कर्णधाराकडून महानायकाचे कौतुक |
दुबईत बरोबर ३६४ दिवसांपूर्वी इतिहास घडला होता. विश्वचषकाच्या कोणत्याही लढतीत भारतापुढं नांगी टाकण्याचा पराक्रम पाकिस्तानाच्या खात्यावर सलग बारा वेळा जमा होता. कोविडमुळं वर्षभर पुढं गेलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अव्वल साखळीमध्ये पाकिस्ताननं भारताला दहा गडी राखून हरवत उपान्त्य फेरी गाठली होती. स्पर्धा अखेरच्या टप्प्यात होती. कर्णधार बाबर आजम आणि यष्टिरक्षक महंमद रिजवान ह्यांनी दीडशे धावांचं आव्हान लीलया पेललं होतं.
हा विजय पाकिस्तानसाठी कसा आवश्यक आहे, हे सांगणारा छोटासा व छानसा लेख त्या वेळी ‘द डॉन’ दैनिकात प्रसिद्ध झाला होता. रोहित शर्मा आणि के. एल. राहुल ही सलामीची जोडी तेव्हाही स्वस्तात बाद झाली होती. एक षट्कार आणि एक चौकार ठोकून मोठ्या धावसंख्येचं स्वप्न दाखवणारा सूर्यकुमार यादव दुहेरी धावसंख्येत गेल्यावर बाद झाला होता. तेव्हा लढला तो विराट कोहली. त्याचं अर्धशतक झालं होतं.
वर्षभरापूर्वी विराटचं अर्धशतक बाबर-महंमद जोडीच्या नाबाद अर्धशतकांपुढे व्यर्थ ठरलं होतं. मेलबर्नच्या भव्य स्टेडियमवर ९० हजार प्रेक्षकांच्या साक्षीनं आणि त्यांच्या कल्लोळात विराटनं झळकावलेल्या नाबाद अर्धशतकाची सगळ्या क्रिकेटविश्वाला विशेष दखल घ्यावी लागली. अशक्यप्राय विजय प्रत्यक्षात आणणारी ही खेळी होती. त्यानं नियोजनपूर्वक केलेला खेळ, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याची शेवटपर्यंत ठेवलेली जिगर ह्याची जगभरातल्या माध्यमांना स्वाभाविकपणे दखल घ्यावीच लागली. महानायक ठरला तो आज.
‘द डॉन’च्या ऑनलाईन आवृत्तीत सविस्तर बातमी आहे, ह्या सामन्याची. निकालाच्या वृत्तान्तामध्ये त्यांचा क्रीडासमीक्षक लिहितो - झटपट क्रिकेटच्या विश्वचषकातील एक झकास सामना. त्या लढतीत नायक होते, खलनायक होते, शेवटच्या षट्कातलं नाट्य आणि सगळंच काही होतं. ह्या नायकांमधला महानायक निःसंशयपणे होता विराट कोहली!
हुकुमी अर्धशतकी खेळी |
कोहलीच्या खेळीचं वर्णन ‘ॲन इम्पीरीअस हाफ-सेंच्युरी’, म्हणजे हुकुमी अर्धशतकी खेळी असं करतानाच ‘द डॉन’च्या वृत्तान्तामध्ये म्हटलंय की, निर्णायक चेंडूच्या वेळी अश्विननं दाखवलेला शांतपणा प्रशंसनीय होता. सामन्यातील परमोत्कर्षाचा बिंदू म्हणजे शेवटचं षट्क. दोन्ही संघांसाठी फिरकी गोलंदाज म्हणजे गळ्यातलं लोढणं ठरलं असताना शेवटचं षट्क डावरा फिरकी गोलंदाज महंमद नवाजला देण्यात आलं, अशी टिप्पणीही त्यात आहे.
शेवटच्या षट्काबद्दल बराच वाद झाला. विशेषतः पाकिस्तानी चाहत्यांनी नाना आक्षेप घेतले. पहिला आक्षेप होता नो-बॉल देण्याचा. नंतर फ्री-हिटवरच्या तीन वाईडचा. त्याचाही सविस्तर आढावा वृत्तान्तामध्ये आहे. कोहलीचा त्रिफळा उडाला तो चेंडू ‘फ्री-हिट’ होता. त्यामुळं पंचांनी तो ‘डेड बॉल’ घोषित करण्याचा सवालच नव्हता.
पाकिस्तानमधील अजून एक महत्त्वाचं आणि उर्दूतून प्रसिद्ध होणार दैनिक म्हणजे ‘जंग’. त्यांनी विराटच्या खेळीच्या निमित्तानं तो आणि गंभीर ह्यांच्यातील वादालाच महत्त्व दिलं. त्यांच्या बातमीचं शीर्षक आहे - विराट कोहलीचे गौतम गंभीरला चोख उत्तर! त्यात लिहिलंय की, ह्या अप्रतिम खेळीनं त्यानं अनेक टीकाकारांची तोंडं बंद केली. त्याच बरोबर गौतम गंभीरलाही चोख उत्तर दिलं आहे.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना लढाईचं रूप मिळालं ते आखातातील लढतींमुळे. त्यामुळे आजच्या सामन्याबद्दल संयुक्त अरब अमिरातीसह आखातातील अन्य देशांनाही कमालीचं स्वारस्य होतं. दुबईच्या दोन महत्त्वाच्या दैनिकांनी भारताच्या विजयाच्या बातम्या सविस्तर दिल्या आहेत. ‘गल्फ न्यूज’चे वरिष्ठ सहायक संपादक अश्फाक अहमद लिहितात की, शेवटच्या दोन षट्कांमध्ये भाग्यानं पाकिस्तानची साथ सोडली. त्याचं कारण होतं आक्रमक, विध्वंसक ‘किंग कोहली.’ टी-20 क्रिकेटमधली त्याची ही निःसंशय सर्वोत्तम खेळी होती. बाबर आजम ह्यानं शेवटचं षट्क फिरकी गोलंदाजाला देऊन घोडचूकच केली, असंही ‘गल्फ न्यूज’चं म्हणणं आहे.
‘खलीज टाइम्स’ हे दुबईतून प्रसिद्ध होणारं महत्त्वाचं दैनिक. त्यांच्या बातमीच्या मथळ्यात ‘विराट कोहली, द सुपरमॅन’ असं विशेष कौतुक करण्यात आलं आहे.
ब्रिटिश दैनिकांच्या संकेतस्थळांवरही सामन्याची बातमी ठळकपणे दिसते. ‘द गार्डियन’च्या वृत्तान्तामध्ये कौतुकानं लिहिलंय, कोहलीचा डाव अविस्मरणीय होता. काळाच्या कसोटीवर उतरणारा होता!
सामन्याला कलाटणी मिळाली शेवटच्या षट्कात. चेंडूगणिक विजयाचं पारडं इकडे वा तिकडे झुकत होतं. त्याबद्दल ‘द गार्डियन’चा क्रीडा समीक्षक लिहितो - सारं नाट्य शेवटच्या षट्कातलं. भारताला सहा चेंडूंमध्ये सोळा धावा हव्या होत्या. प्रत्यक्षात महंमद नवाजनं नऊ चेंडू टाकले. फ्री-हिटवर विराटचा त्रिफळा (आणि तीन बाय), षट्कार, नो-बॉल, दोन वाईड, एक झेल, एक यष्टिचित... असं खूप वैविध्य षट्कामध्ये दिसलं. आणि शेवटची धाव निघाल्यावर कोहली हात उंचावत धावत होता.
‘डेली मेल’च्या ‘मेल ऑनलाईन’ सेवेसाठी पॉल न्यूमन लिहितात - पांढऱ्या चेंडूवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांच्या इतिहासात नवीन अध्याय लिहिला गेला. विराट कोहलीमुळं भारताला अत्यंत देदीप्यमान विजय मिळविता आला. सामन्यात भरपूर नाट्य घडलं आणि थोड्या वादविवादाची काळी तीटही लागली. पण सगळं काही संपलं, असं वाटण्याजोग्या विपरीत परिस्थितीत भारतानं विजय खेचून आणला. त्याचं कारण विराट कोहली! विश्वचषक स्पर्धेच्या तोंडावर बहुतेकांना वाटत होतं की, विराटची कामगिरी भूतकाळात जमा झाली. तो संपल्यासारखा आहे. आणि तोच विराट आजच्या नाट्याचं केंद्रस्थान ठरला.
‘विराट कोहली प्लेज वन ऑफ ग्रेट टी-20 वर्ल्ड कप इनिंग्स टू लीड इंडिया टू केऑटिक पाकिस्तान विन’ अशा शीर्षकानं ‘मिरर’चा वृत्तान्त प्रसिद्ध झाला. त्यांचा क्रीडा-समीक्षक हातचं न राखता विराटचं कौतुक करताना लिहितो की, विराटच्या विस्मयजनक खेळीने अशक्यप्राय वाटणारा विजय खेचून आणला. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील आजपर्यंतचा सर्वोत्तम सामना.
‘संडे टाइम्स’लाही विराटचं कौतुक केल्याशिवाय राहावलं नाही. आधुनिक महावीर विराट कोहलीमुळं भारताचा पाकिस्तानवर नाट्यमय विजय, असे तिथले कौतुकाचे बोल आहेत. ‘द टेलिग्राफ’च्या वृत्तान्ताचं शीर्षकही विराटचं कौतुक करताना म्हणतं - Virat Kohli brilliance carries India past Pakistan in instant classic
ही स्पर्धा जिथं होत आहे, त्या ऑस्ट्रेलियाई माध्यमांनीही ह्या अविस्मरणीय खेळीची ठळकपणे दखल घ्यावी, ह्यात आश्चर्य मुळीच नाही. ‘सिडनी मॉर्निंग हेरल्ड’च्या संकेतस्थळावर स्कॉट स्पिट्स लिहितात, विराट कोहलीसारख्या असामान्य दर्जाच्या खेळाडूमुळेच एक उत्तम रंगलेला सामना अविस्मरणीय झाला. पाहा ह्या लढतीत काय झालं ते, शेवटच्या आठ चेंडूंमध्ये तीन षट्कार, दोन गडी बाद, एक नो-बॉल, दोन वाईड, चेंडू यष्ट्यांना लागल्यावर तीन बाय...अफलातून, चमत्कारिक!
‘न्यूज.कॉम.ऑ’ संकेतस्थळाचा मथळा आहे - विराटने एमसीजीवर चमत्कार घडवला!!
आधुनिक जगात क्रिया-प्रतिक्रियांचा पाऊस पाहायचा असेल, तर ‘ट्विटर’वर चक्कर मारणं आवश्यकच असतं. पाकिस्ताननं चालवलेला हॅशटॅग भारतीयांच्या प्रतिक्रियांमध्ये वाहून गेला. प्रसिद्ध समालोचक-समीक्षक हर्ष भोगले लिहितात की, मी विराटला खूप वर्षांपासून पाहतोय. त्याच्या डोळ्यांत कधीही अश्रू दिसले नाहीत. मी ते आज पाहिले!
अगदी खरंय. विराटनं आज कोट्यवधी भारतीयांना, क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांत पाणी आणलं - आनंदाश्रू होते ते.
.....
#टी20 #टी20_विश्वचषक #भारतxपाकिस्तान #विराट_कोहली #महानायक #आयसीसी #माध्यमे #परदेशी_माध्यमे #खलीज_टाइम्स #द_डॉन #द_गार्डियन #परदेशी_माध्यमे_कोहली
#T20WC #Ind_Pak #SuperHero #Virat_Kohli #Khaleej_Times #Gulf_News #Mirror
.....
(छायाचित्रं विविध संकेतस्थळं व ट्विटर ह्यांच्याकडून साभार)
.....
सोबतच विराटच्या खेळीबद्दल वाचा -
https://khidaki.blogspot.com/2022/10/Virat22.html
आंतरराष्ट्रीय माध्यमांचा धांडोळा घेऊन खूप छान समीक्षा मांडलीत. असं मी काहीदा लोकसत्तामध्ये वाचलंय. विषय वेगळा. कदाचित तेही आपणच लिहीत असाल!
उत्तर द्याहटवासामना बघितला होता. तरीही आधीचा लेख वाचताना पुन्हा हायलाईटस पाहतोय असं वाटलं. तुमची लेखणी खूपच संवादी आहे. ती वाचकांशी बोलते.
आवडीने वाचतो जेव्हा जमेल तेव्हा. वास्तुविशारद खूप आवडलं. मी जरा उशिराच टीव्हीपुढे हजर झालो होतो. पण सुरुवातीला राष्ट्रगीताच्या प्रसंगांचे वर्णन संध्याकाळी फिरायला (!) गेल्यावर एका मित्राने सांगितले होते.
कोहली हेच एक विशेषण होईल भविष्यात!