Sunday 15 August 2021

...हा माझाच देश आहे!

 


चिडतो, कुढतो, रडतो
नशिबाला बोल लावतो
कधी कधी शिव्या देतो
...तरी हा माझा देश आहे!

दोषांची परवचा म्हणतो
उणे-दुणेच काढत बसतो
तेच ते उगाळत राहतो
...तरी हा माझा देश आहे!

नळ कोरडाठक्क दिसतो
रस्त्यांवरचे खड्डे मोजतो
कुरकुर करीत कर भरतो
...तरी हा माझा देश आहे!

नियम सारे ठोकरतो
कायदे बहुदा मोडतो
मुर्दाडपणे पुढे जातो
...तरी हा माझा देश आहे!

व्यवस्थेच्या नावे बोटे मोडतो
नाहीच सुधारणार, शाप देतो
गरजतो अन् मनातच बरसतो
...तरी हा माझा देश आहे!

कामासाठी लाच देतो
हळूच वशिला लावतो
कधी फक्त तमाशा बघतो
...तरी हा माझा देश आहे!

परदेशाचे कौतुक गातो
संधी मिळता तिकडे जातो
तिथून इथे बोट दाखवतो
...तरी हा माझा देश आहे!

कधी शेतकऱ्यांसाठी हळहळतो
कधी कष्टकऱ्यांसाठी खंतावतो
कधी उपऱ्यांवर पार वैतागतो
...तरी हा माझा देश आहे!

लॉकडाऊन पुरता पाळतो
मनाविरुद्ध घरातच बसतो
लढून हरवू म्हणत राहतो
...तरी हा माझा देश आहे!

सांगितल्यावर टाळ्या पिटतो
अनामिकासाठी दिवा लावतो
मदतीसाठी पुढेही सरसावतो
...तरी हा माझा देश आहे!


हॉकीचे सामने मजेत बघतो
सिंधूला सारखं चिअरिंग करतो
 मग एक भाला काळजात घुसतो
...हा माझा, माझाच देश आहे!

ऑलिंपिक पदकाने खुशीत येतो
वर्ल्ड कप दिमाखात मिरवतो
नीरज, मीरा, दहिया माझे म्हणतो
...हा माझा, माझाच देश आहे!

वीरांची स्मृती जागवतो
तिरंग्याला सलामी देतो
मनाशी खूणगाठ बांधतो
...हा माझा, माझाच देश आहे!

नवीनवी स्वप्ने रोज पेरतो
आशेचे पाणी घालत राहतो
'उद्या आपलाच' मीच सांगतो
...हा माझा, हो माझाच देश आहे!

....

(चित्रांचे सौजन्य - https://hdpng.com आणि https://thumbs.dreamstime.com)

....

#India #IndependenceDay #MyCountry #मेरा_देश #15August #हा_माझाच_देश_आहे

7 comments:

 1. होय..तरी सुद्धा हा माझाच देश आहे.
  ७५ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या हार्दीक !शुभेच्छा

  ReplyDelete
 2. सहनशक्तीच्या कुंपणावर तोल सांभाळत..आपण सर्वच वारंवार.. खऱ्याखुऱ्या अभिमानाने सांगत राहतो..तरी हा माझाच देश आहे.!
  श्री सतीश जी,
  आपल्या प्रेरणादायी,अप्रतिम लेखनसमृद्धीने प्रकाशमान झालेल्या खिडकीतून लाभलेली नवं अनुभूती, वास्तवाचे दर्शन घडविणारी अशीच आहे.अप्रतिम. शुभ सदिच्छा!प्रमोद शहा,सिडनी.

  ReplyDelete
 3. देशातील सद्यस्थितीचे मोजक्या शब्दात अचूक पण मर्मभेदी वर्णन ,खूप परिणामकारक पणे मांडले आहे.

  ReplyDelete
 4. काळजाला भिडणारे लेखन...कौशल्य उत्तमच...

  ReplyDelete
 5. वास्तवाचे भान करून देता सर नेहमीच तुम्ही .. व्यवस्थेला नाव ठेवणारे आपण पण जबाबदारीचे कर्तव्य मात्र नाकारतो

  ReplyDelete
 6. सुंदर कविता.....! अगदी खरं आहे, देशात चांगल्या, वाईट दोन्ही गोष्टींचा अनुभव अर्थातच असणारच...! छान रितीने कवितेत वर्णन केले आहे. जराशी उपहासाची छटा देऊन..मुळात हा माझा देश आहे...ही भावनाच किती निश्चिंत करणारी असते...परदेशात राहून परत आल्यावर जाणवतं. इथे आपण आपल्या हक्कांसाठी भांडू शकतो. दाद मागू शकतो.छान कविता अशोकजी ..कधी व्यथित छटा..कधी अभिमानाची छटा....! छान दाखवलीत. मनापासून दाद द्यावीशी वाटतेच.

  ReplyDelete
 7. भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे ही प्रतिज्ञा आपण पहिलीपासून शिकत आलो आहे त्यामुळे भारत हा माझा देश आहे

  ReplyDelete

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...