पंतप्रधान मोदी ह्यांच्या हस्ते सत्कार. |
शंकरराव कोल्हे ह्यांचा ‘सहकारतज्ज्ञ’ असा उल्लेख आज-उद्या-परवाच्या बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांतील संपादकीय पानांवर प्रसिद्ध होणाऱ्या स्फुटांमध्ये होईल. पण फक्त तेवढंच बिरूद त्यांच्यावर अन्याय करणारं असेल. सहकाराबरोबरच विविध क्षेत्रांचा सखोल अभ्यास असणारा, स्वतःची ठाम मतं असणारा आणि ती व्यक्त करणारा हा नेता होता.
‘सहकार-महर्षी’, ‘सहकार-सम्राट’ अशी पदवीसदृश विशेषणं माध्यमांमधून कित्येक वर्षांपासून वापरली जातात. त्यातून बहुदा उपरोध, काहीसा हेवा, क्वचित तुच्छता व्यक्त होत असते. ग्रामीण महाराष्ट्र, विशेषतः पश्चिम महाराष्ट्र व्यापलेल्या सहकार चळवळीने असे ‘महर्षी’ वा ‘सम्राट’ निर्माण केले, ह्यात काही खोटं नाही. पण ह्या उपरोधाच्या आणि हेव्याच्या पार पुढे जाऊन काम करणारे नेते ह्याच चळवळीनं दिले. त्यांच्या कामानं त्या परिसराचा, तालुक्याचा कायापालट झाला. भले त्या परिसराला ‘नेत्याचं संस्थान’ म्हणून हिणवलं गेलं असेल.
काळे आणि कोल्हे
राजकारण्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल तुच्छतेनं बोललं जाण्याच्या आणि बहुतांशी प्रमाणात ते वास्तव असण्याच्या काळात हे दोन्ही शंकरराव उच्चशिक्षित होते. आज ज्याचा ‘व्यावसायिक शिक्षण’ म्हणून खास उल्लेख होतो, ते त्यांनी मिळवलं होतं. दत्ता देशमुख, शंकरराव काळे १९४०च्या दशकातले अभियंते होते. पुण्याच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळविली होती. शंकरराव कोल्हे कृषिशास्त्राचे पदवीधर होते. त्यानंतर युरोप आणि अमेरिकेत त्यांनी ह्या विषयाचं पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलं.
सहकार, शेती, पाणी, शिक्षण हे कोल्हे ह्यांच्या आवडीचे विषय. समोर ऐकणारा असेल, तर त्या विषयावर तासन् तास बोलण्याची त्यांची क्षमता होती. तो अनुभव मी एकदा घेतला. ‘लोकसत्ता’ची नगर आवृत्ती चालू होऊन जेमतेम वर्ष झालं असेल. आम्ही काही मित्र येवल्याहून नगरकडे येत होतो. त्या वेळी कोल्हे ह्यांच्या पुण्या-मुंबईतील जनसंपर्काची जबाबदारी अभिनंदन थोरात पाहत होते. अभिनंदन त्या दिवशी कोपरगाव येथे होते. त्यांना भेटायला म्हणून आम्ही गेलो.
संजीवनी साखर कारखान्यात शंकरराव कोल्हे होतेच. अभिनंदन ह्यांनी त्यांची भेट घालून दिली. त्या काळात ‘लोकसत्ता’ त्यांचं आवडतं, अगदी प्रेमाचं दैनिक होतं. त्या दैनिकाचा माणूस आहे म्हटल्यावर त्यांनी खळखळ न करता वेळ दिला. नंतरचा सव्वा ते दीड तास साखर, पाणी, परदेशातली शेती ह्या विषयावर अखंड बोलत राहिले. आम्ही सारे मित्र त्या वाक्गंगेमुळे आणि त्यातून ओसंडून वाहत असलेल्या ज्ञानप्रवाहामुळे अचंबित झालो. सारा वेळ आम्ही श्रवणभक्ती केली. ‘पत्रकार’ असल्याची जाणीव कधी तरी व्हायची. एखादा प्रश्न विचारायला जायचो. त्याला थोडक्यात उत्तर देऊन कोल्हेसाहेब आपली बॅटिंग मागील डावावरून पुढे अशा रीतीनं चालू ठेवायचे. ‘साहेब, ही मुलाखत नाही बरं. सहज गप्पा आहेत,’ असं अभिनंदन ह्यांनी त्यांना सांगितलं. हे कुठं छापून येणार नाही हे माहीत असूनही ‘...शहाणे करुनी सोडावे सकळ जन’ ह्या बाण्याप्रमाणे त्यांनी आम्हा चार-पाच मित्रांना खूप काही सांगितलं.
मुलाखतीवरून एक गंमत आठवली. नव्वदीच्या दशकात कोल्हेसाहेब पुण्याच्या एका संपादकांचे लाडके होते. छोट्या-मोठ्या गोष्टींबाबत त्यांना कोल्हेसाहेबांचे मत महत्त्वाचं वाटायचं (तसं ते असायचंही, हा भाग वेगळा!) आणि ते नगरच्या कार्यालयातील प्रमुखाला ते घ्यायला सांगायचे. एकदा त्यांनी नगर कार्यालयातील ह्या सहकाऱ्याला कोल्हेसाहेबांची मुलाखत घेऊन यायला सांगितलं. बहुतेक पाण्याचा विषय असावा. नगरहून हा पत्रकार प्रश्नांची पद्धतशीर यादी बनवून गेला.
आपलीच मुलाखत आपल्याशी
कोल्हेसाहेबांनी ते प्रश्न पाहिले. मग ते त्याच्या पद्धतीनं गडगडाटी हसले. ‘मुलाखत कशी घ्यायची मी सांगतो,’ असं म्हणत त्यांनीच स्वतःला प्रश्न विचारले आणि त्याची (सविस्तर) उत्तरं दिली! निरोप घेताना ‘झाली ना चांगली मुलाखत?’ असं विचारायलाही ते विसरले नाहीत. त्यांचं हसू मनमोकळं, दिलखुलास होतं. आमच्या त्या गप्पांमध्येही ते अनुभवायला आलं.
पत्रकारांचं ‘पक्षांतर’
असंच एकदा कोल्हेसाहेब ‘लोकसत्ता’च्या पुणे कार्यालयात आले होते. मी तेव्हा तिथेच होतो. संपादकांनी ‘हा तुमच्या नगरचा बरं का!’ अशी ओळख करून दिली त्यांना माझी. संपादकीय विभागातल्या मंडळींशी त्यांनी तासभर ऐसपैस गप्पा मारल्या. त्या ओघात कुणी तरी नेत्यांच्या पक्षांतराबद्दल विचारलं. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही लोक नाही का, ह्या पेपरमधून त्या पेपरमध्ये जात? कुणी वृत्तसंपादक केलं म्हणून जातं, तर कुणाला संपादक व्हायचं असतं म्हणून तो दुसऱ्या पेपरमध्ये जातो. तसंच असतं हे.’’
नव्वदीच्या दशकानंतर वर्तमानपत्रांचे वर्धापनदिन साजरे करण्याची आणि त्यानिमित्त विशेष पुरवण्या प्रसिद्ध करण्याची पद्धत रूढ झाली. त्यातून मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळायच्या. आधीच्या काळात अशा पुरवण्यांच्या माध्यमातून वाचकांना वेगळं काही वाचायला मिळायचं बरंचसं. (आता त्या निव्वळ जाहिरात पुरवण्या झाल्या आहेत.) अशाच एका वर्धापनदिनासाठी जाहिरातीची विनंती करण्यासाठी जाहिरात विभागाचे दोघे-तिघे कोल्हेसाहेबांकडे गेले. वजन पडावं म्हणून सोबत संपादकीय विभागप्रमुख होतेच. विषय निघाला आणि जाहिरातीची अपेक्षा सांगितली गेली. त्यावर कोल्हेसाहेब म्हणाले, ‘‘अहो साहेब, तुमचा वर्धापनदिन. त्या आनंदानिमित्त तुम्ही आम्हाला, वाचकांना काही तरी द्यायचं. ते सोडून आम्हालाच मागत बसलात!’’ अर्थात नंतर त्यांनी जाहिरात मंजूर केली, हा भाग वेगळा.
आम्ही तिघं-चौघं, पोपट पवार, निर्मल थोरात आणि मी परवाच नगरच्या सावेडीच्या ‘स्वीट होम’मध्ये जेवायला गेलो होतो. निर्मलला अचानक आठवलं नि तो म्हणाला, ‘‘कोल्हेसाहेब नेहमी इथंच जेवायचे बरं का.’’ मला ते माहीत होतं. त्यांना ‘बॉइल्ड फूड’ लागायचं - उकडलेल्या भाज्या. असंच एकदा ते संध्याकाळी ‘लोकसत्ता’च्या नगर कार्यालयात आले होते. तिथून पुण्याला जाणार होते. पोहोचायला रात्रीचे साडेनऊ-दहा वाजणार. अचानक त्यांनी मला सांगितलं, ‘‘अहो, तेवढा अभिनंदनला फोन करा हो. त्याला सांगा, मी येतोय. ते आमचं जेवण कुठं मिळतं त्यालाच चांगला माहितीय. नाही तर उपाशी राहायचो मी.’’ आणि नंतर तेच प्रसिद्ध गडगडाटी हास्य.
‘उत्तम वाचक’ अशीही कोल्हेसाहेबांची ओळख होती. ‘लोकसत्ता’मध्ये त्या काळी रविवारी प्रसिद्ध होणारे ‘नगरी-नगरी’ सदर त्यांना आवडायचे, असे त्यांचे स्वीय सहायक वीरेंद्र जोशी नेहमी सांगत. त्या सदरात प्रसिद्ध झालेले ‘पत्रकार लोग आयोडेक्स मलिए, पाकिट लेने के काम चलिए’ हे टिपण त्यांना खूप आवडलं. इतकं की, त्यांनी तेव्हाचे मुख्य वार्ताहर महादेव कुलकर्णी ह्यांना फोन करून ‘तुम्ही रोज का नाही छापत हे सदर?’ असं विचारलं.
काळे आणि कोल्हे ह्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या ऐन मध्यावर कोपरगावच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला. ऊसमळे जगतील का आणि कारखाने टिकतील का, अशी अवस्था होती. दोघेही त्या प्रश्नाला आपापल्या पद्धतीने भिडले. त्यांनी परस्परांवर जोरदार टीकाही केली. पण ती करताना मूळ प्रश्नाचा विसर पडणार नाही, ह्याची पूर्ण काळजी घेतली. तुटेपर्यंत ताणायचं नाही, हाच दोघांच्याही राजकारणाचा मंत्र होता.
मंत्रिपदाची छोटी इनिंग्स
लायक असूनही ह्या दोन्ही नेत्यांना फार काळ सत्ता उपभोगता आली नाही. शंकरराव काळे ह्यांना तर केवळ एकदा राज्यमंत्रिपदावर समाधान मानावं लागलं. पुरोगामी लोकशाही दलाच्या सरकारमध्ये. कोल्हे ह्यांना मंत्रिपदासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागली. वयाच्या एकसष्टीत म्हणजे १९९०मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. तेही पूर्ण पाच वर्षांसाठीच नाहीच. महसूल, कृषी व फलोत्पादन, परिवहन, राज्य उत्पादनशुल्क अशी विविध खाती त्यांनी छोट्या इनिंग्समध्ये संभाळली. त्यानंतर तीस वर्षांत कोपरगाव मतदारसंघाच्या वाट्याला काही लाल दिव्याची गाडी आली नाही.
‘एन्रॉन’विरोधात सत्याग्रह
जागतिकीकरण उंबरठ्यावर असताना त्याची चाहूल लागून त्याबद्दल बोलणारे जिल्ह्यात दोन नेते होते - बाळासाहेब विखे पाटील आणि शंकरराव कोल्हे. सहकार चळवळीच्या माध्यमातून शिक्षणाचेही मोठे काम झाले. त्याची नगर जिल्ह्यात अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. संजीवनी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय त्यापैकीच एक. गुणवत्तेबद्दल हे महाविद्यालय ओळखले जाते. ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणखी दोन वेगळे उपक्रम चालू झाले. कोल्हेसाहेबांचे सहकारी लहानुभाऊ नागरे ह्यांना सैनिकी शिक्षणाबद्दल मोठी ओढ. त्याची त्यांना जाण होती आणि उपयुक्तताही माहीत होती. लष्करातील मोठ्या अधिकाऱ्यांशी त्यांची ओळख होती. त्यातूनच ‘संजीवनी प्री-कॅडेट ट्रेनिंग सेंटर’ चालू झाले. आणखी एक नोंद घेण्यासारखी वेगळी संस्था म्हणजे - ‘संजीवनी मोटर ड्रायव्हिंग स्कूल’. सह-वीजनिर्मिती, इथेनॉल निर्मिती, आधुनिकीकरण हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय होते. त्यांच्या राजकारणाएवढ्याच, किंबहुना काकणभर अधिक महत्त्वाच्या ह्याच गोष्टी होत.
कोल्हेसाहेब आणखी एका गोष्टीमुळे लक्षात राहिले. संजीवनी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखान्याला त्यांचे नाव देण्याचा ठराव आला. त्याला त्यांनी त्या क्षणी विरोध केला! आपण संस्थापक असलो, तरी आपल्या नावाने कारखाना ओळखला जाऊ नये, अशी त्यांची भूमिका होती. जिल्ह्यात त्या काळात आलेल्या नामांतराच्या लाटेत ती वेगळी होती. पण त्यांची ही भूमिका त्यांच्याच कार्यकर्त्यांना पटली नि पचली नाही. काही काळानंतर त्यांचे नाव कारखान्याला लाभले.
साधारण गेल्या दहा वर्षांपासून कोल्हेसाहेब राजकारणापासून लांबच होते. प्रकृतीमुळे जाहीर समारंभातील वावरावरही मर्यादा आल्या होत्या. सहकार-शेती-शिक्षण-राजकारणाच्या इतिहासातील एक प्रकरण त्यांच्या निधनामुळे संपले!
---
(सर्व छायाचित्रे - कोपरगावचे पत्रकार महेश जोशी ह्यांच्या सौजन्याने)
---
#ShankarraoKolhe #kopargaon #NagarPolitics #cooperative #sanjeevani #Kale_Kolhe #politics #maharashtapolitics #sugarindustries #enron
अतिशय दिग्गज नेते ह्या जिल्ह्यात होऊन गेले. खूप यथार्थ वर्णन केलेत.
उत्तर द्याहटवा- चंद्रशेखर आंबेकर
मस्त !!!
उत्तर द्याहटवाखरं तर निधनानंतरचा लेख आहे पण गुंतून गेलो वाचताना !!!👌👌👌👌
- रोहित हरीप, मुंबई
मला आठवते तसे, सन १९७३-७४मध्ये संजीवनी कारखान्यावर पाणी प्रश्नाबाबत कोल्हेसाहेबांच्या बैठकीत हजर राहण्याचा योग घडला होता. निश्चित चांगला क्षेत्रीय अनुभव मिळाला. आपल्या लेखाने या जुन्या आठवणीला उजाळा मिळाला.
उत्तर द्याहटवामला वाटते आपल्या बँकेत अनेकांचे खाते असावे. या खात्यामध्ये अनेक आठवणी शब्दबद्ध असतील. म्हणूनच इतक्या तत्परतेने साऱ्या आठवणींचा आढावा घेऊन आपण लेख लिहिता याची दाद देतो.
- श्रीराम वांढरे, भिंगार, नगर