अंमळनेर येथे नव्या वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे ह्यांची निवड झाली. संमेलनाध्यक्षपदी निवड होण्याआधी ज्यांची भेट झाली किंवा बोलण्याची संधी मला लाभली, असे हे तिसरे अध्यक्ष. त्यामुळे त्यांच्या निवडीचा स्वाभाविकच आनंद आहे. वडोदऱ्याच्या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, वर्धेत झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ह्यांनी ‘लोकसत्ता’च्या मराठवाडा आवृत्तीसाठी सदरलेखन केले होते. त्यामुळे आवृत्तीचा समन्वयक ह्या नात्याने त्यांच्याशी बोलण्याची व भेटण्याची संधी आधीच मिळाली होती.
खरं तर प्रा. शोभणे ह्यांनी अध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी ह्या आधीच जाहीर केली होती. पण त्या पदानं त्यांना दोन-तीन वर्षं हुलकावणी दिली. त्याबद्दल एकदा त्यांच्याशी सविस्तर बोलणंही झालं. ही संधी न मिळाल्याबद्दल त्या वेळी त्यांनी काहीशी खंतही व्यक्त केली होती. ती स्वाभाविकही होती, असं वाचकाच्या नात्यानं मला तेव्हा वाटलं होतंच.
प्रा. शोभणे ह्यांचा एक कथासंग्रह - बहुतेक ‘ओल्या पापाचे फुत्कार’ - वाचला आणि त्यांना प्रतिक्रिया कळवावी वाटली. संग्रहात दिलेल्या क्रमांकावर त्यांना प्रतिक्रिया कळविली आणि थेट त्यांचा फोनच आला. ही गोष्ट साधारण सात-आठ वर्षांपूर्वीची. ‘ह्या पुस्तकातील कथांबद्दल फार छान व्यक्त झाला आहात. मग तुम्ही परीक्षणच का लिहीत नाहीत?’, अशी अपेक्षावजा पृच्छा तेव्हा त्यांनी केली होती. पण तसं शक्य नव्हतं. योगायोगाने त्यानंतर काहीच दिवसांनी ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीचं काम पाहणारा मित्र विनायक लिमये ह्यानं पुस्तक-परिचय सदरासाठी प्रा. शोभणे ह्यांचं ‘अश्वमेध’ पाठवलं. त्याचा परिचय करून दिला आणि तो दि. ९ ऑगस्ट २०१५च्या अंकात सप्तरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी ‘अश्वमेध’चा परिचय...
........
........
आपल्या देशात ‘एकविसाव्या शतकाची’ भाषा सुरू केली, राजीव गांधी ह्यांनी. पंतप्रधान झाल्यावर. त्याच एकविसाव्या शतकानं आपल्याला, जगाला खूप काही दिलं. ह्या शतकाची भाषा करणाऱ्या राजीव गांधी ह्यांना देशातील जनतेनं लोकसभेत अभूतपूर्व बहुमत दिलं आणि नंतर अवघ्या पाच वर्षांमध्ये सत्तेवरून पायउतारही केलं. त्यांचं पंतप्रधानपद ते तमीळ वाघांकडून हत्या ह्या जेमतेम साडेसहा वर्षांच्या काळात ह्या खंडप्राय देशात खूप काही घडलं आणि बिघडलंही. नेमकं काय घडलं, कसं घडलं, त्याचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत कसे उमटत गेले, ह्याचं चित्रण प्रा. रवींद्र शोभणे ह्यांच्या ‘अश्वमेध’मध्ये पाहायला मिळतं.
अर्थात, ह्या कालखंडातील घटना-घडामोडींवर कादंबरी लिहिणे, हा लेखकाचा उद्देश नाहीच. त्याला ह्या कालखंडावर लिहायचं आहे आणि त्या काळात घडल्या म्हणूनच या साऱ्या घटना कादंबरीत येतात. त्रिखंडात्मक कादंबरी लेखनाचा संकल्प प्रा. शोभणे ह्यांनी सोडला. त्याचा काळ त्यांनी ठरवून घेतला. आणीबाणी जाहीर झाल्यापासून विसाव्या शतकाच्या अखेरच्या वर्षापर्यंत; म्हणजे १९७५ ते २०००. ह्यातील पहिला खंड ‘पडघम’ शीर्षकाने प्रसिद्ध झाला. ‘अश्वमेध’ हा त्यातील दुसरा टप्पा. तिसरा खंड येईल तो ‘होळी’ या शीर्षकाने. ‘या त्रिखंडात्मक लेखनाची प्रकृती काळकेंद्री अशी आहे,’ असं लेखकानं मनोगतामध्ये स्पष्ट केलं आहे.
आणीबाणीचा काळ अस्वस्थतेचा होताच; पण त्यानंतरच्या काळात ती अधिकच वाढत गेली. राजकारण, समाजकारण, साहित्य, करमणूक, माध्यमं... अशा साऱ्याच क्षेत्रांमध्ये ती जाणवत गेली. त्यातून बरंच काही घडत गेलं. सामान्यांना अस्वस्थ करायला लावणारं आणि विचार करणाऱ्यांना अंतर्मुख करायला लावणारं. ते सारं ह्या कादंबरीत पाहायला मिळतं.
कोणत्याही कथा-कादंबरीमध्ये नायक-नायिका, सहनायक, खलनायक अशी पात्रं असतात. इथे मात्र ‘काळ’ हा आणि हाच नायक आहे. म्हणजे लेखकाची भूमिका ती आहे. प्रसिद्ध लेखक-समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले ह्यांनीही प्रस्तावनेत ते अधोरेखित केलं आहे. पण ह्या प्रवाही काळात माणसं असणं स्वाभाविक. कारण त्यांच्याशिवाय त्या काळाला अर्थच काय! म्हणजेच ही एका अर्थाने माणसांचीच कहाणी आहे... प्रवाहपतित किंवा प्रवाहाविरुद्ध पोहोणाऱ्या माणसांची; काळानुसार बदलणाऱ्या किंवा बदलत्या काळाशी जुळवून घेता न आलेल्या माणसांची; लौकिक प्रगतीची शिखरं गाठणाऱ्या किंवा शिखरावरून गर्तेत कोसळणाऱ्या माणसांची; भोगणाऱ्या माणसांची किंवा सोसणाऱ्या माणसांची!
कुणाला आवडो वा ना आवडो, राजकारण आपल्याला अगदी विळखा घालून बसलं आहे. ही कादंबरी राजकीय नसली, तरी त्यातील बहुसंख्य प्रसंग राजकारणातले आहेत. सत्तेच्या शक्तिकेंद्राचे कसे आणि कुठवर परिणाम होतात, ह्याचं वर्णन त्यात आहे. ह्या केंद्राला प्रसन्न करण्यासाठी, त्या केंद्रात आपली जागा मिळविण्यासाठी माणसं काय काय करतात, त्यासाठीच्या पडद्याआडच्या हालचाली आणि खेळ्या कशा असतात, माणसंच माणसांचा कसा वापर करतात, ह्याचं थेट चित्रण कादंबरीमध्ये आहे. राजकारण्यांच्या गुणावगुणांचं, घराणेशाहीचं यथार्थ दर्शनही घडतं. पण कादंबरीत केवळ राजकारण नाही. राजकीय निर्णयांचे किंवा घडामोडींचे सर्वसामान्यांच्या जीवनातल्या विविध क्षेत्रांवर कसे परिणाम होतात, हेही दिसतं. इथं वृत्तपत्रं आहेत, नाटक आहे, वृद्धाश्रम आहे, कॉलेज आहे, बार आहे, पुस्तकांचं प्रकाशन, पुरस्कारासाठीच्या लटपटी... जीवनातलं कोणतंही अंग वर्ज्य नाही.
विविध माणसं ह्या कादंबरीत भेटतात. मुलीला मंत्री करणाऱ्या खासदारापासून ते विजयाच्या कोणत्याही मिरवणुकीत बेधुंद नाचणाऱ्या कार्यकर्त्यापर्यंत. दलित महापौर, त्याची ब्राह्मण बायको आणि प्राध्यापक असलेला मेव्हणा, ह्या मेव्हण्याची देहविक्रय करणारी आई, गांधीवादी नेता आणि त्याचा प्रवाहपतित मुलगा, सारे यम-नियम धाब्यावर बसवून बेबंद वागणारा त्याचा मुलगा, राजकीय सोय लक्षात घेऊन त्याची होणारी सोयरिक, समाजवादी विचारवंताची अभिनेत्री मुलगी, लेखक, वृत्तपत्राचा राजकारणी मालक आणि त्याचे संपादक, मनातील खदखद पत्रांद्वारे व्यक्त करणारी दोन ‘कालबाह्य’ माणसं... अशी असंख्य माणसं गरजेनुसार येत राहतात. त्यांच्या ठसठशीत व्यक्तिरेखा हे दंबरीचं वैशिष्ट्य.
कालखंड साडेसहा वर्षांचा असला, तरी त्यात सतत काही घडत असतं. दोन पंतप्रधान, चार मुख्यमंत्री, लोकसभा-विधानसभेच्या दोन-दोन निवडणुका, बोफोर्सकांड, शाहबानो खटला, आंदोलनं - अयोध्येचं, मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठीचं, शेतकरी संघटनेचं आंदोलन आणि अर्थातच त्या साऱ्यावरून उमटणाऱ्या क्रिया व प्रतिक्रिया. माणसं कशी वागतात आणि ती तशी का वागतात, हे शोधण्याचाही प्रयत्न आहे. बऱ्याच घटना-घडामोडी, असंख्य माणसं असा मोठा व्याप असूनही हे कथानक कंटाळवाणं होत नाही. एखाद्या वेगवान चित्रपटासारखी ती कथा वाचकाला सतत पुढे पुढे नेत राहते.
तुलनेने छोट्या कालखंडाचा विस्ताराने आढावा घेताना काही त्रुटी राहिल्या आहेत. इंदिरा गांधी ह्यांच्या हत्येची बातमी नागपुरातील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजण्यापूर्वीच कळते, हे त्या काळातील संपर्काच्या सोयी पाहता पटण्याजोगं नाही. हेमा यावलकर वयाची २५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच आमदार आणि मंत्रीही कशी होते, हे अनाकलनीय आहे. तिचे खासदार असलेले वडील नारायण यावलकरच ‘ती अजून चोविशीचीही नाही,’ असं सांगतात. इचलकरंजीचे आमदार अण्णा गावीत वऱ्हाडी हेल काढत बोलतात आणि आयुष्यभर राजकारण करणाऱ्या ह्या शिक्षकाला नागपूरचा खासदार कोण, आपल्या नेत्याचा जावई कोण हे माहीत नसणंही न पटणारं. ‘प्रत्यक्षातील काही व्यक्ती सोडल्या, तर अन्य व्यक्तिरेखा पूर्णतः काल्पनिक आहेत,’ असं लेखकाने सुरवातीलाच सांगून टाकलं आहे. मुख्यमंत्री खरे, पश्चिम महाराष्ट्र-मराठवाड्यातील मंत्र्यांची नावं खरी आणि विदर्भातील मात्र काल्पनिक. वास्तवातील पत्रकार मो. ग. तपस्वी दिल्लीतून ‘भारती’ या कल्पनेतील दैनिकासाठी लिहितात आणि खरेखुरे प्रमोद महाजन एका काल्पनिक दलित नेत्याला निवडणुकीत ‘डमी’ म्हणून लढण्याची विनंती करतात. वास्तव आणि कल्पना यांचं हे मिश्रण अजब वाटत राहतं, एवढं खरं!
--------------------------------------#अश्वमेध #रवींद्र_शोभणे #साहित्य_संमेलन #संमेलनाध्यक्ष #आणीबाणी #त्रिखंडात्मक_कादंबरी #अंमळनेर_संमेलन
पुस्तकाचा परिचय करून देताना समीक्षा किती सुरेख केली. शब्दसंपत्तीही आवडली.
उत्तर द्याहटवा- श्री. के. वनपाल, नगर
छान लिहिले आहे..
उत्तर द्याहटवा