Monday 13 July 2015

संमेलन निघालंय फॉरीनला!

मराठी सारस्वताचा दरबार।
उभे सान-थोर मनसबदार।
घेउनि गाऱ्हाणे।।

सालोसाल भरे संमेलन जत्रा।
तयात असती भानगडी सत्रा।
यंदाची गा गोष्ट निराळी।।

सोडुनिया माहेरचा वास।
संमेलन निघाले परदेशास।
ऐसे कैसे चालेल?

अंकल सॅमच्या देशा।
जाण्याचा धरिला धोशा।
आम्ही काय करावे?

आईने सोडुनी स्व-प्रदेशा।
अगा का जावे वनवासा?
मोह डॉलरचा धरुनी।।

येणे-जाणे सत्तर हजारी।
आमची रिकामी तिजोरी।
कोठुनी आणावा रोकडा?

इथे भरता संमेलन।
भरपूर होई मान-सन्मान।
तेथे कोण जाणे काय होई?

येण्या-जाण्या एसी गाडी।
राहण्यास शानदार माडी।
तृप्ती कशी पोटभर।।

रसिकांच्या भेटीची आस।
परि आम्ही सारे उदास।
असे खिसा रिकामा।।

माय-बाप सरकारा।
देशी का कर्ज नादारा?
न फेडीच्या बोलीवरी।।

साहित्य महामंडळाचे ठाले।
तयांवर रोखिले सर्वांचे भाले।
सिद्ध सारे टिपाया।।

नव्हे हे संमेलन जागतिक।
"एनआरआयां'पुढे हे अगतिक।
आरोपही झाले करिते।।

डावे-विद्रोही झाले जमा।
न बाळगता कसली तमा।
केला सुरू हंगामा।।

कोणा दिसे भांडवलशाही।
कोणास वाटे हुकुमशाही।
अमेरिकावारीमागे।।

रत्नांग्रीचे पटवर्धन।
रोज गाती संकीर्तन।
जाहल्या तयारीचे।।

देवीदासराव परभणीचे।
नसे त्यांना दुःख याचे।
म्हणती पाहू पुढल्या साली।।

कोणी म्हणे वेगळी वाटुली।
पर्यायी संमेलनाची धाकली।
पत्करावी सर्वांनी।।

प्रकाशकांचा जमला मेळा।
पुस्तकविक्रीवर त्यांचा डोळा।
जमात ही जाहली रुष्ट।।

कौतिकरावांना म्हणती खाष्ट।
परदेशवारीचा बेत हा नतद्रष्ट।
हाणुनिया पाडू।।

सांगती आमची जात खमकी।
याचिका सादरण्याची धमकी।
आता भेटू कोर्टात।।

कलमबहाद्दरही सरसावले।
रोज एकाचे चांगभले।
होई बातम्यांतून।।

ठाले पाटलांच्या नावावरी।
रोजच्या रोज कोट्या करी।
एक "ओव्हर'स्मार्ट मित्र।।

ठाले इकडे निवांत।
सांगती पुढचे बेत।
कसे कसे होईल।।

रूळ बदलता खडखडाट।
होणारच थोडा-बहुत।
वदती ते कौतुके।।

इथे हो कोठले रुळ?
विमानातूनच की सरळ।
होणार तुम्ही "बुंग'।।

बे-एरियाचे देवकुळे।
डोके तयांचे भंजाळे।
ऐकुनिया वाद सारा।।

म्हणती आम्हीही मराठीप्रेमी।
आली संधी चालुनी नामी।
का लावता दृष्ट तुम्ही?

आतल्या गोटाची खबर।
मुख्यमंत्री आपुले थोर।
पाठिंबा तयांचा या पर्यटना।।

ज्याला ज्याला परवडे।
त्याने संमेलना जावे गडे।
अन्यथा बसावे टीव्हीसमोरी।।

अवघा मतामतांचा गलबला।
ऐकवेना माय मराठीला।
ढाळू लागली आसवे।।

सारे उत्सवाचे चाहते।
मी जगते की मरते?
काळजी कुणा?

गेले एक वर्ष परदेशी।
विसरीन मी तुम्हां कैशी?
सवाल ती विचारी।।

घडते आहे फॉरीनवारी।
त्याचीही आगळी खुमारी।
भोगू द्यावी एकदा।।

तीही माझीच लेकरे।
हौस त्यांची करू पुरे।
रौप्यमहोत्सवाची।।

झाला तेवढा पुरे गोंधळ।
आता नको अधिक घोळ।
संमेलनावरुनी।।

अशी ही साहित्य कहाणी।
दूध कमी अन् जादा पाणी।
पांचट, परि माना गोड।।

-------
(मराठी साहित्य संमेलनाचे वऱ्हाड सॅन होजे इथे जाण्यावरून तेव्हा मराठी साहित्याच्या (चिमुकल्या) विश्वात सात वर्षांपूर्वी खळबळ वगैरे उडाली होती म्हणे. यथावकाश हे संमेलन पार पडलं; "विश्व' असं लेबल लावून! "विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा!' अशा आशयाचं एक कवी लिहून गेलाच आहे की!!)

(कितवे तरी विश्व मराठी संमेलन लवकरच अंदमानला (म्हणजे भारतातच हो!) होऊ घातले आहे. त्यावरून आठवला पहिल्या विश्व संमेलनाचा गोंधळ. आणि त्या वेळी, म्हणजे 28 जून 2008 रोजी खरडलेल्या या ओळी. त्या तेव्हा छापायला धाडल्या. पण संबंधितांनी त्या कचराकुंडीत टाकल्या! त्याच ओळी कचऱ्यातून शोधून आता पुन्हा इथं डकवत आहे. निमित्त अर्थातच अंदमानचं. पण हे वाचणं कुणाला काळ्या पाण्याची शिक्षा वाटायला नको बुवा!!)

7 comments:

  1. या चिंतनात्मक ओळी कुणी क. कुं. त टाकल्या असतील तो नतद्रष्टच म्हणावा लागेल. पण त्या आता तरी खिडकीत दिसल्या हे आमचे परम भाग्य.

    मंगेश नाबर

    ReplyDelete
  2. व्वा सतीशजी क्या बात है. अप्रतिम. कविता आवडली. शुभेच्छांसह अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार. शुभेच्छा देत अभिनंदन करणाऱ्या या वाचकाचे नाव कळले असते तर आनंद झाला असता. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
      sats.coool@gmail.com

      Delete
  3. खिडकीत नियमित डोकवायला आवडेल ! मस्त कविता .

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्यासारख्या उत्तम लिहिणाऱ्या-वाचणाऱ्यांसाठी `खिडकी` सदैव उघडीच राहील. मनापासून आभार!

      Delete
  4. विश्व संमेलनावरची ही कविता फार नाही आवडली. परिस्थितीचे वर्णन आहे. खास काही वाटली नाही. मला असेही वाटले की, हे सगळे सविस्तर लिहिण्यापेक्षा तीन-चार कडव्यांमध्ये तुमची स्वतःची नेमकी टिप्पणी त्यावर केली असती तर ते अधिक परिणामकारक झाले असते.
    - माधुरी तळवलकर, पुणे

    ReplyDelete
  5. वाचून तुमची साहित्य कहाणी
    माझ्या डोळा आले पाणी
    पांचट म्हणता जरी तिला
    कटू सत्य हे वाटे मजला
    नाही काळ्या पाण्याची शिक्षा
    ही ठरेल ज्ञानाची दीक्षा
    असेच स्त्रवू दे शब्द पुनः
    `खिडकी`तून येवो झोत नवा

    आपण लिहिले आहे - " चला सुरुवात तर झाली` म्हणून मुद्दाम दीक्षा शब्द वापरला आहे. कारण त्याचा एक अर्थ initiation असा ही असतो ना?
    - स्वाती वर्तक

    ReplyDelete

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...