बुधवार, ९ मार्च, २०२२

भिवंडीत घुमला नगरचा दम


श्रीकृष्ण करंडक पटकावणारा नगरचा कबड्डी संघ.

इतके जवळ आणि तरीही फार दूर..! कबड्डी-कबड्डीचा दम घुमवत चढाई करताना पकड झाल्यावर आक्रमकाने मोठ्या त्वेषाने मध्यरेषा गाठावी. त्याच्या हाताचा रेषेला स्पर्श होण्याआधीच संरक्षकांपैकी कोणी तो अलगद उचलावा आणि त्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम द्यावा! आक्रमक बाद होतो. इतक्या जवळ असूनही लक्ष्यापासून दूर राहिल्याची सल कायम राहते. त्याला वाट पाहावी लागते पुन्हा चढाई करण्याच्या संधीची.

नगरच्या पुरुष कबड्डी संघाने ही सल जवळपास २३ वर्षे बाळगली. ती दूर झाली मागच्या आठवड्यात. काल्हेरच्या (भिवंडी) बंदऱ्या मारुती क्रीडानगरीमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवडचाचणी कबड्डी स्पर्धेत नगरच्या नवख्या संघाने बाजी मारली. एकोणसत्तर वर्षांतले पहिले विजेतपद. उपान्त्य फेरीत मुंबई उपनगर आणि अंतिम सामन्यात मुंबई शहर अशा बलाढ्य संघांना पराभूत करण्याची किमया शंकर गदई आणि त्याच्या सहकाऱ्यांनी करून दाखवली.

राज्यातील अव्वल, पहिल्या नंबरचा संघ ठरण्याची ही कामगिरी लीलया झालेली नाही. विजेतेपदाकडे नेणारी आणि त्यावर शिक्कामोर्तब करणारी - दोन्ही लढती ‘जिंकू किंवा मरू’ एवढ्या अटीतटीच्या झाल्या. उत्तम संघभावना, आत्मविश्वास, दडपण झुगारून टाकण्याची आणि शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानण्याची वृत्ती ह्यामुळेच नगरला हे यश खेचून आणता आले. मैदानातील कौशल्यांबरोबरच कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता कणखरपणे उभे राहण्याची त्यांची तयारी होती. त्याचे पारितोषिक राज्य अजिंक्यपदाच्या रूपाने मिळाले.

नगरचा एकमेव अर्जुन पुरस्कारविजेता पंकज शिरसाट ह्या अभुतपूर्व विजयाचा साक्षीदार होता. त्याच्याच नेतृत्वाखाली इस्लामपूरमध्ये झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नगरने पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. यजमान सांगलीकडून त्यांचा पराभव झाला आणि विजयश्रीने हुलकावणी दिली. पण त्या स्पर्धेचा ‘हीरो’ पंकज ठरला होता. चतुरस्र चढायांनी त्याने तिथल्या शेकडो प्रेक्षकांना जिंकले होते. ह्या संघातून खेळलेले सातही जण हीरोच आहेत, असं पंकज अगदी दिलखुलासपणे म्हणतो.

श्रीकृष्ण करंडक ‘डार्क हॉर्स’ला 

फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी भिवंडीत सुरू झालेल्या एकोणसत्तराव्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नगरचा संघ तसा फार कुणाच्या खिसगणतीत नव्हता. अजिंक्यपदाचा श्रीकृष्ण करंडक सर्वसाधारण दिसणाऱ्या मुलांच्या ह्या संघाला मिळेल, असंही वाटलं नसेल कुणाला. ‘डार्क हॉर्स’ ठरला हा संघ. चाळीस वर्षांपूर्वी विश्वचषक जिंकणाऱ्या कपिलदेवच्या संघासारखा!

पुरुषांच्या ‘ब’ गटात बलाढ्य मुंबई शहर, सोलापूर, औरंगाबाद व नगरचा समावेश होता. पहिल्याच सामन्यात मुंबई शहराला बरोबरीत थोपवून नगरकरांनी चुणूक दाखवली. खरं तर पूर्वार्ध संपला तेव्हा नगरकडे ९-७ आघाडी होती. राहुल खाटीक, प्रफुल्ल झावरे, शंकर गदई ह्यांनी मिळवून दिलेली ही छोटी आघाडी निर्णायक ठरली नाही. अनुभवी मुंबईकरांनी नंतर जोर लावला आणि सामना २०-२० बरोबरीत सुटला.

गटातील नंतरचे दोन्ही सामने नगरच्या संघाने सहज जिंकले. कर्णधार शंकर, प्रफुल्ल व संभाजी वाबळे ह्यांच्या जोरदार खेळामुळे सोलापूरवर ५४-१३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. औरंगाबादचाही नगरपुढे टिकाव लागला नाही. ह्या गटात मुंबई शहर व नगर ह्यांचे समसमान पाच गुण होते. पण गुणफरक कमी असल्यामुळे मुंबई शहर संघाला गटात अव्वल स्थान मिळाले.

आता होती बाद फेरी. प्रत्येक सामना जिंकलाच पाहिजे. उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश करताना नगरच्या संघाने कोल्हापूर संघाला ४७-१५ अशी धूळ चारली. ह्या विजयात देवीदास जगताप, संभाजी वाबळे चमकले. उपान्त्यपूर्व फेरीत नंदुरबारला हरवताना (३३-२०) नगरने पूर्वार्धात व उत्तरार्धात एक-एक लोण चढविले. ह्या सामन्यात गदई व खाटीक ह्यांना उत्तम साथ मिळाली, ती राम आडागळेची.

नगरकरांची लढाऊ वृत्ती

नगरच्या संघाची आतापर्यंतची वाटचाल आश्वासक होती. त्याच पद्धतीच्या खेळातून उपान्त फेरी गाठली. समोर संघ होता मुंबई उपनगराचा. व्यावसायिक, सातत्याने खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असलेला, ज्याचं नाव ऐकूनच प्रतिस्पर्धी गळाठून जातो, असा संघ. इथेही नगरकरांनी लढाऊ वृत्ती दाखवली. नियमित वेळेत गुणफलक बरोबरी दाखवत होता. मग पाच-पाच चढायांच्या अलाहिदा डावात नगरचा संघ सरस ठरला. ही लढत ३३-३० (७-४) अशी जिंकून नगरने अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेत सलामीला गाठ पडलेलाच मुंबई शहरचा संघ अंतिम फेरीत नगरसमोर उभा होता. उत्तम कामगिरीचा इतिहास, प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळणारे, वर्षातले सात-आठ महिने विविध स्पर्धांमध्ये कस अजमावणारे खेळाडू असा बलाढ्य संघ. तुलनेने नगरचा संघ पोरसवदा. स्पर्धात्मक वातावरणाचा फारसा अनुभव नसलेला. जमेची बाजू एवढीच की, ह्या संघानेच आधी मुंबई शहरशी बरोबरी केलेली.

गमावण्यासारखं काहीच नसलेल्या नगरची सुरुवात धडाकेबाज होती. पण काही मिनिटांतच मुंबई शहरने चोख प्रत्युत्तर देत बाजू सावरली. मध्यंतराला मुंबई शहर संघाकडे १४-८ आघाडी होती. राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत निर्विवाद ठरावी, अशी आघाडी.

पण सामन्याचा उत्तरार्ध अधिक चुरशीचा झाला. सगळं दडपण झुगारून नगरची तरुण पोरं खेळली. मिनिटा-मिनिटाला पारडं बदलत होतं. पाच मिनिटं बाकी असताना नगरकडे एका गुणाची (२३-२२) आघाडी होती. ती तोडत मुंबईने तीन गुणांची आघाडी घेतली. अखेरच्या क्षणी नगरने २५-२५ अशी बरोबरी साधली. विजेता ठरविण्यासाठी झालेल्या ५-५ चढायांच्या डावातही बरोबरी (३१-३१) झाली.

सुवर्ण चढाई नि नवी आवृत्ती

कबड्डीचा राज्यविजेता ठरणार होता सुवर्ण चढाईतून. त्यासाठी पुन्हा नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणाऱ्या संघालाच चढाईची संधी मिळते. जो संघ चढाई करतो, त्याच्या यशाची खातरी अधिक असते, असे राज्य कबड्डी संघटनेचे माजी संयुक्त चिटणीस प्रा. सुनील जाधव ह्यांचे निरीक्षण. सुदैव म्हणा किंवा योगायोग म्हणा, शंकर गदईने नाणेफेक जिंकली. सुवर्ण चढाई करण्यासाठी तोच गेला. त्याने पहिल्याच फटक्यात बोनस गुण वसूल केला आणि कबड्डीच्या इतिहासाची नवी आवृत्ती लिहिली! तेवीस वर्षांपूर्वी हुलकावणी दिलेले स्वप्न आपलेसे झाले.

कोणत्याही खेळात एखादा संघ अजिंक्य ठरतो, तेव्हा त्यासाठी केलेली काही मेहनत असते. विचारपूर्वक केलेली आखणी असते. नगरच्या संघाचे प्रशिक्षक होते शंतनु पांडव. इस्लामपूरला उपविजयी ठरलेल्या संघाचे सदस्य. ते म्हणतात, ‘‘तेव्हा इस्लामपूर आणि आता भिवंडी. कबड्डीपटू म्हणून माझ्या आयुष्यातले हे दोन महत्त्वाचे, सुवर्णक्षण - तेवीस वर्षांच्या अंतराने आलेले.’’

स्वतःसाठी नको, तर संघासाठी खेळू

तुलनेनं नवख्या खेळाडूंचा समावेश असलेल्या ह्या संघावर कशी मेहनत घेतली? त्यांना कोणत्या चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या? शंतनु पांडव म्हणाले, ‘‘कबड्डी सांघिक खेळ आहे. कुणा एकाच्या खेळावर एखादा सामना जिंकता येतो; स्पर्धा नाही. निवडचाचणी असल्यामुळे काही खेळाडू स्वतःला(च) सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. पण मी सर्वांना सांगितलं की, स्वतःसाठी खेळाल, तर संघभावना राहणार नाही. मग संघ जिंकणार नाही. संघ विजयी झाला तर सर्वांचाच फायदा, हे त्यांना पटलं. सराव तसा  घेतला. नवीन, तरुण खेळाडूंचा हा संघ. मोठ्या स्पर्धा किंवा सलग एकत्र खेळण्याचा त्यांना अनुभव नव्हता. पण महत्त्वाचे म्हणजे हे सगळे किमान चार-पाच वर्षांपासून नियमित सराव करणारे आहेत. मूलभूत कौशल्यात सगळेच पक्के आहेत. त्यामुळे सांगितलेलं ते पटकन शिकत गेले.’’


प्रशिक्षक शंतनु पांडव आणि
कर्णधार शंकर गदई
कबड्डीचा खेळ आता अधिक गतिमान झाला नाही. तिसऱ्या अनुत्पादक चढाईचा (अनप्रॉडक्टिव्ह रेड) आणि चढाई तीस सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा नियम ह्यामुळे गती वाढली आहे. संरक्षण व आक्रमण ह्या दोन्ही आघाड्यांवर संघ सरस ठरला. एकदा बाद फेरी गाठल्यावर प्रत्येक सामना महत्त्वाचा ठरतो. त्यासाठी खेळाडूंची कशी तयारी केली? विशेषतः उपान्त्य सामना मुंबई उपनगरसारख्या बलाढ्य संघाबरोबर होता. शंतनु म्हणाले, ‘‘मुंबई उपनगरमध्ये मातब्बर, नाव असलेले, प्रो-कबड्डी लीगमध्ये दबदबा असलेले खेळाडू होते. ह्या नावांचं अजिबात दडपण घ्यायचं नाही, असं मी सगळ्यांना सांगितलं. त्यांना समजावलं की, पाच सामने खेळून आपण सेट झालो आहोत. तुमची क्षमता आहे म्हणूनच संघ इथपर्यंत पोहोचला. त्यांच्या नावावर जाऊ नका. आपण समान आहोत, हे समजून खेळा. मग खेळ आपोआप उत्कृष्ट होईल. त्यांनी हे अंगीकारलं, हे निकालानंतर दिसलंच.’’

‘‘अंतिम लढतीत जोरदार सुरुवात केल्यामुळे आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास जरा अतीच वाढला. त्याचा परिणाम असा झाला की, मध्यंतराच्या वेळी आपण मागं पडलो. मग ‘टाईमआऊट’च्या सोयीचा चांगला उपयोग केला. मुलांना थोडं रागवलो, थोडं समजून सांगितलं. अजूनही सामना जिंकता येईल, हे पटवून दिलं. पुढे काय झालं, ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. संघातल्या सगळ्यांचाच खेळ छान झाला. शेवटी हा सांघिकच खेळ आहे ना. शंकर, राहुल खाटीक, राम आडागळे, संभाजी वाबळे, देवीदास जगताप, प्रफुल्ल झावरे, राहुल धनवटे, आदित्य शिंदे... सगळेच संघासाठी खेळले.’’

श्वास कबड्डी...

मैदानात उतरण्याआधीचा सरावही फार महत्त्वाचा असतो - ‘नेट प्रॅक्टिस’. खो-खो, कबड्डी ह्या देशी खेळांच्या राज्य अजिंक्य स्पर्धांची पूर्वतयारी म्हणून जिल्हा संघाचं सराव शिबिर घेतलं जातं. संघभावना रुजण्यासाठी, कौशल्ये गिरवून पक्की करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बऱ्याच वेळा ही शिबिरं म्हणजे उपचार असतात. नगरच्या संघाला मात्र यंदा भेंडे (ता. नेवासे) इथं जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या शिबिराचा निश्चित फायदा झाला. रणवीर स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्यानं झालेल्या ह्या शिबिराचे ‘द्रोणाचार्य’ होते प्रशिक्षक सतीश मोरकर. त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्स प्रोफाईलवर सहज दिसतं - ‘श्वास कबड्डी - ध्यास कबड्डी - खेळ कबड्डी’!

भेंड्याच्या कबड्डी, कुस्ती आणि ॲथलेटिक्स ह्या खेळांचं प्रशिक्षण रणवीर क्लबमध्ये दिलं जातं. कबड्डी संघाचं शिबिर आम्ही घेतो, असं मोरकर ह्यांनी आग्रहानं सांगितलं. ह्याच क्लबच्या शंकर गदई, राहुल धनवडे, राम आडागळे, राहुल खाटिक ह्यांची नगरच्या संघात निवड झाली होती.


भेंड्यांमधील सराव शिबिरामुळं संघबांधणी भक्कम झाली.

आठ दिवसांच्या शिबिरात प्रामुख्याने फिटनेस व कौशल्ये गिरवणे ह्यांवर भर दिला होता, असं मोरकर ह्यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘‘दिवसातल्या दोन वेळांचं तंदुरुस्तीचं वेळापत्रक तयार केलं होतं. सकाळच्या सत्रात धावणे, वेट ट्रेनिंग ह्यासह कोन प्रॅक्टिस, शिडी प्रॅक्टिस होती. संध्याकाळी प्रत्यक्ष खेळातील कौशल्यांचा सराव केला जायचा. त्यात चढाई, कव्हर ह्यावर भर दिला.’’

शिबिरामुळं संघबांधणी


सराव शिबिराची जबाबदारी
घेणारे सतीश मोरकर
खेळाडूंचा दमसास वाढला पाहिजे, हालचाली सहजपणे व लवचीक व्हायला हव्यात, कव्हर कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे ह्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आलं. त्यासाठी एक पूर्ण दिवस जिम, एक दिवस लांब पल्ल्याचे पळणे, एक दिवस स्प्रिंट मारणे याचाही सराव करून घेण्यात आल्याचं मोरकर म्हणाले. खेळाडू एकदम तरबेज, पण त्याच्यात स्पर्धात्मक खेळण्याचा आत्मविश्वासच नसेल तर? त्यांचा आत्मविश्वास बळकट होईल, ह्याकडेही शिबिरात विशेष लक्ष देण्यात आलं. सकाळी पौष्टिक नाश्ता, दोन्ही वेळा व्यवस्थित जेवण होतं. दर दिवसाआड मांसाहार होता. ह्या शिबिरामुळं संघबांधणी उत्तम झाली, असं मोरकर ह्यांनी सांगितलं.

नगर जिल्हा कबड्डी संघटनेचं मुख्यालय श्रीरामपूरला होतं. ते नगरला आणण्याचा निर्णय कबड्डी महर्षी बुवा साळवी ह्यांनी घेतला. त्याची पहिली बातमी त्यांनी मला दिली होती. त्या गोष्टीला यंदा तीन दशकं झाली. ह्या काळात पुरुष-महिला, कुमार-कुमारी व किशोर-किशोरी ह्या गटांच्या आठ ते दहा राज्य स्पर्धांचं आयोजन नगरमध्ये झालं. ह्या संघटनेवर बुवांचं विशेष प्रेम होतं. बहुतेक सर्व स्पर्धांना ते पूर्ण काळ हजर असत. बुवा असते, तर नगरकरांच्या ह्या यशावर मनापासून खूश झाले असते, ह्यात शंकाच नाही.

............

‘एक जिवानं खेळलो म्हणून जिंकलो!’


छोट्या भावासह शंकर गदई

ह्या सगळ्या यशामागचं गणित संघाचा कर्णधार शंकर गदई अगदी सहजपणे त्याच्या ग्रामीण शैलीत सांगतो. तो म्हणाला, ‘‘आम्ही सगळे एक जिवानं राहायचो-खायचो, एक जिवानं खेळलो. कोणी मोठं नाही, कोणी छोटं नाही. सगळे एक जिवाचे! कर्णधार म्हणून माझं सगळे ऐकायचे. सामना संपल्यावर राहण्याच्या ठिकाणी आमची चर्चा व्हायची - आज काय चुकलं, उद्या कसं खेळायचं! प्रशिक्षक पांडवर सर, व्यवस्थापक मोरकर सर काय चुकलं - काय बरोबर, ते समजावून सांगायचे.’’

‘‘पूर्ण स्पर्धेचं म्हणून काही आमचं नियोजन नव्हतं. आजचा सामना मारायचा, एवढंच आमचं ठरलेलं असायचं. उद्याचं उद्या. एक एक सामना जिंकायचा, हेच आमचं टार्गेट होतं. मुंबई उपनगरविरुद्ध सेमीफायनल होती. मोरकर आणि पांडव सरांनी मोठा आत्मविश्वास दिला - तुम्ही जिंकू शकता. आम्ही ठरवलं की ते खेळाडू आणि आपणही. त्यांच्यात नि आपल्यात वेगळं काही नाही. एवढा सामना जिंकायचाच, असा जबरी कॉन्फिडन्स होता आमच्यामध्ये,’’ शंकर म्हणाला.

टर्निंग पॉइंट

अंतिम लढतीतील एक टर्निंग पॉइंटबद्दल शंकर तपशिलानं बोलला. ‘‘मॅचची सुरुवात चांगली झाली. पण नंतर आमच्यावर आठचं लीड बसलं. सगळ्या मुलांची तोंडं बारीक झालं. मी म्हणालो, ’टेन्शन घेऊ नका रे. शेवटच्या दोन-तीन मिनिटांत मॅच रिकव्हर करू.’ कॅप्टन असं म्हणतो म्हटल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढला. वेळ संपत आली होती. आम्ही दोघंच आत होतो - एक कव्हर आणि मी रेडर. पाच गुणांनी मागं होतो आम्ही. मग मी ‘टाईम आऊट’ घेतला. सरांना म्हणालो, एक चेंज करू. आदित्य शिंदे आत आला. त्याचा खेळ मुंबईला माहीत नव्हता. त्याने एक बोनस आणला. मग एक पकड केली. अशा पद्धतीने बरोबरी साधली. तो होता टर्निंग पॉइंट. पाच-पाच चढायांमध्येही तेच झालं. आता ‘गोल्डन रेड’ची वेळ आली.’’

‘अशी मॅच झाली नाही,’ असं सांगताना शंकरच्या आवाजातला थरार लपत नाही. निर्णायक चढाईबद्दल तो म्हणाला, ‘‘टॉस जिंकला. नशीब भारी. मीच रेड मारली. मुलं सांगत होती अशी मार तशी मार. माझा कॉन्फिडन्स होता. समोरची टीम हबकलेली होती. मी बोनस टाकणार नाही, असं त्यांना वाटत होत. रेड टाकायला गेला आणि लगेच बोनस मारून मध्य रेषेजवळ रेंगाळत राहिलो. कोणाला वाटत नव्हतं नगरची ही टीम फायनल मारील म्हणून!’’

खरं खेळत होतो आम्ही

‘‘स्पर्धा मातीवर झाली, ते आमच्या फायद्याचंच ठरलं. मॅटचा आणि आमचा संपर्कच नाही आलेला. आम्हाला भरपूर लोकांची साथ मिळाली. आम्ही जिंकावं असं खूप जणांना वाटत होतं. कारण खरं खेळत होतो आम्ही. कव्हरसेट एक जिवाचा. आम्ही कुणी सिलेक्शनसाठी नाही, तर टीम म्हणून खेळलो. तसं नसतं तर आम्ही आधीच हरलो असतो,’’ असंही शंकर म्हणाला.

....

जबरदस्त टीम स्पिरीट

नगरच्या संघाचं यश पाहायला आणि नंतर ह्या मुलांचं कौतुक करायला अर्जुन पुरस्कारविजेता पंकज शिरसाट त्या रात्री भिवंडीत होता. तो म्हणाला, ‘‘मस्तच झाला सामना. मुंबई उपनगरविरुद्धचा सामना लॅपटॉपवर पाहिला. पोरं जिंकली. मग म्हणालो की, आता फायनल थेट पाहायला पाहिजे. आपली मुलं खूप शांतपणे खेळली. मैदानावरचा त्यांचा वावर मॅच्युअर होता. सुरुवात एकदम चांगली. त्याच्यानंतर जवळपास दहा मिनिटं आपल्याला पॉइंटच नव्हता. मुलं हताश दिसत होती. मला वाटलं, एक गुण मिळाला की, त्यांच्यात उत्साह संचारेल. आपण पुन्हा मॅचमध्ये येऊ. तसंच झालं. एक बदल केला आणि पुढं निकालच बदलला. ही पोरं मोठ्या चुका करतील, असं पूर्ण सामन्यात कधीच वाटलं नाही. मैदानावर एकमेकांवर ओरडणं नाही, भांडणं नाहीत. ही संघभावना आवडली आपल्याला!’’

इस्लामपूरच्या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या संघाचं नेतृत्व पंकजने केलं. तो संघ आणि हा संघ ह्यांची तुलना करता येईल? पंकज म्हणाला, ‘‘दोन्ही टीममध्ये भरपूर गुणवत्ता आहे. त्या वेळी एक-दोन चुका झाल्या आमच्या. आताच्या संघात राइडर भरपूर आहेत - स्वतः शंकर, खाटिक, देविदास, झावरे, शिंदे. आमच्या टीममध्ये मला पर्याय नव्हता त्या वेळी. ते जाऊ द्या... ही मुलं खूप चांगलं खेळली. टीम म्हणून खेळ झाला. कुणा एका खेळाडूनं जिंकून दिलं नाही. कॅप्टन छान. बाकीची मुलंही छान. वय कमी आहे. खेळायला मिळेल आणि अजून चांगलं खेळतील, एवढं नक्की.’’

-------------

#kabaddi #Nagar #kabaddi_state_championship #maharashtra #maharashtra_kabaddi #pankaj_shirsat #shankar_gadai #kabaddiproleague #Bhivandi #Mumbai #team_spirit

४ टिप्पण्या:

  1. हा जो 'नगरी दम' भरला, तो आम्हाला भावला! खरे तर अशाच गोष्टी लोकांसमोर यायला हव्यात.

    कबड्डीमध्ये इतके मोहाचे क्षण व वैयक्तिक तडजोडी आहेत. त्यावर मात करणे खूप कठीण आहे; त्या पेक्षा विजेतेपद सोपे आहे! या सर्वांवर मात करून विजयाला गवसणी घालणाऱ्या सर्व शिलेदारांचे आणि पडद्याआड राहणाऱ्या साथीदारांचे मनःपूर्वक अभिनंदन.

    या सर्वांना प्रकाशात आणणे आवश्यक होते. वाचताना नेहमीप्रमाणेच मजा आली.
    - मंदार देशमुख, नाशिक जिल्हा खो-खो संघटना

    उत्तर द्याहटवा
  2. त्यानं बालपणापासून मैदानात घेऊन येणारा,बोटला धरून शिकवणार कोण हे नाही का महत्वाचे राहुल धनवडे चे वडील शेळ्या मागे जातात,राम,शंकर यांचे वडील तोडायला जातात यांना आपले लेखणीतून परत न्याय द्यावा

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...