Saturday, 25 March 2023

नंतर आणि आधी... पुरती बरबादी

 


(छायाचित्र सौजन्य - www.livehindustan.com )

थोडी पार्श्वभूमी...

गोष्ट दहा वर्षांपूर्वीची आहे. न्यायालयीन निकालाची आहे. कायदेमंडळाची आहे. लोकप्रतिनिधींची आहे. त्यांना न्यायालयाच्या निर्णयापासून संरक्षण देणाऱ्या अध्यादेशाची आहे.

...आणि गोष्ट राहुल गांधी ह्यांची आहे. लोकसभेचं सदस्यत्व रद्द झालेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षांची.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता - खासदार वा आमदाराला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ शिक्षा झाली, तर त्याचे (संसदेचे/विधीमंडळाचे) सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द होईल आणि पुढची निवडणूकही लढवता येणार नाही.

त्या वेळी केंद्रात सरकार होते संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आणि पंतप्रधान होते डॉ. मनमोहन सिंग. सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयापासून लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकार सरसावले. तसा अध्यादेश सरकारने काढला. आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या लालूप्रसाद यादव ह्यांच्यासाठी हे पाऊल उचलल्याची चर्चा होती. आजचा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व डावे पक्ष ह्यांनी तेव्हा अध्यादेशाला विरोध केला होता.

वाढता विरोध पाहून काँग्रेसने ह्या अध्यादेशाबाबत बाजू मांडण्यासाठी पत्रपरिषद आयोजित केली होती. अजय माकन पक्षाची बाजू तावाने मांडत होते. ते बोलत असतानाच राहुल गांधी तेथे आले. हा अध्यादेश म्हणजे ‘निव्वळ मूर्खपणा’ आहे, अशी शेलकी टिप्पणी करीत, त्यांनी पत्रपरिषदेत तो टराटरा फाडला!

त्या फा़डलेल्या अध्यादेशाच्या कपट्यांमध्ये वेगळ्याच भविष्याची पाने काळाने लिहिली होती. ते भविष्य कुणाला वाचता आलं होतं तेव्हा?

ह्या घटनेनंतर ‘पद्यासारखं वाटणारं गद्य’ लिहिलं होतं. घटना दोन असल्यामुळं दोन भाग. उत्तरार्ध आणि पूर्वार्ध नंतर! तेव्हा लिहिलेलं आज साडेनऊ वर्षांनंतरही ताजं वाटतं की नाही, हे वाचणाऱ्यांनी ठरवायचं...

..............................................


(सौजन्य - ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंजूल)


 

(उशिराचं शहाणपण)

 
झोपेतून उठलं लेकरू
बोलायलं की चुरूचुरू
आजोबा लागले कुरकुरू
 
सोनियाचा दिवस गडे
ऐकून त्यांचे बोल खडे
कानाला का बसले दडे?
 
टाका फाडून, द्या फेकून
अध्यादेश तो द्या टाकून
सांगतोय मीच, घ्या ऐकून
 
पक्ष आमचा, आम्हीच सरकार
आमचा आदेश आम्हीच बेजार
कसा करावा मतांचा बाजार?
 
केलात निव्वळ मूर्खपणा
कधी येणार शहाणपणा?
आता चूप! मम म्हणा!!
 
ओशाळवाणे केवढे माकन
कबुली देते झाले पटकन,
पार्टीने नही खायो माखन!
 
सत्तेत आम्ही पाय पसरू
जबाबदारीचं तेवढं विसरू
लक्षात आहे ना गाय-वासरू?
.
.
.

(...आणि आधीचं मूर्खपण)

 
काय होई काळ्या दगडा?
न्यायाचा पडता हातोडा
त्याच्याच उडती ठिकऱ्या
छिन्न-भिन्न।
 
सह्याजीरावांचा फटकारा
निकालाचा क्षणात कचरा
सुटला मुक्तीचा सुस्कारा
हाश्श-हुश्श सारे।
 
अपात्रतेची होती तलवार
तियेची केली बोथट धार
अहो! असे विशेषाधिकार
हा माननीयांचा।
 
खंडणी, खून, बलात्कार
चारा किंवा गैरव्यवहार
जनतेला करा बेजार
शुभ्रढवळे तरी तुम्ही।
 
‘बागी’ असो वा ‘दागी’
‘केशरिया’ किंवा ‘खादी’
व्यवस्था इथली सांगी
सुरक्षित तुम्ही।
 
चरा आणि राहा चरत
नवीन गुन्हे राहा करत
निवडून या परत परत
सिद्ध आम्ही स्वागता।
 
किल्ल्या जामदारखान्याच्या
कायमच्याच हाती चोरांच्या
व्यथा घालू कानी कोणाच्या
ना दाद, ना फिर्याद।
 
कोल्ह्यां-लांडग्यां अभय
वनराजा बनो निर्भय
काननी असाच न्याय
मिळणार सदा।
 
अभयारण्य असे आगळे
भय जयांचे, तेच मोकळे
कसे ओरडावे न कळे
मौनची परवडे।
.
.
.
आता एकची सांगणे
लई नाही हो मागणे
आम्हां पामरां अडकवणे
सुरक्षित गजाआड।
............................
- गोत्यातून पोत्यात आलेला ‘आम आदमी’ 

......................

(`गुन्हेगार नेता, भूषण भारता` हे जणू ब्रीद असल्याप्रमाणेच केंद्र सरकारने अध्यादेश काढण्याचे ठरविले. युवराज धो-धो बरसले आणि त्यात अध्यादेशाच्या कागदी होड्या वाहून गेल्या.)

लेखन - अनुक्रमे २८ व २६/सप्टेंबर/२०१३
......................

#राहुल_गांधी #अध्यादेश #केंद्र_सरकार #मनमोहनसिंग #आमदार_खासदार #सर्वोच्च_न्यायालय #फाडलेला_अध्यादेश

2 comments:

मित्राची आठवण अन् आठवणीतला मित्र!

अचानक एखाद्या जुन्या मित्राची फाऽऽर आठवण येते. त्यानं पोटापाण्यासाठी गाव/शहर सोडलेलं असतं. त्या दूर देशी तो स्थायिक झालेला असतो. अधूनमधून व...