रविवार, ८ एप्रिल, २०१८

ब्राव्हो, याsssर!


इंडियन प्रीमियर लीगच्या अकराव्या अध्यायाच्या पहिल्या प्रकरणातली सर्वात मनोवेधक गोष्ट कोणती?

... तर लंगडणाऱ्या केदार जाधवनं विसाव्या षट्कातल्या पाचव्या चेंडूवर कव्हरमधून बेधडक चौकार मारला, तेव्हा मनापासून खूश झालेल्या ड्वेन ब्राव्होचं प्रसन्न हास्य!

त्या आधीच्या चेंडूवर केदारनं एका पायावर बसून फाईन लेगला मारलेल्या षट्कारानं समोरच्या इम्रान ताहीरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. सामना खिशात घातल्याची त्याची खात्री झाली होती. तेव्हा ब्राव्होच्या चेहऱ्यावर काय भावना होती, हे नाही दिसलं. कदाचित तोही कर्णधार धोनीप्रमाणं 'सुपर ओव्हर'चा विचार करीत असेल. दोन चेंडू होते, एक धाव होती आणि गडी एकच बाकी होता. षट्कातले पहिले तीन चेंडू निर्धाव ठरले होते.

पण विजयी चौकारानंतर ब्राव्होचं हास्य इतकं दिलखुलास होतं की, तोड नाही. आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशाहून किती तरी अधिक आनंद त्याला झाला असेल, त्या चौकारानं. कुणास ठाऊक!

पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या चेन्नई सुपर किंग्जला विजयाच्या शिखरावर घेऊन जाण्याचं श्रेय निःसंशय या वेस्ट इंडियन खेळाडूला. चेन्नईची परिस्थिती बिकट होती. पंधराव्या षट्कानंतर सात बाद १०६. हव्या होत्या पाच षट्कांमध्ये ६० धावा; म्हणजे चेंडूमागे दोन. साथीला इंग्लिश मार्क वूड. अवघे चार सामने खेळलेला आणि खात्यात एकूण १० धावा असलेला. त्याच्यानंतर इम्रान ताहीर आणि दुखापत सोस येणारा केदार जाधव. परिस्थिती खरंच वाईट होती. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा खुशीत होता.
 

ब्राव्होने फार वेगळा विचार केल्याचं सोळाव्या नि सतराव्या षट्कांमध्ये दिसलं नाही. दोन षटकांमध्ये १३ धावा निघाल्या; वूड बाद झालेला. आता राहिल्या ४७ धावा आणि १८ चेंडू. मिशेल मॅकलेनघन गोलंदाजीला आणि समोर पहिलाच चेंडू खेळणारा ताहीर. त्यानं पहिल्याच चेंडूवर बॅट फिरवली, धाव काढली, स्ट्राईक फिरवला आणि सामनाही फिरला! त्यानंतर वादळ सुरू झालं. १० चेंडूंमध्ये ३७ धावांची बरसात झाली. मुंबईच्या मुसळधार पावसाची आठवण करून देणारी. पाच षट्कार आणि एक चौकार. शिखरावर विजयपताका फडकावण्याचं काम केदारकडे सोपवून ब्राव्हो एक अफाट खेळी पूर्ण करून तंबूत परतला होता.

मुस्तफिजूरच्या शेवटच्या षट्कातल्या पहिल्या तीन चेंडूंवर एकही धाव न निघाल्यावर हेचि फल काय मम तपाला... असा विचार ब्राव्होच्या मनात आला असेल? शक्यता नाकारता येत नाही. पण त्याची खेळी मातीमोल होणार नाही, याची पुरेपूर दक्षता केदारनं घेतली. या तिन्ही षट्कांमध्ये आणखी एक दृश्य दिसलं - ब्राव्होला आणि केदारला धीर देणारा इम्रान ताहीर. धीर नाही, तो त्यांच्यातली ठिणगी प्रज्वलित करीत असणार! दोन चेंडूंमध्ये दोन धावा करणाऱ्या इम्रानचाही या विजयात वाटा आहेच की.

ब्राव्होचा हा डाव अस्सल वेस्ट इंडियन होता. घणाघात, पण नजाकतदार. गोलंदाजीच्या चिंधड्या उडवतानाही त्यातली कलाकारी दिसणारी. पोलार्ड हल्ला चढवितो तो निर्दयीपणे, तेव्हा त्याच्या देहबोलीत क्रौर्य जाणवतं - समोरच्याला चिरडून टाकण्याचं. ब्राव्होनं एखाद्या शल्यविशारदाच्या कौशल्यानं हे काम लीलया केलं.

एक नक्की या सामन्याच्या दोन्ही डावांतल्या अठराव्या षट्कांवर ब्राव्होचं नाव कोरलं गेलेलं आहे. गोलंदाजी करताना त्यानं त्या षट्कात फक्त ३ धावा दिल्या आणि फलंदाजी करताना २० धावा कुटल्या. दोन्ही डावांतल्या शेवटच्या पाच षट्कांमध्ये एकच माणूस छाप टाकून गेला - ब्राव्हो, याsssर!

जाता जाता - मुंबई इंडियन्सकडून दोन खणखणीत भागीदाऱ्या झाल्या. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांची तिसऱ्या जोडीसाठी 78 धावांची आणि पाचव्या जोडीसाठी पंड्या बंधूंची नाबाद ५२ धावांची. सामना जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची सर्वांत मोठी भागीदार नवव्या जोडीसाठी - ४१ धावांची आणि त्यात ब्राव्होचा वाटा ३९. चेन्नईनं सात गोलंदाजांचा वापर केला. मुंबईनं पाचच गोलंदाज वापरले. आणखी पर्याय असतीलही, पण ते वादळात भिरकावले गेले.

(छायाचित्र सौजन्य : espncricinfo.com)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मुसाफिर हूँ यारों...

  ही प्रसन्न छबी सावंतवाडीजवळच्या घाटातली. आम्ही असंच एकदा बेळगावला गेलो होतो तेव्हाची.. ------------------------------------ ‘ आपण एकदा मु...