बातमीत नाव छापून आलं म्हणून माणसांच्या ओळखी होणं, सोपं/शक्य होतं तेव्हाची ही
गोष्ट आहे. बातमीत नकारात्मक रीतीनं नाव प्रसिद्ध होऊनही ओळख आणि नंतर मैत्री
होणं, असेही काही अनुभव गाठीशी आहेत. त्यापैकी एक पोपट पवार. सामाजिक कार्याबद्दल
ज्यांना शनिवारी पद्मश्री किताब जाहीर झाला, तेच पोपट पवार.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये पवार आणि हिवरे बाजार यांचा उल्लेख केला,
तेव्हापासूनच वाटत होतं की, हे घडणार आहे - यंदा किंवा पुढच्या वर्षी. त्यासाठी
'मोदी:२'च्या पहिल्या वर्षाची वाट पाहावी लागली. पद्म पुरस्काराचे मानकरी कोण, हे
संध्याकाळी बराच वेळ इंटरनेटवर पाहत होतो. 'यादी थोड्याच वेळात जाहीर
होईल' अशीच सूचना संकेतस्थळावर येत होती.
संध्याकाळी फिरायला बाहेर पडलो. चालत असतानाच फोन वाजला. श्रीरामपूरचा अशोक
तुपे होता. त्याचं नाव पाहताक्षणी वाटलं की, हा आता बातमी सांगणार - पोपट पवार ह्यांना
पद्मश्री. अगदी तसंच झालं! बातमी अनपेक्षित नव्हती, आश्चर्यकारकही नव्हती; आनंददायी मात्र नक्कीच.
नक्की आठवत नाही, पण ही गोष्ट ३०-३१ वर्षांपूर्वीची. पत्रकारितेची नुकतीच
सुरुवात झाली होती. कार्यालयीन काम संभाळून मैदानावर मुशाफिरी करायला आवडायचं.
खेळाच्या भरपूर बातम्या देत होतो. क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनी नगरमध्ये
तेव्हापासूनच क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहे. त्या स्पर्धेच्या उपान्त्य
सामन्यात नगर एलेव्हन संघ पराभूत झाला. त्या संघाकडून खेळत होते पोपट पवार. लाँग
ऑन किंवा लाँग ऑफला क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या हातून मोक्याच्या क्षणी झेल
निसटला आणि संघाचा पराभव झाला. बातमीत मी तसं लिहिलं होतं.
त्या बातमीनंतर एक-दोन दिवसांनी कार्यालयातल्या एका सहकाऱ्यानं सांगितलं की, पोपट
पवार तुझी चौकशी करीत होते बुवा. त्या नावाला तोपर्यंत वलय यायचं होतं. 'चौकशी का, कशासाठी' एवढं विचारलं. तेव्हा
त्यानं सांगितलं - ते म्हणत होते एवढा कोण पत्रकार आहे हा तुमचा, अगदी सगळं नावासकट
छापतो!
त्याच दरम्यान आमची ओळख झाली. क्रिकेटपटू आणि क्रॉम्प्टनमधील एंजिनीअर बाळू
पवार ह्यांच्यामुळे. नगरचं क्रिकेट त्या काळात थोडं थंडावलं होतं. (अलीकडच्या वीस
वर्षांमध्ये तर ते पार गारेगार पडलंय!) खेळाडूंमध्ये खदखद होती.
पुरेसं खेळायला मिळत नाही, ह्याची अस्वस्थता होती. पोपट आणि आणखी काही जणांनी संघटनेच्या
पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी मोठं निवेदन तयार केलं होतं. ते घेतलं. त्याच्या आधारे 'नगरचे क्रिकेटपटू
बंडाच्या पवित्र्यात' शीर्षकाच्या बातमीनं सुरुवात केली आणि सहा भागांची मालिका
लिहिली. खेळाडूंमध्ये 'केसरी' लोकप्रिय होऊन गेला.
खरं तर पोपट पवारांचं खेळणं तेव्हा संपत आलं होतं. क्रिकेटची पहिली इनिंग्स
संपवून रोजी-रोटीच्या दुसऱ्या इनिंग्सकडे ते वळू पाहत होते. पण विझी करंडकापर्यंत
मजल मारून आलेल्या त्यांच्यातल्या खेळाडूला दिसतंय ते पाहावत नव्हतं. त्यातूनच ते
निवेदन आकाराला आलं. आमच्या मैत्रीचा दुसरा धागा तिथं विणला गेला.
हळुहळू पोपट पवार कार्यालयात येऊ लागले. त्यांचा दुसरा डाव सुरू झाला होता.
गावचं सरपंचपद त्यांना मिळालं. क्रिकेट संघटना ठाकठीक करण्याऐवजी गाव नीटनेटकं
करण्याला आता प्राधान्य होतं. त्याच संदर्भातील बातम्या देण्यासाठी ते कार्यालयात
येत. तशा बातम्या देणं काही माझ्या कार्यक्षेत्रात नव्हतं. मी उपसंपादक. हौस म्हणून बातम्या
देणार ते फक्त क्रीडाविषयक. अगदीच वेगळं काही दिसलं, लिहावं वाटलं तर ते अलाहिदा.
मग संबंधित वार्ताहराशी त्यांची ओळख करून दिली. 'आपण जबाबदारीतून सुटलो,' असं वाटलं, तरी ते तसं
नव्हतं. पोपट पवार कार्यालयात येत राहिले, वाडिया पार्कवर भेटत राहिले आणि संबंध
वाढत गेले.
हिवरे बाजार आता देशाच्या नकाशावर ठळक दिसतं. पण पवार सरपंच झाले, तेव्हा ते
तालुक्याच्या नकाशातही शोधावं लागायचं. 'पैलवानांचं गाव' ही ओळख 'दारुड्यांचं गाव' अशी बदलली होती. त्या
काळात विकासाचं स्वप्न दाखवून, तरुणांना बरोबर घेऊन पवारांनी ही जबाबदारी घेतली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ह्यांच्याशी चर्चा करून, राळेगणसिद्धीत काय बदललं हे
नियमितपणे पाहून गावात काम सुरू होतं. तेव्हा एक दिवसाचं क्रिकेट नुकतंच रुजलं
होतं; 'टी-२०'चा धडाका कुणी स्वप्नातही पाहिला नव्हता. तरुणांचं काम तसंच चालू झालं. झटपट क्रिकेटसारखं
नाही, तर पाच दिवसांच्या कसोटीसारखं. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन, छोटी छोटी काम
हाती घेऊन. एकदम मोठं स्वप्न कुणी पाहिलं नाही नि कुणाला दाखविलंही नाही.
एम. कॉम. झालेल्या पवारांना योग्य वेळी चांगल्या नोकरीची संधी मिळाली नाही, हे
बरंच झालं! तेव्हा नगरमध्ये एस. टी. महामंडळाचा क्रिकेटचा संघ होता. तरुण, चांगल्या
खेळाडूंना तिथं हमखास नोकरी मिळे. कुठं तरी, काही तरी अडलं, उशीर झाला आणि पोपट
पवार एस. टी. महामंडळामध्ये चिकटले नाहीत. नसता आज ते वयाच्या साठीत विभाग
नियंत्रक वगैरे म्हणून निवृत्त होऊन नगरजवळच्या केडगावमध्ये छोटेखानी बंगला बांधून
राहिले असते. एस. टी.तल्या न मिळालेल्या नोकरीचा किस्सा त्यांनीच मला सांगितला. तेव्हा
'लोकसत्ता'मध्ये 'नगरी-नगरी' सदर लिहीत होतो.
त्याच्यासाठी भन्नाट विषय मिळाला. एका रविवारी लिहिलं - 'एस. टी.चे अनंत उपकार,
म्हणून हिवरे बाजार झाले हिरवेगार!'
जेमतेम पाऊस होणाऱ्या, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाऱ्या हिवरे
बाजारमध्ये तरुण मंडळींनी आधी हाती घेतलं पाणलोटक्षेत्र विकासाचं काम. 'पाणी अडवा-पाणी जिरवा' ही तेव्हाची लोकप्रिय घोषणा होती. प्रत्यक्षात
वेगळंच घडे. नव्याचे नऊ दिवस जाऊन मंडळी राजकारणाला सोकावली की, राजकीय अडवाअडवी
नि जिरवाजिरवीचा खेळ सुरू होई. हिवरे बाजारमध्ये सुदैवानं तसं काही घडलं नाही. निवडणुकीच्या
राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय पवारांनी एकाच अनुभवातून घेतला.
कुठलाच बदल एका
रात्रीत होत नसतो. पवारांनी तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने सावकाशीनं, पण ठामपणे काम
चालू केलं. त्याचे परिणाम दिसू लागले. गावच्या सभोवतालच्या डोंगरांवर सलग समतल चर
खोदण्याचं काम पहिल्या काही वर्षांत जोरात झालं. त्याचे थेट परिणाम दिसू लागल्यावर
गावकऱ्यांचाही सूर बदलला. हिवरे बाजारचं हे बदलतं रूप पाहण्यासाठी एक-दोन वेळा
जाऊन आलो. अर्थात हे बदल एका दिवसाच्या काही तासांच्या पाहणीतून लक्षात येत नसतात.
चिपको आंदोलनातील
नेते, मॅगसेसे पुरस्कारविजेते चंडिप्रसाद भट्ट वीस-बावीस वर्षांपूर्वी हिवरे
बाजारला आले होते. बहुतेक गुरुवार असावा तो. माझी साप्ताहिक सुटी. पोपट पवार
म्हणाले म्हणून गेलो हिवरे बाजारला. शाळेच्या व्हरांड्यात काही निवडक गावकरी होते.
त्यांच्याशी संवाद साधत भट्ट माहिती घेत होते. अनुभवाचे चार शब्द सांगत होते. रात्री
आठ-साडेआठ वाजेपर्यंत रंगल्या होत्या गप्पा. त्याची 'बत्तीच्या उजेडात रंगला पर्यावरणावर संवाद' शीर्षकाची बातमी रंगवून लिहिली. बदलत्या हिवरे
बाजारबद्दल लिहिलेली ती पहिली मोठी बातमी माझी. श्री. भट्ट तेव्हा म्हणाले होते, 'आता हाती घेतलेलं हे काम तुम्हाला सोडून जाता
येणार नाही. तसं कुठं गेलाच, तर तुम्ही लावलेली ही झाडंच
तुम्हाला परत बोलावतील.' हिवरे बाजारच्या
टेकड्यांवर लावलेल्या वनसंपदेवर तशी वेळ आलीच नाही.
एक एक टप्पा पार होत
होता. नशाबंदी, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी आणि श्रमदान ही पंचसूत्री कटाक्षाने
पाळली गेली. जोडीला स्वच्छता, पीकपद्धती... असं पद्धतशीर काम चालू होतं. त्याची
दखल घेतली जाऊ लागली. पुरस्कार मिळू लागले. राळेगणच्या बरोबरीनं हिवरे बाजारचं आणि
अण्णा हजारे यांच्यानंतर पोपट पवार ह्यांचं नाव येऊ लागलं. गावात सगळ्यांत आधी आणि
सगळ्यांत महत्त्वाचं काम झालं ते पाण्याचं. ग्रामविकासमंत्री असलेल्या आर. आर.
पाटील यांना या कामाचं मोठं कौतुक. पाणीटंचाई असलेल्या गावांत पाण्याच्या
नियोजनाचे अधिकार ग्रामसभेला देण्याचं विधेयक मांडण्याचं त्यांनी पुण्यातील एका
कार्यशाळेत जाहीर केलं. हे विधेयक हिवरे बाजार पॅटर्नवर आधारित होतं. अवघ्या १२-१५ वर्षांतील कामाला
ही राजमान्यता!
हा हिवरे बाजार पॅटर्न आहे तरी काय, हे सगळ्यांना कळलं पाहिजे, असं वाटलं.
त्यातून पोपट पवारांशी बोलून लिहिलेला लेख 'लोकसत्ता'च्या संपादकीय पानावर
प्रसिद्ध झाला. तो वाचून खूश झालेल्या आर. आर. पाटील ह्यांनीच पवारांना फोन करून असा
लेख प्रसिद्ध झाल्याचं कळवलं होतं त्याच दिवशी अगदी सकाळी. एका धडपडीला आपलाही हातभार लागल्याचं
समाधान तेव्हा वाटलं.
हिवरे बाजार बातमीचा चांगला स्रोत आहे, हे एव्हाना नगरच्या व बाहेरच्याही पत्रकारांना समजून चुकलं
होतं. त्यामुळे केवळ बातमीसाठी आमचे संबंध येणं बंद झालं. पण महत्त्वाचे काही विषय
असले की, पोपट पवार ते सांगतच. हिवरे बाजारच्या वाटचालीची 'हायड्रॉलॉजी प्रोजेक्ट' त्रैमासिकानं आवर्जून
नोंद घेतली. पाण्याला वाहून घेतलेल्या या त्रैमासिकानं पोपट पवार आणि हिवरे बाजार
यांचं कौतुक करताना लिहिलं होतं - 'दुष्काळाविरुद्ध लढाई
करून श्री. पोपट पवार यांनी त्यात जय मिळविला आहे. अन्य खेड्यांसाठी हिवरे बाजार
आता एक आदर्श उदाहरण बनले आहे.' खास हा लेख दाखविण्यासाठी पवार कार्यालयात आले.
दिग्गज पत्रकार, लेखक, विचारवंत राजमोहन गांधी साडेसात वर्षांपूर्वी हिवरे
बाजारला आले होते. अतिशय निवांतपणे त्यांच्याशी गप्पा मारता आल्या. आध्यात्मिक
गुरू श्री एम यांनीही कन्याकुमारी-काश्मीर पदयात्रेत हिवरे बाजारला भेट दिली.
त्यांचीही मुलाखत घेण्याची संधी मिळाली. या दोन्ही मुलाखतींमधून पत्रकार म्हणून चांगलं
काही लिहिता आलं. ही संधी दिली ती पोपट पवार ह्यांच्यामधील मित्रानं.
मध्यंतरी सगरोळी (जि. नांदेड) येथे गेलो होतो. तिथंही चांगलं काम होत आहे. 'खूप वेळा प्रयत्न करूनही
पोपट पवार आमच्याकडे आलेच नाहीत,' असं तिथल्या संस्थेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यानं सांगितल्यावर
ती जबाबदारी घेतली. 'तुम्ही फोन करा, मीही बोलतो,' असं सांगितलं. अचानक एके
दिवशी पोपट पवारांनी सांगितलं की, सगरोळीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं आहे. तू
बरोबर येणार असशील, तरच जाईन! स्वाभाविकच गाड्याबरोबर नळ्याचीही यात्रा घडली.
नाशिकचा क्रीडा संघटक मंदार देशमुख 'समर्पण'तर्फे दर वर्षी 'क्रीडा पत्रकारिता' व 'निसर्गमित्र' पुरस्कार देतो. दोन
वर्षांपूर्वी त्यानं ठरवलं पोपट पवारांच्या हस्ते पुरस्कार द्यायचे. मध्यस्थीला मी
आणि निर्मल थोरात. पवारांची अट एकच - निर्मल आणि सतीश दोघंही येणार असतील तरच मी
येतो! कार्यक्रम ज्या दिवशी होता, त्याच दिवशी त्यांच्या मुलीच्या लग्नाची सुपारी
फोडायची होती. पाहुणे आलेले. आता नाशिकला कधी जाणार आणि वेळेत कसं पोहोचणार, याचीच
काळजी वाटत होती. पण दिला शब्द पाळायचाच, हे नक्की असलेल्या पोपट पवारांनी दोन
वाजेपर्यंत पाहुण्यांना, गावकऱ्यांना व्यवस्थित जेवू घातलं आणि आम्ही गाडीत बसलो.
तिथला कार्यक्रम छान झाला. मंदारनं मानधनाचं विचारल्यावर पोपट पवारांनी स्वच्छ
शब्दांत नकार दिला. परतताना गाडीत मला म्हणाले, ''आपण खेळाडू. खेळासाठी
असलेल्या कार्यक्रमाचं कसलं मानधन घ्यायचं!''
पोपट पवारांची भाषणं बऱ्याच वेळा ऐकायला मिळाली. दिल्लीतली पंचतारांकित परिषद
असो, नगरच्या वाडिया पार्कवरची क्रिकेट स्पर्धा असो, हिवरे बाजारला आलेल्या विद्वान
पाहुण्यांचं-प्रतिनिधींचं शिष्टमंडळ असो, हिंगोली जिल्ह्यातल्या एखाद्या गावात आदर्श
ग्रामसमितीची सभा असो की जिंतूरच्या महाविद्यालयातलं स्नेहसंमेलन असो... त्यांच्या
बोलण्यात अनौपचारिकता असते. समोरच्यांशी थेट संवाद साधणारी शैली. प्रसंगाला साजेशी
रोजच्या जगण्यातली ते थेट आंतरराष्ट्रीय उदाहरणं. ग्रामीण ढंगाच्या त्या बोलण्यात
भरपूर आत्मविश्वास असतो; आपुलकी असते.
नवं वाचणं, नवं समजावून घेणं आणि ते अंगीकारणं यात पोपट पवारांना विलक्षण रस
आहे. तसा तो असल्यामुळेच त्यांना इथपर्यंत मजल मारता आली. निवडणुकीच्या
राजकारणापासून ते कटाक्षाने लांब राहिले. लोकसभेच्या मागच्या दोन निवडणुकांमध्ये
त्यांना उमेदवारी देण्याचं घाटत होतं. फक्त त्यांनी 'हो' म्हणणंच बाकी होतं. तो एकाक्षरी शब्द नाही उच्चारला त्यांनी. कुठल्याही पक्षाचा शिक्का स्वतःवर बसणार नाही, ह्याचीही काळजी त्यांनी घेतली.
गावातील कामासाठी स्वयंसेवी संस्था सुरू केली. पण ती 'व्यावसायिक एनजीओ' बनणार नाही, ह्याची पुरती
खबरदारी घेतली.
हिवरे बाजारनं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत गेल्या वर्षी राज्यात पहिला क्रमांक मिळविला. दहा
वर्षांनंतर सहभागी होऊनही गावानं तोच क्रमांक टिकवला. त्याबद्दल गावकऱ्यांशी
बोलण्यासाठी गेलो होतो. पोपट पवारांनी तयार केलेल्या सहकाऱ्यांनीच सगळी माहिती
दिली. तोंडपाठ असल्यासारखी. शाळेत गेलो तेव्हा सोबत पवार होते. त्या शाळेत तिसरीत
शिकणारा मुलगा कोण, तो इथंच परत कसा आला, हे मला ते सांगत होते.
अलीकडे आमच्या निवांत भेटी कमी होतात. पण त्या त्या वेळच्या गप्पांमधून बरंच
काही समजत राहतं. त्यात अनेक बातम्या लपलेल्या असतात. काही छुपे प्रवाह ज्ञात
होतात. पण हे सगळं 'ऑफ द रेकॉर्ड' असतं. त्यामुळे मनात
असूनही यातल्या काही गोष्टी इथंही लिहिता येत नाहीत. मध्यंतरी एक तुलनात्मक लेख
लिहावा, असं डोक्यात होतं. ती कल्पना बोलून दाखवताच त्यांनी लगेच विरोध केला. त्या
तुलनेमध्ये कुणीच लहान असणार नव्हतं. फक्त एक रेघ मोठी दिसणार होती. ती मोठी रेघ
त्यांच्या कामाची असतानाही त्यांच्या नकारामुळे तो विषय बाजूला सारावा लागला.
हिवरे बाजारमध्ये नेमकं काय घडलं, कसं झालं, त्याचा फायदा किती... ह्या सगळ्या
गोष्टी वेळोवेळी प्रसिद्ध होतच आहेत. पद्म पुरस्काराच्या निमित्तानं त्याला पुन्हा
उजाळा मिळेल. पण त्यासाठी किती मेहनत करावी लागली, हे त्या गावालाच माहीत. यश
मिळायला लागलं की, जमिनीवरचे पाय सुटू लागतात. पोपट पवारांचं तसं झालं नाही. उलट
त्यांची जमिनीवरची पकड अधिकच घट्ट होत आहे. पद्मश्री किताब त्याचीच तर पावती आहे.
......
प्रेरणा, आशा आणि विश्वास...
हिवरे बाजारच्या भेटीत अनौपचारिक
गप्पा मारताना राजमोहन गांधी म्हणाले होते - आपल्या स्वप्नातील गाव हिवरे
बाजारच्या रूपाने साकारले आहे, ही जाणीव महात्मा
गांधी यांच्या आत्म्याला नक्कीच झाली असेल. देशाच्या भविष्याबद्दल आशा करावी,
विश्वास ठेवावा, प्रेरणा घ्यावी असेच इथले काम
आहे. सारे गावकरी मिळून एकमताने निर्णय घेतात, हे
महत्त्वाचे. पाण्याची बचत, रासायनिक खतांचा कमी वापर,
गरिबी नाही, गावकऱ्यांचे परस्परांशी छान संबंध
हे सगळे काही सुखद आहे. या कामाचे कौतुक करावे तरी किती!
ग्रामविकास करणारेच कर्मयोगी!
पदयात्रेच्या दरम्यान आध्यात्मिक
गुरू श्री एम हिवरे बाजारला गेले होते. दिवसभर फिरून त्यांनी सगळे काम पाहिले. ते
म्हणाले की, एकात्मता आणि गावचा विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. महात्मा
गांधींनी सांगितलेले काम पोपट पवार करीत आहेत. असे काम करणारेच साधू-कर्मयोगी असतात. गावे
विकसित झाली, तर शहरात कोण कशाला जाईल? ते काम येथे होत असल्याचे पाहून समाधान वाटते. ते पाहूनच आपल्या देशाच्या
भविष्याविषयी आशा वाटते.
(कृपया, पूर्वपरवानगीशिवाय लेख, त्यातील भाग वापरू नये.
कॉपी-पेस्टऐवजी लिंक
शेअर करावी, ही विनंती)
..........
लेखातल्या " साधू कर्मयोगी " या शब्दांनीच पोपटराव पवारांना मिळालेल्या पद्मश्री या किताबाचं महत्व अधोरेखित झालं आहे. खेळाडू आणि हिवरेबाजारचे कार्य या सबंधाने पोपटराव पवारांच्या कार्याचा आणि व्यक्तीमत्वाचा परिचय अंत्यत सुंदर शब्दात मांडला आहे. हा लेख पोपटराव पवारांना खूप जवळचा वाटेल यात शंका नाही.
उत्तर द्याहटवाखूपच छान लेख.
!! अभिनंदन !!
सतिश..... Great....
उत्तर द्याहटवाProud of you...
छान.माझी पोपटरावांशी 2003साली ओळख झाली.तेव्हा पासून त्यांच्या कार्याचा आलेख चढताच आहे.तुम्ही त्यांची विस्तारानं ओळख करून दिलीत.धन्यवाद
उत्तर द्याहटवामस्तच.
उत्तर द्याहटवा३० वर्षाचा मैत्रीचा प्रवास डोळ्यासमोर उभा केला.. ग्रेट
उत्तर द्याहटवातुमच्या 'खिडकी'त डोकावल्याने 'पोपटराव' होण्यापूर्वीची पोपट पवार ह्यांची एवढी जवळून ओळख प्रथमच झाली. खूप प्रेमाने आणि प्रांजळ लिहिलं आहे.
उत्तर द्याहटवा- विनय गुणे, संगमनेर
ह्या निमित्ताने 'खिडकी'तील 25 जाने. 2020 चा लेख वाचला. मला वाटते असे किती तरी लेख या 'खिडकी'मागे दडले असतील. ह्यांचे एखादे पुस्तक तयार होईल का?
उत्तर द्याहटवा- अशोक थोरात, नगर