मंगळवार, ५ मे, २०१५

कन्फेशन

The end of confession is to tell the truth to and for oneself.
- J. M. Coetzee

Perhaps confession saves the soul
but it ruins the reputation.
- Thomas Dewar

उद्धट, बेमुर्वतखोर, माजोरडे, भाडं नाकारणारे, अडवणूक करणारे, अडवून दामदुप्पट उकळणारे, खोटं बोलणारे, लुबाडणारे... अगदी सगळ्याच नाही; पण बहुतांश रिक्षाचालकांबद्दलचं हे मत. पूर्वग्रहदूषित नाही! अनुभवातून आलेलं, इतरांच्या बोलण्या-अनुभवण्यातून बनलेलं हे मत. त्याला कधीकधीच तडा जातो.

रिक्षावाल्यांनी काहीही भाडं सांगावं आणि आपण ते (नाइलाजानं) मान्य करावं. एके काळी सोलापूरसारख्या शहरात मीटरप्रमाणेच रिक्षा धावे. गेल्या पाव शतकात त्यात मोठा बदल झालेलाय. बसण्याआधीच भाडं ठरवून घ्यावं लागतं. तिथं चार महिन्यांपूर्वी गेलो, तर `सीट'प्रमाणं वाहतूक करणाऱ्या रिक्षावाल्यानं सकाळी सकाळी 125 रुपये भाडं सांगितलं. त्यानंतर 15 मिनिटांनी मिळालेल्या रिक्षानं मी इच्छित स्थळी 15 रुपयांत गेलो. तरीही तिथं पोहोचल्यावर रिक्षावाल्यानं `तुमच्या खुशीनं द्या काही तरी' म्हणत जास्तीचे पाच रुपये उकळलेच. पुण्यात रात्री साडेदहा वाजता मंडईतून शिवाजीनगर बसस्थानकावर सोडून रिक्षाचालक उघडपणे दीडपटीनं भाडं घेतो आणि जणू आपल्याच अंगावर थुंकल्यासारखं गुटक्याची पिचकारी मारत वर सुनावतो, `करा काय करायचंय ते.' नगरमध्ये रात्री 12 वाजता दोन किलोमीटरसाठी रिक्षावाले 90 रुपये सांगतात आणि नंतर `सत्तरच्या खाली येणार नाही' असं खुशाल सांगतात.

अलीकडेच औरंगाबादला गेलो होतो. आम्ही तिघं होतो. बाबा पेट्रोलपंपाच्या थांब्यावर उतरलो. बसचं दार उघडून खाली पाय टाकेपर्यंत रिक्षाचालकांचा गराडा पडलेला. बसमधून उतरल्या उतरल्या रिक्षा करायला मला कधीच आवडत नाही. कारण हे रिक्षावाले गराडा घालून, जोरजोरात बोलून गोंधळवून टाकतात. काही जण तर अंगचटीला आल्याइतके जवळ येतात. आपण बसच्या गतीतून सावरून तिथल्या गतीशी जुळवून घेण्याआधीच ते नव्या चक्रात अडकवतात. बसमधून उतरावं, पाच-पन्नास मीटर चालत जावं आणि मग बस पकडावी किंवा रिक्षा करावी, असं मी तरी करतो. कारण तोवर अंदाज आलेला असतो.

पण त्या दिवशी तशी संधीच मिळाली नाही. बरोबरच्या दोघांनी एका रिक्षावाल्याशी बोलणी सुरूही केली. आधी 70 रुपये सांगून तो लगेच 60 रुपयांवर उतरला. त्या बरोबर मी 50 देण्याची तयारी दाखवली; ती भीतभीतच. कारण जायची जागा मला त्या वेळी नेमकी किती अंतरावर आहे, हे आठवत नव्हतं. ती रिक्षा नाकारून दोन पावलं पुढं आलो की, दुसऱ्यानं हटकलं. तेच स्थळ, तेच भाडं, तीच घासाघीस. पन्नास रुपयांचा हट्ट सोडून त्याचं 60 रुपये भाडं मान्य केलं. दूध डेअरीपासून वळून रोपळेकर हॉस्पिटलजवळ सोडायचं त्यानं मान्य केलं.

माझ्या बरोबर असलेल्या दोघांनाही नेमका पत्ता माहीत नव्हता. रिक्षा सुरू झाल्यावर दोन-पाच मिनिटांत त्यातल्या एकानं तिथं घरी नातेवाइकाला फोन करून पत्ता विचारला. तो रिक्षाचालकाला सांगितल्याबरोबर त्याचा सूर बदलला. "काय राव, एवढ्या आत जायचंय हो! आधी सांगायचं नाही का?'', अशी कुरकुर करीत तो हलक्या आवाजात काही तरी पुटपुटला. त्या बरोबर त्याला म्हणालो, "भाऊ, तुला नाही परवडत तर सोड इथं आम्हाला. घे रिक्षा लगेच बाजूला.'' मी वैतागलो होतो. एक तर तिथनं रिक्षा नको म्हणत असताना बरोबरच्या दोघांनी केली, त्याला नीट पत्ताही नाही सांगितला आणि आता अपेक्षेप्रमाणं रिक्षाचालकाची `दादागिरी.'

थांबायला सांगूनही चालकानं रिक्षा थांबवली नाहीच. तो चालवतच राहिला. तोंडातल्या तोंडात काही तरी पुटपुटत राहिला. आधी सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा गेल्यावर त्यानं मग नंतर सांगितलेल्या ठिकाणाकडं वळवली. उल्कानगरी वगैरे नाव होतं त्या भागाचं. त्या परिसरात गेल्यानंतरही घरी पोहोचण्यासाठी डावीकडं वळायचं की उजवीकडं, पहिल्या रस्त्यावरून आत घालायची रिक्षा की दुसऱ्या गल्लीतून, हे नक्की माहीत नव्हतं. माझे सोबतीही गोंधळलेले. ते म्हणत होते - `नाही, नाही. मागच्या वेळी याच गल्लीतून गेलो होतो.' `मला नक्की आठवतंय. पुढच्या रस्त्यानं आत गेलो होतो...'

एव्हाना रिक्षाचालक वैतागलेला आणि मी कावलेला. जोरात ओरडून म्हणालो, `फोन करून विचारून घ्या, नक्की कुठल्या रस्त्यानं वळायचं ते.'

एव्हाना सोबत्यानं फोन लावला आणि चालकानं रिक्षा थांबविली. मी खाली उतरलो, त्याच क्षणी रिक्षाचालक हळूच म्हणाला, "गरिबावर कुणीही जोरच करतं." आधी ते नीटसं ऐकू आलं नाही. म्हणून त्याला विचारलं, "काय म्हणालात दादा?"

तसाच मवाळ सूर ठेवत तो म्हणाला, "गरिबाला कुणीही जोरातच बोलतं दादा. तुमच्या माणसांनी पत्ता नीट सांगितला नाही. आणि तुम्ही लगेच रिक्षा थांबव म्हणालात, साहेब. उतरून चालला होता.''

आधी त्याच्याशी वाद घालायच्या बेतात होतो. पण त्याचं ते मवाळ बोलणं ऐकून म्हणालो, "बाबा रे, मी काही तुझ्यावर जोर नव्हता केला. तू कुरकूर करायला लागलास म्हणून म्हणालो, `तुला परवडत नाही, तर थांबव रिक्षा.' तू पोटासाठी रिक्षा चालवतोस माहितीय मला. तुझ्यावर मी काय जोर करणार? आणि जोर करायचाच म्हणलं तर अजून करून दाखवतो बघ. पण मला नाही जमत ते. परवडलं तर ने असंच माझं म्हणणं होतं.''

तेवढ्या एका मिनिटात नेमकी गल्ली समजली होती. त्या रिक्षावाल्याला माझा सोबतीही म्हणाला, ``भाऊ, जास्त पैसे देतो तुला. पण आता कुरकुरू नकोस.''

आमच्या सोबत्यांनी सांगितल्या ठिकाणापासून इच्छित स्थळ दीड-दोन किलोमीटर आत होतं. एकदाचं घर सापडलं. रिक्षा थांबली. खिशातून शंभराची नोट काढली. ती चालकाच्या हातात देत म्हणालो, ``तुला किती घ्यायचेत तेवढे पैसे घे दादा. नाराज नकोस होऊ.''

रिक्षाचालकानं खिसे चाचपले. तो 80 रुपये घेईल, असा अंदाज केला होता. आणि आता त्याबद्दल वादही घालायचा नव्हता. चूक आमचीच होती, हे मनानं मान्य केलं होतं. त्याबद्दलची नाराजी संबंधितांना चेहऱ्यावर कधीचीच दाखवून झाली होती. चालकानं शर्टाच्या खिशातून एक विसाची, एक दहाची नोट काढून दिली. मग पँटचे खिसे चाचपले आणि त्यातून काही नाणी काढली. ती रक्कम माझ्या हातात ठेवली.

मी विसाची नोट घेतली आणि बाकीचे पैसे रिक्षाचालकाकडं परत देत म्हणालो, ``दादा, एवढे नकोत. तूच सांग, तुला कमी पडले नाहीत ना? योग्य पैसे मिळाले ना तुला? नाराज नाहीस ना तू?" त्यानं मुकाटपणे ते परत दिलेले पैसे खिशात ठेवले.

अंगात खाकी कोट चढवललेल्या, दाढीचे खुंट वाढलेल्या त्या तरुण पोराचा चेहरा बघता बघता पडला. गालफाडं आत गेलेला त्याचा चेहरा कसनुसा दिसू लागला. त्याच्या पाठीवर थोपटत असतानाच त्याचे डोळे भरून आले. एवढ्या तरण्या पोराच्या डोळ्यांत सकाळी सकाळीच अश्रू? बघून कसं तरीच झालं. त्याला विचारलं, ``कमी दिले का पैसे? दादा, तू पोटासाठीच रिक्षा चालवतोस, हे मान्यंय रे बाबा. तुला नाराज करून बरं नाही वाटणार.''

डबडबलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला, ``पैशाचं काही नाही हो साहेब. बाकीची मजबुरी आहेच की. तुम्हाला तरी ती सांगून काय उपयोग!''

डोळ्यांतून पाणी गळत असतानाच चालकानं रिक्षा वळवली. तो निघून गेला. जाता जाता त्याच्या रिक्षाचा क्रमांक मनात टिपून ठेवला.

एक तरणाबांड रिक्षावाला रडतो? तेही आपल्यामुळं? बरं नाही वाटलं. हे काही पटलं नाही त्या दिवशी.

त्या गोष्टीला आता तीन आठवडे झाले. त्याच्या रिक्षाचा क्रमांक विसरून गेलो. आणखी एक इंग्रजी वचन - It's easier to say, "I don't remember" when you're wrong.

पण तीन आठवड्यानंतरही विसरला नाही तो त्याचा चेहरा - तो अजूनही दिसतो, खप्पड, खंगलेला, डोळ्यांतून पाणी येणारा. `मजबुरी आहे' असं सांगणारा त्याचा ओला -हळवा, दुबळा आवाज!


(जाता जाता आणखी एक - अगदी सुरुवातीला दोन आणि मजकूर संपता संपता एक, अशी तीन इंग्रजी उदधृतं आहेत. ती काही मला सहज आठवलेली नाहीत. या मजकुरासाठी इंटरनेटवरून ती प्रयत्नपूर्वक शोधली आहेत.)

1 टिप्पणी:

  1. तुमचा हा लेख एकदा नव्हे दोनदा वाचला. आम्हा मुंबईकरांना असे अनुभव नवीन नाहीत. तरी तुम्हाला भेटलेल्या त्या रिक्षावाल्याची अवस्था समोर ठेवण्यात तुम्ही यशस्वी झालात.
    मंगेश नाबर

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...