बुधवार, १७ जून, २०१५

सरता गोडी, उरे लबाडी!

भाषण असो वा प्रवचन; वाद असो की संवाद... हे सगळं थोडक्यात आवरलं पाहिजे. थोड्यात गोडी नि फारात लबाडी! नरेशला हा धडा आवडला नि पचनी पडला, त्याचीही एक मोठी गोष्ट आहे.

कधी नाही ते त्या दिवशी नरेशला सगळ्या भौतिक सुखांचा कंटाळा आला. फेसबुकवर बसायला नकोसं वाटू लागलं. न्यूझीलंडविरुद्ध हरणाऱ्या टीम इंडियाचा खेळ पाहताना त्याला जांभया येऊ लागल्या. महिलांचे टेनिस सामने किंवा `रावडी` युरोपीय वा दक्षिण अमेरिकी फुटबॉलचे सामनेही त्याला पाहावेसे वाटेनात. जुन्या गाण्यांचा ठेका त्याला जुनाट वाटू लागला आणि नवी गाणी कर्णकटू. वृत्तपत्र हातात धरवेना नि मासिकाचं पान उलटावं वाटेना... सगळं कसं नको, नकोसं झालेलं. त्यातच बायको समोर येऊन गप्पा मारायच्या मूडमध्ये बसली.

विरक्तीचा झटका आल्यासारखा नरेश उठला. अंगात त्यानं सध्या फॅशन असलेला अर्ध्या बाह्यांचा झब्बा अडकवला. पँटऐवजी पायजमा चढवला. पाकीट खिशात नि पाय चपलेत सरकवले आणि निघाला... निरुद्देश. जाता जाता त्याला रामाचं देऊळ दिसलं. खरं तर ते कैक वर्षांपासनं त्याच्याच रस्त्यावर होतं. पण रोजच्या घाईत, आलिशान मोटारीतून जाताना त्याचं कधी लक्षच गेलं नव्हतं. त्या दिवशी मात्र नरेश थबकला. आपल्या जवळच एवढं छोटं, टुमदार देऊळ आहे, यावर त्याचा विश्वासच बसेना. चपला बाहेर ठेवून आत शिरला.

मंदिरात त्या दिवशी नेमकं प्रवचन होतं. अगदी तरुण दिसणारे, प्रसन्न चेहऱ्याचे बुवा आले. चेहरा हसरा होता; दाढी वाढवलेली, पण नीटनेटकी होती. त्यांना पाहून नरेशनं सहज आपल्या दाढीतून बोटं फिरवली. `ही तरुण पिढी अध्यात्माबद्दल काय सांगती, ते तरी ऐकू या` असं मनाशीच म्हणत नरेश मागं बसला. कंटाळा आला की, पटकन निघता यावं, या विचारानं.

प्रवचन सुरू झालं. बघता बघता बुवांनी पकड घेतली. नरेश पहिल्या 10 मिनिटांतच त्यात रंगून गेला. बुवांची रसाळ वाणी, त्यांची उदाहरणं, निष्कर्ष त्याला पटू लागले. प्रवचन पूर्ण ऐकायचं आणि निघताना आरतीच्या ताटलीत 100 रुपये अर्पण करायचे असं त्यानं ठरवून टाकलं.

प्रवचन चालूच होतं. आणखी 15 मिनिटं गेली. नरेशला थोडं कंटाळल्यासारखं वाटू लागलं. त्यानं आजूबाजूला पाहिलं. उठावं की काय, असा मनात आलेला विचार दाबून टाकला. आरती होऊ दे, ताटलीत 50 रुपये ठेवू नि जाऊ, असं ठरवलं त्यानं.

आणखी 20 मिनिटं गेली. नरेशला आता पुन्हा घरातल्यासारखं कंटाळवाणं वाटू लागलं. एकदाचं प्रवचन संपू दे, आरतीच्या ताटात 25 रुपये टाकू नि सटकू... त्यानं मनाला बजावलं.

तब्बल सव्वा तासानं प्रवचन संपलं. तोवर नरेशला जांभयावर जांभया येऊ लागल्या होत्या. आरतीचं ताट सगळीकडं फिरू लागलं. ते जवळ आल्यावर नरेशनं पटकन त्यातली दहाची नोट उचलली, खिशात टाकली नि बघता बघता तो बाहरेच्या गर्दीत दिसेनासा झाला!!

(मूळ आहे मार्क ट्वेनचा छोटा विनोद. पण त्यात भरपूर पाणी घातलं नि दिला मऱ्हाटमोळा साज.)
(पूर्वप्रसिद्धी - `फेसबुक`च्या भिंतीवर 29 जानेवारी 2014)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...