रविवार, १७ मे, २०१५

`त्यौहार` मस्ट गो अॉन...

चैत्र सुरू झाला की, गावोगावच्या यात्रा-उरूस सुरू होतात. असाच एक उरूस गेल्या आठ वर्षांपासून भारतात सुरू आहे. `आयपीएल` म्हणून ओळखला जातो तो. यात्रेला जत्राही म्हणतात. उरूस काय, यात्रा काय नि जत्रा काय - म्हणजे खा-प्या-मजा करा. `आयपीएल` म्हणजे पण जत्रा. कारण त्यात दर वर्षी दिसताहेत भानगडी सत्रा.

ही `आयपीएल` म्हणजे खेळापेक्षा मनोरंजन अधिक अशीच परिस्थिती बनलीय. चेंडूमागे झुकणारं हे किंवा ते पारडं, संभाव्य यशाचे वजन कधी या तागडीत, तर पुढच्याच चेंडूला त्या तागडीत. क्षणाक्षणाला ताणली जाणणारी उत्सुकता. आनंदाची लहर आणि दुःखाचा कहर. आशा-निराशेचे (कृत्रिम) हिंदोळे. त्यावर झुलणारे कोट्यवधी बघे. जल्लोषाचे चित्कार आणि अपेक्षाभंगाचे फुत्कार. सगळं काही सिनेमॅटीक. एखाद्या कुशल दिग्दर्शकाने गल्ल्यावर डोळा ठेवून साकारावं, अगदी तसंच नाट्य. मस्त रंगलेला रंगमचीय आविष्कार. साडेतीन-चार तासांचं नाटक. कातीव आणि बेतीव. `माहितीरंजन` (इन्फोटेनमेंट) असतं ना, तसं हे `क्रीडारंजन`!

पण खेळ तर मनोरंजनासाठीच असतात ना? प्रत्यक्ष खेळात सहभागी होणाऱ्यांनाच काय ते शारीरिक कष्ट करावे लागतात. व्यायाम त्यांचाच होतो आणि तंदुरुस्तीचा कस त्यांचाच लागतो. प्रेक्षक आलेले असतात ते त्यांचं क्रीडा-कौशल्य बघायला. त्यांना दाद द्यायला. त्यातून रंजन करून घ्यायला. मान्य आहे. पण ते तेवढंच असतं? प्रेक्षकांमध्ये काही नवोदित होतकरू खेळाडूही असतात, प्रतिस्पर्धीही असतात आणि त्या स्पर्धेत स्थान न मिळालेलेही खेळाडू असतात. मैदानात चाललेल्या घडामोडींपासून ते काही शिकत असतात, डावपेच आत्मसात करीत असतात. सगळेच काही केवळ रंजनासाठी जमलेले नसतात.

ढोल वाजवत, भुईनळे उडवत, रंग उधळत `ये है इंडिया का त्यौहार` गात नाचणं हे `आयपीएल`चं ब्रीद आहे. या स्पर्धेतला चोपनावा सामना शनिवारी, 16 तारखेला झाला. साखळीतले अखेरचे दोन सामने रविवारी आहेत. या स्पर्धेतल्या `प्ले-अॉफ`च्या टप्प्यात खेळणारे चारपैकी तीन संघ या शेवटच्या तीन सामन्यांमधून ठरले. केवढी ही चुरस, केवढं हे कौशल्य! बहुसंख्य संघ अगदी एकसारख्या ताकदीचे. शेवटच्या चारांमध्ये जागा मिळविण्यासाठी केवढी त्यांची धडपड. कागदावरचे निकाल पाहून असं वाटणं स्वाभाविक आहे. स्पर्धेतले सुरुवातीचे पाच सामने जिंकणारे राजस्तान रॉयल्स आणि पहिले चारही सामने हरणारा मुंबई इंडियन्स संघ, या दोन्ही संघांना `प्ले-अॉफ`मध्ये जागा मिळणार का नाही, हे त्यांच्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात ठरावं. केवढा हा योगायोग! केवढी चित्तचमत्कारी अनिश्चितता!! त्याबद्दलचं जुनं समर्थन तयारच आहे - `Cricket is a game of glorious uncertainties!`

या अनिश्चिततेची जाऊ द्यात; पण चमत्कारांची अनेक उदाहरणं `आयपीएल`च्या वेगवेगळ्या टप्प्यात दिसली आहेत. संघातून स्थान गमावलेला एखादा खेळाडू 15-16 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून घेतला जातो. तो एखाद्याही सामन्यात चमकताना, संघाला जिंकून देताना दिसत नाही. तरीही त्याची किंमत एवढी? स्पर्धेच्या लिलावातला सर्वांत महागडा खेळाडू तो? एखाद्या स्टार खेळाडूला 22-23 कोटी रुपये देऊन लिलावातून आपल्या संघात खेचून आणलं जातं. आणि नंतर मग स्पर्धेतले 10-12 सामने त्याला खेळवलंच जात नाही. मग ही गुंतवणूक त्याच्या कौशल्यासाठी झालेली असते की आणखी कुठल्या कारणासाठी, हा प्रश्न उभा राहतोच ना. एखाद्या जिम्नॅस्टला लाजवील अशी कसरत करीत कोणी तरी अफलातून झेल घेतो आणि त्यानंतर दोन-तीन चेंडू झाल्यावर तोच महाभाग हातात आलेला लोण्याचा गोळा मातीमोल करताना दिसतो. `जिंकता जिंकता सामना कसा हरावा,` हे पूर्वी भारतीय संघाचं वैशिष्ट्य होतं. ते आता `आयपीएल`मधल्या कोणत्याही संघाला लागू पडतं. सामन्याच्या पहिल्या 15 षटकांमध्ये आपणच केलेल्या कामगिरीवर शेवटच्या पाच षटकांमध्ये बोळा फिरविण्याचं काम एखादा संघ हरेक सामन्यात करीत असेल, तर त्याचं हे `कर्तृत्व` `glorious uncertainties`मध्ये नक्कीच मोडत नाही.

याच स्पर्धेतील शुक्रवारचा सामना पाहिला. संघ होते सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर. या सामन्यावर पावसाचं पाणी पडलं. त्यामुळे तो काही ठरल्या वेळी सुरू झाला नाही. शेवटी त्याला मुहूर्त लागला तो रात्री साडेदहा वाजताचा. सामन्याची षटकं ठरली वीसऐवजी अकरा. मग पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाचा डाव संपताना पुन्हा पाऊस आला. पाऊस पडत असताना सामना कसा सुरू ठेवता, अशी काहीशी तक्रारही बंगळूरचा कर्णधार विराट कोहलीनं केली. पण पंचांनी तो डाव तसाच पुढं रेटला. मैदानात परतताना दिनेश कार्तिक एका पंचाशी तावातावानं बोलताना दिसला. त्याच्या रागाचं कारण बहुतेक हेच असावं. पावसाच्या सरी येतच राहिल्या. मग दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या बंगळूरचा डाव सहा षटकांचा करण्यात आला. म्हणजे चाळीस षटकांचा सामना झाला फक्त 17 षटकांचा.

सामना सुरू असताना मैदानाची स्थिती अतिशय खराब असल्याचं दिसत होतं. क्षेत्ररक्षक घसरत होते, टप्पा पडल्यावर चेंडू हळू जात होता, गोलंदाजाला प्रत्येक वेळी चेंडू नॅपकीननं पुसून घ्यावा लागत होता. पहिल्या डावातलं शेवटचं षटक टाकणाऱ्या स्टार्कचे हात पावसाच्या सरीमुळे ओले झाल्याचे टीव्ही.च्या पडद्यावरही स्पष्ट दिसत होतं. अशा परिस्थितीत सामना खेळवण्याचा अट्टहास कशासाठी, कुणासाठी होता?

प्रश्न एका सामन्याचा नाहीच मुळी. प्रश्न अनेक आहेत. या स्पर्धेमुळे निर्माण केलेले आणि त्यांची उत्तर न मिळालेले. किंबहुना या प्रश्नांची उत्तरं देण्यास टाळाटाळच केली जात असल्याचं वारंवार दिसतंय. त्या ऐवजी मग आपल्याला थेट अमिताभ बच्चन मुंबईला मैदानात पाहायला मिळतो. राजस्तान रॉयल्सचे काही खेळाडू फिक्सिंगमध्ये थेट अडकल्याचं दिसल्यावर त्याच वर्षाच्या अंतिम सामन्यात त्या प्रकाराबाबत `ब्र`ही न उच्चारता `आयपीएल`चं गुणगान करणारा सचिन तेंडुलकर दिसतो.

मयप्पन, चेन्नई सुपरकिंग्ज, राजस्तान रॉयल्सचे फिक्सिंगमध्ये अडकलेले खेळाडू, यंदा फिक्सिंगची अॉफर आल्याची तक्रार करणारा खेळाडू, ललित मोदी, शशी थरूर, सुनंदा पुष्कर, कोची टस्कर...ही यादी मोठी आहे. त्या प्रश्नांच पूर्ण निराकरण करणारी उत्तरं मिळाली नाहीत, कदाचित मिळणारही नाहीत.

तरीही `आयपीएल` सुरूच आहे. कारण `Show must go on...` अगदी त्याच चालीवर `त्यौहार मस्ट गो अॉन` कारण सोपं आहे. प्रश्न खेळाचा नाही. त्यातल्या हितसंबंधांचा आहे. मोठ्या बाजारपेठेचा आहे. जाहिरातदारांचा आहे आणि भांडवलदारांचा आहे. त्यात गुंतलेल्या पैशांचा आहे. पैसा मोठा नि खेळ खोटा!

२ टिप्पण्या:

  1. ही आय पी एल चालू आहे ( सुरूच आहे हे बरोबर नाही !) त्यात आपल्याकडील क्रिकेट संपले आहे हे समजावे. सचिन, गावसकर, शास्त्री, द्रविड हे सारे एका माळेचे मणी ! तुम्ही लिहा आणि आम्ही वाचतो. पण आय पी एल पहाण्याचे नाव घेणार नाही.
    मंगेश नाबर

    उत्तर द्याहटवा
  2. क्रिकेट ' खेळ ' नाही तर " गेम " आहे.

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...