शुक्रवार, ५ जुलै, २०२४

नज़दीकियां फिर भी ये दूरियां...



अटल सेतू...
----------------------
महानगरी
मुंबईत होतो गुरुवारी. दीड-दोन तासांच्या कामासाठी. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कार्यक्रम ज्या वानखेडे स्टेडियमवर होता, तिथून जेमतेम दीड-दोन किलोमीटरवर.

पुन्हा एकदा मुंबईचा धावता दौरा. काही पाहण्यासाठी वेळ न देणारा. ह्या तीन वर्षांमधला तिसरा किंवा चौथा.

ह्या वेळी अटल सेतूवरून जायचं ठऱवलं. झटक्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलो. हा जो वेळ वाचला, तो आधी सेतू शोधण्यात गेला. ‘गूगलबाईं’चे नीट न ऐकल्याचा परिणाम!

मध्येच एकाला विचारलं. गळाभर सोन्याचे दागिने, हातात अंगठ्या, टॅटूचीही सजावट. चौकाच्या बाजूला मोटरसायकल उभी केलेली. ‘दादा’ असल्याची सारी लक्षणं व्यवस्थित दिसणारा.

त्यानं अतिशय व्यवस्थित पत्ता सांगितला. आभार मानून आम्ही निघालो आणि त्याचा फोन वाजला.  ‘बोले रे बिनडोका...’ त्याचा टपोरीपणा आवाजातून दिसला. त्यानंच फार सविस्तर आणि कळेल असा पत्ता नम्रपणे सांगितलेला अर्ध्या मिनिटांपूर्वी.

सेतू शोधताना वेळ गेला खरा; पण त्यावरून जाताना फार मस्त वाटलं. टप्प्याटप्यानं तो वर चढत जातो. आजूबाजूला पाणी, काही तरंगणाऱ्या बोटी.

मंत्रालयाजवळच काम होतं. ते संध्याकाळी चार-साडेचार वाजता संपलं. बाहेर आलो आणि पाहिलं तर सारेच रस्ते वानखेडेच्या दिशेने जात होते. पाऊसही मध्येच येत होता आणि विश्रांती घेत होता.

मंत्रालयावजळच्या रस्त्यावर खाऊगल्ली. शोधलं तर तिथे वृत्तपत्राचा एकही स्टॉल नव्हता. भरल्यापोटी वर्तमान कळू नये, ह्याची काळजी?

निळ्या दिव्याच्या गाड्या सायरन वाजवत बाहेर पडत होत्या आणि प्रवेश करीत होत्या. त्यांची गैरसोय होऊ नये हे पाहताना पोलिसांची तारांबळ उडत होती.

साडेसहा-सात वाजता मुंबई सोडू, असा कयास होता. एवढ्या गर्दीतून जायचं कसं? मोठाच प्रश्न होता. सुदैवाने तो उद्भवलाच नाही.

टीव्ही.वर त्याच बातम्या चालू होत्या. क्रिकेट, ‘टीम इंडिया’ आणि वानखेडे. मुलानंही फोनवर सांगितलं, ‘प्रचंड गर्दी आहे. कसं जाणार तुम्ही?’

इतके आहोत जवळ जरी
तितकेच राहिलो दूरवरी
... अशी खंत वाटत होती. तिथं जाण्याचं, तो सगळा उत्साह अनुभवण्याचं आणि विराट गर्दीचा एक भाग होण्याचं ‘धाडस’ नाही केलं.

काहीही म्हणा. निघायला उशीर झाला. बाकीच्यांचं काम संपत होतं म्हणून खाली रस्त्यावर येऊन उभा राहिलो. मंत्रालयासमोरच्या दुहेरी रस्त्यावरच्या एकाच बाजूला वाहनांची रांग लागलेली होती. मोजक्या दुचाकी, चारचाकी आणि ‘बेस्ट’च्या त्या नव्या-कोऱ्या दुमजली गाड्या.

पायी येणाऱ्या बहुतेकांच्या अंगावर ‘टीम इंडिया’ची ‘जर्सी’... कुणी विराटप्रेमी, कुणी रोहितचा चाहता, तर कोणी बुमराहचा. ती चाह, ते प्रेम टी-शर्टवरील क्रमांकावरून दिसणारं.

वानखेडे स्टेडियमवरून क्रिकेटप्रेमी परतत होते. मिळेल त्या मार्गाने. दोन तरुण मुलं आली आणि विचारलं, ‘काका, चर्चगेटकडे कसं जायचं?’ पाचच मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यांना दिशा दाखविली.

एक मध्यमवयीन सायकलवरून राँग साईडने येत होता. वाहनांच्या गर्दीत त्याला जागा मिळाली नसावी. पुढच्या नळीवर पाच-सात वर्षांचा मुलगा आणि त्याच्या हातात गुंडाळी केलेला तिरंगी ध्वज.

अस्सल मुंबईकर वाटणारे (आणि असणारे!) दोन तरुण पदपथावर बसलेल्या शेंगदाणे विक्रेत्याजवळ थांबले. ‘चचा, सिंग दो’, असं त्यातला एक  म्हणाला. तेवढ्यात दुसरा त्याला म्हणाला, ‘थांब रे. फोन-पेनं देतो पैसे...’

हे मराठीच आहेत, हे समजून खारे दाणे घेणाऱ्याला विचारलं, ‘कसा झाला कार्यक्रम?’
‘एकदम कडक! सॉल्लिड गर्दी होती,’ तो त्याच उत्साहात म्हणाला.


डबल डेकरमधील रात्रीच्या वेळची प्रवाशांची गर्दी
------------------------------------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरून येणाऱ्या देखण्या, चकचकीत दुमजली बसगाड्या भरभरून येत होत्या. वरच्या मजल्यावरही प्रवासी दाटीवाटीनं उभे असल्याचे रस्त्यावरून दिसत होतं. त्या बसगाड्यांचे दिसलेले क्रमांक ११५ आणि ११५ ए.

हा सारा वीस-पंचवीस मिनिटांचा खेळ. हळू हळू गर्दी कमी होऊ लागली. चारचाकींची संख्या विरळ झाली. शेवटची बस पाहिली तर निम्मीशिम्मी रिकामीच.

एव्हाना नऊ वाजले होते. सहकारी खाली आले. गाडीत बसलो. आता गर्दीची अडचण येणार नाही, भर्रकन निघून जाऊ, असं वाटत होतं.

तो गोड गैरसमज काही मिनिटांचाच. मरीन ड्राइव्हच्या रस्त्याला लागलो आणि समुद्र दिसू लागला. माणसांचा. तिथं इतकी माणसं बसली होती की, खरा समुद्र दिसतच नव्हता. मंत्रालयाच्या मतलबी वाऱ्याकडे पाठ करून ती समुद्रावरून येणारं वारं खात होती.

रस्त्यावर चपलांचा खच पडलेला. हाजी अलीकडून येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद. कार्यक्रम संपून किमान तासभर झालेला. पण त्या बाजूची गर्दी काही कमी झालेली नव्हती.

रस्ता दुभाजकावर पोलिसांनी अडथळे लावलेले. ते ओलांडण्याची कसरत करीत मुंबईकर ‘पब्लिक’ इकडून तिकडे जात होतं. सेल्फी काढत होतं. पोलिसांचं काम संपलेलं नव्हतंच.


मरीन ड्राइव्हवरचं रात्री उशिराचं दृश्य.
------------------------------------------------------------------
डाव्या बाजूला लोक निवांत बसले होते. त्यात आई-बाबांचं बोट धरून आलेल्या मुलांसह, मुलांचं बोट धरून आलेले थकलेले आई-बाबाही दिसत होते. सगळ्या वयोगटांतली माणसं. पण तरीही गर्दीचं सरासरी वय पस्तिशीच्या आत-बाहेरच.

ही सारी गर्दी रोहित, विराट, बुमराह, पंड्या, स्काय ह्यांचं दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेण्यासाठी. त्यांनी उंचावलेला विश्वचषक डोळ्यांत साठवून घेण्यासाठी. मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो क्षण पकडण्यासाठी.

सण साजरा करीत होते मुंबईकर काल संध्याकाळी. पावसाची, गर्दीची, जाताना होणाऱ्या अडचणीची... कशाचीच तमा न करता. क्रिकेट हे त्यांचं प्रेम आहे. ते काल पुन्हा दिसून आलं.

ह्या साऱ्यांनी संध्याकाळ होण्याच्या आधीच कधी तरी घर सोडलेलं. वानखेडे स्टेडियमचे दरवाजे उघडण्याची वाट पाहताना त्यांना सूर्यनारायणानं चटका दिलेला. मग त्यावर दिलासा म्हणून भरल्या आभाळानं थोडं भिजवलेलं. कार्यक्रम संपल्यावर बऱ्याच उशिरा ते घरी परतणार होते. स्वतःचं वाहन असलेले थोडेच. बाकी सारा जनांचा प्रवाहो चर्चगेटकडे चाललेला.

जवळपास दोन-तीन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना क्रिकेटवेडं पब्लिक दिसत होतं.
त्या गर्दीचा भाग होता आलं नाही, ह्याची सल मनात घेऊनच परतीचा प्रवास चालू झाला...
-------------

#मुंबई #अटल_सेतू #वानखेडे_स्टेडियम #टी_20 #क्रिकेट #विश्वविजेते #क्रिकेट_उत्सव #क्रिकेटप्रेमी #गर्दी

२० टिप्पण्या:

  1. सतीश राव एकदम जोरात

    उत्तर द्याहटवा
  2. क्रिकेटवेड्या मुंबई व मुंबईकरांवरील दृष्टिक्षेप वाचला. तुमच्या प्रवाही लेखनशैलीला सलाम!
    - मंगेश नाबर, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  3. सुंदर झाला आहे लेख...
    तटस्थ, पण संवेदनशील निरीक्षण.
    - प्रल्हाद जाधव, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  4. छान लिहिलंय. मुंबईची एक नशा, झिंग आहे. तिथे वास्तव्य (काही काळ किंवा कायमचं) करणाऱ्यांनाच ती समजते. फक्त मला एक वाटतं - लोकल ट्रेन नशिबी नसावी!

    बसनं मुंबईत फिरणं हे सुख आहे. माझ्या लहानपणी, अगदी मी आठ वर्षआंची होईपर्यंत ट्राम होती. दर उन्हाळ्याची सुटी मुंबईत घालवली आहे मी.

    खेळाडूंना नाही पाहिलंत; पण ते वातावरण अचूक शब्दांत उतरवलं आहे तुम्ही!

    - लीना पाटणकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  5. छान लिहिले आहे. 'गूगलबाई' शब्द माझ्या कायम लक्षात राहील.
    - सुयोग झोळ, वाशिंबे (करमाळा)

    उत्तर द्याहटवा
  6. सुरेख लेख. त्या गर्दीचा भाग व्हायला हवं होतं असं मलाही वाटलं.

    उत्तर द्याहटवा
  7. छान उतरलाय ब्लॉग. यूट्यूबवर गर्दी आणि इतर कार्यक्रम पाहिला होता. त्यातल्या गर्दीचं शब्दांकन आवडलं.

    मंत्रालयाकडून वाहणाऱ्या वाऱ्याला ‘मतलबी’ हे आपण दिलेलं विशेषण गमतीचं वाटलं.

    गूगल काका/मामाचा लिंगबदल का केला, ते मात्र समजलं नाही. असो. एकूण लेख मस्तच.
    - विजय ना. कापडी, गोवा

    उत्तर द्याहटवा
  8. लेख आवडला. छान वर्णन केले आहे तुम्ही. प्रचंड गर्दी, गजबजलेला वाहता रस्ता, आजूबाजूचा परिसर... सारं काही नजरेसमोर उभं राहिलं.

    तुम्ही स्वतः क्रिकेटप्रेमी असल्यामुळे पंढरपूरला जाऊनसुद्धा दर्शन न मिळू शकल्याची खंत तुम्हाला जाणवली असेल.

    काही महिन्यांपूर्वी आम्हीसुद्ध अटल सेतूवरून प्रवास केला. तास-दीड तास कमी वेळ लोगतो आणि सेतू तर सुंदर बनवला आहेच!

    मुंबईकरांचं क्रिकेट-वेड, खेळाडूंना पाहण्यासाठी कितीही त्रास सहन करायची तयारी आणि अफाट उत्साहाला सलाम.
    - डॉ. विद्या सहस्रबुद्धे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  9. अतिशय सुंदर लेख. वातावरण प्रत्यक्ष अनुभवले. सगळं दृश्य डोळ्यांसमोर आलं. ‘चपलांचा खच’ ह्या शब्दसमूहात सगळा लेख मावला. लिहीत राहा...
    - डॉ. हेली दळवी, मुंबई/पुणे

    उत्तर द्याहटवा
  10. मस्त! मंत्रालयातले ‘मतलबी’ वारे... झोंबणारे!!
    - मंगेश मधुकर कुलकर्णी, पुणे

    उत्तर द्याहटवा
  11. खूप सुंदर लेख.
    - अतुल कोर, साक्री (धुळे)

    उत्तर द्याहटवा
  12. त्या आबालवृद्धांचा उत्साह, ते वातावरण, तुझी घालमेल आणि भारतीयांचं क्रिकेटवेड ह्याचं शब्दचित्र डोळ्यांसमोर उभे झाले!
    - श्रीकांत जोशी, आळंदी (पुणे)

    उत्तर द्याहटवा
  13. काय जिवंत चित्रण शब्दबध्द केलंय. वाचताना आपण स्वतः घटनास्थळी असल्याचा भास होतोय.छानच.

    उत्तर द्याहटवा
  14. मध्यमवर्गीय सायकलस्वार.
    त्याच्या सोबत मूल. ‘राँग साईड’ने येणारा.

    खाऊगल्लीत वर्तमानपत्र शोधणे.
    शेंगांना ‘सिंग’ संबोधणारा.

    आणि,
    गर्दीतही गर्दीचा भाग न होता तटस्थ निरीक्षक.
    वस्तुनिष्ठ वर्णन.
    पण काही एक भाव-दिशा, भाव-दशा!

    ... असे सारे ह्या कथनात आले आहे.
    - प्रा. डॉ. एकनाथ पगार.

    उत्तर द्याहटवा

प्रतापराव....

प्रतापरावांचं हे छायाचित्र त्यांच्या गावच्या शिवारातील. आम्ही हुरडा खायला गेलो होतो, त्या वेळचं. त्यांच्या खांद्याला अडकवलेली पिशवी माझी आहे...