Thursday 16 December 2021

कार्यकर्ताही नि पत्रकारही!


सुधीर मेहता. नगरमध्ये पत्रकारिता आणि राजकारण करणाऱ्या (आणि एकाच वेळी ह्या दोन्ही गोष्टी करणाऱ्या) माणसांना हे नाव माहीत नाही, असं होणारच नाही. साधारण दोन हजारच्या आधी पत्रकारितेत आलेल्या, सत्तरनंतर राजकारणात आलेल्या बहुतेक सगळ्यांची सुधीरशी ओळख होती. काही अपवाद वगळले तर त्यांचे सुधीरशी अरे-तुरेचे संबंध होते. पत्रकार त्याला पत्रकार कमी नि राजकीय कार्यकर्ता अधिक मानत आणि राजकारणी त्याला पत्रकार म्हणत. थट्टा, क्वचित टवाळी केली जात असली, तरी ह्या दोन्ही क्षेत्रांतल्या अनेकांना तो आपला वाटत राहिला. त्यांचे त्याच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते.

नगरमध्ये ३३ वर्षांपूर्वी आलो मी. 'केसरी'मध्ये रुजू झालो. सर्जेपुऱ्यातल्या प्रियदर्शनी संकुलातील कार्यालयात सुधीरला पहिल्यांदा पाहिलं. तेव्हा तो 'एन. एस. यू. आय.'चं आणि युवक काँग्रेसचं काम करीत होता. प्रसिद्धिपत्रकं घेऊन तो येत असे. त्याची ओळख 'पत्रकार' अशीही होती. कोणत्याच वर्तमानपत्रात काम न करणारा हा माणूस पत्रकार कसा, असा (भाबडा) प्रश्न तेव्हा पडला होता. त्यानं आधी कोणकोणत्या वर्तमानपत्रात ('गावकरी', 'नवा मराठा', 'लोकयुग' आदी) काम केलं होतं, हे माहीत असण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळंच ते आश्चर्य वाटायचं. तेव्हा तो साप्ताहिक चालवत होता - 'बिरादर' नाव असावं त्याचं. युवक बिरादरीशी संबंधित. ते क्वचित कधी पाहायला मिळे.

सोनईच्या प्रवीणसिंह परदेशी ह्यांचं पत्र 'केसरी'मध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यात राजीव गांधी ह्यांच्यावर जोरदार टीका केलेली. त्याला सुधीरनं उत्तर दिलं, ते पत्रक काढून नव्हे, तर पत्रच लिहून. राजीव गांधी ह्यांच्या करिष्म्यावर लुब्ध असलेल्या तरुण-तडफदार काँग्रेसजनांपैकी तो होता. त्या पत्रात त्यानं सणसणीत उपहासाचा आधार घेतला होता. त्याचं तसं लिखाण नंतर पाहायला मिळालं नाही. दोन-चार भेटीनंतर सुधीरची ओळख झाली. ती पुढे वाढणार होती. तो नेमकं करतो काय, ह्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा मिळालं नव्हतं. पण पत्रकारांचा तो मित्र आहे, एवढं नक्की कळलं होतं.

विधानसभेची १९९०ची निवडणूक नगरसाठी वेगळी ठरली. अनिल राठोड ह्यांनी बाजी मारत शिवसेनेचा भगवा फडकावला. सुधीर त्यांचा 'भय्या, भय्या' असा एकेरी उल्लेखानं कौतुक करत होता. वाटलं की, नव्या सत्तास्थानाजवळ जाण्याची त्याची ही धडपड आहे. हा काँग्रेसचा कार्यकर्ता लगेच संधी साधून शिवसेनेचा झाला काय, असा प्रश्न पडला. सहकारी वार्ताहरानं माझा संभ्रम दूर केला. हे दोघं चांगले मित्र आहेत, त्याचा शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ता असण्याशी काही संबंध नाही, हे त्यानं सांगितलं. भय्या आणि सुधीर ह्यांचे संबंध कशा पद्धतीचे आहेत, ह्याचा उलगडा यथावकाश झाला. अर्थात सुधीरने ऐकवलेल्या किश्शांमधूनच.

त्यानंतर काही दिवसांतच सुधीर आमचा सहकारी बनला. तो 'केसरी'मध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाला. हा कार्यकर्ता माणूस एकदम श्रमिक पत्रकार कसा झाला, हे तेव्हा पडलेलं कोडंच होतं. 'केसरी'मध्ये तसा तो 'पर्सोना नॉन ग्राटा' असल्यासारखा होता. माझे आणि त्याचे सूर मात्र जुळून आले. आमचे संबंध एकेरीचे झाले, मैत्रीचे झाले. तेव्हाच्या 'केसरी'मध्ये बातमी लिहिण्याचे, संपादित करण्याचे व प्रसिद्ध करण्याचे अनेक यम-नियम होते. ते सारे नियम सुधीरसारख्या 'फ्री बर्ड'ला जाचकच होते. तो बातमी लिहून टाकायचा. संपादनाचे सारे सोपस्कार करून मी ती छापण्यायोग्य बनवायचो. त्यातूनच त्याचं माझ्याबद्दलचं, माझ्या लिखाणाबद्दलचं कौतुक वाढत गेलं.

फोटोत आपण दिसलो पाहिजे, बातमीत आपलं नाव आलं पाहिजे, ही सुधीरची मूळची कार्यकर्ता वृत्ती. पत्रकारानं असं बातमीत झळकायचं आणि दिसायचं नसतं, हे काही त्याच्या पचनी पडत नव्हतं. एका गणेशोत्सवात त्याच्याकडं देखाव्यांची बातमी देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. तो रोज एका मंडळाच्या देखाव्याचं उद्घाटन करायचा आणि रंगवून बातमी लिहायचा. बातमीचा लीड त्यालाच असे. छायाचित्रातही अपरिहार्यपणे तो असायचा. ती बातमी उपसंपादक म्हणून माझ्याकडे आली की, त्याला सांगून त्याचं नाव उडवून टाकायचो. कात्री घेऊन फोटोतून त्याला अलगद कापायचो. हे करताना 'फोटो असा कापायचा असतो बरं का...' असं शिकवण्याचा आव आणत त्याला सांगायचो. खोट्या रागानं तो पाठीत धपाटा मारायचा. कधी गाल ओढायचा. कधी तरी त्याची पूर्ण बातमीच नाकारायचो. उपसंपादकाला असलेला तो अधिकार त्यानं मान्य केला होता. 'सतीश मुद्दाम माझ्या बातम्या कापतो,' अशी तक्रार त्यानं वरिष्ठांकडे कधीच केली नाही किंवा माझा रागराग केला नाही.

'केसरी'तलीच ही गंमत. एका बंडखोर, तरुण तुर्क नेत्याच्या वैयक्तिक आयुष्यातली मोठी घडामोड होती. त्यानं ज्या तरुणीला आधी वचन दिलं होतं; तिच्याशी लग्न करण्याचं नंतर नाकारलं. पुण्याच्या कार्यालयातून ही माहिती आली. बातमीचा स्रोत राशीनमध्ये होता. अन्य कुणी तिथं जाण्यास तयार नसल्यानं सुधीरला पाठवण्यात आलं. त्याच्यातील कार्यकर्त्यासाठी ही मोठीच संधी होती. राशीन-कर्जतमध्ये त्याचे जवळचे नातेवाईक होते, कार्यकर्ता म्हणून ओळखी होत्या. त्यामुळं बारीकसारीक माहिती काढण्यात त्याला काहीच अडचण आली नाही. संध्याकाळी सातच्या सुमारास फोनवरून त्यानं बातमी दिली. माहिती भरपूर असल्यामुळं ती अतिशय छान रंगवली आणि 'सुधीर मेहता यांजकडून' अशा नामोल्लेखासह पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली. पुण्याच्या अंकातही ती लागली. पुणे कार्यालयातील वरिष्ठ त्या बातमीवर खूश झाले. त्यामुळे स्वाभाविकच सुधीरही माझ्यावर खूश झाला. 'मला बातमी अशी रंगवता आलीच नसती,' असं नंतर त्यानं मला प्रांजळपणानं सांगितलं.

राजीव गांधी ह्यांची हत्या झाल्याची बातमी मी रात्री साडेअकराच्या सुमारास बी. बी. सी.वर ऐकली. तिथून तडक सुधीरच्या घरी गेलो. त्याच्या घरून राजीव गांधी ह्यांची छायाचित्रं असलेले विविध मासिकं घेऊन आम्ही केडगावला 'केसरी'च्या कार्यालयात गेलो. ती रात्र आम्ही कार्यालयात काढली. सोबतीला होते सुधीर सांगत असलेले राजीव ह्यांचे ऐकीव किस्से. ती आठवण तो नंतर नेहमी सांगत असे. राजीव हत्येनंतर दुसऱ्या दिवशी आमची जेवणाची मोठीच अडचण झाली. खानावळ, हॉटेलं, टपऱ्या बंद. तेव्हा सुधीरच्या घरी जायचं सुचलं नाही. हे नंतर सांगितल्यावर तो बराच हळहळला.

काही काळानंतर सुधीर 'केसरी'तून बाहेर पडला. पण त्यामुळे आमचे संबंध कमी झाले नाहीत. आदेश्वर कॉलनीतील त्याचं घर आमचं हक्काचं झालं. दुपारी कधी गेलो, तर त्याचं जेवण तीन-साडेतीन वाजता असायचं. त्याच्या बरोबर जेवायचा हमखास आग्रह व्हायचा. 'लोकसत्ता'मध्ये 'नगरी नगरी' सदर दीर्घ काळ लिहिलं. सुधीर त्याचा हक्काचा वाचक. त्याला मनापासून आवडत होतं ते. त्या विनोदी, टवाळी-उपहास करणाऱ्या सदरातून दोन-चार वेळा त्यालाच लक्ष्य केलं. त्यानं 'नगर फेस्टिव्हल' सुरू केला, तेव्हा त्याबद्दल मोठ्ठं लिहिलं होतं. म्हटलं तर ती टिंगल होती आणि मानलं तर त्याचं कौतुक होतं. भपकेदार 'पुणे फेस्टिव्हल' आयोजित करणाऱ्या सुरेश कलमाडी ह्यांच्याशी थेट तुलना केल्यामुळं सुधीर मनोमन सुखावला होता. तसाही तो काही हळवा नव्हता. त्यामुळं त्याच्यावर टीका करायला सोपं जायचं. तो हे सारं मोकळ्या मनाने घेई.

खरं सांगायचं झालं, तर सुधीर पत्रकारापेक्षा चळवळ्या कार्यकर्ता अधिक होता. कल्पकता हा त्याचा मोठाच गुण. वेगवेगळ्या प्रश्नांवर त्याला आंदोलनं सुचत. ती तापवत कशी ठेवायची, हेही त्याला माहीत होतं. त्यात पुन्हा हे प्रश्न कोणत्या तरी समाजघटकाच्या अगदी जिव्हाळ्याचे असायचे. औद्योगिक वसाहतीच्या 'डी झोन'चा मुद्दा त्यानं दीर्घ काळ तापवत ठेवला होता. त्यामुळं उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाला 'सुधीर मेहतांकडूनच तुमचे प्रश्न सोडवून घ्या ना...' असं शरद पवार ह्यांनी तेव्हा सुनावलं होतं. सुधीर ते नेहमी कौतुकानं सांगायचा. महाविद्यालयीन जीवनात केलेल्या गमती, आंदोलनं ह्याबद्दल अलीकडे तो भरभरून सांगे. गोविंदराव आदिक, मग यशवंतराव गडाख आणि नंतर बाळासाहेब विखे ह्यांचा तो काही काही काळ आवडता होता. त्यांच्याबद्दल सुधीरला फार बारकाईनं माहिती होती. त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्यं, आवडीनिवडी तो अलगद टिपून घेई.

'युवक बिरादरी' म्हणजे सुधीरची घरची चळवळ. एकविसाव्या शतकात संघटनेचं मोठं पद त्यानं भूषवलं. राज्याच्या राजकारणात मोठं झालेल्या अनेकांशी त्याचा परिचय झाला तो बिरादरीच्या माध्यमातून. 'बिरादरी'ला विलासराव गमतीनं 'युवक धराधरी' म्हणायचे, हे तो कौतुकानं सांगायचा. मुख्यमंत्री झाल्यावर विलासरावांनी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या नगरला झालेल्या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी भरपूर वेळ दिला. सुधीर त्या अधिवेशनाचा संयोजक होता. 'बिरादरी'च्या क्रांती शाह ह्यांच्याशी सुधीरचं फार जवळचं नातं होतं. संघटनेची बातमी सुधीरनं दिलेली असली की, त्यात क्रांती शाह नाव असायचंच. बिचाऱ्या पत्रकारांना 'त्या' क्रांती शाह वाटत. त्यांच्या नावामागे हमखास 'श्रीमती' लिहिलं जाई. 'श्रीमती'चं 'श्रीयुत' करण्याचं काम मी खूप वेळा केलं. सुधीरला म्हणालोही बऱ्याच वेळा की, 'माझी एकदा क्रांती शाह ह्यांच्याशी ओळख करून दे. 'लिंगबदल' होण्यापासून मी त्यांना अनेक वेळा वाचवलं, हे सांगायचं आहे!'

पत्रकारांच्या असो की अन्य कुठल्या, सुधीरला संघटनेत राहणं फार आवडे. 'नगर फेस्टिव्हल' त्यानं उत्साहानं सुरू केला. पण त्याला वाटलं तशी पुण्याची रंगत आली नाही. तरीही तो अनेक वर्षं नेटानं चालवत राहिला. माझ्यासह बरेच पत्रकार त्या नगर व्यासपीठाचे 'विश्वस्त', पदाधिकारी होते. अंध-अपंगांसाठीही सुधीरनं नव्वदीच्या काळात संघटना चालवली होती. अलीकडे तो नवनीत विचार मंचाच्या माध्यमातून सक्रिय राहण्याचा प्रयत्न करीत होता. नगर पर्यटनही त्याच्या डोक्यात होतं. हे सगळं तब्येत साथ देत नसताना.

मूळचा करमाळ्याचा हे कळाल्यावर त्याला माझ्याबद्दल थोडी जास्त आपुलकी वाटू लागली. 'तुमचं कर्जत-करमाळा' असा उल्लेख तो त्याच्या आईच्या संदर्भात नेहमी करायचा. पत्रकार म्हणून किंवा सक्रिय राजकीय कार्यकर्ता म्हणून सुधीरला त्याच्या काही मर्यादा होत्या. राजकीय क्षेत्रामध्ये मुंबईत काम करण्याची संधी त्याला तरुण वयात मिळाली होती. पण घरगुती अडचणींमुळे जाता आलं नाही. तरुण वयात गमावलेल्या अशा अनेक संधी त्याला अलीकडच्या काही वर्षांत व्यथित करत होत्या. अर्थात त्या तो जाहीरपणे सांगत नसे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ह्यांचं पहिलं आंदोलन झालं, ते सुधीरनं बाहेर काढलेल्या सामाजिक वनीकरणमधील प्रकरणाचा पाठपुरावा करण्याच्या निमित्तानं. कालानंतरानं तो त्यापासून लांब गेला.

दीर्घ काळ राजकारण-समाजकारण-पत्रकारिता ह्यामध्ये वावर असल्याने सुधीरकडे असंख्य अफाट आठवणी होत्या. एकदा शरद पवार कुठल्या कार्यक्रमासाठी नगरला येणार होते. त्यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणजे सुधीरचे विरोधक. ते आपल्याला पवारसाहेबांना भेटू देणार नाही, हे ओळखून ह्या गड्याने वेगळीच चाल खेळली. नगरच्या आधी काही किलोमीटर हार-गुच्छ घेऊन तो थांबला. गाडी दिसताच ती थांबवून त्यानं पवारसाहेबांचा सत्कार केला आणि त्यातच बसून तो नगरकडे निघाला. डाक बंगल्यावर मोटर येताच कार्यकर्ते अदबीने पुढं आले. त्यांनी मोटारीचं दार उघडून विनम्रपणे नमस्कार केला, तो स्वीकारायला त्यांच्या समोर होता सुधीर! हा किस्सा तो रंगवून सांगायचा. बिरादरीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सिनेजगतातील तनुजा, जया भादुडी अशी मोठी व्यक्तिमत्त्वं त्याला जवळून अनुभवायला मिळाली. बिरादरीच्या एका शिबिराच्या निमित्ताने अभिनेत्री तनुजा काही दिवस नगर मुक्कामी होती. त्या काळात आपण छोट्या काजोलला कसं खेळवलं, हेही सुधीर रंगवून रंगवून सांगायचा. एखाद्याला वश कसं करायचं, ह्याची खुबी त्याला चांगलीच माहीत होती. (त्याच्या भाषेत 'नॅक'!) स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारलेल्या शैलेंद्र गौड ह्यांना त्यानं इतकं आपलंसं केलं की, ते दोघे जणू शाळासोबती आहेत, असं कुणा त्रयस्थाला वाटावं.

माझ्यासारख्या बऱ्याच समकालीन पत्रकारांना सुधीरचं घर आपलं वाटे. त्याच्या आतिथ्यप्रियतेचा अनेकदा अतिरेक होई. त्याचा त्रास घरच्या मंडळींना व्हायचा. त्यामुळेच प्रसंगी आम्ही कल्पनाभाभींची बाजू घेऊन त्याच्याशी वादही घालत असू. कोणत्याही माणसाप्रमाणे सुधीरमध्येही गुण-दोष होतेच. पण मैत्री जोडण्याचा आणि निभावण्याचा त्याचा गुण अफलातून होता. 'पत्रकार' म्हटल्यावर तो कधीही, कसल्याही मदतीसाठी तयार असायचा. एरवी त्याच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांनाही तो अडचणीच्या काळात मित्र म्हणूनच वागवी. '...प्रसंगानुसार आम्ही १०५' अशी त्याची तेव्हाची वागणूक असायची. आधीच्या काळात ज्यांच्याशी जमत नव्हतं, अशा अनेक व्यक्ती नंतर त्यांच्या मित्रयादीत समाविष्ट झाल्या. तेव्हा जुनं सगळं विसरण्याची कला त्याला अवगत होती.

अलीकडच्या पाच वर्षांत वेगवेगळ्या व्याधींनी सुधीरला त्रस्त केलं होतं. मधुमेहानं उचल खाल्ली. त्यामुळे दोन-तीन वेळा त्यांना दीर्घ काळ रुग्णालयात राहावं लागलं. त्या काळात माझी आणि त्याची अगदी नित्यनेमानं भेट होई. गप्पा रंगत. 'केसरी'तले काही किस्से तो अशा थाटात सांगायचा की, वाटे मी तिथे नव्हतोच कधी. नवनव्या नि मोठमोठ्या उपक्रमांची स्वप्नं तो रंगवी. त्यासाठी माझी कशी मदत लागेल, हेही पटवून देई. 'नगर व्यासपीठ'तर्फे गुणिजनांना 'नगरभूषण' पुरस्कारानं गौरवायचं त्याच्या मनात होई. पाच वर्षांपूर्वी त्यानं अशी पाच नावं काढली. त्यांची मानपत्रं लिहिण्याचं काम माझ्यावर सोपवलं. त्यातलं एक नाव होतं अभिनंदन थोरात ह्यांचं. 'कार्यक्रम कधी करायचा, पाहुणा कोण बोलवायचा, हे अभिनंदनला विचारून तू ठरव,' असं त्याचं म्हणणं होतं. काही ना काही अडचणी येत राहिल्या आणि तो कार्यक्रम काही झालाच नाही. तो सरचिटणीस असलेल्या राष्ट्रीय पत्रकार संघटनेचं अधिवेशन त्याला शिर्डीत घ्यायचं होतं. कोरोनामुळं तेही शक्य झालं नाही.

मध्यंतरीच्या काळात सुधीरनं वेगवेगळ्या दैनिकांमध्ये काम केलं. पण मूळ चळवळ्या वृत्तीचा असल्यानं तो कुठंच फार काळ स्थिरावला नाही. ह्या काळात त्यानं जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांतली माणसं मात्र मोठ्या प्रमाणात जोडली.

पत्रकारितेचं स्वरूप फार बदललं. राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्र ह्यातही नवीनं माणसं आली. स्वाभाविकच सुधीर त्यापासून थोडा लांब गेला. पण समकालीन राहण्याची त्याची धडपड कायम होती. त्याच्याकडे असंख्य आठवणी होत्या. अनेक किस्से होते. ते कागदावर उतरवण्याचा प्रयत्न त्यानं कधी केला नाही. 'आपण ब्लॉग चालू करू. तू सांगत जा, मी लिहीत जाईन,' ह्या माझ्या ऑफरला त्यानं मनापासून कधीच देकार दिला नाही. 'डॉक्युमेंटेशन'च्या बाबत त्याच्यातला पत्रकार निरुत्साही राहिला. लिहिण्यापेक्षा बोलणं त्याला आवडे. त्याच्या उमेदीच्या काळात आजच्या एवढ्या दूरचित्रवाणी वाहिन्या असत्या, तर पक्षप्रवक्ता म्हणून त्यानं जोरदार कामगिरी केली असती. तेवढा बहुश्रुत होता तो.

अलीकडच्या पाच वर्षांत सुधीर थकला होता. तरुणपणी केलेली धावपळ आता शरीर कुरकुरून बोलून दाखवत होतं. त्याच्या शारीरिक हलचालींवर मर्यादा आली होती. पण त्याच्यामधला उत्साहाचा झरा कायम होता. त्याचं दर्शन तो ॲडमिन असलेल्या व्हॉट्सॲप ग्रूपवरून व्हायचं.

उत्साहाचा हा खळाळता झरा काल रात्री शांत झाला. कायमसाठी. काहीसा अकालीच!

-----------------

#journalism #Ahmednagar #MarathiJournalism #journalist #politics #activist #sudheer_mehata

12 comments:

 1. सुधीर मेहतांबद्दल आमचा नेता सुधीर मेहता हे म्हटलं जायचं . आणि काही अंशी ते खरंही होतं कारण ज्या समुहात किंवा संघटनेत ते असायचे तिथं त्यांच्यातला नेता जागा रहायचा आणि त्यांच्यातला कार्यकर्ता काम करत रहायचा . प्रचंड सकारात्मक ऊर्जा असलेलं व्यक्तिमत्व . म्हणूनच तुमच्या लेखनाची शेवटची ओळ मनाला भिडली - उत्साहाचा खळाळता झरा शांत झाला . अगदी समर्पक .

  ReplyDelete
 2. आपण आजींच्या टपरीवर चहासाठी जात असू, त्यावेळी ते तेथे नेहमी दिसत.. त्यावेळी तुमच्या गप्पांमधून तुमच्यातील बाॅन्डिंग दिसायची.. काकांना भावपूर्ण श्रद्धांजली...!!

  ReplyDelete
 3. सतीशराव,
  सुधीर मेहता यांच्या बद्दल आपण ज्या ओघवत्या शैलीत लिहिलं ते वाचताना सुधीरजी समोर बसले आहेत की काय असाच भास होत होता. 90-91 च्या काळात मी पत्रकारितेला सुरुवात केली ती केसरी पासूनच.. त्यावेळी सतीशराव, आपल्याबरोबर भूषण देशमुख, रामदास नेह्रूलकर, दिलीप धारूरकर, शिल्पा रसाळ यांच्या बरोबरच अत्यंत बोलका परखड असा एक कार्यकर्ता भेटला पण तो पत्रकारापेक्षा कार्यकर्ताच अधिक वाटत होता ही मला जाणवलेली गोष्ट आपल्या विवेचनावरून अधिक स्पष्ट होते. काका सगळ्यांशी बोलत होते मग तो नवीन असो की जुना, ओळखीचा असो की नसो, सगळ्यांशी आपुलकीच्या नात्यांनं बोलणारा,धडपडणारा अत्यंत उत्साही कार्य रत कार्यकर्ता आज आपल्यात नाही हे मान्यच करावं लागेल.
  आपण ज्या आठवणी सांगितल्या त्यातून काका समोर बसले आहेत हीच अनुभूती मिळते. सुधीर काकांच्या जाण्यानं पत्रकारितेतील चैतन्याचा झरा आज आटला असंच म्हणावं लागेल..
  गजेंद्र क्षीरसागर

  ReplyDelete
 4. 'खिडकी' ची किमया... आपला सुधीर साक्षात समोर उभा ठाकला. आमची ७०पासून मैत्री असूनही त्याच्या काही करामती आणि कारवाया 'खिडकी'तून समजल्या. काही प्रसंग आणि उल्लेख 'मनोमन' हसवून गेले. सुधीरच्या सर्व पैलूंचे यथायोग्य दर्शन हेच 'खिडकी'चे मोठे यश.
  शुभेच्छा .. ����
  - प्रताप देशपांडे, नगर

  ReplyDelete
 5. सतीश, सुधीर मेहतांबद्दल तुझा लेख
  वाचला. मी कधीही हे नाव ऐकलं नाही;
  तरी पण मला सुधीरबद्दल आत्मीयता
  वाटू लागली. हे तुझ्या लिखाणाचं यश आहे.

  सुंदर अप्रतिम! तसंच ओघवतंपण!
  तुझ्या खिडकी मधिल लेखाचे
  एक संग्रहरूपी पुस्तक प्रकाशित करावं.
  मला वाटल ते तुला कळवलं!!
  - पी. बी. देशमुख, दहिसर, मुंबई

  ReplyDelete
 6. सुधीर मेहतांबद्दल छान, प्रांजळ आणि मनापासून लिहिलं आहे.. सुधीर मेहता यांच्याशी फारसा संपर्क आला नाही. कोणत्या निमित्ताने भेटलो ते आता आठवत नाही. त्यांचं व्यक्तिचित्र अचूक साकारलं आहे.
  - विनय गुणे, संगमनेर

  ReplyDelete
 7. माझे सहकारी मयूर सर..यांचे वडील म्हणजे काका त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐..... सर आपण त्यांच्या बद्दल एवढे भरभरून लिहिले... तुमचे सहकारी,मित्र असे अचानक गेल्यामुळे मित्रत्वाची पोकळी भरून न निघण्यासारखी आहे. 1990 ते पासून तुम्ही जे नगर बघितले तुमच्या लेखणीतून अक्षरश डोळ्यासमोर उभे राहिले...

  तुषार वांढेकर, सोनई

  ReplyDelete
 8. सुधिरभाईंची माझी ओळख युवक बिरादरी मुळे. त्यांची पत्नी कल्पनाचे माहेर मी रहात असणाऱ्या पुण्यातील रास्तापेठेतील वाड्यातील. त्यामुळे ऋणानुबंध आणखी वाढले. काही दिवसांपूर्वी त्यांची एका लग्नात भेट झालेली त्यावेळीही तब्येत बरी नसताना देखील समाजाकरीता काय करता येईल याच्याच गप्पा. असा ऊत्साहाचा झरा अचानक थांबला ऐकून दुःख झाले.कल्पना व परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली .दिलीप मेहता चेअरमन जिनेंद्र सोशल फाऊंडेशन.

  ReplyDelete
 9. Farach sunder. Mala tyana bhetayachi sandhi milali nahi pan apan lihilelya smrutilekh aprateem.

  ReplyDelete
 10. सतीशराव, काका तथा नेताजी यांच्या समवेतच्या आठवणी थोडक्यात पण ओघवत्या भाषेत मांडल्यात. काका हे व्यक्तिमत्वच अस होत की कोणाच्या संपर्कात तासभर जरी आले तरी अनेक आठवणी सोडून जात. आपण तर अनंत काळ बरोबर राहिलात, त्यामुळेच 'थोडक्यात' असा शब्दप्रयोग केला. अहमदनगर प्रेस क्लब, नगर व्यासपीठ आदी संस्थानमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला. दिलखुलास व्यक्तिमत्त्व,असाच त्यांचा उल्लेख करावा लागेल. प्रकृतीच्या अनंत तक्रारी असतानाही त्यांनी त्या कधी चेहऱ्यावर येऊ दिल्या नाहीत. सतत उत्साही असलेला हा कार्यकर्ता त्यांचे चिरंजीव मयूर यांच्या अपघातावेळी कोलमडलेला पहायला मिळाला. मात्र तरीही तेच स्वतःला धीर देत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती; तरीही त्यांच्यातील चळवळा कार्यकर्ता शांत नव्हता. या काळात मयूरला मोठी कसरत करावी लागत असे. एकीकडे नोकरीची जबाबदारी पेलतानाच दुसरीकडे वडिलांची काळजी घेणे, त्यांच्याशी संवाद साधत दगदग करू न देणे, वैद्यकीय उपचार वेळोवेळी करवून घेणे, औषधाच्या वेळा पाळणे या सर्व आघाडीवर मयूर व त्याच्या कुटुंबीयांनी रात्रीचा दिवस केला. काका आता आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी त्यांचे अस्तित्व कायम ठेवतील.
  - सुहास देशपांडे

  ReplyDelete
 11. *ज्येष्ठ पत्रकार मित्र श्री सतीश* *कुलकर्णी यांनी आपल्या* *खिडकी* *या* *ब्लॉग वर स्वर्गीय* *सुधीर मेहता यांना* *वाहिलेल्या, त्यांच्या ओघवत्या* *शैलीतील समर्पक शब्द* *आदरांजलीने स्वर्गीय सुधीर मेहता* *यांच्या जीवन प्रवासातील अनेक* *यादगार क्षणांच्या*
  *आठवणी ताज्या झाल्या.* *निखळ,उत्कट मित्रत्वाचे बंध किती* *घट्ट असतात याची प्रचिती* *श्री* *सतीश कुलकर्णी यांच्या* *लेखाद्वारे आली. अतिशय* *भावपूर्ण शब्दात* *वाहिलेली ही आदरांजली मनात घर* *करून गेली आहे.*
  स्वर्गीय सुधीर मेहता याचा, त्याच्या
  धडपड्या स्वभावामुळे केवळ पत्रकारिताच नव्हे तर सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक, दिव्यांगा साठी कार्य,ग्राहक हित संरक्षण,राजकीय, अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रात त्यांचा अविरत सहभाग.. लीलया वावर होता.या गोष्टींचे माझ्या सहित त्यांच्या संपर्कातील सर्वांनाच आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. उत्साही स्वभावामुळे अनेकविध उपक्रम राबवीत स्वतःचा सर्व क्षेत्रातील सतत वाढत जाणारा जनसंपर्क आणि तो जपण्याची, जोपासण्याची मनस्वी इच्छाशक्ती ही त्यांची खूप मोठी जमेची बाजू होती.आपल्या जीवन प्रवासात अनेक लोकहित उपयोगी चळवळी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून अहमदनगर तसेच महाराष्ट्र राज्य तसेच युवक बिरादरी या संस्थेच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख,अस्तिव त्यांनी निर्माण केले. आपले अहमदनगर शहर हे ही स्मार्ट व्हावे असे त्यांना नेहमीच वाटले आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अहमदनगरची कीर्ती उंचविण्याचा प्रयत्न केला..करीत राहिले.
  मित्रत्वाच्या नात्याने त्यांच्याशी जोडले गेलेल्या प्रत्येकाला, त्यांच्या
  निस्पृह,निखळ,निस्वार्थी मैत्रीचा
  अनुभव खूप काही शिकवून गेला.
  थोडक्यात सांगायचे झाले तर..कुठल्याही परिणामाची पर्वा न करता,कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता.. *.._मा_ _फलेशू कदाचन.._* या प्रमाणे आपला जीवन प्रवास सुरू ठेवला.
  माझ्यावर गेली अनेक वर्ष निस्सीम प्रेम करणाऱ्या आणि सावली सारखी साथ देणाऱ्या सुधीर याची
  अकाली एक्झीट खूपच क्लेशदायक आहे,पोरकेपणाची जाणीव करून देणारी आहे.
  श्री.सतीश कुलकर्णी यांनी आपल्या संवेदनशील आदरांजली लेखात, सुधीर मेहता म्हणजेच,.. *_हा_* *_खळाळता झरा कायम स्वरुपी शांत_* *_झाला आहे_* ..असे आवर्जून नमूद केले आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे, ..तरी असे मनापासून वाटते की..
  *स्वर्गीय सुधीर रूपी..* *उत्साहाचा,चैतन्याचा हा हसमुख,* *खळाळता झरा त्याच्या* *अगणित आठवणीच्या* *रूपाने आपल्या सर्वांच्या मनात* *अखंड वाहत राहणार* *आहे,सकारात्मक कार्याची प्रेरणा देत* *राहणार आहे.*
  ��
  *भावपूर्ण आदरांजली.*
  ����
  प्रमोद शहा

  ReplyDelete

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...