मंगळवार, ११ मार्च, २०२५

खणखणीत आणि निर्विवाद

चॅम्पियन्स करंडक - 

अहमदाबादेतल्या ठसठसत्या जखमेवर दुबईत पुन्हा एकदा
हळुवार फुंकर मारण्यात आली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावून. उपान्त्य सामन्याचा जणू पुढचा अंक असावा, अशी ही दुबईतली लढत. आधी फिरकीनं ब्लॅक कॅप्सच्या नाड्या आवळल्या.
मग रोहित-गिल ह्यांची शतकी सलामी. संयमाच्या परीक्षेत अय्यर आणि राहुल उत्तीर्ण झाले. ह्या सांघिक परिश्रमाचं फळ म्हणजे दहा महिन्यांमधलं
दुसरं विश्वविजेतेपद!
----------------------
साधारण दहा महिन्यांच्या काळात दुसरं जागतिक विजेतेपद. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील मागच्या चोवीसपैकी २३ सामन्यांमध्ये विजय. पराभव एकमेव; पण त्याचा घाव न पुसला गेलेला. विश्वचषक स्पर्धेतील अहमदाबादच्या अंतिम सामन्यातील हार.

त्या घावावर मलम लागला २९ जून रोजी ब्रिजटाऊनमध्ये. टी-20 विश्वचषक भारतीय संघानं पटकावला.
आणि आता पुन्हा एकदा त्या ठसठसत्या जखमेवर हळुवार फुंकर मारली गेली दुबईतल्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये. आठ देशांच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारतानं बाजी मारली. स्पर्धेतले पाचही सामने जिंकून कमावलेलं हे विजेतेपद. खणखणीत आणि निर्विवाद.

शेवटच्या सामन्यात न्यू झीलँड संघाचा प्रतिकार पद्धतशीरपणे मोडून काढत भारतानं गटात अव्वल स्थान मिळविलं. उपान्त्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ समोर असल्याचं दडपण झुगारून दिलं. चार गडी राखून विजय.

त्याच उपान्त्य सामन्याची थोडी-फार पुनरावृत्ती अंतिम सामन्यात झाली. कर्णधार रोहित शर्मा पुन्हा नाणेफेक हरलेला. धावांचा पाठलाग करण्याची वेळ. पुन्हा एकदा लोकेश राहुल आणि रवींद्र जाडेजा ह्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलेलं.

राहुलचा कबुलीजबाब
अजून काही वर्षांनी निकाल सांगेल - भारत चार गडी राखून विजयी. तेव्हा असंही वाटेल कदाचीत की, सहज सोपा विजय होता. पण सामना किती चुरशीचा झाला, हे राहुलनं रविवारी कॅमेऱ्यासमोर काहीशा असभ्य भाषेत सांगितलेलं आहेच.

इंग्लंडमध्ये सहा वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषक स्पर्धेत अतिशय अटीतटीच्या लढतीत न्यू झीलँडला यजमान इंग्लंड संघानं हरवलं. तेव्हा चौकारांची संख्या महत्त्वाची ठरली होती. किवीज त्यातून काही शिकले असावेत बहुदा. ह्या अंतिम सामन्यात त्यांचे चौकार भारताहून दोन अधिकच होते. षट्कारांमध्ये मात्र ते मागे राहिले. पण निकाल ठरविण्यासाठी ते मोजण्याची वेळ आलीच नाही.

कुलदीप, वरुण, अक्षर आणि जाडेजा ह्या फिरकी चौकडीनं मधल्या षट्कांमध्ये न्यू झीलँडला बांधून ठेवलं होतं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकच फलंदाज गमावून संघानं ६९ धावांची मजल मारली होती. फिरकीचं आक्रमण सुरू झालं आणि त्या गतीला खीळ बसली.

चौकारांचा दुष्काळ
न्यू झीलँडच्या डावात चौकारांचा दुष्काळ दिसत होता. तब्बल ८१ चेंडू एकही फटका सीमेच्या पलीकडे गेला नाही. चौदाव्या षट्कातील दुसऱ्या चेंडूला डॅरील मिचेलने अक्षर पटेलला स्लॉग स्वीप मारून स्क्वेअर लेगला चौकार मिळवला. त्यानंतर थेट सत्ताविसाव्या षट्कातल्या कुलदीपच्या अखेरच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सने षट्कार मारला. गती किती संथ झाली होती? तर नऊ ते त्रेचाळीस ह्या षट्कांमध्ये चारच चौकार गेले.

फिरकी गोलंदाजांनी किवी फलंदाजांच्या नाकात दम आणला होता खरा. ही पकड अशीच राहती, तर न्यू झीलँडला निर्धारित षट्कांत जेमतेम सव्वादोनशेचा टप्पा गाठता आला असता.

पण मायकेल ब्रेसवेल ह्यानं कमाल केली. शेवटच्या सात षट्कांमध्ये ६७ धावा निघाल्या. त्यातही महंमद शमी आणि हार्दिक पंड्या ह्यांनी अखेरच्या तीन षट्कांमध्ये खैरातच केली. त्यांनी ३५ धावा दिल्या. सत्तेचाळिसावं षट्क संपलं तेव्हा ब्रेसवेलच्या ३५ धावा होत्या ३३ चेंडूंमध्ये. पुढं तो सुटला.

ब्रेसवेलची ही तोफ अखेरच्या षट्कातही धडाडावी म्हणून कर्णधार मिचेल सँटनरनं धावचित होणं पत्करलं. ब्रेसवेलच्या ४० चेंडूंमधील ५३ धावांच्या खेळीनं डॅरील मिचेलच संथ अर्धशतक स्वाभाविकच झाकोळून गेलं.

ढेपाळलेलं क्षेत्ररक्षण
भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण ह्या महत्त्वाच्या सामन्यातही ढेपाळलेलंच दिसलं. चार झेल सुटले. त्याची सुरुवात शमीनं केली आणि शेवट शुभमन गिल ह्यानं. श्रेयस अय्यर, रोहित शर्मा आणि गिल ह्यांच्या हातून सुटलेले झेले मिडविकेट, डीप मिडविकेट ह्याच क्षेत्रातले होते, ही एक गंमतच.


जादूगार...ग्लेन फिलिप्स
.......................

स्पेशल झेलानंतरची स्पेशल पोज...
................

बहुदा श्रेयसला ह्याची भरपाई प्रतिपक्षानं करून दिली. फक्त खातं उघडलेलं असताना काईल जेमिसन ह्यानं त्याचा झेल सोडला. तो कमनशिबी गोलंदाज कोण होता? ग्लेन फिलिप्स! ज्यानं अफलातून झेल घेत गिलचा ऑफ ड्राइव्ह पकडला होता. जादूगार हवेतून कबुतर काढून दाखवतो, त्या लीलया पद्धतीनं फिलिप्सनं चेंडू पकडला होता.

ह्याच जेमिसनच्या गोलंदाजीवर गिलला जीवदान मिळालं तेव्हा तोही एकच धाव काढून खेळत होता. न्यू झीलँडच्या पराभवाला तो झेल कारणीभूत ठरला का? कारण मग रोहित आणि गिल ह्यांनी शतकी भागीदारी केली. पहिल्या दोन षट्कांमध्ये २२ धावा करणारा भारतीय संघ पहिला पॉवर प्ले संपल्यावर धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांच्या मागेच होता.

मधल्या षट्कांमध्ये न्यू झीलँडच्या फिरकी गोलंदाजांनीही भारतीय फलंदाजीच्या नाड्या आवळल्या. ते दडपण घेऊनच रोहित पुढे सरसावला आणि रचिन रवींद्रला यष्टिचित झाला.

शतकी सलामी महत्त्वाची का, तर दुबईच्या स्टेडियमवर मधल्या षट्कांमध्ये धावा करणं कठीण होतं. तिथेच पाच सामने खेळलेल्या भारतीय संघाला ह्याची कल्पना असणं स्वाभाविकच. म्हणूनच त्या काळात दाखवावा लागतो संयम. श्रेयस, अक्षर, राहुल आणि पंड्या ह्यांनी तो दाखवला. त्या संयमाचं फळ म्हणून नाव सुखरूप पैलतिरी लागली. मॅट हेन्रीची उणीव ब्लक कॅप्सना नक्कीच जाणवली. त्याचं रडगाणं सँटनरनं काही गायिलं नाही, हे कौतुकास्पदच.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपान्त्य लढतीतील डावच जणू राहुलने पुन्हा सुरू केला होता. विजय मिळविताना आधी पंड्या आणि शेवटी जाडेजा हेच त्याचे पुन्हा सहकारी होते. रोहित सामन्याचा मानकरी ठरणं स्वाभाविक. स्पर्धेत दोन शतकं झळकावणारा रचिन रवींद्र स्पर्धेतील सर्वोत्तम ठरला. अफ्लातून झेल घेणाऱ्या ग्लेन फिलिप्सचा त्या साठी विचार करायला काही हरकत नव्हती.

आयसीसीनं निवडलेला संघ
अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ह्या ‘स्पर्धेचा संघ’ निवडला. विजेता कर्णधार रोहितला त्यात स्थान नाही. एवढंच काय, सहभागी आठपैकी पाच देशांचा एकही खेळाडू नाही. ह्या सर्वोत्तम संघाची धुरा न्यू झीलँडचा कर्णधार मिचेल सँटनर ह्याच्या हाती सोपविण्यात आली आहे. पहिलीच चॅम्पियन्स स्पर्धा खेळणाऱ्या अफगाणिस्तानचे दोन खेळाडू ह्या संघात आहेत.

हा संघ असा -
रचिन रवींद्र (न्यू झीलँड दोन शतकं), इब्राहीम जदरान (अफगाणिस्तान, एक शतक, सरासरी ७२), विराट कोहली (एक शतक, सरासरी ५४.५), श्रेयस अय्यर (दोन अर्धशतकं), के. एल. राहुल (यष्टिरक्षक, सरासरी १४०, तेवढ्याच धावा, तीन वेळा नाबाद. लक्ष्याचा पाठलाग करताना निर्णायक खेळी, यष्टिरक्षणाचंही कौतुक), ग्लेन फिलिप्स (न्यू झीलँड, ५९ सरासरीनं २१७ धावा, दोन बळी आणि पाच अफ्लातून झेल), अजमतुल्ला ओमरजाई (अफगाणिस्तान, १२६ धावा, एकूण सात बळी - एका सामन्यात पाच), मिचेल सँटनर (कर्णधार, न्यू झीलँड २६.६ सरासरीनं नऊ बळी. इकॉनॉमी ४.८०), महंमद शमी (नऊ बळी आणि एका सामन्यात पाच बळी), मॅट हेन्री (दहा बळी १६.७ सरासरीनं. एकदा पाच बळी), वरुण चक्रवर्ती (नऊ बळी, सरासरी १५.१, इकॉनॉमी ४.५३) आणि बारावा खेळाडू - अक्षर पटेल.
....
(सर्व छायाचित्रे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या संकेतस्थळावरून साभार.)
....
#चॅम्पियन्स_करंडक #क्रिकेट #अंतिम_सामना #भारत_न्यूझीलँड #रोहित_शर्मा #श्रेयस_अय्यर #फिरकीचे_जाळे #ग्लेन_फिलिप्स #राहुल #ICC_Champions_Trophy #Champions_Trophy_Final #Ind_NZ #Black_Caps #Rohit_Sharma #Shreyas_Iyer #Glenn_Phillips #Rachin_Ravindra
....

४ टिप्पण्या:

  1. हार्दिक पंड्याचा उल्लेख करायचा राहिला की काय? या वेळी ह्या सामन्याचे प्रक्षेपण आम्ही दोघांनी आवर्जून पाहिलं! सामन्यातील दोन्ही टीमच्या कामगिरीचा आलेख free hand drawing सारखा वाटला. फक्त विराट कोहली कसा आऊट झाला ते मिस केलं.
    महंमद शमीची कामगिरी न्यूझीलंडचा स्कोअर वाढवणारी वाटली! एक विकेट मिळाली ही जमेची बाब.
    - राजेंद्र सहस्रबुद्धे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  2. अक्षर पटेल याची दोन षटके शिल्लक ठेवून शमी आणि हार्दिक यांना शेवटची षटके का दिली याचे आश्चर्य वाटते... दोन्ही षटके खूप महाग ठरली...फिरकी गोलंदाज पकड ठेवून आणि दडपण ठेवून असताना जलदगती गोलंदाजाना गोलंदाजांना शेवटी चेंडू सोपवण्याचा रोहितचा निर्णय अनाकलनीय वाटला... त्या दोन षटकात चोवीस धावांची भर पडली आणि न्यूझीलंड संघ २५० आकडा ओलांडू शकला...
    - राजेंद्र फरगडे, संगमनेर

    उत्तर द्याहटवा
  3. ✌ एकच नंबर
    - अनिल कोकीळ, पुणे

    उत्तर द्याहटवा
  4. ✌✌
    मी वाटच बघत होतो कालपासून ‘खिडकी’ची! 👍
    - जगदीश निलाखे, सोलापूर

    उत्तर द्याहटवा

खणखणीत आणि निर्विवाद

चॅम्पियन्स करंडक -  ६ अहमदाबादेतल्या ठसठसत्या जखमेवर दुबईत  पुन्हा एकदा हळुवार फुंकर मारण्यात आली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकाव...