सोमवार, ६ मार्च, २०२३

मित्रत्व बहाल करणारा गुरू

 

अमृतमहोत्सवानिमित्त नाशिकमध्ये मानपत्र देऊन सत्कार. प्रवीण ठिपसे,
विनायकदादा पाटील, वि. वि. क. आणि शांताराम जाधव.
मंदार देशमुख ह्यांनी आयोजित केलेला देखणा, अविस्मरणीय सोहळा.
----------------------------------------
------------------------------

‘वि. वि. करमरकर यांचं वेगळेपण कशात?
भाषेत? अभ्यासात? तपशिलात? शैलीत?
या सगळ्याच प्रश्नांचं उत्तर अगदी थोडक्यात देता येईल - ‘सगळ्याच बाबतीत.’
त्यांची भाषा वेगळी असे; पण सर्वसामान्यांना समजणारी.
लेखात-बातमीत त्यांनी केलेला अभ्यास दिसे; पण तो दडपून टाकणारा नसे.
आवश्यक तेवढा तपशील ते देत; त्यांच्या लेखनाची शैली, धाटणी वेगळी होती. पण तो केवळ शब्दांचा फुलोरा नसे. या साऱ्याचा अनोखा, गुंगवून टाकणारा संगम म्हणजे वि. वि. क.’

- साधारण चौदा वर्षांपूर्वी वि. वि. करमरकर, अर्थात सर्वसामान्य क्रीडाप्रेमी वाचकांचे वि. वि. क. ह्यांचं व्यक्तिचित्र रंगवताना हे लिहिलं होतं. ‘शब्दसंवाद’ पुस्तकाची ओळख करून देताना ह. मो. मराठे ह्यांनी ते नेमकं उचलून धरलं होतं.

हे लिहिलं तेव्हा वि. वि. क. ह्यांच्याशी ओळख नव्हती. म्हणजे दुहेरी नव्हती. पुण्याच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दहा दिवस त्यांच्याशी नियमित बोलणं झालं होतं खरं; म्हणून ते मला ओळखत असतील, असं काही वाटत नव्हतं. त्यामुळे त्या लेखात सगळं काही त्यांच्यातील पत्रकाराबद्दल होतं; माणसाबद्दल नव्हतं.
.....

माहितीच्या महाजालात मिळणारं
 वि. वि. क. ह्यांचं चांगलं म्हणावं,
असं एकमेव छायाचित्र.
सौजन्य - दैनिक प्रहार
------------------------------

शाळकरी वयात वाचत होतो, तेव्हा वि. वि. क. ह्यांच्याशी कधी ओळख होईल, असं स्वप्नही पाहिलं नव्हतं. त्यांनी लिहायचं आणि आपण वाचून खूश व्हायचं. त्या काळात ‘महाराष्ट्र टाइम्स’ अग्रलेख व संपादकीय पानासाठी वाचला जाई म्हणे. ‘डाक एडिशन’चीही वाट पाहिली जाई. माझ्यासारखे असे असंख्य वाचक असतील की, जे ‘म. टा.’ची वाट पाहायचे क्रीडा पानासाठी. त्यावर वि. वि. क. आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काय लिहिलंय, ते वाचण्यासाठी.

पत्रकारितेत आल्यावर वाटत होतं की, कधी तरी योग येईल आणि आपली त्यांच्याशी भेट होईलही. मराठी क्रीडा पत्रकारांची संघटना स्थापन झाल्यावर वाटलं की, हा योग आता नक्कीच आहे. पण त्या संघटनेपासून ते लांबच राहिले. हुलकावणी.

पुण्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ती संधी मिळाली. त्यांना पाहता आलं, बोलता आलं, त्यांनी हातात हात घेतला, खांद्यावर हात टाकला, एकेरी, अगदी पहिल्या नावानं हाक मारली... ह्या सगळ्याचं केवढं तरी अप्रुप. सत्तर एम. एम.च्या विशाल पडद्यावरून उतरून नायक थेट तुम्हाला भेटतो, तेवढंच!
.....
मध्ये मग खूप वर्षं गेली. ते लिहीत होते. आम्ही वाचत होतो. कळत-नकळत बातम्या लिहिताना त्यांचं अनुकरण करत होतो. शैलीचंच. पण अंधळेपणानं नव्हे. झेपेल तेवढं, आपल्याला कळलेलं असेल तितकंच.

नगरचे नगराध्यक्ष शंकरराव घुले होते. ‘अण्णा’ म्हणायचे सगळे त्यांना. माझ्या क्रीडा बातमीदारीचं त्यांना कौतुक वाटे. कुणाशीही ओळख करून देताना ते म्हणायचे, ‘मुंबईला ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वि. वि. करमरकर आहेत ना, तसे हे आपल्या नगरचे!’ हौशी क्रीडा पत्रकार म्हणून दीर्घ काळ काम केल्यावर कोणते पुरस्कार मिळाले नाहीत; पण अशी प्रशस्तिपत्रं भरपूर मिळाली!

वि. वि. क. ह्यांच्याशी नंतर भेट किंवा बोलणं होण्याचं काहीच कारण नव्हतं. तो योग १५ वर्षांनी आला. त्यांचं कारण वर सांगितलेलं व्यक्तिचित्र. त्याबद्दल त्यांचा फोन आला. ‘अरे सतीश...’ असं म्हणत. जणू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच आम्ही भेटत होतो.
.....
बहुतेक २०११चं वर्ष असावं. बारामतीत राष्ट्रीय खो-खो स्पर्धा होती. ती संपवून मंदार देशमुख नगरमार्गे नाशिकला जाणार होता. तिथं त्याच्या सोबत वि. वि. क.ही होते. निर्मल थोरात, मी आग्रह केला - त्यांनाही सोबत घेऊन ये. रात्री गप्पा मारू, जेवू. आम्ही त्यांना सकाळी मुंबईच्या बसमध्ये बसवून देतो. त्या रात्री वि. वि. क. भेटले, बोलले. आमच्यातील दीर्घ काळाच्या संवादाची ती नांदी होती.

रात्री हॉटेलवर सोडताना त्यांना सकाळी नाश्त्याला काय आणू, असं विचारलं. वि. वि. क. म्हणाले होते, ‘मला उपिट आवडतं. बघ जमलं तर.’ दुसऱ्या दिवशी सकाळीच सुधीर चपळगावकर आणि मी हॉटेलात गेलो. त्यांना घेऊन जवळच्या स्टँडवर आलो.

बस आली. सुधीरनं त्यांचं तिकीट काढलं. तो नको म्हणत असतानाही त्यांनी तिकिटाचे पैसे लगेच दिले. आग्रहानं. तिकिटाच्या रकमेपेक्षा पाच रुपये जास्त होते. तोवर आमची घट्ट ओळख झालेली नव्हती. त्यांचं एकूण (हिशेबी?) वागणं बघून मग मीही जवळचे पाच रुपये त्यांना परत केले. ‘थँक्यू’ म्हणत त्यांनी ते नाणं खिशात टाकलं.

मुंबईला पोहोचल्याचं सांगायला वि. वि. क. ह्यांचा फोन. काहीसं औपचारिक वाटेल असा आभाराचा फोन. बोलणं संपवण्याच्या आधी म्हणाले, ‘आणि हो, उपिट छान होतं रे. वहिनींना माझा नमस्कार सांग.’

मग हे उपिट पुढची सात-आठ वर्षं त्यांच्या बोलण्यातून नेहमी येत राहिलं. ‘वहिनींना नमस्कार सांग. त्यांनी केलेलं उपिट छानच होतं.’ वाटीभर उपिट आणि ढीगभर आभार! गोड शब्दांत. तशीच आठवण निघायची ती पुढे निर्मल थोरातच्या घरी खाल्लेल्या पिठलं-भाकरीची.
.....
आता आम्ही नियमित फोनवर बोलू लागलो होतो. दरम्यान ‘मैदान बचाव’ मोहिमेची व्याप्ती नगरपर्यंत वाढविण्याचं त्यांनी ठरवलं. ‘महाराष्ट्र क्रीडा विकास संस्था’ हा एक त्यांचा उपक्रम होता. ती संस्था आणि स्थानिक क्रीडा मंडळ ह्यांनी जिल्हा पातळीवर चार-पाच खेळांची स्पर्धा वर्षातून एकदा घ्यावी. खेळाडूंना स्थानिक पातळीवर खेळायला मिळावं, असा उद्देश.

महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेची शाखा नगरलाही सुरू करायची होती. त्यांनी आग्रह धरला म्हणून एकलव्य क्रीडा मंडळातर्फे दोन दिवसांची खो-खो व व्हॉली़बॉल स्पर्धा आयोजित केली. त्यासाठी वि. वि. क. आणि त्यांचे घट्ट मित्र भास्कर सावंत नगरला आले होते.

रत्नागिरीनंतर नगरलाच असे सामने होत होते. राज्य खो-खो संघटनेचे उपाध्यक्ष अशोक पितळे ह्यांनी त्यांच्या सन्मानार्थ छान जेवण आयोजित केलं. तिथं आलेल्या सगळ्यांशी वि. वि. क. मनमोकळेपणानं बोलले. सगळ्यांची ओळख करून घेतली. त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या माणसाचं नाव आणि फोन नंबर टिपून घेतला.

त्याच दौऱ्यात आम्ही त्यांना बाळू चंगेडे ह्याची नगरमधली ‘जगप्रसिद्ध मिसळ’ खायला भर दुपारी घेऊन गेलो होतो. मूळचे नाशिककर असलेल्या वि. वि. क. ह्यांना ती नगरी मिसळही आवडली. पण उपिट किंवा पिठलं-भाकरीप्रमाणे त्या मिसळीची त्यांनी नंतर कधी आठवण काढली नाही, हेही खरं.

ती स्पर्धा एकाच अध्यायावर थांबली. वि. वि. क. पुढची दोन-तीन वर्षं त्याबद्दल चौकशी करीत होते. कधी तरी त्यांच्या लक्षात आलं की, आता हे होणार नाही. मगच ते थांबले. अन्यथा पिच्छा पुरविण्याबाबत त्यांना तोड नव्हती. निर्मलनगरच्या एकलव्य क्रीडा मंडळात आता किती खेळाडू आहेत, अशी चौकशी ते अधूनमधून करीत. निर्मलनं काय केलं पाहिजे, हेही सांगत.

का कुणास ठाऊक, पण निर्मल थोरातचा नंबर त्यांच्याकडून सेव्ह झाला नाही. कधी आठवण आली किंवा माझ्याशी बोलणं झाल्यावर म्हणत, ‘अरे, मला तेवढा निर्मलचा नंबर पाठवतोस? बोलतो एकदा त्याच्याशी.’
‘तुम्हाला मागच्याच वेळी दिला की त्याचा नंबर,’ अशी आठवण करून दिल्यावर ते म्हणत, ‘सेव्ह नाही झाला तो बहुतेक. जाऊ दे. आता एवढ्या वेळी दे. मी नक्की सेव्ह करतो.’ पुन्हा हा नंबर लगेच तोंडी सांगून उपयोग नसे. कारण हाताशी कागद-पेन असेलच, असं काही नाही. एस. एम. एस.च पाठवणं अनिवार्य असायचं. असं आठ-दहा वेळा झाल्यावर एकदा त्यांना एस. एम. एस.मध्ये निर्मलच्या आधी माझं नाव लिहून नंबरही दिला. त्यांचा लगेच फोन, ‘तुझा कशाला नंबर पाठवलास? तो आहे ना माझ्याकडे.’
‘कधी तरी माझाही नंबर विसराल आणि मलाच मागाल. त्या पेक्षा आधीच देऊन ठेवलेला बरा!’ हे उत्तर ऐकल्यावर खळखळून हसले होते.

एकदा त्यांना कुरिअरनं काही तरी पाठवायचं होतं, लेख किंवा कातरण. त्यांचा ‘३२, मोघे भवन, दादर’ हा पत्ता वहीत लिहिलेला होता. सहज विचारलं की, दादरच्या पत्त्यावरच पाठवायचं ना, तो मोघे भवन वगैरे... ते लगेच म्हणाले, ‘किती वेंधळायेस रे तू. मागच्याच आठवड्यात तुला पत्ता सांगितला ना. घोळ घालू नकोस. घे पुन्हा लिहून.’ मी वहीत पत्ता आहे, असं सांगेपर्यंत त्यांनी पुन्हा तो सांगितला आणि माझ्याकडून वदवून घेतला.
....
असाच कधी तरी सकाळी वि. वि. क. ह्यांचा फोन येई. ‘बाळ बोलतोय... बाळ करमरकर. कसायेस?’ खरं तर त्यांचं ‘बाळ’ किंवा ‘बाळासाहेब’ हे नाव आतल्या वर्तुळातलं, असा समज. कदाचित त्यांना ते आवडत असावं किंवा त्या वर्तुळात त्यांनी मलाही सामावून घेतलं असावं.

एखादं मिनिट हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर वि. वि. क. लगेच मुद्द्यावर येत. एकामागून एक प्रश्न असत - ‘तुझ्याकडे ‘लोकसत्ता’ येतो? आजचा अंक आलाय? तू पाहिलास? माझा लेख आलाय का त्यात? वाचलास का नाही? वाचून तुझी प्रतिक्रिया कळव...’ 

तो लेख वाचून दिवसभरात त्यांना कळवावं लागे. नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन ठरलेलाच. एखादा मुद्दा कळला नाही किंवा पटला नाही, असं सांगितलं तर तसं नेमकं का वाटतं, हे त्यांना स्पष्ट करून सांगावंच लागे.

मधलं वर्षभर, २०१५ किंवा २०१६मध्ये औरंगाबादच्या ‘दिव्य मराठी’मध्ये वि. वि. क. सदर लिहीत होते. त्याचा अंक मात्र त्यांना सहज मिळत नसे. मग पुन्हा तसाच फोन करून माझ्याकडे ‘दिव्य मराठी’चा अंक येतो की नाही, ह्याची चौकशी होई. मग तो अंक कुरिअरने पाठव, असं ते सांगत.

‘दिव्य मराठी’मधलं ते सदर खास वि. वि. क. शैलीचंच होतं. दोन ओळींमध्ये न लिहिलेलं काही असे. एकदा असंच वाटलं की, ज्या भागात हा अंक जातो, तिथल्या वाचकांना हे लेखन कितपत पचत असेल? त्या पेक्षा वि. वि. क. ह्यांनी जुनी शैली थोडी बदलून आणि थोडं अजून सोपं करून लिहावं.

त्या दिवशी नेमका त्यांचा फोन आला आणि हे (चुकून) सांगून टाकलं. ते म्हणाले, ‘‘म्हणजे नेमकं कसं करायला पाहिजे म्हणतोस? असं कर, तो लेख तुला वाटतो तसा लिहून, संपादित करून मला पाठव.’’ हे भलतंच झालं, असं समजून टाळाटाळ करू लागलो. ‘‘काय हे... मित्रासाठी एवढं करणार नाहीस का तू?’’ मधाळ आवाजात त्यांनी विचारलं. पण ते धर्मसंकट टाळलंच मी. त्यांच्या लेखाचं संपादन किंवा त्यांची शैली सोपी(?) करायची हिंमत झाली नाही!

‘तुम्ही आत्मचरित्र लिहायलाच पाहिजे!’ दर दोन-चार फोननंतर वि. वि. क. ह्यांना मी म्हणत होतो. असंच एकदा त्यांनी विचारलं, ‘‘आत्मचरित्रात काय काय लिहावं म्हणतोस?’’ सांगू लागलो. माझी दोन-चार वाक्यं होतात न होतात, तोच थांबवून म्हणाले, ‘‘हे तुझे सगळे मुद्दे मला लिहून पाठवशील प्लीज? कुरियर कर. पत्ता आहे ना माझा? पाठवच.’’ 

त्यांच्या आत्मकथेत काय वाचायला आवडेल, ह्याचा विचार करून एका रात्री बैठक मारून दहा-बारा मुद्दे काढले. दुर्दैव असं की, दुसऱ्याच दिवशी संगणकाची तोळा-मासा असलेली तब्येत ढासळली. डेस्क-टॉपवरची ती फाईल अर्थातच उडाली.

चार दिवसांनी त्यांचा पुन्हा फोन आला. नेमकं काय घडलं नि कसं बिघडलं, हे सांगण्याची हिंमत नव्हती. दोन दिवसांनी त्यांना मोठा एस. एम. एस. करून परिस्थिती कशी आहे, हे कळवलं आणि मगच त्यांनी माझा नाद सोडला.
....
पण वि. वि. क. असा एखाद्या गोष्टीचा सहजी नाद सोडत नसत; समाधान होईपर्यंत पिच्छा पुरवत. ‘प्रो कबड्डी’च्या धर्तीवर महाराष्ट्राची कबड्डी लीग झाली तेव्हाची गोष्ट. मित्र विजय सेठी ह्यानं नगरचा संघ घेतला होता. स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी वि. वि. क. ह्यांनी यावं, त्यांच्याकडून काही ऐकावं असं त्याला वाटलं. त्यांना आमंत्रण देण्याची, त्यांच्या सोबत राहण्याची, त्यांची कुठलीही गैरसोय होणार नाही, हे पाहण्याची जबाबदारी माझी.

ठरल्यानुसार वि. वि. क. आले. सोबत भास्कर सावंत होते. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी विजयशी त्यांनी अर्धा तास गप्पा मारल्या. संघाच्या मालकीचं आर्थिक गणित समजून घेतलं.

स्पर्धा काही त्या अर्थाने यशस्वी झाली नव्हती. गाजलीही नाही. नेमकं काय चुकलं, कुठं चुकलं हे वि. वि. क. ह्यांना जाणून घ्यायचं होतं. त्यासाठी ते विजय सेठीशी वारंवार संपर्क साधत. विजय अनेक कामात गुंतलेला. दोन महिन्यांनंतर तो कबड्डी लीगच्या व्यापातून मनोमन दूर झाला. वि. वि. क. काही पिच्छा सोडत नव्हते. अखेर त्यांना एकदा सांगितलं, ‘‘विजयच्या मागे खूप व्याप आहेत. त्याच्या दृष्टीनं हा अध्याय संपलेला आहे.’’ त्यांनी ते मनाविरुद्धच मान्य केलं.

त्याच वेळची एक गंमत. पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी त्यांना टॅक्सीच्या भाड्याएवढी रक्कम दिली होती. पण लगेच शिवनेरी बस मिळाली आणि त्यानंच ते गेले. टॅक्सीपेक्षा कमी भाडं लागलं. उरलेल्या पैशाचं काय करायचं?

वि. वि. क. ह्यांचा दोन दिवसांनी फोन. ‘तू टॅक्सीसाठी दिलेल्या पैशातले एवढे एवढे शिल्लक राहिलेत. ते कसे पाठवू तुला?’
सांगितलं की, ते पैसे विजयने दिलेले आहेत. त्याचा पत्ता देतो. त्यालाच पाठवून द्या. त्यांच्याकडून नकार. ‘मला तू पैसे दिले होतेस. तुलाच मी परत करायला हवेत. त्याचं काय करायचं ते तू कर.’

राज्य खो-खो संघटनेचे खजिनदार तुषार सुर्वे एका स्पर्धेनिमित्त शेवगावला येणार होते. त्यांच्याकडे वि. वि. क. ह्यांनी माझा नंबर, ते पैसे, माझ्यासाठी चिठ्ठी दिली. ते तीन दिवस रोज फोन.

तुषार सुर्वे ह्यांनी आमच्या शेवगावच्या बातमीदारामार्फत पैसे पाठविले. ते हातात पडताक्षणी फोन करून सांगितलं ‘पैसे आताच मिळाले!’ ते ऐकल्यावर ते स्वस्थ झाले. महाराज गडावर पोहोचले, असं कळाल्यावर वीर बाजीप्रभू आश्वस्त झाले, अगदी तसं.
....

नाशिकमध्ये सत्कार. लाखाचा चेक देऊन!
------------------------------------------------------------

वि. वि. क. ह्यांचा वाढदिवस ११ ऑगस्ट. वयाचं पाऊण शतक त्यांनी २०१३मध्ये पूर्ण केलं. अमृतमहोत्सवाचा हा मुहूर्त साधून नाशिकच्या मंदार देशमुख ह्यानं जोरदार कार्यक्रम आयोजित केला. ‘मिळून सारे’तर्फे. सायखेडकर नाट्यगृहात. वि. वि. क. ह्यांची ग्रंथतुला, त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश, सत्कार आणि मग सगळ्यांसाठी मस्त जेवण. वनाधिपती विनायकदादा पाटील, भारताचे पहिले ग्रँडमास्टर आणि अर्जुन पारितोषिक विजेता बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे, अर्जुन पारितोषिक विजेता कबड्डीपटू शांताराम जाधव, हे प्रमुख पाहुणे.

वि. वि. क. ह्यांची तासभर मुलाखत. विनायकदादांचं खुसखुशीत भाषण. कार्यक्रम फारच अफलातून झाला. मंदारच्या नियोजनाला अगदी साजेसा. तोळाभर उणा नाही. कर्मभूमीनं दखल घेतली नसली, तर जन्मभूमीत सत्कार होतो आहे, ह्यामुळं वि. वि. क. अगदी मनापासून खूश दिसले. तसाही मंदार त्यांचा लाडकाच. वि. वि. क. ह्यांच्यावरील प्रेमापोटी ‘बेळगाव तरुण भारत’चे क्रीडा प्रतिनिधी विवेक कुलकर्णी बेळगावहून नाशिकला आले होते.

कार्यक्रम संपला. जेवण संपवून आम्ही नगरला निघालो. निरोप घ्यावा म्हणून गेलो, तेव्हा वि. वि. क. जेवत होते. त्यांनी गप्पा सुरू केल्या. त्यांच्या शेजारी चंद्रशेखर संत होते. ‘अहो, नंतर बोला. त्यांना आधी जेवू द्या नीट,’ असं ते म्हणाले. आम्ही निघालो.
दोनच दिवसांनी वि. वि. क. ह्यांचा फोन. ‘‘संत तुला बोलले, म्हणून रागावलास का? अरे, मी त्यांना म्हणालो, ही मंडळी आपल्यावरील प्रेमापोटी नगरहून गाडी करून इथं आली. आता रात्री-अपरात्री ते पोहोचतील. असं बोलायचं नव्हतं. चल जाऊ दे... त्यांच्या वतीनं मी तुझी क्षमा मागतो!’’ केवढी ही दिलदारी, मनाचा मोकळेपणा!!
....
पुण्यात मल्लखांबाविषयी काही परिषद किंवा कार्यशाळा होती. नगरचा प्रशांत मोहोळे तिथं होता. परिषद संपल्यावर वि. वि. क. रिक्षाची वाट पाहत असलेले त्याला दिसले. त्यांना मोटारीतून सोडायची तयारी प्रशांतनं दर्शविली. तो नगरचा असं समजताच त्यांनी विचारलं, ‘सतीश कुलकर्णी, निर्मल थोरात  ह्यांना ओळखता?’ त्यानं लगेच फोन लावल आणि म्हणाला, ‘सतीशराव, बोला तुमच्या गुरूंशी.’

पुढच्या फोन वेळी वि. वि. क. म्हणाले, ‘‘अरे ते मला तुझा गुरू म्हणाले. पण माझ्या काही तसं मनात नव्हतं.’’
‘‘अहो पण तुम्ही आहातच आमचे गुरू. आता आम्हाला शिष्य मानायचं की नाही, हे तुम्ही ठरवायचं,’’ असं म्हणाल्यावर ते मनापासून हसले.
....
वि. वि. क. पुण्यात आले मध्यंतरी. तिथं दीर्घ काळ राहिले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये बातमी वाचण्यात आली. पारनेर तालुक्यातील एका छोट्या गावातील दोन-तीन मुलींनी बांबू उडीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ती वाचून त्यांनी संपर्क साधला. ‘तू त्यांच्या प्रशिक्षकाशी बोल. त्यांना कोणत्या साहित्याची गरज आहे आणि त्याला साधारण किती पैसे लागतील विचार. आपण मिळवून देऊ त्यांना मदत.’ दुर्दैवाने त्या प्रशिक्षकाला वि. वि. क. ह्या नावाचं महत्त्व कळलं नाही आणि नेमकी काय गरज आहे, हे त्याला सांगता आलं नाही. आम्ही दोघांनीही नाद सोडला.

आग्रही होते, ठाम होते, पण समोरच्याचं ऐकून घेण्याची त्यांची नेहमीच तयारी होती. आणि पटलं की मान्य करण्याची. प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू प्रेमचंद ‘डोगरा’ ह्यांच्याबद्दल एकदा बोलत होतो. त्यांची मुलाखत मी घेतल्याचं सांगितलं.
‘कोण म्हणालास?’
‘प्रेमचंद डोगरा.’
‘कोण?’
पुन्हा तेच उत्तर.
‘अरे डोगरा नाही, डेगरा, डेगरा! लक्षात ठेव आता.’

‘रवींद्र जडेजा आपण लिहितो, पण ते खरं जाडेजा असं आडनाव आहे,’ असं एकदा बोलता बोलता म्हणालो मी त्यांना. ‘हो का. मी तपासून इथून पुढे तसंच लिहितो.’
....
मागच्या क्रिकेट विश्वचषकातील अंतिम लढत चुरशीची झाली. इंग्लंड जिंकलं आणि स्पर्धेचा मानकरी म्हणून न्यू झीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ह्याची निवड झाली. सहानुभूती. खरं तर बेन स्टोक्स हाच खरा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, असं माझं मत. वि. वि. क. ह्यांच्याशी तसं बोललो. मग त्यांनी स्टोक्सची कामगिरी मागवून घेतली. प्रत्येक फेरीतील विजेत्या संघाला किती रक्कम मिळाली, विजेत्याला किती, उपविजेत्याला किती हाही तपशील मागवला.

वि. वि. क. ह्यांना ह्या बक्षिसाच्या रकमेबद्दल काही लिहायचं होतं. टेनिसच्या ग्रँड स्लॅम स्पर्धा, फुटबॉलमधल्या विविध स्पर्धांमधील बक्षिसांबद्दल त्यांना तपशील हवा होता. ते त्यांनी सांगितलं. रात्री तीन-चार तास बसून ते सगळे आकडे काढले. पण एस. एम. एस.वर एवढा मजकूर जाईना. तुकडे करून पाठवावेत, तर त्यांचा गोंधळ उडणार. वि. वि. क. व्हॉट्सॲप किंवा इ-मेल ह्यापासून लांब. त्यांना कळवलं, व्हॉट्सॲप वापरणाऱ्या तुमच्या जवळच्या कोणाचा नंबर किंवा इ-मेल द्या. त्यांनी एक नंबर कळवला. त्यावर ती सगळी माहिती पाठवून दिली. 
....
आपल्या ओळखीच्यांनी एकमेकांशी सतत संवाद साधत राहावं, एकमेकांच्या संपर्कात राहावं, असा वि. वि. क. ह्यांचा आग्रह. ‘तू ह्याच्याशी बोललास का, त्याला फोन केलास का... अरे कसे रे तुम्ही. मित्रांशी बोललं पाहिजे ना,’ असं त्यांचं म्हणणं असे.

बडोद्याला सुधीर परब सरांशी मस्त गप्पा मारत होतो. अचानक आठवलं. त्यांना विचारलं वि. वि. करमरकरांशी बोलायचं का? फोन लावून म्हणालो, ‘देशी खेळातल्या पहिल्या अर्जुनवीराशी बोलायचं का तुम्हाला?’
‘अरेsss, सुधीर परब. तुला कुठे भेटला तो?’ मग पंधरा-वीस मिनिटं त्यांच्या गप्पा रंगल्या.
....

‘शब्दसंवाद’मधील वि. वि. क. ह्यांच्यावरील लेखासाठी
नांदेडच्या नयन बाराहाते ह्यांनी रेखाटलेलं चित्र.
------------------------------
लॉकडाऊनच्या काळात वि. वि. क. ह्यांच्याशी नियमित संवाद साधत होतो. एकदा तर सलग तीन दिवस तबलिगी ह्या विषयावर ते बोलत होते. अखेर न राहून म्हणालो, ‘‘आपल्या दोघांचं ह्या विषयावर काही एकमत होणार नाही कधीच. हा विषय टाळूयात का आपण इथून पुढे?’’ त्यांनी पुढे कधीच विषय काढला नाही.

लॉकडाऊनची घोषणा झाली, त्या रात्री आम्हीही धावपळ करून किराणा सामान आणलं. ते खटकत होतं. आपलं चुकल्याची भावना होती. ती बोलून दाखविल्यावर वि. वि. क. म्हणाले, ‘‘तशी काही अपराधी भावना अजिबात बाळगू नकोस. तू बरोबरच केलंस. उलट मी तर म्हणीन की, पैसे असतील जवळ तर अजून दोन महिन्यांचं सामान आणून ठेव. हे किती दिवस चालेल, दर किती वाढतील काही सांगता येत नाही.’’ किती छान समजावून घेतलं होतं त्यांनी.
....
अजून खूप आठवणी आहेत. खूप लिहिता येईल. वि. वि. क. ह्यांच्या लेखनाबद्दल इथं काहीच लिहिलं नाही. कारण त्याबद्दल पूर्वीच लेख लिहिला आहे. त्यांच्यातला प्रेमळ, दिलदार, हट्टी, रागावणारा, हक्कानं दोन गोष्टी सांगणारा माणूस ह्या दहा-बारा वर्षांत अनुभवला. केवढं हे भाग्य! ‘शब्दसंवाद’ प्रकाशित झाल्यावर त्यांना प्रत पाठविली. पुस्तक हातात पडताच त्यांचा फोन आला. ‘हे छानच झालं. पण आता पुढचं पुस्तक एखाद्या विषयाचा अभ्यास करून लिही. लिहिशील तू...’

दि. वि. गोखले आणि दिनू रणदिवे ह्या दोन सहकाऱ्यांच्या निधनानंतर त्यांनी भरभरून लिहिलं. रणदिव्यांवरचा लेख वाचल्यावर २० जून २१ रोजी त्यांना मेसेज केला - लेख आवडला. त्यात त्यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाचा ओझरता उल्लेख केला आहे. त्याबद्दल विचारल्यावर म्हणाले, ‘आता ते महत्त्वाचं नाही. त्यावर नंतर बोलीन कधी. तुला सविस्तर सांगतो.’ ते काही झालं नाही.

चार वर्षांपूर्वी त्यांचा वाढदिवस विसरलो. आठवड्यानंतर मेसेज केला. त्याच वर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाटलं आणि त्यांना एस. एम. एस. पाठविला - ‘तुम्हाला वाचत मी खूप काही शिकलो. शिष्योत्तम झालो नसेन; पण शिष्य होण्याचा प्रयत्न केला. गुरुपौर्णिमेनिमित्त हे मनोगत!’

तीच भावना आज पुन्हा व्यक्त करावी वाटते. त्यांनी जे काही दिलं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी वाटते. मनापासून, खूप आतून...
.....

(छायाचित्रं नाशिकच्या सचिन निरंतर ह्यांनी काढलेली आणि मंदार देशमुख ह्यांच्या संग्रहातून.)

.....

#विविक #करमरकर #पत्रकारिता #क्रीडा_पत्रकारिता #मराठी_पत्रकारिता #महाराष्ट्र_टाइम्स #मंदार_देखमुख #निर्मल_थोरात  

४३ टिप्पण्या:

  1. सतिश खुप खुप सुंदर आहे. आपल्या जवळच्या माणसाचे ऊत्क्रृष्ट व्यक्तिचित्र रेखाटण्यात तू यशस्वी झाला आहेस असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    उत्तर द्याहटवा
  2. फार सुंदर लिखाण झालं , त्यांच्या स्वभावातले बरेच धागेदोरे हाताशी लागले, त्यांच्या बद्दल खूप काही समजलं. वि.वि.करमरकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

    उत्तर द्याहटवा
  3. भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
    कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांचं समालोचन रेडिओवर ऐकलं आहे. खूप प्रभावी. 🙏
    - विजय नगरकर, नगर

    उत्तर द्याहटवा
  4. 🙏🏻🙏🏻
    करमरकर सरांशी १९७२-७३पासून बऱ्याच गोष्टींची, विचारांची देवाण-घेवाण झाली,

    भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻🙏🏻
    - शकुंतला खटावकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  5. उत्तम लेख! व्यक्तिमत्त्व त्यांच्यातील बारकाव्यांसह नुसतं व्यक्त झालं असं नाही तर ठसलं!! विनम्र श्रद्धांजली!!
    - श्रीकांत जोशी, नगर

    उत्तर द्याहटवा
  6. फार भावूक... भावपूर्ण श्रद्धांजली.
    - प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर, लोणी

    उत्तर द्याहटवा
  7. आमच्या नोकरीच्या उपोषण काळात सरकारची कानउघडणी करणारे वि. वि. क. ‘सरकारला भिक लागलीय का? राज्यात NIS प्रशिक्षकांची गरज असताना हे तरुण उपोषण करतात, हे सरकारचं अपयश आहे,’असे खडे बोल त्यांनी सुनावताच शासनाने हालचाल करून आम्हाला नोकऱ्या दिल्या. परखड लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले.

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐ओम शांती
    - अजय पवार, नगर

    उत्तर द्याहटवा
  8. अप्रतिम... 👌👌
    ...मला ह्यातील खूप काही माहितीच नव्हते. 🙏🏼

    मला त्यांचा क्रिकेट commentaryचा आवाज भावायचा. खूपच संस्कृतिगर्भ (cultured) होता तो आवाज.
    आजही (आठवला की) काना-मनात घुमतो.
    🙏🏼
    - सुहास गोळे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  9. ओळख झाल्यापासून ते आत्तापर्यंतचा सगळा प्रवास मस्त मांडला आहे.

    १) नगरचे वि. वि. करमरकर कोण हे आज कळलं.
    २) ज्या मिसळची करमरकर सरांनी पुढे आठवण काढली नाही, ती ‘बाळू चंगेडे’ ह्यांची मिसळ नक्की खायची आहे.
    ३) रेल्वेने किंवा बसने येऊन गाडीचे भाडे घेणारे किंवा ॲाफिसच्या नावावर गाडी भाड्याने करून कार्यक्रमाला जाणारे व आयोजकांकडून गाडीचे भाडे घेणारे पाहिले आहेत. पण बसने गेल्याने शिल्लक राहिलेले पैसे परत देण्याचा किस्सा ऐकून सरांना सलाम…
    ४) त्यांच्या लेखाचं संपादन किंवा शैली सोपी करण्याची हिंमत कधी झाली नाही…या वाक्यावरून लोकसत्तामधील किस्सा आठवला - तुम्ही संपादित केलेली बातमी आपल्या एका लोकप्रिय सहकाऱ्याने परत संपादित केली. ते ऐकल्यावर मिश्किल बोलण्याबद्दल प्रसिद्ध असलेला आपला दुसरा सहकारी म्हणाला, ‘सतीशने एडिट केलेली बातमी ह्यानं एडिट केली, म्हणजे ती मूळ होती तशी झाली!’ 😁😁😁😁
    ५) शिष्य-गुरूचा किस्साही भारी आहे
    ६) ‘शिष्य होण्याचा प्रयत्न केला’, हे आवडलं.
    🙏🙏👍👍
    - गणाधिश प्रभुदेसाई, पुणे

    उत्तर द्याहटवा
  10. ते माझे आजपर्यंतचे सर्वात आवडते क्रीडा पत्रकार. लहानपणी तेव्हा मी त्यांच्यामुळे म. टा.चे सर्वांत शेवटचे पान सर्वांत आधी वाचायचो. त्यांनी सर्व खेळांची आवड मनात निर्माण केली. तसे मी खेळलोही आणि अजूनही आवड आहे. हे सर्व विविक ह्यांच्यामुळे. त्यांच्या मी कायमच ऋणात आहे.
    - पंकज कुरुलकर, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  11. हे फारच छान लिहिलं आहे. खरंच आवडलं. करमरकर ह्यांचं वाचायला मलाही आवडायचं. त्यांचं हे शब्दचित्र सुरेख उतरलं आहे.. मनापासून, प्रांजळ, सहज.

    Thanks a lot..
    तुमचं ‘शब्दसंवाद’ वाचायला आवडेल...
    - विनय गुणे, संगमनेर

    उत्तर द्याहटवा
  12. सर्वप्रथम वि. वि. क. ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. काय सुंदर लेख लिहिला आहेस तू. मी स्वतः लहानपणी करमरकर सरांचे लेख आवर्जून वाचायचो. लिखाणाची एक वेगळीच शैली होती. भले त्यामध्ये संझगिरींसारखी आतषबाजी नव्हती; पण सामन्याचे नेमके विश्लेषण असायचे.

    तू त्यांचे स्वभाववर्णन अगदी योग्य शब्दांत केले आहे. तुझा हा लेख मला अतिशय आवडला.

    हो आणि, जाता जाता एक गोष्ट - तुला कोणत्याही पुरस्काराची आवश्यकता आहे असे मला तरी नाही वाटत. आमच्यासारख्या सामान्य वाचकांमध्ये तुझ्या लेखणीची किंमत ही कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी आहे!
    - विकास पटवर्धन, नगर

    उत्तर द्याहटवा
  13. अगदी हृद्य आठवणींचा ठेवा आहे हा. अशा मोठ्या लोकांचा सहवास तुम्हाला लाभला, हेच किती छान आहे.
    - अजिंक्य कुलकर्णी, अस्तगाव, नगर

    उत्तर द्याहटवा
  14. भन्नाट! वि. वि. क. ह्यांच्याशी माझा खूप जवळचा संबंध होता. आमच्या दादांचे ते मित्र होतेच, पण मी शाळकरी वयात असताना कबड्डी, टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजनात सहभागी असायचो. या स्पर्धांच्या बातम्या मी स्वतः लिहून त्यांना नेऊन देत असे. सुरुवातीला त्यांना वाटे की, ह्या बातम्या दादा लिहून देत असावेत. पण जेव्हा त्यांना मी लिहितो हे समजलं तेव्हा त्यांनी खूप कौतुक केलं. त्यानंतर अनेकदा भेट झाली की ते ‘पंढरीचा मुलगा’ म्हणून ओळखण्याऐवजी मला स्वतंत्रपणे ओळख द्यायचे. मी ‘लोकसत्ता’मध्ये कोथरूड अंतरंगमध्ये क्रीडाविषयक लेख लिहिला की, ते आवर्जून कॉल करायचे. छोट्या छोट्या खेळाडूंना ओळख निर्माण व्हायला मदत करतो आहेस हे चांगलं करतोस असं आवर्जून सांगायचे.

    कर्वेनगरला राहात असताना बऱ्याचदा वि. वि. क., मी, प्रताप जाधव आणि बाळासाहेब लांडगे ह्यांच्यासमवेत भरपूर गप्पा मारायचे. खेळातल्या राजकारणावर खूप गप्पा व्हायच्या. खरं तरं ते आमच्या दादांच्या वयाचे. पण चर्चेदरम्यान माझं मत, भूमिका आवर्जून विचारायचे. विशेष म्हणजे ज्यांच्या लिखाणाची स्टाईल पाहून खेळांची व क्रीडाविषयक लिखाणाची आवड निर्माण झाली, ते महान व्यक्तिमत्त्व ‘मला तुझी लिहिण्याची स्टाईल आवडते’ असं म्हणायचे. मला त्या वेळी खूप आनंद व्हायचा.

    आज तुझा ब्लॉग वाचल्यावर वि. वि. क. ह्यांची आठवण प्रकर्षाने झाली.... बाकी तुझा ब्लॉग भन्नाट आहे. आपल्या आयडॉलचा सहवास खूप कमी लोकांना लाभतो. तू त्यापैकी एक आहेस. त्यांचं लिखाण वाचून तू त्यांची कॉपी नाही केलीस, तर स्वतःची स्टाईल निर्माण केलीस. खरं तर हीच त्यांना मोठी आदरांजली म्हणता येईल...
    - प्रबोधचंद्र सावंत, पुणे

    उत्तर द्याहटवा
  15. What a unique way of paying tributes to your Guru. In fact I was a regular reader of his sports articles which used to appear in daily maharashtra times, if I recollect correctly right from 1970 or 71 when India toured west indies and later on England. I hv watched on TV sahyadri "krida Vishwa " for which he was the commentator. My heartfelt condolences to Resp. VVK.

    You are fortunate enough for having known this personality so closely and having spent many days with him in last over a decade. I must appreciate your lucid writing which I have been enjoying whenever I come across your write-ups in "Khidki".
    - Ashok Kanade, Pune

    उत्तर द्याहटवा
  16. खूप सुंदर लेख, सतीश!
    - पोपट पवार, हिवरे बाजार

    उत्तर द्याहटवा
  17. खूपच सुंदर... तुम्ही खूप भाग्यवान आहात... 👌🏻👍🏻
    - प्रसाद कुलकर्णी, पुणे

    उत्तर द्याहटवा
  18. हे क्रीडा पत्रकारिता प्रकरण मला माहीतच नव्हतं. क्रीडाक्षेत्रातील पत्रकारिता हा एक स्वतंत्र विभाग. त्यासाठी सर्व आयुष्य वेचणारे करमरकर किती महान होते हे कळलं. त्यांचा शिष्योत्तम माझ्या वाट्याला यावा, हे माझे भाग्य! सविस्तरपणे सर्व आठवणी तुम्ही जाग्या केल्या आहेत.
    - श्री. के. वनपाल, नगर

    उत्तर द्याहटवा
  19. 👌 सुंदर... अनुभव, लेखन, निरीक्षण... सतीश!!

    वि. वि. क. म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व. 🙏
    - चंद्रकांत कुटे, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  20. खूप छान... ओघवती भाषा, सहजसुंदर लेखन. गुरूंना श्रध्दांजली...
    🙏🙏
    - सुधीर चपळगावकर, नगर

    उत्तर द्याहटवा
  21. छान आठवणी. अशी माणसं पुन्हा होणे नाही.
    - अपर्णा देगावकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  22. अतिशय सुरेख आठवणी व लेख. अकृत्रिम स्नेही लाभला. खरंच भाग्यवान आहात तुम्ही.

    टाइम्स ग्रूप कुठून एवढी गुणी माणसं मिळवतो. याचं नेहमीच कुतूहल आहे. धन्यवाद! 🙏🙏
    - मिलिंद पाटील, पुणे

    उत्तर द्याहटवा
  23. खूप छान लेख! अर्थात तो प्रत्यक्ष भेटीतूनच साकार झालेला असल्याने,असेल कदाचित! 👌🏻🙏🏻
    - संजीवनी कुलकर्णी, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  24. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे क्रीडाविभाग प्रमुख व क्रीडा पत्रकारितेतील महर्षी वि. वि. करमरकर ह्यांच्या विषयीचा हृदय भारून टाकणारा लेख वाचला. मनाला भावला. कुस्तीच्या मासिकाचा संपादक असताना करमरकरांचा १९७७मध्ये माझा परिचय झाला. माझे कुस्तीविषयक अनेक लेख त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये छापले.

    मॉस्को ऑलिपिकला (१९८०) पत्रकार म्हणून मी गेलो होतो. तेथे जागतिक व ऑलिपिक कुस्तीत सात सुवर्णपदकविजेत्या आलेकझांडर मिदवेद ह्याची हिंदी बोलणाऱ्या रशियन इंटरपीटरच्या मदतीने मी मुलाखत घेतली. ती मुलाखत वि. वि. करमरकरांनी छापली होती. त्यांचा तीन-चार वर्षांपूर्वी मला फोन आला - ‘अज्ञात गांधी’ पुस्तक वाचले. खूप आवडले. कुस्तीवर लिहिणारा सुरेशचंद्र वारघडे तूच या पुस्तकाचा लेखक आहे का? होकार दिल्यावर त्यांनी माझे अभिनंदन केले.

    ‘खिडकी’मधील ह्या लेखामुळे करमरकर गेल्याचे समजले. तीव्र वेदना झाल्या. करमरकर पत्रकारितेतील आकाशीमनाचा दिलदार साक्षेपी व निर्भीड पत्रकार होते. असा पत्रकार पुन्हा होणे नाही. त्यांच्या स्मृतीस माझी भावपूर्ण हृदयांजली.
    🙏🏼💐👏🙏🏼💐👏🙏🏼💐👏
    - सुरेशचंद्र वारघडे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  25. भरपूर आठवणींनी भरलेला (भारलेला) लेख.
    👌👌
    - राजेंद्र बागडे, कोल्हापूर

    उत्तर द्याहटवा
  26. तुझी मेहनत, विषयावरील प्रभुत्व , तळमळ असे सर्व पैलू लेखात जाणवतात.
    - विनायक कुलकर्णी, पुणे

    उत्तर द्याहटवा
  27. आठवणींचा सहज सुंदर ओघ…
    👌👌👍👍❤️❤️🙏
    - सुरेंद्र धर्माधिकारी, नगर

    उत्तर द्याहटवा
  28. क्रीडा क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून क्रीडा बातम्यांना वर्तमानपत्रात अढळ स्थान मिळवून दिले, त्या ध्येयवेड्या क्रीडा पत्रकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.
    - सुरेश क्षीरसागर, नगर

    उत्तर द्याहटवा
  29. 🙏👍
    आठवणींचा हा दरवळ म्हणजे श्रद्धांजलीच्या रूपांत वि. वि. क. ह्या व्यक्तिमत्त्वावरच्या निस्सीम प्रेमाची मांडणी व मोठेपणा बाजूला ठेवून त्या व्यक्तीने आपल्यावर केलेल्या प्रेमाची कृतज्ञतापूर्वक मांडणी.
    🙏
    - श्रीराम जोशी, नगर

    उत्तर द्याहटवा
  30. सतीशराव अप्रतिम. प्रवाही लेख झालाय. उत्तम!
    - अनिल पोळ

    उत्तर द्याहटवा
  31. अप्रतिम लेख . अत्यंत नेटके शब्दचित्र . वि वि क सर मित्रामुळे कर्वे नगर परिसरात एक
    दोनदा भेटले . त्यांचा काॉमेंटरीचा आवाज, शांत संयत बोलणे, निगर्वीपणा आणि क्रिडा पत्रकार म्हणूनची कामगिरी सारे सारे डोळ्यापुढे आले. भावपूर्ण श्रद्धांजली .

    उत्तर द्याहटवा
  32. करमरकर सर खऱ्याअर्थाने मला आपल्या लेखातून कळाले. गूरूविषयी मनमोकळेपणे कृतज्ञता व्यक्त करण्यास मनाचा मोठेपणा लागतो.

    प्रामाणिकपणे, तळमळीने स्वत:ला झोकून देऊन क्रीडाक्षेत्राची पेरणी करणारे शेतकरी विरळच. आता मात्र क्रिडा क्षेत्रातही भ्रष्टाचाराची पेरणी करणाऱ्यांचा सुळसुळाट.

    श्रीराम वांढरे.
    भिंगार, अहमदनगर.

    उत्तर द्याहटवा
  33. वि. वि. क. ह्यांच्या निधनाची बातमी आज सकाळीच मित्राकडून कळली. त्यांच्या बरोबर झालेल्या दादर येथे झालेल्या भेटी आठवल्या. आपला लेख आवडला.
    - नितिन परब, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  34. सुंदर लिखाण.... वि. वि. करमरकरांच्या स्वभावातील बऱ्याच गोष्टी समजल्या. त्यांचे आणि तुमचे ऋणानुबंध किती घट्ट होते, हेही कळलं.
    - डॉ. वंदना देशमुख-चव्हाण, पुणे

    उत्तर द्याहटवा
  35. मित्रा, फारच अप्रतिम. एका गुणवान पत्रकाराने त्याच्या कर्तृत्ववान गुरूस वाहिलेली सच्ची सुमनांजली! असेच लिहीत जा.
    - प्रवीण जोशी, पुणे

    उत्तर द्याहटवा
  36. लेखनात जिव्हाळा ओतप्रोत भरलेला जाणवत होता वाचताना. ऐंशीच्या दशकात मुंबईत होतो. प्रकाश अकोलकरबरोबर त्यांच्या मोघे बिल्डिंगमध्ये एक दोनदा गेलो होतो आणि एकदा रात्री पावभाजी खायला व्ही.टी.समोर. पण त्यांचे लिखाण अधिक वाचले गेले. तुम्ही छानच लिहिले आहे.
    - प्रमोद तेम्ब्रे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  37. करमरकर यांच्यावरील तुमचा लेख अतिशय हृद्य आहे. माझ्या सुरुवातीच्या काळात मी अनेकदा म. टा.मध्ये जात असे. त्या वेळी त्यांना आवर्जून भेटत असे. मनमोकळ्या गप्पा ते मारत. त्यांचे हसू अत्यंत निरागस असे. खूप छान वाटायचं त्यांना भेटल्यावर.
    - प्रशांत कुलकर्णी, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  38. वि.वि.क. ह्यांच्यावरचा तुमचा हॄद्य लेख वाचला. काही माणसे देव स्वतःच्या हाताने खास अशी बनवतो. त्यातील एक वि.वि.क. होते हे लेख वाचून पक्के झाले. वाटीभर उपीट आणि ढीगभर आभार हे कॄतज्ञतेचे लक्षण असते. आणि उरलेले पाच रुपये न नाकारता खिशात टाकणे हा व्यवहार ! भावना आणि व्यवहाराची अशी मनोज्ञ सांगड घालणे भल्याभल्यांना जमत नाही. असो. लेख खूप आवडला. शेअर केल्याबद्दल धन्यवाद. असेच लिहित राहा. शुभेच्छा.
    - प्रा. पुरुषोत्तम रामदासी

    उत्तर द्याहटवा
  39. लेख आवडला. छोट्या छोट्या प्रसंगातून तुम्ही वि. वि. क. ह्यांचं व्यक्तिमत्त्व कसं होतं याची ओळख करून दिली आहे. - मुकुंद नवरे

    उत्तर द्याहटवा
  40. Thanks dear Satish. You had a very important member of sports as a friend. Congrats.
    - Vinayak Khandkar

    उत्तर द्याहटवा

  41. छान आहे लेख!
    तुम्ही अनेक बारकावे , कंगोरे, पैलू सहज बोलता बोलता सांगावेत असे सरळ ,सोपं वर्णन केले आहे

    करमरकर आडनावाला साजेशी अशी हिशेबी वृत्ती. एकही काना मात्रा नसलेल्या आडनावाप्रमाणे स्पष्ट वर्तणूक तुम्ही सुरेख चितारली आहे.
    - स्वाती वर्तक

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...