राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा नगरच्या वाडिया पार्क मैदानावर रंगली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात फुललेली प्रेक्षक गॅलरी. |
नगरच्या न्यू आर्ट्स मैदानाच्या प्रशस्त मैदानावर निमंत्रित संघांची स्पर्धा रंगली होती. त्यासाठी प्रसिद्ध खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर आल्या होत्या. त्यांची मी ‘केसरी’साठी मुलाखत मिळवली. मनमोकळेपणाने बोलल्या त्या. ‘मुलाखत प्रसिद्ध झालेला अंक पाठव बरं का,’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं होतं.
आशियाई स्पर्धेत कबड्डीचा नुकताच समावेश झाला होता. त्याचा संदर्भ देत शकुंतला खटावरकर ह्यांनी भविष्याचं चित्र रंगवलं होतं - ‘आंतरराष्ट्रीय खेळ झाला म्हणजे कबड्डी आता मॅटवर खेळावी लागेल. पायात बूट-मोजे घालावे लागतील. जपानी, कोरियाई खेळाडू लवचीक असतात. त्यांचं तंत्र पाहून आपल्यालाही खेळात बदल करावा लागेल. तरच आशियाई स्पर्धेत आपल्याला सुवर्णपदक राखता येईल...’ असं बरंच काही त्या म्हणाल्या होत्या.
नगरची स्पर्धा मॅटवर खेळली जात आहे. शकुंतला खटावकर ह्यांनी तीस वर्षांपू्वी हे स्वप्न पाहिलं होतं. |
मॅटवर खेळायचं असल्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या पायात आधुनिक ‘स्पोर्ट्स शूज’ आहेत. ‘टाईम आऊट’, बदली खेळाडू, बाद झालेल्या व राखीव खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या अशा सोयी दिसतात. (त्यावरून आठवण झाली ती मुकुंदराव आंबर्डेकर ह्यांची. नगरला झालेल्या पुणे विद्यापीठ आंतरविभाग खो-खो स्पर्धेच्या वेळी त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली होती. राखीव आणि बाद खेळाडूंना बसण्यासाठी खुर्च्या हव्यात, असं त्यांचं आग्रही म्हणणं होतं. हे तरुण खेळाडू मैदानाच्या बाजूला उकीडवे बसतात, ते कसं तरीच दिसतं, अशी त्यांची मल्लीनाथी होती!)
करता अंगत-पंगत, वाढते जेवणाची लज्जत... चविष्ट जेवणाचा स्वाद घेणाऱ्या महिला खेळाडू. |
मॅटवरची ही पहिली राज्य अजिंक्यपद स्पर्धा म्हणतात खरं; पण वाटतं की, सांगलीच्या तरुण भारत व्यायाम मंडळानं २०१२मध्ये आयोजित केलेली राज्य स्पर्धा मॅटवर झाली होती. तशी बातमी मी दिली होती. मॅटवरच्या खेळाची वैशिष्ट्यं सांगणारी अर्जुन पुरस्कारविजेता पंकज शिरसाट ह्याची चौकट त्या बातमीत होती. नेमकं आता त्याचं कात्रण सापडत नाही. असो! पण तरीही कबड्डी मॅटवर आल्याचं श्रेय आशियाई क्रीडा स्पर्धेपेक्षा प्रो-कबड्डीलाच द्यावं लागेल, हे नक्की!
पूर्वी रणजी करंडकातील क्रिकेट सामने मोठी गर्दी खेचणारे असत. दोन्ही संघात कोण कोण कसोटीपटू आहेत, ह्याची चर्चा होई. आता राज्य कबड्डी स्पर्धेतील सामने पाहताना प्रेक्षक एकमेकांना सांगत असतात की, ह्या संघातला अमका तमका प्रो-कबड्डीत खेळतो; त्या संघात प्रो-कबड्डी खेळणारे तिघे आहेत. कबड्डीलाही ‘प्रो-ग्लॅमर’ आलं आहे तर...
राज्य अजिंक्यपद स्पर्धा वाडिया पार्कवर चाललीय. ह्या आधी पहिल्यांदा १९९७मध्ये कुमार-कुमारी गटाची राज्य स्पर्धा तिथे रंगली होती. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेलं वाडिया पार्कचं प्रशस्त मैदान फक्त क्रिकेटसाठी राखीव असू नये, तिथं अन्य खेळांच्या स्पर्धाही व्हाव्यात, म्हणून तेव्हा लेखणी झिजवत होतो. त्यामुळेच तिथे खो-खो आणि कबड्डी ह्या देशी खेळांच्या राज्य स्पर्धा झाल्या.
‘छत्रपती’, ‘अर्जुन’ आणि ‘पद्मश्री’... स्पर्धास्थळी बुधवारी रात्रीच्या सत्रात निर्मलचंद्र थोरात, शांताराम जाधव आणि पोपट पवार ह्यांच्या गप्पा रंगलेल्या पाहायला मिळाल्या |
पण बघता बघता नगरचा केंद्रबिंदू पुढे सरकलाय. वाडिया पार्क आता तेवढं मध्यवर्ती राहिलेलं नसावं, प्रेक्षकांना ते तेवढं सोयीचं वाटत नसावं, असं उद्घाटनाच्या दिवशी असलेली गर्दी पाहून वाटलं. हे चित्र दुसऱ्या दिवशी बदललं. बुधवारी संध्याकाळी पश्चिमेकडची प्रेक्षक दीर्घा ओसंडून वाहत होती. पूर्वेकडेही चांगली गर्दी होती. ही गर्दी राहिलेल्या दोन दिवसांत वाढत जाईल, अशी आशा आहे.
पुरुष व महिलांचे प्रत्येकी दोन डझन संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. नगरकरांना एकच औत्सुक्य आहे, यजमान संघ विजेतेपद कायम राखणार का? महाराष्ट्राचं कर्णधारपद भूषविणाऱ्या शंकर गदई ह्याच्या नेतृत्वाखाली नगरचा संघ भिवंडीतील कामगिरीची पुनरावृत्ती करील, असं नगरकरांना मनापासून वाटतंय. त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राहुल खाटीक, आदित्य शिंदे, राहुल धनवड सर्व ताकद पणाला लावूनच खेळतील. गटातले तिन्ही सामने जिंकून नगरने बाद फेरी गाठली आहेच.
सोलापूर संघाचं आव्हान यजमान नगरनं गटात सहज मोडून काढलं. |
उपान्त्यपूर्व फेरीचे सामने गुरुवारी रंगतील आणि रात्रीच्या सत्रात चित्र स्पष्ट होईल. स्पर्धेचा शेवटचा दिवस - शुक्रवार - सर्वच संघांसाठी ‘जिंका किंवा घरी जा’ असा असणार आहे. नगरकर विजेतेपद राखण्यात यशस्वी होतात का आणि किती दिमाखात ही कामगिरी करतात, हे पाहायला मजा येणार आहे.
#कबड्डी #कबड्डी_स्पर्धा #राज्य_अजिंक्यपद #नगर #वाडिया_पार्क #प्रो_कबड्डी #मॅटवर_कबड्डी
-------------------------------------
नगरच्या विजेतेपदाची कहाणी वाचा इथे - भिवंडीत घुमला नगरचा दम
https://khidaki.blogspot.com/2022/03/Nagarkabaddi.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा