कुठल्याही सामाजिक
माध्यमातलं लिखाण, व्यक्त झालेलं मत-विचार ह्याकडे कसं पाहावं? त्यावरच्या वादविवादात किती टोकाची भूमिका घेत
सहभागी व्हावं? घटकाभरची, फावल्या वेळेतली करमणूक म्हणून पाहायचं
की त्याचा गांभीर्यानं विचार करायचा?
फेसबुकवरची एक
पोस्ट. आठवड्यापूर्वीची. भरपूर वाचली गेली आणि तिची जोरदार चर्चा झाली. हे टिपण
वाचल्याची पावती १००३ जणांनी
दिलेली. त्यापैकी ६०३ जणांनी हसरी स्मायली टाकलेली, बदाम टाकणारे १२ आणि लाईकचा
अंगठा दाखविणारे ३७३. हा मजकूर न आवडल्याने रागावले चौघे आणि दुःखी झालेले तिघे.
अर्थात ह्या साऱ्या भावना शब्दांकित नव्हे, तर इमोजीच्या रूपाने चिन्हांकित
झालेल्या. शब्दाने व्यक्त झालेले वाचक आहेत ५८८ आणि हे टिपण १४६ वाचकांनी आपल्या
भिंतीवर सामायिक केलेले.
वरच्याच टिपणाशी
संबंधित दुसरी पोस्ट त्यानंतर तीन दिवसांनी फेसबुकवर अवतरलेली. तिच्याबद्दल पावती
देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी. म्हणजे ३६६ - त्यात हसऱ्या स्मायली ११८, 'आवडलं बुवा' असं बदामाच्या रूपाने
सांगणारे सहा, अंगठा दाखविणारे २३८ वाचक. ह्या टिपणामुळे रागावलेल्यांची आणि वाईट
वाटलेल्यांची संख्या फारच कमी - प्रत्येकी एक. ह्या टिपणकर्त्याने छोटा मजकूर
लिहिलेला आणि त्याच्या खाली वरचं टिपण सामायिक केलेलं. त्यामुळेच की काय इथे
संख्या कमी दिसते आहे.
पहिलं टिपण आहे
मंदार अनंत भारदे ह्यांचं. त्यात त्यांनी लिहिलं आहे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर ह्यांच्याबद्दल. 'दीर्घ काळानंतर सोशल
मीडियात मला मनापासून आवडलेली ही पोस्ट म्हणून जशीच्या तशी शेअर करतोय,' अशी टीप देत भाऊंनी हा
मजकूर सामायिक केला. त्याच्या आधी एक छोटी कथा लिहिली - आई मी कुठे आहे?
भारदे यांचा लेख सात
परिच्छेदांचा आणि ४८६ शब्दांचा.
काय आहे त्यात? तर भाऊ तोरसेकर ह्यांचा वावर कसा
अत्र-तत्र-सर्वत्र असतो; सगळ्या गोष्टींची त्यांना
कशी आधीच माहिती असते आणि ते मोदींहून कसे अधिक मोदीनिष्ठ (किंवा हल्लीच्या अत्यंत
लोकप्रिय भाषेत 'मोदीभक्त'!) आहेत, हे भारदे ह्यांनी वक्रोक्तीनं लिहिलं आहे. त्यात मग श्रीकृष्ण,
अफजलखान ह्यापासून ते थेट अजित डोवाल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि
(अर्थातच) राहुल गांधी हे सगळे येतात. ह्या साऱ्यांना एकत्र आणणारं एकच समान सूत्र
- भाऊ तोरसेकर.
'वेदांआधी भाऊ तोरसेकर
होते, उपनिषदांच्या आधीही भाऊ होते,' अशा वाक्यानं सुरू होणारा लेख एकदम हलकाफुलका
आहे. पाच ते सात मिनिटांत वाचून होणारा हा लेख काहींना खदखदून हसवील, तर काहींच्या
चेहऱ्यावर एखादी तरी स्मितरेषा उमटवील. विनोदाचा, व्यंग्य-लेखनाचा उत्तम नमुना
म्हणून ह्या लेखाकडे पाहता येईल.
'लेखकाची भूमिका' अंगीकारून 'बघ्याची भूमिका' असं पुस्तक नावावर असलेले भारदे लेखनात उपहास-उपरोधाचा पुरेपूर वापर करतात.
पण त्यांच्या ह्या लेखाकडे फारच गांभीर्यानं पाहिलं गेलेलं दिसतं. लेखाखाली
प्रतिक्रियांचा वर्षाव पाहायला मिळतो. कशा आहेत ह्या प्रतिक्रिया? ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या. 'हा कोण टिकोजीराव भाऊंबद्दल लिहिणारा?' असा संतप्त सूर व्यक्त करण्यापासून 'बरं झालं जिरवली एकदाची!' असा (असुरी) आनंद व्यक्त करण्यापर्यंत.
कशामुळे भारदे ह्यांनी
भाऊंवर हा लेख लिहिला असावा? आपल्या आजूबाजूला एवढं
काही विनोदी घडत असताना त्यांनी हाच विषय का निवडला? उत्तर साधं-सोपं आहे. सामाजिक माध्यमांवरची भाऊंची लोकप्रियता आणि त्यांचं
मोठं 'फॅन-फॉलोइंग'. फेसबुकवरच्या
मराठी माणसांमध्ये साधारण सात वर्षांपासून हे नाव प्रसिद्ध आहे. भाऊ तोरसेकरांनी
ब्लॉगवर लेख लिहावा, त्याचा दुवा फेसबुकवर सामायिक करावा आणि त्याखाली
प्रतिक्रियांचा पाऊस पडावा! हे असं सात-आठ वर्षांपासून
चालू आहे. त्यांच्या ब्लॉगने वाचकसंख्येचा एक कोटीचा टप्पा कधीच ओलांडला.
'लॉकडाऊन'वर उतारा म्हणून
ह्या काळात अनेकांनी फेसबुक लाइव्ह, वेबिनार, यूट्यूब चॅनेल असे मार्ग निवडले.
साधारण ह्याच सुमारास भाऊ तोरसेकर ह्यांनी यूट्यूबवर 'प्रतिपक्ष' नावाने चॅनेल सुरू
केलं. त्यावर त्यांचे व्हिडिओ नियमित येऊ लागले. त्याचेही साडेचार महिन्यांतच
लाखाहून अधिक 'फॉलोअर' झाले आहेत. त्यातील
काही 'व्लॉग' हिंदीतही रूपांतरित
होऊ लागले. ब्लॉगकडून भाऊ व्लॉगकडे (व्हिडिओ ब्लॉगिंग) वळाले. आधी ते लिहायचे, तेच आता बोलून दाखवतात.
त्यांचं हे चॅनेल तांत्रिकदृष्ट्या फार सरस नाही. पण त्यांच्या निष्ठावान वाचकांना
त्यात फारसा रस नाही. त्याबद्दल त्यांची तक्रारही नसणार. 'भाऊ बोलत आहेत,' हाच त्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा मुद्दा. साहजिकच 'प्रतिपक्ष' लोकप्रिय होण्यास
वेळ लागला नाही.
भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचे
उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी ह्यांचे नाव साधारण सात वर्षांपूर्वी जाहीर केले.
तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे सातत्याने समर्थन करणारे पत्रकार म्हणून भाऊ चिरपरिचित
झाले आहेत. 'पुण्यनगरी'तील सदराने त्यांना
मोठा वाचकवर्ग मिळवून दिला आणि फेसबुकमुळे त्यांचे हजारोंच्या संख्येने चाहते
निर्माण झाले. ‘जागता पहारा’ ब्लॉगवरील लेख चवीने वाचले जाऊ लागले, व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात
शेअर केले जाऊ लागले. आतापर्यंत कधी मिळालं नाही किंवा आपल्यापासून माध्यमांनी
दडवून ठेवलं, ते भाऊंच्या लिखाणातून वाचायला मिळत आहे, असं वाचकांना वाटू लागलं.
हे सगळं लिहिताना-मांडताना भाऊंचं तर्कशास्त्र अजिबात उणं पडत नाही, हे
महत्त्वाचं. उघडपणे उजवी बाजू
मांडणाऱ्या मराठी पत्रकाराला बहुदा पहिल्यांदाच मिळालेलं हे प्रचंड यश असावं.
'प्रतिपक्ष' लोकप्रिय होण्याचं
एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्याच काळात झालेला गलवान खोऱ्यात झालेला संघर्ष.
त्यावर भाऊंनी 'लडाख गूढकथा' ह्या शीर्षकाने तब्बल ११ व्लॉग सलग सादर केले. अर्थातच
त्यांची भूमिका अनपेक्षित नव्हती. ह्या संघर्षात चीनला कसं नमतं घ्यावं लागलं,
भारताची - अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची भूमिका कशी योग्य व नेमकी आहे,
अजित डोवाल ह्यांनी कशी भूमिका बजावली, ह्या संघर्षाचा पूर्वेतिहास, मोदींना
प्रश्न विचारणाऱ्या राहुल गांधी ह्यांच्यावर टीका... असं सगळं काही त्यात आहे.
दरम्यानच्या काळात राजस्थानमधील घडामोडी, महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार, देवेंद्र
फडणवीसांचं 'मी पुन्हा येईन...' अशा वेगवेगळ्या विषयांवरही भाऊ बोलले. 'प्रतिपक्ष'नं गेल्याच आठवड्यात
लाख प्रेक्षक-श्रोत्यांचा टप्पा ओलांडला.
भारदे ह्यांनी भाऊ तोरसेकर
ह्यांच्यावर लिहिण्याची पार्श्वभूमी ही अशी आहे. त्यातूनच त्यांनी भाऊंना
श्रीकृष्ण जन्मापासून ते अफझलखानाचा वध, १८५७च्या उठावापासून देवेंद्र फडणवीस ह्याच्या जलयुक्त
शिवारापर्यंत सगळीकडे नेलं आहे; सगळीकडे त्यांचं अस्तित्व दाखवून दिलं आहे. ह्या छोट्या
टिपणातल्या काही कोट्या, काही चिमटे अफलातून आहेत. आपण न केलेल्या कामाचे व्हिडिओ
भाऊ टाकत असल्याचे पाहून फडणवीसांनी त्यांना ब्लॉक केले, अशा काही भन्नाट कल्पना
आहेत. भाऊंच्या लिहिण्या-बोलण्यावर, विश्लेषणावर वा भूमिकेवर थेट टीका न करता ह्या
अस्वली पद्धतीने केलेल्या गुदगुल्या आहेत. हे लिहिण्यात थोडी टिंगल, थोडी टवाळी,
बरीचशी मस्करी दिसत असली, तरी विखार वा अनादर जाणवत नाही.
हे मिश्कील,
खुसखुशीत लेखन खुद्द भाऊंना आवडलं असलं, तरी त्यांच्या चाहत्यांना मात्र मुळीच
रुचलेलं नाही. प्रतिक्रियांवरून ते दिसून येतं. त्यातल्या काही निष्ठावंत वाचकांनी
'भारदे तुम्ही स्वतःला समजता कोण (भाऊंवर टीका
करायला)?' असा सात्त्विक संतापाचा सवाल विचारला आहे.
अनेकांनी पातळी सोडून प्रतिवाद केला आहे. भाऊ कसं खरं खरं लिहितात, ह्याची ग्वाही
ह्या निमित्ताने देत बऱ्याच जणांनी 'त्यामुळंच ते रुचत
नाही' असा निष्कर्षही काढला आहे.
भाऊंचे चाहते ह्या लेखावर
जसे व्यक्त झाले, तसे त्यांचे विरोधकही. त्यात प्रामुख्याने लेखक, पत्रकार आहेत.
त्यांच्या प्रतिसादातून भाऊंबद्दल व्यक्त झालेली असूया, विखार सहजपणे दिसतो. एका
पत्रकाराने अश्लाघ्य भाषेत टीका करून त्यावरील प्रतिसादाला उत्तर देताना नंतर
एकेरी उल्लेख केला आहे. 'अशी पोस्ट आपल्यावर
लिहिली जाणार आहे, हे भाऊंना आधीच माहीत
झालं असणारे!', असा लेखाच्या सुराला साजेसा एक प्रतिसादही दिसतो. भाऊंनी
केलेलं राजकीय विश्लेषण आवडणाऱ्या काहींना त्यांचं परराष्ट्र धोरण, लष्कर आदींबाबतचं
मतप्रदर्शन पटत नाही. ही संधी साधून एकमेकांना 'ट्रोल' करण्याची संधी साधणारे
आणि दुसऱ्याच्या भिंतीवर आपलं भांडण भांडणारेही बरेच दिसतात.
एका पत्रकाराने
भाऊंच्या बाजूनं लिहिलं आहे, 'लाख सबस्क्राईबर
व पन्नास-साठ हजार व्ह्यूअर म्हणजे भाऊंचे व्हिडिओ पटतात लोकांना.' हे सगळं गमतीगमतीत
घ्यायचं आहे आणि वाचायचं आहे, ह्याची जाणीव असलेलेही काही मोजके वाचक ह्या पोस्टवर
येऊन गेलेले दिसतात. बाकी बहुतेक सारे तलवारी उपसून सज्ज!
प्रतिक्रियांचा
असा पाऊस पडलेला असताना, त्यांना उत्तर देण्याच्या, प्रतिवाद वा समर्थन करण्याच्या
भानगडीत लेखक मंदार भारदे फारसे पडल्याचे दिसत नाही. 'तुम्ही आता स्टँडअप कॉमेडियन व्हा,' असा सल्ला देणाऱ्या एका वाचकाचे त्यांनी आभार
मानल्याचे दिसतात! 'तू पण थोडी पत्रकारिता केली आहेस असे वाटते म्हणून केवळ… विचार वेगळे यासाठी इतके
अतिरेकी विखारी विचार योग्य नाही. ज्येष्ठत्वाचा असा अनादर तुझ्याकडून अपेक्षित
नाही,' अशी प्रतिक्रिया चिंतामणी करमरकर ह्यांनी नोंदविली. त्याच्या उत्तरादाखल मंदार
भारदे लिहितात, 'फक्त गंमत म्हणून का बघू नये आपण ह्याकडे? विरोध केला तर लगेच अनादर कशाला होईल?'
भारदे ह्यांना ही भट्टी कशी
साधली? ह्याचं उत्तर शोधलं तर सहज सापडतं. रसाळ
भाषणांबद्दल प्रसिद्ध असणारे, निरुपणकार म्हणूनच जे ओळखले जात त्या बाळासाहेब
भारदे ह्यांचे मंदार नातू आहेत. 'काँग्रेस
खुर्चीवाल्यांचा / भाजप पूजाअर्चावाल्यांचा / समाजवादी चर्चावाल्यांचा / कम्युनिस्ट
मोर्चावाल्यांचा' किंवा 'ज्ञान असेल तरच भान येते. स्फूर्तीची मूर्ती
होते आणि कार्यसिद्धी असेल तर आपोआप प्रसिद्धी मिळते,' अशा
कोट्या भाषणात सहज करणाऱ्या भारदेबुवांचा दीर्घ सहवास त्यांना लाभला. त्यामुळे
राजकारण, समाजकारण, रसाळ लेखन ह्याचे धडे इतर कोणाकडे गिरवण्याची गरज त्यांना भासलेली
नसावी. 'माजी अभाविप कार्यकर्ता' असा त्यांचा उल्लेख एका
वाचकानं प्रतिक्रियेत केला. पण त्यांनी कोणतं 'पॉलिटिकल थॉट बुक' अभ्यासलं, ते स्पष्ट
आहे.
बहुसंख्य
प्रतिक्रिया-प्रतिसादाचा सूर पाहिला, तर जाणवतं हेच की, निखळ विनोद म्हणून ह्या
लेखाकडे फार थोड्या लोकांनी पाहिलं. त्यातलं वाचनानंदाचं सुख घेणं अनेकांना जमलं
नाही. श्रीकांत उमरीकर ह्यांच्यासारख्या उत्तम वाचक-लेखकालाही ह्याचा
मुलाखतीद्वारे प्रतिवाद करावा वाटणं नाही म्हटलं तरी खटकणारं आहे. लेखामध्ये भारदे
ह्यांनी कुणाच्याही व्यंगाचा दुरान्वयानेही उल्लेख केलेला नाही. असलंच तर ते 'व्यंग्य' आहे!
'विनोदाचे महत्त्व' ह्यावर महर्षी वि. रा.
शिंदे ह्यांनी लिहिलं आहे - विनोद म्हणजे संसारात येणाऱ्या निरनिराळ्या प्रसंगांचा
वाजवीपेक्षा जास्त चटका लावून न घेता, आपली संतोषित वृत्ती कायम
ठेवणे हा होय.... ह्या गुणामुळे ही माणसे नेहमी सुखी आणि आनंदी असतात. त्यांच्या
मनोमंदिरामध्ये नेहमी विनोदाची हवा खेळून उबट ओलसरपणास जागा न राहिल्यामुळे क्लेश, चिंता इत्यादी कृमी त्यात
साचत नाहीत. धर्म आणि कर्तव्य ह्यांविषयी आपली खोटीच समजूत करून घेऊन मनुष्ये
वारंवार आपआपसांत तंटा माजवितात आणि त्यामुळे होणारे व्यक्तीचे आणि समुदायाचे
नुकसान भरून काढण्यासाठी पुन: नवीन यत्न करावा लागतो, ह्या सर्वच खटाटोपाचे निवारण विनोदी माणसाच्या
ह्या निर्विघ्नपणामुळे होते, ही गोष्ट एकदम कोणाच्या लक्षात भरण्याजोगी नसली, म्हणून तिचे महत्त्व कमी
आहे असे नाही. (संदर्भ - https://virashinde.com)
जाता जाता सहज टोपी
उडवणं, एवढंच लेखातून जाणवतं. वक्रोक्तीचं वा व्याजोक्तीचं उदाहरण म्हणूनच त्याकडे
पाहिलं पाहिजे. तसं ते पाहता येत नसेल, तर भाऊंच्याच शब्दात स्वतःला विचारलं
पाहिजे, 'आई, मी कुठं आहे?'
....
....
मंदार भारदे ह्यांचा लेख इथं वाचायला मिळेल -
https://www.facebook.com/photo/?fbid=10158599648733064&set=a.10151015027468064
...आणि 'मी कुठं आहे?' हे विचारणारं भाऊ तोरसेकर ह्यांचं
टिपण २३ जुलैचं आहे.
मस्त. लाॅकडाऊनचा वेळ मजेत चालला आहे. वाचन आणि विविध प्रकारचे व्हिडीओ पाहण्यात.
उत्तर द्याहटवामुळात विपरीत प्रतिक्रिया आली की तोंडाचा चंबू करून रुसून बसणे याचा अनुभव मी भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत घेतला आहे, इतका की त्या विरुध्द प्रतिक्रिये पश्चात माझ्याशी असलेल्या त्यांच्या बरोबरील स्नेहावर देखील त्याचा परिणाम मला जाणवला.
उत्तर द्याहटवामी प्रत्यक्ष पुलं च्या समोर चिं वि जोशी हे विनोदी लेखक म्हणून मला आवडतात हे जेव्हा सांगितले ते पुलंनी खुप कुतुहलाने घेतले होते.
तोच प्रकार शिवाजीराव भोसले यांचे विचार मला जुनाट वाटतात ही माझी प्रतिक्रिया त्यांचे भक्त असलेल्या माझ्या वडिलांनी देखील कुतुहलानेच घेतले होते.
दोन्ही अनुभवात आजकालच्या तरुणाईची नेमकी विचारसरणी समजावून घ्यायची उत्सुकता तरी होती.
चिं वि जोशी हे पुलंच्या मागील पिढीचे नि एक वेळ मी पुलंच्या नंतरच्या पिढीतील लेखकाचे नाव घेतले असते तर ते काळाला धरून म्हणता आले असते, पण तसे ते झाले नाही नि म्हणून त्यांनी मला माझे म्हणणे सविस्तरपणे मांडण्याची संधी तरी दिली.
पण ही उदाहरणे खूप विरळा असेच म्हणण्याची परिस्थिती आपल्याकडे केवळ आजच नव्हे तर या आधी देखील होतीच.
त्यामुळे भक्त मंडळी हा शब्दप्रयोग शब्द म्हणून जरी या समाज माध्यमाच्या उदयानंतर अस्तित्वात आला तरी देखील अशी भक्तमंडळी या आधी अनेक शतकांपासून आपल्या समाजात होती, आहेत आणि ती राहतील अशीच यात शंका नक्कीच नाहीत.
मुळात भाऊ तोरसेकर या पत्रकाराचे समाज माध्यमावरील प्रतीस्थापना (launching) कसे सुव्यवस्थितपणे झाले आहे त्यावर एखादा लेख केवळ आपणच लिहू शकता याची खात्री.
भाऊ तोरसेकर यांच्या ब्लॉगचा फायदा त्यांना झालाच नि त्यांची पुस्तके देखील त्या प्रमाणात प्रचंड खपली, त्यांनी व्याख्यानावर व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रात झोडली हे तितकेच खरे, पण त्यापुढील त्यांची झेप मात्र त्यांना कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्नाचा वाहता झरा मात्र तयार स्वरुपात प्राप्त करता झाला, तो म्हणजे त्यांची यूट्यूब वाहिनी.
एकंदर आर्थिक संपन्नते चा हा online मार्ग यशस्वी होण्याची साठाउत्तराची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपन्न असे आपण सहज म्हणू शकतो हे खरे.
- देवेंद्र रमेश राक्षे