Monday 2 August 2021

बीजिंगपासून टोकियोपर्यंत

 ऑलिंपिक, भारत आणि हॉकी - 

तळाला आणि उसळी मारून शिखराला. भारतीय हॉकीचं - पुरुष आणि महिला ह्या दोन्ही संघांचं वर्णन आज घडीला तरी असंच करावं लागेल. टोकियो ऑलिंपिकमध्ये आपल्या दोन्ही संघांनी उपान्त्य फेरी गाठली आहे. बीजिंगपासून टोकियोपर्यंतचा हा प्रवास थरारक आहे. त्यात अडथळे आहेत आणि समोर खुणावणारं, कामगिरीसाठी उद्युक्त करणारं यशोशिखरही आहे.

बीजिंग ऑलिंपिकसाठी पात्रही न ठरण्याची नामुष्की भारतीय पुरुष संघावर ओढवली. त्यानंतरच्या लंडन ऑलिंपिकमध्ये पुन्हा समावेश झाला आणि ऑलिंपिकच्या इतिहासातली सर्वांत खराब कामगिरीची नोंद झाली. सर्व स्पर्धकांमध्ये आपण शेवटच्या क्रमांकावर राहिलो. रिओमध्ये उपान्त्यपूर्व फेरीत पराभूत झालेल्या भारतीय पुरुष संघाचा आठवा क्रमांक राहिला. ऑलिंपिकबाहेर ते बाराव्यावरून आठवा क्रमांक ही प्रगतीच होती! टोकियो ऑलिंपिकमध्ये आपण पहिल्या चारमध्ये राहणार हे  निश्चित.

महिला हॉकी संघाची कहाणी तर ह्याहून चित्तचमत्कारिक आहे. मॉस्को ऑलिंपिकमध्ये पहिल्यांदा महिला हॉकीचा समावेश झाला. त्यात आपलं कांस्यपदक थोडक्यात हुकलं. त्यानंतर तब्बल तीन तपांनंतर, म्हणजे रिओ ऑलिंपिकमध्येच भारतीय महिलांना संधी मिळाली. तिथं एकही सामना जिंकता न आलेल्या भारतीय महिला सर्व स्पर्धकांमध्ये तळाला राहिल्या. टोकियोमध्ये गटातील पहिल्या तीन लढतींमध्ये पराभूत झाल्यानंतर आपल्या मुलींनी घेतलेली झेप विलक्षण आहे. साखळीतले शेवटचे दोन सामने जिंकून उपान्त्यपूर्व फेरी गाठताना आपली दमछाक झाली. पण उपान्त्यपूर्व सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून रानी रामपालच्या सहकाऱ्यांनी विजिगिषू वृत्तीचं दर्शन घडवलं आहे. आता अपेक्षा आहे दुहेरी मुकुटाची!

बीजिंग (२००८)
मायकेल फेल्प्स आणि उसेन बोल्ट ह्यांनी गाजविलेलं ऑलिंपिक सुरुवातीपासून चर्चेत राहिलं, ते यजमान चीन असल्यामुळे. दोन दशकांनंतर पुन्हा आशियाई देशाला यजमानपद मिळालं होतं. भारतासाठी महत्त्वाची आणि खेदजनक बाब म्हणजे ऑलिंपिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय संघ स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही. तब्बल ८० वर्षांत पहिल्यांदाच. पात्रता फेरीत इंग्लंडने भारताला हरवून ऑलिंपिकची कवाडं किलकिली होऊ दिली नाहीत. ह्या स्पर्धेत हॉकीच्या पदकांसाठीच्या लढतींपर्यंत एकही आशियाई संघ पोहोचला नाही.

असं असलं तरी भारतासाठी हे ऑलिंपिक संस्मरणीय आहे. व्यक्तिगत क्रीडा-प्रकारातील पहिलं सुवर्णपदक देशाला मिळवून दिलं ते अभिनव बिंद्रा ह्याने. दहा मीटर एअर रायफलमध्ये त्यानं ही ऐतिहासिक सोनेरी कामगिरी केली. मुष्टियुद्धात विजेंदर सिंगने मिडलवेट गटात आणि सुशीलकुमारने फ्री स्टाईल कुस्तीमध्ये ६६ किलो गटात कांस्यपदक जिंकलं. व्यक्तिगत तीन पदके ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होय.

पुरुष
बारा संघ आणि त्यांची दोन गटांमध्ये विभागणी ही पद्धत आता रूढ झाली. ‘अ’ गटातून स्पेन व जर्मनी ह्यांनी बाद फेरी गाठली. त्यानंतर दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, बेल्जियम व यजमान चीन ह्यांचा क्रमांक लागला. स्पेनने पाचपैकी चार सामने जिंकले व एक पराभव स्वीकारला, तो जर्मनीविरुद्ध. जर्मनीने तीन लढती जिंकताना दोन बरोबरीत सोडविल्या. बेल्जियमशी झालेली १-१ बरोबरी काहीशी अनपेक्षित होती. स्पेनने सर्वांत मोठा विजय (४-२) मिळविला तो बेल्जियमशीच. पहिल्याच ऑलिंपिकमध्ये चीनची पाटी साखळीत कोरीच राहिली. गटातील तीन लढती बरोबरीत सुटल्या.

द नेदरलँड्स व ऑस्ट्रेलिया ह्यांनी ‘ब’ गटातून उपान्त्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंड, पाकिस्तान, कॅनडा व दक्षिण आफ्रिका अशी बाकीची क्रमवारी राहिली. नेदरलँड्सने चार सामने जिंकले व एक बरोबरी झाली. ऑस्ट्रेलियाशी त्यांचा सामना २-२ बरोबरीत सुटला. त्यांचा सर्वांत मोठा विजय (५-०) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होता. ऑस्ट्रेलियाही अपराजित राहिला, तरी त्यांच्या दोन लढती बरोबरीत सुटल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कांगारूंनी गोलाचे दशक केले. त्यात एली मॅथिसनचा वाटा तीन गोलांचा होता.

उपान्त्य फेरीचे सामने २१ ऑगस्ट रोजी झाले. नेदरलँड्स-जर्मनी सामना अतिशय चुरशीचा झाला. जादा वेळेनंतरही १-१ अशी बरोबरी कायम राहिली. पेनल्टी स्ट्रोकवर  जर्मनीने ४-३ यश मिळविले. दुसरी लढतही अटीतटीची झाली. स्पेनने ऑस्ट्रेलियाचा प्रतिकार ३-२ असा मोडून १६ वर्षांनी अंतिम फेरी गाठली. त्यात दोन गोल करणाऱ्या एदुआर्दचा मोलाचा वाटा होता. ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सवर ६-२ असा सहज विजय मिळवित कांस्यपदक जिंकले.

जर्मनी व स्पेन यांच्यातील अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी झाला. जर्मनीच्या ख्रिस्तोफर झेलर याने सोळाव्या मिनिटाला केलेला गोल सामन्यातील एकमेव व निर्णायक ठरला. आटोकाट प्रयत्न करूनही बरोबरी साधता न आल्याने स्पेनला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. नेदरलँड्सच्या ताएकेमा ताएके याने सर्वाधिक ११ गोल केले. पाकिस्तानची मोठी घसरण होऊन पहिल्यांदाच आठव्या क्रमांकावर फेकला गेला. 

महिला
संघांच्या संख्येत दोनाने वाढ झाली. ह्या १२ संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली. गटातील पहिले दोन संघ उपान्त्य फेरीसाठी पात्र ठरले. द नेदरलँड्स व चीन ह्यांनी ‘अ’ गटात अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळविला. द नेदरलँड्सने पाचही सामने सहज जिंकले. दक्षिण आफ्रिकेवर त्यांनी सहा गोलांनी मात केली. चीन व ऑस्ट्रेलिया ह्यांची कामगिरी समान होती – तीन विजय, एक बरोबरी व एक पराभव. पण त्यांच्यातील लढत बरोबरीत सुटल्याने यजमानांनी उत्तम गोलफरकाच्या आधारे उपान्त्य फेरी गाठली. ज्या दक्षिण कोरियाने ऑस्ट्रेलियाशी ४-५ अशी कडवी झुंज दिली, त्या कोरियावर चीनने ६-१ असा दणदणीत विजय मिळविला. ह्याच सामन्यातला फरक शेवटी महत्त्वाचा ठरला.

‘ब’ गटातून जर्मनीने पहिला व अर्जेंटिनाने दुसरा क्रमांक मिळवला. पाचपैकी चार सामने जिंकणाऱ्या जर्मनीला अर्जेंटिनाने नमवले, ते ४-० अशा एकतर्फी झालेल्या सामन्यात. अर्जेंटिनाने तीन सामने जिंकले व ब्रिटन आणि इंग्लंड ह्यांच्याविरुद्धच्या लढती बरोबरीत सुटल्या. उपान्त्य लढती २० ऑगस्ट रोजी झाल्या. पहिल्या चुरशीच्या सामन्यात चीनने जर्मनीवर ३-२ विजय मिळवून तिसऱ्या ऑलिंपिकमध्येच अंतिम फेरी गाठली. नेदरलँडसने अर्जेंटिनाचे आव्हान ५-२ असे सहज मोडीत काढले. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात अर्जेंटिनाने जर्मनीचा ३-१ असा सहज पराभव केला.

अंतिम लढतीत द नेदरलँड्सने यजमानांची डाळ शिजू दिली नाही. सामना २-० गोलने जिंकत नेदरलँड्सने २४ वर्षांनंतर सुवर्ण पटकाविले. स्पर्धेत सर्वाधिक ११ गोल करण्याचा मान नेदरलँड्सच्या मार्टिज पाउमेन हिने पटकाविला.
लंडन (२०१२)
वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये दोन रौप्य व चार कांस्यपदके अशी कामगिरी भारत करीत असतानाच दुसरीकडे हॉकीमधले अपयश जिव्हारी लागणारे होते. एका ऑलिंपिकच्या खंडानंतर भारताने पात्रता फेरी ओलांडून प्रवेश मिळविला खरा; पण इतिहासातील सर्वांत वाईट कामगिरीची नोंद लंडन येथेच झाली. अंतिम क्रमवारीत भारत तळाला राहिला.

पुरुष
‘ब’ गटात असलेला भारतीय संघ साखळी सामन्यांनंतर तळाला राहिला. भारताला एकही सामना जिंकता आला नाही. एवढेच नव्हे, तर पाच सामन्यांमध्ये मिळून भारताला फक्त सहा गोल करता आले. पहिल्याच सामन्यात आपण द नेदरलँड्सला थोडं झुंजवलं. त्यांची पूर्वार्धातील दोन गोलची आघाडी भरून बरोबरी साधली ती धरमवीर सिंग व शिवेंद्रसिंग ह्यांनी अनुक्रमे पंचेचाळिसाव्या व अठ्ठेचाळिसाव्या मिनिटाला केलेल्या गोलांमुळे. पण व्हॅन डर वीर्डन मिंक ह्यानं एकावनाव्या मिनिटाला विजयी गोल केला.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्याच मिनिटाला संदीप सिंग ह्यानं गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर न्यूझीलंडने पूर्वार्धातच तीन गोल केले. पूर्वार्धातल्या गोलफलकावरच सामन्याचा निकाल लागला. जर्मनीकडून २-५ पराभूत झाल्यावर भारताच्या आशा जवळपास मावळल्याच होत्या. ह्या सामन्यात रघुनाथ व तुषार खांडेकर ह्यांनी गोल केले. दक्षिण कोरियानं ४-१ आणि बेल्जियमनं ३-० असे विजय मिळवून भारत गटात तळाला राहील, ह्याची काळजी घेतली. पण अजून मानहानी होणं बाकी होतं. अकरा-बारा क्रमांकाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या ऑलिंपिक इतिहासातला सर्वांत मोठा विजय नोंदविला. त्यांनी भारताला ३-२ असं हरवलं! ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारतावर अशा रीतीने तळाचा मानकरी होण्याची वेळ ओढावली. खेळलेल्या सर्व सामन्यांत हार पत्करावी लागलेलं हे पहिलंच ऑलिंपिक.

माजी ऑलिंपियन धनराज पिल्ले ह्यानं ह्या सुमार कामगिरीबद्दल पदाधिकारी, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक मायकेल नॉब्स व त्यांचे सहकारी ह्यांना दोषी ठरवलं. ह्या संघाची ऑलिंपिक खेळण्याची पात्रताच नव्हती, अशी कडवट टीका महंमद शाहीद ह्यांनी केली.

'ब' गटात नेदरलँड्सने पहिला व जर्मनीने दुसरा क्रमांक मिळविला. त्यानंतर बेल्जियम, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड  ह्यांचे क्रमांक लागले. नेदरलँड्सने पाचही सामने जिंकले. न्यूझीलंडवर त्यांनी ५-१ असा मोठा विजय मिळविला. जर्मनीची तीन विजय, प्रत्येकी एक बरोबरी व एक पराभव ही कामगिरी उपान्त्य फेरीसाठी पुरेशी ठरली.

ऑस्ट्रेलिया व यजमान इंग्लंड ह्यांनी ‘अ’ गटातून निर्विविदपणे उपान्त्य फेरीची जागा निश्चित केली. दोन्ही संघ साखळीत अपराजित राहिले. स्पेन, पाकिस्तान, अर्जेंटिना व दक्षिण आफ्रिका अशी नंतरची क्रमवारी राहिली. ऑस्ट्रेलियाने तीन सामने जिंकले व दोन बरोबरीत सुटले. दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा (६-०, त्यात जेमी ड्वायरचे तीन गोल), स्पेनवर सहज मात (५-०) आणि पाकिस्तानविरुद्ध सात गोलांचा धडाका, ही त्यांची कामगिरी. अर्जेंटिना व इंग्लंड ह्यांच्या बरोबरचे सामने बरोबरीत राहिले, तरी त्यात अनुक्रमे दोन व तीन गोलांची नोंद झाली. यजमानांनी अर्जेंटिना व पाकिस्तान यांच्यावर समान गोलफरकाने (४-१) मात केली. दक्षिण आफ्रिका व स्पेन यांच्याविरुद्ध मात्र त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले.

उपान्त्य लढती ९ ऑगस्ट रोजी झाल्या. पहिल्या लढतीत जर्मनीने ऑस्ट्रेलियावर ४-२ असा सहज विजय मिळविला. दुसरी लढत खूप एकतर्फी झाली. स्पर्धेतील सर्वाधिक गोलांची नोंद करताना नेदरलँड्सने यजमानांचा ९-२ असा धुव्वा उडविला. त्यात बिली बाकर व रॉड्रीक वेश्तोफ ह्यांचे प्रत्येकी तीन गोल होते. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यातही इंग्लंडची निराशा झाली. ऑस्ट्रेलियाने त्यांना ३-१ असे पराभूत केले.

स्पर्धेतील अंतिम सामना ११ ऑगस्ट रोजी झाला. यान फिलीप याने तेहेतिसाव्या मिनिटाला गोल करून जर्मनीला आघाडीवर नेले. व्हॅन डर वीर्डन मिंक याने चोपन्नाव्या मिनिटाला बरोबरी साधली. फिलीपने सहासष्टाव्या मिनिटाला गोल करून मिळविलेली आघाडी जर्मनीने कायम ठेवली. गटात नेदरलँड्सकडून झालेल्या पराभवाची जर्मनीने २-१ अशी मोक्याच्या वेळी परतफेड करून १६ वर्षांनंतर सुवर्णपदकावर नाव कोरले. स्पर्धेत सर्वाधिक आठ गोल नोंदविण्याचा पराक्रम व्हॅन डर वीर्डन मिंक याच्या नावावर नोंदला गेला.

महिला
बारा संघांची विभागणी दोन गटांत व गटांतील पहिले दोन संघ उपान्त्य फेरीसाठी, ही पद्धत महिला स्पर्धेतही कायम झाली. द नेदरलँड्स व ग्रेट ब्रिटन यांनी ‘अ’ गटातून अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान मिळविले. नेदरलँड्सने पाचही सामने सहज जिंकले. त्यांचा सर्वांत मोठा विजय बेल्जियमविरुद्ध ३-० असा होता. बाकी कोणत्याच सामन्यात त्यांना एकहून अधिक गोलफरकाने विजय मिळाला नाही. यजमानांच्या महिलांनी तीन सामने जिंकले, तर दोनमध्ये पराभव पत्करला. जपान (४-०) व बेल्जियम (३-०) यांच्याविरुद्धचे त्यांचे विजय सफाईदार होते. त्याच वेळी चीनकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला. चीन व दक्षिण कोरिया यांनी प्रत्येकी दोन, जपानने एक सामना जिंकला. बेल्जियमचा संघ सर्व सामन्यांमध्ये पराभूत झाला.

तीन विजय, एक बरोबरी व एक पराभव अशी समान कामगिरी असलेल्या अर्जेंटिना, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ‘ब’ गटात मोठीच चुरस होती. तथापि सरस गोलफरकामुळे अर्जेंटिना (१२ गोल केले, ४ स्वीकारले) अव्वल व न्यूझीलंडचा संघ (९ गोल केले, ५ स्वीकारले) दुसऱ्या क्रमांकावर आला. ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेत (५ गोल केले, २ स्वीकारले) फारच मागे पडला. दक्षिण आफ्रिकेला अर्जेंटिनाने ७-१, न्यूझीलंडने ४-१ असे सहज हरविले. ऑस्ट्रेलियाने मिळविलेला १-० असा निसटता विजय अंतिमतः महागात गेला. गटाच्या तळाशी राहिलेल्या युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका संघाने एकमेव विजय मिळविताना अर्जेंटिनाला १-० असा धक्का दिला. याच अमेरिका संघावर दक्षिण आफ्रिकेने ७-० असा दणदणीत विजय मिळविला! न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियावर मात केली आणि ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनाशी गोलशून्य बरोबरी साधली.

उपान्त्य लढती ८ ऑगस्ट रोजी झाल्या. नेदरलँड्स-न्यूझीलंड सामना जादा वेळेनंतरही २-२ बरोबरीत राहिला. पेनल्टी स्ट्रोकच्या लढाईत नेदरलँड्सने ३-१ अशी बाजी मारून सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली. यजमानांचा प्रतिकार अर्जेंटिनाने २-१ असा मोडून काढला व एक तपानंतर सुवर्णपदकासाठी झुंजण्याची तयारी केली. कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडवर ३-१ विजय मिळविला.

दि. १० ऑगस्टला झालेला अंतिम सामना तेवढा रंगला नाही. डर्क्स व्हॅन डॅन ह्युवेल व मार्टिज पाउमेन यांनी गोल करून नेदरलँड्सला आघाडीवर नेले. ही आघाडी कमी करणेही अर्जेंटिनाला जमले नाही. सलग दुसऱ्या स्पर्धेत नेदरलँड्सचा संघ सुवर्णपदकाचा मानकरी बनला.

रिओ-दी-जानेरो (२०१६) 
पी. व्ही. सिंधू हिने बॅडमिंटनमध्ये मिळविलेले रौप्य व कुस्तीत साक्षी मलिकने जिंकलेले कांस्यपदक एवढीच काय ती या ऑलिंपिकमधील भारताची लक्षणीय कामगिरी. नव्या उमेदीने उतरलेल्या हॉकीच्या पुरुष संघाला पदकापर्यंत मजल मारता आली नाही; तथापि क्रमवारीत थोडी सुधारणा झाली. महिला संघालाही तीन तपांनंतर प्रवेश मिळाला. एकूण क्रमवारीत हा संघ शेवटचा ठरला.

पुरुष
स्पर्धेच्या स्वरूपात थोडा बदल करण्यात आला. एकूण १२ संघांची दोन गटांमध्ये विभागणी व त्यांच्यात साखळी सामने कायम राहिले. प्रत्येक गटातील पहिले चार संघ उपान्त्यपूर्व फेरीसाठी निवडण्यात आले. त्याचा काहीसा फायदा भारताला झाला. अंतिम सामना खेळणारे दोन्ही संघ पहिल्यांदाच तेथे पोहोचले होते. त्यामुळे हॉकीजगताला नवे सुवर्ण व रौप्यपदकविजेते मिळाले. पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच ऑलिंपिकसाठी अपात्र ठरला, हेही एक वेगळेपण.

‘ब’ गटातून अनुक्रमे जर्मनी, द नेदरलँड्स, अर्जेंटिना व भारत बाद फेरीसाठी पात्र ठरले. भारताने आयर्लंडविरुद्धची सलामीची लढत ३-२ जिंकली. खरं तर  पूर्वार्धातपर्यंत आपल्याकडे दोन गोलची आघाडी होती. उत्तरार्धात आयर्लंडने दोन गोल करून अंतर कमी केलं. रुपिंदरपाल सिंगनं दोन व रघुनाथनं एक गोल केला. पुढची लढत जर्मनीशी होती. त्यात १-२ असा पराभव झाला. एकमेव गोल रुपिंदरपाल ह्यानंच केला.

पुरुषांच्या ‘ब’ गटात भारताचा सलामीचा सामना आयर्लंडशी झाला.
पुढे जाणाऱ्या मायकेल डार्लिंगला अडवणारा सरदार सिंग.
(ऑलिंपिक समितीच्या संकेतस्थळाच्या सौजन्याने)

अर्जेंटिनाविरुद्ध २-१ विजय मिळवून भारतानं आव्हान जिवंत ठेवलं. चिंगलसेना सिंग व कोथाजित सिंग ह्यांनी गोल केले. थोडी आशा निर्माण झाली असतानाच पुढच्या सामन्यात द नेदरलँड्सविरुद्ध आपला १-२ पराभव झाला. रघुनाथनं हा गोल केला. कॅनडाविरुद्ध धक्कादायकरीत्या २-२ बरोबरी झाली. गटातील अन्य चारही संघांनी कॅनडाविरुद्ध विजय मिळवला होता, हे लक्षणीय. उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला, हीच भारतासाठी जमेची बाजू होय.

उपान्त्यपूर्व फेरीत मात्र भारताचा टिकाव लागला नाही. बेल्जियमनं हा सामना ३-१ असा सहज जिंकला. एकमेव गोल केला तो अक्षदीप सिंग ह्यानं. ऑलिंपिकबाहेर ते आठवा क्रमांक अशी भारताची 'प्रगती' होती, ह्यावरच समाधान मानणं भाग पडलं.

‘ब’ गटातून जर्मनी व द नेदंरलँड्स ह्यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवला. जर्मनीने चार सामने जिंकले व एकात बरोबरी झाली. नेदरलँड्सची कामगिरी तीन विजय, एक पराभव व एक बरोबरी होती. नेदरलँड्सने कॅनडावर ७-० व आयर्लंडवर ५-० असा मोठा विजय मिळविला. जर्मनीनेही कॅनडाला ६-२ असं सहज पराभूत केलं. गटात पहिले दोन क्रमांक मिळविणाऱ्या संघांशी बरोबरी साधण्याची कामगिरी अर्जेंटिनाने केली व भारतापेक्षा एक पराभव कमी स्वीकारून गटात तिसरं स्थानं मिळवलं. 

‘अ’ गटातून बेल्जियम, स्पेन, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड संघांनी बाद फेरीत प्रवेश केला. माजी यजमान ग्रेट ब्रिटन पाचव्या व यजमान ब्राझील संघ शेवटच्या क्रमांकावर राहिला. बेल्जियमने पाचपैकी चार सामने जिंकताना २१ गोल केले. स्पेन व ऑस्ट्रेलिया ह्यांनी प्रत्येकी तीन लढती जिंकल्या. स्पेनने एक पराभव व एक बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाचा मात्र दोन सामन्यांत पराभव झाला. न्यूझीलंडने दोन सामने जिंकले. ब्राझीलविरुद्धच्या लढतीत बेल्जियमने डझनभर गोल केले. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया व इंग्लंड ह्यांनीही ब्राझीलविरुद्ध प्रत्येकी नऊ गोल नोंदवून दिवाळी साजरी केली. तुलनेने स्पेनची लढत यजमानांसाठी कमी गोलांची ठरली; तरीही त्यांना सात गोल स्वीकारावेच लागले. यजमानांकडून एकमेव गोल स्टिफन स्मिथने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात केला. बेल्जियमला गटात एकमेव पराभव पत्करावा लागला तो न्यूझीलंडकडून (१-३). गटातील दोन सामने बरोबरीत सुटले.

उपान्त्यपूर्व फेरीचे सर्व सामने १४ ऑगस्ट रोजी झाले. अर्जेंटिनाने स्पेनचा २-१, नेदरलँड्सने ऑस्ट्रेलियाचा ४-० आणि जर्मनीने न्यूझीलंडचा ३-२ असा पराभव केला. पदकासाठीच्या लढतींमध्ये आशियाचा एकही संघ नाही, असे हे सलग चौथे ऑलिंपिक होय. उपान्त्य लढती १६ ऑगस्ट रोजी पार पडल्या. पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने गतविजेत्या जर्मनीवर ५-२ अशी सहज मात केली. गोन्झालो पेईलट याने विजेत्यांकडून हॅटट्रिक साधली. बेल्जियमन नेदरलँड्सला ३-१ असे सहज नमविले. कांस्यपदकासाठी जर्मनी व नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना जादा वेळेतही १-१ असा बरोबरीत राहिला. पेनल्टी स्ट्रोकच्या लढतीत जर्मनीने ४-३ असा विजय मिळविला.

बेल्जियम व अर्जेंटिना या दोन्ही संघांसाठी पहिलाच अनुभव असलेला अंतिम सामना १८ ऑगस्टला झाला. बेल्जियमच्या कॉसिन्स टाँगी याने तिसऱ्याच मिनिटाला गोल करून आघाडी मिळविली. पण त्यानंतरच्या १९ मिनिटांत तीन गोल करून अर्जेंटिंनाने धडकी भरवली. उत्तरार्धात बोकार्डने एक गोल केला आणि त्याला अर्जेंटिनाच्या माझिलीकडून उत्तर मिळाले. ही लढत ४-२ अशी जिंकून अर्जेंटिनाने पहिले सुवर्णपदक पटकाविले. गोन्झालो पेईलट (अर्जेंटिना) याने स्पर्धेत सर्वाधिक ११ गोल केले. व्हॅन डर वीर्डन मिंक (नेदरलँड्स) याने ९ व मॉरित्झ फर्स्ट (जर्मनी) याने सात गोल केले. अंतिम क्रमवारी अशी : ५) स्पेन, ६) ऑस्ट्रेलिया, ७) न्यूझीलंड, ८) भारत, ९) इंग्लंड, १०) आयर्लंड, ११) कॅनडा आणि १२) ब्राझील.

महिला
पुरुष गटाप्रमाणेच महिलांच्या स्पर्धेचे स्वरूप ठेवण्यात आले. सहभागी चारही आशियाई देश तळाच्या चार क्रमांकावर राहिले. ‘अ’ गटातून द नेदरलँड्स, न्यूझीलंड, जर्मनी व स्पेन यांनी बाद फेरीत प्रवेश केला. चीन व दक्षिण कोरिया अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकावर राहिले. नेदरलँडसने चार विजय व एक बरोबरी अशी कामगिरी केली. स्पेनविरुद्ध त्यांनी ५-० आणि दक्षिण कोरियाविरुद्ध ४-० असा सहज विजय मिळविला. चीनने मात्र त्यांना झुंजविले (०-१). न्यूझीलंडने नेदरलँड्सशी १-१ बरोबरी साधली. न्यूझीलंडची कामगिरी तीन विजय, एक पराभव व एक बरोबरी अशी होती. जर्मनी व स्पेन यांनी प्रत्येकी दोन लढतींमध्ये जय मिळविला. चीनने दोन लढती अनिर्णीत राखताना गोलफरकही लक्षणीय राखला. त्यांनी तीन गोल केले व प्रतिस्पर्ध्यांना फक्त पाच गोल करू दिले.

‘ब’ गटातून ग्रेट ब्रिटन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ऑस्ट्रेलिया व अर्जेंटिना यांनी बाद फेरी गाठली. जपान पाचव्या व भारत सहाव्या क्रमांकावर राहिला. इंग्लंडने पाचही सामने जिंकले. त्यात भारताविरुद्धचा विजय सर्वांत मोठा (३-०) होता. अमेरिकेने इंग्लंडविरुद्धची लढत वगळता चारही सामने जिंकले. ऑस्ट्रेलियाची कामगिरी तीन विजय व दोन पराभव आणि अर्जेंटिनाचे यश दोन विजय व तीन पराभव असे होते. जपान व भारत यांना एकही लढत जिंकता आली नाही. या दोन्ही संघांमधील सामना २-२ असा अनिर्णीत राहिला. सरस गोलफरकाच्या बळावर जपान भारताच्या पुढे राहिला.

उपान्त्यपूर्व फेरीच्या लढती १५ ऑगस्ट रोजी झाल्या. त्यात न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाचा ४-२, जर्मनीने अमेरिकेचा २-१, इंग्लंडने स्पेनचा ३-१ आणि नेदरलँड्सने अर्जेंटिनाचा ३-२ असा पराभव केला. उपान्त्य सामने दि. १७ ऑगस्टला झाले. त्यातली नेदरलँड्स व जर्मनी ही पहिलीच लढत मोठ्या चुरशीची झाली. जादा वेळेतही १-१ अशी बरोबरी राहिल्याने पेनल्टीची मदत घ्यावी लागली. त्यात नेदरलँड्सने ४-३ असा निसटता विजय मिळविला. दुसरा सामना मात्र एकतर्फी झाला. त्यात इंग्लंडने न्यूझीलंडला ३-० असे सहज पराभूत केले. त्यात अॅलेक्स डॅन्सनच्या दोन गोलांचा वाटा मोलाचा होता. जर्मनीने न्यूझीलंडला २-१ असे हरवून कांस्यपदक जिंकले.

स्पर्धेची अंतिम लढत १९ ऑगस्ट रोजी झाली व त्यात पूर्वार्धापासूनच विलक्षण चुरस होती. नियमित वेळेत गोलफलक ३-३ असा राहिला. सुवर्णपदकविजेता ठरविण्यासाठी पेनल्टी स्ट्रोक्सकडे वळावे लागले. इंग्लंडकडून सोफी ब्रे व होली वेब यांनी संधी साधली. इंग्लंडची गोलरक्षक मॅडी हिंच हिच्या अप्रतिम कामगिरीमुळे नेदरलँड्सचे सर्व फटके निष्फळ ठरले आणि त्यामुळे इंग्लंडने २-० असा विजय मिळविला. त्यांचे हे पहिलेच सुवर्णपदक होय. स्पर्धेत सर्वाधिक पाच गोल करण्याचा पराक्रम केटी बाम (अमेरिका), मार्टजी पाउमेन (नेदरलँड्स) व ॲलेक्स डॅन्सन (इंग्लंड) यांनी केला. अंतिम क्रमवारी अशी : ५) अमेरिका, ६) ऑस्ट्रेलिया, ७) अर्जेंटिना, ८) स्पेन, ९) चीन, १०) जपान, ११) दक्षिण कोरिया आणि १२) भारत.

(मालिका पूर्ण. ह्यानंतरचा लेख भारतीय संघांनी पदके पटकावल्यावर...)
......
(संदर्भ - olympics.com, olympedia.org, theguardian.com आणि विकिपीडिया, आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, भारतीय हॉकी ह्यांची संकेतस्थळे.)
....

आधीचे भाग इथे वाचा

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey1.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey2.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey3.htm

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey4.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey5.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey6.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey7.html

https://khidaki.blogspot.com/2021/07/OlyHockey8.html

.....

#भारतआणिऑलिंपिक #हॉकीचे_सुवर्णयुग #OlympicsHockey #IndiaInOlympics

#Olympics #India #hockey #TokyoOlympics #GoldMedal #MensHockey #WomensHockey

#Beijing 2008 #London2012 #Rio2016 #TokyoFirstFour


2 comments:

  1. साहेब... खूपच सूक्ष्म आणि अभ्यासपूर्ण माहिती आहे यामध्ये..., आवडलं...👌👌👍

    ReplyDelete
  2. अतिशय सखोल व अभ्यासपूर्ण लेख. पुढच्या लेखाची उत्कंठा......

    ReplyDelete

एक दिवाळी अंक, एक लेखक, एक अर्धशतक...

  ‘आवाज’ आणि दिवाळी ह्यांचं जवळचं नातं आहे. हा फटाक्यांचा आवाज नाही. ‘आवाऽऽज कुणाऽऽचा?’, ह्या प्रश्नाचं उत्तर ‘पाटकरांचा!’ हेच असणार!! ‘आवा...