Saturday 14 January 2023

विजयी सलामी


पेनल्टी कॉर्नर आणि गोल. पहिला गोल केल्याचा आनंद
उपकर्णधार अमित रोहिदासच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहतो आहे.
(छायाचित्र सौजन्य - https://www.fih.hockey)

खरोखर आहे की नाही, माहीत नाही; पण बहुसंख्य भारतीयांसाठी ‘आपला राष्ट्रीय खेळ’ अशीच हॉकीची ओळख आहे. त्याच खेळाच्या विश्वचषक स्पर्धेस ओडिशामध्ये सुरुवात झाली आहे. पाच वर्षांच्या खंडानंतर (धन्यवाद कोविड!) होणाऱ्या ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे ओडिशामध्ये होणारी ही सलग दुसरी स्पर्धा. स्पर्धेचं गुरुवारी उद्घाटन झालं आणि आजपासून लढतींना सुरुवात झाली.

‘अ’ आणि ‘ड’ गटातील प्रत्येकी दोन सामने आज झाले. दोन सामने मोठ्या गोलफरकाचे आणि दोन गोलफलकावरून चुरशीचे झाल्याचे वाटावेत, असे. गंमतीची गोष्ट म्हणजे चारही सामन्यांतील विजयी संघांनी प्रतिस्पर्ध्यांना आपल्याविरुद्ध गोल करण्याची संधी दिली नाही. 

‘ड’ गटात यजमानांनी विजयी सलामी दिली. दिवसातला हा शेवटचा सामना. ऑलिंपिकमधलं पदक आपण दीर्घ काळानंतर टोक्योमध्ये जिंकलं आणि हॉकी पुन्हा एकदा आकर्षणाचा विषय झाली. राऊरकेला इथल्या बिरसा मुंडा क्रीडागारात भारतीय संघानं अपेक्षांना तडा दिला नाही. एरवी सातत्याने त्रासदायक ठरणाऱ्या स्पेनचं आव्हान त्यांनी मोडून काढलं. स्पेनच्या आघाडीच्या फळीनं पहिल्याच मिनिटाला भारतीय क्षेत्रात धडक मारली. पण इग्लेसियास अल्वारो ह्यानं मारलेला फटका गोलजाळ्याच्या आसपासही गेला नाही.

भारतीय संघ लगेच सावरला. त्याच्या परिणामी बाराव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीत सिंगला ती संधी साधता आली नाही म्हणून फार काही बिघडलं नाही. कारण लगेचच पुढचा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि अमित रोहिदास ह्यानं नेत्रदीपक गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. विश्वचषक स्पर्धेतला हा भारताचा द्विशतकी गोल होता! त्याचे मानकरी होते अमित आणि नीलम संजीप एक्सेस. हे दोघंही ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यातले. ‘भूमिपुत्रांनी’ केलेल्या ह्या कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या उत्साहाला उधाण आलं नसतं तरच नवल!

त्यानंतर चौदाव्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. नीलकांत शर्माचा तो प्रयत्न फसला. स्पेनच्या आघाडीच्या फळीनं विसाव्या मिनिटानंतर  जोरदार आक्रमण सुरू केलं. त्याचा फारसा उपयो झाला नाही. त्यांना पंचविसाव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पाऊ कनिल ह्यानं मारलेला जोरदार फटका गोलरक्षक क्रिशनबहादूर पाठक ह्यानं अप्रतिम झेप घेत अडवला. त्यामुळं उत्साहात आलेल्या आपल्या आघाडीच्या फळीनं डाव्या बगलेतून मुसंडी मारली. हार्दिक सिंगनं चेंडू घेऊन थेट ‘डी’पर्यंत धाव घेतली. त्यानं डावीकडं असलेल्या ललितकुमार उपाध्यायकडं पास दिला. पण त्याच्या पुढेच उभ्या राहिलेल्या कनिलच्या स्टिकला लागून गोलरक्षक रफी आद्रियन याला चकवत चेंडू गोलजाळ्यात विसावला. आघाडी २-०! त्याच गोलफलकावर पूर्वार्धाची सांगता झाली.

आघाडी मिळाल्यानंतर खेळाडू काहीसे सुस्तावतात. त्याचा परिणाम निकाल बदलण्यात होतो, असं ह्या पूर्वी झाल्याची उदाहरणं आहेत. पण भारतीय संघानं ती ढिलाई उत्तरार्धात दाखवली नाही. उत्तरार्धातली पहिली पंधरा मिनिटं भारताचीच होती. पण गोलसंख्येत भर घालण्यात आपले खेळाडू अपयशी ठरले.


बिरसा मुंडा स्टेडियममधील भारतीय खेळाडूंचा हा जल्लोष
स्पेनवर दुसरा गोल चढविल्यानंतरचा.
(छायाचित्र सौजन्य - विश्वरंजन रौत/‘स्पोर्टस्टार’)

उत्तरार्धाच्या सुरुवातीलाच आघाडी वाढविण्याची मोठी संधी भारताला मिळाली होती. ‘डी’च्या जवळ गेलेला अक्षदीप सिंग फटका मारण्याच्या तयारीत असतानाच स्पॅनिश खेळाडूचा फाऊल झाला. परिणामी सदतिसाव्या मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. कर्णधार हरमनप्रीत ह्याला मात्र ही संधी साधता आली नाही. त्याने गोलजाळ्याच्या डावीकडे तळाला चेंडू ढकलला खरा; पण सजग रफीने तो बरोबर अडवला. हरमनप्रीतने तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्याचा उपयोग झाला नाही. भारताला त्रेचाळिसाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. तोही वाया गेला. पुन्हा एकदा हरमनप्रीतला संधी साधता आली नाही.

सामन्याची अखेरची पंधरा मिनिटं राहिली असताना गोलफरक बदललेला नव्हता. स्पेनचा संघ उसळी मारून येतो की काय, अशी थोडी धास्ती होती. त्यात भर पडली ती फॉरवर्ड अभिषेकच्या निलंबनाने. बोनास्त्रे जोरदी ह्याच्याशी त्याची टक्कर झाली आणि त्याच्यावर दहा मिनिटांच्या निलंबनाची कारवाई झाली. म्हणजे शेवटची दहा मिनिटं भारताला दहा खेळाडूंनिशीच खेळावं लागणार होतं. स्पेनला त्रेपन्नाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. चेंडू गोलजाळ्याकडं फिरकणारसुद्धा नाही, ह्याची पुरेपूर काळजी क्रिशनबहादूर पाठकनं घेतली. त्यानंतर चार मिनिटांनी मिळालेला पेनल्टी कॉर्नरही स्पेनला साधता आला नाही. ललितकुमारनं चेंडूला व्यवस्थित बाहेरची वाट दाखवली. 


सामन्याचा मानकरी - अमित

सामन्याच्या उत्तरार्धात एकाही गोलची नोंद झाली नाही. भारतानं दोन संधी दवडल्या खऱ्या; पण समाधानाची बाब ही की, स्पेनला गोल नोंदवण्याची संधी आपण दिली नाही. ह्या विजयानं आपल्या खात्यात तीन गुण जमा झाले. संघाचा उपकर्णधार आणि बचाव फळीतला महत्त्वाचा खेळाडू अमित रोहिदास ह्या सामन्याचा मानकरी ठरला. घरच्या मैदानावर आपल्या माणसांसमोर मिळालेला हा पुरस्कार त्याच्यासाठी महत्त्वाच. पूर्ण सामनाभर जोरजोरात ओरडून संघाला प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षकांचे, अर्थात आपल्या माणसांचे त्यानं मनापासून आभार मानले.

कांगारूंचा दणदणीत विजय

स्पर्धेतील सलामीची लढत ‘अ’ गटातील अर्जेंटिना व दक्षिण आफ्रिका ह्यांच्यामध्ये झाली. दोन्ही संघ आक्रमक खेळाबद्दल प्रसिद्ध असूनही पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. ही कोंडी फुटली त्रेचाळिसाव्या मिनिटाला. अर्जेंटिनाच्या माईको कसेल्ला ह्यानं फिल्ड गोल केला. ही एका गोलाची आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात त्यांना यश आलं. ह्या गटातलाच दुसरा सामना पूर्ण एकतर्फी झाला. थॉमस ऊर्फ टॉम क्रेग ह्याची हॅटट्रिक आणि जेरेमी हेवार्ड ह्यानंही तीन गोल करून त्याला दिलेली साथ ह्यामुळं कांगारूंनी फ्रान्सचा ८-० असा धुव्वा उडवला. ‘ड’ गटातील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं वेल्स संघावर ५-० असा मोठा विजय मिळवला.

...

(संदर्भ व माहितीचे स्रोत - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, हॉकी इंडिया, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती, स्पोर्ट्स्टार ह्यांची संकेतस्थळे)

...

#हॉकी #विश्वचषक२०२३ #हॉकी_इंडिया #भारतxस्पेन #ओडिशा #बिरसा_मुंडा_स्टेडियम #अमित_रोहिदास #हरमनप्रीत #क्रिशनबहादूर_पाठक #HWC2023


No comments:

Post a Comment

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...