समाधानाचे हसू! शस्त्रक्रिया केलेल्या एका मुलीसमवेत डॉ. हिरजी एडनवाला.
|
कोण होते हे डॉ. एडनवाला? नगरशी त्यांचा नेमका काय
आणि कसा संबंध? त्यांचा जन्म १९३०मध्ये नगर येथे झाला. भिंगार कँप परिसरात
श्री. बेहराम नगरवाला ह्यांचा बंगला (११, नगरवाला रस्ता) आहे. तेच डॉ. एडनवाला
ह्यांचं जन्मस्थळ. त्यांचं आजोळ नगर. त्यांची आई होमाई होरमसजी नगरवाला. पत्नी
गुलनारही नगरनिवासीच. ते वाढले मुंबईमध्ये. तिथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि
त्यानंतर त्रिशूर (केरळ) येथेच स्थायिक झाले. त्यांच्या निधनाची बातमी 'पारशी टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाली. श्री. बेहराम नगरवाला व मित्र श्री. धनेश बोगावत
ह्यांच्यामुळे ती समजली. इंटरनेटवर शोध घेतल्यावर लक्षात आलं की, हा माणूस किती
मोठा होता ते!
दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या जन्मजात व्यंगामुळे अनेक मुलांचं आयुष्य बिकट होतं.
व्यंगामुळे चेहरा विकृत होतो; बोलताना त्रास होतो. समाजात टिंगलटवाळी वाट्याला येते आणि ती
मागे पडत जातात. हे जन्मजात व्यंग शस्त्रक्रियेने दूर करून ह्या मुलांच्या
आयुष्यात हसू फुलवणं हेच डॉ. एडनवाला ह्यांनी जीवनध्येय मानलं. प्रदीर्घ
कारकीर्दीत अशा १६ हजार मुलांवर शस्त्रक्रिया केल्या.
'स्माईल ट्रेन'मुळे डॉ. एडनवाला विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी झाले. .................................. |
वैद्यकीय शिक्षणानंतर डॉ. एडनवाला ह्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून त्रिशूरच्या
'ज्युबिली
मिशन हॉस्पिटल'ची १९५८मध्ये निवड केली. अखेरच्या क्षणापर्यंत
ते तिथेच कार्यरत राहिले. दुभंगलेले ओठ व टाळू ह्या व्यंगामुळे मुलांना किती त्रास
होतो, हे सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांच्या लक्षात आलं आणि हे दुःख दूर
करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे ह्या रुग्णालयातील
'चार्ल्स पिंटो क्लेफ्ट सेंटर' ह्या शस्त्रक्रियांचे
भारतातील अग्रणी केंद्र बनले.
दुभंगलेले ओठ-टाळूवरची शस्त्रक्रिया खर्चिक आहे. अनेक पालकांना हा खर्च
परवडणारा नसतो. दूरवरून येणाऱ्या गरीब पालकांना डॉ. एडनवाला ह्यांनी कधी निराश
केलं नाही. रुग्णालय, मित्र आणि काही संस्था ह्यांच्या मदतीने ते ह्या मुलांवर
मोफत शस्त्रक्रिया व उपचार करीत. ह्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे मुंबईचा जयनाथ
पवार. त्याचा आदर्श प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान. त्याचं 'जय हो...' जयनाथला 'की बोर्ड'वर उत्तमपैकी वाजवता यायचं. पण गाणं शक्य नव्हतं. अडचण व्यंगाची
होती. त्रिशूरच्या रुग्णालयात त्याच्यावर विनामूल्य शस्त्रक्रिया झाली आणि तो
आनंदानं 'जय हो...' गाऊ लागला!
ह्याच व्यंगावर विविध देशांमध्ये उपचाराची सोय करणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी स्वयंसेवी संस्था म्हणजे 'स्माईल ट्रेन'. साधारण २० वर्षांपूर्वी डॉ. एडनवाला ह्या संस्थेबरोबर काम करू लागले. मग ते संस्थेचा अविभाज्य घटक बनले. त्यांच्या निधनानंतर 'स्माईल ट्रेन'ने संकेतस्थळावर श्रद्धांजलीपर विशेष लेख प्रसिद्ध केला. (त्याचा अनुवाद खाली दिला आहे.)
डॉ. एडनवाला ह्यांचे जन्मस्थळ.
(छायाचित्र सौजन्य - बेहराम नगरवाला) ............
|
हसू फुलविण्याचे हे मिशन डॉ. एडनवाला ह्यांनी
अगदी काही
महिन्यांपूर्वीपर्यंत चालविले. नव्वदीच्या घरात असलेल्या या शल्यविशारदाने शेवटची शस्त्रक्रिया २०१९च्या डिसेंबरमध्ये केली. श्री. बेहेराम नगरवाला सांगतात की, आपला जन्म
जिथं झाला, त्या घराबद्दल त्यांना फार जिव्हाळा होता. घराजवळचा हौद, तिथलं चिंचेचं
झाड, आईने लावलेलं चिकूचं झाड ह्याची ते नेहमी आठवण काढीत. अलीकडेच त्यांनी
घराचे फोटो मागविले होते. ते पाठवण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी आली.
.............
डॉ. एडनवाला ह्यांना आठवताना...
मुंबईतलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आणि जीवनाच्या साथीदाराची निवड करून डॉ.
हिरजी सोराब एडनवाला दक्षिण भारतातील त्रिशूरमध्ये पोहोचले. तिथं २० खाटांचं, एकही
डॉक्टर वा रुग्ण नसलेलं रुग्णालय त्यांच्या स्वागतासाठी सज्ज होतं. नवंनवंच लग्न
झालेलं हे जोडपं रुग्णालयाच्या आवारातील एका छोट्या घरात राहू लागलं. तिथं नव्हती
पाण्याची सोय, नव्हता साधा पंखा. तशा परिस्थितीत डॉ. एडनवाला ह्यांनी काम सुरू
केले.
त्या आरंभीच्या दिवसांत रुग्णालयाची धुरा डॉ. एडनवाला ह्यांनीच संभाळली.
बाळांतपणं, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांची सेवाशुश्रुषा करणं आदी कामांमध्ये ते
गुंतून गेले. पण त्यांचं आवडतं काम म्हणजे मुलांना मदत करणं. त्यातूनच त्यांच्या
आवडीचं काम उभं राहिलं - दुभंगलेले ओठ आणि टाळू असं व्यंग असलेल्या मुलांवर उपचार
करणं.
त्रिशूरच्या ज्युबिली मिशन रुग्णालयात १९५९मध्ये डॉ. एडनवाला ह्यांनी 'चार्ल्स पिंटो सेंटर फॉर क्लेफ्ट
लिप अँड पॅलेट'चा श्रीगणेशा केला. आपल्या माजी बॉसचं नाव
त्यांनी ह्या केंद्राला दिलं होतं. हे केंद्र म्हणजे त्यांचा एकखांबी तंबूच! ते एकटेच शस्त्रक्रिया करीत. केंद्राला पैशाची चणचण भासत होती; हाताशी आधुनिक उपकरणं नव्हती. पण आपलं काम आणि आपले रुग्ण ह्यांच्याबद्दल
त्यांना असलेलं अमर्याद ममत्व ह्या प्रतिकुल परिस्थितीहून वरचढ ठरलं. हाताशी
असलेल्या मर्यादित सामग्रीच्या साहायाने त्यांनी रुग्ण म्हणून येणाऱ्या प्रत्येक
मुलावर आवश्यक ते उपचार केले, त्याची काळजी घेतली.
दुभंगलेल्या ओठाचे व्यंग असलेल्या मुलांना मदत करण्याच्या कामाला डॉ. एडनवाला
ह्यांनी वाहूनच घेतलं होतं. एकदा तर रेल्वेगाडीतून जाताना खिडकीतून त्यांना असं
व्यंग असलेला एक मुलगा दिसला. त्याला पाहून त्यांनी गाडी थांबविण्यासाठी साखळी
ओढली. आपल्या कामावरच्या त्यांच्या ह्या निष्ठेला तोडच नाही!
ह्याच पद्धतीने चार दशकांहून अधिक काळ डॉ. एडनवला आपलं शल्यक्रियांचं काम करीत
आले. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला त्यांच्या पत्नीच्या वाचण्यात एक लेख आला. हा
लेख होता 'स्माईल
ट्रेन'बद्दल. ही स्वयंसेवी संस्था दुभंगलेल्या ओठांचे व्यंग
असलेल्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया करते आणि ह्या कामासाठी आपले भिडू म्हणून
संस्था भारतातील रुग्णालयांचा शोध घेत होती. हा लेख वाचून त्यांनी आपल्या पतीबद्दल
आम्हाला कळविले आणि सन २००१मध्ये त्रिशुरचे ज्युबिली मिशन हॉस्पिटल आणि डॉ.
एडनवाला 'स्माईल ट्रेन'चे भारतीय भागीदार
बनले. त्यानंतरच्या १९ वर्षांमध्ये 'स्माईल ट्रेन'च्या मदतीमुळे आणि डॉ. एडनवाला ह्यांच्या मूलभूत प्रशिक्षणामुळे 'चार्ल्स पिंटो क्लेफ्ट
सेंटर'चं रूपांतर ह्या व्यंगावर उपचार करणाऱ्या एका आधुनिक,
बहुविद्याशाखीय केंद्रामध्ये झालं.
'स्माईल ट्रेन'चा जीवनगौरव पुरस्कार डॉ. एडनवाला ह्यांना
अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या हस्ते
देण्यात आला. ............
|
खरं तर डॉ. एडनवाला ह्यांचं काम जागतिक स्तरावर दखल घेण्यासारखंच होतं. ते
मात्र 'आपण
बरं नि आपलं काम बरं' अशाच पद्धतीनं ह्या साऱ्यापासून लांब
राहिले. त्यांनी एवढी वर्षं केलेल्या ह्या कामाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता
मिळवून देण्याचं काम 'स्माईल ट्रेन'नं
केलं. 'क्लेफ्ट केअर'बाबत (दुभंगलेल्या
ओठांवर उपचार व काळजी) आयोजित विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना आमंत्रित
करण्यात येऊ लागलं. ह्या परिषदांमध्ये त्यांनी आपले अनुभवाचे बोल सांगितले; त्यांनी एवढी वर्षं वापरलेलं तंत्र श्रोत्यांना समजावून सांगितलं. त्याचा
फायदा जगभरातील अनेक डॉक्टरांना झाला. 'स्माईल ट्रेन'च्या वैद्यकीय सल्लागार मंडळाचे (न्यू यॉर्क) सदस्य म्हणून ते काम पाहू
लागले. संस्थेनं भारतात वैद्यकीय सल्लागार परिषद स्थापन केली, तिचे ते संस्थापक
सदस्य होते. वैद्यकीय उपचार आणि परोपकारी सेवाकार्याबद्दल त्यांना २००६मध्ये अतिशय
मानाचे जोसेफ मॅकार्थी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दुभंगलेल्या ओठावरची भारतातील
५० हजारावी शस्त्रक्रिया २०१८मध्ये झाली. हाच मुहूर्त साधून 'स्माईल ट्रेन'नं जीवन गौरव सन्मान देत डॉ. एडनवाला
ह्यांच्या कार्याला दाद दिली.
खूप काही बदलत असताना आणि वाट्याला एवढी प्रसिद्धी नि लोकप्रियता येत असताना
डॉ. एडनवाला ह्यांच्या कामाची गती कधी मंदावली नाही. 'स्माईल ट्रेन'ची आणि त्यांची साथ दोन दशकांची. ह्या काळात त्यांनी दुभंगलेल्या
ओठांवरच्या सदतीसशेहून अधिक शस्त्रक्रिया केल्या.
डॉ. एडनवाला आपल्या कार्यालयात. सगळ्या भिंती त्यांच्या हीरोंच्या छायाचित्रांनी सजलेल्या! ............ |
'ज्युबिली मिशन हॉस्पिटल'च्या परिसरातील छोट्याशा
घरात डॉ. एडनवाला दाम्पत्याचा संसार साठ वर्षं चालला. त्याच घरात त्यांनी शेवटचा
श्वास घेतला. आठवड्यात किमान चार शस्त्रक्रिया करण्याचा डॉ. एडनवाला ह्यांचा जणू
परिपाठच होता आणि तो त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत पाळला. त्यांच्या कार्यालयातील
भिंती कृष्ण-धवल छायाचित्रांनी सजल्या होत्या. दुभंगलेल्या ओठांचं व्यंग घालविण्यासाठी
शस्त्रक्रियांचा उपाय अवलंबिणाऱ्या जुन्या पिढीतल्या शल्यविशारदांची ती छायाचित्रे.
ते सारे सर्जन म्हणजे डॉ. एडनवाला ह्यांचे नायक! ह्या नायकांच्या स्मृतिमंदिरात ते बसत.
त्याच नायकांच्या मांदियाळीतलेच डॉ. एडनवाला एक होत. पण ह्या विनयशील माणसाने तसं
कधी जाणवू दिलं नाही. स्वतःच्या मनाची तशी समजूत होऊ दिली नाही. दयाळूपणा, समर्पण
आणि सातत्य ह्याचा जिताजागता आदर्श म्हणजे डॉ. एडनवाला. त्यांनी हजारो विद्यार्थी
घडविले. लाखो मुलांच्या चेहऱ्यावर कायमचं हसू फुलवलं. हे विद्यार्थी आणि ते हसरे
चेहरेच त्यांचा वारसा अमर ठेवणार आहेत.
'स्माईल
ट्रेन'च्या उपाध्यक्ष आणि आशियाच्या विभागीय संचालक डॉ. ममता
कॅरल म्हणाल्या, ''अतिशय शांत, हुषार आणि शिस्तप्रिय असलेल्या डॉ. एडनवाला
ह्यांनी आम्हां सर्वांना पुढे पुढे जाण्यासाठी सदैव प्रेरत केले. ऋषितुल्य
व्यक्तिमत्त्वाच्या डॉक्टरांनी सगळ्यांना नेहमीच मदत केली. 'टीच अ मॅन टू फिश' हे 'स्माईल ट्रेन'चं ब्रीद आहे. म्हणजे तेवढ्या वेळापुरती उपयोगी पडेल अशी मदत करण्याऐवजी
संबंधिताला पुढे सदैव कामास येईल आणि तो स्वयंपूर्ण होईल, असं शिकवणं. डॉक्टरांनी
हे तत्त्वज्ञान सर्वांच्या गळी उतरवलं. तरुण शल्यविशारद, वैद्यकीय व्यावसायिक
ह्यांना प्रशिक्षण, सल्ला देऊन, मार्गदर्शन करून त्यांनी तयार केलं. दुभंगलेल्या
ओठाचं व्यंग असलेल्या मुलांबद्दल त्यांना मनस्वी कणव वाटे, त्यांच्याबद्दल
त्यांच्या मनात अपार प्रेम होतं, ह्याचं मला कधीच विस्मरण होणार नाही. परोपकार आणि
करुणा याचे ते मूर्तिमंत उदाहरण होत. अशा मुलांशी संवाद साधणाऱ्या, गप्पा
मारणाऱ्या डॉ. एडनवाला ह्यांना पाहणं फार आनंददायी दृश्य असे. त्यांना आम्ही
गमावलंय, ह्याचं दुःख तर मोठं आहेच. पण त्यांनी उपचार करून व्यंगमुक्त केलेल्या
हजारो मुलांच्या चेहऱ्यावर झळकणाऱ्या हास्यातून त्यांच्या कर्तृत्वाचं दर्शन घडत
राहील. त्यांना जवळून पाहिलेल्या अनेकांच्या हृदयात त्यांनी जागा पटकावलेली आहे.''
('स्माईल
ट्रेन' संकेतस्थळाच्या सौजन्याने. हा मृत्युलेख अनुवादित
करून प्रकाशित करण्यास संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक ब्रँडन लॉसन ह्यांनी परवानगी
दिली. सर्व छायाचित्रे त्यांच्याच संकेतस्थळावरून साभार.)
(मूळ लेखाचा दुवा - https://www.smiletrain.org/stories/remembering-dr-hirji-adenwalla-who-changed-world-one-smile-time)
(आणखी संदर्भ - 'द
हिंदू', 'पारशी टाइम्स', 'मुंबई मिरर')
सतीशराव, फारच छान माहिती शेअर केली.हा एवढा मोठा माणूस !
उत्तर द्याहटवाInspiring
उत्तर द्याहटवाGreat job
He made a huge difference ..
Tribute to him ,team , family and his patients ..
" डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे...." न गाणारे ओठ आता गाऊ लागले. चुंबनही घेऊ लागले. डोळ्यातून आता आनंदाश्रू वाहू लागले. या आदरणीय किमयागारास प्रणाम व नगर विशेषतः भिंगार कॅम्प मधील हे संपुष्ट शोधून काढणारे आपणास धन्यवाद. एक मात्र खरं कि, आजकाल सर्व प्रकारची बहुतांश यंत्रणा, प्रसिद्धी माध्यमे किती खालच्या पातळीवर काम करतात हेच वेळोवेळी दिसून येते.
उत्तर द्याहटवाश्रीराम वांढरे,
भिंगार, अहमदनगर.
Great person !!
उत्तर द्याहटवाग्रेट माणूस... कधी वाचनात आलं नाही. प्रचंड कर्तृत्वाच्या माणसाचं हे मोठेपण ह्या लेखामुळे समजले. तू त्यांचा जीवनपट थोडक्यातही छान उलगडगला आहेस. खूप छान लेख...
उत्तर द्याहटवा- प्रबोधचंद्र सावंत, पुणे
चांगली माहिती, सुंदर मांडणी.
उत्तर द्याहटवा- अविनाश दंडवते, नगर
लेख संपूर्ण वाचला. डॉ. हिरजी एडनवाला ह्यांच्या जीवनकार्याची चित्रफीतच डोळ्यांपुढून सरकली. व्यंग असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारे डॉ. एडनवाला म्हणजे साक्षात देवदूत! ब्लॉगच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगळे विषय हाताळता.
उत्तर द्याहटवा- बालाजी ढोबळे, परतूर (जालना)
नगरचे खरेखुरे नायक हेच!
उत्तर द्याहटवा- अभय भंडारी, नगर
खूप छान माहिती. नगरमध्ये जन्मलेले डॉक्टर त्रिशूरमधील कामाने प्रसिद्ध झाले.
उत्तर द्याहटवा- बी. व्ही. कानडे, बेंगळुरू
नेहमीसारखाच सुंदर लेख आहे तुझा. छान माहिती; जी अजिबात माहीत नव्हती.
उत्तर द्याहटवा- विकास पटवर्धन, नगर
एडनवाला ह्यांचे नाव कुठे तरी वाचल्याचं आठवतं... पण माहिती नव्हती. आज एका असाधारण माणसाची 'खिडकी'द्वारे ओळख झाली. एवढेच नव्हे तर त्यांचे असामान्य कार्य समजले.
उत्तर द्याहटवा- अनंत दसरे, नगर
माहिती नसलेल्या एका थोर माणसाची , त्यांच्या असामान्य कामाची तुम्ही ओळख करून दिली. खूप खूप धन्यवाद .
उत्तर द्याहटवासतीशराव फारच अप्रतिम. तुमच्या नेहमीच्या वहिवाटीप्रमाणे अभ्यासपूर्ण. वाचनाचं समाधान रेंगाळत राहतं आसपास. शुभेच्छा.
उत्तर द्याहटवा-शशिकांत शिंदे.
ग्रेट👌
उत्तर द्याहटवासतीशराव , काय आणि किती लिहू असं झालंय. अहो , एडनवाला यांची समग्र माहिती सोशल मिडिया वर लिहून तुम्ही केवढं थोर कार्य केलंय ! आपल्याकडं सेलेब्रिटी चं कौतुक अति होतं पण एडनवालांंसारखे खरे नायक समाजाला ज्ञात होत नाहीत. मला तर वाटतं , एडनवाला यांच्या रुपात देवानंच भूतलावर अवतार घेतला असावा. 3700 शस्त्रक्रिया ! बापरे ! तो जयनाथ पवार तर त्यांच्या फोटोची रोज पूजा करीत असेल. असो. एडनवाला यांना मनःपूर्वक श्रद्धांजली. तुमचे पुन्हा आभार. असे समाजकार्य तुमच्या हातून अखंडपणे होत राहो. धन्यवाद.
उत्तर द्याहटवापुरुषोत्तम रामदासी. नवी मुंबई.
सतीश , काय लिहू या लेखाबद्दल . तुझ्या खिडकीतून अशी लपलेली व्यक्तित्व उजागर होतात कि सध्याचा मीडिया जाणूनबुजून तिकडे दुर्लक्ष करतो का असे वाटते . लेख वाचताना डोळे थोडे पाणावले, का कोणास ठाऊक भावुक झालो थोडा . थोडे आधी माहित असते तर डॉ . एडनवाला यांना भेटून येता आले असते कारण मी केरळ ला २-३ वेळेस गेलो आहे . डॉ एडनवाला यांस मानाचा मुजरा . अशाच काही व्यक्तित्वाची आणि संस्थांची माहिती असल्यास कळव म्हणजे आमच्या तर्फे काही योगदान करू शकतो . आमचा खारीचा वाटा ....... अमित भट
उत्तर द्याहटवा