सोमवार, १५ जुलै, २०२४

... भेटीत तृप्तता मोठी


शेंगा, माउली आणि पेढे... ह्या समान धागा काय बरं!
---------------------------------------------
खरपूस भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा.
‘प्रसिद्ध’ विशेषण लावलेले स्वादिष्ट पेढे.
आणि
संत ज्ञानेश्वरांची सुबक मूर्ती.

... एकाच दिवशी मिळालेल्या ह्या तीन गोष्टींमध्ये समान धागा तो काय असावा? एकदम बरोबर. त्या भेट मिळालेल्या आहेत. आणखी एक गंमत म्हणजे अतिशय प्रेमपूर्वक भेट देणारा आणि ती स्वीकारणाऱ्या दोघांचं नावही एकच - सतीश. पहिला कळंबचा नि दुसरा नगरचा. त्यांच्यातले समान दुवे पुन्हा तीन - पत्रकारिता, मराठवाडा आणि 
‘लोकसत्ता’.

कळंब येथील पत्रकार सतीश टोणगे ह्याच्याशी माझी ‘ओळख’ फार वर्षांपूर्वीची. ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’च्या छोट्या संघात कळंबचा वार्ताहर म्हणून तो साधारण २००६/
७च्या सुमारास सहभागी झाला. त्यानंतरच्या सोळा-सतरा वर्षांच्या काळात आम्ही शेकडो वेळा फोनवरून बोललो असू.

थेट भेट शनिवारी झाली. आमची पहिलीच भेट. ती धाराशिवमध्ये. कळंबपासून ६० किलोमीटर आणि नगरपासून २०० किलोमीटर दूरवर. आता फेसबुकवर जोडलो गेलो आहोत म्हणून ठीक; नसता एकमेकांना ‘तोंडदेखलं’ ओळखणंही आम्हाला मुश्कील होतं. सतीशचे मोठे भाऊ, भावजय, पुतणे, पत्नी... ह्या सर्वांची एकाहून अधिक वेळा भेट झालेली. आम्हांलाच एकमेकांना पाहण्यासाठी दीर्घ वाट पाहावी लागली!

सतीशचे दोन पुतणे प्रवरानगरच्या पब्लिक स्कूलचे विद्यार्थी. लेकरांना भेटायच्या ओढीपायी त्यांचे वडील, अर्थात सतीशचे मोठे बंधू (त्यांना मी ‘वकीलसाहेब’ म्हणत होतो; प्रत्यक्षात ते एंजिनीअर असल्याचा उलगडा काल झाला! ), त्यांची पत्नी महिन्या-दीड महिन्याने कळंबहून प्रवरानगरला जात. मग सतीश त्यांच्याबरोबर माझ्यासाठी खास गावाकडची भाजी पाठवत असे. दोन पिशव्या भरून. पालेभाज्या, फळभाज्या आणि हिर्व्यागार तिखटजाळ मिरच्या.  मला काकवी आवडते, हे कळल्यावर दोन-तीन वेळा तीही पोहोच झाली. 

‘काकवी? म्हणजे काय?... हां, हां सर... आमच्याकडे त्याला ‘पाक’ म्हणतात,’ पहिल्यांदा विचारल्यावर सतीश हसत हसत म्हणाला होता. ‘पाक होय! इकडं काय फार कुणी आवडीनं खात नाही. पाठवतो की तुम्हाला...’
कदाचित ह्या ‘पाका’मुळेच आमचे संबंध अधिक घट्ट आणि तेवढेच गोड झाले असावेत!

धाराशिवमध्ये शनिवारी दुपारी भेटल्यावर पुतण्याला समोर बोलावून सतीशनं सुरुवात केली, ‘‘सरांचा फोन यायचा. झापायला सुरुवात करायचे...’’ नशिबाला बोल लावला! म्हटलं ह्या पठ्ठ्यानं एवढ्या वर्षांतलं नेमकं तेवढंच लक्षात ठेवलेलं दिसतंय. पण पुढे मग तो म्हणाला, ‘‘त्यामुळंच मला वेगळं पाहायची-लिहायची सवय लागली.’’

कळंबच्या बाजारातून टपोरी, पांढरीशुभ्र ज्वारी घेऊन माझ्या घरी पोहोचविण्याची जबाबदारी घेतलेला त्याचा सहायकही ह्या संवादाला साक्ष आहे. ह्या मित्राचे आजोळ नगरच्या माळीवाड्यात.

कळंबसारख्या तुलनेने छोट्या गावात राहून सतीशनं उच्चशिक्षण घेतलंय. तो व्यवसाय करतो आहे. ह्या सगळ्यात तो वाचन, पत्रकारिता ह्याची विलक्षण आवड टिकवून आहे. वेगळं काही लिहिलं पाहिजे, हा त्याचा नेहमीचा आग्रह आहे.

भाऊ-भावजय प्रवरानगरला निघत, त्याच्या आदल्या दिवशी सतीश विचारून आणि त्यानुसार पिशव्या भरभरून भाज्या पाठवत राहिला. त्या भाज्यांचे पैसे किती नि कसे द्यायचे? खूप आग्रह केल्यावर सतीश एकदा म्हणाला, ‘‘त्या भाजीचे कसले पैसे हो... तुम्हाला लईच वाटत असेल तर पुस्तकं द्या पाठवून. इथं चांगली चांगली मिळत नाहीत...’’

लोकसभेच्या २००९च्या निवडणुकीत ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’चं शेवटचं पान वेगवेगळ्या सदरांसाठी राखून ठेवलं होतं. त्यात प्रामुख्याने वाचकांचा सहभाग होता.

एके दिवशी पाहिलं तर सतीशच्या पत्नीच्या नावाने मजकूर आला होता. त्याला फोन लावला आणि विचारलं, ‘‘खरंच वहिनींनी लिहिलंय की, तूच हाणलं आहेस त्यांच्या नावानं?’’

नेहमीच आर्जवानं बोलणारा सतीश ते ऐकून अधिकच मवाळ झाला. म्हणाला, ‘‘मी कशाला लिहू हो सर तिच्या नावानं? ती चांगली शिकलेलीय... एम. एस्सी. झालेली आहे की.’’

एरवीही सतीशचं बोलणं विश्वास ठेवण्यासारखंच. त्या दिवशीच्या प्रश्नानं तो किंचित दुखावला असणार. शंका नाही.  त्या दिवशी तो मजकूर अर्थातच प्रसिद्ध झाला. वार्ताहराच्या घरचा माणूस ही जशी पात्रता ठरत नाही, तशीच ती अपात्रताही असत नाही!

जेवढा काळ वार्ताहर होता, तेवढ्या काळात सतीशनं वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिल्या. आपण निवडलेला विषय ‘लोकसत्ता-मराठवाडा वृत्तान्त’च्या दर्जाला साजेसा आहे का नाही, ह्याची त्याला फार काळजी असे. तशी थोडी जरी शंका त्याच्या मनात आली की, लगेच फोन करून विचारत असे. अमूक एखादी बातमी प्रसिद्ध झालीच पाहिजे, असा आग्रह त्यानं कधी धरलेला आठवत नाही. बातमी प्रसिद्ध झाली नाही, ह्याचा अर्थ आपणच कोठे तरी कमी पडलो, असं तो मानत असावा.

येरमाळ्याच्या येडेश्वरी देवीची यात्रा म्हणजे भूम-कळंब-येरमाळा परिसरातील मोठा उत्सव. सतीशला ‘हद्दीची काळजी’ पोलिसांपेक्षा अधिक! येडेश्वरीच्या यात्रेची बातमी कळंबवरून कशी द्यावी? कारण ते आपल्या हद्दीत नाही. पण ती आपल्या वाचकांना वाचायलाही मिळालीच पाहिजे. त्यानं त्याच्या घाबरल्या स्वरातच बातमी देऊ की नको विचारलं. होकार मिळताच मग खुलून दणकेबाज बातमी दिली.

प्रसिद्ध लेखक प्राचार्य भास्कर चंदनशिव ह्यांनी एक वर्ष ‘संवाद’ सदरासाठी लेखन केलं. त्या वर्षभरातील दर आठवड्याला सदराचा लेख व्यवस्थित पोहोचतो की नाही, ह्याची काळजी सतीशनं घेतली. त्या सदराचं पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्याची प्रत मला पोहोच होईल, हे आवर्जून पाहिलं.

‘लोकसत्ता’नं निर्णय घेतला आणि लहान व मध्यम तालुक्याच्या वार्ताहरांचं काम थांबविण्यात आलं. त्याचं प्रचंड दुःख झालेले वार्ताहर प्रामुख्याने दोन - सतीश टोणगे आणि लोह्याचा हरिहर धुतमल. ‘काही दोष नसतानाही आपली लिहिण्याची संधी जाते’, ह्याचं त्यांना फार वाईट वाटलेलं. ती खंत दोघांच्या बोलण्यांतून आजही जाणवते. अर्थात मी दोघांशीही नियमित संपर्कात आहेच.

... तर अशा सतीश टोणगे ह्या आर्जवी, उत्साही पत्रकारमित्राशी ओळख झाल्यापासून दीड दशकानंतंर पहिली भेट झाली. नात्यातल्या लग्नानंतर मला नगरला परत निघायचं होतं. माझी बस चुकू नये म्हणून तो बरोबर साडेबाराच्या ठोक्याला आला.

कार्यालयात सतीश मला नि मी त्याला शोधत होतो; नजरानजर झाली आणि आम्ही ओळखलं एकमेकांना! 
मग खास मऱ्हाटवाडी पद्धतीनं ‘दर्शन’ घेत त्यानं मला संकोचित आणि (शारीरिकदृष्ट्या संकुचितही!) केलं.


सतीशनं टोपी घातली, शाल पांघरली
आणि पुस्तकही भेट दिलं!

---------------------------------------------
पाच-दहा मिनिटं झाल्यावर सतीश म्हणाला, ‘‘चला सर, सत्कार करू.’’ हेही पुन्हा खास मराठवाडी अगत्य. त्यानिमित्तानं  त्याच्यासारख्या सरळ माणसानं मला टोपी घातली! मग खास शाल. कळंबचे प्रसिद्ध पेढे. आणि रंगबिरंगी चमकदार कागदात गुंडाळेली खास भेटवस्तू. मला ती आवडते की नाही, ह्याची त्याच्या मनात शंका. ती त्यानं थेट विचारलीही. सोबत दोन पुस्तकं. सतीशच्या नावावर दोन पुस्तकंही आहेत आता!

सतीशचा पुतण्या पुण्यात शिकायला आला, तेव्हा आमची भेट झाली. ती त्याच्या एका तपानंतरही लक्षात राहिली. समर्थला भेट म्हणून दिलेलं एक पुस्तक त्याला कालही आठवलं.

गप्पा संपत नव्हत्या. निघताना सतीशनं हातात आणखी एक प्लास्टिकची पिशवी दिली. ‘‘काही नाही सर... भाजलेल्या शेंगा आहेत. तुम्हाला गाडीत खायला होतील. वांगी आणावीत म्हटलं होतं...’’

भूमच्या घाटातलं पावसाळी वातावरण त्या शेंगांना न्याय देणारं होतं खरं तर. पण तुळजापूर-नगर बसमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे त्या खाता आल्या नाहीत. नगरमुक्कामी पोहोचल्यावर त्या खाल्ल्या.

टोपी, ती खास शाल, श्रीफळ, ते पेढे, ती पुस्तकं, त्या शेंगा आणि माउलींची ती मूर्ती... ह्या सगळ्यांमधलं आणखी एक आणि सर्वांत मोलाचा समान धागा सांगायचा राहिलाच की.

त्या सगळ्या गोष्टींमधून सतीशचं प्रेम एखाद्या नितळ, निखळ झऱ्यासारखं वाहत होतं. त्या साऱ्या वस्तूंमध्ये विलक्षण आपुलकीची, प्रेमाची असलेली ऊब मला आताही हे लिहिताना जाणवत आहे.
.........
#भेट #कळंब #नगर #सतीश_टोणगे #लोकसत्ता #मराठवाडा_वृत्तान्त #भुईमुगाच्या_शेंगा #प्रवरानगर #सतीश 

१९ टिप्पण्या:

  1. लेख मैत्री दिनाच्या निमित्ताने लिहिला आहे असं वाटलं. मोजक्या शब्दांत छान मांडलंत.‌ हल्ली चांगले मित्र मिळाले तर नशीबवान आहोत असं म्हणायचं. नवीन तंत्र युगात माणूस हा कमी महत्त्व असलेला आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी इतका वेळ न मिळाल्याने तो प्रश्नही अनुत्तरित लोंबकळत पडलेला असतो. मैत्र जुळले तर एक आत्मिक समाधान लाभते हे मात्र नक्की - राजेंद्र सहस्रबुद्धे

    उत्तर द्याहटवा
  2. उत्तम, भारी, आठवड्याची सुरवात चांगलं वाचून झाली.
    👍👍🙏🙏
    - गणाधीश प्रभुदेसाई, पुणे

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम शब्दचित्र! केवळ शब्दांतून माणूस उभा करणं... सोपं नाही.

    पत्रकारिता म्हणजे थँकलेस जॉब. अशी माणसं जोडत जाणं हीच हाडाच्या पत्रकाराची खरी श्रीमंती. ह्या अर्थानं ‘सतीश स. कुलकर्णी’ किमान अब्जाधीश तरी नक्कीच!
    - मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली

    उत्तर द्याहटवा
  4. तुमची लोकसंग्राहक वृत्ती हाच तो समान धागा!
    - डॉ. विद्याधर देसाई, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  5. 🙏🙏🙏
    संवेदनशील आणि भावपूर्ण.
    - निरंजन आगाशे, पुणे

    उत्तर द्याहटवा
  6. 🙏 मस्त... सतीशची कहाणी सतीशकडूनच! 🙏🙏
    - श्रीराम जोशी, नगर

    उत्तर द्याहटवा
  7. लेखन आवडलं. वेगळा विषय.
    - विजय ना. कापडी, गोवा

    उत्तर द्याहटवा
  8. किती लक्षात ठेवता तुम्ही माणसाला! बारीक सारीक तपशिलासह. खूप आवडला लेख...
    - इंद्रजित भालेराव, परभणी

    उत्तर द्याहटवा
  9. हृदयस्पर्शी नातं आणि लेखनही. 🙏
    - अनिल पवार, पुणे

    उत्तर द्याहटवा
  10. अतिशय सुंदर लिहिलंयत.
    - लीना पाटणकर, पुणे

    उत्तर द्याहटवा
  11. फारच सुंदर...

    मित्र ही माणसाच्या आयुष्यातील एक सुखद जागा असते. परंतु अलीकडे अशी मैत्री दुर्मिळ होत चालली आहे.
    - प्रा.डॉ. राजेंद्र सलालकर, लोणी

    उत्तर द्याहटवा
  12. सतीशसारखी माणसं आपल्या अवतीभवती असतात. पण तुमच्यासारख्या संवेदनशील मनाला ती गवसतात,जपता येतात. कधीही न पाहिलेल्या सतीशला तुम्ही भेटवलंत!

    पाकाला ‘काकवी’ म्हणतात, हे पुस्तकात वाचून, पुणेकरांकडून ठाऊक झालं आम्हाला पण! आम्ही अजूनही ‘पाक’च म्हणतो.

    हरीचा ओझरता उल्लेखही खूप भावला. गुणी पत्रकार हरी. खूप दिवसांनी खिडकीतून दुनिया बघायला मिळाली.
    - व्यंकटेश चौधरी, नांदेड

    उत्तर द्याहटवा
  13. खूप छान लिहिलंय! प्रेमळ आणि प्रांजळ... 👍🌹
    - प्रल्हाद जाधव, मुंबई

    उत्तर द्याहटवा
  14. खूप खूप सुंदर लिखाण!!

    ऋणानुबंधावर एवढा दीर्घ लेख लिहिला आहे म्हणजे ऋणानुंबध तेवढेच दृढ असणार.
    - छाया बेले, नांदेड

    उत्तर द्याहटवा
  15. उत्तम शब्दचित्र. हे रेखाचित्र नसून, ‘हाय डेफिनेशन’चा रंगीत फोटो आहे. 👍
    - डॉ. हेली दळवी, पुणे/मुंबई

    उत्तर द्याहटवा
  16. छान लिहिलेय सतीश सर.मराठवाडा आवृत्तीच्या आठवणी ताज्या झाल्या.

    उत्तर द्याहटवा
  17. दोन सतीश ना एकमेकांची भेट झाल्यावर
    ईश भेटल्या प्रमाणे आनंद झाला असावा...🌹🌹💐💐

    उत्तर द्याहटवा
  18. वा, सर सुंदर लिहिलं आहे!

    ‘लोकसत्ता’ने तालुका वार्ताहरांची पदे रद्द केल्यानंतर मीही नाराज झालो होतो.

    तुमचं रागावणं हेच सर्व बातमीदारांच्या लक्षात राहण्यासारखं आहे, सर! कारण तुमच्या रागावण्यामुळे आम्हाला चांगलं आणि वेगळं लिहायची सवय लागली!!

    खरंच हो सर, खूप सुधारणा झाल्या तुमच्या रागावण्यामुळे. त्याचे आम्हाला कोणाला कधीच वाईट वाटले नाही.
    - ज्ञानोबा सुरवसे, परळी वैजनाथ

    उत्तर द्याहटवा

तृप्त, कृतज्ञ आणि चिंब!

सूर्यकुमार यादव, रिंकूसिंह ह्यांच्या 360 degree फलंदाजीची आठवण करून देतो आहे वडोदऱ्यातला पाऊस.  🌧️☔️ जोर धरून आहे बुधवारी सकाळपासून. मन्ना ...