जुनागढ़चं बाहेरून दर्शन |
'राजा और रंक'मध्ये कुमकुमचं गाणं आहे. ती दरोगाबाबूला 'चली आयी हूँ मैं अकेली बीकानेर से' असं सांगताना खूप वेळा ऐकलं. 'बिकानेर मिष्ठान्न भांडार' असे फलक नगरसह अन्य शहरांत पाहिले. तिथल्या
भुजियाबद्दल ऐकलेलं. बिकानेरशी संबंध एवढाच.
'पधारो म्हारे देस...' असं आमंत्रण राजस्तानातून कधी कुणाकडून आलं
नाही. पण वर्ष संपता संपता निर्मल थोरात ह्यानं सोबत म्हणून चलायला सांगितलं.
बिकानेरला जायचं. तिथं नव्या वर्षात संकल्पची आंतरविद्यापीठ सायकलिंग स्पर्धा
होती. त्याच्या दोन सायकली, त्यांची चाकं हे सगळं नेण्यासाठी निर्मलनं स्वतःची गाडी
काढली. त्यात जागा होती म्हणून 'चल' म्हणाला. गाड्याबरोबर नळ्याची (बिकानेर) यात्रा.
धुळ्याहून
मुंबई-आग्रा रस्त्याने मंदसौरमार्गे (आणि इंदूरला बाजूला सोडून) जायचं, असा मार्ग आमचे
सारथी वामन ह्यांनी ठरवलेला. त्यांचा नेहमीचा रस्ता. असा प्रवास म्हणजे रस्त्यात
स्थानिक खासीयत चाखणं, शक्य होईल ते पाहाणं आणि फोटो काढत राहाणं, ही त्रिसूत्री
ठरलेली. त्यानुसार जाण्याच्या मार्गावर कुठं काय खायला मिळेल, हे इंटरनेटवर पाहून
ठेवलं.
वर्षाच्या शेवटच्या
दिवशी सकाळी सहाचा मुहूर्त ठरला खरा; पण आम्ही नगर सोडलं
आठ वाजता. येवले पार केल्यावर मनमाडच्या अलीकडे अंकाई-टंकाई जोडकिल्ले खुणावत
होते. अंतर तब्बल बाराशे किलोमीटरचं आणि मुख्य उद्देश स्पर्धा, ह्या दोन कारणांमुळे
तिथं थांबणं शक्य नव्हतं. साजिऱ्या दिसणाऱ्या किल्ल्यांना दुरूनच पाहून समाधान
मानलं. दुपारची क्षुधाशांती धुळ्याजवळच्या सोनगीर फाट्यावरील 'सुरभि'मध्ये केली. जेवण चांगलं
मिळालं; पण खान्देशी भरीत-कळण्याची भाकरी नसल्यामुळे
निराशाच झाली. (ह्या खाद्यभ्रमंतीवरचा लेख इथं वाचा; जाता, जाता...खाता, खाता - https://lajzat.wordpress.com
मंदसौरला
पशुपतिनाथाचं मंदिर आहे. काठमांडूनंतर फक्त तिथेच. त्या देवस्थानाच्या धर्मशाळेत
मुक्काम. उत्तर भारतीय थंडीनं आपली चुणूक दाखवायला मध्य प्रांतातच सुरुवात
केली होती. शहराच्या थोडं बाजूला असलेल्या धर्मशाळेत लगेच जागा मिळाली. आठ-दहा माणसं
मावतील अशी प्रशस्त खोली. पांघरायला रजया आणि गीझरही. बारा तास गाडीत बसलेल्या
माणसांना अजून काय हवं? आणि हो, खोलीचं रात्रीचं
भाडं २०० रुपये!
पहिल्या दिवशी बऱ्यापैकी अंतर कापलं होतं. बिकानेरमुक्कामी पोहोचायला दुसऱ्या
दिवशीसाठी ५५० किलोमीटरचा प्रवास बाकी होता. सकाळी लवकर उठून नयागांव इथं नाश्त्यासाठी
थांबलो - पोहे-समोसा-जिलबी. तिथं गंमत झाली. वामनकाकांनी 'एक जलेबी' अशी ऑर्डर दिली. अर्धवट
झोप झालेला मालक वैतागला. 'एक नही मिलेगी। कम से कम दो लेना पडेगा।' असं म्हणाला. समजुतीतला
घोटाळा नंतर लक्षात आला. आपल्या पद्धतीनुसार आम्ही एक प्लेट मागत होतो नि त्याला
एक वेढा वाटला.
चांगल्या फोटोचं श्रेय कॅमेऱ्यालाच! |
निम्बाहेडा सोडल्यानंतर राजस्तानची हद्द लागली. डोक्यातलं राजस्तान डोळ्यांना
दिसत नव्हतं. सगळीकडे हिरवंगार. ब्यावर सोडल्यानंतरही दोन-तीन ठिकाणी मोठ्या
प्रमाणात पाणी दिसलं. चित्तोडगडनंतर अहमदाबाद-दिल्ली
राष्ट्रीय महामार्ग पकडला. कापडासाठी प्रसिद्ध असलेलं भिलवाडा रस्त्याच्या बाजूनंच
होतं. जागोजागी उड्डाणपुलांचं काम
चालू. त्यामुळे वेळेचा-वेगाचा अंदाज चुकू लागला.
या रस्त्यानं
बिकानेरला जायचं म्हणजे अजमेर आणि पुष्कर ओलांडून जावं लागणार. ऐन दुपारी,
गर्दीच्या वेळी, भर वस्तीतून. त्या ऐवजी ब्यावरवरून आतल्या रस्त्यानं मेडता, नागौर
इथून जायचं ठरलं. त्या रस्त्यानं परीक्षाच घेतली. काही भाग चांगला, काही खराब.
मध्येच घाट. शिवपुरा घाट तर परीक्षा पाहणाराच. ब्यावरजवळ सिमेंटचे कारखाने असलेलं
एक गाव. महामार्गावर जेवायला थांबलो आणि अजून एकसुद्धा नाही वाजला, म्हणून तसंच
निघालो. ब्यावरच्या पुढे एकही चांगला ढाबा, हॉटेल दिसलं नाही.
सकाळच्या पोहे-समोसा-जिलबीनं दिवसभर आधार दिला. असो!
वर्षाचा पहिलाच दिवस कंटाळवाण्या प्रवासाचा. जाताना नागौरला रस्त्याच्या
कडेलाच असलेलं सुंदर उद्यान दिसलं. संध्याकाळ सरून रात्र सुरू झाली आणि कसंबसं
आम्ही बिकानेरमध्ये दाखल झालो. दीर्घ प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यानंही परीक्षा
घेतली. शहरातले गल्ली-बोळ पार करीत कसंबसं जाट धर्मशाळेत पोहोचलो. बाहेरून अतिशय
छोटी वाटणारी ही धर्मशाळा मोठी आहे. साध्या खोल्यांपासून वातानुकूलित
खोल्यांपर्यंत; दोन माणसांसाठी आणि दहा जणांसाठीही. माणशी २५० रुपये एवढा अल्प दर.
जिल्ह्यातील जाट समाजाने अगदी ५०० रुपयांपासून देणग्या देऊन हमरस्त्यावर ही वास्तू
उभी केली आहे. तीन-चार जानेवारीला राज्य सरकारच्या भरतीसाठी मोठी परीक्षा होती.
त्या दिवशी तर तिथं जागाच नव्हती. गावावरून गाड्या करून आलेली आठ-दहा तरुण पोरं
एकाच खोलीत पथारी टाकून राहिली.
पहिल्या रात्री पटकन दिसलेल्या, जवळ असलेल्या 'नागणाराय होटल एण्ड
रेस्टोरेन्ट'मध्ये जेवलो. चांगलं जेवण होतं. गल्ल्यावर बसलेल्या जयपालसिंह भेलू यांनी चौकशी
केली. महाराष्ट्रातून आलो म्हटल्यावर ते जरा खुलले. कारण कळलं. ते आठ-दहा वर्षं मुंबईत
होते. मराठी माणसांबद्दल त्यांचं चांगलंच मत. परप्रांतीय म्हणून कुणाचा त्रास झाला
नाही. त्रास दिला तो आमच्याच माणसांनी, असं त्यांनी सांगितलं. कौटुंबिक कारणामुळं ते
राजस्तानात परतले.
धुके दाटले... |
घेवरचा महिना |
राजस्तानात पाहण्यासारखं खूप काही आहे. बिकानेरमध्येही. दुसऱ्या दिवशी चौकशी
करून लालगढ़ व जुनागढ़ पाहायचं ठरवलं. चौकशी करत जुनागढ़पर्यंत पोहोचलो. तिथलं
सारं व्यवस्थापन राजघराण्याच्या ट्रस्टचं आहे. प्रवेशशुल्क ५० रुपये. पाहण्यासारखं
भरपूर. आम्ही तिथं जेमतेम दोन-अडीच तास होतो. जुनागढ़, त्यातली सारी दालनं, वास्तुकला, अफलातून
नक्षिकाम हे सगळं बारकाइनं नि निवांत पाहायला, त्याची मजा चाखायला दिवसही कमीच
पडेल.
त्या दिवशी ती राज्य सरकारची परीक्षा दुपारी संपल्यावर अनेक उमेदवार मोठ्या संख्येने आले होते. परदेशी पर्यटकांचाही गट होता. आत जाण्यापूर्वीच धिप्पाड देहयष्टीचे आणि भरदार पांढऱ्याशुभ्र मिशांचे दीपसिंह दिसले. बाहत्तरीचे दीपसिंह इथं पर्यवेक्षक म्हणून काम करतात. तिकीटबारीजवळच खुर्ची टाकून बसलेले असतात. त्यांनी चौकशी केली आमची. 'अहमदनगर' असं सांगताच त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सैन्यातून निवृत्त झालेले सुभेदारसाहेब तीन-साडेतीन वर्षं नगरच्या एम. आय. आर. सी.मध्ये होते. त्यांच्या भरभक्कम हातात हात देत पुन्हा येण्याचा शब्द आम्ही दिला.
त्या दिवशी ती राज्य सरकारची परीक्षा दुपारी संपल्यावर अनेक उमेदवार मोठ्या संख्येने आले होते. परदेशी पर्यटकांचाही गट होता. आत जाण्यापूर्वीच धिप्पाड देहयष्टीचे आणि भरदार पांढऱ्याशुभ्र मिशांचे दीपसिंह दिसले. बाहत्तरीचे दीपसिंह इथं पर्यवेक्षक म्हणून काम करतात. तिकीटबारीजवळच खुर्ची टाकून बसलेले असतात. त्यांनी चौकशी केली आमची. 'अहमदनगर' असं सांगताच त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. सैन्यातून निवृत्त झालेले सुभेदारसाहेब तीन-साडेतीन वर्षं नगरच्या एम. आय. आर. सी.मध्ये होते. त्यांच्या भरभक्कम हातात हात देत पुन्हा येण्याचा शब्द आम्ही दिला.
पर्यंटकांच्या गटासाठी ट्रस्टने 'गाईड'ची सोय केली आहे. पण
पंचवीस-तीस जणांना तो एकटा काय सांगणार? आणि त्याचं ऐकण्यात
रसही खूप कमी जणांना! तुलनेने परदेशी पर्यटक लक्ष देऊन पाहत होते आणि
ऐकतही होते. आम्ही फिरत फिरत पाहू लागलो. आम्हा पंधरा-वीस पर्यंटकांबरोबर गाईड इंदरसिंह राठोड (संपर्क +९१ ७८९१४ १०२५७) आले. ट्रस्टचे
गाईड ते. पहिल्या काही मिनिटांतच त्यांनी मला हेरलं. नाव-गाव चौकशी केली. मग
प्रत्येक ठिकाणी ते 'कुलकर्णी जी' अशी हाक मारू लागले,
माहिती देऊ लागले. नंतर 'निर्मल जी' नावाचाही जप सुरू झाला. प्रत्येक ठिकाणचं वर्णन ते करत
होते, ते जणू काही आम्हा दोघांसाठीच.
बाहेर पडताना या माणसाला काही तरी द्यावं लागणार. तशी अपेक्षा असल्याशिवाय का
तो आपल्याला एवढा जपतो, हे मनात आलंच. मध्ये एक-दोन वेळा त्यांना टाळण्याचाही
प्रयत्न केला. साठीजवळ आलेले इंदरसिंह आवर्जून आमची वाट पाहत थांबत. एक-दोन ठिकाणी
त्यांनी आमचे फोटोही काढले. मग त्यांना टाळण्याचा विचार सोडला.
बाहेर पडताना इंदरसिंह यांना विचारलं, काही अपेक्षा आहे का? अतिशय प्रांजळपणे
त्यांनी सांगितलं, तुमची इच्छा; आग्रह नाही. जेवढं दिलं तेवढ्याचा त्यांनी मान ठेवला आणि
पुन्हा येण्याचं आमंत्रण दिलं. हा लेख लिहिताना थोडा समजुतीचा गोंधळ झाला म्हणून
त्यांना फोन केला. नाव आणि गाव सांगितल्यावर 'कोई तकलीफ नाही' म्हणत ते बोलले.
बिकानेर संस्थानाचे संस्थापक राव बिकाजी, महाराजा गंगासिंह (पहिले
व दुसरे), कर्णीसिंह यांचा हा
जुनागढ़ किल्ला. महाराजा कर्णीसिंह म्हणजे आंतरराष्ट्रीय नेमबाज. ऑलिम्पिकमध्ये
भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या या महाराजांच्या नावाने 'शूटिंग रेंज'ही आहे.
फारसं फिरलो नाही, तरी शहर म्हणून बिकानेरचा तसा ठसा उमटत नाही. उघडी गटारे,
रस्त्याच्या कडेला कचरा, छोटे बोळ, चहाच्या आणि समोसे-कचोरीच्या टपऱ्या असं दिसतं.
मोकाट फिरणाऱ्या गायी हे या शहराचं वैशिष्ट्य. ठिकठिकाणी गायी निवांतपणे रस्ता
अडवून उभ्या होत्या किंवा रस्ता ओलांडताना दिसतात. त्यांना हाकलण्याच्या फंदात
कोणी पडत नाही. अशी 'गायलँड' भरपूर. या भागात गो-शाळाही भरपूर आहेत. बिकानेर सोडतानाच
एक मोठी गो-शाळा दिसली. रस्त्यावर लागणाऱ्या अन्य गावांमध्येही तसे फलक पाहायला
मिळाले.
शहराचं चित्र असं नि माणसांचं वेगळंच. गुजरातसारखीच आतिथ्यशील माणसं इथं भेटली. मोकळेपणाने गप्पा मारणारी. रस्ता किंवा पत्ता
सांगणारी. जुनागढ़ पाहून येताना एका मोटरसायकलस्वाराला पत्ता विचारण्यासाठी हटकलं.
तो वेगात होता. लक्षात आल्यावर थोडं पुढं जाऊन थांबला, मागं आला आणि व्यवस्थित
माहिती दिली. अस्सल राजस्तानी जेवायचं होतं, तेव्हा मालट्रकच्या क्लीनरनं जवळच्या दोन-तीन हॉटेलांची नावं सांगितली. ट्रक घेऊन तो अधूनमधून महाराष्ट्रात येत असतो.
पर्यटन पोलिसांचाही चांगला
अनुभव आला. जुनागढ़जवळ वाहनतळ शोधण्यासाठी आणि पाहण्यासाठी अजून काय आहे, याची
चौकशी करायला म्हणून 'पर्यटन पुलिस' अशी पाटी लावलेल्या चौकीजवळ गेलो. तिथल्या शौकतअली यांनी कपाळावर आठ्या न पाडता
सविस्तर सांगितलं आणि बिकानेरमधल्या पर्यटनस्थळांची माहिती व नकाशा असलेली छोटी
पुस्तिकाही दिली. त्याच चौकीत दुसऱ्या दिवशी आणखी एका पोलिसाकडून तसाच चांगला
अनुभव मिळाला. त्यानं सगळ्या खाणाखुणांसह व्यवस्थित रस्ता सांगितला आणि संपूर्ण
राजस्तानमधील सगळ्या पर्यटनस्थळांचा नकाशा दिला.
माणसं बोलायला
मोकळी, संवादोत्सुक आणि विश्वास ठेवणारी. याचा वेगळाच अनुभव भुजियाच्या दुकानात
आला. सगळ्यांत मस्त भुजिया कुठं मिळेल, याची चौकशी केल्यावर स्टेशन रस्त्यावरील 'बिशनलाल बाबुलाल भुजियावाला' नाव समजलं. सर्वोत्तम भुजियासाठी तिथंच जा, असा
सल्लाही मिळाला. तिथं गेलो तेव्हा काही मराठी मुंबईकर खरेदी करीत होते. छोटंसं दुकान.
मोसम असल्यामुळे दर्शनी भागात सगळी फिणीची खोकी. दोन प्रकारचे भुजिया आणि पापड
घेऊन पैसे देण्यासाठी गल्ल्याजवळ गेलो.
थोड्या गप्पा
मारताना नगरहून, शिर्डीजवळच्या अहमदनगरहून आलो आहे, असं सांगताच चमत्कार झाला.
पैसे घेणाऱ्या श्री. जीवनलाल अग्रवाल यांनी एका मुलाला हाक मारून चार प्रकारचे
भुजिया आणि गजकचा पुडा असलेली पिशवीच हातात दिली. हे साईबाबा आणि शनिदेवाच्या चरणी
अर्पण करा, असं त्यांनी सांगितलं. घेतलेल्या पदार्थांचे पैसे देण्यासाठी मी हातात
नोट घेऊन उभा. जीवनलालजी पैसे घ्यायलाच तयार नाहीत. माझा आग्रह आणि त्यांचा नकार,
असं चार वेळा झालं. 'शिर्डी नगरपासून किती लांब
आहे? तिथं जाण्यासाठी तुम्हाला पैसे लागतीलच ना?', असं म्हणत ते पैसे नाकारत होते. अखेर नाइलाज
झाल्याचं दर्शवित त्यांनी बिलाच्या जवळ पोहोचणारी रक्कम घेतली. परतीच्या प्रवासात
साईबाबाच्या चरणी त्यांची पिशवी ठेवल्यावर बरं वाटलं.
असंच खादीच्या
दुकानात गेलो. तिथं असलेले कमल गप्पिष्ट होते. त्यांच्या गप्पांमुळे आम्ही थोडी
जास्तच खरेदी केली. स्टेशन रस्त्यानं जाताना मध्येच एक बाबा दिसले. 'अपना वजन तुलवाए। मात्र पाच / रु.' अशी पाटी जवळ. डोक्याला
साफा, गळ्यात मफलर, अंगात जर्कीन आणि त्यावर जाकीट. जवळ काठी आणि वजनाचं यंत्र.
बाबा बिडी शिलगावण्याच्या तयारीत होते. त्यांचा फोटो काढावा म्हणून परत फिरलो. बाबांनी
मग पोज घेतली आणि विचारलं, 'आप फोटो खिचवाओगे तो हमें
क्या मिलेगा?' निरुत्तर करणारा प्रश्न. जवळच्याच एकानं
सांगितलं, 'बाबाजी, ये टुरिस्ट है। निकालने दो फोटो...'
बिकानेरमध्ये गायी
जेवढ्या दिसल्या, तेवढ्या संख्येने उंट काही दिसले नाहीत. इथलं विमानतळ
नालपासून एक किलोमीटरवर आहे. बाजूला मोकळी जागी आणि बाभळीसारख्या झाडांचं रान.
स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी तिथं तीन उंट चरताना दिसले. मालवाहतुकीसाठी उंटानं
ओढायच्या काही गाड्या दिसल्या. त्यातून प्रामुख्यानं भुस्सा वाहून नेला जात होता.
या परिसरात पिक-अप व्हॅन मात्र मोठ्या प्रमाणात दिसतात. मागच्या हौद्यात दुधाचे
मोठमोठाले कॅन, भाज्यांच्या टोपल्या, धान्याची पोती. पुढं कोंबलेली माणसं.
हमें क्या मिलेगा? |
बिकानेरमध्ये मजेशीर
हिंदी फलक, त्यावरचे शब्दप्रयोग दिसले. 'बर्फ जैसा ठंडा
मिनरल वॉटर', असं एक टपरीवाला कडाक्याच्या थंडीत जाहीर करीत
होता. 'फुल्ल डाइट' म्हणजे पोटभर थाळी.
'आइरन/आयरन' हे आयर्नचं राजस्तानी रूप. 'क्लास'चं अनेकवचन तिथं 'क्लासेज' झालेलं पाहायला
मिळालं. 'ऑटोज्ञ' किंवा 'पाश्चरीकृत' यांसारखे
आंग्ल-गीर्वाण शब्द दिसले, तसाच 'अनुज्ञप्तिधारक' असा शुद्ध शब्दही वाचायला मिळाला.
परतीच्या मार्गावर
पुष्कर आणि अजमेर ही दोन तीर्थक्षेत्रं पाहायचं ठरवलं. (नंतर मग शेवटच्या टप्प्यात
शिर्डीतही दर्शन झालं.) पुष्करच्या जवळ जातानाच उंटाच्या दिमाखदार गाड्या दिसल्या.
पर्यटकांसाठी. ब्रह्मदेवाचं एकमेव मंदिर पुष्करमध्ये आहे. पुष्कर मेळ्यासाठी
प्रसिद्ध असलेला या गावातील तलाव मोठा, खूप घाट असलेला. गाडी लावतानाच आम्हाला एका
तरुणानं गाठलं. 'फक्त १० रुपयांची पूजेची थाळी घ्या आणि मला ३० रुपये द्या,' असं म्हणत तो बरोबर आला. त्या दिवशी दशमी
असतानाही एकादशी असल्याचं सांगत त्यानं पूजा करायला लावली आणि एका माणसाच्या
जेवणासाठी म्हणून १०० रुपये अधिकचे
खर्च करायला लावलेच. अजमेर कोणत्याही भारतीय देवस्थानासारखंच. दाराजवळच
पैसे मागणारे होते. डोक्यावर आच्छादन पाहिजे म्हणून १५ रुपयांना पांढरेशुभ्र
हातरुमाल विकणारे होते. आशीर्वाद देणारे होते, ताईत विकणारे होते आणि भीक
मागणारेही होते...
राजस्तानचं हे पहिलं दर्शन. केर-सांगरीची भाजी आणि बाजरीची रोटी, दाल बाटी
चुरमा, गट्टे की सब्जी यांची चव घ्यायची राहिलीच. लालगढ़, कर्णीमाता मंदिर, गजनेर
अभयारण्य पाहायचं राहिलंच. उंटावरची सफरही बाकी आहे. तिथलं आतिथ्य अनुभवायला
पुन्हा एकदा जायलाच हवं! आमंत्रण आलं नाही, तर ते
लावून घ्यायला हवं...
.....
(छायाचित्रं - https://khidaki.blogspot.com/2020/02/Bknr-Photo.html)
सुरेख वर्णन सतीश. राजस्थान सुंदर प्रदेश
उत्तर द्याहटवाकुलकर्णी सर , संपूर्ण ब्लॉग वाचला.लिखान बोलके आहे.प्रत्येक शब्द आपल्याशी बोलतो आहे असे वाटत राहते.वाचताना नकळत डोळ्यासमोर चित्रफीत सरकल्यागत वाटते.अप्रतिम प्रवासवर्णन !
उत्तर द्याहटवामस्तच लिहितोस ....
उत्तर द्याहटवासर, खूपच सुंदर लिहिले आहे.
उत्तर द्याहटवाMast!!
उत्तर द्याहटवाKeen observation, great writing!
उत्तर द्याहटवा- Jagdeesh Nilakhe, Solapur
सतीश, तुझ्याबरोबर प्रवास करीत आहे, असेच वाटले. एवढे सुंदर प्रवासवर्णन.
उत्तर द्याहटवा- रवींद्र चव्हाण, पुणे
छान सैर घडली.
उत्तर द्याहटवा- विनय गुणे, संगमनेर
खूप आवडला लेख. तुमच्या रोचक शैलीबद्दल मी आधीही बऱ्याच वेळा तुमचं कौतुक केलेलं आहे. तीच री पुन्हा ओढते!
उत्तर द्याहटवा- मृदुला जोशी, मुंबई
खरंच खूप छान लिहितोस. प्रवासवर्णन लिहायला लागणारं निरीक्षण आणि ते मांडणं तुला मस्त जमतं.
उत्तर द्याहटवा- उमेश आठलेकर, पुणे
बिकानेरला मीच फिरून आल्यासारखं वाटलं... खूप छान!
उत्तर द्याहटवा- संदीप जाधव, नगर
Good presentation about Bikaner, Ajmer and other places. Nice experience you had.
उत्तर द्याहटवा- B. V. Kanade, Bengaluru
...बीकानेर से
उत्तर द्याहटवासुंदर वर्णन...
ओघवती शैली..
फारच छान!
- अनिल कोकीळ, पुणे
वा...छान! सुंदर शहरांचा प्रवास. व्यक्तिरेखा, खवय्येगिरी. मीही प्रवास केला. 'जग घूमियाँ... थारो जैसा न कोई.'
उत्तर द्याहटवा- चंद्रकांत कुटे, मुंबई
माझे बिकानेर पाहणे राहून गेले. ते ह्या लेखातून पूर्ण झाले.
उत्तर द्याहटवा- उल्हास देसाई, नगर
खूप भारी वाटलं. तू अशा ठिकाणची माहिती 'खिडकी'मध्ये देत जा. मी डिसेंबरमध्ये पाटणमध्ये (गुजरात) असलेल्या राणी की वाव आणि मोधेरा सूर्यमंदिर या जागतिक वारसा असलेल्या अप्रतिम वास्तू डोळे भरून पाहिल्या. गेला नसशील तिथे, तर आवर्जून जा.
उत्तर द्याहटवा- प्रदीप कटारिया, पुणे
फोटोंसह सुंदर!
उत्तर द्याहटवा- मिलिंद गंधे, नगर
वा, वा... प्रवासवर्णन उत्तम. मी हा भाग पाहिला आहे. नागौरमार्गे प्रवासाचा अनुभव घेतला आहे. मुंबईत नागौरची लस्सी खूप फेमस आहे. माझ्या आणि मेव्हण्याच्या मुलांच्या आग्रहास्तव मुद्दाम नागौरला गेलो. मात्र आमचा अक्षरशः पोपट झाला. मुंबईत नागौरची लस्सी मिळत असली, तरी तिथे मात्र लस्सी कुठेच मिळेना. परंतु एक प्रसिद्ध भुईकोट किल्ला जवळच पाहायला मिळाला. वीर अमरसिंह राठोड या पराक्रमी वीरांचा हा किल्ला. लहानपणी 'वीर अमरसिंह राठोड' चित्रपट पाहिला होता, त्यामुळे त्यांचा इतिहास बऱ्यापैकी माहीत होता.
उत्तर द्याहटवातुझ्या बिकानेर प्रवासाचं वर्णन, तिथं तुला भेटणाऱ्या व्यक्ती, दुसऱ्या प्रदेशात जाऊन नव्यानं ओळखी करण्याची तुझी (सवय म्हणणार नाही) कला. सगळंच लाजवाब... मस्तच.
- प्रबोधचंद्र सावंत, पुणे
अरे व्वा छानच लेख !!
उत्तर द्याहटवाआता मला बिकानेर ला प्रत्यक्ष जायची गरज राहिली नाही असं वाटलं लेख वाचून. खूप छान लेख. मनापासून आवडला. प्रवासवर्णन आणि व्यक्ती रेखाटन जमून आलंय. --रामदासी पुरुषोत्तम रा. नवी मुंबई.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर वर्णन
उत्तर द्याहटवाFantastic detailing, I thought I am travelling with you!
उत्तर द्याहटवा- S. K. Vanpal, Pune
तुझी बिकानेर-अजमेर सफर वाचली. खरंच प्रवासवर्णन लिहिणे ही कला तुला मस्त जमते. खूप आवडलं. प्रत्यक्ष प्रवास करण्याचा feel आला. लगे रहो!
उत्तर द्याहटवा- धनंजय देशपांडे, उस्मानाबाद
छान लेख. अजूनही काही फोटो नंतर टाकण्यात येतील असे आश्वासन लेखाच्या शेवटी दिले आहे. त्यामध्ये जीवनलाल यांनी दिलेली पिशवी खरोखरच साईचरणी अर्पण करतानाच फोटो जरूर पोस्ट करावा!
उत्तर द्याहटवातसा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे; पण तुझा पेशा पत्रकाराचा. 'ध'चा 'मा' करण्यात तुमची महत्त्वाची वर्षे जातात. सहज एक वाचक म्हणून शंका आली, ती सरळ विचारली. राग नसावा!
- विकास पटवर्धन, नगर
सतीश, नेहमीप्रमाणचे सुंदर. भुजिया गरम पाण्यात तळतात, असे ऐकले होते. ते नेमके काय प्रकरण आहे?
उत्तर द्याहटवा- राजेंद्र बागडे, कोल्हापूर
मस्त. बिकानेरमध्ये उंटांवर संशोधन करणारी Camel Research Institute ही संस्था आहे. तिथे मादी उंटांच्या दुधापासून बनलेला चहा मिळतो. तसेच दरवर्षी जानेवारी महिन्यात Camel Festival पण भरतो. कधीतरी त्या उंट महोत्सवाला जायचे आहे.
उत्तर द्याहटवानिरीक्षणशक्ती उत्तम. वर्णनशैली त्याहूनही सरस. असंच लिहीत राहिलात तर पर्यटकांना तिथे जाण्याचं प्रयोजनच राहणार नाही. उगीच लोकांच्या पोटावर पाय. 😁
उत्तर द्याहटवाउंटभूमीतली गायलँड झकास 👌. तुमच्या आणि तुमच्या कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी आम्हाला खूप काही दाखवलं. लेखणीने त्यात रंग भरले. अॉटोज्ञ, पाश्चरीकृत, फुल्ल डाइट हे शब्द वार्ताहरी डोळयांनाच दिसतात. येरागबाळ्याच्या नजरेला दिसत नाहीत.
उत्तर द्याहटवाकेर-सांगरी, दाल-बाटी वगैरेंची चव जिभेवर रुजावी लागते. एकदाच खाऊन फक्त अपेक्षाभंग होतो.
'मात्र पाच रुपये'वाल्याचा फोटो वस्सूल झाला 👌
तुमचे असे क्लिकते-लिखते दौरे वरचेवर घडोत आणि आम्हाला घरबसल्या दुनिया-दर्शन होवो. 🙏
बिकानेरचे प्रवास वर्णन छान. तुमच्यासह आमचाही प्रवास झाला
उत्तर द्याहटवाप्रवासवर्णन मस्तच जमून आलंय सर. बिकानेरला सैर करुन आल्यागत वाटतंय
उत्तर द्याहटवाpharch सुंदर प्रवासी ब्लॉग आहे हा.
उत्तर द्याहटवाहा लेख वाचून असे वाटले की, खरंच आपण गाडीत बसून निघालो आहोत.
उत्तर द्याहटवा- शानुल देशमुख, नाशिक