मुख्य सामग्रीवर वगळा

भुवीचे पुनरागमन, जर्सी नंबर ७८

भुवनेश्वरकुमार - सभ्य माणसांचा खेळ. (छायाचित्र सौजन्य ः आयसीसी) ----------------------- भारताच्या क्रिकेट संघात भुवनेश्वरकुमारचे पुनरागमन झाले - तब्बल चार वर्षांनंतर. भुवी बदलला आहे का, माहीत नाही; पण त्याचा जर्सी क्रमांक बदलला आहे! नवा क्रमांक आहे ७८. त्यातील दोन्ही अंकांची बेरीच १५ होते - त्याचा आधीचा जर्सी क्रमांक. -------------------- ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे’, ह्या उद्धृताची आठवण ज्या थोड्या खेळाडूंना पाहून आवर्जून होते, त्यापैकी एक भुवनेश्वरकुमार. भारताकडून तो शेवटचा सामना खेळला २२ नोव्हेंबर २०२२ रोजी. नेपियर येथे न्यू झीलँडविरुद्ध. पावसामुळं डकवर्थ-लुईस पद्धतीनं लक्ष्य दिले गेलेला तो सामना बरोबरीत सुटला. त्याच न्यू झीलँडच्या दौऱ्यासाठी भुवनेश्वर ह्याची भारतीय संघात पुन्हा निवड झाली. चार वर्षे संपायला एक महिना बाकी असताना तो पुन्हा खेळताना दिसतो आहे - २२ ऑक्टोबर २०२६. मैदान ख्राइस्टचर्च येथील. खरे तर मागच्या आठवड्यातच बंगळुरूच्या मैदानावर भुवनेश्वरकुमार ह्याने सीमोल्लंघन केले असते. पण वेस्ट इंडिजविरुद्धचा तो सामना पावसामुळे रद्द झाला. चिन्नास्वामी मैदानाऐवजी हेग्ली...

नज़दीकियां फिर भी ये दूरियां...



अटल सेतू ...
----------------------
वानखेडे स्टेडियमपासून दूर उभं राहूनही त्या दिवशीची मुंबई अनुभवता आली. रस्त्यांवरची गर्दी, टीम इंडियाच्या जर्सी, हातातले तिरंगे, दुमजली बस आणि मरीन ड्राइव्हवर उसळलेला जनसागर - ह्या सगळ्यातून जाणवलं मुंबईचं क्रिकेटवेड आणि त्या उत्सवाचा भाग होता न आल्याची सल.
--------------------------
महानगरी
मुंबईत होतो गुरुवारी. दीड-दोन तासांच्या कामासाठी. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा कार्यक्रम ज्या वानखेडे स्टेडियमवर होता, तिथून जेमतेम दीड-दोन किलोमीटरवर.

पुन्हा एकदा मुंबईचा धावता दौरा. काही पाहण्यासाठी वेळ न देणारा. ह्या तीन वर्षांमधला तिसरा किंवा चौथा.

ह्या वेळी अटल सेतूवरून जायचं ठऱवलं. झटक्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आलो. हा जो वेळ वाचला, तो आधी सेतू शोधण्यात गेला. ‘गूगलबाईं’चे नीट न ऐकल्याचा परिणाम!

मध्येच एकाला विचारलं. गळाभर सोन्याचे दागिने, हातात अंगठ्या, टॅटूचीही सजावट. चौकाच्या बाजूला मोटरसायकल उभी केलेली. ‘दादा’ असल्याची सारी लक्षणं व्यवस्थित दिसणारा.

त्यानं अतिशय व्यवस्थित पत्ता सांगितला. आभार मानून आम्ही निघालो आणि त्याचा फोन वाजला.  ‘बोल रे बिनडोका...’ त्याचा टपोरीपणा आवाजातून दिसला. त्यानंच फार सविस्तर आणि कळेल असा पत्ता नम्रपणे सांगितलेला अर्ध्या मिनिटांपूर्वी.

सेतू शोधताना वेळ गेला खरा; पण त्यावरून जाताना फार मस्त वाटलं. टप्प्याटप्यानं तो वर चढत जातो. आजूबाजूला पाणी, काही तरंगणाऱ्या बोटी.

मंत्रालयाजवळच काम होतं. ते संध्याकाळी चार-साडेचार वाजता संपलं. बाहेर आलो आणि पाहिलं तर सारेच रस्ते वानखेडेच्या दिशेने जात होते. पाऊसही मध्येच येत होता आणि विश्रांती घेत होता.

मंत्रालयावजळच्या रस्त्यावर खाऊगल्ली. शोधलं तर तिथे वृत्तपत्राचा एकही स्टॉल नव्हता. भरल्यापोटी वर्तमान कळू नये, ह्याची काळजी?

निळ्या दिव्याच्या गाड्या सायरन वाजवत बाहेर पडत होत्या आणि प्रवेश करीत होत्या. त्यांची गैरसोय होऊ नये हे पाहताना पोलिसांची तारांबळ उडत होती.

साडेसहा-सात वाजता मुंबई सोडू, असा कयास होता. एवढ्या गर्दीतून जायचं कसं? मोठाच प्रश्न होता. सुदैवाने तो उद्भवलाच नाही.

टीव्ही.वर त्याच बातम्या चालू होत्या. क्रिकेट, ‘टीम इंडिया’ आणि वानखेडे. मुलानंही फोनवर सांगितलं, ‘प्रचंड गर्दी आहे. कसं जाणार तुम्ही?’

इतके आहोत जवळ जरी
तितकेच राहिलो दूरवरी
... अशी खंत वाटत होती. तिथं जाण्याचं, तो सगळा उत्साह अनुभवण्याचं आणि विराट गर्दीचा एक भाग होण्याचं ‘धाडस’ नाही केलं.

काहीही म्हणा. निघायला उशीर झाला. बाकीच्यांचं काम संपत होतं म्हणून खाली रस्त्यावर येऊन उभा राहिलो. मंत्रालयासमोरच्या दुहेरी रस्त्यावरच्या एकाच बाजूला वाहनांची रांग लागलेली होती. मोजक्या दुचाकी, चारचाकी आणि ‘बेस्ट’च्या त्या नव्या-कोऱ्या दुमजली गाड्या.

पायी येणाऱ्या बहुतेकांच्या अंगावर ‘टीम इंडिया’ची ‘जर्सी’... कुणी विराटप्रेमी, कुणी रोहितचा चाहता, तर कोणी बुमराहचा. ती चाह, ते प्रेम टी-शर्टवरील क्रमांकावरून दिसणारं.

वानखेडे स्टेडियमवरून क्रिकेटप्रेमी परतत होते. मिळेल त्या मार्गाने. दोन तरुण मुलं आली आणि विचारलं, ‘काका, चर्चगेटकडे कसं जायचं?’ पाचच मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यांना दिशा दाखविली.

एक मध्यमवयीन सायकलवरून राँग साईडने येत होता. वाहनांच्या गर्दीत त्याला जागा मिळाली नसावी. पुढच्या नळीवर पाच-सात वर्षांचा मुलगा आणि त्याच्या हातात गुंडाळी केलेला तिरंगी ध्वज.

अस्सल मुंबईकर वाटणारे (आणि असणारे!) दोन तरुण पदपथावर बसलेल्या शेंगदाणे विक्रेत्याजवळ थांबले. ‘चचा, सिंग दो’, असं त्यातला एक  म्हणाला. तेवढ्यात दुसरा त्याला म्हणाला, ‘थांब रे. फोन-पेनं देतो पैसे...’

हे मराठीच आहेत, हे समजून खारे दाणे घेणाऱ्याला विचारलं, ‘कसा झाला कार्यक्रम?’
‘एकदम कडक! सॉल्लिड गर्दी होती,’ तो त्याच उत्साहात म्हणाला.


डबल डेकरमधील रात्रीच्या वेळची प्रवाशांची गर्दी
------------------------------------------------------------------
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरून येणाऱ्या देखण्या, चकचकीत दुमजली बसगाड्या भरभरून येत होत्या. वरच्या मजल्यावरही प्रवासी दाटीवाटीनं उभे असल्याचे रस्त्यावरून दिसत होतं. त्या बसगाड्यांचे दिसलेले क्रमांक ११५ आणि ११५ ए.

हा सारा वीस-पंचवीस मिनिटांचा खेळ. हळू हळू गर्दी कमी होऊ लागली. चारचाकींची संख्या विरळ झाली. शेवटची बस पाहिली तर निम्मीशिम्मी रिकामीच.

एव्हाना नऊ वाजले होते. सहकारी खाली आले. गाडीत बसलो. आता गर्दीची अडचण येणार नाही, भर्रकन निघून जाऊ, असं वाटत होतं.

तो गोड गैरसमज काही मिनिटांचाच. मरीन ड्राइव्हच्या रस्त्याला लागलो आणि समुद्र दिसू लागला. माणसांचा. तिथं इतकी माणसं बसली होती की, खरा समुद्र दिसतच नव्हता. मंत्रालयाच्या मतलबी वाऱ्याकडे पाठ करून ती समुद्रावरून येणारं वारं खात होती.

रस्त्यावर चपलांचा खच पडलेला. हाजी अलीकडून येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद. कार्यक्रम संपून किमान तासभर झालेला. पण त्या बाजूची गर्दी काही कमी झालेली नव्हती.

रस्ता दुभाजकावर पोलिसांनी अडथळे लावलेले. ते ओलांडण्याची कसरत करीत मुंबईकर ‘पब्लिक’ इकडून तिकडे जात होतं. सेल्फी काढत होतं. पोलिसांचं काम संपलेलं नव्हतंच.


मरीन ड्राइव्हवरचं रात्री उशिराचं दृश्य.
------------------------------------------------------------------
डाव्या बाजूला लोक निवांत बसले होते. त्यात आई-बाबांचं बोट धरून आलेल्या मुलांसह, मुलांचं बोट धरून आलेले थकलेले आई-बाबाही दिसत होते. सगळ्या वयोगटांतली माणसं. पण तरीही गर्दीचं सरासरी वय पस्तिशीच्या आत-बाहेरच.

ही सारी गर्दी रोहित, विराट, बुमराह, पंड्या, स्काय ह्यांचं दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेण्यासाठी. त्यांनी उंचावलेला विश्वचषक डोळ्यांत साठवून घेण्यासाठी. मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो क्षण पकडण्यासाठी.

सण साजरा करीत होते मुंबईकर काल संध्याकाळी. पावसाची, गर्दीची, जाताना होणाऱ्या अडचणीची... कशाचीच तमा न करता. क्रिकेट हे त्यांचं प्रेम आहे. ते काल पुन्हा दिसून आलं.

ह्या साऱ्यांनी संध्याकाळ होण्याच्या आधीच कधी तरी घर सोडलेलं. वानखेडे स्टेडियमचे दरवाजे उघडण्याची वाट पाहताना त्यांना सूर्यनारायणानं चटका दिलेला. मग त्यावर दिलासा म्हणून भरल्या आभाळानं थोडं भिजवलेलं. कार्यक्रम संपल्यावर बऱ्याच उशिरा ते घरी परतणार होते. स्वतःचं वाहन असलेले थोडेच. बाकी सारा जनांचा प्रवाहो चर्चगेटकडे चाललेला.

जवळपास दोन-तीन किलोमीटरपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना क्रिकेटवेडं पब्लिक दिसत होतं.
त्या गर्दीचा भाग होता आलं नाही, ह्याची सल मनात घेऊनच परतीचा प्रवास चालू झाला...
-------------

#मुंबई #अटल_सेतू #वानखेडे_स्टेडियम #टी_20 #क्रिकेट #विश्वविजेते #क्रिकेट_उत्सव #क्रिकेटप्रेमी #गर्दी

टिप्पण्या

  1. क्रिकेटवेड्या मुंबई व मुंबईकरांवरील दृष्टिक्षेप वाचला. तुमच्या प्रवाही लेखनशैलीला सलाम!
    - मंगेश नाबर, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  2. सुंदर झाला आहे लेख...
    तटस्थ, पण संवेदनशील निरीक्षण.
    - प्रल्हाद जाधव, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  3. छान लिहिलंय. मुंबईची एक नशा, झिंग आहे. तिथे वास्तव्य (काही काळ किंवा कायमचं) करणाऱ्यांनाच ती समजते. फक्त मला एक वाटतं - लोकल ट्रेन नशिबी नसावी!

    बसनं मुंबईत फिरणं हे सुख आहे. माझ्या लहानपणी, अगदी मी आठ वर्षआंची होईपर्यंत ट्राम होती. दर उन्हाळ्याची सुटी मुंबईत घालवली आहे मी.

    खेळाडूंना नाही पाहिलंत; पण ते वातावरण अचूक शब्दांत उतरवलं आहे तुम्ही!

    - लीना पाटणकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  4. छान लिहिले आहे. 'गूगलबाई' शब्द माझ्या कायम लक्षात राहील.
    - सुयोग झोळ, वाशिंबे (करमाळा)

    उत्तर द्याहटवा
  5. सुरेख लेख. त्या गर्दीचा भाग व्हायला हवं होतं असं मलाही वाटलं.

    उत्तर द्याहटवा
  6. छान उतरलाय ब्लॉग. यूट्यूबवर गर्दी आणि इतर कार्यक्रम पाहिला होता. त्यातल्या गर्दीचं शब्दांकन आवडलं.

    मंत्रालयाकडून वाहणाऱ्या वाऱ्याला ‘मतलबी’ हे आपण दिलेलं विशेषण गमतीचं वाटलं.

    गूगल काका/मामाचा लिंगबदल का केला, ते मात्र समजलं नाही. असो. एकूण लेख मस्तच.
    - विजय ना. कापडी, गोवा

    उत्तर द्याहटवा
  7. लेख आवडला. छान वर्णन केले आहे तुम्ही. प्रचंड गर्दी, गजबजलेला वाहता रस्ता, आजूबाजूचा परिसर... सारं काही नजरेसमोर उभं राहिलं.

    तुम्ही स्वतः क्रिकेटप्रेमी असल्यामुळे पंढरपूरला जाऊनसुद्धा दर्शन न मिळू शकल्याची खंत तुम्हाला जाणवली असेल.

    काही महिन्यांपूर्वी आम्हीसुद्ध अटल सेतूवरून प्रवास केला. तास-दीड तास कमी वेळ लोगतो आणि सेतू तर सुंदर बनवला आहेच!

    मुंबईकरांचं क्रिकेट-वेड, खेळाडूंना पाहण्यासाठी कितीही त्रास सहन करायची तयारी आणि अफाट उत्साहाला सलाम.
    - डॉ. विद्या सहस्रबुद्धे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  8. अतिशय सुंदर लेख. वातावरण प्रत्यक्ष अनुभवले. सगळं दृश्य डोळ्यांसमोर आलं. ‘चपलांचा खच’ ह्या शब्दसमूहात सगळा लेख मावला. लिहीत राहा...
    - डॉ. हेली दळवी, मुंबई/पुणे

    उत्तर द्याहटवा
  9. मस्त! मंत्रालयातले ‘मतलबी’ वारे... झोंबणारे!!
    - मंगेश मधुकर कुलकर्णी, पुणे

    उत्तर द्याहटवा
  10. खूप सुंदर लेख.
    - अतुल कोर, साक्री (धुळे)

    उत्तर द्याहटवा
  11. त्या आबालवृद्धांचा उत्साह, ते वातावरण, तुझी घालमेल आणि भारतीयांचं क्रिकेटवेड ह्याचं शब्दचित्र डोळ्यांसमोर उभे झाले!
    - श्रीकांत जोशी, आळंदी (पुणे)

    उत्तर द्याहटवा
  12. काय जिवंत चित्रण शब्दबध्द केलंय. वाचताना आपण स्वतः घटनास्थळी असल्याचा भास होतोय.छानच.

    उत्तर द्याहटवा
  13. मध्यमवर्गीय सायकलस्वार.
    त्याच्या सोबत मूल. ‘राँग साईड’ने येणारा.

    खाऊगल्लीत वर्तमानपत्र शोधणे.
    शेंगांना ‘सिंग’ संबोधणारा.

    आणि,
    गर्दीतही गर्दीचा भाग न होता तटस्थ निरीक्षक.
    वस्तुनिष्ठ वर्णन.
    पण काही एक भाव-दिशा, भाव-दशा!

    ... असे सारे ह्या कथनात आले आहे.
    - प्रा. डॉ. एकनाथ पगार.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

‘ळ’च्या अढळपदासाठी

  रचना - शब्दकुल ---------- हा लढा केवळ एका अक्षराचा नाही. मराठीच्या अस्मितेचे अढळपद टिकवून ठेवण्याचा संघर्ष आहे.  'तिलक' किंवा 'जलगाव' ही मोडतोड थांबविण्यासाठी पुण्याच्या श्री. प्रकाश निर्मळ ह्यांनी केंद्रीय मंत्रालयांपर्यंत चिवट पाठपुरावा केला. केंद्रीय हिंदी संचालनालयाने अखेर विस्तारित वर्णावलीत 'ळ'  स्वीकारला. ऋग्वेदापासून ते आधुनिक उपबोलींपर्यंत ५० कोटी जनतेच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या 'ळ' अक्षराची ही रंजक भाषिक यात्रा. सोबत प्रकाश निर्मळ ह्यांची मुलाखत... ---------------- ‘ ध ’ चा ‘ मा ’ केल्यानं काय होतं, हे मराठी माणसाला चांगलं माहीत आहे. ते ऐतिहासिक सत्य आहे. म्हणजे अक्षरांतर इतिहास घडवतं ! इतिहासाचा हा धडा आपण शिकलो, पण गिरवला नाही, असंच दिसत होतं. वर्तमानात ‘ ळ ’ चा ‘ ल ’ केला जात होता आणि ‘ च ल ता है... ’ अशी आपली त्याबाबतची वृत्ती होती. लोकमान्यांचं टिळक आडनाव हिंदीत बनायचं ‘ ति ल क ’ . बाळासाहेब ठाकरे ह्यांचं नाव हिंदी माध्यमांतून व्हायचं ‘ बाला साहब ’ . नाशिक जिल्ह्यात आहे मालेगाव आणि पुणे जिल्ह्यातलं ते माळेगाव. पण हिंदीत गेली की, दोन्...

पहिला फोटो, 'केसरी' आणि ५१ रुपयांचे बक्षीस

स्वतःचा पहिला फोटो छापून येणं आणि शिवाय त्यासोबत बक्षीसही. किती मोठी गोष्ट होती ती त्या काळातली आणि आजचीही! दैनिक केसरीमध्ये लिहिलेलं वाचकाचं पत्र आणि त्याची त्या महिन्यातली सर्वोत्तम पत्र म्हणून झालेली निवड. बरोब्बर ४० वर्षांपूर्वी - ९ सप्टेंबर १९८६! ----------- ‘ लवकर उठायचंच आज ’ असा निश्चय करून ( नेहमीप्रमाणेच) उशिरा उठलो. सगळं आवरून दुपारच्या सुमारास कार्यालयात गेलो. ‘ शतायुषी ’ दिवाळी अंकात संपादकीय सहायक म्हणून काम करायला सुरुवात झाली होती. ‘ पत्रकार ’ ह्या नात्यानं पहिली नोकरी. हल्लीच्या भाषेत सांगायचं तर ‘ कॅम्पस इंटरव्ह्यू ’ मधून निवड झालेली होती माझी. परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधीच. संज्ञापन व वृत्तविद्या विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्र. ना. परांजपे ह्यांचे घरच्या पत्त्यावर कार्ड आले होते - ‘ एका दिवाळी अंकाच्या संपादकांना सहायकाची गरज आहे. तुम्हाला रस असेल तर कार्यालयीन वेळेत भेटायला यावे. ’ (ते पोस्टकार्ड अजून संग्रहात आहे.😅) कसा कोणास ठाऊक, पण प्र. ना. ह्यांचा मी बऱ्यापैकी लाडका विद्यार्थी होतो. त्यामुळेच त्यांना ह्या जागेसाठी माझी आठवण झाली. त्या दिवशी त्यांनी...

दोन रजत कमळांचा ‘अभिजात’ मानकरी ‘अभिजित’

अभिजित दळवी. नगरचा लेखक आणि दिग्दर्शक. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील रजत कमळ दुसऱ्या वेळी त्याला मिळालं. त्याचे अनुभव, नाटक ते चित्रपट दिग्दर्शन हा प्रवास, पुरस्कार ह्याबद्दल त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पा... ----------------------------------- ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती पाहायला मिळणं, आनंद देणारं असतं ना ? की ‘ ॲ वॉर्ड ’ विजेत ी कलाकृती घडविणाऱ्याला पाहायला, त्याच्याशी सहजपणे बोलायला मिळणं आनंददायक ? ह्या दोन्हींमध्ये अधिक सुखद काय ? तसा अधिक-उणे हिशेब नाही मांडता येत. ... ह्यापैकी दुसरा अनुभव गेल्या आठवड्यात घेतला. त्या निर्मात्याची कलाकृती लवकरच पाहायची ठरवलं आहे. म्हणजे मग दुधात साखरच ! कूल... नगरच्या कलाक्षेत्रात अभिजित अरविंद दळवी ह्यानं इतिहास घडवला आहे. खरं म्हणजे त्याने इतिहासाची पुनरावृत्ती केलेली. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या यादीत त्याचं नाव दुसऱ्या वेळी झळकलं आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार एकदा मिळाला तरी कारकीर्द सुफळ झाली, असं मानणारे छोट्या, मोठ्या पडद्यावरचे आणि पडद्यामागचेही बरेच असतात. अभिजित त्यातला नव्हे ! त्यानं चार वर्षांमध्ये दुसऱ्यांदा हे यश मिळ...
html