Sunday 27 December 2020

‘४२’च्या आठवणी

आकड्यांमधलं अंतर फक्त सहाचं. काळाचा फरक ४६ वर्षांचा. घटना घडलेल्या दोन शहरांमध्ये असलेलं अंतर १६ हजार किलोमीटरहून थोडं अधिकच. दोन गोलार्धांतली ही शहरं - लंडन आणि डलेड. जून १९ आणि डिसेंबर ०.

ह्या एवढ्या फरकानं काय वेगळं घडलं आहे?


 

 

 

डावीकडं लॉर्ड्सचा (१९७४) धावफलक आणि खाली नव्या नीचांकाची नोंद. डलेड २०२०.

 

 

 

पहिला नीचांक पुसून टाकत दुसऱ्या नीचांकाची नोंद. कसोटी क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघासाठी मागचा शनिवार (दि. १९) न करत्याचा वार ठरला. पण ह्या वारीही संघाकडून झाली एक (नकोशी) कामगिरी. कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या धावसंख्येचा तळ गाठण्यात आला. भारत सर्व बाद ३६. त्या आधीचा नीचांक क्रिकेट पंढरीतला - लॉर्ड्सच्या मैदानावर. दि. २४ जून १९. इंग्लंडविरुद्ध भारत सर्व बाद ४२.

इंग्लंडचा तो दौरा समर ऑफ ४२ म्हणून (कु)प्रसिद्ध आहे. त्या दौऱ्यातल्या तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताचा दणदणीत पराभव झाला. कर्णधार अजित वाडेकरची विजयाची परंपरा खंडित झाली. ह्या पराभवामुळंच त्यानं (अकाली) निवृत्तीचा निर्णय घेतला.

सांघिक नीचांकी धावसंख्येची नोंद करणाऱ्या ह्या दोन सामन्यांमधल्या काही गोष्टी समान आणि गमतीशीर आहेत. आकड्यांमधून ती गंमत कळते. डलेडचा सामना अडीच दिवसांमध्येच संपला आणि त्यात दोन्ही संघांचे ३१ गडी बाद झाले. लॉर्ड्सवरचा सामना तुलनेनं लांबलेला; चार दिवस चालला आणि त्यात २९ फलंदाज बाद झाले. डलेडच्या लढतीत एकाही शतकाची नोंद नाही, तर तिकडे तीन इंग्लिश फलंदाजांनी पहिल्या डावामध्ये शतके झळकावली.

धावसंख्येचा नीचांक नोंदविणाऱ्या दोन्ही डावांमध्ये भारताचे नऊ-नऊच फलंदाज बाद झाले. ४२च्या डावात फिरकी गोलंदाज भागवत चंद्रशेखर जखमी असल्यामुळे खेळायला उतरला नव्हता. इकडे ३६च्या डावात अकराव्या क्रमांकावरचाच फलंदाज महंमद शमीला खेळताना गंभीर इजा झाली. त्यामुळे पुढे खेळता येणं शक्य नव्हतं. त्याला निवृत्त व्हावं लागलं नसतं, तर कदाचीत नीचांकी पायरी ओलांडली गेलीही असती. असो!

या दोन्ही डावांतली जी एकूण धावसंख्या आहे, ती आपल्या फलंदाजांची स्वकष्टार्जित कमाई आहे. म्हणजे नो-बॉल, वाईड, बाय, लेगबाय आदी स्वरूपात धावसंख्येत कोणतीही भर पडलेली नाही. फॉलोऑननंतर लॉर्ड्सवरचा आपला डाव चेंडूंमध्ये आटोपला. डलेडच्या मैदानावर आपला दुसरा डाव तुलनेनं अधिक काळ, म्हणजे १२८ चेंडूंपर्यंत चालला. २६ चेंडू अधिक खेळूनही सहा धावा कमीच. म्हणजे टी-० सामन्यांचा एवढा सराव असूनही आपल्या ह्या फलंदाजांना ४६ वर्षांपूर्वीच्या स्ट्राईक-रेटनंही खेळता आलं नाही तर! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही आणि तिघांना भोपळा फोडण्यात अपयश आलं. सर्वाधिक नऊ धावा काढल्या सलामीच्या मयांक अग्रवालनं (४० चेंडू) आणि त्याच्या पाठोपाठ होता सातव्या क्रमांकावर आलेला हनुमा विहारी (२२ चेंडूंमध्ये आठ). रात्रीचा रखवालदार म्हणून उतरलेल्या जसप्रीत बुमराहने १७ आणि वृद्धिमान साहाने १५ चेंडू खेळून काढले. बाकी सगळ्यांनी १० चेंडूंच्या आतच तंबूचा रस्ता धरला. एकूण चार वेळा चेंडू सीमापार झाला. त्यातला एक चौकार दहाव्या क्रमांकावर आलेल्या उमेश यादवचा होता. पृथ्वी शॉचा त्रिफळा, बाकी आठ फलंदाज झेलबाद झाले. त्यातले सात यष्ट्यांमागे झेल देऊन. पैकी पाच झेल यष्टिरक्षक टीम पेनचे. दोन्ही संघांकडून एक-एक षट्कार. त्यातला ऑस्ट्रेलियाचा शेवटच्या चेंडूवर जो बर्न्सचा. विजयावर शिक्कामोर्तब करणारा!

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील त्या डावात फक्त एकाच फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली. तो म्हणजे सहाव्या क्रमांकावर उतरलेला डावखुरा एकनाथ सोलकर. त्यानं १७ चेंडूंमध्ये नाबाद १८ धावा केल्या. त्यात त्याचे दोन चौकार व एक षट्कार होता. दहा किंवा त्याहून अधिक चेंडू खेळलेल्या फलंदाजांची संख्या इथेही चारच होती. चेंडू खेळण्यात अव्वल क्रमांकावर सुनील गावसकर (६), मग सोलकर, इरापल्ली प्रसन्न (१) आणि ब्रिजेश पटेल (१०) ह्यांचा क्रमांक लागतो. गावसकर, गुंडप्पा विश्वनाथ व प्रसन्न ह्यांनी प्रत्येकी पाच धावा केल्या. सलामीचा फारुख एंजिनीअर आणि दहाव्या क्रमांकावर आलेला बिशनसिंग बेदी ह्यांना मात्र भोपळा फोडता आला नाही. दोन फलंदाज पायचीत झाले व तिघांचा त्रिफळा उडाला. चार जण झेल देऊन बाद झाले आणि त्यातले तीन झेल होते यष्टिरक्षक लन नॉटचे. ह्या डावातील सर्वांत मोठी, ११ धावांची भागीदारी पाचव्या जोडीसाठी गावसकर-सोलकर ह्यांच्यात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सर्वांत मोठी भागीदारी आठ धावांची आणि दुसऱ्या जोडीसाठी होती!

शाम्पेनची वेळ. जेफ अर्नोल्ड आणि ख्रिस ओल्ड.फक्त पाच चेंडू.
 

 

 

 

 

 

 

प्रतिस्पर्धी संघांनी प्रत्येकी तीन गोलंदाज वापरले. त्यातील एकाला बळी मिळविता आला नाही. म्हणजे अंगणी आलेल्या वाहत्या गंगेतही तो कोरडाच राहिला. ऑस्ट्रेलियाच्या डावऱ्या मिशेल स्टार्कची पाटी सहा षट्कांनंतर कोरीच राहिली. इंग्लंडच्या माईक हेंड्रिकने फक्त एक षट्क टाकलं. त्यालाही बळी मिळाला नाही. सहज लक्षात येतं की, हे सगळे बळी उजव्या हाती जलदगती/मध्यमगती मारा करणाऱ्यांनी मिळविले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने पाच व पॅट कमिन्सने चार. इंग्लंकडून जेफ अर्नोल्डने पाच आणि ख्रिस ओल्डने चार गडी बाद केले.


हेझलवूड आणि पॅट कमिन्स. अफलातून मारा.

 

 

 

 

 

 

 

इंग्लंडने भारताविरुद्ध धावांचा डोंगर (६२९) उभा केला होता. बेदीला सहा बळींसाठी २२६ धावांचे व प्रसन्नला दोन बळींसाठी ६६ धावांचे मोल द्यावे लागले. भारतावर फॉलोऑनची आणि नंतर डावाच्या पराभवाची नामुष्की ओढवली. ह्याच्या उलट ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने पहिल्या डावात ५३ धावांची आघाडी मिळविली होती. म्हणजे इंग्लंडविरुद्ध भारताचा डाव दडपणाखाली असताना गडगडला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्मविश्वास देणारी आघाडी मिळाल्यानंतर. हा फरक महत्त्वाचा आहे.

ह्या नीचांकी धावसंख्येसाठी, एवढ्या खराब कामगिरीसाठी कोणाला दोष द्यायचा? फलंदाजांची हाराकिरी म्हणायची की प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या तिखट माऱ्याचं मनापासून कौतुक करायचं? सुनील गावसकर ह्यांनी दोन्ही वेळा, आधी खेळाडू आणि आता समीक्षक म्हणून, भारतीय फलंदाजांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा मोह टाळलेला दिसतो. इंग्लंडविरुद्धच्या डावाबद्दल ते म्हणतात, ह्याचं अगदी साधं-सोपं उत्तर म्हणजे अर्नोल्ड आणि ओल्ड ह्यांनी पाच उत्कृष्ट चेंडू टाकले आणि त्यावर आमचे पहिले पाच फलंदाज बाद झाले. त्यानंतर आपल्या शेपटाने काही प्रतिकार केलाच नाही. प्रसिद्ध फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्न ह्यांचंही म्हणणं असंच आहे. वन मोअर ओव्हर आत्मकथेत ते लिहितात, खराब फलंदाजी हे काही कारण नाही. खरं सांगायचं तर अर्नोल्ड आणि ओल्ड ह्यांनी खरोखर अप्रतिम मारा केला.

कांगारूंविरुद्धच्या सामन्यात नव्या नीचांकाची नोंद होऊनही त्याचा दोष फलंदाजांना देणं गावसकर ह्यांना अन्यायकारक वाटतं. ते म्हणतात, ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाजांच्या त्रिकुटानं अफलातून मारा केला. भारताऐवजी अन्य कोणताही संघ असता, तर त्यांचा डाव ७२ किंवा फार तर ८०-९० धावांच्या आतच आटोपला असता.

सनी डेजमध्ये ह्या सामन्याबद्दल, दौऱ्याबद्दल गावसकर ह्यांनी सविस्तर लिहिलं आहे. त्यातली एक आठवण गमतीशीर आहे. गावसकर-सोलकर जोडी जमली आहे, असं वाटत होतं. गावसकर लिहितात, ख्रिस ओल्डच्या एका बाउन्सरवर एकनाथनं हूकचा षट्कार मारला. ते षट्क संपल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मला साथ दे. आपण पराभव टाळू, सामना वाचवू. पण त्यानंतरच्या अर्नोल्डच्या षट्कात मी बाद झालो. पॅव्हिलियनमध्ये येऊन लेग गार्ड काढत नाही, तोच मदनलाल आणि अबिद अली तंबूत परतलेले दिसले!


इंदूरमधील
'विजय बल्ला'. आधी आणि दगडफेकीनंतर डागडुजी केल्यावर.

वाडेकरच्या नेतृत्वाखाली संघाने १९मध्ये वेस्ट इंडिज व इंग्लंड ह्यांच्याविरुद्धच्या मालिका जिंकल्याची सुखद स्मृती म्हणून इंदूरच्या नेहरू स्टेडियमजवळच्या उद्यानात काँक्रिटची एक भव्य बॅट उभी करण्यात आली. त्यावर तेव्हाच्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंचा उल्लेख होता. ह्या आगळ्या स्मारकाचे उद्घाटन कर्णधार वाडेकरच्याच हस्ते झाले होते. पण तीन वर्षांनंतर इंग्लंडमध्ये मिळालेल्या व्हाईट वॉशनंतर भारतातल्या क्रिकेटप्रेमींचा संताप संताप झाला. काही टवाळखोरांनी ह्या बॅटची नासधूस केली. भारतीय क्रिकेटशौकिनांचा स्वाभाविक संताप म्हणून त्याकडे त्या वेळी पाहिले गेले. काही काळानंतर त्या स्मारकाची पुन्हा डागडुजी करण्यात आली. भारतातला हा रागरंग पाहून खेळाडू एकत्र न येता गटागटांनी मायदेशी परतले.

कर्णधार वाडेकरच्या घरावरही दगडफेक झाल्याच्या बातम्या आल्या. त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले होते की, ह्यातल्या बहुतेक सगळ्या बातम्या अतिरंजित होत्या. माझं घर चौथ्या मजल्यावर आहे. तिथपर्यंत दगड फेकता येणाऱ्याची कसोटी संघातच निवड व्हायला हवी!

तो दौरा एवढ्या पराभवापुरताच मर्यादित राहिला नाही. आणखीही काही वादग्रस्त घटना घडल्या. भारतीय उच्चायुक्त बी. के. नेहरू ह्यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला भारतीय संघ उशिरा पोहोचला. संतापलेल्या उच्चायुक्तांनी कर्णधार वाडेकरला आल्या पावली परत पाठवलं. फलंदाज सुधीर नाईक ह्यांच्यावर शॉप लिफ्टिंगचा आरोप झाला. त्यांनी तो कसा आणि का मान्य केला, हे एक गूढच आहे.

क्रिकेट, ऑलिंपिक स्पर्धा ह्यात अपयश आलं की, लोकप्रतिनिधी त्याबद्दल चिंता व्यक्त करीत. खेळाबद्दल कळवळा वाटून ते संसदेत आवाज उठवित. त्या वेळी तशी पद्धतच होती मुळी! त्याच रिवाजानुसार इंग्लंडमधील दारूण पराभवाची चौकशी झाली. प्रसन्न आत्मचरित्रात लिहितात की, 'इकडे मायदेशी नेहमीप्रमाणे चौकशी समिती नेमण्यात आली होती. पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी खेळाडू परत येण्याची वाट अधिकारी पाहत होते. खेळाडू गटागटांनी भारतात परतले. चौकशी समितीचा निष्कर्ष होता - प्रतिकुल हवामान आणि खराब खेळ ह्यांमुळे संघाचा (दारूण) पराभव झाला. पण खेळाडूंमध्ये मतभेद असल्याचा उल्लेख (त्या चौकशी अहवालात) मुळीच नव्हता.'

इंग्लंडचा तो दौरा हंगामाच्या पूर्वार्धात होता. त्या काळात हवामान अतिशय त्रासदायक असतं, कमालीची थंडी असते, असा अनुभव आहेच. गावसकरांनी लिहिलं आहे की, बहुतेक खेळाडूंनी एकावर एक स्वेटर चढविले होते. स्लिपमध्ये उभे असलेले क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत हात खिशातून बाहेर काढत नसत. पण एवढी थंडी हेच एकमेव पराभवाचं कारण होतं? संघात बाकी सारं आलबेल होतं का?

त्या दौऱ्यात सहभागी असलेल्या गावसकर व प्रसन्न ह्यांनी आपापल्या पुस्तकांमध्ये ह्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे. 'सनी डेज'मधला हा उल्लेख पाहा - भरपूर मार बसत असूनही बेदीनं चेंडूला उंची देणं काही थांबवलं नाही. फलंदाज आक्रमकपणे खेळत आहेत म्हणून काही मी उंची देणं थांबवणार नाही, असं तो म्हणाला. खरं तर परिस्थिती अशी होती की, त्यानं (धावा थोपविण्यासाठी) अगदी कसून मारा करायला हवा होता. संघभावना नावाची काही गोष्टच नव्हती. त्या ऐवजी किरकोळ गोष्टींवरून, अत्यंत क्षुद्र कारणांवरून खटके उडालेले पाहायला मिळत होते. ते कुणाच्याच भल्याचं नव्हतं. अशा बऱ्याच घटनांनी संघाची बदनामीच झाली. हे सगळं आत्यंतिक निराश करणारं होतं.

'तुम्ही पतौडीची माणसं' असा शिक्का कर्णधारानेच मारलेल्या इरापल्ली प्रसन्न ह्यांनी 'one more over'मध्ये ह्या दौऱ्यावर एक प्रकरणच लिहिलं आहे - disaster in blighty. व्यवस्थापक कर्नल हेमू अधिकारी ह्यांच्यावर कडाडून टीका करताना त्यांनी कर्णधार अजित वाडेकरकडेही बोट दाखवलं आहे. पण हे करताना फलंदाज अजितचं कौतुक करायला ते विसरत नाहीत. ते लिहितात - दौऱ्याला जाण्यासाठी विमानात बसताच लक्षात आलं की, वाडेकर-बेदी ह्यांचे सूर काही जुळत नाहीत. दौऱ्यात आमची धुलाई होणार असं वाटत होतं. संघाचा आत्मविश्वास पार ढासळलेला दिसला. डेरेक रॉबिन्सन्स एलेव्हनविरुद्धच्या सामन्यात वाडेकर-बेदी ह्यांची चकमक उडाली. कडाक्याची थंडी, बोचरं वारं, सर्द वातावरण असं प्रतिकूल हवामान. खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना हतप्रभ करणाऱ्या होत्या. ह्या दौऱ्यात आम्हाला बिल्कुलच संधी नव्हती.

व्यवस्थापक कर्नल हेमू अधिकारी ह्यांना प्रसन्न ह्यांनी प्रामुख्यानं लक्ष्य केलं आहे. ते लिहितात की, शिस्तप्रिय व साधेपणाची आवड अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा तयार केली होती. १९च्या विजयाचं श्रेय घेण्यासाठी ते आघाडीवर होते. पराभवानंतर मात्र ते गायब झाले. संघात एकजिनसीपणा आणावा ह्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही. विजयाचं श्रेय ते घेत असतील, तर १९७४च्या पराभवाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारायला हवी. वाडेकरला त्यांनी पंगू बनवून सोडलं आणि आपला बोलका पोपट बनवलं.... अजितला अकाली निवृत्तीकडं अधिकारी ह्यांनीच ढकललं. त्यांच्यामुळेच वाडेकर खेळाडूंमध्ये अप्रिय बनला. संघाचं नेतृत्व करण्याऐवजी अजित व्यवस्थेचा माणूस बनला!

प्रसन्न ह्यांच्याप्रमाणेच अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेला आणि ऑफस्पिन गोलंदाजी करणारा रविचंद्रन अश्विन ह्यानं अजून चार-सहा वर्षांनंतर आत्मचरित्र लिहिलंच तर? त्यात तो कर्णधार विराट कोहलीबद्दल बरं लिहील की टीका करील? भारतीय संघात सगळं काही ठीकठाक नसल्याची चर्चा मागच्या विश्वचषक स्पर्धेपासून आहे. अशा चर्चांना आधी कुजबुजीच्या स्वरूपात असतात आणि त्यांच्या बातम्या होतात त्या पराभवानंतरच.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी सुरू होण्याच्या दोन दिवस आधी सुनील गावसकर ह्यांनी संघातील राजकारणाकडं थेट लक्ष वेधलं. संघाच्या बैठकीत स्पष्टपणे बोलणाऱ्या रविचंद्रन अश्विनला संघात स्थान मिळविण्यासाठी झगडावं लागतं. एखाद्या सामन्यात बळी मिळाला नाही की, त्याला वगळलं जातं. हाच न्याय (काही) फलंदाजांना मात्र लावला जात नाही. थोडक्यात एकाला एक व दुसऱ्याला दुसरा न्याय, असा हा प्रकार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे. कोहली प्रसूतिपूर्व रजेवर आणि बाबा बनलेला नटराजन ऑस्ट्रेलियात, ह्या दुजाभावाकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
 
४२च्या प्रकरणानंतर भारतीय क्रिकेटमध्ये बरंच काही घडलं. वाडेकरांनी निवृत्ती पत्करली, एका मालिकेसाठी टायगर पटौदी पुन्हा कर्णधार बनले. क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला. डलेडमधील मानहानीनंतर पुतळे जाळ, दगडफेक असं काही घडलं नाही. क्रिकेटप्रेमींनी आपला सारा संताप, व्यथा सामाजिक माध्यमांतून त्याच दिवशी व्यक्त केली. सेहवागचे ओटीपी ट्वीट शेअर करून पराभव साजरा केला. अजून तीन कसोटी बाकी आहेत. त्यांचा निकाल लागल्यानंतरच शिमग्यानंतरचे कवित्व सुरू होईल किंवा कुणी सांगावं, कौतुकाचा महापूरही येईल.

(संदर्भ : ईएसपीएनक्रिकइन्फो, क्रिकेटकंट्री, स्पोर्ट्सस्टार व अन्य काही संकेतस्थळे)

(छायाचित्रे विविध संकेतस्थळांच्या सौजन्याने)

13 comments:

 1. भागवत आणि शमी जखमी नसते तर... कदाचित स्वकमाइने जिंकलो असतो😀

  ReplyDelete
 2. उत्तम प्रासंगिक विषय आणि उत्तम मांडणी यामुळे लेख वाचनीय झाला आहे.

  दोन्ही डावांतील साम्य आणि विरोध फार सुंदर दाखवले आहेत. पण सर्वात अधिक भावल्या त्या भारतीयांच्या भिन्न प्रतिक्रिया.

  जरा अधिक खोल जाऊन त्या प्रतिक्रियांचं कारण शोधलं असतं तर लेखाला अधिक खोली किंवा उंची आली असती. पन्नास वर्षांपूर्वीचा न्यूनगंड आणि आजचा आत्मविश्वास यामधला प्रवास हा आधुनिक भारताने मानसिक पारतंत्र्य झुगारून दिल्याचं द्योतक आहे.

  सुंदर लेखाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन.
  - हेली दळवी

  ReplyDelete
 3. सर, नेहमीप्रमाणे छान लिहिले आहे.. हा सामना मी पाहिला आणि तुमच्या लेखामुळे तो अनुभवता आला...

  ReplyDelete
 4. भाऊ, अतिशय सुंदर लेख.42ची जखम तर अजून सुकलीच नाही , त्यात 36. तुझ्या लेखन शैली बद्दल धन्यवाद, आणि तुझं कौतुक.🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍👍

  ReplyDelete
 5. सुंदर आणि मेहनतपूर्वक लिहिलेला लेख.
  - विकास पटवर्धन, नगर

  ReplyDelete
 6. ह्या आठवणी म्हणजे मला वाटलं 'चले जावे' मोहिमेच्या; स्वातंत्र्यलढ्याच्या असतील. पण त्या क्रिकेटमधील नामुष्कीच्या निघाल्या! गंमत वाटली.
  - प्रियंवदा कोल्हटकर

  ReplyDelete
 7. वाचनीय आणि अभ्यासपूर्ण...
  - अनिल पवार, पुणे

  ReplyDelete
 8. खूपच छान लेख. आपण संपूर्णपणे, अगदी बारीक निरीक्षण मांडलं आहे. जुन्या सामन्याचा व आताच्या सामन्याच्या स्कोअरबोर्डची माहिती, जुने दाखले, नऊच गडी बाद होण्यासारखे काही योगायोग चांगले दाखवून दिले आहेत.
  - अजय कविटकर, नगर

  ReplyDelete
 9. ३६ आणि ४२ ह्यांची 'खिडकी' भारी!
  - धनंजय देशपांडे, उस्मानाबाद

  ReplyDelete
 10. आपल्या या क्रिकेटविषयक लेखाबद्दल धन्यवाद .

  दादर, मुंबईचा असल्याने लहानपणापासून क्रिकेटमध्ये मला खूप रुची आहे. शिवाजी पार्क मैदानावर बऱ्याच मोठ्या, नावाजलेल्या क्रिकेट खेळाडूंना अगदी जवळून पाहिले आहे.

  आपण ज्या ज्या जुन्या घटनांचे वर्णन केले, त्या त्या वेळी मी वाचलेल्या आठवतात.

  मुख्य म्हणजे ४२ धावसंख्येत आपले खेळाडू बाद झाले, ह्या वेळचे सामन्याचे धावते वर्णन BBCवरून, अगदी रेडिओला कान लावून ऐकल्याचे लक्षात आहे.

  इंग्लंडविरुद्धच्याच कसोटी सामन्यातील विनू मंकड यांचा १८२ धावांचा भीमपराक्रमही लक्षणीय होता. त्यास उद्देशून ब्रिटिश वर्तमानपत्रांनी 'एकटा मंकड विरुद्ध ११ ब्रिटिश खेळाडू' असे सामन्याचे वर्णन केले होते.

  आपण लेखात त्या वेळेच्या व सध्याच्या संबंधित सर्व पैलूंचे संकलन पूर्णतः व यशस्वीरीत्या केले आहे; कुठचीही महत्त्वाची बाब न विसरता.

  पुन्हा आपल्या लेखनकौशल्यास सलाम!!
  - अशोक जोशी, बंगळुरू

  ReplyDelete
 11. सर, खूपच छान लेख लिहिला आपण! 👍🙏🏻...

  ReplyDelete
 12. माहितीपूर्ण विस्तृत लेख!!

  ReplyDelete

... भेटीत तृप्तता मोठी

शेंगा, माउली आणि पेढे... ह्या समान धागा काय बरं! --------------------------------------------- खरपूस भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा. ‘प्रसिद्ध’...