Friday 28 January 2022

ए. आय. आणि आय. आय. : पेन ते वांगे

 


फेसबुकवर बऱ्यापैकी नियमित छोटं-मोठं लिहितोय सध्या. आता अगदी दोन दिवसांपूर्वी हस्ताक्षरदिनाचं निमित्त साधून लिहिलं. त्यात पेनाचा (म्हणजे तो नसल्याचा) उल्लेख केला. ह्या पोस्टनंतर एका दिवसांतच मला पेनांच्या जाहिराती दिसू लागल्या. त्याच्या किमतीही हजारांपासून लाखापर्यंत. 'लाखाची ऐपत असती, तर फुकाची पोस्ट कशाला टाकली असती?', असं त्यावर लिहिलं. त्यावर (फेसबुक) मित्रांनी हसून घेतलं. (गरिबावर काय कुणी हसतं... आणि त्यातही पेन नसल्यानं लिहू न शकणाऱ्यावर तर खदाखदा!)

त्याच्या आधी मंडईबद्दल लिहिलं होतं. त्याचा विषय खरं तर वेगळाच होतो. नेहमीप्रमाणेच भरकटायला झालं. नमनाला धडाभर तेल नेहमीच जातं आपलं. (त्याचं ताजं उदाहरण म्हणजे हेच की!) चिकू घ्यायला लावणाऱ्या आणि तलाठी असूनही पैसे न खाणाऱ्या मुलाचा अभिमान बाळगणाऱ्या मावशी. त्यानंतर 'तलाठी परीक्षेत हमखास यश', 'घोलवडचे चिकू' किंवा 'घरपोहोच भाजी' अशी काही जाहिरात दिसली नाही. का बुवा दिसली नसावी? फेसबुकच्या 'अल्गोरिदम'मध्ये ते नसणार बहुतेक.

मंडईचा विषय निघाला आणि वांग्याला टाळून गेलो, असं कधी होणारच नाही. 'भाजीत भाजी वांग्याची...' असा उखाणा घेतल्याचं आठवत नाही बुवा. पण वांगी फाssर प्रिय आहेत! त्याच्यावर लिहिलेला मोठ्ठा लेख ह. मो. मराठे ह्यांनाही आवडला होता. ('वांग्यावर कधी एवढा मोठा खुसखुशीत लेख लिहिता येईल, ह्याची कल्पनाही केली नव्हती,' असं काहीसं त्यांनी 'शब्दसंवाद'चा परिचय करून देताना लिहिलं होतं. त्या पुस्तकाबद्दल लिहिलेल्या लेखाचा दुवा शेवटी दिला आहे.) विषय वांग्याचा आहे. चतुर्मासात वर्ज्य मानली गेलेली वांगी आता बारोमास मिळतात. पण त्यांचा खरा हंगाम दिवाळीनंतर मार्च उजाडेपर्यंत. पूर्वीएवढ्या कडकपणे चतुर्मास पाळला जात नसला आणि वांगी सरसकट श्रावण-भाद्रपदात खाल्ली जात असली, तरी एरवी मिळणारी वांगी आणि ह्या हंगामातली वांगी ह्यात फरक असतोच. भावात, दिसण्यात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या चवीत.

यंदा हवामान विचित्रच आहे. थंडी, पाऊस, ढगाळ, वारं, उन्ह... सारखा बदल.  ह्याचा फटका (नेहमीप्रमाणेच) शेतकऱ्यांना बसला. भाजीपाल्याचं पीक त्यात होरपळलं. चार वर्षांत कधी नव्हत्या एवढ्या भाज्या महाग झाल्या. तेही ऐन हिवाळ्यात - त्या मुबलक, ताज्या टवटवीत आणि स्वस्त असण्याच्या काळात.

चंपाषष्ठीला वांगी महाग असणं गृहीत होतं. खंडोबाला बाजरीच्या रोडग्याचा-भरताचा नैवेद्य दाखवल्यावर वांगी स्वस्त होतात. नेहमीप्रमाणेच यंदाही तेच होईल, असं वाटलं. नाही झालं ना. भोगीपर्यंत वांगी चढीच राहिली. भोगीच्या आदल्या दिवशी तर दीडशे रुपये किलो! (खेंगट ही यंदाची सर्वांत महागडी घरगुती डिश असणार.)

ह्याच दरम्यान कधी तरी एका मित्राशी जिव्हाळ्याच्या, म्हणजेच जिव्हालौल्याच्या विषयावर बोलत होतो. भाज्या, त्यांचे वाढते भाव ह्या मुद्द्यावर गाडी आली. भाव चढे असू द्यात हो; पण तेवढे दाम मोजूनही काटेरी, छोटी, तेल ओतल्यासारखी वांगी मिळतच नाही, असं मी तक्रारीच्या सुरात सांगत होतो.

माझ्या म्हणण्याला सहमती दर्शवत मित्र म्हणाला, ''खरंय. मला मात्र एक वांगेवाला भेटला. तो एकदम मस्त वांगी देतो. भाव तुमच्या नगरएवढाच. पण एक वांगं किडकं निघणार नाही.'' त्याच्या ह्या वांगे-भाग्याबद्दल स्वाभाविकच थोडी असूया वाटली. त्याला हवी तशी वांगी सहज देणारा हा शेतकरी ऐन कोविडच्या काळात औषधाचं दुकान सोडून शेतीकडे वळलेला. दुकान मुलाकडे सोपवलं आणि त्यानं आपल्या छंदाकडं लक्ष द्यायला सुरुवात केली.

आमच्या बोलण्याला बरेच दिवस होऊन गेले. चंपाषष्ठीनंतरचं बोलणं ते. त्या मित्राचा आज भल्या सकाळी फोन आला. नव्या दिवसाला सामोरं जाण्यासाठी मी काही सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत तयार झालेलो नसतो. नुकताच उठून आज काय करायचं (आणि त्यातलं काय टाळायचं.), ह्याची आखणी करण्याचा विचार करत असतो. एवढ्या सकाळी गप्पा मारण्याची मनाची तयारी नसती. ह्या मित्राला काही तरी राजकीय विषय सांगायचा असेल, काही तरी गंमत सांगायची असेल, अमूक एक बातमी वाचली का असं विचारायचं असेल... अशा वेगवेगळ्या शक्यतांपैकी एखादी किंवा आणखी भलतंच काही असेल, असं समजून फोन वाजू दिला.

सगळं आवरून झाल्यावर त्याला फोन लावला. पलीकडून तो म्हणाला, ''इथून वांगी नगरपर्यंत पाठवली, तर घेऊन जाण्याची सोय कराल का?'' नगरपासून त्याचं गाव साधारण साठ-पासष्ट किलोमीटर. त्याच्या गावचा आज आठवडे बाजार. सकाळी सकाळी बाजारात गेल्यावर त्याला माझ्या मनातली वांगी दिसली. तिथंच थांबून त्यानं फोन लावला. एक-दीड किलो वांगी घेऊन कुणाबरोबर तरी पाठवून देतो. तुम्ही फक्त बसस्थानकावर किंवा एखाद्या महत्त्वाच्या जागी या आणि त्या माणसाकडून ती घेऊन जा, असा त्याचा आग्रह होता.


छायाचित्र सौजन्य : शटरस्टॉक

मला भरूनच आलं हो! उत्तम दर्जाची वांगी एका खवय्याला पाठविण्याची बुद्धी त्याला कोण देत होतं कुणास ठाऊक!! त्याच्या उत्साहाला आवर आणि आपलेपणाच्या खळाळत्या झऱ्याला बांध घालत मी नकार दिला. कारण ह्याच आठवड्यात दोन वेळा आवडतात तशी मस्त वांगी मला मिळालेली आहेत.

पेनाच्या जाहिराती दिसतात, असं फेसबुकवर लिहिल्यानंतर एक मित्रानं प्रतिक्रियेत म्हटलं - ही ए. आय.ची (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) कमाल.

मनातली वांगी अशी साठ किलोमीटरवरून घरपोहोच येत होती. ही कसली किमया? ही तर आय. आय. ची (इंट्युटिव्ह इंटेलिजन्स) कमाल!!

---------

'शब्दसंवाद'बद्दल लिहिलेला लेख - 'पहिल्यावहिल्याची पहिली गोष्ट'

https://khidaki.blogspot.com/2015/06/blog-post.html

.....

#AI #I_I #intution #vegetables #facebook #brinjal #vegetable_market #facebook_friends #मंडई #भाजी #वांगी

6 comments:

  1. 'पुराणातली वांगी...' असं म्हणतात. पण ही ताजी वांगी आवडली! खरंच बाजरीची भाकरी व भरली वांगी...एकदम मस्त बेत.
    - शोभा देवी, पुणे

    ReplyDelete
  2. मस्त लेख! छानच!
    - मृदुला जोशी, मुंबई

    ReplyDelete
  3. मला आठवतं, आम्ही नगरला रेल्वे क्वार्टरमध्ये राहत असताना (सत्तरच्या दशकात), अकोळनेरहून केरबा नावाचा शेतकरी भाजी विकायला येत असे. त्यांच्याकडच्या वांग्याची आठवण झाली. तशी वांगी पुन्हा कधीही मिळाली नाहीत!
    - संजय चपळगावकर, नाशिक

    ReplyDelete
  4. वांगी पुराणातील भरीत मेजवानीने तोंड खवळले.रेसीपीला अर्थात पाककृतीला फोडणी छान बसली. पुन्हा एकदा "भाजीत भाजी....वांग्याचीच"

    श्रीराम वांढरे.
    भिंगार,अहमदनगर.

    ReplyDelete
  5. वाङ्मयीन वांगी आवडली. खात राहा, लिहीत राहा!
    - सीमा मालानी, संगमनेर

    ReplyDelete
  6. छान व खुसखुशीत लेख आहे.

    पेनावरून आठवलं, गेल्या महिन्यात पुण्यात आयोजित पेन-प्रदर्शन पाहायला गेलो होतो. जर्मनी,जपान अशा विविध देशांचा सहभाग होता. त्यात अडीच लाखांचे पेन (जर्मन) हाताळून पाहिले.
    - विनायक कुलकर्णी, पुणे

    ReplyDelete

पुस्तकांची गोष्ट

हे कधी लिहिलं, हे नेमकं आठवत नाही. पण बहुतेक दोन-तीन वर्षांपूर्वी पुस्तकदिनाच्या निमित्तानंच रात्रीच्या वेळी लिहिली ही कविता. पण फार उशीर झा...