माझ्या मुलाचे मामा श्री. अशोक कानडे यांनी 13 जून 2013 रोजी माझ्या वडिलांना एक पुस्तक भेट दिलं. पुस्तकाचं नाव - "हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन'. लेखक - श्री. एम्.. अनुवादक - श्री. वि. पटवर्धन. आवृत्ती तिसरी. पाने - 362. किंमत 295 रुपये.
या पुस्तकाचा विषय पूर्णपणे अध्यात्माचा. अर्थातच तो आपला नाही, असं समजून पुस्तक हातात घेतलं आणि ठेवून दिलं. अध्यात्म, योग, साधू, चमत्कार या विषयाची आवडच असावी लागती. वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी. मुलगा मला परवा परवापर्यंत "नास्तिक' म्हणत होता. आस्तिक आहोत की अज्ञेयवादी, याच्या उत्तराचा शोध माझ्यापुरता चालू आहे. "नास्तिक' म्हणवून घ्यायला आवडलं असतं; पण तेवढा मनाचा खंबीरपणा नाही अजून. तो येईल की नाही, हे सांगणं कठीण आहे. असो!
वडिलांनी श्री. एम. यांचं आत्मकथन वाचून पूर्ण केलं. एकदा असंच कधी तरी वाचायला नवं काहीच नव्हतं आणि तेव्हाच श्री. एम. यांचं आत्मकथन हाती लागलं. त्यातली काही पानं वाचली. जरा वेगळी वाटली. श्री. एम. नावाच्या माणसाचा प्रवास, त्याला आलेले थरारक अनुभव - काही अद््भुत आणि अविश्वसनीय वाटण्याच्या कोटीतील, एका वेगळ्या जगाच्या प्रवासाचं आपल्या नेहमीच्या भाषेत वर्णन... नक्कीच वाचनीय आहे हे सारं, असं वाटलं. तरीही ते पुस्तक एका बैठकीत हातावेगळं करावं असं नाही वाटलं.
आमचा एक साधा-सरळ-सज्जन मित्र लक्ष्मीकांत दिवाणी ऊर्फ लखू पटेल अलीकडच्या सात-आठ वर्षांत याच अध्यात्माच्या रस्त्याकडं वळला आहे. वडिलांनी ते पुस्तक त्याला वाचायला दिलं.
साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी कधी तरी "श्री. एम.' नगरमध्ये येऊन गेल्याचं कळलं-वाचलं आणि पुस्तक आठवलं. त्यांना भेटायला हवं होतं, असं वाटलं. लखू पटेलनंच महिनाभरापूर्वी बोलता बोलता श्री. एम. पुन्हा नगरला येणार असल्याचं सांगितलं. त्यांचं आत्मकथन वाचून पूर्ण झाल्याचंही त्यानं सांगितलं आणि आठवड्याभरात ते पुस्तक परत दिलं.
पुस्तक परत आलं आणि ते वाचायला घेतलं. माझ्या पद्धतीनं अधली-मधली पानं वाचत राहिलो. थोडा अधिक रस निर्माण झाला. श्री. एम. नगरमध्ये तीन दिवस थांबणार आहेत, तेव्हा त्यांच्याशी बोलता येईल का, त्यांची मुलाखत घेता येईल का, असं वाटलं. म्हटलं बघू या. आणि मग मंगळवारी (१४ जुलै) बातमी आली, त्यांच्या पदयात्रेचं राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि हिवरेबाजारच्या पोपट पवार यांनी स्वागत केल्याची. अरेच्चा! आले की ते. नगरमध्ये काय कार्यक्रम आहे, किती दिवस आहेत, हे पाहायला पाहिजे, असं मनात आलं. पण ते तेवढ्यापुरतंच.
दुसऱ्या दिवशी, बुधवारी (१5 जुलै) कार्यालयात गेल्यावर लगेच समजलं की, श्री. एम. हिवरेबाजारमध्ये आहेत. तिथं संध्याकाळी ते गावकऱ्यांशी बोलणार आहेत. छायाचित्रकार दत्ता इंगळेनं हे सांगितलं. त्यांच्या पदयात्रेचं - कन्याकुमारी ते काश्मीर आशा-यात्रेचं माहितीपत्रक दिलं आणि विचारलं, ""येता का? जाऊ आपण.'' ते शक्य वाटत नव्हतं. मग पोपट पवारांशी संपर्क साधून तक्रार केली - काय हे? एवढी मोठी माणसं येतात आणि तुम्ही साधं सांगतही नाही. पोपट जुना मित्र. त्यानं लगेच यायचं आमंत्रण दिलं. "आता जमणं अवघडच,' असं सांगून गप्प बसलो.
पण राहवत नव्हतं. चमत्कार वगैरे सोडून द्या; पण त्या अफाट आत्मकथनातले काही प्रसंग आठवत राहिले. श्री. एम. यांना भेटावं आणि बोलावं, असं वाटत राहिलं. जाऊ की नको? उलघाल. अस्वस्थता. सहकारी दीपक रोकडे यानं जोर लावला. हिवरेबाजारला निघालो. साथीला दत्ता. तोच सारथी. नंतर छायाचित्रकाराच्या भूमिकेत.
आत्मकथन पूर्ण वाचून झालेलं नाही. त्यांच्या पदयात्रेच्या माहितीपत्रकावरून फार काही माहिती मिळत नाही. अध्यात्म, योगशास्त्र याबद्दल काहीच माहिती नाही. श्री. एम. यांना काय विचारायचं? कसं विचारायचं? त्यांच्याकडून काय जाणून घ्यायचं आणि नंतर ते कसं मांडायचं? अस्वस्थ वाटू लागलं. मनात आलं, निघालो नसतो तर बरं झालं असतं.
हिवरेबाजारमध्ये साडेपाचच्या सुमारास पोहोचलो आणि अर्ध्या तासात ग्रामसंसदेच्या पटांगणात श्री. एम. आले. सोबतीला पोपट पवार होतेच. त्यांनी लगेच ओळख करून दिली. प्रेमानं हसले ते. माझ्याजवळ असलेलं त्यांच पुस्तक त्यांनी दुरूनच ओळखलं होतं. दाक्षिणात्य पद्धतीने गुंडाळलेली पांढरी लुंगी, पांढरा सदरा, गळ्यात उपरणं, उलटे वळविलेले केस, पांढरी दाढी, कपाळी बहुतेक पिवळं गंध आणि पायात निळे बूट. नाक एकदम धारदार. इंदिरा गांधी यांच्या नाकाची आठवण करून देणारं.
पण एकूण व्यक्तिमत्त्व काही साधू-संत-योगी यांच्यासारखं वाटत नव्हतं. आपल्या घरातला माणूस वाटत होता तो.
साधा, सज्जन, सात्त्विक. परका न वाटणारा.
श्री. एम. व्यासपीठावर बसले. पुस्तकावर त्यांची सही घेतली. आशीर्वादांसह सही.
कार्यक्रम सुरू झाला. पोपट पवार बोलले. मग गावकऱ्यांतर्फे श्री. एम. यांचा सत्कार. फेटा बांधून. गळ्यात हार घालून घेतला. मानपत्र स्वीकारलं. मग बोलायला उभे राहिले, तेव्हा हार काढून ठेवला. सत्संग. म्हटलं हे अध्यात्माविषयी बोलतील. आपल्याला पचायला जडच जाणार.
श्री. एम. यांनी मृदू, हळुवार आवाजात बोलायला सुरुवात केली. पंधरा-एक मिनिटं बोलले. त्याच संथ लयीत. कुठे चढ-उतार नाही. आवेश नाही. भावनांच्या हिंदोळ्यावर झुलवण्याची वक्तृत्वकला नाही. पण ठामपणे. "भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी...आज चालू या सोबतीनं' असं ब्रीद असलेल्या पदयात्रेची माहिती दिली. बोलण्यात महात्मा गांधी, वेद, उपनिषदे, गावे, गावांचा विकास, तरुण असे सगळे मुद्दे येऊन गेले. कार्यक्रम संपला.
श्री. एम. यांनी पत्रकारांसाठी थोडा वेळ द्यावा, अशी विनंती पोपट पवारांनी केली. त्यांनी ती मान्य केली. त्यांच्याशी बोलू इच्छिणारा, काही जाणून घेऊ पाहणारा तसा मी एकटाच होतो. हिवरेबाजारच्या ग्रामसंसदेच्या सभागृहात आमची बैठक जमली.
आध्यात्मिक गुरू असलेले श्री. एम. मूळचे मुमताजअली. तारुण्यातच अध्यात्माकडे ओढले जाऊन ते नाथपंथीय बनले. गुरूंनी त्यांचं नामकरण "मधुकरनाथ' केलं. पण "श्री. एम.' हे प्रचलित नाव. संन्यासी नव्हे, संसारी. त्यांच्याशी संवाद सुरू होण्यापूर्वी या साऱ्याची उजळणी केली. पुस्तकात वाचलेले काही प्रसंग लक्षात आहेत ना, हे आठवून पाहिलं.
महत्त्वाचं एक कुतुहल होतंच. श्री. एम. जन्माने मुस्लिम. आजही ते मुस्लिम असल्याचं नाकारत नाहीत. रमजानचा महिना सुरू. आणि हा माणूस हिंदू अध्यात्मावर अधिकारानं बोलतो. तेच जाणून घ्यायचं होतं.
तरीही पहिला प्रश्न स्वाभाविकपणे पदयात्रेबद्दलचा. शांतता आणि एकात्मता या उद्देशानं काढलेली ही "आशा-यात्रा.' त्यात तीन हजार किलोमीटर अंतर कापल्यानंतर काय वाटतं, अनुभव काय आहे? श्री. एम. म्हणाले, ""अनुभव चांगलाच आहे. लोक प्रेम करतात, हेच कुठेही गेलो तरी पाहायला मिळाले. जिथं जिथं चांगलं काम सुरू आहे, तिथं तिथं आजपर्यंतच्या प्रवासात जात आलो. समाजातील ऐक्य आणि गावांचा विकास यांचा फार जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी यांनी तेच सांगितलंय. त्याचा विसर पडल्यामुळेच आज परिस्थिती काहीशी वाईट झाल्याचे दिसते. पण तरीही मला चित्र आशादायीच दिसतंय. पुण्यात आम्ही उपवास केला. शनिवारवाड्यासमोर बसलो होतो. किती वेगवेगळे लोक आले होते तिथं.''
समोरच्याचा प्रश्न ऐकून घेण्यास श्री. एम. उत्सुक. पदयात्रेच्या कल्पनेविषयी विचारल्यावर ते उत्साहानं सांगू लागले. "माणसानं चाललंच पाहिजे. मी ज्या घरात जन्मलो, तिथे तेव्हापासूनच गाड्यांचा वापर पाहत आलो. चालायला हवं, हे मला लहानपणीच समजलं. हिमालयात असताना गुरू महेश्वरनाथ यांनी मला तसाच संदेश दिला होता. ते म्हणाले होते, "परिस्थिती अशी येईल, की धर्माचा झेंडा घेऊन लोक रस्त्यावर येतील. त्यामुळे तुला एक दिवस कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत जावंच लागेल.' खरं तर दोन्ही धर्मांचा आत्मा एकच आहे. कबिरांनीही ते सांगितलं आहे. पण गुरूंनी सांगितलेले खूप वर्षांपासून मनात होते. पण अनामिक भीतीमुळे ही कल्पना कागदावर उतरवत नव्हतो. माझं वय आता 66 आहे. असंच तीन-एक वर्षांपूर्वी कधी तरी विचार करत होतो. लक्षात आलं की, वय वाढतंय. पदयात्रा आता नाही काढायची तर कधी? आधी ठरवलं की, एकटंच चालत राहायचं. मग एके दिवशी सहज कर्नाटकाच्या माजी पोलिस महासंचालकांना मनातलं बोलून दाखवलं. ते म्हणाले, "मीही येणार.' त्यांची पत्नी म्हणाली, "मी का नाही? मीही येते की!' झालं. असं करत करत माणसं वाढत गेली. और फिर कारवाँ बनता गया... यात्रेत आमचा 60-70 माणसांचा गट आहे. कधी कधी दीड-दोनशे मंडळी होतात. जेवण्याची-राहण्याची सोय स्थानिक मंडळी करतात. कसली अडचण येऊ देत नाहीत.''
जन्माने मुस्लिम असलेल्या या योगीयाच्या तोंडी सतत दाखले असतात उपनिषदे, वेद यांचे. हे सारं अडचणीचंच. त्याबद्दल विचारल्यावर श्री. एम. हळुवार हसले. म्हणाले, ""होय! ही तारेवरची कसरतच आहे. पण मी द्विधा नव्हतोच कधी. ना मैं इस्लाम की सोचता हूँ; ना हिंदू की। मैं सिर्फ आदमी के बारे में सोचता हूँ। या साऱ्या प्रवासात वेगवेगळे छोटे-मोठे गुरू लाभले. त्यातील एका स्वामींनी एकदा विचारले होते, "तुम्ही रोज पाच वेळा नमाज पढता का?' त्यांना मी म्हणालो, "माझा नमाज 24 तास सुरूच असतो. कारण मी सर्वांना नमस्कार करीत असतो.' "नमाज' अरबी नव्हे, तर पर्शियन शब्द आहे. संस्कृत "नमः' म्हणजे नमस्कार. त्यापासूनच "नमाज' बनला आहे.'' बोलता बोलता त्यांनी भाषेचा अभ्यास सहज दाखवून दिला. संस्कृत का महत्त्वाची भाषा आहे, हेही सांगून टाकलं.
जरा भीत भीतच विचारलं - तुम्हाला कधी कुणी "काफीर' म्हणून हिणवलं नाही का? खळखळून हसले ते.
मोक्षाची गोष्ट सांगणाऱ्या अध्यात्मातील मंडळींना गेल्या काही वर्षांपासून राजकारणात "अच्छे दिन' आले आहेत. मनात शंका होतीच की, श्री. एम. त्यापासून दूर कसे? की त्यांचीही विशिष्ट कोणत्या पक्षाशी-विचारसरणीशी जवळिक आहे? धाडस करून विचारलंच त्यांना - अध्यात्मातील "गुरू' बनल्यावर राजकारणात येण्याची आमंत्रणं नाही का आली?
या भाबड्या प्रश्नावर श्री. एम. यांचं आधी उत्तर एका स्मितहास्याचं. मग म्हणाले, ""तो माझा मार्ग नव्हे. मी सगळ्यांना भेटतो. सगळ्यांशी चर्चा करतो. पण राजकारणात उतरायला माझा नकारच.''
एकदा भूमिका कळली. मग पुढचा प्रश्न विचारायला फारसं धाडस बांधावं लागलं नाही. सध्याच्या राजकारणातील साधू-संत-महंत यांच्या गर्दीविषयी विचारलं. त्याबद्दल त्यांची मतं पक्की आहेत. सूचकपणे ते म्हणाले, ""कपड्यांवरून कोणी साधू नाही होत. साधुत्वाचे गुण महत्त्वाचे. ते एक दिवसात किंवा एक तासात कळणार नाही. साधू म्हणवून घेणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे.''
राजकारण, क्रिकेट, सिनेमा, गुन्हेगारी आणि अध्यात्म हे सध्याचे चलतीचे विषय आहेत. या सगळ्याच गोष्टी विकल्या जातात. अध्यात्माचा बाजार मांडलेला पाहायला दिसतो. हे दुकान, तो मॉल... श्री. एम. यांना विचारलं, अध्यात्माचं बाजारीकरण झालं आहे का हो? उत्तर दिलं त्यांनी. पण तेव्हा बोलताना खंत जाणवत होती त्यांच्या आवाजात. म्हणाले, ""खरं आहे हे. पण कोण कुणाला सांगणार? ध्यान पैसे देऊन विकतात. असं असतं का कधी?''
कुंभमेळा हौशा-नवशांची फार गर्दी वाटते नाही का, असं एक सरसकट विधानही मी बोलता बोलता करून टाकलं होतं. त्यालाही श्री. एम. यांनी हात घातला. ""तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे. कुंभमेळ्याचा मूळ उद्देश फार वेगळा होता. ठरावीक वर्षांनी साधू-संतांनी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करावी यासाठी कुंभ सुरू झाला. आताचं...जाऊ द्या झालं.''
फेटा बांधल्यामुळं श्री. एम. काहीसे अवघडलेले होते. बोलता बोलता त्यांनी दोनदा विचारलं, ""हे आता काढून ठेवलं तर चालेल का?'' काही संबंध नसताना मीही त्यांना मोठ्या औदार्याने तशी "परवानगी' देऊन टाकली. वेळ संपत होती. विचारण्यासारखं माझ्याकडेही फार काही राहिलं नव्हतं. कोणताही अभ्यास नसलेल्या, त्यांच्या विषयाची जाण नसलेल्या एका पत्रकाराला श्री. एम. यांनी भरपूर वेळ दिला होता. सगळ्या प्रश्नांना त्यांनी शांतपणे उत्तरं दिली.
या देशाच्या, या समाजाच्या भवितव्याविषयी फार आशावादी आहेत ते. माणसं माणसांशी माणसासारखंच वागतील, अशी आशा आहे त्यांच्या मनात. एवढा वेळ बरोबर घालवल्यानंतर काही गोष्टी लक्षात राहिल्या - या माणसाला अध्यात्माबद्दलचा अभ्यास आणि अधिकार दाखवण्याची हौस नाही. अतिशय मृदू स्वरातलं त्यांचं बोलणं. आणि अर्थात त्यांचं साधेपण, सच्चेपण!
--------
योग आणि इस्लाम
अलीकडेच जागतिक योग दिन साजरा झाला. त्यावरून दोन-तीन आठवडे जोरदार वादही रंगला. योग इस्लामविरोधी आहे, असा गवगवा करण्यात आला. याबद्दल श्री. एम. यांना विचारावं असं ठरवलंच होतं. तसं ते भीत भीत विचारलंही. त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं. योगशास्त्र इस्लामच्या विरोधात आहे, हे त्यांना मुळीच मान्य नाही. ते म्हणाले, ""योग भारतात हजारो वर्षांपूर्वी जन्मलेलं, सगळ्यात मोठं शास्त्र आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून मी रोज अर्धा ते पाऊण तास योगासने आणि प्राणायम करतो. योग आणि शाकाहार, हेच माझ्या प्रकृतीचं रहस्य. या भारतीय संस्कृतीला "हिंदू संस्कृती' असं लेबल लावणं गैर आहे. योगासनात कुठे आहे धर्म आणि देव? चित्तवृत्तीचा निरोध हेच "योगसूत्र' आहे, असे पातंजली ऋषी यांनीच लिहून ठेवले आहे. तुम्हाला सूर्यनमस्कार मान्य नाही. ठीक आहे; अन्य आसनं करा ना मग. आणि नाही तरी सूर्याकडे पाहून नमस्कार घालायला आजच्या फ्लॅटसंस्कृतीत कुणाच्या घरातून सूर्य दिसतो? नमाजात योगासनं आहेतच आहे. समजा प्रकृतीसाठी डॉक्टरने योगासनं करण्याचा सल्ला दिला, तर तो तुम्ही ऐकणार नाही? जगण्यासाठी आवश्यक ते करण्याचं नाकारणं हेच मुळी इस्लामला मान्य नाही. आता कम्युनिस्टांसाठी योगशास्त्रावर एक पुस्तक लिहिण्याचा मी विचार करतो आहे.''
ग्रामविकासातील कर्मयोग
ग्रामविकासाचं आधुनिक तीर्थक्षेत्र झालेल्या हिवरेबाजारमध्ये आशा-यात्रा दिवसभर होती. श्री. एम. आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसभर गावात सगळीकडे फिरून झालेलं काम पाहिलं. त्यांना ते आवडलंही फार. एकात्मता आणि गावचा विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असंच त्यांचं मत आहे. ते म्हणाले, ""महात्मा गांधींनी सांगितलेलं काम पोपटराव पवार इथं करीत आहेत. असं काम करणारेच साधू-कर्मयोगी असतात. तमाशा करनेवाले साधू कम होने चाहिए। गावे विकसित झाली, तर शहरात कोण कशाला जाईल? नेमकं हेच काम इथं होतंय. ते पाहून खरोखर समाधान वाटतं. आणि म्हणून तर देशाच्या भविष्याविषयी आशा वाटते. पूर्वी ज्ञानसंपादनासाठी जगातून मंडळी भारतात येत. ती परिस्थिती पुन्हा येईल, ज्ञान मिळविण्यासाठी परदेशातील लोक या देशात येत राहतील, असंच स्वप्न मी पाहतो आहे.''
"एम' म्हणजे मसाला डोसाही!
हिवरेबाजारच्या गावकऱ्यांशी संवाद साधताना "एम.' म्हणजे नेमकं काय, हे श्री. एम. यांनी सांगितलं. "एम.' म्हणजे - मधुकरनाथ, मुमताजअली खान आणि मानवही! अशाच आणखी एका "एम'चा उल्लेख त्यांच्या आत्मकथनात आहे. तो मुळातून वाचण्यासारखा आहे. अरुंधती गुहेमध्ये ध्यान करताना एके दिवशी त्यांच्या डोळ्यांसमोर मसाला डोसाच येत होता. ते त्यांच्या गुरूंनी जाणलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषिकेशमधील "मद्रास कॅफे'मध्ये श्री. एम. यांनी पोटभर डोसे खाल्ले आणि त्यानंतर त्यांची त्याबद्दल तीव्र इच्छा उरली नाही! त्यांना डोशाबद्दल विचारायचं मी ठरवलं होतंच. त्याप्रमाणं "अजूनही डोसा खाता का?' असं विचारण्याचं धाडस केलंच. प्रश्न विचारला आणि त्यांना हसू फुटलं. म्हणाले, ""ते पुस्तकात लिहिल्यापासून सगळे जण मला डोसाच खाऊ घालू पाहतात. मी अजूनही डोसा खातोच. पण त्याबद्दलची आसक्ती तेव्हाच संपून गेली.''
----------------------
(टीप : या विषयावर लिहिणं हे माझं धाडसच! पण ते केलं खरं. श्री. एम. यांच्याशी साधलेल्या संवादाच्या आधारे दैनिक सकाळच्या नगर आवृत्तीमध्ये एक छोटेखानी लेख लिहिला. त्याचंच हे विस्तारित रूप. या लेखाचा उद्देश, नेमकं काय सांगायचंय याबद्दलची अनभिज्ञता, लिहिण्याची शैली... हे सारं जमलंय की नाही, याबद्दल साशंकता आहे. अशा विषयावर लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न. त्यामुळं अपुरेपण, काही हून गेल्याची हुरहूर जाणवतेच.)
(छायाचित्रे - दत्ता इंगळे)
----------------------
#श्री_एम #सत्संग #अध्यात्म #अध्यात्म_गुरू #योग_इस्लाम #हिवरेबाजार #वेद_उपनिषदे #आशा_यात्रा #मसाला_डोसा #ग्रामविकास #पोपट_पवार
या विषयाबद्दल माझीही माहिती, रूची खूपच कमी आहे, त्यामुळं खोलवर काही मत देता येणार नाही. पण एकदोन गोष्टी जाणवल्या.
उत्तर द्याहटवा- आधी व्यक्तिगत स्वरूपाची काही सुरुवात करून श्री. एम यांच्या कामाकडे जाणारा लेख आहे.
- 'नास्तिक' म्हणवून घ्यायला आवडलं असतं, पण तेवढा मनाचा खंबीरपणा नाही अजून, हे वाक्य प्रांजळ वाटलं.
- मला श्री. एमच्या कामाबद्दल लगेच काही लक्षात येत नाहीये, ठरवता येत नाहीये. गावकऱ्यांशी भाषणात ते काय बोलले, त्याचे मुद्दे दिले आहेत, पण त्यातला आणखी काही तपशील आला असता तरी आवडलं असतं, असं वाटलं. पण मग कदाचित पुढचा जरा व्यक्तिगत संवाद तेवढा ठसला नसता, असंही असेल.
- अवधूत
पातंजली नव्हे. पतंजलि. आणि त्या मुनींनी मांडलेलं योगशास्त्र म्हणून पातंजल योगशास्त्र. आपल्या जीवनातून ब्रिटिशांनी संस्कृत काढून टाकलं. आणि नंतर आलेल्या काँग्रेसनं त्यांचंच अनुकरण केल्यामुळं आपल्या इतर भाषासुद्धा बिघडत गेल्या. दशरथाचा पुत्र तो दाशरथि राम. तुम्हाला गीतरामायणतलं गाणं माहीत असेल. जय गंगे जय भागिरथी जय जय राम दाशरथि. इथं कवितेकरता `भागिरथी` लिहिलं असलं तरी मूळ शब्दही माहीत असावा. तो आहे `भागीरथी`. भगीरथानं महत्प्रयत्नानं तिला स्वर्गाहून भूतलावर आणली म्हणून `भागीरथी`. पण म्हणून आपण भागीरथ म्हणणार नाही. तीच बाब संप्रदायपासून सांप्रदायिक, समरपासून सामरिक, मनस् पासून (मूळ संस्कृत शब्द) मानसिक, परमार्थ पासून पारमार्थिक.
उत्तर द्याहटवा- मनोहर राईलकर
I have read your blog entries. You have written in a candid manner. You are able to express your emotions well, and that establishes connect with the reader straight away.
उत्तर द्याहटवा- Sadanand Date
लेख वाचला. खरे सांगायचे तर पचनी पडला नाही. अर्थात व्यक्तिमत्त्वसुद्धा अवघड. त्यांची भेट घेण्यासाठी केलेल्या प्रवासाचे वर्णन वृथा वाटते. उत्तुंग मानवाला सोप्या शब्दात बांधून ठेवणे हीच तर लेखकाची कला!
उत्तर द्याहटवा- विनायक कुलकर्णी, पुणे
Liked.
उत्तर द्याहटवाEven though you state that Spirituality is not your field, reading the book (studying) prior to interview and preparing makes a great difference. Alas all heed to this prerequisite!
Awareness of and touching many a aspects of present social problems clearly reveals a successful journalist in you....Congrats, go ahead, my best wishes.
छानंच झालंय...मला सर्व विषयांतील सर्व काही कळते (भलेही राजकीय नेत्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये आम्ही त्यांना आवडतील असेच प्रश्न विचारीत असू किंवा ते सांगतील, ते आणि तेवढेच बातमीच्या स्वरूपात आक्रमकपणे मांडत असू...) ही प्रथा मोडणारा पत्रकार विरळच. श्री. एम. यांच्याबाबत फारशी माहिती नसल्याने मनात वाटणारी भीती तुम्ही जगजाहीर मान्य करणे, म्हणजे पत्रकारांची ती प्रथा मोडीतच काढीत नाही काय... पण तुमच्या या प्रामाणिक भूमिकेमुळेच श्री. एम. लोकांपर्यंत तुमच्या नजरेतून व्यवस्थित पोचतात. अन्यथा श्री. एम. यांच्याबाबत किती लोकांना माहिती असते... तुम्ही करून दिलेली त्यांची ओळख, तुमचा लेख वाचल्यानंतर कधीही विसरता येणार नाही. किंबहुना, ते वाचल्यानंतरच त्यांना भेटण्याची इच्छा जागृत होते.
उत्तर द्याहटवाओघवत्या, प्रवाही भाषेत, मनातील भाबडे प्रश्न न लपवता, अज्ञान न झाकता, तुम्ही एम. यांच्यापुढे ज्या ताकदीने गेला असाल, त्याच ताकदीने या लेखातील मांडणी झाली आहे... समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या अशा अनेकानेक लोकांपर्यंत तुम्ही पोचावे, (अगदी तुम्हाला माहीत नसलेल्याही... कारण तुम्हाला माहीत नसलेल्या माणसांशी तुम्ही जाणून घेण्यासाठी जेवढे एकरूप होता, तेवढे क्वचितच ओळखीच्या माणसाशीही कुणी होत असेल.) आणि ते लोक आमच्यापर्यंत पोचवावेत... हीच अपेक्षा...
अर्थात यातही आमचाच स्वार्थ आहे... विनासायास चांगल्या माणसांची भेट घेण्यासाठी आम्हाला तुमच्यासारखा प्रामाणिक लिहिणारा मध्यस्थ हवाच आहे...
- दीपक रोकडे
मिस्टर एस,
उत्तर द्याहटवाआपण लिहिलेला मिस्टर एम यांच्यावरील लेख आवडला