Sunday, 30 December 2018

इये राजकारणाचिये नगरी


इतिहासाचे जुने साक्षीदार
ऐसे एक आटपाट 'नगर'
पौरजनांचा सदा चाले गजर
शहर माझे भले

नगरी ही नावाने शेलाटी
नसे काना, मात्रा, वेलांटी
नित्य नवी मारी कोलांटी
राजकारण तिथले

पाहण्या नगराचा कारभार
पालक संस्था 'महा' फार
निधीच्या अभावी आजार
तिला सदा नि कदा

तिथे एकदा जाण्याकरिता
म्हणे सेवक होण्याकरिता
आटापिटा जिवाचा करिता
इच्छुकांची तोबा दाटी

फूल पाकळ्यांचे कोणा हाती
कुठे वाघोबाचा होतसे हत्ती
येई त्याला पावन करिती
दत्तकविधान पवित्र

निवडणुकीचा खेळ मजेदार
घ्यावे दोन नि द्यावे चार
खरे पाहता असे व्यवहार
छनछनाट सारा

कोणा गरिबा दाखवावा गुत्ता
कोणासी करून द्यावा रस्ता
कोणा एखाद्याची मालमत्ता
द्यावी छान रंगवोनी

होता जाहीर तो निकाल
लागे अनेकांचा निक्काल
फासला विजयाचा गुलाल
अडुसष्टांच्याच माथी

बहुमतासाठी संख्या अपुरी
न लागे एक नाव किनारी
नवागत अश्व उभे बाजारी
लिलावासाठी सिद्ध।

याचे आणि त्याचे जमेना
त्याला शूत्रविना करमेना
आकडेमोडीनंतरही जुळेना
सत्तेचे समीकरण।

धाकला झाला होता मोठा
त्याचा काही उतरेना ताठा
देऊन टाकू आता जमालगोटा
म्हणती थोरल्या।

युती होणार की आघाडी
का आहे सगळी बिघाडी?
पकणार वेगळीच खिचडी?
कट काही शिजला।

दिवस तो उगवला महान
प्रथम नागरिकाचे चयन
अवघ्या नगरीचे नयन
एक टक तिकडे।

चमत्कार! चमत्कार!
अवघा झाला हाहाकार
तत्त्व-भूमिकांचा विसर
पडला सोयीस्कर।

धडा शिकवण्याचा बांधला चंग
केला त्यासाठी असंगाशी संग
सत्तेच्या कैफात केवढे दंग
पक्ष म्हणे वेगळा।

वादी घाली गळ्यात गळा
आपली झाली नकोशी कमळा
सैनिकहो आता हात चोळा
वंदा चरण श्रीचे।

खड्ड्यात गेली शेवटी युती
आघाडीनेही खाल्ली माती
मित्रधर्मा लागली पनवती
पॅटर्न नवा ये जन्मा।

दलदलीतच कमळ फुले
बुडता अधिक खोल चाले
सांगुनही हे तयां न कळे
गुंता सारा दाढीत।
-----------
अचंबित, भयकंपित आम आदमी
---------------
(महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत
युती तुटल्यावर प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार मंजूल यांनी
रेखाटलेले हे चित्र नगरमध्ये अगदी तस्सेच लागू पडले.)

19 comments:

 1. सध्या राजकारणावरील हेमार्मिक भाष्य

  ReplyDelete
 2. सर, एकच नंबर टोला हाणला

  ReplyDelete
 3. अगदी मार्मिक

  ReplyDelete
 4. सत्तेच्या राजकारणात काहीही चालते; तोपर्यंत सामान्यांनी बघत बसायचे ह्यास पर्याय नाही.
  नानी पालखीवालांसारख्या संयमित, मोजून-मापून बोलीबद्दल प्रसिद्ध असलेल्या विधितज्ज्ञाने 'फोरम ऑफ फ्री एन्टरप्राइझ'च्या व्यासपीठावरून १९६५मध्ये केलेलं विधान आठवले - WE, the advocates are nothing more that indulging in intellectual prostitution, where our educated brain is spread to cover the problem with the linen of well said vocabulary!'
  असो. धन्यवाद!
  - भाल पाटणकर, मुंबई

  ReplyDelete
 5. नगरमधील राजकीय घडामोडींवर बोचरे आणि मर्मभेदी भाष्य. सतीशराव, तुमच्या शब्दसामर्थ्याचाही परिचय या काव्यातून घडतो. तथापि, अशा काव्यात्म टोचणीने राजकारण्यांचा बाल बाका होत नाही हेही खरे. अशा संधीसाधूंना आपण निवडून दिल्याची लाज जनतेलाही वाटत नाही.... असो. नेहमीप्रमाणे दर्जेदार आणि पीनपाँईटेड...धारदार,टोकदार.

  ReplyDelete
 6. व्यंगचित्रासह आपले भाष्य खमंग आणि चुरचुरीत

  ReplyDelete
 7. मस्त. तंतोतंत.
  - अमित बैचे, नगर

  ReplyDelete
 8. Great text with apt comment on today`s people and politics.
  खास सतीश टच..!
  - डॉ. प्रदीप सेठिया, पुणे

  ReplyDelete
 9. खूपच छान आहे हे!
  - सुरेखा आव्हाड शिरसाट, नगर

  ReplyDelete
 10. ग्रेट! सुंदर भाष्य कवितेतून...
  - जयंत येलूलकर, नगर

  ReplyDelete
 11. अगदी वर्मी घाव. मस्तच...

  नगरच्या स्थानिक राजकारणाचा माझा अभ्यास नाही. निवडणुकीनंतर झालेली युती भद्र की अभद्र या फंदातही मी पडत नाही. 'तत्त्वांना तिलांजली', 'सत्तेसाठी काहीही', 'राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो' वगैरे... अशा घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांचा वापर न करता मला असे वाटते की, एकदा हे व्हायलाच हवे होते.

  कडू कारलं तुपात घोळा की साखरेत; कडू ते कडू. किंवा कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. असंच काही तरी इथं घडलं, असं मला वाटतं.

  मोठ्या भावाने कितीही नमते घेतले, तरी समोरचं नेतृत्व रोज उठून भुंकतच राहणार असेल, तर यापेक्षा वेगळं काही होण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे वेड्याच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे. अशी घटना मुंबई महापालिकेच्या निवडणुकानंतरच घडली असती. परंतु तेव्हा सरकारच्या अस्तित्वाचा प्रश्न होता म्हणून...

  हा एक गर्भित इशारा असू शकतो. शेवटी काय, तर खूप ताणले की तुटतेच!
  - दिलीप वैद्य, पुणे

  ReplyDelete
 12. शेवटच्या चार ओळी धम्मालच! प्रहसन काव्य प्रचंड आवडलं.
  - संजय आढाव, नगर

  ReplyDelete
 13. अगदी मार्मिक! पण त्यातली कळकळ निगरगट्टांना कधी व कशी कळणार?
  - सुनील जोशी, नगर

  ReplyDelete
 14. एकदम बरोबर आहे. उत्तम लिखाण! अभिनंदन...
  - रवींद्र देशपांडे, पुणे

  ReplyDelete
 15. बऱ्याच दिवसांनी असे काही वाचावयास मिळाले; जे पद्य होते आणि त्यात कमीलाचा विखार होता.

  पूर्वी काही सदरे 'मटा', 'लोकसत्ता' यातून येत. त्यात असे प्रसिद्ध सदर-लेखक मधूनच लिहीत. ती मजा परत अनुभवता आली. पण मला नगर येथे नेमके काय झाले, ते इत्थंभूत अजूनही कळले नाही.

  पण त्याने फरक पडत नाही. त्यावरचे भाष्य कळते. ते तसे कळते, कारण आता हा under-current सगळीकडचे सापडतो. तो सापडतो आणि सार्वत्रिक असतो, हा एकूण मोठा असा downfall आहे. आणि तो वाढणार, हे स्पष्ट आहे!

  लोकांसाठीची जी व्यवस्था नेमून दिलेली आहे, ती काळी ठिक्कर आहे आणि त्यात काहीही बदल होईल, अशी चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत शब्द acidic होतातच; पण तरीही ते मर्यादेत असतात, हे लेखनकौशल्य आहे.
  - प्रदीप रस्से, जळगाव

  ReplyDelete
 16. आपले लिखाण वाचले. अतिशय सुंदर लिहिलेय.
  - पल्लवी माने

  ReplyDelete
 17. एकदम भारीच लिहीले आहे...

  ReplyDelete
 18. 'नगर लीलामृत' वाचले. नकळत संत कबीराचा दोहा आठवला -
  'यह कलियुग आयो अबै, साधु न मानै कोय।
  कमी, क्रोधी, मंस्खरा, तिनकी पूजा होय।।'

  'जहाँ डाल डाल पर सोनकी चिडिया...' असा आमचा देश गेल्या ७१ वर्षात कुठे नेऊन ठेवला? यथा प्रजा तथा राजा.

  असो. आपल्या तळमळीची दाद देतो.

  - श्रीराम वांढरे, भिंगार, नगर

  ReplyDelete

'हिंडता फिरता' अध्यक्ष उदगीरला लाभता

  'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्या...