Friday, 2 November 2018

‘पेपर १०० टक्के सोडवल्यानं यश अपेक्षितच होतं!’


गाव बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तेव्हापासून आजपर्यंत आम्ही कधीच पैशाच्या किंवा पुरस्कारांच्या मागं लागलो नाही. लोकसहभाग, श्रमदान, लोकवर्गणी यातून गावात सुधारणा करणं हाच आमचा उद्देश होता, आहे आणि राहील. लोकांचा सहभाग वाढावा आणि कामात सातत्य राहावं, एवढ्याच एका हेतूने आम्ही संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत यंदा सहभागी झालो. राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष श्री. पोपट पवार नेमकेपणानं गावकऱ्यांच्या वतीनं भूमिका स्पष्ट करतात. श्री. पवार हिवरेबाजारचे सरपंच झाले आणि त्यांनी आदर्श गावाची संकल्पना सर्वांच्या मनात रुजविली. त्यासाठी सुरू झालेल्या कामांतून गावाचा कायापालट होऊ लागला. हे एकट्याचं काम नाही. सर्वांना बरोबर घेतल्यानंच पुढे जाता येईल, हे त्यांनी सुरुवातीपासूनच जाणलं होतं. त्यामुळेच हिवरेबाजारमध्ये गेल्या २८ वर्षांत झालेल्या घडामोडींमध्ये ठळकपणे जाणवतो तो लोकसहभाग.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छ हिवरेबाजारला यंदा मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकाचं मर्म कशात आहे? या प्रश्नावर श्री. पवार म्हणाले, ‘‘विकासप्रक्रियेत सहभागी होण्याची गावकऱ्यांना जी सवय लागली, त्याचा हा दृश्य परिणाम आहे. लोकसहभाग हा आमचा परवलीचा शब्द आहे. त्यानं भल्याभल्या समस्या पळून जातात. लोकसहभागातून सगळं काही करता येतं, हे गावाला अनुभवातून पटलं आहे. ग्रामस्वच्छता अभियानात आम्हाला १० वर्षांपूर्वीही राज्यस्तरीय पहिलं पारितोषिक मिळालं होतं. त्यामुळं आमचा गृहपाठ पक्का होता. जुन्या कामावर आम्ही कधीच नव्यानं बक्षीस मिळवलं नाही. एकदा अभियानात सहभागी व्हायचं ठरवल्यावर गावकरी जिद्दीनं कामाला लागले. प्रत्येक मोहिमेत आम्ही नवीन टीमवर जबाबदारी टाकतो. त्यामुळं काम करणारे तयार होतात. यंदाच्या मोहिमेसाठी टीम तयार केली, जबाबदारीचं वाटप झालं. साहित्याची खरेदी, काम, त्याचा दर्जा तपासणं आणि एकूण मोहिमेचा सर्वंकष आढावा घेणं, यासाठी वेगवेगळे गट तयार केले. त्यातली माणसं गावातल्या वेगवेगळ्या स्तरातली होती. जबाबदारी मिळाली की, त्यानुसार हे गट कामाला लागले. असं वेगवेगळ्या पातळ्यांवर बारीक लक्ष ठेवल्यानं केलेली कामं टिकतात, हा अनुभव आहे. आम्ही प्रत्येक कामाची तपशीलवार नोंद ठेवतो. हे सगळं रेकॉर्ड विभागीय आयुक्त श्री. महेश झगडे यांनी तपासणीच्या वेळी स्वतः पाहिलं. त्यावर ते पूर्ण समाधानी दिसले.’’

यंदाच्या मोहिमेत पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळेल, याची कितपत खात्री होती श्री. पवार आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना? श्री. पवार म्हणाले, ‘‘खरं सांगतो. पेपर पूर्ण आत्मविश्वासानं १०० टक्के सोडवला होता. त्यामुळे यश अपेक्षितच होतं. त्याचं संपूर्ण श्रेय विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना. विविध स्तरांवरच्या समित्या मोहिमेत सहभागी झालेल्या गावांची पाहणी करतात. या सर्व समित्यांपुढे गावकरीच बोलले. जे केलं, तेच दाखवायचं आणि सांगायचं असल्यामुळं अजून वेगळं काही करायचा प्रश्नच नव्हता. या मोहिमेत १० वर्षांनी पुन्हा भाग घेण्याचं आम्ही एकमतानं ठरवलं. राज्य पातळीवरचं पहिलं पारितोषिक मिळवण्यात सर्वांचा वाटा आहेच; पण त्याचं सर्वांत मोठं श्रेय मी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना देतो. त्यांनी हे मनावर घेतलं आहे. त्यांच्यामुळेच घराघरामध्ये जागृती झाली.’’

घनकचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची, हा जगापुढचा सध्याचा फार मोठा प्रश्न आहे. योग्य प्रकारे त्याची विल्हेवाट लावता आली, तर स्वच्छतेच्या वाटेवरचा मोठा अडथळा आपोआप दूर होतो, असं सांगून श्री. पवार म्हणाले, ‘‘कचऱ्याचं वर्गीकरण करून, ओल्या कचऱ्याचा कंपोस्ट खत बनविसाठी उपयोग करून आम्ही आमच्या पद्धतीनं मार्ग शोधला. सांडपाण्याच्या पुनःवापराचंही असंच आहे. प्लास्टिकबंदी अलीकडे झाली. आमच्याकडे सवयीनं आधीच प्लास्टिकचा कचरा वेगळा केला जात असतो. गावात स्वच्छता राहण्याचं नि टिकण्याचं ते एक कारण आहे. स्वच्छतागृहांचा वापर करण्याची सवय लागणंही महत्त्वाचं आहे. महात्मा गांधी स्वतः शौचालयाची-स्वच्छतागृहाची सफाई करीत. आमच्या शाळेतील मुलांना ती सवय आहे. शाळेसारखंच ते घरीही वागतात आणि त्यामुळं त्यांच्या पालकांनाही आपोआप ही सवय लागली.’’

हिवरेबाजारच्या या दीर्घ काळच्या वाटचालीचं रहस्य श्री. पवार सहजपणे उलगडून दाखवतात. आमच्याकडे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर नाही. रस्त्यावरून वाहणारं सांडपाणी दिसत नाही. मूलभूत सोयी मिळाल्या की, लोक कोणत्याही कामात उत्साहानं सहभागी होतात, हाच आमचा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळेच श्रमदानात सारे उत्स्फूर्तपणे भाग घेतात. आपल्याकडे दुर्दैवाने सगळं मजुरांकडून करून घ्यायची सवय लागली आहे. ती आमच्या गावात नाही, असं ते म्हणाले.

या वर्षी हिवरेबाजारमध्ये प्रामुख्यानं शोषखड्ड्यांचं आणि स्वच्छतागृहांच काम लक्षणीयरीत्या झालं. गावातील शौचालये पाहून बाहेरगावाहून आलेला एक पाहुणा श्री. पवार यांना म्हणाला, तुम्हाला बहुतेक सरकारकडून जास्त पैसे मिळतात. म्हणून एवढं चांगलं काम होतं. वस्तुस्थिती वेगळीच आहे. इतर सर्व गावांप्रमाणे आणि लाभार्थींप्रमाणे हिवरेबाजारमध्ये सरकारकडून शौचालयासाठी १२ हजार रुपयांचंच अनुदान मिळतं. तेवढ्याच अनुदानात इतर गावांपेक्षा इथं अधिक चांगलं काम होण्याचं कारण आहे एकत्रित खरेदी. हिवरेबाजारमध्ये बांधल्या गेलेल्या शौचालयाचा खर्च बाजारभावाप्रमाणे २१ हजार ३०५ रुपये आहे. पण सगळं साहित्य एकत्रित खरेदी केल्यामुळे, त्याची एकदम वाहतूक केल्यानं गावातील प्रत्येक लाभार्थीला त्यासाठी १७ हजार ७६५ रुपये खर्च आला. एकत्रित खरेदीमुळं प्रत्येकाचे ३ हजार ५४० रुपये वाचले. ही सगळी माहिती देऊन श्री. पवार म्हणाले, ‘‘ठरवलं तर सगळं काही करता येतं. आम्ही ते केलं.’’ यंदाच्या परीक्षेत अव्वल नंबर आला म्हणून सगळं गाव खूश आहे. पण म्हणून गावकरी आत्मसंतुष्ट नाहीत. प्रगतीची पुढची शिखरं गाठण्यासाठी अभ्यास नेहमीसारखाच चालू ठेवावा लागणार, हे त्यांना माहीत आहे!
............
हिवरेबाजारच्या यशाची कहाणी - स्वच्छतेच्या व्रताचा रौप्यमहोत्सव!
https://khidaki.blogspot.com/2018/11/HiwareBazar.html

1 comment:

  1. आपल्या कुशल लेखणीतून 'आधी केले मग सांगितले', 'झपाटलेलं व्यक्तिमत्व', 'अधुनिक गाडगे महाराज', 'आधी Practical नंतर Theory' असा पोपटराव पवारांचा प्रवास उलगडतो.
    - श्रीराम वांढरे, भिंगार (नगर)

    ReplyDelete

'हिंडता फिरता' अध्यक्ष उदगीरला लाभता

  'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्या...