'करून दाखवले!', असं काही कौतिकराव ठाले पाटील ह्यांनी कधी बोलून दाखवलं नाही. पण एखादी गोष्ट बोलून दाखवल्यावर करून दाखवण्याचाच त्यांचा खाक्या असतो. उदगीरच्या निमित्तानं ते (पुन्हा एकदा) सिद्ध झाल्याचं दिसून येतं.
उदगीर बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. पण साहित्य संमेलनाशी संबंधित असणाऱ्यांना माहिती हवीच ती गोष्ट म्हणजे उदगीरला 'डोळे सरांचं कॉलेज' आहे. 'प्राचार्य' हे त्यांचं पुस्तक 'वाचलंच पाहिजे' ह्या प्रकारात मोडणारं. लातूर जिल्ह्यातील ह्या तालुक्याच्या मुख्यालयी दोन-अडीच महिन्यांत कधी तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याच्या अध्यक्षाची निवड नव्या वर्षातल्या पहिल्या रविवारी एकमताने झाली.
(छायाचित्र सौजन्य marathi.abplive.com) |
साहित्य संमेलन, अध्यक्षाची निवड, उद्घाटकाची निवड, राजकारण्यांची (व्यासपीठावरची) उपस्थिती... ह्या साऱ्या नेहमीच्या वादाच्या गोष्टी ठरत आलेल्या आहेत. त्यात आता नावीन्य काही राहिलेलं नाही. कोरोनाच्या कृपेमुळे नाशिकचं संमेलन लांबणीवर पडलं. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांतच (मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला) पुढचं संमेलन होईल. त्यामुळे चर्चा तर चालूच राहणार...
नाशिकच्या संमेलनाला अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर उपस्थित राहिलेच नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांचं अध्यक्षीय भाषण झालं खरं. पण 'अध्यक्ष तो दिसतो कसा आननी'चं औत्सुक्य शमलंच नाही. त्यातून निर्माण झालेल्या नाराजीच्या भावनेला डॉ. ठाले पाटील ह्यांनी वाट करून दिली असावी. अध्यक्षांची अनुपस्थिती त्यांच्यासह संयोजकांनाही अनपेक्षित नसावी.
डॉ. जयंत नारळीकर ह्यांची अध्यक्षपदी निवड झाली, तेव्हाच शंका वाटली होती की, संमेलनाचे तिन्ही दिवस ते हजेरी लावतील का? त्यांना जमेल का? अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा चालू असताना 'काही मुद्दय़ांवर स्पष्ट राहून डॉ. नारळीकर यांनी या प्रस्तावाला होकार दिला आहे,' अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. ह्याच संदर्भात दैनिक लोकसत्तामधील बातमी (दि. १५ जानेवारी २०२१) पुन्हा पाहण्यासारखी आहे - वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांना तीनही दिवस तेथे उपस्थित राहणे शक्य होणार नाही. पहिल्या दिवशी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे, त्या दिवशी उपस्थित राहून ते अध्यक्षीय भाषण करू शकतात. नंतरच्या दिवशी त्यांचे ऑनलाइन व्याख्यान किंवा मुलाखत घेता येणे शक्य होईल; पण तीनही दिवस अध्यक्षाने उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा परामर्श घ्यावा किंवा त्यावर आपली टीकाटिप्पणी करावी, अशी अपेक्षा असेल तर ते शक्य होणार नाही, हे स्पष्ट केले आहे, असे डॉ. मंगला नारळीकर यांनी सांगितले.
ही बातमी पुरेशी बोलकी आहे. संमेलनात पूर्ण काळ उपस्थित राहण्यासाठी डॉ. नारळीकर ह्यांची प्रकृती साथ देणारी नाही, हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं. अशा परिस्थितीत त्यांनीच अध्यक्ष व्हावे, हा हट्ट कशासाठी होता, हे जाणून घेण्यासाठी त्या पंधरवड्यात मी अनेकांशी संपर्क साधून बोललो. त्यात काही लेखक होते, साहित्य संस्थांचे पदाधिकारी होते आणि वाचकही होते. बऱ्याच जणांनी आपला विरोध असल्याचं अगदी स्पष्ट सांगितलं होतं. प्रामुख्यानं त्यांचं वय आणि प्रकृती ह्या मुद्द्यांवर त्यांचा विरोध होता. काही लेखकांनी मात्र ह्या विषयावर बोलायला नकार दिला. ह्या चर्चेत अनेक मुद्दे आले. त्यातल्या बऱ्याच गोष्टी नव्या वादाला तोंड फोडणाऱ्या होत्या. त्यामुळे त्या (डॉ. नारळीकर ह्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवमान न होता) कशा मांडायच्या हा प्रश्नच होता. उशीर होत गेला आणि मग कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे संमेलनच पुढं ढकललं गेलं. त्यामुळे लिहिण्याचंही बारगळलं.
डॉ. नारळीकर स्वतःच अध्यक्षपदासाठी उत्सुक होते का, असा प्रश्न पडला. त्यांच्यापेक्षा महामंडळाशी संलग्न साहित्य संस्थेतील काही पदाधिकारी त्यासाठी आग्रही होते, अशी माहिती तेव्हा मिळाली. 'तुम्ही फक्त होय म्हणा (बाकीचं आम्ही पाहून घेऊ!)', असं त्या पदाधिकाऱ्यांचं धोरण होतं. ह्या शिवाय आणखी एक कारण असावं - अपराधगंड. साहित्य संमेलनाच्या इतिहासामध्ये अध्यक्षपदाचा सन्मान विज्ञानलेखकाला न मिळाल्याची उणीव भरून काढण्याची संधी, ही एक भावना त्यामागे होती. ('बी. बी. सी. मराठी'ला दिलेल्या एका मुलाखतीत डॉ. नारळीकर म्हणाले की, 'मी गमतीनं असं म्हणतो की आपल्याकडच्या साहित्यसंमेलनांमध्ये सुद्धा विज्ञानकथांना बॅकडोअर एक्झिट असते.') पण मग त्यातून असा एक मुद्दा येतो की, त्यासाठी अन्य कोण्या विज्ञानलेखकाचं नाव सुचलं नाही का? अगदीच उदाहरणादाखल नावं घ्यायचीच झाली, तर डॉ. बाळ फोंडके, दीर्घ काळ केवळ लेखनाचेच व्रत करणारे निरंजन घाटे आणि अजून काही जण... तथापि तोही वादाचाच मुद्दा होता.
पुण्यात मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. रावसाहेब कसबे ह्यांनी त्या वेळी काय प्रतिक्रिया व्यक्त केली होती? ते म्हणाले होते, 'हा साहित्यिकांचा नव्हे, तर साहित्य संमेलनाचा सन्मान आहे. डॉ. नारळीकर जगातील अतिशय महान साहित्यिकांपैकी नसले, तरी महान वैज्ञानिक आहेत. मराठी साहित्यातले ते सर्वांत मोठे विज्ञानकथालेखक आहेत. त्यांच्या लेखनामुळे मराठी साहित्यात वैज्ञानिक जाणिवा अधिक प्रगल्भ होण्याच्या दृष्टीनं मदत होईल.'
(छायाचित्र सौजन्य marathi.abplive.com) |
मुख्य प्रवाहातील माध्यमांनी डॉ. नारळीकर ह्यांच्या निवडीचं मनापासून स्वागत केलं असलं, तरी सामाजिक माध्यमांमध्ये (विशेषतः फेसबुक) दोन्ही टोकांची मतं हिरीरीनं मांडली गेली. 'पुस्तके' ह्याच विषयावर सातत्याने लिहिणाऱ्या श्री. शशिकांत सावंत ह्यांनी फेसबुकवर 'सज्जन पण निरुपयोगी नारळीकर' शीर्षकाची मोठी टिप्पणी लिहिली. 'विज्ञान कथेतून विज्ञानाचा प्रसार होतो हा अजून एक गैरसमज,' असं थेट सांगून ते डॉ. नारळीकर ह्यांना 'साहित्यिक' म्हणण्यावरच आक्षेप घेतात. ह्या पोस्टवर जोरदार चर्चा झाली. शंभराहून अधिक प्रतिक्रियाही आल्या. स्वाभाविकच तिथे जोरदार वादही झाला.
'विज्ञानलेखकाची निवड' ह्या मुद्द्यावर डॉ. अभिराम दीक्षित ह्यांनी लिहिलंय की, (धर्मगुरू) दिब्रिटो ह्यांना (मागच्या संमेलनाचं) अध्यक्ष केलं होतं; त्याचं परिमार्जन म्हणून यंदा आपण विज्ञाननिष्ठा दाखवली आहे! 'नारळीकर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होऊ शकतात, पण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होण्यासाठी त्यांच्याहून किती तरी इतर व्यक्ती पात्र आहेत,' असं संजय रानडे ह्यांनी फेसबुकवरच लिहिलंय.
वाद-विवाद होत राहिला तरी नाशिककरांनी डॉ. नारळीकर ह्यांना आपल्या संमेलनाचं अध्यक्ष म्हणून स्वीकारलं होतं. विज्ञाननिष्ठ लेखक अध्यक्ष म्हणून लाभल्यामुळं संमेलनात पूजन, श्रीफळ वाढविणे आदी कर्मकांड टाळण्याचं ठरविल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. 'डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वयोमानामुळे त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ,' असं संमेलनाचे आधारस्तंभ छगन भुजबळ ह्यांनी आश्वस्त केलं होतं.
...तर असं सगळं असूनही डॉ. नारळीकर नोव्हेंबरमध्ये झालेल्या संमेलनासाठी उपस्थित राहिलेच नाहीत. पूर्ण तीन दिवस जाऊच द्या; उद्घाटनाच्या सत्रालाही त्यांना येणं शक्य झालं नाही. लांबलेलं, स्थळ बदललेलं संमेलन त्यामुळं अधिकच वादात सापडलं. महाबळेश्वरचं अध्यक्षाविना झालेलं संमेलन एकमेव होतं. त्या यादीत आता नाशिकची भर पडली. पण दोन्ही संमेलनातील त्या परिस्थितीमागच्या कारणांत जमीन-अस्मानाचं अंतर आहे. (उस्मानाबाद संमेलनाला अध्यक्ष उद्घाटनाच्या समारंभापुरते हजर राहिले.)
अनंत अडीअडचणी पार करून होणाऱ्या संमेलनाला अध्यक्षच हजर नाही. त्यामुळेच श्री. ठाले पाटील म्हणाले की, नारळीकर ह्यांनी एक किंवा अर्ध्या तासासाठी हजेरी लावली असती तरी साऱ्यांना आनंद झाला असता. यापुढे तरी अध्यक्ष हिंडता-फिरता असावा. त्यासाठी महामंडळाला घटनेत दुरुस्ती करावी लागते की काय, असंही त्यांनी बोलून दाखवलं.
अध्यक्ष हिंडता-फिरता का असावा? तो वाचकांना 'दिसलाच' पाहिजे, असा अट्टहास का? खरं तर केशवसुतांनी लिहिलंय 'कोणीहि पुसणार नाहि, 'कवि तो होता कसा आननी?'' पण कवी-लेखक दिसतो कसा, ह्याचं सर्वसामान्य वाचकांना कुतुहल असतंच. साहित्य संमेलनाच्या प्रयोजनाबद्दलही सातत्याने आक्षेप घेतला जातो. त्याला उत्तर देताना प्रसिद्ध कवयित्री-लेखिका शान्ता ज. शेळके यांनी म्हटलं होतं - 'रसिकांना जसे साहित्य आवडते तसे साहित्यिकांना बघायला, त्यांच्याशी संवाद साधायलाही आवडते. या दृष्टीने साहित्य संमेलनांची उपयुक्तता निर्विवाद आहे.'
साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद अधिकारापेक्षा मानाचं आहे. केवळ संमेलनाच्या सुरुवातीच्या दिवशी अध्यक्षीय भाषण आणि अध्यक्षीय समारोप एवढंच त्याचं काम नाही. वर्षभराच्या कारकीर्दीत त्यानं गावोगावी जावं, वाचकांपर्यंत पोहोचावं, त्यांच्याशी संवाद साधावा, असं अपेक्षित आहे. सोलापूर, प्रवरानगर इथल्या साहित्य पुरस्कारांचं वितरण संमेलनाध्यक्षांच्या हस्ते करण्याची प्रथा आता रूढ झाली आहे. अध्यक्षाला सहजपणे फिरता यावं, त्यासाठी त्याच्या खिशाला झळ लागू नये म्हणून काही वर्षांपासून निधीही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ह्या मुद्द्यांवर प्रा. श्रीपाल सबनीस ह्यांची अध्यक्ष म्हणून कारकीर्द उल्लेखनीय ठरावी. अलीकडच्या काळात सर्वाधिक भ्रमंती केलेले, कार्यक्रमांना उपस्थित राहिलेले अध्यक्ष म्हणून त्यांचंच नाव घ्यावं लागेल. गंमतीनं असं म्हणतात की, त्यांना वर्षभरात इतक्या शाली मिळाल्या की, त्या मोजणंही शक्य नाही!
अध्यक्ष हिंडता-फिरता हवा, ह्या मतप्रदर्शनावर टीकाही झाली. प्रसिद्ध नाटककार चं. प्र. देशपांडे ह्यांनी फेसबुकवर त्याबाबत टिप्पणी लिहिली - '...सारांशरूपाने, हिंडताफिरता असणे, भूमिकावाला असणे आणि साहित्याबाबतही, जाता जाता का असे ना, बोलणारा असला पाहिजे -- या तीनही अटी पाळू शकणारे कोण कोण सुचताहेत? की, हिंडताफिरता असणे आणि साहित्याबाबत बोलणारा असणे, या दोनच अटी बास होतील? आपापली मते आणि अपेक्षित अटी पाळून अध्यक्षपद कोण भूषवू शकेल त्यांची नावे सुचवावीत. रागलोभ, चिडचिड न करता, शांतपणे हे काम होऊ शकले तर संभाव्य अध्यक्ष समोर दिसू लागल्याने, लगेचच येणाऱ्या या उत्सवाच्या आनंदाला सुरुवात करता येईल.'
साधारण पाच वर्षांच्या हुलकावणीनंतर अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री. सासणे ह्यांचं मत मात्र वेगळं आहे. चालता बोलता म्हणजे लोकांमध्ये मिसळणारा अध्यक्ष, असं त्यांनी निवडीनंतर स्पष्ट केलं.
ह्या निमित्ताने अध्यक्षाची निवड पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निवडणुकीचं (घाणेरडं) राजकारण नको, म्हणून काही मातबर मंडळी ह्या प्रक्रियेपासून नेहमीच दूर राहिली. परिणामी पात्र असूनही त्यांना हे मानाचं पद मिळालं नाही, अशी ओरडही फार पूर्वीपासूनची. लक्षावधी मराठी माणसांच्या अखिल भारतीय असलेल्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याचा अधिकार हजार-बाराशे मतदारांनाच का, असा प्रश्नही वर्षानुवर्षे विचारला जात होता. बरीच चर्चा होऊन निवडपद्धतीत बदल झाला. त्यासाठी महामंडळाची घटनादुरुस्ती करण्याचा प्रस्ताव दोन-अडीच वर्षांनंतर मंजूर झाला. निवडणुकीऐवजी संमेलनाध्यक्ष 'सन्मानाने' निवडण्याची पद्धत सुरू झाली.
(छायाचित्र सौजन्य weeklysadhana.in) |
संमेलनाध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा नवीन पद्धत येण्याची शक्यता आहे की काय? महामंडळाच्या घटनेत दुरुस्ती करण्याच्या श्री. ठाले पाटील ह्यांच्या नाशिकमधलं विधानाकडे त्या दृष्टिकोणातून पाहायला हवं. किंबहुना ती सूचक प्रस्तावना मानावी लागेल. बडोदे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख ह्यांनी तीन वर्षांपूर्वीच नव्या पद्धतीला विरोध करताना म्हटलं होतं, 'संमेलनाध्यक्षांची निवड साहित्य महामंडळाचे १९ सदस्यच करणार आहेत. यात मूठभरांच्या हाती अमर्याद अधिकार आल्याने अन्य साहित्यिकांचा सन्मान राखला जाणार नाही. ही प्रक्रिया चुकीची आहे. पाच मान्यवर साहित्यिक व विचारवंतांच्या समितीने एका साहित्यिकाची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड करावी.' ('सकाळ' - दि. १२ एप्रिल २०१९)
'कुठलाही वाद होऊ न देता साहित्यिकांनी एखादे तरी संमेलन घेऊन दाखवावे,' असं फार पूर्वी आर. आर. पाटील म्हणाले होते. त्यांचं ते आव्हान (की आवाहन?) स्वीकारणं साहित्यिकांना वा साहित्य महामंडळाला अवघडच आहे. संमेलन, अध्यक्षांची निवडप्रक्रिया कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. त्या परिस्थितीत आमूलाग्र बदल होईल व वाद-चर्चांना कायमचा पूर्णविराम मिळेल, असं काही दिसत नाही. तूर्त एवढं खरं की, नाशकात बोलले ते श्री. ठाले पाटलांनी करून दाखवलं. दीर्घ काळ दर्जेदार लेखन करणाऱ्या श्री. सासणे ह्यांच्या रूपाने उदगीरच्या संमेलनाला हिंडता फिरता अध्यक्ष मिळाला आहे.
------
#MarathiSahityaSammelan #Marathi #Literary_Meet #ThalePatil #Dr.Narlikar #BharatSasane #Nashik #Udgir #SahityaMahamandal #SocialMedia #हिंडता_फिरता
मांडणी आवडली
उत्तर द्याहटवापूर्ण सहमत नाही पण , लिहिलंय चांगलं...च !
उत्तर द्याहटवा-प्रब
उदगीर व डोळे सरांचा महत्वाचा संदर्भ दिलाय. संमेलनात त्यांचे स्मरण व्हायला हवे
उत्तर द्याहटवाअसेच हिंडत्या फिरत्या कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला पाहिजे.
उत्तर द्याहटवालेख प्रदीर्घ आहे. तो सगळा वाचला. नारळीकर अध्यक्ष व्हावेत ही इच्छा मराठी विज्ञान परिषदेचीही होती. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने ती उचलून धरली. संमेलन मार्च , २०२१ मध्ये झाले असते तर नारळीकर एक दिवस नक्की येणार होते. पण ते आठ महिने लांबले. दरम्यान त्यांची तब्येत अधिक नाजूक झाली. शिवाय छगन भुजबळ त्यांना हेलीकॉप्टरने आणायलाही तयार होते. पण संमेलनाच्या २-३ दिवस अगोदर सगळ्या महाराष्ट्रात धो धो पाउस होता आणि हेलीकॉप्टरने जाणे धोक्याचे होते. ७-८ वर्षापूर्वी या मार्गावर एक हेलीकॉप्टर बेपत्ता झाले होते आणि दोनच दिवस अगोदर जनरल रावत यांचा हेलीकॉप्टर अपघात झाला होता.
उत्तर द्याहटवानारळीकर हे विज्ञानकथा लेखकांचे नेते आहेत. फोंडके, घाटे, जावडेकर ही नावे आहेतच, पण नारळीकर हे अग्रक्रमाने आहेत. कोणी काही म्हणो, ते साहित्यिक आहेतच. अजून मराठी साहित्यिकांना विज्ञानकथा हा साहित्यप्रकार आहे, हेच मान्य नाही. त्यांनी दुर्गा भागवत, पु.ल.देशपांडे, पु.भा.भावे यांची साहित्य संमेलनाची यासाठी भाषणे वाचावीत.
जर उस्मानाबादला उरलेले दोन दिवस अध्यक्षाविना चालले, तेव्हा हिंडता-फिरता हा निकष नव्हता का ठाले पाटील? आणि महाबळेश्वरला आनंद यादव यांच्याशिवाय संमेलन झालेच ना?
अ.पां.देशपांडे
छान
उत्तर द्याहटवासर..छान लिहिले... विस्ताराने वेध घेतला...
उत्तर द्याहटवा'हिंडता फिरता अध्यक्ष' हे ठाले पाटलांचे वक्तव्यच बालिश आहे. शिवाय त्यांनी ते संमेलनाच्या मंचावरच केलं, हे अजुन आक्षेपार्ह. नारळीकरांसारख्या जेष्ठ वैज्ञानिकाचा तो अपमानच आहे. मुळात अध्यक्ष होण्यासाठी नारळीकरांनी काही निवडणूक लढवली नव्हती किंवा ते मला अध्यक्ष करा म्हणून विनंती करायला ते कोणाच्या घरी गेले नव्हते. असो.
उत्तर द्याहटवाआतापर्यंत जे 'हिंडते फिरते' अध्यक्ष होऊन गेले त्यांनी काय दिवे लावले हा पण संशोधनाचा विषय आहे. श्रीपाल सबनीस एक वर्षाच्या कारकिर्दीत काय काय बोसत फिरत होते. फिरण्यासाठी मिळालेली रक्कम पूर्ण खर्च केली एवढंच. नंतर अध्यक्षांना असे पैसे द्यायला नको असा मानभावी सल्ला द्यायला ते विसरले नाहीत.
मुळात साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा त्या साहित्यिकाचा त्याने केलेल्या साहित्यसेवेबद्दल एक सन्मान एवढंच. त्याला कुठलेही कार्यकारी अधिकार किंवा शासनाकडे काही शिफारस करण्याचा अधिकार असं काहीच नाही. तरीही एखाद्याने काही शिफारस केली तर त्याची दखल घेतली जाईल असं काही नाही.
'हिंडता फिरता' अध्यक्ष असायला हवा; परंतु एखाद्याच्या नव्वदीमधे तशी अपेक्षा ठेवणे तेवढे योग्य नाही. निदान पहिल्या दिवसासाठी तरी नारळीकर येऊन गेले असते तरी सर्वांना आनंद झाला असता. भुजबळांनी हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यायची तयारी दर्शवली होती. परंतु प्रकृतीच्या कारणामुळे म्हणा किंवा मिंधेपणा घ्यायला नको म्हणtनही त्यांनी टाळले असेल. जर ते खरोखरच हेलिकॉप्टरने आले असते तर त्यावरही उलट सुलट प्रतिक्रिया येतच राहिल्या असत्या. किxबहुना साहित्य संमेलनाऐवजी हेलिकॉप्टरवरच जास्त चर्चा झाली असती, जी नारळीकरांसारख्या सुसंस्कृत/ संवेदनशील माणसास रुचली नसती.
असो, मराठी साहित्य संमेलन आणि वाद झाला नाही असा दुर्मिळ योग जेव्हा येईल तो मराठी सारस्वतासाठी सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यासारखा असेल एवढं मात्र नक्की.
- दिलीप वैद्य, पुणे
सतीश, खूपच छान आहे. मागचे दाखले वाचताना मजा आली. चालता बोलता अध्यक्ष म्हणजे फाडफाड इंग्रजी किंवा हसत खेळत इंग्रजी या जुन्या जाहिरातींना उजाळा मिळाला. कौतिकराव खरेच कौतिकराव आहेत.
उत्तर द्याहटवा- मंदार देशमुख, नाशिक
भाषेचे ज्ञान व विषयाचे ज्ञान या दोन गोष्टी भिन्न. मराठी साहित्य संमेलन हे प्रामुख्याने मराठी भाषा संबंधि. श्री-नारळीकर सर खगोल शास्त्रज्ञ. त्यांची मराठी भाषेत विज्ञान साहित्य निर्मीती. केवळ कोणी मिळत नाहि म्हणून खगोल शास्त्रज्ञाच्या गळ्यात माळ घालून त्याची कुचंबणा करायची असाच प्रकार. असो.
उत्तर द्याहटवाउपजत साहित्तीक, लेखक, कवि आता अभावानेच. त्यात खेदाची बाब म्हणजे मराठी माणूस व शासन या ऊभयतांने चालविलेली मराठी भाषेची गळचेपी. मराठी माध्यमाच्या शाळेतच मराठीला दुय्यम स्थान. मराठी व्याकरणाची तर बोंबाबोंब. सहाजीकच मराठी भाषेच सौंदर्य लोप पावत चाललंय. परीणामी आजकाल ‘दैनिक’ म्हणजे ‘आता उरलो जाहिराती करीता’ असाच प्रकार. भविष्यात अध्यक्षपदाची जाहिरात द्यायला न लागो म्हणजे झालं.
साहित्य व संमेलनाचा आपण घेतलेला विस्तृत आढावा भावला.
श्रीराम वांढरे.
भिंगार, अहमदनगर.
आपला लेख लक्षपूर्वक व दोनदा वाचला. छानच आहे. अध्यक्षाने हजर न राहाण्याची कारणे काय आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे असे माझे मत आहे. अर्थात ते सर्वांचेच असावे किंवा बरोबरच आहे असा माझा दावा नक्कीच नाही.
उत्तर द्याहटवाश्री नारळीकर हे विज्ञानकथा/गोष्टी खूप छान लिहितात व मी स्वतः त्यापैकी अनेक महत्त्वाच्या वाचल्या आहेत. IUCCAच्या अध्यक्षपदाबरोबरच त्यांनी दर्जेदार लेखनाची आवड जोपासली हे कौतुकास्पदच आहे. इतर ललितकथांपेक्षा विज्ञानकथा हा विषय तसा क्लिष्ट व रुक्ष समजण्याचा कल प्रतिष्ठित साहित्यिकांमधे असतो. ते कितपत बरोबर ह्यावर मतभिन्नता असू शकते. पण त्या निरुपद्रवी म्हणणे हे मात्र पटत किंवा मला तरी पटलेले नाही.
नारळीकर स्वतः वेळेच्या बाबतीत व प्रोटोकॉल पाळण्याबद्दल काटेकोर असतात, हे मी म्हणू शकतो. कदाचित संमेलनाला झालेल्या विलंबाबद्दल; तसेच अध्यक्षाच्या निवडीबद्दल तसेच राजकीय नेहमीच होणाऱ्या वादांमुळेही त्यापासुन दूर राहाणे त्यांना योग्य वाटले असेल. त्यांच्या अनुपस्थितीचाही वाद निर्माण करणे हे मात्र खचितच अयोग्य वाटते. इतर वादाच्या गोष्टी वगळूनही त्यांचे विज्ञानसाहित्यातील योगदान मला तरी मोलाचेच वाटले व वाटत राहील.
एकंदरित ह्या विषयावर समर्पक लेखाबद्दल आपले अभिनंदन.
- अच्युत हिरवे
साहित्य संमेलन आणि अध्यक्ष या विषयावरील लेख वाचला. मराठी साहित्य संमेलन आणि संमेलनाचे अध्यक्षपद या दोन्ही परंपरांच्या मोठेपणाबद्दल उदाहरणे बरीच आहेत. परंतु मी येथे दोन उदाहरणांचा उल्लेख करत आहे. १९२७ साली पुणे येथे झालेल्या १३व्या संमेलनाचे अध्यक्षपद श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी भूषवले होते. त्यांनीच ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा' हे गीत लिहिले आणि ते महाराष्ट्रगीत म्हणून अजरामर आहे. या प्रतिभावान साहित्यिकाने या गीतात महाराष्ट्राची जी महानता वर्णिली आहे, तिची प्रशंसा करण्यास शब्द अपुरे पडावेत. परंतु आज आपल्याला जो महाराष्ट्र दिसतो, तो त्या वेळी भौगोलिकदृष्ट्या अस्तित्वात नव्हता; तरीही कवीने आपल्या प्रतिभेने ती निर्मिती केली.
उत्तर द्याहटवादुसरे उदाहरण १९४६ साली बेळगाव येथे झालेल्या तिसाव्या संमेलनाचे आहे ज्याचे अध्यक्षपद साहित्यिक आणि पत्रकारिता करणाऱ्या ग. त्र्यं.माडखोलकर यांनी भूषवले. या संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मराठी भाषकांचे एक राज्य असावे ही सूचना मांडली आणि त्याच संमेलनात तसा ठराव पारित होऊन संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन होऊन तिच्या चिटणीसपदी माडखोलकरांची निवड झाली. पुढे या चळवळीतून महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली हा इतिहास आहे.
वरील दोन उदाहरणांवरून दिसते की, मराठी भाषा आणि महाराष्ट्र या दोन अस्मिता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रसृत झाल्या. मराठी जनमानसांत मराठी आणि महाराष्ट्र हे दोन शब्द उच्चारताच ज्या भावना उचंबळून येतात त्यामागे अशी संमेलने आणि त्यांचे अध्यक्ष आहेत. पण आता संमेलने म्हणजे मोठे इव्हेन्ट झाले असून अध्यक्षपद हे पण वादाच्या भोवऱ्यात असते. अध्यक्षीय भाषण हे बाजूला पडते आणि इतर मंडळींचा वावर भाव खाऊन जातो. संमेलनाच्या उद्घाटनाचे पहिले सत्र आणि ज्यात ठराव पारित होणार त्या शेवटच्या सत्रात जर संमेलनाचे अध्यक्षच नसतील तर ते संमेलन इतरजनांचेच ठरणार. हिंडता फिरता अध्यक्ष असणे त्या दृष्टीने महत्वाचे असले, तरीही संमेलने ही केवळ इव्हेन्ट ठरू नयेत असे वाटते.
- मुकुंद नवरे
आपला लेख उत्तम आहे! अनेकविध पैलू आपल्या कवेत घेणारा आहे. लेख प्रदीर्घ आहे आणि त्याच्यामध्ये दिलेले बरेचसे मुद्दे अगदी बरोबर आहेत, असं वाटतं. (नाशिकच्या संमेलनात) डॉ. जयंत नारळीकर अनुपस्थित होते, हा विचार करताना मलाही महाबळेश्वरच्या संमेलनाची आठवण झाली. दिब्रिटो फक्त पहिल्याच दिवशी आणि अध्यक्षीय भाषणाच्या वेळेलाच उपस्थित होते. त्यांची प्रकृती हे तर कारण होतंच होतं.
उत्तर द्याहटवाश्री. कौतिकराव ठाले पाटील ह्यांचा हा मुद्दा फारसा चुकीचा वाटत नाही की, हिॆडता-फिरता अध्यक्ष असावा. योग्य वेळी ती ती जी व्यक्ती साहित्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे, तिला अध्यक्षपद मिळावं.
सहज मनात आलं की, डॉ. ताराबाई भवाळकर, ह्यांच्यासारखी व्यक्ती. जिने साहित्याच्या बऱ्याच क्षेत्रात लेखन केलेलं आहे आणि विशेषतः लोकसाहित्यावरचं त्यांचं संशोधन, अभ्यास खूपच आहे. त्या उत्तम वक्त्याही आहेत. लोकप्रियही आहेत. पण असं असतानाही त्यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं नाही, ह्याची थोडी खंत वाटते. अर्थात असे प्रत्येक भागामध्ये कुणी ना कुणी साहित्यिक असतील, ह्याची कल्पना मला आहेच.
बाकी मला हा लेख आवडला. खूप छान लेख झाला. तो वाचताना मला खरोखरच डॉ. तारा भवाळकर ह्यांची आठवण झाली.
- उज्ज्वला केळकर, सांगली
खूप छान लिहिलंय तुम्ही. विचार करायला लावणारं. ठाले पाटील असं बोलल्यापासून माझ्याही मनात असं काही तरी सुरू होतं. लेख वाचताना आपण मनातलं लिहिलं आहे असं वाटलं.
उत्तर द्याहटवाखरं तर हा लेख मराठी साहित्य व्यवहाराचा धांडोळा घेणारा आहे. आपण अनेक अंगांना स्पर्श केला आहे. अनेक लेखक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उत्सुकता दाखवत नाहीत, हे खरं आहे. पण असल्या व्यवहारात न पडता लिहीत राहणं त्यांना अधिक पटतं. ती साधना ते करत राहतात. या लेखकाला पुरस्कार, संमेलनाचे अध्यक्षपद यापेक्षा काहीतरी चिरकाल टिकेल असं हातून लिहिलं जावं असं सतत वाटत असतं. त्यामुळे दर वर्षी साहित्य संमेलन होतं आणि दर वर्षी अशा चर्चा होतात. अशा चर्चांमधून ठरावीक लोक दिसतात.
... आपला लेख या सर्वांनी वाचला पाहिजे. निष्ठेनं लिहिणाऱ्या लेखकाचा अध्यक्षपद मिळून गौरव होईल, अशा पद्धतीची काही व्यवस्था झाली पाहिजे. मी हा लेख अनेकांना पाठवला. बऱ्याच जणांचं हेच मत आलं. 🙏
- बबन मिंडे, पुणे