Thursday 3 February 2022

श्रेय नको म्हणताना...


‘एकविसावं शतक’...‘एकविसावं शतक’! कोणे एके काळी म्हणता येईल, एवढ्या पूर्वी हा फार चर्चेतला विषय होता. ते उजाडेल आणि अनेक समस्यांना गडप करील, असं वाटायचं. आमच्या पिढीला (पन्नास ते पासष्ट वयोगट) एकविसाव्या शतकाचं स्वाभाविकच फार अप्रुप होतं. त्याची चर्चा सुरू झाली ती ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि त्या चर्चेनं, ‘एकविसावं शतक’ ह्या शब्दप्रयोगानं खूप स्वप्नं दाखवली. म्हणून आमच्यासह आपला देश ते कधी एकदा येतंय, ह्याची वाट पाहत होता.

बराच काळ, जवळपास दीड दशक गाजावाजा होत राहिलेलं एकविसावं शतक उजाडलं आणि त्याची दोन दशकंही पार पडली. आपल्याला हवं ते नेमंक गाणं ऐकण्यासाठी एखादी कॅसेट ‘फास्ट फॉरवर्ड’ करावी तसा हा वीस-बावीस वर्षांचा काळ गेला, असं आता वाटतं. त्या शब्दप्रयोगाचं गारूड असलेली माणसंही जुनी झाली. उठता-बसता ‘आमच्या वेळी...’ म्हणतील एवढ्या वयाची झाली.

आता असं वाटतं की, एकूणच हे शतक ‘फास्ट फॉरवर्ड’ आहे. किंवा ‘टू मिनट’सारखं इन्स्टंट, झटपट आहे. त्यात गेल्या साधारण दहा वर्षांपासून ‘फॉरवर्ड’ हा फारच महत्त्वाचा शब्द बनला आहे. व्हॉट्सॲपनं आपल्या आयुष्याचा ताबा घेतल्यापासून. (किंवा आपण त्याला ताबा घेऊ दिल्यापासून, असं म्हणू या हवं तर.) ह्या ‘फॉरवर्ड’चा आचार-विचारातील पुरोगामीपणाशी फारसा संबंध नाही. त्याचं नातं आहे पुढे पाठविण्याशी. रोज हजारो शब्दांचा मजकूर, छायाचित्रं, ध्वनिचित्रफिती पुढाळल्या जातात. आल्या तशा पुढे ढकलल्या जातात. उत्साहाने, ईर्ष्येने. त्यामागचे इरादे नेक असतात नि फेकही असतात.

व्हॉट्सॲपच्या थोडंसंच आधी फेसबुकनं चमत्कार घडवला होता. त्या माध्यमामुळं अनेकांना व्यक्त होण्याची संधी मिळाली. नवे लेखक उजेडात आले. वेगळ्या पद्धतीचं लिहू लागले. स्मार्ट फोनमुळं फेसबुक-व्हॉट्सॲप अशी युती घडली. त्यातून ‘शेअरिगं’-‘फॉरवर्डिंग’ चालू झालं. कुणी तरी लिहिलेलं दुसराच कुणी तरी तिसऱ्याच्या नावानं पुढं पाठवू लागला. ‘माझी पोस्ट ढापली’, ‘माझी कविता चोरली’ अशी ओरड होऊ लागली. हेही वाङ्मयचौर्यच की. काही वेळा ही ढापाढापी स्वार्थासाठीच असते असंही नाही. काही वेळा त्यात ‘शहाणे करूनि सोडावे सकल जन’ असा अविर्भावही असतो.

कृष्णाजी नारायण आठल्ये ह्यांची कविता आहे. ‘प्रमाणामध्ये सर्व काही असावे...’ असा हितोपदेश करणारी ही कविता. ‘ही वीस कडवी म्हणजे वीस रत्नं आहेत,’ अशी मल्लिनाथी करीत ती गेल्या काही वर्षांपासून सर्रास समर्थ रामदासांच्या नावे खपवली जाताना आढळते. ‘पाचशे रुपयाची नोट’ असा उल्लेख असलेली कविता बा. भ. बोरकरांची असं छातीठोकपणे सांगितलं गेलं. एका ज्येष्ठ व उत्तम वाचक असलेल्या डॉक्टरांकडून ही कविता मला आली, तेव्हा बराच शोध घेतला. बोरकर कविता लिहीत होते, तेव्हा पाचशे रुपयाची नोटच मुळी नव्हती. मग त्यांच्या कवितांचा अभ्यास असलेल्या काहींनी निर्वाळा दिला की, ही बोरकरांची कविता नव्हेच. अगदी अलीकडचंच उदाहरण म्हणजे सुभाष अवचटांचं नोव्हेंबरमधलं लेखन डॉ. अनिल अवचट ह्यांचं आहे, असं म्हणत 'य' वेळा फिरत राहिलं.

हे झालं मोठ्या माणसांचं. त्यात असं मानता येईल की, नेमका कवी वा लेखक माहीत नसल्याने आणि शैली थोडी-फार ओळखीची वाटल्यानं श्रेय देण्यात चुका होतात. पण सर्वसामान्य माणसांचं लेखन अगदी सहजपणे ढापलं जातं. जणू आपणच ते लिहिलं, असं भासवलं जातं. फेसबुकवरचा एक किस्सा आठवतो. सात-आठ वर्षांपूर्वी एकाची फ्रेंड रिक्वेस्ट आली. ती स्वीकारली आणि थोड्या वेळात पाहतो, तर मी लिहिलेली टिपणं त्यानं सरळ स्वतःची म्हणून टाकलेली! मध्यंतरी तर खवय्यांच्या एका गटात पाककृती चोरून तशाच दुसऱ्या गटात आपल्या नावावर खपविल्याची तक्रार झाली.

‘या लेखनावर माझा कॉपीराईट आहे’, ‘माझी पोस्ट माझ्या नावासकट शेअर करण्यास हरकत नाही’, अशा वैधानिक इशारांसह लोक लिहू लागले. स्वामित्वहक्क दाखविणाऱ्या © चिन्हाचा सर्वाधिक वापर ह्याच दशकामध्ये झाला असावा. तरीही मजकुराची ढापाढापी थांबलेली नाही. 

हे सगळं लिहिण्याचं कारण एकदम छोटं आहे. ‘भाषा आणि जीवन’चा उन्हाळा-पावसाळा २०२०चा अंक कसा कोण जाणे, ह्या आठवड्यात माझ्याकडे आला. त्यात नेहा सिंह ह्यांच्या हिंदी कथेचा अनुवाद ‘असं समजा की’ ह्या  शीर्षकानं प्रसिद्ध झाला आहे. तो केला आहे नांदेडच्या पृथ्वीराज तौर ह्यांनी.

जेमतेम दीड-दोनशे शब्दांच्या ह्या कथेनंतर अनुवादकाने दिलेली टीप फारच वेगळी आणि बेलगाम ‘फॉरवर्ड’च्या आजच्या जमान्यात महत्त्वाची आहे. पृथ्वीराज तौर लिहितात - ‘(ह्या कथेच्या) मराठी अनुवादाचे हक्क मुक्त असून, हा अनुवाद कुणालाही, कशासाठीही, अनुवादकाचे नाव वगळूनही वापरता येईल. हा अनुवाद कुणी स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केला तरी प्रस्तुत अनुवादक त्यावर कधीही आक्षेप घेणार नाही. मराठी मुलांपर्यंत जगभरातील उत्तमोत्तम गोष्टी पोहोचाव्यात, मुलांना श्रेष्ठ जागतिक बालसाहित्याचा परिचय व्हावा, एवढीच या अनुवादामागील भूमिका आहे.’

श्रेय लाटण्याच्या, दुसऱ्याच्या लेखनावर बिनदिक्कत स्वनाममुद्रा उमटविण्याच्या आजच्या जमान्यात कुणी एक श्रेयापासून दूर जाऊ पाहतो. आपण केलेला अनुवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, एवढंच त्याचं म्हणणं.

ह्यावर अधिक काय बोलावे!

.............

#एकविसावेशतक #फास्टफॉरवर्ड #अनुवाद #भाषाआणिजीवन #बालसाहित्य #ढापाढापी #फॉरवर्डिंग #सामाजिकमाध्यमे #WhatsApp #facebook #copyright


1 comment:

  1. सर, खूप खूप आभार

    ReplyDelete

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...