रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

प्रतापराव....


प्रतापरावांचं हे छायाचित्र त्यांच्या गावच्या शिवारातील. आम्ही हुरडा खायला गेलो होतो,
त्या वेळचं. त्यांच्या खांद्याला अडकवलेली पिशवी माझी आहे. मला फोटो काढायला अडचण
होऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण वेळ बाळगली. दुसऱ्याची जबाबदारी आपलीच असल्याच्या
त्यांच्या स्वभावाला जागून...

----------------------------------------------------------

‘केसरी’च्या नगर आवृत्तीच्या कार्यालयात त्यांना ‘देशपांडे’, ‘प्रताप’ आणि ‘प्रतापराव’ अशा वेगवेगळ्या तऱ्हेनं संबोधलं जाई. वरिष्ठ त्यांच्या मागे क्वचित ‘प्रताप’ असा उल्लेख करीत. एरवी त्यांना आडनावानं, नावापुढं राव लावूनच हाक मारली जाई.

प्रतापरावांची थेट भेट होण्याआधीच त्यांची वेगळ्या तऱ्हेनं ओळख झाली. त्यांचं लग्न ज्या दिवशी झालं, त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी माझी नगरला ‘केसरी’तील प्रशिक्षणार्थी उपसंपादक/वार्ताहर ह्या पदासाठी मुलाखत झाली. डिसेंबरची १५ तारीख होती आणि साल होतं १९८७. त्यानंतर दीड महिन्याने आम्ही एकमेकांना प्रत्यक्ष भेटलो.

सुरुवातीचे काही दिवस फार जवळची ओळख झाली नाही. कधी तरी चहा प्यायला जाण्याएवढेच संबंध. ‘केसरी’तले आम्ही तीन तरुण तुर्क एका खाणावळीत जाऊ लागलो. त्या चालविणाऱ्या ताई प्रतापरावांच्या बहीण असल्याचं काही दिवसांनी समजलं. नकळत थोडी जवळिक झाली.

‘केसरी’चा बाडबिस्तारा सर्जेपुऱ्यातून केडगावच्या औद्यागिक वसाहतीमध्ये हलल्यानंतर प्रतापरावांशी थोडे अधिक संबंध येऊ लागले. कारण छपाई नगरमध्ये सुरू झाली होती. रात्रपाळीला सहसा आम्ही दोघे एकत्र असायचो. ते असले तर माझी रात्री जाण्याची सोय व्हायची.

अंकाची छपाई सुरू झाली की, प्रतापरावांच्या एम-80वरून निघायचो आणि जुन्या बसस्थानकावरील शेट्टीच्या कळकट कँटीनमध्ये उकळून उकळून काढा झालेला स्टीलच्या बुटक्या कपातला एक कप चहा व्हायचा. खरं तर त्यांना चहा प्यायचा नसायचा, पण मला कंपनी म्हणून ते चहा पित.

हळू हळू लक्षात आलं की, प्रतापरावांचं कोणत्याच गोष्टीबाबत आग्रही किंवा अनाग्रही असं काही नसतं. प्रूफ रीडर म्हणून काम करताना सोलापुरातून ते इथे उपसंपादक म्हणून आले आणि बहुदा तेथेच त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण झाल्या. 

एखाद्या बातमीवरून ते कधी उत्तेजित झालेले दिसले नाहीत; किंवा एखादी बातमी आली नाही वा व्यवस्थित लागली नाही म्हणून हळहळताना दिसले नाहीत.

ह्याचा अर्थ असा नक्कीच नाही की, ते कामाबाबत उदासीन होते. वाट्याला आलेले काम ते चोखपणे बजावत. शांत राहून. पोक्तपणा दाखवत.

त्यांना आपल्या क्षमता आणि मर्यादा ह्याची चोख जाणीव होती, हे आता कळतं.

एकदा असंच झालं. रात्रपाळी होती माझी. काही तरी बिनसलं होतं त्या दिवशी. कार्यालयात येऊन टेकलो. पुढच्या मिनिटाला प्रतापरावांनी एक बातमी पुढे केली.

ते संपादकीय सहकाऱ्यांशी कधीच अरे-तुरे बोलत नसत. आम्ही सगळे त्यांच्याहून वयानं आणि अनुभवानं बरेच लहान. तरीही त्यांच्या तोंडून एकेरी हाक कधी आली नाही. त्या दिवशी ते म्हणाले, ‘‘सतीश, एवढी एक बातमी सोडता का?’’

एस. टी.च्या टपालाने दुपारी कधी तरी आलेली बातमी होती ती. एव्हाना संपादन वगैरे होऊन ती आतल्या कोणत्या तरी पानावर चिकटायला पाहिजे होती. ते पाहून म्हणालो, ‘‘अहो देशपांडे, मी रात्रपाळीला आहे. मला पहिल्या पानाच्या बातम्या सोडायच्या आहेत. मग दोन पानं लावायची आहेत. तुम्हीच सोडायला पाहिजे ती.’’

असं ऐकायला मिळाल्यावर दहा-बारा पावसाळे अधिक पाहिलेला कोणताही अनुभवी माणूस चिडला असता. पण चिडतील ते प्रतापराव कसले!

समजूत काढावी तसं ते म्हणाले, ‘‘बरोबर आहे. पण ही बातमी वेगळी आहे. तुम्ही ती चांगली कराल म्हणून तुमच्याकडे दिली. तुमच्याकडे असलेल्या सगळ्या बातम्या मी सोडतो. हवं तर तुमची दोन्ही पानं मीच लावतो. पण ही बातमी तुम्हीच संपादित करावी, असं मला वाटतं...’’

खरं तर त्यांचा राग आला होता. पण त्यांच्या स्वभावामुळे तो दाखविता येणंही शक्य नव्हतं. बातमी घेतली. खरंच थोडी हट के होती. ती अधिक चांगली केली. प्रतापरावांच्याच पानात ती सजवून लागली.

अयोध्येत ६ डिसेंबर रोजी जो इतिहास घडला, तो दिवस आमच्यासाठीही ऐतिहासिक होता. पद्मभूषण देशपांडे ह्याच्याबरोबर मी त्या दिवशी अकोल्याहून संगमनेरला आलो होतो. फोन-टीव्ही. ह्याच्यापासून लांबच असल्यानं काय ‘रामायण’ घडलं ह्याबद्दल आम्ही अनभिज्ञच होतो.

संगमनेरहून नगरला यायला एस. टी. बस नाही. माझी रात्रपाळी. कशीबशी संध्याकाळी साडेसात-पावणेआठ वाजता बस मिळाली. ती रखडत सव्वाअकराच्या सुमारास नगरला पोहोचली. तिथनं केडगावला जायचं कसं? एकाला दादापुता करून स्कूटर काढायला लावली आणि पोहोचलो.

कार्यालयात सगळीच शांतता. प्रतापराव, दोन पेस्टर आणि दोन कम्प्युटर ऑपरेटर. पानं लावण्याच्या टेबलवर तयार होऊन आलेल्या बातम्याच बातम्या पडलेल्या. तीन पानं लावायची बाकी. एकटा माणूस काय करणार!

मला पाहून प्रतापराव खूश झाले. खरं तर एवढ्या उशिरा आल्याबद्दल त्यांनी रागवायला हवं होतं. किमान काही शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करायला हवी होती.

तसं काहीही न करता प्रतापराव म्हणाले, ‘‘आलात का! बरं झालं. ह्या बघा बातम्या. तुम्ही पहिलं पान लावा. तुमच्याकडे जाणार नसलेल्या बातम्या मला सांगा. माझ्या पानांमध्ये जिरवतो. बाकी सगळं सोडा. तुम्ही पहिलं पान बघा फक्त...’’

बऱ्याच लटपटी करून त्या दिवशीचा अंक वेळेत दिला. चांगला नाही, बरा निघाला असावा. कारण आम्हाला त्यावरून कोणीच काही बोललं नाही.

प्रतापरावांमधला सांभाळून घेणारा सहकारी पुन्हा एकदा दिसला.

केडगावच्या आरती हॉटेलमध्ये चहा प्यायला प्रतापरावांबरोबर जायचं म्हणजे मजा असायची. ते सोबत असल्यावर आम्ही वडीलकीचा मान राखून त्यांनाच बिल द्यायला लावायचो. तिथं गेल्यावर भेळ खावी वाटली तर तसं सांगायचो. त्यांचा कोणत्याच गोष्टीला आक्षेप नसायचा.

पुढे पुढे आमची सलगी वाढली आणि आमचा डोळा त्यांच्या डब्यावर जाऊ लागला. त्यांच्या डब्यातली मेथीची मोकळी भाजी आणि वांग्याचं भरीत केवळ अफ्लातून. 

कधी तरी पद्मभूषणला किंवा मला रात्री आठ-सव्वाआठ वाजताच भूक लागायची. खाणावळीचा डबा यायला वेळ असायचा. तो येई तेव्हा कामाची घाई सुरू झालेली.

असंच एकदा प्रतापरावांना म्हणालो, ‘भूक लागली राव.’ ‘माझा डबा आहे की,’ असं म्हणत त्यांनी तो आणून दिला. लाजेकाजेखातर आम्ही त्यांच्यासाठी अर्धी भाकरी आणि घासभर भाजी ठेवून बाकी सगळ्याचा फन्ना उडवला.

मग तो महिन्यातून एक-दोन वेळचा रिवाजच बनला. शेवटी शेवटी तर आम्ही एवढे निर्ढावलो की, त्यांच्या पिशवीतून डबा घेऊन त्यांनाच सांगत असू, ‘भूक लागलीय. संपवतो तुमचा डबा.’

आपण त्यांचा डबा संपवला तर ते काय खाणार, त्यांना भूक लागणार नाही का, एवढ्या रात्री घरी जाऊन ते काय जेवणार आणि समजा घरचा स्वयंपाकच संपला असेल तर... असला काही पाचपोच आम्हाला नव्हताच. पण त्यांनीही त्याची चुकूनही जाणीव कधी करून दिली नाही. उलट मला आवडते म्हणून ते अधूनमधून वहिनींनी बनवलेली मेथीची भाजी किंवा भरीत आणत.

मग आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. अधूनमधून भेट होई. चहा पिण्या-पाजण्याचा आग्रह होई. गल्लीत आले क्वचित तर घरी चक्कर मारीत. त्यांच्या पत्रकारितेचा प्रवासही इकडून तिकडे असा झाला. पण ते कोठेच मनापासून रमले नाहीत. खऱ्या अर्थानं ते ‘ओल्ड स्कूल’चे विद्यार्थी होते. बातमी लिहिण्यातील अनौपचारिकपणा किंवा प्रयोग, जुन्या संकेतांना धक्का लावणारी शीर्षके त्यांना कधी पटली नाहीत. हे असले प्रयोग त्यांना रुचत किंवा पचत नसत. पण बोलून दाखवणं त्यांचा स्वभाव नव्हता.

आमच्या अतिउत्साहाला ते कधी कधी फार खळखळून हसत. पण त्यात टिंगल किंवा कुत्सितपणा नसायचा. आम्ही नावाने बातम्या येण्यासाठी, लेख लिहिण्यासाठी धडपड करत असू. अशा परिस्थितीत प्रतापराव काहीच कसं लिहीत नाहीत, ह्याचं आश्चर्य वाटे. तसं त्यांना कधी तरी विचारलंही. त्यांनी हसून आणि टाळी देत उत्तर टाळलं!

अलीकडच्या दहा वर्षांमध्ये आमचे संबंध पुन्हा वाढले. सात-आठ दिवसांतून कधी तरी फोन, आठ-पंधरा दिवसांतून जमलंच तर भेटणं चालू आहे.

थोडं चालून झालं की, त्यांचा चहा पिण्याचा आग्रह असतो. आम्ही चहा पितो. ते घाईघाईत उठतात. ‘माझ्याकडे सुटे पैसे आहेत,’ असं म्हणत बिल देण्याची लगबग करतात.

सर्व प्रकारची बिलं देण्याचा प्रतापरावांचा अधिकार आम्ही केव्हाच मान्य केलेला आहे. त्या साध्या-सरळ माणसाच्या हे अजून लक्षात आलेलं नाही. 🤣 कोविडच्या आधी आम्ही त्यांच्या गावी हुरडा खायलाही जाऊन आलो. मजा केली.


प्रतापरावांचे दोन मित्र एका चौकटीत. डावीकडे आहेत ते
त्यांचे बालमित्र. उजवीकडे व्यवसायबंधू. हे खुद्द त्यांनीच टिपलेलं
छायाचित्र. गावाच्या शिवारात, हुरडा खाल्ल्यानंतर.

--------------------------------------------------

कधी तरी फिरायला बरोबर येताय का, हे विचारण्यासाठी प्रतापरावांना फोन करतो. त्यांना त्या दिवशी शक्य नसतं. मग ते अतिशय तळमळीनं सांगत बसतात, येणं का शक्य नाही ते. त्यांचं हे स्पष्टीकरण आवडत नाही. मग बहुतेक माझा आवाज तुटक होतो. ‘अहो प्रतापराव, यायला जमत नाही तर तेवढंच सांगा की,’ असं तोडून टाकतो. मग थोडं पुढे गेल्यावर मलाच वाईट वाटतं.

प्रतापरावांच्या डोळ्यांचं मध्ये ऑपरेशन झालं. त्यामुळे फारसं वाचायला जमत नाही, ह्याबद्दलचा खेद ते बोलून दाखवतात. ‘अहो, आता वाचण्यासारखं राहिलंच काय!’, असं म्हणत मी त्यांना दिलासा देतो. मीही फार काही वाचत नाही, असं सांगून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो. ‘#खिडकी’मध्ये डोकावता येत नाही, ह्याची खंतही व्यक्त करतात. मग मी पुन्हा समजूत काढतो.

मध्यंतरी त्यांना सवय लागली होती. फोनवरचं पहिलं वाक्य असायचं, ‘तब्येत ठीक ना?’ मला ते अजिबात आवडायचं नाही. बोलून बोलून त्यांची सवय घालवली.

एखाद्या दिवशी फोन येतो. खूप दिवस बोललो नाही म्हणून फोन केल्याचं सांगतात ते. मग आम्ही दहा-पंधरा मिनिटं बोलतो. ‘गेले ते दिन गेले...’च्या त्यांच्या सुरात मी कोरसची भूमिका बजावतो. त्यांच्याकडून जेवण घ्यायचं असल्याचं बजावून सांगतो. तेही बिचारे होकार देतात. नकार देणं किंवा विरोध करणं त्यांच्या स्वभावात नाहीच.

प्रतापराव म्हणजे सीधे-साधे, सरळ. राग-लोभ-द्वेष आदी विकारांपासून लांब असलेले. म्हणजे त्याचं प्रदर्शन तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून कधी दिसलं नाही.

असे तीन तपांपूर्वीचे सहकारी आणि तरीही अजून (ज्येष्ठ) मित्र असलेल्या प्रतापराव देशपांडे ह्यांचा २२ सप्टेंबर हा वाढदिवस. सत्तरी ओलांडून ते आता अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून हे आठवलं तसं नि तेवढं लिहिलं.

💗🌻💗🌻

....................................................
(लेखाखाली असलेल्या निवडक प्रतिक्रिया फेसबुकवरील आहेत. तेथे टाकलेल्या पोस्टवर अनेक जण भरभरून व्यक्त झाले.)
....................................................

#केसरी #मित्र #प्रतापराव #प्रताप_देशपांडे #मेथीचीभाजी_भरीत #बातमी #उपसंपादक #चहा #रात्रपाळी

१३ टिप्पण्या:

  1. प्रतापरावांबरोबर मलाही खूप काम करायला मिळालं... आपण लिहिलेल्या अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. माननीय प्रतापराव देशपांडे यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
    - संतोष खेडलेकर, संगमनेर

    उत्तर द्याहटवा
  2. रसाळ, मधाळ... वाचत राहावे असा लेख. प्रत्यक्ष तेथे आहोत असे वाटले.
    - प्रवीण कुलकर्णी, नगर

    उत्तर द्याहटवा
  3. लेख वाचता वाचता प्रतापराव मित्र झालेत हो!!!! आता तुमच्या सोबत त्यांना भेटून चहा पिण्याची औपचारिकता बाकी राहिलीय असेच वाटतेय...
    🙏🌹
    - शिरीष शिवणगीकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  4. तुमची शैली छान आहे ,अपरिचित असूनही व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभं राहिलं.
    - विनय गुणे, संगमनेर

    उत्तर द्याहटवा
  5. आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याचे इतके सुरेख व्यक्तिचित्रण खूपच भावले. माझ्या पन्नास वर्षाच्या ‘गावकरी’तील पत्रकारितेत असे काही सहकारी लाभले होते. त्यांचे स्मरण झाले...

    एकोणीसशे सत्तर-ऐंशीनंतर तंत्रातच नव्हे तर इतरही बरेच बदल झाले. त्याचे स्वागत करावे लागले... रिचवावे लागले. नवी पिढी आली, बदल आले. पण अशा सहकाऱ्यांमुळे प्रवास सुखद झाला. माझ्याकडून प्रतापराव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
    - नरहरी भागवत, नाशिक

    उत्तर द्याहटवा
  6. सुंदर. देशपांडे डोळ्यासमोर उभे राहिले!!
    - मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली

    उत्तर द्याहटवा
  7. अत्यंत हृदयाच्या तळापासून लिहिले आहे.
    - प्रमोद तेंब्रे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  8. प्रतापराव किमान महिन्यातून फोन करतात... मीही करतो. बोलताना नेहमी म्हणतात की, तुझ्याशी बोलताना फ्रेश वाटते. गमती-जमती तुझ्याकडे खूप आहेत. तूही बिनधास्त बोलतोस. म्हणून चांगले वाटते.

    मलाही प्रतापराव आवडतात. सहनशीलता त्यांच्याकडून शिकावी. प्रतापरावांबद्दल वाचताना ‘केसरी’मधील आठवणी जाग्या झाल्या. योग्य शब्दात बसवलं, सतीश आपण प्रतापराव यांना...तेही योग्य दिवशी!
    - रवींद्र देशपांडे, केडगाव, नगर

    उत्तर द्याहटवा
  9. मृदू व्यक्तिमत्त्वाच्या समंजसपणाचे आपुलकीने घडविलेले लोभस दर्शन!
    - महेश घोडके, पुणे

    उत्तर द्याहटवा
  10. ‘केसरी’मध्ये नगरला आल्यावर पहिल्याच दिवशी श्रीपाद मिरीकरांनी प्रताप देशपांडे ह्यांची ओळख करुन दिली. प्रतापरावांनी शांतपणे नमस्कार केला. हाच शांतपणा मी ‘केसरी’ आणि नगर सोडले, तेव्हाही कायम होता! हाच संयमी स्वभाव पत्रकरितेमध्ये त्यांनी एवढ्या दीर्घ काळ कायम ठेवला आहे, हे त्यांचे वेगळेपण लक्षणीय आहे.

    रोजचे काम करताना असा समतोल राखणे कठीणच. प्रतापरावांना ते सहज साधते; कारण या व्यवसायाबद्दलची निर्विकार आणि निरोगी वृत्ती.

    सतीशराव, खरोखर तुम्ही म्हटल्याप्रमाणे, फारशी इच्छा नसताना चहा घेण्यापासून फारशी इच्छा नसताना एखादी बातमी सोडण्यापर्यंत, सारे या निरोगी वृत्तीमुळे त्यांना सहज जमते.
    या निरोगीपणाच्या जोरावर त्यांना दीर्घायुरारोग्य लाभेलच.

    प्रतापराव, मन:पूर्वक शुभेच्छा !
    🎉🎉🎉
    - शरद फटांगरे, संगमनर

    उत्तर द्याहटवा
  11. सतीशराव, खूपच छान!
    दैनिक लोकआवाजमध्ये सहा वर्षे प्रतापराव सोबत होते आमच्या. तुमच्या लेखात वर्णिलेला प्रतापरावांचा स्वभावगुण आम्हालाही अनुभवायला मिळाला. एकप्रकारे तुमच्या लेखातील सत्यतेविषयी आमची ही साक्षच.

    प्रतापरावांना अधून मधून मी भेटतच होतो. कधी रस्त्याने ते जात असले आणि माझे लक्ष नसले तर हाक त्यांनीच मारली. अवचित फोन करून सुखद अनुभव त्यांनीच दिला.

    या जन्मदिवसाच्या या औचित्यपूर्ण क्षणी प्रतापरावांच्या आयुष्यात आरोग्य, समाधान, आणि आनंद भरुन राहो ही शुभेच्छा आणि प्रार्थना!
    - सॉलोमन गायकवाड, नगर

    उत्तर द्याहटवा
  12. फोटो पाहिल्यावर लगेच लक्षात आले. माणूस अबोल पण हरहुन्नरी आहे. पंचाहत्तरी निमित्त शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

प्रतापराव....

प्रतापरावांचं हे छायाचित्र त्यांच्या गावच्या शिवारातील. आम्ही हुरडा खायला गेलो होतो, त्या वेळचं. त्यांच्या खांद्याला अडकवलेली पिशवी माझी आहे...