बुधवार, ३० मार्च, २०२२

कवी(?) असणं, कविता लिहिणं...

‘तू कविता(ही) लिहितोस?’ काहींनी दोन दिवसांत हा प्रश्न थेट विचारला. काहींच्या बोलण्या-प्रतिक्रियांतून तो जाणवला. ह्याचं कारण दैनिक लोकसत्ताच्या रविवारच्या (दि. २७ मार्च) अंकात प्रसिद्ध झालेली अस्मादिकांची रचना. दैनिक लोकसत्तानं ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज. शेळके ह्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या ‘कविता मनोमनी’ उपक्रमाचं निमित्त. कवयित्री नीरजा व कवी दासू वैद्य ह्या जोडगोळीनं पसंतीची मोहोर उठविलेल्या १६ कवितांपैकी एक.

मित्रांच्या-स्नेह्यांच्या ह्या प्रश्नानंतर मी स्वतःलाही विचारलं - ‘तू कवी आहेस का?’ ह्या प्रश्नाचं मनातल्या मनातलं उत्तर तरी ‘नाही!’ असंच आहे. ते होकारार्थी आलेलं आवडेल. मुंबईच्या आर. जे. गौरी कुलकर्णी ह्यांनी लिहिलं होतं की, कमीत कमी शब्दांमध्ये भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे कविता. त्यांची ही प्रतिक्रिया अगदी अलीकडची असल्यानं अजून लक्षात राहिलेली.

कवी नाही, असं जाहीरपणे मान्य केलं, तरी नावावर काही कविता आहेत. त्या छापून आल्या आहेत. विनायक लिमये आणि प्रदीप कुलकर्णी ह्यांच्या आग्रहामुळे ‘शब्ददीप’ दिवाळी अंकामध्ये सलग दोन वर्षं कविता प्रसिद्ध झाल्या. ‘सकाळ साप्ताहिक’च्या दिवाळी अंकातही एक कविता प्रसिद्ध झाली. ती माझी सर्वांत लाडकी कविता. शास्त्रानुसार त्या कितपत कविता होत्या, ह्याबाबत मला (काहीशी) शंका आहे. पण तशी ती घेणं वा व्यक्त करणं योग्य नाही. कारण तसं करणं म्हणजे लिहायला लावणाऱ्या, निवड करणाऱ्या  आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या संपादकांवर अन्याय केल्यासारखं आहे.

ह्या प्रसिद्ध झाल्या एवढ्याच कविता मी प्रसवल्या असं मुळीच नाही. साधारण २०११पासून तत्कालीन महत्त्वाच्या घडामोडींवर मुक्तछंदात लिहू लागलो. त्याचं नामकरण ‘पद्याचा आभास निर्माण करणारं गद्य’ किंवा ‘पद्यासारखं वाटणारं गद्य’ असं केलं. चार वर्षांच्या काळात अशा साधारण पन्नास-साठ रचना झाल्या. त्यातील काही ‘रविवार जत्रा’च्या विशेषांकात व दिवाळी अंकात प्रसिद्ध झाल्या.

ह्या रचना लिहीत होतो, तेव्हा फेसबुकवर वावरत नव्हतो. मग मी ओळखीच्या पाच-पंचवीस जणांना त्या इ-मेलने पाठवत होतो. त्याचं खूप जणांनी कौतुक केलं. ‘आप’चा उदय झाला तेव्हाची परिस्थिती, नारायणदत्त तिवारी ह्यांच्या मुलानं खटला जिंकून त्यांना आपलं जनकत्व स्वीकारायला भाग पाडणं, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ह्यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, पुण्यात आलेल्या नरेंद्र मोदी ह्यांना लतादीदींना पंतप्रधान होण्यासाठी दिलेल्या शुभेच्छा... ह्या आणि अशा काही विषयावरच्या कविता मनापासून लिहिल्या होत्या.

दैनिक सकाळमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या ‘ढिंग टांग’ सदरासाठी बदली खेळाडू म्हणून भूमिका बजावताना तीन-चार कविता लिहिल्या. मोदी सरकारचा दुसरा वर्धापनदिन, पाऊस आल्यावर काय होतं आणि लेखक मुरुगन ह्यांच्याबाबत न्यायालयानं दिलेला निर्णय ह्या त्यातील मला आवडलेल्या रचना. त्यांना नाद आहे आणि त्या मीटरमध्ये आहेत. दैनिकाच्या वाचकाला समजेल, आवडेल, पचेल नि पटेल अशी शब्दरचना त्यात मला बऱ्यापैकी साधली आहे. (त्यातल्या काही कविता ह्याच ब्लॉगवर ‘पद्यासारखं गद्य’ सदरात पाहायला मिळतील.)

‘पद्यासारखं वाटणारं गद्य’ची संख्या वाढली, तेव्हा त्यांचा संग्रह प्रकाशित व्हावा, असंही वाटू लागलं. काहींनी तयारी दाखवली. पण प्रकरण पुढं सरकलंच नाही. ह्यातल्या काही रचनांसाठी प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार प्रशांत कुलकर्णी ह्यांनी त्या वेळी अर्कचित्रंही काढून दिली. पण संग्रहच आला नाही आणि ते नाराज झाले. अगदी स्वाभाविक! त्यांची नाराजी दूर करणं मला अजूनही शक्य झालेलं नाही.

अलीकडच्या तीन-चार वर्षांत अशा व्यंग्यकविता लिहिणं थांबलं. कारण माहीत नाही. आतून लिहावं वाटावं लागतं, तसं वाटलं नाही. अर्थात अजून एक कारण आहे - मला उत्स्फूर्त सुचत नाही. एखाद-दोन ओळी सुचतात किंवा मध्यवर्ती कल्पना मनात येते. त्यानुसार पंचवीस-तीस ओळींची कविता लिहिण्यासाठी ती घटना मला पुनःपुन्हा वाचावी लागते. सहसा रात्रीनंतर बैठक जमवावी लागते. एका प्रयत्नात मनासारखं लिहून होत नाहीच. प्रयत्न करावे लागतात. शब्द बदलावे लागतात. आता काय होतंय की, एखादी घटना घडली की, सामाजिक माध्यमांवर त्याच्यावर तातडीने प्रतिक्रिया उमटतात. त्यातल्या खूप प्रतिक्रिया चटकदार, धारदार, नेमक्या असतात. त्या वाचल्यावर ‘आपण काय वेगळं लिहिणार’ असं वाटतं आणि उत्साह मावळतो.

असो. ‘कविता मनोमनी’ उपक्रमाच्या बातम्या वाचल्या आणि वाटलं की, आता लिहावं. कविता सादर करण्याच्या मुदतीच्या दोन दिवस आधी एक कल्पना मनात घोळत होती. तिलाच शब्दरूप द्यायचं ठरवलं होतं. शेवटचा दिवस उगवला, तरी प्रत्यक्षात एक ओळही लिहून झाली नव्हती. ‘पाठविली का कविता?’ असं मित्रानं रात्री दहाच्या सुमारास विचारलं आणि जाग आली. संगणक उघडून बसलो आणि आधी सुचलेलं काहीच आठवेना. मित्राला शब्द दिला म्हणून लिहायचंच असं ठरवलं. साधारण साडेदहा ते रात्री पावणेबारा असं झगडत राहिले. संगणकाच्या वर्डपॅडवर बरंच काही लिहिलं आणि खोडलं. त्यातून जे राहिलं ते मुदत संपण्याच्या जेमतेम पाच मिनिटं आधी इ-मेलवरून पाठवून दिलं.

निकाल कधी लागणार, ह्याची काही कल्पना नव्हती. कविता प्रसिद्ध झाली त्या रविवारी मी सकाळीच प्रवासासाठी निघालो. आपली कविता परीक्षकांना पसंत पडली, हे मला थेट संध्याकाळी समजलं. योगायोग किंवा गंमत अशी की, ‘लोकसत्ता - तरुण तेजांकित’ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमस्थळीच मला ही बातमी कळली!

अशी आहे ती कविता...



नपुसंकलिंगी...

एकटेपणाचा खूप खूप

कंटाळा आला म्हणून

आणि धावत्या जगाबरोबर

दोन पावलं चालत

थोडं ‘सोशल’ व्हावं म्हणून

भराभरा, उत्साहाने

सामाजिक माध्यमांवर

‘लॉग-इन’ झालो

रोज नवनवे पाहत राहिलो

आवडल्याक्षणी दाद देत राहिलो

अंगठा, बदाम, हसरा चेहरा

दुःखी आणि काळजी दाखवणारा

 

यांच्या-त्यांच्या गटात येण्याचं

निमंत्रण ह्यांनी-त्यांनी दिलं

‘सहर्ष’ म्हणत स्वीकारताना

टक्क डोळ्यांनी स्वप्न पाहिलं

आता लाईक वाढतील

प्रतिक्रिया लिहितील

‘छान लिहिता हं’ म्हणत

कुणी कौतुक करतील


अपेक्षिलं तसं काहीच नाही झालं

त्यांच्यात राहूनही त्यांचा न झालो

ह्यांच्यात असूनही एकटाच पडलो


‘बघता काय सामील व्हा’

आवाहनावर गप्प बसलो,

म्हणून काहींनी धुत्कारलं

पलीकडच्याला कचकचीत

शिव्या देत नाही,

म्हणताना काहींनी फटकारलं

धाड घालणाऱ्या ट्रोलांना

जणू आमंत्रण दिलं


मग ह्यांनी मला जात विचारली

उत्तर देणं टाळलं

मग त्यांनी मला धर्म विचारला

ओठ न उघडणं पसंत केलं

आमचा? त्यांचा? की कुंपणावरचा?

सवाल होता त्यांचा लाखमोलाचा


कुणी पाकिस्तानात धाडलं

कुणी युरेशियात पाठवलं

आणखी कुणी आफ्रिकेत जा म्हटलं

थोडक्यात, आपला म्हणायला

सगळ्यांनी त्वेषानं नाकारलं

मौनामुळं सगळंच बिघडलं


बधिरपणाला कंटाळून माझ्या

पिच्छा सोडून जातानाही पिचकारले,

‘xxला, ‘हे ’ माणसांतही जमा नाही!’

----------

#कविता  #कवी #कविता_मनोमनी #कविता_स्पर्धा #लोकसत्ता #पद्यासारखं_गद्य  #सामाजिक_माध्यमे #सोशल_मीडिया

२१ टिप्पण्या:

  1. अभिनंदन ! कविराज!!
    तू एक यशस्वी लेखक आहेस हे मला
    माहित होतं पण कविता पण छान
    करतोस !!
    पण एक सांगू तुझे लेखच मला
    भावतात !विपुल शब्दसंपत्ती
    ओघवतं लिखाण क्या बात है !!!
    🙏🙏
    - पी. बी. देशमुख, दहिसर, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  2. कमाल आहे.
    तूही कविता करतोस?
    छान आहे.
    आपण वेगळ्याच गटात येतो आता...
    - विवेक विसाळ, पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. खूपच सुंदर... ,कविता खूप भावली...
    शेवटची ओळ तर अप्रतिमच.
    ही कविता आजच्या वास्तवाचे शब्दबिंब आहे.
    - आनंदलहरी

    उत्तर द्याहटवा
  4. सुंदर💐💐
    खूप छान लिहिता.
    - सावित्री जगदाळे

    उत्तर द्याहटवा
  5. काही कारणामुळे रविवारचा लोकसत्ता वाचला गेला नाही आणि तुमचं अभिनंदन करण्याची संधी हुकली. ' पद्यासारखं वाटणारं गद्य ' लिहिणाऱ्यांचा महापूर आलेला आहे; त्यांत ' निःसत्त्व ' च अधिक. भेदक, मनाला भिडणारा एखादाच; तुमच्यासारखा. तुम्ही-आम्ही सगळेच आज ' नपुंसक ' झालेले आहोत, पण ते कबूल करण्याचं धैर्य दाखवणाराही एखादाच; तुमच्यासारखा.
    - मृदुला जोशी, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  6. बधिर, तटस्थ वृत्तीचं पद्यासारखं गद्य झकास 👌

    उत्तर द्याहटवा
  7. कविता जीवनाची
    आजच्या जगण्याची
    - हरिहर धुतमल, लोहा (जि. नांदेड)

    उत्तर द्याहटवा
  8. ‘खिडकी’तून डोकावल्यावर झरोक्यातून ‘पद्मासारखं गद्य’चा छान सूर्यकिरण हाती आला.
    - स्वाती लक्ष्मण लोंढे, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  9. प्रिय सतीश.
    कवी आणि कवितेबद्दल तुझ्यासाठी पुढील चारोळी -

    कवीमनाला असतात असंख्य कंगोरे।
    जसे कल्पनाविश्वातील अतर्क्य मनोरे।।

    अवनीवर अवतरती अनंत ब्रह्मीचे तारे।
    उजळे प्रकाश गगनी शब्दांचे निखारे।।

    - अमित भट, दक्षिण कोरिया

    उत्तर द्याहटवा
  10. ‘खिडकी’तून कविताही डोकावते का, आणि इतकं कवितेतून खरं लिहायला शिकवते का?
    wonderful!
    - श्री. के. वनपाल

    उत्तर द्याहटवा
  11. छान आहे कविता ही आणि त्याबद्दलचे स्फुटही.

    कविता एकदम ...टक्क... डोळे उघडायला लावते.. विचार करण्यासाठी खडबडून जागे करते..उत्तम.

    - सौ. स्वाती वर्तक

    उत्तर द्याहटवा
  12. Keep Composing! Wish you great success!

    - Suresh Deolalkar

    उत्तर द्याहटवा
  13. कविता करूनही स्वत:ला कवी म्हणवून न घेणं हा तुमचा विनय झाला.
    चांगली आहे कविता (व तिच्या जन्माची कथा). अभिनंदन!
    - प्रियंवदा कोल्हटकर

    उत्तर द्याहटवा
  14. मी जेव्हा 'लोकसत्ता'मध्ये ती कविता वाचली तेव्हा माझ्याही मनात 'तुम्ही कविताही करता काय?' असा प्रश्न आला होता. आता खुलासा झाला. कविता आणि हा लेख दोन्ही छान आहेत.
    - मुकुंद नवरे

    उत्तर द्याहटवा
  15. चांगली कविता. भूमिका असणाऱ्यांची हीच पंचाईत असते. शुभेच्छा!
    - श्रीकांत देशमुख

    उत्तर द्याहटवा
  16. गद्याकडून पद्याकडे आपली वाटचाल स्तुत्य आहे. पण काठीला सोनं बांधून मुक्त फिरण्याचे दिवस केंव्हाच संपले व केवळ शासनव्यवस्था रोजच्या रोज निर्माण करत असलेल्या समस्यांच्या सोडवणुकीकरिता हेलपाट्याचे दिवस आलेत. ह्या व्यवस्थेने माणसातला लेखक, कवी नव्हे माणसाचं मनच मारून टाकलं. समाजामधली प्रतिभा संपवली. अनेक कारणांपैकी हे एक महत्वाचे कारण.

    ही व कोणतीही बाधा आपल्याला न होवो व आपल्यातला कवी दिवसेंदिवस फुलत जावो हीच कामना.

    श्रीराम वांढरे, भिंगार, अहमदनगर

    उत्तर द्याहटवा
  17. आपली ‘पद्यासारखी गद्य’ असणारी कविता वाचली. बऱ्याच दिवसांनी आपल्या खिडकीतून झुळूक आल्याने गारवा वाटून बरं वाटलं . आपल्या या ‘काव्यगुण’ कौशल्याचीही जाणीव मिळाली. त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन !

    कविता आवडली; परंतु सामाजिक माध्यमांवर काय प्रतिक्रिया येतात यावर जास्त विचार व चिंतन करणे सोडून द्यावे .
    त्यांचा वापर केवळ ‘Timepass’चे एक साधन म्हणून ठेवावा.
    - अशोक जोशी, अमेरिका

    उत्तर द्याहटवा
  18. खूप सुंदर... लोकसत्तामध्ये कविता वाचली होती. कळवावं म्हणून मग राहून गेलं. नेहमीप्रमाणे. पद्यासारखे गद्य असं का म्हणताय? मला वाटतं म्हणू नये. वास्तवाला छान भिडणारं आणि उजागर करणारं हे किती सुंदर पद्य आहे! मलाही तुम्ही कविता लिहिल्या हे ठाऊक नव्हतं. तुमच्या गद्याचा तर मी दिवाणा आहे! आता पद्याची भर पडली. येऊद्या नवं लेकरू लवकर! शुभेच्छा...

    उत्तर द्याहटवा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...