ते वर्ष महत्त्वाचंच होतं. आता
इतिहासात स्थान मिळवलेल्या अनेक घडामोडी त्या वर्षात घडल्या. उदाहरणार्थ, इदी अमिन
ह्यांनी लष्करी उठाव करून युगांडाची सत्ता ताब्यात घेतली. चीननं अमेरिकेच्या टेबल
टेनिस संघाला आमंत्रण देऊन ‘पिंगपाँग डिप्लोमसी’ सुरू
केली. अमेरिकेनं सव्विसावी घटनादुरुस्ती करून मतदाराचं वय १८ वर्षावर आणलं. भारत
आणि सोव्हिएत रशिया ह्यांनी २० वर्षांच्या मैत्री करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ‘द
न्यू यॉर्क टाइम्स’नं ‘पेंटॅगॉन पेपर्स’ प्रसिद्ध करून युद्धखोर अमेरिकी सरकारचा खोटारडेपणा उघडकीस आणला. ‘वॉल्ट
डिस्ने वर्ल्ड थीम पार्क’चं उद्घाटन झालं. वगैरे वगैरे...
ते वर्ष होतं १९७१. हिमाचल प्रदेशाच्या रूपानं भारतात अठरावं राज्य निर्माण झालं. पश्चिम बंगालला महापुराचा आणि ओडिशाला (तेव्हा ओरिसा) वादळाचा महाभयंकर तडाखा बसला.
वरच्या सगळ्या घटना-घडामोडी महत्त्वाच्या आहेत. पण सर्वसामान्य भारतीयांसाठी त्याहून खूप खूप महत्त्वाचं असं ह्याच वर्षानं दिलं.
पूर्व पाकिस्तानातील मुक्ती वाहिनीच्या हाकेला प्रतिसाद देत आपल्या सैन्यदलानं पाकिस्तानची नांगी ठेचली ती हेच वर्ष संपता संपता. बांगला देशाला स्वातंत्र्य मिळालं!
ह्याच वर्षात भारतीय क्रिकेट संघानं परदेशांतील दोन मालिकांमध्ये विजय मिळविला. आधी वेस्ट इंडिजमध्ये, मग इंग्लंडमध्ये.
...आणि ह्याच वर्षात भारतीय क्रिकेटला नवं स्वप्न पडलं. दीड
दशक खेळून नवनवे विक्रम नोंदविणाऱ्या ह्या स्वप्नाचं नाव सुनील मनोहर गावसकर.
भारतीय संघासाठी, क्रिकेटप्रेमींसाठी लख्ख ‘सनी डेज’
घेऊन आलेल्या गावसकर ह्यांच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात झाली, त्याचा आज (६ मार्च)
सुवर्णमहोत्सव!
पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या
दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीचा फलंदाज म्हणून गावसकरांनी पदार्पण केलं. पहिल्याच
कसोटीपासून त्यांचं नातं विक्रमांशी जडलं. वेस्ट इंडिजमध्ये भारतानं मिळविलेला हा
पहिला विजय. सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये (दुसऱ्या डावात नाबाद) त्यांनी
अर्धशतक झळकावत ह्या संस्मरणीय विजयात सिंहाचा वाटा उचलला. चारही सामन्यांतील
त्यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्यांदाच मालिका जिंकता
आली.
पन्नास, साठ आणि सत्तरीच्या दशकांमध्ये ज्यांचा जन्म झाला, त्या पिढ्यांमधले बहुतेक सारे सुनीलचे चाहते. त्या असंख्यांमधला मी एक. क्रिकेटच्या बातम्या वाचायला लागलो, सामन्यांचं धावतं वर्णन ऐकायला लागलो त्या शाळकरी वयापासून सुनील गावसकर हाच नायक. तो मुंबईकडून खेळतो म्हणून मी मुंबई संघाचा चाहता. त्या शाळकरी वयात एकदा त्याला पत्रही लिहिलं होतं. आंतर्देशीय. कुठून तरी त्याचा पत्ता मिळवून. ‘प्रिय सुनीलदादा’ असा मायना लिहून. ते त्याच्यापर्यंत पोहोचलं नसावं. पोहोचलं असेल, तर त्यानं वाचलं नसावं. वाचलं असेल त्यानं कदाचित, तर त्याला उत्तर द्यावं वाटलं नसावं. त्याच्या ‘फॅन मेल’मध्ये कधी तरी आपला उल्लेख होईल, अशी (भाबडी) आशा होती तेव्हा.
तेव्हा लेख नाही, पण वाचकांच्या पत्रात लिहीत होतो. त्यानं एकोणतिसावं शतक करीत डॉन ब्रॅडमन ह्यांच्या विक्रमाची बरोबरी केली, नंतरचं शतक काढून नव्या विक्रमाची नोंद केली, त्या दोन्ही वेळा पत्रं लिहिली. तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेत मुंबईकर खेळाडूंवर अन्याय झाल्याची भावना वि. वि. करमकरकर ह्यांनी 'महाराष्ट् टाइम्स'मधून व्यक्त केली होती. ती फारच पटली. मग पत्र लिहिलं - ‘ह्या स्पर्धेत भारत ज्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झाला, त्या दोन्हींमध्ये सुनीलचा संघात समावेश नव्हता. हा निव्वळ योगायोग नाही!’ आता हसू येतं त्या समर्थनाचं. ह्या साऱ्या पत्रांची कात्रणं तीन-साडेतीन वर्षांपूर्वी निकालात काढली. सुनील तेव्हा ‘वीक पॉइंट’ होता. त्याला खेळताना प्रत्यक्ष पाहण्याची संधी एकदाच मिळाली. पुण्यातल्या नेहरू स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध. पत्रकार पक्षात बसून पाहिलेला भारताचा तो पहिलाच सामना. एकदम रद्दड झालेला. आपण हरलो. अवघ्या सात धावा काढून सुनील धावबाद झाला होता.
गावसकरांशी अगदी जवळून 'ओळख' होण्याचा योग नियती घेऊन आली. ‘क्रीडांगण’ पाक्षिकात नोकरीसाठी अर्ज केला होता. नोव्हेंबर १९८६. अर्ज वाचून श्री. सर्जेराव घोरपडे ह्यांनी विचारलं, ‘कधीपासून येताय?’ मी तयारच होतो. त्या आधी त्यांनी अनुभवाबद्दल विचारलं. ‘शतायुषी’ दिवाळी अंकात काम केल्याचं सांगितल्यावर ते म्हणाले होते, ‘दिवाळी अंकाचं काम काय वर्षभरात कधीही करता येतं हो! इथं तसं नसतं...’ (पुढे एका दैनिकातील मुलाखतीत ‘क्रीडांगण’चा अनुभव सांगितल्यावर ते संपादक म्हणाले होते, ‘ते काम काय पंधरवड्यात कधीही करता येतं हो...’)
‘क्रीडांगण’मध्ये जाऊ लागलो तेव्हा तिथं तयारी सुरू होती ‘सुनील गौरव अंक’ प्रसिद्ध करण्याची. म्हणजे बहुतेक लेखांचं काम झालं होतं. मांडणीचं काम चाललं होतं. किरकोळ मजकूर येणं बाकी होतं. छायाचित्रांच्या ओळी द्यायच्या होत्या. ते काम पाहताना छाती दडपून गेली. आपल्या (अत्यंत) आवडत्या खेळाडूबद्दल एकाच वेळी एवढं वाचायला मिळणार, त्याचे इतके फोटो पाहायला मिळणार, ह्यानं हरखून गेलो. थेट सुनीलची मुलाखत छापण्यापूर्वीच वाचायला मिळाली होती. त्याची पानं हाताळत होतो. मजकुराच्या ब्रोमाईड पट्ट्या चिकटवलेली जाड पानं. तेव्हा श्री. सर्जेरावांनी मंत्र सांगितला होता - ‘Artwork should be handled like glass!’
‘सुनील गौरव अंक’ म्हणजे श्री. सर्जेराव घोरपडे ह्यांचं मोठ्ठं स्वप्न होतं. हा अंक बाजारात आला की, ‘क्रीडांगण’ पुन्हा उभारी घेईल, असं त्यांना मनोमन वाटत असावं. मासिकाच्या आकारातील २५६ पानं असलेल्या ह्या अंकात भरगच्च मजकूर होता. जवळपास ७० जणांनी त्यात लिहिलं होतं. त्यात सुनीलचे कुटुंबीय, मित्र, समकालीन खेळाडू, ज्येष्ठ क्रिकेटपटू, राजकारण-कला क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार असे सगळेच होते. इंग्लंडमधील विजयाची आठवण रंगवणारा खुद्द सुनीलचा लेख! शिवाय भरपूर छायाचित्रं. वाचकांसाठी मोठं आकर्षण म्हणजे सुनीलचे सहा रंगीत ‘ब्लो-अप’. त्यावर त्या वर्षाचं कॅलेंडर.
ह्या महत्त्वाकांक्षी विशेषांकाचे संयोजक-संपादक होते श्री. एस. डी. जोशी. अतिशय खुसखुशीत, चटकदार लिहिणारे. बहुतेक तेव्हा ते ‘बजाज ऑटो’च्या गृहपत्रिकेचे संपादक म्हणून काम करीत होते. औद्योगिक क्षेत्राएवढीच रुची त्यांना क्रिकेटबद्दलही होती. पुढे त्यांनी ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे ह्यांच्याविषयीच्या एका पुस्तकाचं संपादन केल्याचंही पाहण्यात आलं. त्यांनीच सुनीलची मुलाखत घेतलेली. अगदी सविस्तर. जवळपास दीडशे छोटे-मोठे, किरकोळ-महत्त्वाचे प्रश्न विचारलेले. मूळ गाव कोणतं ते ब्रिटिश पत्रकारिता... असे नानाविध प्रश्न. काही प्रश्नांना सुनीलनं सविस्तर उत्तर दिलेली; तर काही दोन-चार शब्दांत बोलून ‘वेल लेफ्ट’ केलेले.
ही दीर्घ मुलाखत पुण्यातच घेतलेली. दुलीप करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी सुनील आला होता तेव्हा ती झाली असावी बहुतेक. ह्या मुलाखतीने अंकातील २५ पानं व्यापली आहेत. शिवाय अधूनमधून छायाचित्रं असलेली पानं, ती सात-आठ. सुनीलची एवढी सविस्तर, त्याचा सगळा प्रवास सांगणारी मुलाखत त्या पूर्वी कोणत्याच दैनिकात प्रसिद्ध झाली नसावी. नंतरही ते भाग्य कुणाला लाभलं का, ह्याची शंकाच आहे.
ह्या मुलाखतीची मांडणी दस्तुरखुद्द श्री. सर्जेराव ह्यांनी
केली होती. तेव्हाच्या आधुनिक इंग्रजी नियतकालिकांसारखी. वेगळी नि आकर्षक. पानात
एकूण तीन रकाने. मधल्या रकान्यात सुनीलचं एक छायाचित्र आणि त्याच्या खाली त्या
पानावर असलेल्या मजकुरातील वैशिष्ट्यपूर्ण तीन-चार वाक्यं. त्या छायाचित्राला जाड
स्क्रीनची चौकट. मधल्या स्तंभात घेतलेल्या मजकुराचा टंक स्वतः श्री. घोरपडे
ह्यांनी निवडलेला. तो त्यांच्या छापखान्यातील. ही वाक्यं/मजकूर निवडण्याचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलं होतं. आता ३४ वर्षांनंतर तो
अंक पाहताना त्यातल्या (मी केलेल्या) काही चुका लक्षात येतात. त्या मधल्या
रकान्यातील ठळक मजकुरात सुनीलचं म्हणणं येण्याऐवजी बऱ्याच ठिकाणी त्याला विचारलेले
प्रश्नच आले आहेत. सर्जेरावांनाही ते का खटकलं नाही, ह्याचं आता आश्चर्य वाटतं. 'माझा कसोटीतला उत्तम भिडू म्हणजे चेतन चौहान. पण आदर्श भिडू म्हणाल तर...
रामनाथ पारकर!', ‘ब्रिटिश मासिकं फार पक्षपाती
आहेत. त्यांना फक्त इंग्लिश क्रिकेट आणि क्रिकेटरबद्दलच रस आहे.’, ‘सुदैवाने
क्रिकेटर म्हणून खेळामधून थोडे-फार पैसे मिळवू शकतो. पण माझा खेळाकडे पाहायचा
दृष्टीकोन प्रोफेशनलच आहे’ अशी काही चटकदार आणि त्या जागेला न्याय देणारी वाक्यंही आहेत. त्यातल्या शुद्धलेखनातील
त्रुटींचंही आता आश्चर्य वाटतं. (नवोदित असल्यामुळं त्यात माझा वाटा चांगल्यापैकी
असणार.)
आणखी एक गमतीची गोष्ट आता जाणवते, ती म्हणजे ह्या मुलाखतीचं शीर्षक. एवढ्या सविस्तर मुलाखतीचं शीर्षक आहे - ‘इति सुनील उवाच!’ त्यातून नेमकं काहीच ध्वनित होत नाही. सुनीलच्या एवढ्या बोलण्यातून शीर्षकासारखं काहीच सापडलं कसं नाही? कुणी दिलं असावं ते? अगदी तीच गल्लत मीनल गावसकर ह्यांच्या मुलाखतीलाही झाली आहे. त्याचं शीर्षक आहे - ‘सुनीलची आई’. आता ती मुलाखत सुनीलच्या आईबद्दल काही सांगत नाही, तर ती आपल्या लाडक्या लेकाबद्दल सांगत आहे. ह्या दोन्ही चुका तेव्हा खटकल्या नाहीत किंवा लक्षातही आल्या नाहीत.
ह्या अंकाचं काम करताना अनेक गोष्टी कळल्या. लेखक म्हणून भाऊ पाध्ये हे नाव ठाऊक होतं. पण ते क्रिकेटवरही एवढ्या आवडीनं आणि ताकदीनं लिहितात, हे समजल्यावर धक्काच बसला. ‘पब्लिकचा सुनील आणि सुनीलचं पब्लिक’ शीर्षकाचा त्यांचा लेख बऱ्यापैकी मोठा आहे. तो संपादन(?) करून मीच फोटोकंपोजला दिला होता. त्याची मूळ प्रत तेव्हा जपून ठेवली असती तर..? ‘तंत्रशुद्ध खेळाडू नावापेक्षा बदनाम अधिक होतात...’, ‘आपला चाहता Creature of Extremes आहे, हे मात्र सुनीलच्या त्या वेळेस लक्षात आलं असेल’, ‘मला प्रथमच समजले की, या क्रिकेट खेळाडूंची एक युनियन आहे आणि या युनियनचा लीडर गावसकर आहे’... ही उदाहरणं भाऊ पाध्येंच्या लेखात काय दम आहे, हे दाखवून देण्यासाठी पुरेशी आहेत.
भाऊ पाध्ये नुसते चांगले लेखकच नव्हते, तर उत्तम पत्रकार होते, हेही लेखातून ठळकपणे दिसतं. त्यांनी दिलेले राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संदर्भ, सुनीलच्या खेळाचं-वागण्याचं काळाच्या संदर्भात केलेलं विश्लेषण फारच वेगळं आहे. हे भाऊ हा लेख वाचेपर्यंत मला माहीतच नव्हते. पुढे त्यांनी असाच एक धक्का दिला. ‘सजती है यूँ ही महफील’ हे त्यांचं पुस्तक अचानक हाती आलं आणि त्यांना चित्रपटांचीही ही एवढी गोडी आहे, ह्याचा साक्षात्कार झाला. क्रिकेट (आणि सुनीलही!) आवडत नसलेल्यांनी भाऊंसाठी म्हणून हा लेख वाचलाच पाहिजे.
‘इलस्ट्रेटेड वीकली’मध्ये असलेले राजू भारतन आणि ‘संडे ऑब्झर्व्हर’चे अरविंद लवाकरे हे दोन्ही नामांकित पत्रकार त्या काळात सुनील-विरोधक म्हणूनच ओळखले जात. त्यांचेही लेख गौरव अंकात आहेत. भारतन ह्यांनी सुनीलची तुलना टेनिसपटू बियॉन बोर्गशी केलेली आहे. ‘सनी जसा आहे तसाच मला आवडतो’, असं लवाकरे ह्यांनी म्हटलंय. त्या काळातील इंग्रजीतले स्टार पत्रकार अनिल धारकर ह्यांचीही मुलाखत अंकात आहे आणि तिचंही शीर्षक फसलेलं दिसतं. खास शिरीष कणेकरी शैलीतला 'सुनील माझ्या चष्म्यातून' लेख आजही ताजा टवटवीत वाटतो. तो कणेकर ह्यांच्या कुठल्या पुस्तकात कसा नाही?
विजय मर्चंट, विजय हजारे, राजसिंग डुंगरपूर, वासू परांजपे आदी खेळाडू, पिलू रिपोर्टर, स्वरूप किशन, माधव गोठोस्कर हे पंच, गंगाधर महांबरे व अनंत मनोहर असे प्रसिद्ध लेखक ह्या गौरव अंकाचे मानकरी आहेत. त्यात मला एक शब्दही लिहायला मिळाला नाही. पण तरीही तो अंक मला आजही 'आपला' वाटतो. त्यातील बहुसंख्य छायाचित्रांच्या ओळी देण्याचं काम मी केलं. त्या बऱ्यापैकी जमल्या आहेत. बऱ्याच लेखांचे 'लीड/इंट्रो' देण्याचं काम श्री. घोरपडे ह्यांनी मला सांगितलं होतं. ते काम फसल्याचं आता वाचताना जाणवतं. 'सनी कॅलिडिओस्कोप'मध्ये विविध क्षेत्रांतील नामवंतांना सुनीलबद्दल बोलतं करण्यात आलं. अंकाचं काम शेवटच्या टप्प्यात असताना त्यासाठी शरद पवार आणि विट्ठलराव गाडगीळ ह्यांचा मजकूर लिहून देण्याचं फर्मान श्री. घोरपडे ह्यांनी काढलं. ते ऐकून बावचळून गेलो. 'त्यांची भाषणं ऐकली नाहीत का कधी संपादक?', असं विचारत श्री. सर्जेराव ह्यांनीच अर्ध्या तासात त्या दोघांचा मजकूर तयार केला. अगदी त्यांच्या शैलीबरहुकूम!
ज्येष्ठ पत्रकार र. गो. सरदेसाई ह्यांनीही विक्रमादित्याबद्दल लिहिलं आहे. न्यूज प्रिंटच्या चतकोर आकाराच्या कागदांवर त्यांनी शाई पेनानं लिहिल्याचं आठवतंय. प्रत्येक पानात सारख्याच ओळी आणि शब्दसंख्याही साधारण तेवढीच. पण त्याहूनही त्यांची हृद्य आठवण आहे. अंक प्रकाशित झाल्यावर त्याची प्रत व मानधनाचा धनादेश त्यांना पाठविण्यात आला. योग असा की, सुनीलनं १० हजार धावांचा टप्पा गाठला, त्याचं धावतं वर्णन रेडिओवर ऐकत असतानाच सरदेसाई ह्यांना हे टपाल मिळालं. पोहोच देताना त्यांनी लिहिलेल्या पत्रात ह्याचा आवर्जून उल्लेख केला. हा मोठा, अनुभवी पत्रकार किती साधा-सरळ माणूस होता, हेच त्या आभाराच्या पत्रातून अनुभवायला मिळालं.
आता लक्षात येतं की, ह्या अंकात सुनीलच्या पत्नीनं काही लिहिलेलं नाही किंवा तिची मुलाखतही नाही. त्याच्या बहिणींचंही लेखन नाही. त्या वेळच्या महत्त्वाच्या मराठी वृत्तपत्रांतल्या एकाही क्रीडा-पत्रकाराला श्री. घोरपडे ह्यांनी लिहायला का सांगितलं नसावं, ह्या प्रश्नाचं उत्तरही मिळत नाही.
'सुनील गौरव अंक हॉट केकसारखा संपला' अशी
मस्त जाहिरात श्री. सर्जेराव घोरपडे ह्यांनी स्वतःच तयार केली होती. प्रत्यक्षात
तसं घडलं नाही. अडीचशे पानांच्या, भरपूर छायाचित्रं आणि देखणं मुखपृष्ठ असलेल्या
ह्या अंकाची किंमत २० रुपये होती. ती त्या काळाच्या मानाने कमी नव्हती; पण अगदी खिशाला न परवडणारीही नव्हती. हा अंक नियोजनापेक्षा थोडा उशिराच
प्रसिद्ध झाला. जानेवारी १९८७. त्यानंतर काही काळानं सुनीलनं १० हजार धावांचा
टप्पा गाठला. अंकाला अजून थोडा उशीर होऊन, तो त्या मुहूर्तावर प्रकाशित झाला असता
तर? मग कदाचित श्री. घोरपडे ह्यांच्या जाहिरातीप्रमाणे त्याचा उठाव 'हॉट केक'सारखा झाला असता!
अन्य काही गोष्टीही त्यांच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत. तसं त्यांनी बोलूनही
दाखवलं.
सुनील गावसकर आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांचं लेखन. 'प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रूप'च्या माध्यमातून आपलं
लेखन 'सिंडिकेट' पद्धतीनं देणारा तो
पहिला क्रिकेटपटू. मराठीत त्याचं लेखन दोनच ठिकाणी प्रसिद्ध व्हायचं. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'क्रीडांगण'. त्यांचा लेख पहिल्यांदा अनुवादासाठी देताना श्री. घोरपडे ह्यांनी तंबी
दिली होती, 'म. टा.मधलं उचलून जसंच्या तसं वापरायचं नाही.' सरळ बॅटनं खेळणारा हा माणूस लिहिताना मात्र व्यंग्योक्ती, उपहास, मिश्किल
विनोद ह्याचा सढळपणे उपयोग करी. ते मराठीत आणताना खूप झगडावं लागे. तो अनुभवही वेगळा
होता.
गावसकरांची ती शैली आजही दिसते. त्यांच्या स्तंभलेखनातून आणि कॉमेंटरीमधूनही. ह्या थोर खेळाडूच्या पदार्पणाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हे सारं आठवलं आणि लिहावं वाटलं.
ताजा कलम : एक वैशिष्ट्य सांगायचं राहूनच गेलं. 'सुनील तू असाच खेळत रहा!' असं आर्जव करणारी ना. के. ताले ह्यांची कविता अंकात अगदी सुरुवातीलाच आहे. दैनंदिन घडामोडींवर ताले कविता करीत व त्या एका दैनिकात की साप्ताहिकात त्या वेळी नियमित प्रसिद्ध होत, एवढं आठवतं. त्या कवितेच्या शेजारीच अंकनायकानं क्रीडांगणच्या वाचकांना स्वहस्ताक्षरात दिलेल्या शुभेच्छा आणि सही आहे. महत्त्वाचं म्हणजे स्वाक्षरी मराठीत आहे! माझ्यासाठी अजून एक अप्रूप असं की, अजित वाडेकरांची सही त्या अंकावर घेतलेली आहे.
----
#SunilGavaskar #India #cricket #England #WestIndies #Kreedangan #IndianCricket #PackerCircus #PMG #BhauPadhye #GoldenJubilee #Ghorpade #Sunil_Gaurav_Ank #1971 #SeriesWin
सतीशजी , खूप छान लिहिलाय लेख. केवढी तपशीलवार माहिती दिली आहे जी आजच्या पिढीला बोधप्रद ठरेल. मला लेख आवडला. शेअर केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
उत्तर द्याहटवाअतिशष छान माहितीपूर्ण लेख
उत्तर द्याहटवाक्रिकेट फारस कळत नव्हत तरी (आताही नाही) माळदावर जाऊन रेडीओवर समालोचन ऐकण्यात वेगळीच मजा होती. खेळाडू खेळासाठी व समालोचकहि खेळासाठीच होते. बहुतेक खेळाडू दर्जेदार तर समालोचक अमीन सयानीच होते. दिवसेंदिवस हा दर्जा घसरत जाऊन नको त्यांच्या लुडबुडी मुळे त्याला बाजरी व गल्लीबोळाचे हिन स्वरूप आले आहे. सुनील गावस्कर नंतरहि व पुढेही हा खेळ राहील पण दर्जा व मॉरल असेल असं वाटत नाही.
उत्तर द्याहटवाम्हणूनच वाटते, सुनील गावस्कर म्हणजे भारतीय क्रिकेट खेळाचा बेंचमार्क बाकी सर्व चेंज पॉइंट.
आपले लेखन म्हणजे न संपणारी परीक्रमाच.कोणत्या स्टेशनवर किती थांबायचे जास्तीत जास्त प्रवासी कसें मिळवायचे हि जाण आपल्या लेखणीला छानच आहे. खेद एकच कि, सारे प्रवासी १००% सवलतीचे. असो.
धन्यवाद.
श्रीराम वांढरे.
भिंगार, अहमदनगर.
क्रिकेट काय पण एकूणच कोणताही खेळ आणि खेळाडू यांच्याविषयी फारसे ज्ञान मला नाही ... परंतु या लेखामधून आपण महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा करून दिलेला परिचय आणि आपले उमेदवारीच्या दिवसातील पत्रकारितेचे आणि संपादनाचे सोनेरी अनुभव या दोन कारणांमुळे आपला लेख वाचनीय झाला आहे !!!
उत्तर द्याहटवासर, मस्तच लिहिलंय तुम्ही.
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख....तो अंक वाचायला कसा कुठे मिळेल?
उत्तर द्याहटवातो अंक आता एखाद्या संग्राहकाकडेच पाहायला मिळेल. माझ्याकडे एक प्रत आहे.
हटवाखुप छान तो काळ डोळ्यासमोर फिरत होता
उत्तर द्याहटवाMust say.....well played Sateesh
उत्तर द्याहटवासर, नेहमीप्रमाणे मस्तच लेख लिहिला आहे. मीही एकदा गावसकरांना ट्विट केले होते; पण त्यांच्या नावाने कोणीतरी ते ट्विटर हँडल चालवत होतं. हे त्यानेच रिप्लाय करून सांगितले. धन्यवाद सर..!!
उत्तर द्याहटवाSunny Gavaskar...
उत्तर द्याहटवाWell played Sateesh..
Proud of you!
- Anil Kokil, Pune
सुनील गावसकर,
उत्तर द्याहटवासनी डेज,
सुवर्णमहोत्सव
आणि
...
...
...
सतीश कुलकर्णी.
सगळे काही 'स'.
'स' म्हणजे
सकारात्मक,
सुंदर
आणि सोन्यासारखे!
����������������
- रवींद्र चव्हाण, पुणे
Satish ��������
उत्तर द्याहटवाnice as usual, can't express more than that.
����������������
- Jagdeesh Nilakhe, Solapur
आजची 'खिडकी' वाचली. अतिउत्तम. शीर्षक छान.
उत्तर द्याहटवा'क्रीडांगण'मधील अनुभव संस्मरणीय. आणखी बरेच काही...
������������
- प्रताप देशपांडे, नगर
अतिशय छान ��������������
उत्तर द्याहटवापुण्यात मी तुझ्या वरील कार्यालयामध्ये आलो होतो. मला स्पष्ट आठवते आहे.
तुझ्या लेखनशैलीबद्दल वादच नाही. सुंदर
लेखाबद्दल अभिनंदन.
- चंद्रशेखर रामनवमीवाले, करमाळा
मस्त झालाय लेख. क्रिकेट पाहायला सुरुवात केली, तेव्हा गावसकर कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर होते. माझी आजी त्यांची 'फॅन' होती. नगरला आलो की, 'क्रीडांगण'चा अंक पाहायला आवडेल.
उत्तर द्याहटवा- मिहिर टांकसाळे, पुणे
सतीश,
उत्तर द्याहटवागावसकर बाद झाला की, मीसुद्धा रेडिओ बंद करायचो किंवा बाहेर निघून जायचो. रेडिओवर धावते समालोचन ऐकण्यात जी मजा होती, ती आता राहिली नाही. असो.
तुझ्या लेखामुळे गावसकर-प्रेम जागे झाले. पहिले प्रेम विसरत नाही असे म्हणतात, तसे आता झाले आहे. क्रिकेट म्हटलं की, गावसकर हे समीकरण अजून काही संपत नाही. तुझ्यामुळे जुन्या सुवर्ण आठवणी जाग्या झाल्या.
-
मंदार देशमुख, नाशिक
Highly informative. Introduction is excellent. Good article for young generation to know. keep it up.
उत्तर द्याहटवा- B. V. Kanade, Banglore
लेख नेहमीप्रमाणेच छान झाला आहे. तुमची शैली आणि स्मृती इराणी या दोन्हींना सलाम! लिहिते राहा.
उत्तर द्याहटवा- अरविंद व्यं. गोखले, पुणे
मस्त लिहितोस मित्रा...
उत्तर द्याहटवातुझी बातच न्यारी... मस्त... मस्त!
एकदम सहज सुंदर.
- राजन कुटे, नगर
एक गोष्ट खरी आहे की, पूर्वीच्या काळी गावसकर आऊट झाला की सामना हरो किंवा जिंको; पूर्ण इंटरेस्ट जायचा. त्याची जागा नंतर सचिनने घेतली. सध्या असा मनाला भावणारा एकही खेळाडू नाही. भले विराटने कोटी धावा, शतके केली तरी तो मनाला आपलासा वाटणारा खेळाडू नाही. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
उत्तर द्याहटवा- धनंजय देशपांडे, उस्मानाबाद
लेख वाचला. अप्रतिम.
उत्तर द्याहटवाएका अंकाच्या निर्मितीचा अनुभवही भन्नाट.
हा अंक आज मिळू शकतो?
भाबडा प्रश्न ��
- पी. विट्ठल, नांदेड
Very appropriate, informative.
उत्तर द्याहटवा- Sudheer Chapalgaokar
नेहमीप्रमाणेच...
उत्तर द्याहटवाआजची खिडकी जास्त अभ्यासपूर्ण ����
- राजेंद्र बागडे, कोल्हापूर
सुंदर लेख. जुन्या आठवणी परत जागवल्या.
उत्तर द्याहटवासुनीलबद्दल काय बोलायचे! तो आपला पहिला हीरो व आपले पहिले प्रेम. नंतर किती तरी जण आले. सचिन, कोहली वगैरे. पण माणूस आपल्या पहिल्या प्रेमाला कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे आज ही सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून गावसकरच जास्त आवडतो.
- विकास पटवर्धन, नगर
सतीश सर...खूपच सुंदर! ���� खूप मोठा अनुभव आहे तुमच्या पाठीशी����
उत्तर द्याहटवा- संजय जाधव
बऱ्याच दिवसांनी आपली खिडकी उघडून गार वाऱ्याची झुळूक सध्याच्या उन्हाळाच्या दिवसांत आल्याने बरं वाटलं.
उत्तर द्याहटवासुनील गावसकर यांच्या कारकीर्दीचे सर्व पैलू आपण विशद करून सांगितले आहेत. ते सर्व, त्यांचे व इतरांचे पराक्रम मी (TV येण्याआधी) रेडिओवर ऐकले आहेत वा वर्तमानपत्रांत वाचले आहेत. त्यांचे सर्व लिखाण, इंग्रजीमधीलही मी मन लावून वाचले आहे. आपल्या या लेखाने जुन्याची उजळणी झाली, धन्यवाद.
गावसकर यांनी भारतीय क्रिकेटला स्वाभिमानाची, स्वत्वाची जाणीव करून दिली. ती परंपरा पुढे कपिलदेव, सौरभ गांगुली व धोनी या कर्णधारांनी अधिक घट्ट केली.
IPL चालू झाल्यापासून भारतीय क्रिकेटला सतत नवीन नवीन तारे मिळत आहेत. त्यामुळे पुढील काळात आपण क्रिकेटमध्ये अव्वल राहणारच आहोत.
आज संपलेल्या इंग्लडविरुद्धच्या कसोटीतील विजयामुळे आपला World Test Championshipच्या Final मध्ये New Zealand शी सामना , १८-२४ जून मध्ये लंडन येथे होण्याचे नक्की झाले आहे. हा सामना जिंकल्यास ICC च्या सर्व World Cup Championships जिंकल्याचे श्रेय भारतास मिळेल .
- अशोक जोशी, बंगलोर
सतीशसर,आपण सुनिल गावस्कर संदर्भात लिहिलेले लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. नगरपालिकेच्या black & white tv वर सुनिल गावस्करची batting पाहण्याची मजा औरच.
उत्तर द्याहटवाअतिशय वेगळा आणि वाचनीय लेख. ����
उत्तर द्याहटवा- अनिल पवार, पुणे
अरे वा! मस्त लिहिले आहे, लहानपण आठवले/ माझी आजी फक्त २ इयत्ता शिकलेली होती; पण तिला इंग्लिश कॉमेंटरी पूर्ण कळायची. तिच्यामुळे मी पण लहानपणापासून कॉमेंटरी ऐकायला लागलो. तेव्हा मला क्रिकेटचे स्टॅटिस्टिक्स लिहून काढायची सवय होती. फक्त गावसकरवरच ४ वह्या भरल्या होत्या! आयुष्यात झालेल्या अनंत बदल्यांमध्ये त्या वह्या कुठे गेल्या माहीत नाही. माझ्या मामाबरोबर मी गावसकर ह्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. साधारण ४० -४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही.
उत्तर द्याहटवा- अभय बर्वे, मुंबई
कसोटी क्रिकेटमधला एक तंत्रशुद्ध फलंदाज, त्यातही ओपनर आणि कळस म्हणजे त्या काळातील (कदाचित सर्वकालीन) वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्याला फक्त तोंड देणाराच नव्हे तर पुरून उरणारा एकमेवाद्वितीय कसोटीवीर म्हणजे लिट्ल मास्टर सुनील. क्रिकेटपटूंना त्या काळी मिळणा-या तुटपुंज्या मानधनाविरुद्ध आवाज उठवणारा खेळाडू, सत्य असेल तर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सडेतोड बोलणारा, अनेक विक्रमांना गवसणी घालणारा विक्रमादित्य! अशी किती तरी विशेषणं...
उत्तर द्याहटवाह्या महान मराठी खेळाडूच्या क्रिकेट कारकीर्दीला पाच दशकं पुर्ण झाली. ह्या सुवर्णमहोत्सवी कारकीर्दीला सलाम करण्यासाठी जो शब्दप्रपंच 'खिडकी'तून मांडला, तो अप्रतिमच. अभ्यासपूर्ण माहिती व समर्पक शब्दयोजना त्यामुळे लेख वाचनीय झाला आहे.
- दिलीप वैद्य, पुणे
खूपच माहितीपूर्ण लेख झालाय सर
उत्तर द्याहटवाघरातील काही कारणांमुळे 'खिडकी'तून डोकावण्यासाठी थोडा वेळ गेला. पण बारीकसारीक तपशिलांमुळे एकदम nostalgic करून टाकलेत गुरुजी!
उत्तर द्याहटवाआता इच्छा एकच. तो अंक पाहायची. कधी पूर्ण करणार?
- विवेक विसाळ, पुणे