नवं वर्ष उगवलं आणि आता अंगवळणी पडलं. नव्या वर्षाची चाहूल
लागताच नवे संकल्प मनाच्या कवाडावर टकटक करू लागतात. यंदा काय करण्याचा संकल्प
सोडायचा? किंवा काय सोडून देण्याचा चंग बांधायचा? वर्ष
सरताना मनात जे काही ठरवलं आहे, ते पाळलं जाईल का? संकल्प पूर्ण होईल का? की नेहमीसारखंच... नव्याचे
नऊ दिवस; आठ-दहा दिवसांनंतर पहिले पाढे पंचावन? केलेल्या संकल्पावर ठाम राहण्यासाठी कुणी काही प्रोत्साहन दिलं तर
निश्चयाला अधिक बळकटी येईल का? आयुष्याची दिशाच बदलणारी
घसघशीत रक्कम देऊ केली तर?
बाकी जगाचं माहीत नाही; पण यंदा अमेरिकी नागरिकांना ही
संधी मिळाली आहे. ती देऊ केली आहे ‘व्हिटॅमिन वॉटर’नं एका स्पर्धेद्वारे. स्पर्धेचं नाव आहे – व्हिटॅमिनवॉटर
स्क्रोल फ्री फॉर ए यीअर कॉन्टेस्ट. विजेत्याला मिळतील एक लाख डॉलर! त्यासाठीची एक छोटी अट आहे – स्मार्ट फोनपासून (आणि
टॅबपासूनही) ३६५ दिवस लांब राहायचं. वापर सोडाच, स्पर्शही नाही करायचा. नाही म्हणजे नाही.
अगदी दुसऱ्याचाही वापरायचा नाही.
स्मार्ट फोन वापरणं बंद. म्हणजे मग काय काय बंद?
मेसेज, फोटो, व्हिडिओ, मल्टीमीडिया
मेसेज पाठविणं, इमेल... बंद.
इंटरनेटचा वापर...बंद.
जीपीएस वापरणं...बंद.
व्हिडिओ चॅटिंग...बंद.
सोशल नेटवर्किंग...बंद.
गेम खेळणं...बंद.
...आपल्यासाठी स्मार्ट फोनमध्ये सर्वांत महत्त्वाचं म्हणजे
व्हॉट्सॲप. तेही बंद!
एकूण ३६५ दिवस गुणिले २४ तास. राजकीय
पोस्ट, विनोद, व्हिडिओ, देवादिकांची स्तोत्रं हे पाहणं आणि पुढं
ढकलणं बंद. गुड मॉर्निंग-गुड नाईटचे, शुभेच्छांचे, सणांचे फॉरवर्ड बंद. जमेल हे? उत्तर काहीही असेल... ‘हो’, ‘प्रयत्नपूर्वक शक्य’ किंवा ‘अगदीच अशक्य’. पण
आपल्यासाठी नाहीच ही स्पर्धा.
स्पर्धेची घोषणा करणारं 'व्हिटॅमिन वॉटर'चं ट्वीट. .............................. |
‘व्हिटॅमिन वॉटर’ म्हणजे
प्रसिद्ध ‘कोका-कोला कंपनी’च्या
खनिजयुक्त पाण्याचं ‘ब्रँड नेम’.
कशामुळं आयोजित केली आहे, ही स्पर्धा? ‘व्हिटॅमिन वॉटर’च्या संकेतस्थळावर यामागची भूमिका
दिली आहे – स्मार्ट फोनशिवाय जगता येणारच नाही, असं आज कोणत्याही दोघांपैकी एक जण म्हणतो, हे
माहितीय तुम्हाला? तरुण पिढी आणि अगदी मुलंही आपला उत्पादक
वेळ यात घालवताना दिसत आहेत. हे दुष्टचक्र मोडून काढा. तुम्ही ज्या आयुष्याचं
स्वप्न पाहात आला आहात, ते आयुष्य खरंखुरं जगा.
शर्टाच्या खिशात मावणाऱ्या मोबाईलमध्ये इंटरनेट आलं, ही या दशकातली सर्वांत मोठी क्रांती. त्या क्रांतीनं मोबाईलचा झाला
स्मार्ट फोन. त्यानं पोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना झपाटून टाकलं. www.statista.com संकेतस्थळावरील
आकडेवारीनुसार सध्या जगभरातली दोन अब्ज ५३ कोटी माणसं स्मार्ट फोन वापरतात. पुढच्या वर्षी त्यात १८ कोटींची भर पडेल आणि अजून दोन वर्षांनी, म्हणजे २०२०मध्ये ही संख्या होईल दोन अब्ज ८७ कोटी. आपल्या देशात ही संख्या आहे ३३ कोटी ७० लाख.
त्यात अर्थातच भर पडत राहील.
स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या गेल्या पाच
वर्षांत फार झपाट्यानं वाढली. वापर एवढा की, काही दिवसांतच ते ‘व्यसन’ झालं. समाजशास्त्राचे अभ्यासक, डॉक्टर, मनोविकारतज्ज्ञ असे सारे या
व्यसनाधिनतेबद्दल बोलत आहेत आणि धोक्याचा इशारा देत आहेत. आभासी दुनियेत लोक नको
तेवढं रमू लागले. त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होताना दिसतो.
भ्रामक गोष्टींतली गुंतवणूक, बिघडणारी जीवनशैली, निद्रानाश, डोळ्यांचे विकार,
वास्तव जगाशी फटकून राहणं असं बरंच काही. दैनंदिन दोन किंवा तीन जीबीच्या डाट्यात
गुंतलेली दुनिया!
‘सीएनबीसी.कॉम’ संकेतस्थळानं
दिलेल्या बातमीनुसार १८ ते ३४ वयोगटात स्मार्ट फोनचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. या
वयोगटात असणारे स्मार्ट फोनवरच्या फक्त मनोरंजनासाठी रोज अडीच तास खर्च करतात!
‘निएल्सन टोटल ऑडियन्स’च्या अहवालानुसार या
सहस्रकाच्या सुरुवातीला तारुण्यात प्रवेश केलेल्यांमधले ४३ टक्के लोक दर २०
मिनिटांनी आपला फोन तपासून पाहतातच. म्हणून तर ‘व्हिटॅमिन
वॉटर’च्या या स्पर्धेचा विजेता १८ ते ३० वयोगटातला असण्याची
शक्यता फारच कमी असल्याचं अभ्यासकांना वाटतं. तरुणांच्या या मोबाईल वेडाबद्दल सॅन
डिएगो विद्यापीठातील मानसशास्त्राचे प्राध्यापक जीन एम. ट्वेंग म्हणाले की,
तरुण पिढी स्मार्ट फोनमध्ये एवढी गुंतून गेली आहे की, ती मानसिक आरोग्याच्या धोक्याच्या कड्यावर आहे. या दशकातील हे सर्वांत
भयानक संकट आहे, असं वाटतं.
परिस्थिती अशी भयावह असल्यामुळंच त्यातून सुटका
करून घेण्याचा एक मार्ग म्हणून या ‘स्क्रोल फ्री कॉन्टेस्ट’कडं बघता येईल. आयोजकांनी आपल्या ‘ट्विटर हँडल’वर ११ डिसेंबरला स्पर्धेची घोषणा केली आणि तिला जोरदार प्रतिसाद मिळाला.
अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनातील १८ वर्षांपुढील आणि स्मार्ट फोनचा नियमित वापर
करणाऱ्या कोणालाही त्यात भाग घेता येईल. आयोजकांच्या ‘ट्वीट’ला उत्तर देऊन स्पर्धेसाठी नाव नोंदवायचं आहे. उत्तरात दोन हॅशटॅग
वापरायचे आहेत - #NoPhoneforaYear
#contest.
आयोजकांनी ट्वीटमध्ये सगळे नियम, अटी स्पष्ट केल्या
आहेत. ट्वीट करून किंवा इन्स्टाग्रामवरून स्पर्धकांनी येत्या आठ जानेवारीपर्यंत
नाव नोंदवायचं. स्मार्ट फोन न वापरता तुम्ही वर्षभर काय करणार, हेही प्रवेशिकेत लिहायचं आहे. संभाव्य विजेत्यांची निवड २२ जानेवारीला
केली जाईल. त्यांच्याशी व्यवस्थित करार करण्यात येईल. या मंडळींना आयोजकांकडून एक
मोबाईल मिळेल – तो असेल दोन दशकांपूर्वीच्या पिढीतला,
१९९६मध्ये वापरात होता तसा. त्याच्या सोबत आयोजक देतील ‘मंथली प्लॅन’.
एका संभाव्य स्पर्धकानं विचारलं, पण कुणी स्मार्ट फोन वापरत
असेल, तर तुम्हाला ते कसं कळेल?
आयोजकांनी त्याचाही विचार केला आहे. वर्षभराचा हा करार संपल्यावर विजेता
ठरविण्यासाठी ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ घेतली जाईल.
स्पर्धेत भाग घेण्याच्या ट्वीटसोबत फोडून टाकलेल्या स्मार्ट फोनचं सादर केलेलं छायाचित्र. ...................... |
एक
लाख डॉलर! मोठी रक्कम. अनेक स्वप्नं सत्यात आणण्याची ताकद
असलेली रक्कम. त्यामुळेच आठवडाभरात नऊ हजार ६०० जणांनी हे दोन हॅशटॅग वापरून
स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली. एकूण दोन हजार जणांनी री-ट्वीट केलं आणि
या ट्वीटला लाईक मिळाले साडेपाच हजार. आपण या स्पर्धेत का भाग घेऊ इच्छितो हे
ट्वीटमध्ये इच्छुकांनी लिहिलं आहे. पैसे हा त्यातला मोठा भाग आहेच. याशिवाय आपण
यात नको एवढा वेळ घालवतो, हेही अनेकांच्या मनाला खातंय,
हे दिसतं. स्टिफनी मिन्स म्हणतात - (स्मार्टफोन
वापरत नसल्यामुळे) माझं आयुष्य थोडंसं कमी त्रासाचं होईल. स्मार्ट फोनमुळं खूप
काही बदललं आहे, आपण काही तरी गमावलं आहे, याची खंत बऱ्याच जणांना वाटत असल्याचं त्यांच्या ट्वीटमधून सहज कळतं. @bobsonpsamuel यांनी लिहिलंय – मी तयार आहे. स्मार्ट फोनपासून
लांब राहिल्यानं मला चांगली झोप मिळेल, मला काही उत्पादक
करता येईल आणि मित्र, कुटुंब यांच्यासमवेत वेळ घालवीन.
हेन्री बार्झागा लिहितात की, ‘मी भरपूर
झोप घेईन. दिवसातले २४ तास फोनला कवटाळून बसण्यापेक्षा
घराबाहेर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होईन.’ हे ‘व्यसन’ कसं नि किती घातक आहे, हे
या वर्षभरात मी इतरांना शिकवीन, त्यातले धोके समजावून देईन.
या उपकरणाशिवायही कसं छान जगता येतं, हेही शिकवीन, असं जॅगर यांनी प्रवेशिकेत लिहिलं आहे.
स्मार्ट फोनच्या व्यसनावर नेमकं भाष्य करणारं एका स्पर्धकानं ट्वीट केलेलं व्यंग्यचित्र. .................... |
स्मार्ट फोनमुळे
कुटुंबातला संवाद कसा संपला आहे, याचीही जाणीव काही स्पर्धकांच्या मनोगतामधून
होते. @OMARIIYON या ट्वीटर हँडलनं
काय लिहिलंय आयोजकांना पाहा – या स्पर्धेत माझ्या आईला सहभागी करून घ्या. ती
आम्हा भावंडांना पुरेसा आणि आवश्यक तेवढा वेळ देत नाही. ती सहभागी झाली, तर आम्हाला आमच्या हक्काचा वेळ तिच्याबरोबर घालवता येईल! काहीशी अशीच व्यथा शरिफा कूव्हर यांनी बोलून दाखविली आहे. त्या लिहितात की,
माझ्या मुलानं मला एकदा विचारलं, ‘माझ्या फोटोला किती लाईक मिळाले?’ तुम्ही काय करत
आहात, ते मला चांगलं कळलंय. आता मी माझ्या मोठ्या
कुटुंबाबरोबर थोडा अधिक वेळ घालवीन आणि त्यांच्या गप्पा-गोष्टी आनंदाने ऐकीन. डाऊड
मेझन यांना खंत आहे ती आपण खऱ्या जगापासून लांब गेल्याची. मी माझं ज्ञान, कौशल्य वाढवीन आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मी ज्याला मुकलो आहे, त्या वास्तव जगातील लोकांशी संवाद साधीन, असं ते
म्हणतात. फोनशिवाय जगता येतं, हे बीडी ॲड्रिआना यांना पतीला
दाखवून द्यायचं आहे.
स्पर्धेत भाग
घेतल्यावर वर्ष कसं घालवणार? या प्रश्नालाही स्पर्धकांनी उत्तरं शोधून ठेवली
आहेत आपल्या परीनं. ॲड्रिअनला वाटतं, आता कसलाच व्यत्यय
नाही. त्यामुळे आठवड्याला एक पुस्तक सहज वाचून होईल. थियो लिस्टरही असाच
पुस्तकवेडा. तो लिहितो, आता मी स्मार्ट फोनऐवजी पुस्तक जवळ
बाळगीन. सोशल मीडियाचा विसर पडण्यासाठी पुस्तक मोठ्यानंही वाचीन कदाचित. अतिकठीण
अशा मॅरॅथॉन स्पर्धेसाठी या काळात अगदी कसून सराव करण्याचा संकल्प सारा हिनं सोडला
आहे.
स्मार्ट फोनमुळे
आयुष्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पनाही अनेकांना आलेली दिसते. त्याबद्दल
वाटणारा खेद त्यांच्या ट्वीटमधून कळतो. काही विद्यार्थी आहेत. स्मार्ट फोनमुळे आपण
अभ्यासात कमी पडतो,
एकाग्रता राहत नाही, हे त्यांना जाणवलं आहे.
या संधीचा फायदा घेऊन ते अभ्यासाकडं लक्ष देणार आहेत. काहींना मिळणाऱ्या
बक्षिसातून जग हिंडून यायचं आहे. मानसिक आरोग्यावरचा परिणामही काहींनी लिहून
दाखविला आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी, मानसिक आरोग्याकडे
लक्ष देण्यासाठी ही एक मोठी संधी आहे, असं बेक्का हिला
वाटतं.
या स्पर्धेच्या
निमित्तानं बरेच अमेरिकी विविध पद्धतीनं व्यक्त झाले आहेत. त्यातल्या अनेकांना एक
लाख डॉलर खुणावत आहेत,
हे नक्की. त्याचप्रमाणे स्मार्ट फोनचा अतिवापर आपल्या हिताचा नाही,
हे पटलेले अनेक जण ही स्पर्धा म्हणजे त्यापासून लांब राहण्याची,
तो टाळण्याची सुवर्णसंधी मानत आहेत. काहींना मुलांमध्ये रमायचं आहे,
तर काहींना अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. स्पर्धेचा निकाल २०२०मध्ये लागेल. त्या वेळी एक लाख डॉलर कोण जिंकतं, याच्यापेक्षा महत्त्वाचं असेल, ते किती अमेरिकी नागरिकांना या मिषापासून वर्षभर दूर राहण्याचं साधलं ते!
भारतीय मंडळीही होती
इच्छुक
ही स्पर्धा
अमेरिकी सज्ञान नागरिकांसाठीच असल्याचं आयोजकांना नियमावलीच्या पहिल्याच वाक्यात
म्हटलं आहे. असं असलं तरी अमेरिकेव्यतिरिक्त अनेक देशांच्या नागरिकांनी स्पर्धेत
सहभागी होण्यासाठी ट्वीट केली आहेत. त्यात भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. यातल्या
काहींनी इंग्रजीची लावलेली वाट पाहून करमणूक होते. काहींनी ‘मला पैसे
हवेत’ असं अगदी सरळसोटपणे सांगितलं आहे. अतुल अग्निहोत्री
यांनी केलेलं ट्वीट मात्र नेमकं आहे. ते लिहितात, ‘कृपया शक्य असेल, तर ही स्पर्धा भारतीयांसाठी घ्या.
इथं त्याची (स्मार्ट फोनपासून लांब राहण्याची) खरोखरच गरज आहे.’
--------------
#नववर्ष_संकल्प #मोबाईल #स्मार्ट_फोन #व्हिटॅमिन_वॉटर #फोन_बंद
#स्मार्ट_फोन_व्यसन #एक_लाख_डॉलर #आभासी_दुनिया #मानसिक_आरोग्य #ट्वीट
#री_ट्वीट #अमेरिका
#NoPhoneforaYear #contest
--------------
(दैनिक पुढारीच्या
बहार पुरवणीमध्ये ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेला लेख.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा