बुधवार, ५ एप्रिल, २०२३

वडीलधारा पत्रकार


(छायाचित्र : फेसबुकवरून साभार)
‘केसरी’च्या
नगर आवृत्तीमध्ये उपसंपादकाची जागा होती, असं समजलं. म्हणून अर्ज केला. मुलाखतीसाठी तोंडी निरोप आला. नगरहून पुणे कार्यालयात आणि तिथून मला. आठवण पक्की आहे. मुलाखत द्यायला गेलो, तो दिवस होता १४ किंवा १५ डिसेंबर १९८७. सर्जेपुऱ्यातील प्रियदर्शनी संकुलातील कार्यालयात सकाळी साडेदहा-अकरा वाजता पोहोचलो, तेव्हा तिथे दोनच माणसं होती. वृत्तसंपादक रामदास नेहुलकर मुलाखत घेणार होते. त्यांनी प्राथमिक चौकशी केली. कुठपर्यंत पाण्यात आहे, ह्याची चाचपणी केली. मग एक बातमी अनुवादासाठी आणि एक संपादनासाठी दिली.

लिहिण्यासाठी मोकळ्या टेबलाजवळ गेलो. तिथं बसलेल्या मध्यमवयीन गृहस्थाने अतिशय ऋजूपणे स्वत:ची ओळख करून दिली. “नमस्कार. मी श्रीपाद मिरीकर. इथला मुख्य वार्ताहर. मुलाखतीसाठी आलात ना? वा, वा. शुभेच्छा!”

वृत्तपत्रांतील प्रस्थापित नवोदितांशी कसं वागतात, ह्याचा अनुभव यायचा होता. तरीही ही आपुलकी वेगळी वाटली, एवढं खरं.

संपादन करण्यासाठी योगायोगानं मला मुख्य वार्ताहराचीच बातमी देण्यात आली होती. तेव्हाचे उपनगराध्यक्ष कृष्णा जाधव ह्यांची बातमी होती ती. ‘अर्धवट राहिलेली कामे पालिका आधी पूर्ण करणार’ असं दोन कॉलमी दोन ओळींचं शीर्षक दिलं होतं. तो अंकही बहुतेक संग्रहात आहे.

संपादित केलेली बातमी (दुसऱ्या दिवशीच्या) ‘केसरी’च्या अंकात प्रसिद्ध झाली, तर निवड नक्की, असं आत्येभावाशी बोललो होतो. अगदी तसंच झालं. दुसऱ्या दिवशी ती बातमी ठळकपणे होती.

यथावकाश दीड महिन्याने, १ फेब्रुवारी रोजी मी ‘केसरी’त, लोकमान्यांच्या ‘केसरी’मध्ये रुजू झालो. पहिला दिवस भांबावलेला. चाचपडण्यातच पाच-सहा तास गेल्यावर संध्याकाळी चहा पिण्यासाठी गेलो. मी, उपसंपादक शरद फटांगरे आणि मिरीकर. माझ्या जवळ एक-एक रुपयाच्या नोटा होत्या.

चहा पिऊन झाल्यावर पैसे देऊ लागलो, तर मिरीकरांनी दटावलं. “सतीश, आजच आला आहेस. आता महिनाभर तू अजिबात पैसे द्यायचे नाहीत. पहिला पगार झाल्यावर वाटलं तर चहा पाज आम्हाला,” वडीलधाऱ्याच्या अधिकारानं त्यांनी सांगितलं. नवख्याला कसं संभाळून घ्यायचं असतं, हे त्यांनी दाखवून दिलं सहजपणे.

एव्हाना सगळे म्हणतात, तसं मीही त्यांना ‘अण्णा’ म्हणू लागलो होतो. पण आम्ही फार काळ सहकारी राहणार नव्हतो. फेब्रुवारी संपता संपता त्यांनी ‘केसरी’तील नोकरीचा राजीनामा दिला. नोकरी का सोडतोय, हेही त्यांनी हळुवार आवाजात सांगितलं. जेमतेम महिनाभराची ओळख असतानाही त्यांनी विश्वासानं मन मोकळं केलं होतं माझ्याकडे. तेव्हाच जाणवलं की, अण्णा (नको एवढे) सज्जन आहेत.

काही महिन्यानंतर अण्णा ‘सकाळ’मध्ये रुजू झाले. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा नगरमध्ये झाली. कोणत्याही राज्य स्पर्धेचं वार्तांकन करण्याची माझी पहिलीच वेळ. उत्साहानं बागडत होतो. भरपूर लिहीत होतो. रोज किमान तीन बातम्या.

महाराष्ट्र केसरीसारखी मानाची स्पर्धा. ‘सकाळ’मध्ये रोज हरिश्चंद्र बिराजदार ह्यांचा ‘एक्सपर्ट कॉलम’ प्रसिद्ध होई. आखाड्यातच बिराजदार बोलत आणि ते काय म्हणतात, तो शब्द न् शब्द अण्णा टिपून घेत. कार्यालयात जाऊन पक्कं लिखाण करीत. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी ते दोघं बोलत असताना मी तिथं पोहोचलो. “सतीश, तूही घे की हे मुद्दे. छान होईल तुझ्या बातमीसाठी,” अण्णा म्हणाले! कसं कोण जाणे, पण बिराजदार सांगत आहेत, ते खास आहे आणि आपल्यासाठी नाही, हे मला कळलं.

त्याही वेळी लक्षात राहिला तो अण्णांचा भाबडेपणा. वर्तमानपत्रांमध्ये स्पर्धा वगैरे असते आणि पुण्याच्या क्रीडा प्रतिनिधीनं आपल्या दैनिकासाठी म्हणून केलेली ही खास व्यवस्था आहे, हे काही त्यांच्या गावीही नव्हतं. व्यवसायबंधूला होता होईल ती मदत करावी, हा उदात्त हेतू!

नंतरही अण्णांच्या नियमित भेटी होत. ते चौकशी करीत. काही सांगत. आपण लिहिलेलं काही वाचण्यात आलं असेल, तर स्वभावधर्मानुसार कौतुक करीत. नेहमीच्याच हळुवारपणे. काही विनोद झाला की, त्यांच्या शैलीत हसत टाळी देत.

पद्मभूषण देशपांडे ‘केसरी’तला सहकारी. वार्ताहर म्हणून रुजू झाल्यावर त्याला कानमंत्र देताना अण्णा म्हणाले होते, ‘हे बघ, पत्रकारितेत आपल्यापेक्षा कुणाला लहान नाही हं समजायचं.’ हे सांगून पद्मभूषण मिश्किलपणे म्हणाला होता, “आपलं तत्त्व अण्णांना माहीत नाही - आपल्यापेक्षा कुणी मोठा नाही नि आपण कुणाहून लहान नाही!”

नगर, इथली माणसं ह्याबद्दल अण्णांना भरपूर माहिती होती. त्यांचं ह्या सगळ्या गोष्टींवर मनस्वी प्रेम होतं. काहीसं पसरट, पण भरपूर माहिती देणारं लिहीत ते. खऱ्या अर्थानं ते शहर वार्ताहर किंवा ‘सिटी रिपोर्टर’ होते. शहराबद्दल, माणसांबद्दल, इतिहासाबद्दल विलक्षण आस्था, जिव्हाळा होता त्यांना.

माध्यमातील व्यवस्थेला, ती राबवणाऱ्यांना अण्णा कधीच समजले नाहीत. इथं त्यांचा सज्जनपणा दुर्गुण ठरलेला दिसला. ह्या व्यवस्थेनं त्यांच्या पदरी पुरेपूर माप टाकलं नाही, हे खरं.

ऋजू स्वभावी, नवोदितांशी आपुलकीनं वागणाऱ्या अण्णांना श्रद्धांजली!

#नगर #पत्रकारिता #श्रीपाद_मिरीकर #अण्णा_मिरीकर #सिटी_रिपोर्टर #केसरी

१३ टिप्पण्या:

  1. आण्णांना विनम्र श्रध्दांजली
    सतिश ,आण्णाविषयी सविस्तर लेख आपुलकी जागवून गेला

    उत्तर द्याहटवा
  2. 🙏🙏अंतर्बाह्य भला माणूस... अस्सल नगरकर अण्णा 🙏🙏😢

    उत्तर द्याहटवा
  3. अशी माणसं विसरताच येत नाहीत...
    मिरीकर... नावाचा आणि नगरचा काही ऋणानुबंध असावा.
    नगरविषयीच्या वाचनात बऱ्याच वेळा हे नाव येतं.
    - प्रकाश कोळपकर, डोंबिवली

    उत्तर द्याहटवा
  4. ओळख नसतानाही आपुलकी वाटली. अशी माणसे फार कमी असतात.
    - सुहास पंडित, सांगली

    उत्तर द्याहटवा
  5. खूप सुंदर ओळख. श्रीपाद मिरीकर ह्यांना विनम्र श्रद्धांजली.
    - शैलजा शेवडे, नवी मुंबई

    उत्तर द्याहटवा
  6. तरल चित्रण.
    भावपूर्ण श्रद्धांजली.
    - विकास पांढरे, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  7. माझी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजमध्ये 'संपदा' मासिकाचा कार्यकारी संपादक होतो (१९८२ ते १९८५) तेव्हापासूनची मैत्री. नगरचा चालताबोलता ज्ञानकोश. फारच सज्जन व ऋजू व्यक्तिमत्व. विनम्र श्रद्धांजली! 🙏🌹🙏
    - सुभाष नाईक, पुणे

    उत्तर द्याहटवा
  8. एक अतिशय सरळ माणूस पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली.
    - मिलिंद देशमुख, कडा

    उत्तर द्याहटवा
  9. खूप सज्जन होते ! अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत.
    - विनोद शिंदे, नगर

    उत्तर द्याहटवा
  10. दुःखद, भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 ‘सकाळ’ कार्यालयात अनेक वेळा भेट झाली . खूप सज्जन, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा माणूस. 🙏💐
    - विजय प्रभाकर नगरकर, नगर

    उत्तर द्याहटवा
  11. सज्जन व्यक्तिमत्त्व. आदरणीय अण्णांना अखेरचा सलाम.
    - शाकीर शेख, नगर

    उत्तर द्याहटवा

प्रतापराव....

प्रतापरावांचं हे छायाचित्र त्यांच्या गावच्या शिवारातील. आम्ही हुरडा खायला गेलो होतो, त्या वेळचं. त्यांच्या खांद्याला अडकवलेली पिशवी माझी आहे...