Friday 22 May 2020

एकलव्याची एकसष्टी



'कुठंय?' वाजणारा फोन उचलल्याबरोबर हा प्रश्न कानावर आदळतो. 'मी कुठंही असेन, काय बोलायचंय ते बोल की...' मनातल्या मनात उत्तर देतो. तसं स्पष्ट बोलायची सोय नसते.

'काय साहेब, झाली का झोप?' सकाळी कधी तरी फोन येतो आणि अशी विचारणा होते. 'झोपलो असतो, तर फोनवर बोललो असतो का?' चरफडत विचारलेला हाही तर्कशुद्ध प्रतिप्रश्न मनातल्या मनात.

'हो ना... मी तेच म्हणतो.' फोनवरच्या संवादात हे विधान किती तरी वेळी ऐकायला मिळतं. 'हो का! इथून पुढं तूच सगळं म्हणत जा नं...' असं म्हणावं वाटतं मग. हेही अर्थात मनातच! तसं बोलण्याचं धाडस अजून कधी केलं नाही. पुढेही होणार नाही.

फोनच्या पलीकडच्या बाजूला असतो निर्मल. म्हणजे निर्मचलचंद्र थोरात. अशी उत्तरं दिल्यामुळं तो दुखावला वगैरे जाईल, अशी काही भीती वाटत नसते. तो दुखावून घेणार नाही, ह्याची खात्री असते. असं काही विचारल्यावर तो हसणार आणि आपला राग, चीड निष्फळ ठरवणार. तो माझा मूड अजमावू पाहत असतो. म्हणजे मी त्याच्यापेक्षा वयानं, कर्तृत्वानं मोठं असल्यासारखं. वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे.

ही फार जुनी गोष्ट आहे. साधारण पस्तीस वर्षांपूर्वीची. पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर राष्ट्रीय खो-खो स्पर्धा चालू होती. स्वतःला खो-खोपटू मानत होतो. खेळलो ते मातीच्या मैदानावर. डुगडुगते खुंट. पाणी न मारलेलं मैदान. ही स्पर्धा तर क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या स्टेडियमवर. आवडत्या खेळाची एवढी मोठी स्पर्धा पाहायची संधी सोडणं म्हणजे महापापच. नेहरू स्टेडियमच्या गॅलरीत बसून दोन दिवस सामने पाहिले. महाराष्ट्राचे दोन्ही संघ जिंकताना आणि अंतिम फेरीत धडक मारतानाचा थरार अनुभवला.

अंतिम सामन्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होतं. त्यामुळे शेवटच्या दिवशी प्रेक्षकांसाठी पाच रुपये किंवा असंच काही तरी तिकीट होतं. ते काही माझ्या खिशाला परवडणारं नव्हतं. त्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकावलं. त्या विजयाचे नायक निर्मलचंद्र थोरात आणि सुरेखा कुलकर्णी ह्या दोघांचा खेळ उपान्त्य सामन्यांमध्ये डोळे भरून पाहिला होता. निर्मलची दमदार पळती चालू असताना शेजारी बसलेला एक तरुण म्हणाला, 'थोरात आमचा गाववाला. नगरचा आहे.' हा तरुण तेव्हा पुण्याच्या 'किर्लोस्कर न्यूमॅटिक'मध्ये नोकरी करीत होता. त्याची पुढे नंतर कधीच भेट झाली नाही. त्यानं नकळत निर्मल आणि नगर ह्यांच्याशी माझं नातं जोडून दिलं.

तोपर्यंत मी नगरला कधीही गेलो नव्हतो. जाण्याची काही शक्यताही नव्हती. निर्मलचा खेळ पुन्हा पाहायला मिळेल, असंही काही वाटत नव्हतं. पुढे वेगळंच घडलं. त्यानंतर फक्त तीन-साडेतीन वर्षांतच नगर आणि निर्मल आयुष्याचा अपरिहार्य भाग बनले! त्यालाही आता तीन दशकं झाली.

'केसरी'मध्ये नोकरी मिळाली म्हणून मी नगरला आलो. शिकाऊ उपसंपादक. हौस होती आणि 'क्रीडांगण'मध्ये काम केल्याचा अनुभव होता म्हणून खेळाबद्दल लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. हवीहवीशी जबाबदारी होती ती. पहिल्याच वर्षी प्रकाशझोतातली टेनिस चेंडू क्रिकेट स्पर्धा झाली. त्याच्या मन लावून बातम्या दिल्या. स्पर्धा जिंकणाऱ्या चषक संघामध्ये निर्मल थोरात असं एक नाव होतं. विजेत्या संघाचं मोठ्ठं छायाचित्र लेखासोबत छापलं, त्यातही तो होताच. पण त्या नावामुळं काही लक्षात आलं नाही. खो-खो आणि क्रिकेट... दोन वेगळे खेळ. नावं सारखी असतात.

नगरला नोव्हेंबर ८८मध्ये राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन भरलं. म्हणजे 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा. साहेबलोकांनी त्याच्या बातम्या देण्याचं काम सहकाऱ्यावर सोपवलं होतं. त्याला राजकीय कुस्त्यांमध्ये अधिक रस. हे काम नको होतं. त्यानं मला सांगितलं आणि नंतर साहेबांना पटवलं. तोपर्यंत नियमानुसार होणारी एकही कुस्ती पाहिली नव्हती. पण त्याची काही भीती वाटत नव्हती.

नगरच्या वाडिया पार्कच्या पंडित नेहरू आखाड्यात जमलेल्या त्या सगळ्या पेहेलवान लोकांमध्ये मी दुबळा माणूस विशोभित दिसत होतो. पण तेव्हा वर्तमानपत्रांत छापून येणाऱ्या बातम्यांना आणि त्या लिहिणाऱ्या माणसांना मान होता. त्यामुळे अनेक जण आपुलकीनं, उत्साहानं मदत करीत, माहिती देत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळं दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. माती आणि गादी कुस्तीतला फरक समजला. त्यातला वाद लक्षात आला. गदेसाठीची कुस्ती होण्याच्या पाच तास आधीच माझ्याकडे दोन्ही मल्लांच्या मुलाखती तयार होत्या.

पण त्याच्या आधी, स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट घडली. आखाड्यातून बाहेर पडताना एकानं हटकलं आणि नाव घेऊन 'तूच का तो?' असं विचारलं. माझ्या बातम्यांचं कौतुक करीत त्यानं स्वतःची ओळख करून दिली - मी निर्मल थोरात! लख्खकन ट्यूब पेटली. अरे! हा तर महाराष्ट्राच्या खो-खो संघाचा कर्णधार. ज्याचा खेळ पाहून खूश होऊन त्याच धुंदीत सहा-सात किलोमीटर पायी चालून घरी गेलो होतो, तो निर्मल थोरात.

मुंबईत झालेल्या भाई नेरूरकर चषक खो-खो स्पर्धेच्या कुमार गटात नगरच्या सहकार क्रीडा मंडळानं विजेतेपद मिळवलं होतं. निर्मलनं त्याची माहिती दिली. त्याबद्दल एक लेख लिहायचं ठरवलं. त्यानं दिलेल्या माहितीनुसार दणक्यात लेख लिहिला. अठरा वर्षांखालील खेळाडूंचा तो संघ निर्मलचा लाडका होता. त्यातले बहुतेक खेळाडू त्याच्या आवडीचे. त्यांच्यात तो आपला 'एकलव्य' शोधत असावा बहुतेक. पण दुर्दैवाने खुल्या गटात त्यांच्यापैकी कुणीच फारसं चमकलं नाही. असो!

निर्मल तेव्हा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करीत होता. एम. आय. डी. सी.च्या शाखेतलं काम संपवून घरी जाताना संध्याकाळी दोन तासांचा त्याचा थांबा असायचा. नगरपालिकेजवळचं सहकार क्रीडा मंडळ. तिथं तो सराव घेत असायचा. 'केसरी'त रात्रपाळी असली की, जाताना मी सहकार क्रीडा मंडळाच्या मैदानाकडे नजर टाकत असे. लाल रंगाची एम-50 दिसली की, निर्मल तिथं आहे, असं समजायचं. मग मैदानावर आमच्या गप्पा व्हायच्या. तिथंच त्यानं अनेकांच्या ओळखी करून दिल्या.

नदिया किनारे... मुलगा आणि वडील नर्मदेच्या पुलावर.

'केसरी'मध्ये क्रीडा-पुरवणी सुरू करायचं ठरवलं. आठवड्यातून एकदा एक पूर्ण पान. त्यात नव्या आणि जुन्या खेळाडूंची ओळख-माहिती, त्यांचं छायाचित्र. सदरांची नावं होती 'तळपते तारे' आणि 'जुना जमाना'. खेळाडू म्हणून निर्मल काय चीज आहे, हे एव्हाना कळलं होतं. 'जुना जमाना'चा श्रीगणेशा त्याच्यापासूनच करायचं ठरवलं. त्याच्याबद्दल लिहिलेल्या स्फुटलेखाचं शीर्षक होतं - 'एकमेव एकलव्य'. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचं एकलव्य पारितोषिक मिळविणारा अजून तरी तो एकमेवच नगरकर आहे. खो-खोतील श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळविणारा पुण्या-मुंबईबाहेरचा तो पहिला खेळाडू. या दोन्ही सदरांसाठी त्यानं बऱ्याच नव्या-जुन्या खेळाडूंची नावं सुचवली. त्यांच्या मुलाखतींसाठी तो बरोबर आला.

भाई नेरूरकर स्पर्धेच्या लेखामुळे निर्मलची चांगली ओळख झाली होती, तरी अजून मैत्री अशी काही झाली नव्हती. 'महाराष्ट्र केसरी'नंतर पाच-सहा महिन्यांतच नगरला राज्य ॲथलेटिक्स स्पर्धा झाली. ह्याच स्पर्धेमुळे आमदार प्रसाद तनपुरे ह्यांच्याशी ओळख झाली. ते जिल्हा संघटनेचे अध्यक्ष होते. तिच्या संयोजनात निर्मल होताच. त्याची वेगळी ओळख ह्या निमित्ताने झाली. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी संयोजनातील गोंधळाबद्दल-गडबडीबद्दल एक बातमी दिली होती. त्याचा जाब निर्मलनं सकाळीच विचारला! तेव्हा आमचे संबंध 'अहो-जाहो'चे होते. पण ते तेवढ्यावरंच राहिलं.

स्पर्धेच्या चांगल्या बातम्या दिल्याबद्दल निर्मलनं प्रा. रंगनाथ डागवाले ह्यांच्याकडून माझ्यासाठी प्रमाणपत्र आणलं! 'नगर कॉलेज' असं मोठ्या अक्षरात छापलेला एक बनियनही भेट दिला. तो वापरण्याचं धाडस झालं नाही.

उमेदीचा काळ होता तो. उत्साही वातावरण. किती लिहू नि किती नको असं. निर्मल विषय देत असे. जिल्हा खो-खो संघटनेनं तेवढ्यात कधी तरी कुमारांची राज्य अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून आम्ही कधी तरी 'अरे-कारे'वर आलो. तो घरीही येऊ लागला. आम्ही कौटुंबिक मित्र झालो. खेळाडू-क्रीडा संघटक आणि पत्रकार हे आमच्यातलं नातं असंच कधी तरी संपून गेलं.
.....
अमेरिकी कुस्तीगीर डॅन गेबल ह्यानं म्हटलं आहे की, 'सुवर्णपदके सोन्याची नसताततर ती तुम्ही घेतलेली मेहनतगाळलेला घाम आणि धैर्य नावाच्या कुठेही न आढळणाऱ्या धातूची असतात.' हे उद्धृत निर्मलला माहिती असायचं काही कारण नाही. पण त्यातलं सार त्याला कळलेलं आहे.

'खेळून काय पोट भरणार आहे का?', असं पालकांनी रागावू नये आणि त्यातून खेळाडूंचं मैदान सुटू नये, म्हणून राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खेळाडूंची भरती करण्यात येऊ लागली. सत्तर-ऐंशीच्या दशकांमध्ये क्रिकेटपटूंबरोबर बरेच खो-खोपटू, कबड्डीपटू व अन्य खेळाडूंनाही त्याचा फायदा झाला. राष्ट्रीय स्पर्धेत तीनदा खेळलेल्या आणि त्यात दोन वेळा महाराष्ट्राचं नेतृत्व केलेल्या, पहिला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या निर्मलला नोकरी मिळाली ती खेळामुळेच. त्याचं सगळं श्रेय तो आजही श्याम पुरोहित यांना देतो.

मैदान सोडू नये म्हणून खेळाडूंना नोकऱ्या मिळू लागल्या आणि नोकरी मिळाल्यावर दोन-चार वर्षांतच खेळाडू मैदानाला रामराम ठोकू लागल्याचं चित्र नवीन नाही. ह्याला काही अपवाद असणारच. त्यातलं मी पाहिलेलं ठळक उदाहरण निर्मलचं. खेळणं संपवून चौतीस वर्षं झाल्यानंतरही त्याचं मैदान सुटलेलं नाही. 'नवे शिकण्याचा मार्ग शिकविण्याच्या वाटेने जातो,' हे समजून तो प्रशिक्षकाच्या भूमिकेत शिरला. बँक संपली की, तो सहकार क्रीडा मंडळावर रोज संध्याकाळी दीड-दोन तास हजेरी लावायचा. आधी अहिरे आणि नंतर दत्ता हे दोघे त्याचे खंदे सहायक होते.

नव्वदीच्या दशकात निर्मलनं राहण्याची जागा बदलली. नगरच्या स्टेशन रस्ता परिसरातून तो एकदम सावेडीच्या टोकाच्या निर्मलनगरमध्ये राहायला गेला. बँक, घर आणि सहकार क्रीडा मंडळ, हे तीन दिशांना-तीन टोकांना. आता निर्मलचं मैदान सुटलं, असं (तो सोडून) बऱ्याच जणांना वाटलं असणार त्या वेळी. निर्मलनगरमध्ये स्थिरावताच त्यानं तिथं हलचाल सुरू केली. तिथं नव्यानं वसती होत होती. बहुसंख्य रहिवासी गरीब म्हणावेत असे. कुणी हमाली करणारं, कुणी रोजंदारी, कुणी छोटा व्यवसाय. त्यांची मुलं काय खेळणार नि त्यांना कोण शिकवणार?

निर्मलनगरच्या एकलव्यांसाठी द्रोणाचार्य तयार होता. मोकळी जागा बघून निर्मलनं मैदान सुरू केलं. 'एकलव्य क्रीडा मंडळ' असं त्याचं नामकरण केलं. जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष व चार्टर्ड अकाउंटंट अशोक पितळे ह्यांच्या मदतीने त्यानं चांगली जागा मिळविली. आमदार, महापौर ह्यांच्याशी असलेल्या ओळखीचा फायदा त्यानं मैदानासाठी वापरला. 'एकलव्य'चं मैदान गेल्या २५ वर्षांपासून गजबजलेलं असतं. अनेक मुलं तिथं तयार झाली. खेळामुळं बऱ्याच जणांना पोलिस म्हणून नोकरी करण्याची संधी मिळाली. काही सैन्यात गेले, तर काहींना बँकेत नोकरी मिळाली. बेकायदा दारू विकणाऱ्या एका कुटुंबातील मुलगा सरकारी अधिकारी बनला. एकलव्याच्या निष्ठेनं निर्मलनं घेतलेल्या मेहनतीला मिळालेलं हे फळ आहे.

निर्मल आज जो काही आहे, तो त्याच्या खेळामुळेच. त्याला ह्याचा कधीच विसर पडला नाही. खेळानं आपल्याला भरपूर दिलं. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग म्हणून तो मैदानावरच राहिला. मैदानाशी असलेली नाळ तुटली नाही. प्रसंगी खिशातून खर्च करून, लोकप्रतिनिधींना गळ घालून त्यानं एकलव्य मंडळ उभं केलं. खो-खोच्या प्रत्येक वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूचं पारितोषिक पटकाविणारी श्वेता गवळीसारखी खेळाडू तिथंच घडली.

प्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू व प्रशिक्षक पॅट्रिशिया सुझन अर्थात पॅट समिट ह्यांनी सरावाबात म्हटलं आहे की, 'बरेच लोक खेळण्यासाठी उत्सुक नि उत्साही असतात. मी मात्र सरावाच्या बाबतीत उत्सुक असते. कारण नियमित सराव हाच माझा वर्ग, शिक्षण आहे.' निर्मलची भूमिका अशीच काहीशी राहिली आहे. यशासाठी नियमित सरावाला पर्याय नाही, हेच तो खेळाडूंच्या मनावर आजवर बिंबवत आला आहे.
.....
नगरसाठी सेलिब्रेटी असलेला निर्मल थोरात त्या अर्थानं 'लो प्रोफाईल' आहे. त्याचं एकच उदाहरण सांगतो. पाव शतकापूर्वी नगरला राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा झाली. तिच्या वृत्तांकनासाठी मुंबईहून मोठ्या वृत्तपत्राचा तरुण क्रीडा प्रतिनिधी आला होता. स्पर्धेच्या आदल्या दिवशी मैदानावरून त्याला मुक्कामाच्या हॉटेलात जायचं होतं. तिथून रिक्षा मिळणं अवघड होतं, संयोजकांपैकी कुणी नव्हतं. मुंबईकर असल्यामुळं त्याचा रुबाब वेगळाच. तो थोडा तकतक करू लागला. निर्मलनं त्याला सोडण्याची तयारी दाखविली. मुंबईचा तो तरुण पत्रकार गाडीवर बसत असतानाच मी थांबवलं नि विचारलं, 'हा कोण आहे माहीत आहे का?' आपल्याला सहजपणे सोडायला निघालेला हा साधा माणूस म्हणजे महाराष्ट्राचा कर्णधार आणि शिवछत्रपती पुरस्कारविजेता खो-खोपटू आहे, हे समजल्यावर मुंबईकर पत्रकार अचंबित झाला.

निर्मलला वेगवेगळ्या कार्यक्रमांची, विशेषतः शाळा-महाविद्यालयांतल्या क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रणं येत. त्यातल्या काही कार्यक्रमांना तो मलाही बरोबर घेऊन गेला. त्याबद्दल ज्योतीवहिनी दोन-चार वेळा म्हणाल्याही, 'हे फार भारी आहेत. तुम्हाला बरोबर घेऊन जातात म्हणजे आपोआप बातमी येण्याची सोय.' गमतीनं केलेल्या ह्या विधानात तथ्य नाही. 'माझी एवढी बातमी छाप ना,' असं निर्मल एवढ्या वर्षात कधीच म्हटलेला आठवत नाही. मला बरोबर नेण्यामागे माझ्या ओळखी व्हाव्यात, लिहिण्यासाठी विषय मिळावेत, हाच त्याचा हेतू असे.

आपल्या खेळाबरोबरच अन्य खेळांच्या आणि खेळाडूंच्या बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात, असंही निर्मल नेहमीच पाहत आला. अशी कुठलीही नवीन माहिती मिळाली की, तो ती लगेच कळवतो आणि ह्याच्यावर लिही, असा आग्रह धरतो.

टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेले धावपटू अँथनी फ्रान्सिस कुटिन्हो नगरमध्ये स्थायिक आहेत, हे निर्मलला कुठून तरी कळलं. मागं लागून तो मला त्यांच्या घरी घेऊन गेला. त्या भेटीतून एक झकास लेख 'लोकसत्ता'मध्ये प्रसिद्ध झाला. एवढ्या वर्षांनंतर आपली कुणाला तरी आठवण आहे, हे पाहून कुटिन्होही खूश झाले.

साधारण १५-१६ वर्षांपूर्वी नगरच्या तीन खेळाडूंना एकाच वेळी श्री शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. त्यात खो-खोपटू नव्हता. पण ह्या साऱ्यांचा सत्कार करण्याची कल्पना निर्मलनं बोलून दाखवली. एकलव्य क्रीडा मंडळाच्या मैदानावर एका सायंकाळी छान कार्यक्रम झाला. सगळ्यांना 'एक होता कार्व्हर'ची भेट देण्यात आली. एका खेळाडूच्या शिक्षक असलेल्या बहिणीला हे पुस्तक फारच आवडलं. पुस्तक देण्याची कल्पना त्याची नि निवड माझी. तेव्हापासून तो भेट म्हणून पुस्तकच देतो. पुस्तक निवडण्याचं काम मला करावं लागतं, एवढंच.

निर्मल आता आहे त्यापेक्षा 'अधिक मोठा' झाला असता का? नोकरी आणि क्रीडा संघटना, ह्या दोन्ही बाबींचा विचार केला, तर ह्या प्रश्नाचं उत्तर 'हो' असंच आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मिळणारी बढती त्यानं नाकारली. 'आपल्याला ते काम झेपणार नाही,' असं कारण तो सांगतो. त्यात त्याचा प्रांजळपणा दिसतो. पण खरं कारण हे असणार की, अधिकारी झाल्यावर जबाबदारी वाढणार आणि मग मैदानावर नियमितपणे जायला जमणार नाही! मध्यंतरी नगरमध्ये असलेल्या एका वरिष्ठ विभागीय व्यवस्थापकांना निर्मलची एवढी मदत झाली की बस! ते त्याच्यावर खूश होते. त्यानं बढती घ्यावी, हव्या त्या शाखेत, म्हणून ते आग्रही होते. त्यांच्याच मागं लागून निर्मलनं आपल्या बँकेची शाखा हिवरेबाजार इथे उघडायला लावली. बँकेची नोकरी त्यानं पूर्ण जबाबदारीनं केली. शक्य होईल त्यांना मदत केली.

राज्य संघटनेतही काम करण्याची संधी निर्मलला मिळाली असती. पण त्यानं कधी रस दाखवला नाही किंवा पुढाकार घेतला नाही. त्यासाठी जो संघर्ष करावा लागतो, वाईटपणा घ्यावा-द्यावा लागतो, तशी त्याची मानसिक तयारी नाही. 'घे पंगा' असं मैदानावर शिकवत असला, तरी त्याची ती वृत्ती नाही. राज्य खो-खो संघटनेचा कारभार वादग्रस्त असताना, निर्मलनं पुढाकार घ्यायला हवा होता, असं मंदार देशमुख किंवा वि. वि. करमरकर ह्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सुचवून पाहिलं. पण तो आपला प्रांत नाही, असं त्यानं जणू ठरवलेलं आहे. निवडसमितीत काम करण्यासाठीही तो फारसा उत्सुक नसतो.

निर्मलच्या गाठीशी अनेक अनुभव आहेत. त्यामुळे त्याच्याकडे अनेक किस्से आहेत. अमिताभ बच्चन यांच्या जवळ कुण्या खेळाडूने जाऊ नये म्हणून तेव्हाचा पुण्याचा तरुण-तडफदार नेता बुटाच्या लाथा कशा मारत होता, हे तो रंगवून सांगतो. वृत्तपत्रं बारकाईनं वाचणाऱ्या, भरपूर हिंदी सिनेमा पाहिलेल्या निर्मलनं अलीकडच्या काळात ट्रॅक बदलला आहे. त्याला आता वेगवेगळी पुस्तकं वाचायला आवडतात. मुलगा संकल्पच्या क्रीडा-करीअरकडे लक्ष द्यायचं म्हणून त्यानं दोन वर्षं आधीच नोकरी सोडली. मग सायकलिंग, ट्रायथलॉन हे त्याचे खेळ नसताना लोकांशी बोलून त्यानं त्याबद्दल बरीच माहिती काढली. जणू ते त्याचेच खेळ असावेत.

मराठी साहित्य संमेलनासाठी दोन वर्षांपूर्वी बडोद्याला गेलो होतो. तिथं पोहोचलो आणि सकाळीच निर्मलचा फोन, 'काय साहेब कुठंय? काय चाललंय?' मग त्यानं सांगितलं की, दोनदा एकलव्य पारितोषिक मिळविणारे सुधीर परब बडोद्यातच असतात. एका खेळाडूला एकदाच हे पारितोषिक द्यायचा नियम त्यांच्यामुळेच आला. त्यांना भेटून ये.

सुधीर परब ह्यांना बडोद्यात कुठं शोधायचं हा मोठा प्रश्न होता. पण निर्मलनं पुन्हा एकदा फोन करून तसा आग्रह धरला. त्यामागचा त्याचा हेतू लक्षात आला. मंदार देशमुखमुळं परब सरांचा फोन नंबर मिळाला आणि एका मोठ्या माणसाची ओळख झाली, मैत्री झाली!


लेखक आणि नायक. बिकानेर दौऱ्याच्या वेळी.

मी भरपूर हिंडावं, लोकांशी बोलावं आणि लिहावं, असा निर्मलचा नेहमीच आग्रह होता, आहे. अनेकांशी त्यानं माझी ओळख करून दिली. ओळख करून देताना 'हे एकदम भारी लिहितात हं,' असं त्याचं नेहमीचं वाक्य असतं. माझं लिखाण त्याला कधीच बरं, ठीक वाटत नाही. ते 'छान झालंय' किंवा 'एकदम भारी' ह्याच श्रेणीत मोडतं. आता हा लेख कुठल्या कॅटॅगरीत मोडेल, हे जाणून घेण्याचं औत्सुक्य मला आहेच.

अलीकडच्या काळात निर्मलला कुठला पुरस्कार मिळालेला नाही. कुठल्या पदावर त्याची निवड वगैरे झालेली नाही. मग अचानक हे निर्मल-पुराण कोणत्या निमित्ताने?

... खेळ आणि मैदान हेच आपलं जगणं मानणारा हा साधा, सरळ माणूस, घरी नेहमीच शेलकी मिठाई घेऊन येणारा जिवलग मित्र आज (२२ मे) एकसष्टीचा झाला. पाय सदैव जमिनीवर असलेल्या ह्या माणसाला जौन एलिया ह्यांचा एक शेर लागू होतो -

अपना रिश्ता ज़मीं से ही रक्खो
कुछ नहीं आसमान में रक्खा

36 comments:

  1. निर्मल सर तुम्हाला एकसष्टीच्या खूप खूप शुभेच्छा , लेखकाने लेख फारच सुंदर लिहिला, वाचनीय वाटला.

    ReplyDelete
    Replies
    1. लेखन छानच आहे.खेळाडू तयार झाले पाहिजेत.

      Delete
  2. Very well articulated!!!

    Nirmal Kaka deserves this...

    And your words!
    - Gaurav Pitale, Nagar

    ReplyDelete
  3. खूपच छान लिहिले आहे निर्मलमामाबद्दल...
    - मृण्मयी, पुणे

    ReplyDelete
  4. Khup khar khar lihalay ....asach aahe to !!!!!!

    ReplyDelete
  5. Good human being with cool attitude... Legend of Khokho, wish you very happy birthday sir. From -Dr Wagh Kiran Gavajirao ,Shevgaon sports club Shevgaon. Play Khokho, develop Khokho Jay Khokho...

    ReplyDelete
  6. खूप सुंदर.......निर्मल सरांचा सगळा प्रवास आणि संघर्ष डोळ्यासमोर तरळला...!!

    ReplyDelete
  7. सहकार क्रिडा मंडळाने खो खो मधील पुण्याला चांगले आव.आव्हान उभे केले.त्यात निर्मला वाटा खूप मोठा!आजही निर्मल सर 61वयाला पोहोचले,खरे वाटत नाही.सतीशराव सुंदर शब्द चित्र आहे.

    ReplyDelete
  8. व्वा. निर्मलसोबत असलेल्या निर्मळ मैत्रीचं निखळ लेखन.
    सुनीता तगारे
    औरंगाबाद

    ReplyDelete
  9. फारच छान लिहिला लेख
    जुन्या माहीत नसलेल्या व न अनुभवलेल्या आठवणीचं जणू जाग्या झाल्या. अप्रतिम.

    ReplyDelete
  10. खूपच अप्रतीम लेख जसा एखादा जीवनपट पहावा

    ReplyDelete
  11. खुप छान लेख लिहीला आहे.

    ReplyDelete
  12. मस्त झाला आहे लेख.
    - श्वेता गवळी, नगर

    ReplyDelete
  13. सतीश, खूप छान लेख लिहिला आहे तुम्ही. निर्मल थोरात यांचं खेळातलं मोठं स्थान आणि खऱ्या आयुष्यातलं साधं-सरळ वागणं या दोन्हींचा परिचय तुमच्यामुळेच होऊ शकला.

    निर्मल यांना एकसष्टीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!
    - मृदुला जोशी, मुंबई

    ReplyDelete
  14. खूपच सुंदर लेख. अगदी निर्मलचे योग्य वर्णन करणारा. निर्मल म्हणजे एक अजातशत्रू माणूस. एवढा मोठा खेळाडू असून, अजिबात डोक्यात हवा नाही. त्यामुळे मला तो खूपच मोठा वाटतो.
    - विकास पटवर्धन, नगर

    ReplyDelete
  15. सतीश, जसा आहे तसा निर्मल तू डोळ्यांपुढे उभा केला. थोडा कमी नाही, थोडा जास्त नाही. शक्कर ना थोड़ी कम ना थोडी जादा. मिठास उतनी जितनी होनी चाहिए!

    खरं तर तो आहे तसा मांडणे खूप अवघड. त्याचा कधी कधी खूप राग येतो. एवढा मोठा खेळाडू, एवढा मोठा माणूस; पण खेळाडूंवर, त्याच्या स्वतःच्या खेळाडूंवर अन्याय झाला तरी कधी चिडला नाही, रागावला नाही. त्याच्या बोलण्याला खूप महत्त्व होते. कारण त्याला जे मिळाले ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीत व महत् कष्टाने. त्यामुळे तो बोलला पाहिजे होता... पण असो.

    तो तर खऱ्या, पुणे-मुंबईच्या बाहेर जो महाराष्ट्र वसला आहे त्या सर्वांचा 'हीरो' होता, आहे व राहीलसुद्धा. माझ्या ग्राउंडवरही तो माझ्यासह सर्वांचा 'हीरो' होता. प्रतिकूल परिस्थिती असताना यश प्राप्त करायचे असते, हे माझ्या मुलांवर मी कायम बिंबवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच कदाचित देश पातळीवरील तीन सर्वोच्च पुरस्कार माझ्या खेळाडूंनी मिळवले, ते त्याच्यापासून प्रेरणा घेऊनच.

    सतीश, तो खरंच एकलव्य होता व आहे. पुरस्कार हे केवळ निमित्त. तुझ्या मुळे जुन्या गोष्टीना छान उजाळा मिळाला.

    निर्मल. तू निर्मळ आहेस; तो असाच रहा. आमच्या मित्रावर किती रागावलो तरी शेवटी तू 'निर्मळ' आहेस या एका गोष्टीवर आम्हाला राग सोडून परत तुझ्या प्रेमात पडावे लागते. म्हणून तू मोठा आहेस, अजून मोठा आभाळभर हो, ह्याच शुभेच्छा आमच्या सर्व नाशिककर खो-खो कुटुंबाकडून.

    सतीश, तुझ्या छान लेखामुळे व्यक्त व्हावे असे वाटले. त्यामुळे तुला धन्यवाद.
    - मंदार देशमुख, नाशिक

    ReplyDelete
  16. निर्मल सरांना एकसष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन. उत्तम लेखाद्वारे "निर्मळ" परिचय करून दिल्याबद्दल श्री. कुलकर्णी साहेबांना धन्यवाद.

    ReplyDelete
  17. सतीश, नेहमीप्रमाणे भट्टी मस्त जमून आली आहे. लेख वाचताना निर्मल थोरात डोळ्यांसमोर उभे राहिले.
    - राजाराम कुलकर्णी, पुणे

    ReplyDelete
  18. कोणताही विषय असू द्या, सतीश भट्टी जमवणारच. त्याचे खवय्येगिरीचे लिखाण वाचले की, कधी एकदा त्या ठिकाणी जाऊन मनसोक्त हादडू, असे तुम्हाला वाटल्याशिवाय राहणार नाही.
    - जगदीश निलाखे, सोलापूर

    ReplyDelete
  19. मस्त! सतीश 'खिडकी'तील बिकानेरच्या लेखाची आठवण झाली.
    - राजेंद्र बागडे, कोल्हापूर

    ReplyDelete
  20. नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. तसेच 'सुवर्णपदके सोन्याची नसतात, तर ती तुम्ही घेतलेली मेहनत, गाळलेला घाम आणि धैर्य नावाच्या कुठेही न आढळणाऱ्या धातूची असतात.' सुंदर वाक्य सतीश!
    - दिनेश भंडारे

    ReplyDelete
  21. @निर्मल थोरात - 'खिडकी' नेहमीप्रमाणेच मस्त.
    - अनिल कोकीळ, पुणे

    ReplyDelete
  22. Great! Article gives good insight of your friend. Convey our best wishes to Nirmal Thorat.
    - B. V. Kanade, Bengluru

    ReplyDelete
  23. काही माणसांना पुरस्कार मिळाले की, पुरस्कारांची किंमत वाढते. तर काहींना पुरस्कार मिळाले की, त्या पुरस्काराची किंमत शून्य होऊन जाते... सहसा सेटिंग लावणाऱ्यांना पुरस्कार मिळतात.

    निर्मलसारखं व्यक्तिमत्त्व खूप अभावानेच सापडतं. खूप मोठं नाव आहे आणि ते कायम मोठंच राहील. खो-खोच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
    - उमेश आठलेकर, पुणे

    ReplyDelete
  24. सर्व प्रथम सतिष तुझे आभार. कारण निर्मल थोराता बरोबर माझी ओळख तुच करून दिली.वास्तवीक मी नगरचा असून माझी ओळख एका नगरच्या बाहेरच्या माणसाने त्यांच्याशी करून दिली.त्याला कारण माझी म्हाडा पुणे येथे शिवसेने कडुन संचालक पदी निवड झाली होती. पुणे म्हाडा मध्ये निर्मल थोरात ह्यांचा मित्र संजीव नाईक ह्याला माझ्या बद्दल माहिती पाहिजे होती.त्यामुळे त्याने निर्मल थोरातां कडे माझ्या विषयी काही माहिती आहे का अशी विचारणा केली.त्यावेळेस त्यांना सुध्दा मी कोण हे माहीत नव्हते.त्यांनी माझ्या बद्दल सतिष कडे विचारणा केली व आमची प्रथम ओळख झाली.अत्यंत साधा माणूस विनम्र तेने बोलणारा.इतका मोठा खेळाडू केवळ सतिष मुळे त्यांची व माझी ओळख झाली हे मी माझे भाग्य समजतो.अशा भाग्यवान माणसाला एकसष्टी निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो व हा त्यांचा सुंदर परिचय करून देणार्या माझ्या मित्राला शतशः धन्यवाद देतो व इथुन पुढे सुध्दा आम्हाला अशीच मेजवानी देत रहावी अशी विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र आपला मित्र सुरेश क्षीरसागर, उपशहर प्रमुख, शिवसेना तसेच चेअरमन
    श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी अहमदनगर.ॎ प्राथमीक विभाग ॎ.

    ReplyDelete
  25. खेळाडूचचे वय कधीच वाढू नये.तो सतत खेळताना अन तो खेळत असताना अनेकपिढ्या घडाव्यात असे मनोमन वाटते.
    छत्रपती पुरस्काराला साजेसा अप्रतिम लेख !
    खूपच छान !!!.

    ReplyDelete
  26. निर्मल सर नावाप्रमाणे निर्मळ आणि मनमिळावू आहेत. त्यांनी संकल्प साठी घेतलेले परिश्रम त्यांच्या क्रीडा प्रेमाची साक्ष देतात. हा लेख वाचून नक्की कळतं की सर महाराष्ट्र खो खो चा जीताजागता इतिहास आणि येणाऱ्या दैदिप्यमान भविष्याचे रचीयते आहेत. सर आपल्याला एकसष्ठी निमित्त खूप खूप शुभेच्छा...
    प्रसन्न कोटस्थाने, अहमदनगर

    ReplyDelete
  27. सतिश, लेख खुपच छान. सविस्तर प्रतिक्रिया निवांतपणे लिहितो.

    ReplyDelete
  28. एक खेळाडू, त्याचा खेळ आणि समांतर घडणारे आजूबाजूचे वास्तव, हे ज्या पद्धतीने आता समोर आले, ते म्हणजे विम्बल्डन प्रत्यक्ष तेथे जाऊन - गांभीर्याने आणि शिस्तीने पाहणे, असे!

    श्री. निर्मल किती लोकप्रिय आहेत, ते प्रतिक्रिया सांगतात. त्या वाचनीय आहेत.

    क्रीडा वगैरे सारे मैदानी आता एक तर नामशेष होत चालले आहे किंवा त्यांचा मोठा बाजार जर भरतो आहे, तर त्याला तुमच्यासारख्या क्रीडा-पत्रकाराचे नसणे हे प्रमुख कारण आहे...

    मी दंग राहून गेलो. श्री. निर्मल ह्यांचे मनःपूर्वक अभीष्टचिंतन करतो.
    - प्रदीप रस्से, जळगाव

    ReplyDelete
  29. खूप छान! निर्मल थोरात यांच्याबद्दल मला खरेच काही माहिती नव्हती; ती आज मिळाली. असे किती तरी नायक असतील. ज्यांच्याबद्दल लोकांना माहिती नसेल. त्यामुळे आपले काम खूपच प्रशंसनीय आहे.
    - स्वाती वर्तक

    ReplyDelete
  30. Impressed with the article on Nirmal Thorat.
    - Sudheer Parab, Vadodara

    ReplyDelete
  31. मला वाटतं बरोबर दोन वर्षा पूर्वी आपली लेखणी सुधीर परब सरांना घेऊन बडोद्यात खो-खो मैदानात उतरली होती. त्यानंतर आता नगरच्या निर्मल थोरात सरांना. एकाबाजूला हे मैदानी वीर तर दुसऱ्या बाजूला आपला सिद्धहस्त. खरोखर आपली लेखणी भाग्यवान.  
    श्रीराम वांढरे. भिंगार.

    ReplyDelete
  32. Extraordinary dedication and contribution by Nirmal sir

    Befitting parnership by Satish bhai

    To cause effective sports culture and sharing it to globe

    ReplyDelete
  33. Very good article. Meeting you through this blog after long time. I gives a very clear picture of your friend and sportsman. I read a good article on sports after a very long time . Where were you during lock down period? I am in touch with him through Maitri word press.

    ReplyDelete
  34. नावासारख्याच निर्मळ असलेल्या थोर मित्राचं मनापासून कौतुक करणारा लेख भावला. त्या मित्राने तुमच्या लेखणीला किती प्रकारे खेळवलं तेही समजलं आणि आवडलं. "तुमची मैत्री, ते सगळे खेळ आणि तुमची 'खेळकर' लेखणी या साऱ्यांना उदंड आयुष्य लाभो," हा एकसष्टीच्या निमित्ताने आशीर्वाद.

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...