भो, ऐतिहासिक नगरा,
उपेक्षेचे वारे सोसत,
परी ना कण्हत, ना कुथत,
संथ गतीने सुरूच आहे
तुझी वाटचाल, अखंडित
पारतंत्र्याच्या सोसून अनेक ‘शाही’
अनुभवतोयस सध्या लोकशाही,
पण तुझ्या गौरवाच्या आणि कुचेष्टेच्या
लिखाणाची अजूनही आहे ओली शाई
पाचशतकी वयाचा तुझ्या
उल्लेख होतो वारंवार,
पण बा नगरा, नाहीत दिसत
वार्धक्याच्या काहीबाही खुणा
तुझ्या अंगावर...
हां, दिसताहेत सुरकुत्या कधीच्या
झालेल्या त्या तरुणपणीच्या
उपेक्षेच्या, कुपोषणाच्या...
लढायांतल्या तलवारींचा
तू ऐकला आहेस खणखणाट
आणि मंदिरात वाजणाऱ्या
टाळ-घंटांचा किणकिणाट
तरीही स्तब्ध आणि सुज्ञ,
नेहमीसारखाच स्थितप्रज्ञ!
ऋषी-मुनी, साधू-संतांचा
नित्य लाभलाय सहवास
आणि हव्यासी सत्ताधीशही
करून गेलेत येथे वास
पण आहे तीच परिस्थिती
झकास, मानत राहतोयस खास
भरण-पोषणाच्या,
नि सुजाण पालकत्वाच्या
कल्पनाच आहेत तुझ्या वेगळ्या
देगा उसका भला,
न देगा उसका भी भला
धुंदीत जगतोयस आगळ्या...
कुणीही यावे
टिकली मारुनी जावे,
तसे कुणीही यावे नि
राज्य करुनी जावे...
तुझे त्याला ना सोयर - ना सुतक
प्रश्न पडत राहतात,
उत्तरे कधी तरीच
सापडत असतात,
अनुत्तरित समस्या
चिघळून लसलसतात...
मिरवतोस तू त्या अंगावर
लखलखत्या दागिन्यांगत!
उसाच्या हिरव्यागार मळ्यांतून
घोंगावतात दुष्काळी वारे
आणि वाहत्या कालव्यांतून
पुढे जातात तहानेचे झरे
भुकेला-तहानलेला तू,
आहेस तेथे, तसाच राहा बरे
खुणावणारे पुणे,
हिणवणारे नाशिक,
चमकणारे औरंगाबाद
या त्रिकोणात तुझा
न दिसणारा चौथा कोन
बोथट, न टोचणारा...
झगमगत्या त्या महानगरांकडे,
पाहून नाहीत तुझे दिपत डोळे
कोठून, काही कळत नाही,
पण मिळवलेस हे शहाणपण खुळे?
ग्लोबल युगापासून तू
नसशी रे लांब फार,
पण नाही तुझा हात
त्याच्या खांद्यावर
सबब, इतके जवळ
तरीही दूर,
पडले हे केवढे अंतर
नव्या जगात जगताना
कितीही आले जिवावर
रोज करावे वाटते हाऽऽय,
तरीही म्हणावे लागते बाऽऽय
फेसबुकावर तुला मानाचे पान
कितीक लाईक, कॉमेंट्स छान
दुरावा तुझा साहवेना,
परि तुझ्याजवळ राहवेना!
रविवार, २९ मे, २०१६
मत्प्रिय नगरा...
(‘अहमदनगर’ असं कागदोपत्री
नाव असलेलं आणि साऱ्यांच्या बोलण्या-लिहिण्यात कायम ‘नगर’ असाच उल्लेख येत राहिलेल्या या शहराचं वयोमान पाचशेहून अधिक आहे. त्याचा स्थापनादिन 28 मे. गेल्या अडीच दशकांपासून तो साजरा होतो. त्याच आठवणी, तेच कढ,
तीच महता आणि तीच गाथा... उत्सवी स्थापनादिनापलीकडे कधीच काही होत नाही. या
शहराबद्दलची आपुलकी व्यक्त करणारी ही कविता. अडीच वर्षांपूर्वी केलेली... आणि वर्तमान पाहता भविष्यातही तशीच लागू राहील, असंच खंतावून म्हणावंसं
वाटतं.)
(पूर्वप्रसिद्धी
: दैनिक सकाळ, 22 नोव्हेंबर 2013)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पोरी... खेळणाऱ्या, जिंकणाऱ्या!
ह्या विजयानं अनेक गोष्टी बदलतील. बऱ्याच बदलांची नांदी झाली आहे. काही छोट्या गावांमधून नवी गुणवत्ता पाहायला मिळेल. मुलींना अंग चोरून मुलां...
-
डॉक्टर खास कौतुक करतात - ‘ह्या सगळ्या रुग्णांमध्ये तुमचा एक नंबर आहे बघा.’ मग आजोबा उपचाराबद्दल सांगू लागतात. सकाळी सहा वाजताच उपचार सुरू ...
-
रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं !...
-
थोडी आवराआवरी सुरू आहे घरात. पुस्तकं, जुनी वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, कातरणं... पाहायची आणि निकाली काढायची. एरवीचा निकष ह्या वेळी ना...
मस्त. शहराशी संवाद ही कल्पना आवडली. आपल्या शहराला आपण बोलावे, असे लोकांना वाटले, तर शहरे जिवंत वाटू लागतील.
उत्तर द्याहटवाउसाच्या हिरव्यागार मळ्यांतून
घोंगावतात दुष्काळी वारे
आणि वाहत्या कालव्यांतून
पुढे जातात तहानेचे झरे
हे कडवं छानंय!
पण चमकणारे औरंगाबाद? कुठाय ही चमचम? आम्हाला कशी दिसत नाही बरे?
इथे आम्हीही पाहतो दुसऱ्या झगमगणाऱ्या शहरांकडे.
नगर चे वास्तव कवितेत अवतरले!
उत्तर द्याहटवास्तुत्य प्रयत्न, अभिनंदन!
(अण्णासाहेब वाकचौरे)