कमी धावसंख्येच्या सामन्यात निर्धाव षट्क एकच. युजवेंद्र चहलची फिरकी पाहुण्यांना ‘पॉवर प्ले’मध्ये खेळता आली नाही. |
निव्वळ चौकार-षट्कारांची आतषबाजी, अफलातून फटके, उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण आणि प्रामुख्याने धावांचा डोंगर ह्यासाठी टी-20 क्रिकेट सामने ओळखले जातात. षट्कामागे साडेआठ धावांची किमान सरासरी असेल, तर सामना पाहायला आलेल्यांना फटकेबाजीचा आनंद मनमुराद लुटता येतो. ‘पैसा वसूल सामना पाहिल्याचा’ आनंद त्यांना मिळतो!
कमी धावसंख्येच्या ह्या सामन्यातही बऱ्याच गमती घडलेल्या दिसतात. थर्ड मॅनलाही जिथं फलंदाज सहज षट्कार मारतात, यष्टिरक्षकाच्या बरोबर डोक्यावरून गेलेल्या चेंडूचा पहिला टप्पा सीमेबाहेर पडतो, असे टी-20 सामने. पण आज दोन्ही संघांमधल्या एकाही फलंदाजाला षट्कार मारता आला नाही. २३९ चेंडूंमध्ये एकही षट्कार नसावा, हा विक्रमच म्हणावा की काय!
तीच गत चौकारांची. ते किती? तर रामाच्या वनवासाच्या वर्षांएवढे - म्हणजे १४. न्यू झीलंडचे सहा नि भारताचे आठ. फलंदाजांचा स्ट्राईक रेट जेवढा अधिक, तेवढा तो धोकेबाज. दीडशे-पावणेदोनशेच्या स्ट्राईक रेटने खेळणारे फलंदाज इथे दिसतात. ह्या सामन्यात शंभरहून अधिक स्ट्राईक रेट फक्त चार फलंदाजांचा दिसला. न्यू झीलंडचा सलामीवीर फिन ॲलन ह्यानं ११ धावा काढल्या १० चेंडूंमध्ये - स्ट्राईक रेट ११०. डावातील सर्वाधिक म्हणजे दोन चौकार त्याचेच होते. पाहुण्यांकडून सर्वाधिक स्ट्राईक रेट राहिला शेवटच्या क्रमांकावरच्या जेकब डफी ह्याचा - २००. तीन चेंडूंमध्ये सहा धावा!
यजमानांकडून शतकी स्ट्राईक रेट असणारे फलंदाज दोन - सलामीचा शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर. दोघे प्रत्येकी नऊ चेंडू खेळले. गिलने ११ धावा केल्या आणि सुंदरने १०.
'स्काय'साठीही आज लिमिट होतं. सामन्यातील सर्वाधिक धावा त्याच्या. पण त्याचा एकमेव चौकार सामन्यातल्याच शेवटच्या चेंडूवर! |
सूर्यकुमार यादव ह्या नावाला अलीकडच्या काळात एक अद्भुत वलय लाभलेलं आहे. त्याच्यासाठी ‘स्काय’ इज द लिमिट! एबीडी ह्याच्यानंतरचा ‘मि. ३६०’ काय आणि कसा खेळेल हे सांगता येत नाही. आज मात्र त्याच्याही बॅटला किवी गोलंदाजांनी लगाम घातला होता. एकतीस चेंडूंमध्ये २६ धावा ही सूर्यकुमारची खेळी सामन्यातील सर्वाधिक धावांची. ह्या तडाखेबाज फलंदाजाने फक्त एक चौकार मारला. तो सामन्यातील शेवटच्या चेंडूवर आणि विजयावर शिक्कामोर्तब करणारा! भारताच्या डावात चौकारांमध्ये किती अंतर होतं? सुंदरनं बारावं षट्क टाकणाऱ्या ग्लेन फिलिप्स ह्याच्या पहिल्याच चेंडूवर शॉर्ट फाईन लेगला स्वीपचा चौकार मिळवला. त्यानंतरचा चौकार मिळण्यासाठी तब्बल ४६ चेंडूंची वाट पाहावी लागली.
लखनौची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देणारी होती, हे नक्की. लॉकी फर्ग्युसन ह्यानं एकोणिसावं (म्हणजे सामन्यातलं एकोणचाळिसावं) षट्क टाकलं. त्यातही चेंडू हवेत वळताना आणि सूर्यकुमार-हार्दिक पंड्या ह्यांना चकवताना दिसला. फिरकी गोलंदाजांनीही मजा केली. एवढ्या कमी धावा होऊनही दोन्ही संघांनी जास्तीत जास्त गोलंदाजांचा वापर केला. पाहुण्यांनी आठ गोलंदाज वापरले. त्यातल्या चौघांनी चार-चार षट्कं टाकली. बाकीचे चौघे एका षट्काचे मानकरी. त्यांच्या मायकेल ब्रेसवेल ह्यानं चार षट्कांत फक्त १३ धावा देताना शुभमन गिल ह्याच्यासारखा मोहरा टिपला. एरवी भारताला त्रास देणाऱ्या मिचेल सँटनर ह्याला फार काही करता आलं नाही. त्याच्या चार षट्कांत वीसच धावा गेल्या, हे खरं. पण त्याला बळी मिळाला नाही. ईश सोढी ह्यानं राहुल त्रिपाठीला बाद केलं. त्याच्या चार षट्कांत सहाच्या सरासरीनं धावा निघाल्या.
यजमानांनी सात गोलंदाज वापरले. दीपक हुड्डाला गोलंदाजी द्यायचं विसरतो म्हणून रोहित शर्मावर टीका होते. त्याच हुड्डा ह्याच्याकडून कर्णधार हार्दिक पंड्यानं आज कोटा पूर्ण करून घेतला. चार षट्कांचा कोटा पूर्ण करणाऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वांत महागडा होतो तो पंड्या. त्याची ६.२५ ही इकॉनॉमी एरवी नावाजली गेली असती.
भारताकडून बळी मिळवता न आलेला गोलंदाज होता शिवम मावी. डावातलं एकोणिसावं षट्क त्याला टाकावं लागलं. आपल्या संघाला गेल्या कैक सामन्यांपासून शेवटून दुसऱ्या षट्काचा जणू शाप लागलेला आहे. तसंच आजही झालं. मावीच्या षट्कात सर्वाधिक ११ धावा फटकावल्या गेल्या!
एवढ्या कमी धावसंख्येचा सामना म्हणजे निर्धाव षट्कांची संख्या बऱ्यापैकी असणार, असं स्वाभाविक वाटतं. तसंही झालेलं नाही. सामन्यात एकच निर्धाव षट्क पडलं. ते टाकणारा होता युजवेंद्र चहल. हे निर्धाव षट्क ‘पॉवर प्ले’मध्ये टाकलं गेलं, ही भलतीच गंमत.
मालिकेचा निकाल अहमदाबादच्या स्टेडियममधील सामना ठरवणार आहे. तिथंही अशीच फिरणारी, फलंदाजांना चकवणारी खेळपट्टी असावी, असं दोन्ही संघांमधील गोलंदाजांना वाटत असणार. तसं होण्याची शक्यता कमीच. कारण बहुसंख्येने प्रेक्षक येतात, ते फलंदाजांनी गोलंदाजांवर गाजवलेली हुकूमत पाहायला.
.......
(दोन्ही छायाचित्रं https://www.espncricinfo.com ह्यांच्या सौजन्यानं.)
.......
#क्रिकेट #टी20_क्रिकेट #भारतxन्यूझीलंड #लखनौ #सूर्यकुमार_यादव #युजवेंद्र_चहल #हार्दिक_पंड्या #फटकेबाजी #चौकार #षट्कार #निर्धाव_षट्क
#cricket #t-20 #india_nz #lucknow #surya #sky #chahal #pandya #boundries #sixers #maiden_over #power_play
#क्रिकेट #टी20_क्रिकेट #भारतxन्यूझीलंड #लखनौ #सूर्यकुमार_यादव #युजवेंद्र_चहल #हार्दिक_पंड्या #फटकेबाजी #चौकार #षट्कार #निर्धाव_षट्क
#cricket #t-20 #india_nz #lucknow #surya #sky #chahal #pandya #boundries #sixers #maiden_over #power_play
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा