नांदेडला झालेल्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या
कार्यक्रमाला अभिनेत्री काजोल आमंत्रित होती. तिला मग ‘दोन शब्द’ बोलण्याची विनंती झाली. तिच्या मराठीपणाचा आणि मराठी कुळाचा
अभिमानाने उल्लेख करण्यात आला.
काजोल बोलायला उठली आणि मराठीत बोलताना गडबडू लागली. तिनं त्याच गडबडीत अक्षरशः दोन शब्द संपवले. तिला सावरून घेताना लफ्फेदार साडीतील सूत्रसंचालिका तेव्हा म्हणाली होती, ‘काजोलचा की नै, मराठीचा थोडा प्रॉब्लेम आहे!’
नेमका हाच प्रॉब्लेम आमच्या अथर्वचा होता. फक्त भाषा बदलती. त्याला इंग्रजीची अडचण होती.
आईचा आग्रह असतानाही अथर्वच्या बाबांनी त्याला जाणीवपूर्वक मराठी शाळेत घातलं होतं. पहिलीपासून इंग्रजी असूनही अथर्वला त्यात गती नव्हती. ‘रेन रेन गो अवे’ आणि ‘हम्प्टी डम्प्टी’ याच्या पलीकडे त्याची इंग्रजीची गाडी पुढं सरकत नव्हती. एकदा तर त्यानं आईला लाज आणली. दुसरीतल्या अथर्वचं मैत्रिणींपुढं कौतुक करताना ती म्हणाली होती, ‘‘आमचा अथ्थू एका दमात ए टू झेड आणि वन टू हंड्रेड म्हणतो.’’ मग तिनं त्याच कौतुकभरल्या नजरेनं अथर्वला खुणावलं होतं. तिने सांगितल्याप्रमाणे त्यानं खरंच एका दमात ‘ए टू झेड’ आणि ‘वन टू हंड्रेड’ एवढे सहाच शब्द उच्चारले!
तर ते असो. यथावकाश अथर्व पुढच्या इयत्तेत जात राहिला.
इंग्रजीत पासापुरते मार्क मिळवित राहिला. आता तो आठवीत गेला. आईनं त्याच्या
बाबांचं काही न ऐकता त्याला हट्टानं ‘सेमी-इंग्लिश’च्या तुकडीत टाकलं. गणित-विज्ञान इंग्रजीतून शिकताना अथर्व
बिचारा घायकुतीला आला.
तसा अथर्व चांगला मुलगा. आज्ञाधारक, गृहपाठ नियमित पूर्ण करणारा, काही खेळात भाग घेणारा, स्नेहसंमेलनात छोट्या नाटुकल्या करणारा, हिंदी गाण्यांवर सामूहिक नाचणारा... इंग्रजीच्या सरांना
त्याची थोडी दया आली. ‘यू इज द गुड टीचरर’ हे अथर्वचं इंग्रजी त्यांच्या पचनी पडत नव्हतं. त्याचं
इंग्रजी सुधारायचंच, असा त्यांनी चंग बांधला.
वाघिणीचं दूध त्याला पचवायला लावायचंच, असा निश्चय करून त्यांनी आठवड्यातले दोन तास त्यासाठी खास
खर्च करायचं ठरवलं.
दोन-तीन आठवड्यानंतर अथर्वचं इंग्रजी आधीपेक्षा थोडं बरं
झालं, असा सरांचा समज झाला.
त्याचं प्रात्यक्षिक त्यांनी वर्गात दाखवायचं ठरवलं. तास सुरू झाल्यावर त्यांनी
अथर्वला एका कोपऱ्यात उभं केलं आणि स्वतः दुसऱ्या कोपऱ्यात उभे राहिले. सर म्हणाले, ‘‘अथर्व, तू मला तुझ्याकडे बोलव पाहू...’’
अथर्वनं एकदा घसा खाकरला आणि म्हणाला, ‘‘सर, प्लीज कम हिअर...’’
खूश झालेल्या सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांकडे अभिमानाने
पाहिलं आणि अथर्वकडे जाऊन म्हणाले, ‘‘आता तू मला त्या कोपऱ्यात जायला सांग बघू...’’
अथर्व क्षणभर गोंधळला आणि लगेच तरातरा पलीकडच्या कोपऱ्यात
गेला. तिथनं म्हणाला, ‘‘सर, प्लीज कम हिअर!!’’
सरांची बोलतीच बंद झाली. त्यांनी मग खूप विचार केला. एके
दिवशी ते अथर्वला म्हणाले, ‘‘अथ्थू, तुझं इंग्रजी नक्कीच चांगलं होईल. त्यासाठी एक कर... तू
स्वप्नंही इंग्रजीतच पाहत जा.’’
सरांच्या या सांगण्यावर अथर्वनं विचार केला. दोन दिवसांनंतर
तो मधल्या सुटीत सरांना भेटला आणि म्हणाला, ‘‘सर, तुम्ही म्हणता तसं झालं
हं. मला काल इंग्रजीतनंच स्वप्न पडलं.’’
उत्तेजित झालेल्या सरांनी विचारलं, ‘‘वा, वा. काय स्वप्न पडलं?’’
‘‘मी एका मोठ्या सभागृहात उभा होतो सर. खूप लोक होते तिथं.
सगळे जोरजोरात एकमेकांशी इंग्रजीत बोलत होते, इंग्रजीतच हसत होते,’’ अथर्वनं सांगितलं.
‘अरे वा!’, असं म्हणत सरांनी विचारलं, ‘‘काय बोलत होती ही सगळी मंडळी?’’
जी अवस्था इंग्रजीची झाली आहे, तीच मराठी व इतर भाषांचाही झाली आहे. कारण एकच की इंग्रजीचा अतिहव्यास आणि त्यामुळे आपल्या मातृभाषेकडे होणारं कमालीचं दुर्लक्ष . यामुळे तो विद्यार्थी `धोबी का कुत्ता...` होतो आहे . पालकांनी विचार करणं आवश्यक आहे .
उत्तर द्याहटवा- प्रा सुरेश जाधव, नांदेड
Best
उत्तर द्याहटवा