्ला नाही; वाचला फक्त. आपल्या सचित्र लेखामुळे एकदा तरी खाऊन पाहावा अशी इच्छा झालीय. मात्र जमल्यास ती व्यावसायिक हुर्डापार्टीच होणार हे भय आहे!
उत्तर द्याहटवा- प्रियंवदा कोल्हटकर
झक्क्काssस!
उत्तर द्याहटवा- मंदार कुलकर्णी, लातूर
सर, हुरडा पार्टी चांगलीच रंगवली. शहरी जीवनामुळे गेले ते दिवस राहिल्यात फक्त आठवणी......
उत्तर द्याहटवाकिती सुंदर शब्दबद्ध केले आहे.
उत्तर द्याहटवाअगदी जिभेवर चव रेंगाळते आहे.
अप्रतिम वर्णन.
- स्वाती वर्तक
हुरडा फार चविष्ट रे!
उत्तर द्याहटवा- अविनाश दंडवते, अमरावती
लेख वाचला आणि लहानपणी खाल्लेल्या हुरड्याची चव जिभेवर पुन्हा खेळती झाली.
उत्तर द्याहटवाआपल्या रसाळ लेखाबद्दल अभिनंदन.
उत्तर द्याहटवाहा असा अनुभव प्रत्यक्ष घेण्याचा योग्य माझ्या आयुष्यात कधी आला नाही. कारण मुंबईसारख्या शहरात वास्तव्य व गावांत जाण्याच्या संधी फारच थोड्या आल्या. आपल्या लेखाने हुरड्याचा Virtual का होईना पण छान अनुभव मिळाला. धन्यवाद.
- अशोक जोशी, बंगलोर
खूप दिवसांनी डोळ्यांनी हुरडा पार्टीचा आंनद घेतला. खूप वर्षांपूर्वी नांद्रे येथे पूर्वी वाटेकरी असलेल्या कल्लाप्पांच्या शेतात जाऊन असा हुरडा खाल्लेला आठवतोय. (आयुष्यात एकदाच.) त्या पूर्वस्मृतींना उजाळा मिळाला. छान वाटलं.
उत्तर द्याहटवा- उज्ज्वला केळकर, सांगली
लेखन हुरड्यासारखं चविष्ट झालंय..मजा आया..
उत्तर द्याहटवावा..छान.... आळंदी रो डवर आम्ही अशीच हुरडा पार्टी केली होती दहा वर्षे झाली असतील आठवण झाली त्यानिमित्ताने
उत्तर द्याहटवातुझं 'हुरडा' वर्णन वाचून तोंडाला पाणी सुटलं. दर वर्षी पांडुरंग गायकवाडच्या शेतावर जाऊन हुरडा खायचो. ती सहल मोठी मजेदार असायची. त्या आठवणी जाग्या झाल्या. तू खूप छान लिहिलंयस. पुढच्या वेळी हुरडा खायला जाताना माझी आठवण असू दे, इतकंच !
उत्तर द्याहटवा- सुभाष नाईक, पुणे
हुरडा--छान.शेतावरच्या हुरड्याची मजा काही औरच! आगटी हार डहाळा या अस्सल ग्रामीण शब्दांनी गतस्म्रुतींना उजाळा मिळाला.
उत्तर द्याहटवाविलंबाने का होईना, पण आपली 'हुरडा पार्टी' अटेंड केली. एरवी हुरडा हा रब्बी हंगामी; पण आपला हुरडा बारमाही, तोही गुळभेंडी. कथवटात बनलेली चुलीवरील ज्वारीची भाकर, चिपाडानी हाटलेलं पिठलं, गाडग्यातील वरण, दही. व्यंकटेश माडगूळकरांच्या 'काळी आई'वर जिवापाड प्रेम करणारा आप्पा, 'मोट चालली मळ्यात करते चाक तिचे कुरकुर', या भूतकाळातील गोड आठवणी नकळत जाग्या झाल्या. शिवाराची सफर झाली. आपल्या 'हुरडा पार्टी'ने एक हुरहूर मात्र लावली... 'गेले ते दिन गेले'!
उत्तर द्याहटवा- श्रीराम वांढरे, भिंगार, नगर
गूगल पेजवर या लेखाच्या परिचयात *मोट चालली मळ्यात करते चाक तिचे कुरकुर* या कवितेचा उल्लेख आहे पण लेखात त्या कवितेतला एक शब्दसुद्धा नाही. कोणाला ही कविता आठवते का? आम्हाला प्राथमिक शाळेत होती. पण ती गूगलवर शोधूनही सापडली नाही. अशीच दुसरी कविता *विहिरीचे गाणे*. सुरुवातीचे शब्द *हळुहळुहळु दिनमणी हा उदयाचली आला (दोनदा), येईल तो शेतकरी, लाविल मग मोट वरी, नेईल मम जीवनास पिकविण्या पिकाला* सोडून काहीच आठवत नाही. कुणाला माहीत असेल तर कृपया टाका.
उत्तर द्याहटवा