‘शंकर वावीकर नावाच्या एका सद्गृहस्थांची १८८६ या साली
प्रसिद्ध केलेली ‘वाचन’ नावाची पुस्तिका माझ्या संग्रही आहे. तिच्या प्रस्तावनेत असं म्हटलेलं
आहे की, ‘हल्लीचे प्रोफेसर आणि शिक्षक हे टेक्स्टबुकांव्यतिरिक्त
काही वाचत नाहीत.’ म्हणजे शंभराहून अधिक वर्षं आपण तीच
तक्रार (...वाचक कमी झाले आहेत) करत आलो आहोत.’
- ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’, पान क्रमांक
136, अरुण टिकेकर (पहिली आवृत्ती, ३१ मार्च २००५, डिंपल पब्लिकेशन)
.
.
.
औरंगाबादहून
नांदेडला दोन रस्त्यांनी जाता येतं. चालकानं परभणीला न जाता औंढा नागनाथमार्गे
नांदेड गाठायचं ठरवलं होतं. त्या दिवशी मला औंढ्याचं दर्शन घडवायचं त्याच्या मनात
असेल कदाचित. जालना सोडल्यावर बोरीची (तालुका जिंतूर, जिल्हा परभणी) आठवण झाली आणि
वाहनचालक सिद्धार्थला विचारलं, ‘‘आपल्याला बोरीला
जायचंय. जाता येईल का? वेडंवाकडं तर होणार नाही ना, अंतर फार
वाढणार नाही ना?’’ तसं काही होणार नाही, असा दिलासा देत
सिद्धार्थनं जिंतूरवरून गाडी बोरीकडं वळवली. जिंतूरपासून १६ किलोमीटरवर बोरी.
तिथनं परभणी ३० आणि नांदेड साधारण ८० किलोमीटर. बोरीमध्ये नेमिनाथ जैन ह्याला
भेटायचं होतं. ‘लोकसत्ता’चा जुना
वार्ताहर. एवढ्या वर्षांनंतर हा माणूस आपल्याला ओळखतो का हे पाहायचं होतं. त्याहून
कुतुहल होतं, तो चालवित असलेल्या वाचनालयाबद्दल. त्याबद्दल त्याच्या तोंडून
सहा-सात वर्षं बरंच काही ऐकलं होतं. लाडक्या आणि गुणी लेकराचे गुण अभिमानी बापाने
भरभरून गावेत, त्याच पद्धतीनं नेमिनाथ वाचनालयाबद्दल नेहमी सांगत असे. म्हणून ते
एकदा पाहायचं होतंच. त्याच कारणाने त्याच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला.
नेमिनाथ जैन आता
वार्ताहर नाही. स्वमालकीच्या ‘लोकदिलासा’ साप्ताहिकाचा संपादक आहे तो! त्याहून महत्त्वाचं
म्हणजे ‘कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालय’चा ग्रंथपाल आहे. ग्रंथपालनाचा अधिकृत अभ्यासक्रम पूर्ण केलेला ग्रंथपाल! स्वागतासाठी चौकात आलेल्या नेमिनाथनं घरी नेलं. पाच मिनिटं बसलो. पाणी
पिऊन झालं की, तो म्हणाला, ‘‘चला, वाचनालय पाहून येऊ.’’
घरापासून पाच
मिनिटांच्या अंतरावर एक छोटी, टुमदार, मस्त रंगवलेली इमारत होती. दर्शनी
वाचनालयाचा मोठा फलक. आत गेल्यावर चकीत व्हायला झालं. दोन छान खोल्या. दोन्ही मस्त
सजविलेल्या...तस्विरी, वेगवेगळे फलक, वाचनाचं महत्त्व सांगणाऱ्या पाट्या, बसायला
खुर्च्या. एकदम स्वच्छ. भिंतीच्या कप्प्यांमध्ये, कपाटांत छानपैकी ठेवलेली पुस्तकंच पुस्तकं. त्यांची
वर्गवारीही व्यवस्थित. पाहातच राहावं असं, प्रसन्न वाटायला लावणारं सारं काही.
सरकारच्या ‘इतर क’ वर्गात असलेल्या
जयकुमारजी जैन वाचनालयात सध्या साडेसहा हजार पुस्तकं आहेत. नियमानुसार ह्या
वर्गाच्या वाचनालयात एक हजार पुस्तकं हवीत. नेमिनाथनं त्याच्या साडेसहा पट पुस्तकं
जमवली आहेत.
टापटीप,
रंगरंगोटी, भरपूर पुस्तकं, आरामशीर बैठकव्यवस्था एवढीच काही जैन वाचनालयाची
वैशिष्ट्यं नाहीत. ह्या सगळ्यांहून महत्त्वाचं म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी ते
पूर्णपणे मोफत आहे! पहिली ते सातवीपर्यंतचे ३०८ विद्यार्थी
वाचनालयाचे सभासद आहेत. वाचनालय सकाळी ९ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत सुरू असतं. रोज ३५-४० मुलं पुस्तक बदलायला येतात. या बालवाचकांचं
देवाण-घेवाण कार्ड आहे. त्यावर पुस्तक दिल्याच्या व्यवस्थित नोंदी आहेत. तिथंच
बसून वाचायचं असल्यास मुला-मुलींसाठी स्वतंत्र कक्ष आहेत.
हे सगळं कशासाठी? नेमिनाथ जैन मनापासून सांगतो, ‘‘ग्रामीण
भागातील लहान मुलांना वाचण्याची आवड लावण्यासाठी!’’
वाचनालयाचे संचालक व पत्रकार दीपक राजूरकर त्याला दुजोरा देताना म्हणाले, ‘‘पुस्तकात मस्तक बसावे, एवढ्याचसाठी. म्हणजे मग मस्तकात पुस्तक बसते.
विद्यार्थी विचार करायला शिकतो.’’
वाचनसंस्कृती
रुजविण्याच्या आणि जपण्याच्या उद्देशानेच नेमिनाथने वडिलांच्या स्मरणार्थ १९९९मध्ये हे वाचनालय सुरू केलं. त्याचा उद्देश सफल होताना दिसतो. एका गावात ३०० विद्यार्थी वाचनालयाचे सभासद असणं, ही लक्षणीय बाब आहे. मुलांना वाचण्याची आवड
लावण्याबरोबरच त्यांच्यासाठी दर वर्षी विविध स्पर्धा घेतल्या जातात. उत्कृष्ट
बालवाचक पुरस्कार वाचनालयातर्फे दिला जातो. ह्याशिवाय विद्यार्थी नसलेले १०८ (प्रौढ)
सभासद आहेत. त्यांच्यासाठी शुल्क आहे. किती? दरमहा पाच
रुपये! मागासवर्गीयांना शुल्क आकारायचं नाही, असं वाचनालयाच्या
संचालक मंडळानं ठरवलं आहे.
प्रामुख्यानं
मुलांसाठी असलेल्या ह्या वाचनालयाचा ग्रंथसंग्रह एकसुरी नाही. कथासंग्रह, कादंबऱ्या,
प्रवासवर्णन, कवितासंग्रह, चरित्रं-आत्मचरित्रं, धार्मिक अशी सर्व प्रकारची
पुस्तकं आहेत. मुलं प्रामुख्यानं गोष्टीची पुस्तकं आणि थोरांची चरित्रं वाचतात. दोन
खोल्यांच्या ह्या टुमदार वाचनालयात ३२ साप्ताहिकं व मासिकं आणि ७ दैनिकं नियमित
येतात. त्याचाही लाभ घेणारे वाचक आहेत.
जैन सार्वजनिक
वाचनालयाला सरकारचं अनुदान मिळतं; पण ते सर्व गरजा पूर्ण होतील एवढं नाही. मग सगळा खर्च कसा भागतो? लोकसहभाग हे त्याचं उत्तर. गावकरी देणगी देतात, पुस्तकं भेट
देतात. प्रसिद्ध लेखक आसाराम लोमटे नेहमीच पुस्तकांची भेट देतात, असं नेमिनाथनं
आवर्जून सांगितलं. त्याच्या आयुष्यात ह्या वाचनालया-इतकं महत्त्वाचं काहीच नाही.
म्हणून तर घर बांधण्याच्या आधी त्यानं गाठीचा पैसा खर्च करून वाचनालयाची
छोटेखानीच, पण अतिशय सुंदर इमारत आकाराला आणली.
मध्यंतरी एका
कार्यक्रमानिमित्त जिंतूरचे आमदार विजय भांबळे ह्यांनी जैन वाचनालयास भेट दिली. सगळं
पाहून त्यांनी अचंब्यानं, कौतुकानं ‘नेमिनाथ! लायब्ररी अशीही असती होय!!’ असे उद्गार काढल्याची आठवण नेमिनाथ आणि राजूरकर सांगतात. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी
पुस्तकं आणि फर्निचर ह्याकरिता त्यांनी मोठ्या आनंदाने वाचनालयाला मदत केली.
बोरी काही
तालुक्याचं गाव नाही. लोकसंख्या असेल १८ हजारांच्या घरात. (‘विकिपीडिया’च्या म्हणण्याप्रमाणे २०११च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या १३ हजार ४३८ आहे.) गावात दोन महाविद्यालयं, दोन उच्चमाध्यमिक व चार माध्यमिक
विद्यालयं आणि पाच प्राथमिक शाळा आहेत. गावात दोन ‘ब वर्ग’ वाचनालयंही आहेत. ‘विकिपीडिया’नंच बोरीचं आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित केलं आहे - ह्या गावाचं लिंगगुणोत्तर ९४२, म्हणजे महाराष्ट्र राज्याहून (९२९) अधिक आहे. म्हणजे दर हजार पुरुषांमागे ९४२ महिला. अशा ह्या गावासाठी असं वैशिष्ट्यपूर्ण वाचनालय म्हणजे अभिमानास्पद गोष्ट होय.
‘वाचनसंस्कृती
लयास चालली आहे’, ‘वाचक कमी होत आहेत’, ‘टीव्ही-नेटमुळे आता कोण वाचतंय हो!’... ह्या आणि अशा काही वाक्यांच्या साथीनं वाचनसंस्कृतीबद्दल रडण्याची साथ
जुनीच आहे. ती किती जुनी आहे, हे अरुण टिकेकर ह्यांनी लिहिलंच आहे. काहीच न करता अशा
नुसत्या रडण्यानं वाचनसंस्कृती वर्धिष्णू होणार नाही, हे नक्की. नेमिनाथ आणि
त्याचे सहकारी कृतीतून ती संस्कृती जोपासत आहेत. अनुदानासाठी निघालेली वाचनालयं
भरपूर आहेत. अधिकाधिक कमिशन देणाऱ्या पुस्तकांची रद्दी तिथं मोठ्या प्रमाणात असते.
त्या पार्श्वभूमीवर जैन वाचनालयाचं रूप वेगळं वाटणारं आहे.
बोरीमध्ये
असलेल्या दोन मंदिरांमध्ये नेमिनाथ नित्यनेमाने पूजा करतो. अगदी मनोभावे. पहिली
पूजा असते ती जैन मंदिरात. आणि त्याचं दुसरं मंदिर म्हणजे हे वाचनालय. एका छोट्या
गावात उत्तम दर्जाचं, अधिकृत नोंदणी झालेलं, संचालक मंडळ असलेलं हे वाचनालय सुरू
आहे. त्याला पुस्तकांच्या रूपाने मदत करू इच्छिणाऱ्यांसाठी नेमिनाथ जैन यांचा
संपर्क-क्रमांक – ९९६०८८७८२४
....
#ग्रंथालय #बोरी #परभणी #जैन_वाचनालय #नेमिनाथ_जैन #खिडकी_ब्लॉग #वाचनसंस्कृती #बालवाचक
Khup changale kaam karatoy Neminath Jain. Tyala jamel tashi madat karun saath dili pahije. Great !
उत्तर द्याहटवा- Subhash Naik,Pune.
अशा प्रयत्नांचं कौतुक करणं गरजेचंच आहे. ते केल्याबद्दल धन्यवाद. अशा प्रयत्नांना एखादी व्यक्ती कारणीभूत ठरते आणि ती पुरेपूर खपत असे प्रयत्न करतही राहाते, हे खरंच दाद देण्याजोगं आहे. दुर्दैवानं आपल्याकडं अशा प्रयत्नांना दीर्घकालीन संस्थात्मक रूप येताना कमी दिसतं. असं रूप येण्यासाठी आवश्यक पूरक वातावरण नसतं, स्त्रोत नसतात, आणखीही काही मुद्दे असतील. तरीही एकेक व्यक्ती आनंदानं प्रयत्न करत राहाते, हे विशेष. जैन वाचनालयाच्या दीर्घकालीन वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. - अवधूत
उत्तर द्याहटवासध्याच्या सभोवतालच्या जगातील हे ग्रंथालय एक " माणसे घडविणारे व जोडणारे मंदीरच " असल्याचे आपल्या बोलक्या लेखणीने सिद्ध केले आहे.'वाचन ' पुस्तिकेतील प्रतिक्रिया तर डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. विशेष म्हणजे एक पत्रकार हे काम करतोय. सलाम त्याच्या कार्याला व तुमच्या शोधक लेखनीला. - सुनील आढाव
उत्तर द्याहटवाआजचया काळात अशा कामाची गरज आहे़ नेमीनाथ ते मनापासून करत आहेत त्याना शुभेचछा
उत्तर द्याहटवाअसे नेमिनाथ गावोगावी व्हावेत ही सदिच्छा.
उत्तर द्याहटवासतीश तुझा लेख वाचताना मी ही तुझ्या बरोबर आहे असा भास होत होता. खूप सुंदर वर्णन केले आहेस.
संबंधितांना शुभेच्छा आहेच. मात्र वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपण उचललेले अनमोल पाऊल आणि सुंदर लिखाण आम्हाला सदैव प्रेरक आहे.
उत्तर द्याहटवा- भास्कर सोनवणे
नेमीनाथ जैन बोरीसारख्या लहान गावात महान काम निरपेक्षपणे करीत असल्याची नोंद केव्हाच घेतली गेलेली दिसते.
उत्तर द्याहटवासतीश कुलकर्णी यांनी त्यांच्या 'खिडकी'तून बोरीतील जैन वाचनालयाचे छायाचित्रांसह दर्शन अनेकांना घडवले हे चांगले केले. प्रेरणादायी असलेले हे महत् कार्य त्यामुळे अनेकांना कळू शकले.
exellent effort.you have described it in lucid language
उत्तर द्याहटवाDr Urmila Chakurkar
स्तूत्य उपक्रम. अभिनंदनीय आणि अनुकरणीय.
उत्तर द्याहटवाश्री. नेमिनाथ जैन यांचं अभिनंदन. त्यांच्या कार्याला शुभेच्छा!
उत्तर द्याहटवाअशा चांगल्या कार्याची नोंद घेणारे श्री. सतीश कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन. कारण हल्ली चांगल्या कामाची नोंद घेण्यासाठी लागणारं मोठं मन दुर्मिळ झालं आहे. जमलं तर मीही त्या ग्रंथालयाला भेट देईन.
- प्रा. सु. ग. जाधव, नांदेड
वाचनालयास शुभेच्छा
उत्तर द्याहटवाडि.एन.कुलकर्णी परभणी
छान माहिती आहे.
उत्तर द्याहटवाकाम लक्षणीय असूनही, नोंदसुद्धा घेतली जात नाही, असे अनेक लोक आहेत. चेन्नईमध्ये एक चहावाला आहे; तोही असे वाचनालय चालवतो, असे कळते.
आपण नेमिनाथ यांची दखल घेतली याचा आनंद आहे.
- स्वाती वर्तक
वाचनालय माझ्या लेखी मंदिर असतं. म्हणून हा लेख आवडला. नेमिनाथजींचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
उत्तर द्याहटवा- प्रियंवदा कोल्हटकर
'खिडकी'तून वाचनालयात गेलो. दुर्लक्षित घटक हुडकून, चटकदार लेखणीतून, समाजापुढे मांडणारे उत्तम कांबळे हे 'फिरस्ते' सर, तसेच अमेरिकेतील Dekalb, Forsyth County Public Lib. यांची आठवण झाली. दर्जाहीन पुस्तकांचा सुकाळ असलेल्या काळात बाजूला पडलेल्या अनाथ दर्जेदार पुस्तकांस व वाचकांस नाथ भेटला तर या नाथास या लेखाच्या रूपाने एक-नाथ भेटला असेच दिसते! असो.
उत्तर द्याहटवावाचनालयात कथा, कादंबऱ्या, प्रवास, कविता, चरित्र, धार्मिक या सह प्रामुख्याने विज्ञान-तंत्रज्ञान पुस्तकांचा समावेश असेलच.
- श्रीराम वांढरे, भिंगार, नगर
'खिडकी'त डोकावताच पुस्तकातल्या मस्तकांचं मस्त दृश्य दिसलं.
उत्तर द्याहटवाअलीकडे वाचनाची आवड कमी होत आहे, या विधानात तथ्य नाही. जगभर वाचकांचं प्रमाण होतं तितकच आहे. समाजाच्या काही स्तरात आता साधनांची उपलब्धता वाढल्याने ते प्रमाण अधिकच वाढलं आहे. हिंदी वृत्तपत्रांच वाढतं circulation हा त्याचा पुरावा आहे.
पैशाची सोय होत असली तर मुलांना electronic वाचनाची सवय लावावी. त्यामुळे किलकिल्या असलेल्या खिडक्या सताड उघडतील व चारी दिशांच्या वाऱ्याने मनातली जळमटं निघून जातील. पण पैशाचं सोंग आणता येत नाही हे खरं. जैनसाहेबांना आमच्या शुभेच्छा.
- डॉ. हेली दळवी