मुख्य सामग्रीवर वगळा

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...

नर्मदातटीचे नारेश्वर

(वडोदरा विशेष - २)
----
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं सूप वाजल्यानंतर वडोदरा आणि परिसर पाहण्यासाठी दोन-तीन दिवस मुक्काम करायचं ठरवलं होतं. (संमेलनाला गेल्यावर ‘सूप वाजलं’ अशाच भारदस्त साहित्यिक भाषेत लिहायचं असतं ना!) वडोदऱ्याहून एका दिवसात जाऊन परत येता येईल, अशी ठिकाणं शोधत होतो. संमेलनस्थळी गुजरात पर्यटन महामंडळाच्या दालनातून बऱ्यापैकी माहिती मिळाली. ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांचा पुतण्या भागवत यांनी सुचविल्यानुसार नारेश्वरला जायचं ठरवलं. ते दत्त देवस्थानांपैकी एक, असं त्यांनी सांगितलं.

वडोदऱ्याच्या प्रशस्त बसस्थानकावरून सकाळी साडेआठ-नऊच्या सुमारास नारेश्वर धामसाठी बस असते आणि तिथून परतायला दीड वाजता. बस कुठल्या फलाटावर, किती वाजता लागते याची चौकशी करून फलाटावर उभं राहिलो, तोच एक रिकामी बस आली. तिचा वाहक ‘नारेसर-नारेसर’च ओरडत होता. (नारेसर किंवा नारेस्वर, अंकलेसर किंवा अंकलेस्वर... हे तिथले आपल्याला ऐकू येणारे उच्चार.) त्या तरुण वाहकाला (उगीचंच) मस्का लावत विचारलं, ‘आप हमे नारेश्वर ले जायेंगे ना?’ त्यानं आश्वासक हास्यानंच उत्तर दिलं. घाई करीत बसमध्ये शिरलो. पण त्याची गरजच नव्हती. माझ्यानंतर अजून सात-आठच प्रवासी चढले आणि गाडी सुटली. नारेश्वर फारसं लोकप्रिय नसावं किंवा ही अगदीच डब्बा गाडी आहे, असं प्रवाशाच्या संख्येवरून वाटलं. आणखी दोन-तीन जणांनी नारेश्वरचं तिकीट घेतल्यावर योग्य गाडीत बसल्याचा दिलासा मिळाला.

ही रिकामी बस साधू वासवानी चौकातल्या थांब्यावरच ओसंडून भरू लागली. तिथनं पुढं ‘हात दाखवा, गाडी थांबवा, थोडे प्रवासी उतरवा नि भरपूर प्रवासी चढवा’ असा प्रकार सुरू होता. या ७२ किलोमीटरच्या प्रवासाला साधारण दोन तास लागले आणि तिकीट फक्त ३७ रुपये. रस्ता चांगलाच होता.

श्रीरंगावधूत महाराज मंदिराचं प्रवेशद्वार बाहेरून आणि आतून असं दिसतं.
नारेश्वर दत्तसंप्रदायातलं महत्त्वाचं ठिकाण आहे. श्रीरंग अवधूत (तिथं उच्चार श्रीरंगावधूत असाच करतात.) दत्तसंप्रदायातले महत्त्वाचे संत-कवी. अनुयायी-भाविक त्यांना दत्तात्रेयाचा अवतार मानतात. गुजरातमध्ये दत्तसंप्रदायाच्या प्रसाराचं मोठं काम त्यांनी केलं. (अधिक तपशील - https://en.wikipedia.org/wiki/Rang_Avadhoot). मंदिराच्या अगदी जवळच बसथांबा आहे. मंदिर प्रशस्त आणि शांत. आवारात आपल्या पद्धतीप्रमाणे अन्य छोटी-मोठी मंदिरे. रंगावधूत स्वामींची मोठी मूर्ती आहे. मुक्कामाची आणि दोन्ही वेळच्या प्रसादाची सोय आहे. मंदिरात छायाचित्रं काढायला मनाई असल्याचा फलक होता. पण नेमकी कुठली छायाचित्र काढायला मनाई आणि कुठली काढता येतील, हे न कळल्यानं प्रवेशद्वाराची आणि भोजनगृहाची छायाचित्रं घेतली.


इथं येण्याचं मुख्य आकर्षण होतं नर्मदामैया. परिक्रमेची चार-पाच पुस्तकं वाचली आतापर्यंत. तेव्हापासून नर्मदेविषयीची उत्कंठा वाढलेली. तिचं दर्शन घ्यायचं होतं. मंदिरात दर्शन घेऊन विचारत नर्मदामैयाकडं गेलो. श्रीरंग सेवा घाट - नऊ वर्षांपूर्वी तयार झालेला हा घाट भक्कम आणि चांगला आहे. पण तरीही त्याला थोडी कळा आलेली वाटली. घाट उतरतानाच नर्मदेचं घडलेलं दर्शन तेवढं विलोभनीय नव्हतं. पात्रात पाणी होतं, पण नदी दुथडी भरून वाहताना दिसली नाही. एका छोट्या शाळेची सहल होती तिथं. त्यातल्या विद्यार्थ्यांना पाहून आलेले उंटवाले. विस्तीर्ण वाळवंटात ‘चौपाटी’. सकाळ जेमतेम संपून दुपार होत असल्याने त्या ‘चौपाटी’वर आळसावलेली शांतता. लोकांना पलीकडच्या गावात ने-आण करणारी एक बोट. स्वतःचं काही तरी हरवल्यासारखं पाण्यात ऐवज शोधणारा तरुण. बहुदा परिक्रमावासीयांनी पूजेसाठी केलेल्या पात्रातील महादेवाच्या पिंडी. डुंबणाऱ्या म्हशी. थोड्या दूरवर सुरू असलेला वाळूचा जोरदार उपसा. त्याच्या यंत्रांची घरघर आणि मालमोटारींची थरथर. चौपाटी म्हटल्यावर अपरिहार्य असलेला कचरा. हे दृश्य काही फार मनोहर नाही वाटलं. तसं ते नव्हतंच.
नारेश्वरच्या श्रीरंग सेवा घाटावरून घडलेलं नर्मदामातेचं पहिलं दर्शन.
नर्मदामैयाला पुन्हा भेटायला यायचं कबूल करून देवस्थानातल्या भोजनगृहाकडं वळलो. मोठी रांग असूनही शांततेत प्रसाद वाढणं-घेणं सुरू होतं. भात-आमटी, मसालेदार दिसणारी पण तिखट नसणारी वांगी-वाटाण्याची भाजी आणि बर्फी. वडोदऱ्याच्या परतीच्या प्रवासासाठी थांब्यावर येऊन थांबलो आणि अचानक नर्मदा परिक्रमेला निघालेले भाविक भेटले. त्यांच्याबरोबर परिक्रमेला निघण्याचा आग्रह कसाबसा नाकारून निघालो. त्या विषयी नंतर. तूर्तास नर्मदेच्या पहिल्यावहिल्या भेटीची ही काही छायाचित्रं...


नर्मदेच्या वाळवंटात थाटलेली ही चौपाटी. गेला तेव्हा दुपार असल्याने तिथं सारी सामसूम होती.
(खालचं छायाचित्र) या बाई मात्र उकडलेली मक्याची कणसं घेऊन होत्या तिथं. 












कंबरभर पाण्यात उभं राहून चाललेली ही साधना नव्हे,
तर मोलाचं काही गवसावं यासाठीचे श्रम आहेत!


नर्मदेच्या पात्रात झालेली शिवलिंगांची पूजा.


सहलीला आलेल्या मुलांची घोडेस्वारी.
उंटावरचे शहाणे होण्यास मात्र कुणी तयार नव्हतं.


संध्याकाळपर्यंत काहीच काम नसल्यानं वाळूत तोंड खुपसण्याच्या बेतात असलेला ‘रईस’.


नदीकाठी वाळूची चलती. महाराष्ट्राप्रमाणंच
इथंही वाळूचा उपसा असा जोरात सुरू असलेला दिसला.














तुरीच्या ओल्या शेंगा घ्यायच्या की सोललेले दाणे?


सहलीसाठी आल्यावर सहभोजनाचा आनंद
आणि तोही प्रसादालयात.


नारेश्वरहून पलीकडच्या तिरावरच्या गावात ने-आण करणारी नाव. यंत्रावर चालते ती.
माणसांसह वाहनांना ‘ले चल पार’चं काम दिवसभर सुरू असतं. एका फेरीचं भाडं १० रुपये.


टिप्पण्या

  1. घरबसल्या 'नर्मदामैया'चे दर्शन घेता आले. अप्रतिमच!
    - रोहिणी पुंडलिक, नगर

    उत्तर द्याहटवा
  2. बडोद्याजवळच्या नारेश्वरबद्दल वाचताना आम्ही अलीकडेच केलेल्या नर्मदा परिक्रमेच्या आठवणी ताज्या झाल्या.
    - दिलीप वैद्य, पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. नारेश्वरच्या वर्णनावरून बडोद्याला तीनतीनदा जाऊनही आपण न बघितल्याबद्दल खंत वाटली नाही. नर्मदा बघावी तर जबलपूरचीच. भेडाघाट, मार्बल रॉक्स व धुवाधार ही अप्रतिम ठिकाणे नसली बघितली तर अवश्य बघा.
    - प्रियंवदा कोल्हटकर

    उत्तर द्याहटवा
  4. सर्व नद्या आम्हाला गंगेसमानच! म्हणूनच आपली प्रवाही लेखणी 'खिडकी'तून थेट नर्मदेच्या प्रवाहास जाऊन मिळाली. आपला लेख नकळत 'Testament of Jawaharlal Neharu' मध्ये पंडितजींनी गंगा-यमुना नद्यांचं केलेल्या भावस्पर्शी वर्णनाची तसेच 'When the Rivers run Dry'मध्ये श्री. फ्रेड पियर्स यांनी 'भारत एक प्रचंड अंदाधुंदी' म्हणून भारतातील नद्या-पाणी व्यवस्थापन याची वर्णन केलेली वस्तुस्थिती यांची आठवण करून देतो.
    - श्रीराम वांढरे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्ही गावं एक होतात. बातमी नेमकी कुठली ते कळायला मार्ग नाही. लोणावळे, जळगाव, भुसावळ, करमाळा आदी स्थाननामांतील आणि काळे, साळी, माळी, जगदाळे, बाळू आदी व्यक्तिनामांतील ‘ ळ ’ जाऊन तिथं ‘ ल ’ कसा येतो ? हिंदीमध्ये ‘ ळ ’ च्या जागी ‘ ल ’ का, हा प्रश्न पुण्यातील आयुर्विमा अधिकारी प्रकाश निर्मळ ह्यांना छळत होता. हा अक्षरबदल खटकत होता. त्यांनी दाद मागायचं ठरवलं. अक्षरांतर होऊ नये, ह्यासाठी २०१८ पासून प्रयत्न सुरू केले. ' ळ ' ऐवजी ' ल ' चा वापर चुकीचा आहे. हिंदीमध्ये ' ळ ' च वा...

द. मा. - पाहिलेले, ऐकलेले

' परमेश्वर प्रसन्न झाला, तर पुढचा जन्म मी लेखकाचाच मागीन! उत्तम लेखक होणे, हीच माझी महत्त्वाकांक्षा होती. माझ्या भाषेतील हजारो, लाखो लोकांच्या जीवनात माझ्या लेखनामुळे आनंद निर्माण करावा, हीच माझी इच्छा आहे...' ...आपल्या हजारो, लाखो चाहत्यांना हळहळ करायला लावीत, ह्या जगाचा काल निरोप घेतलेल्या प्रसिद्ध लेखक प्रा. द. मा. मिरासदार ह्यांचे हे म्हणणे आहे. नगरमध्ये २४ वर्षांपूर्वी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांची मुलाखत झाली. तिचा समारोप करताना त्यांनी ही इच्छा बोलून दाखविली. द. मा. मिरासदार आपल्या अनेकांचे आवडते लेखक. लहानपणी कधी तरी त्यांच्या कथांची ओळख झाली. बहुतेक जुन्या मॅट्रिकच्या (अकरावी) मराठी पाठ्यपुस्तकात त्यांची नागू गवळीची कथा होती. मी ऐकलेली-वाचलेली त्यांची ती पहिली कथा. आपल्या म्हशींवर लेकरांप्रमाणे प्रेम करणारा, कुंभकर्णी झोपेतच दोन-तीन चोरांना लोळवणारा नागू फार आवडला. मग संधी मिळेल, तेव्हा करमाळ्याच्या ज्ञानेश्वर वाचनमंदिरातून त्यांची पुस्तके आणून वाचू लागलो. भोकरवाडी आणि नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, आनशी, महादा, ज्ञानू वाघमोडे ह्...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...