Friday 20 January 2023

गोलांच्या पावसाविना विजय

 


जोरदार आक्रमण आणि तेवढ्याच तडफेने बचाव.
डावीकडे सुखजित आणि उजवीकडे अभिषेक.

‘विजयातलं अंतर फार महत्त्वाचं नसतं. लक्षात राहतो तो मिळवलेला जय!’, असं म्हणतात. त्यात तथ्य असलं, तरी ते नेहमीच असत नाही. बऱ्याच वेळा ह्या अंतरानं बराच फरक पडतो. उदाहरणार्थ, विश्वचषक हॉकी स्पर्धेतील ‘ड’ गटातील शेवटच्या साखळी सामन्यातील भारत-वेल्स सामन्याचा निकाल. इंग्लंड आणि भारत ह्यांचे समान गुण असूनही, गोलफरकामुळंच इंग्लंडला गटातलं अव्वल स्थान मिळालं. त्यामुळे त्यांना थेट उपान्त्यपूर्व फेरी गाठता आली. तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला आणखी एक सामना खेळावा नि जिंकावा लागेल.

भुवनेश्वर इथल्या कलिंग हॉकी स्टेडियमध्ये गटातली शेवटची लढत खेळणाऱ्या भारताला गटातलं अव्वल स्थान मिळवायचं तर गोलांचा पाऊस पाडायला हवा होता. वेल्सविरुद्ध संघाला आठ किंवा त्यापेक्षा जास्त गोलफरकाने विजय मिळवणं आवश्यक होतं. सामन्यात आठपेक्षा अधिक गोल केले असते, तर कदाचित आपण गटात पहिल्या क्रमांकावर दिसलो असतो. अशी अजून दोन-तीन समीकरणं मांडली गेली. त्या साऱ्याचं सार एकच होतं - वेल्सविरुद्ध मोठ्या संख्येनं गोल झाले पाहिजेत. आठ किंवा त्याहून अधिक गोलांची अपेक्षा ह्या एकाच सामन्यात असताना, प्रत्यक्षात गोलफलक काय दाखवतो? गटातील तीन सामन्यांत मिळून सहा गोल! इंग्लंडचे आपल्या दीडपट आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि एकच सामना जिंकता आलेल्या स्पेन आपल्यापेक्षा फक्त एकाने कमी.

थेट उपान्त्यपूर्व फेरी गाठायची, हेच दडपण घेऊन भारतीय संघ आज बहुतेक खेळत होता. कर्णधार हरमनप्रीत सिंगला पुन्हा एकदा सूर सापडलाच नाही. त्याचे ड्रॅग फ्लिक दमदार नव्हते. परिणामी पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या संधी हुकल्या. सामन्यातील पहिली वीस मिनिटं साधारण खडाखडीतच गेली. भारताला पहिली संधी मिळाली ती दहाव्या मिनिटाला. नीलकांत शर्मा ह्यानं ‘डी’मध्ये धडक मारली खरी. पण रेनल्ड कॉटरील ह्यानं डाव्या पायानं चेंडूला बाहेरची दिशा दाखवली. सामन्याच्या पहिल्या चतकोरात फारशी आक्रमणं झाली नाही. परिणामी कोणत्याही संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही.


गोलचा आनंद साजरा करणारे भारतीय खेळाडू.
 विवेक सागर, मनजित आणि अमित रोहिदास.

अभिषेक आणि डॅनियल ह्यांच्यात चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात थोडा गोंधळ झाला आणि सोळाव्या मिनिटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. पण हरमनप्रीतच्या ड्रॅग फ्लिकमध्ये दम नसल्याने तो सहज अडवला गेला. सामन्यातला पहिला गोल झाला तो एकविसाव्या मिनिटाला. वेल्श खेळाडू भारताच्या भागात असताना आपल्या खेळाडूंनी प्रतिआआक्रमण केलं. अमित रोहिदासचा पास घेऊन मनदीप खोलवर घुसला. वेल्सच्या बचावफळीतील खेळाडूचा फाऊल झाल्याने पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतचा ड्रॅग फ्लिक अडवणं काही अवघड गेलं नाही. पण धडकून परत आलेल्या चेंडूचा शमशेर सिंगने ताबा घेतला आणि गोलजाळ्याच्या उजव्या कोपऱ्यात चेंडू धाडला. त्यानंतरच्या नऊ मिनिटांत फार काही घडलं नाही आणि त्याच गोलफरकावर मध्यंतर झालं.

उत्तरार्धात भारत किती गोल करणार, ह्याचीच चर्चा विश्रांतीच्या वेळी चालू होती. उत्तरार्धाचा खेळ सुरू होताच दुसऱ्या मिनिटाला गोल झाला. मनदीप व अक्षपदीप ह्यांनी सुरेख चाल रचली. ‘डी’च्या जवळ मनदीप सिंगने चेंडूचा ताबा मिळवला आणि अक्षदीप सिंगला पास दिला. त्यानं अगदी जीव खाऊन मारलेला चेंडू आधी डाव्या खांबावर आदळून मग उजव्या कोपऱ्यात विसावला. पुढच्या तीन मिनिटांनी मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतच्या ड्रॅग फ्लिकचं दुखणं नडलं. सदतिसाव्या मिनिटाला वरुण आणि मनप्रीत ह्यांनी उजव्या बाजूनं रचलेली चाल अपयशी ठरली.

वेल्सच्या गॅरेथ फुरलाँग ह्याला एकोणचाळिसाव्या मिनिटाला ग्रीन कार्ड दाखवण्यात आलं. म्हणजे पुढची दहा मिनिटं वेल्सला दहा खेळाडूंसह खेळावं लागणार होतं. त्याचा फायदा उठवणं भारताला साधलं नाही. गॅरेथ बाहेर पडल्यानंतर पुढच्याच मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. त्यातून काहीच साधलं नाही. पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर करण्यात आलेलं अपयश ठळकपणे जाणवलं.

सामना रटाळ, संथ चालला आहे, असं वाटत असतानाच खळबळजनक अध्यायाला सुरुवात झाली. वेल्स संघाला पहिली संधी मिळाली बेचाळिसाव्या मिनिटाला. जरमनप्रीत सिंगने हवेतला पास चुकीच्या पद्धतीने घेतला. पेनल्टी कॉर्नरची संधी साधत गॅरेथने डाव्या कोपऱ्यात चेंडू मारला. त्यानंतर दोनच मिनिटांनी वेल्स संघाला बरोबरी साधता आली, ती जरमनप्रीतच्या फाऊलमुळे. पेनल्टी कॉर्नरचा पहिला फटका श्रीजेशने अडवला. त्याच्याकडून परत आलेला चेंडू द्रेपर याकोब (ड्रेपर जेकब) ह्यानं नेमका हेरला. त्यानं श्रीजेशच्या डोक्यावरून बरोबर चेंडू मारला. दोन-दोन. बरोबरी! वेल्सचा हा आनंद जेमतेम तीन मिनिटं टिकला. सुखजित सिंगच्या रिटर्न पासवर अक्षदीपनं गोल लगावत संघाला आघाडीवर नेलं. त्यामुळं जोशात आलेल्या भारतीय खेळाडूंनी सत्तेचाळिसाव्या मिनिटाला जोरदार हल्ला केला. सुखजितनं मारलेला फटका थेट गोलरक्षकाकडे केला.

दोन्ही संघांनी त्यानंतरची दहा मिनिटे जोरदार प्रयत्न केले. त्यातून गोलफलक काही बदलला नाही. सामना संपायला दोन मिनिटं बाकी असताना निकराचा प्रयत्न म्हणून वेल्स संघाने गोलरक्षकाऐवजी जादा खेळाडू घेतला. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. गॅरेथची चूक झाल्यानं भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रीतनं ह्या वेळी नावाला जागला. त्याचा सरळ फटका गोलजाळ्यात विसावला, तेव्हा सामना संपायला जेमतेम एकेचाळीस सेकंद बाकी होते. त्याचा हा स्पर्धेतला पहिलाच गोल! उपान्त्यपूर्व फेरीत जाण्यासाठी भारताला आता ‘क्रॉस ओव्हर’मध्ये न्यू झीलंडशी खेळावं लागेल. ‘क’ गटात आज मलेशियाकडून २-३ असा पराभव झाल्यानं न्यू झीलंड तिसऱ्या स्थानावर गेलं. मलेशियाची लढत स्पेनशी होईल.

डझनाहून जास्त!

द नेदरलँडसने ‘क’ गटात अव्वल स्थान नक्की करताना आज अखेरच्या साखळी सामन्यात नवीन विक्रमाची नोंद केली. चिली संघाचा त्यांनी १४-० (मध्यंतर ५-०) असा फडशा पाडला. सामन्यात सर्वाधिक गोल करण्याचा आधीचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. दक्षिण आफ्रिकेत २०१०मध्ये झालेल्या स्पर्धेत कांगारूंनी यजमानांना १२-० हरवलं होतं.


गोलांचा चौकार मारणारा यान्सेन जिप
सामन्याचा मानकरी ठरला.
डच संघासाठी हीरो ठरला यान्सेन जिप. त्यानं चार पेनल्टी कॉर्नरची संधी साधली. सहाव्या मिनिटाला पहिला गोलं करून त्यानं सधी साधली. त्याचा  चौथा गोल चव्वेचाळिसाव्या मिनिटाला झाला. ब्रिंकमन थिएरी ह्यानं तीन गोल करून यान्सेनला मोलाची मदत केली. त्यानं बाविसाव्या व तेविसाव्या मिनिटाला सलग दोन फिल्ड गोल केले. उत्तरार्धात विजेत्यांनी तब्बल नऊ गोल केले. त्यातही ४२, ४४, ४५, ४८ या सात मिनिटांत गोलांचा चौकार लागला. त्यातले तीन फिल्ड गोल होते.

‘क’ आणि ‘ड’ गटांचं चित्र आज स्पष्ट झालं. इंग्लंडनं पहिलं स्थान मिळवताना स्पेनला ४-० असं नमवलं. साखळी सामन्यांत कोणत्याच संघाला इंग्लंडचा बचाव भेदून गोल करणं जमलेलं नाही. ‘अ’ आणि ‘ब’ गटांतील चित्र शुक्रवारी स्पष्ट होईल.

...

(माहिती व छायाचित्रांचा स्रोत - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ, ‘ईएसपीएन’ व ‘स्पोर्टस्टार’ ह्यांची संकेतस्थळं.)

.....

#हॉकी #विश्वचषक२०२३ #हॉकी_इंडिया #भारतxवेल्स #ओडिशा #कलिंग_स्टेडियम #अक्षदीप_सिंग #हरमनप्रीत #गोलविक्रम #नेदरलँड्सxचिली #यान्सेनxजिप #HWC2023

....


No comments:

Post a Comment

थेट भेट ‘अर्जुन’वीरांशी

नगरमध्ये आयोजित पुरुष गटाच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं  अर्जुन पुरस्कारविजेत्या खेळाडूंचं संमेलनच भरलं होतं. त्यातल्या तीन पि...