![]() |
‘सोल्जर्स डिफेन्स एकेडमी’मधील ध्वजवंदन. |
पंधरा ऑगस्ट! त्याचा उत्साह जाणवणारा असतोच एरवीही. चौक सजतात. कर्ण्यांवर ‘मेरे देश की धरती...’, ‘हम जियेंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए...’ ही आणि अशी गाणी ऐकू येत असतात. रेडिओ चालूच असतो. त्यावरही आठवडाभर देशभक्तिपर गाणी ऐकू येत असतात. यंदाचा उत्साह किती तरी अधिक. खूप आधीपासून दिसणारा, खुणावणारा, अंगात वेगळंच रसायन भिनवणारा.
ध्वजवंदनाला गेलो नाही, त्याला किती वर्षं झाली? आठवत होतो मागच्या आठवड्यात. मोजली नाहीत. कामाच्या वेळापत्रकामुळं अवेळी झोपायची नि अवेळी उठायची सवय लागलेली. ठरवूनही आणि गजर लावूनही सकाळी ठरल्या वेळी उठणं आणि आवरणं व्हायचं नाही. मग स्वाभाविकच चिडचिड. असे बरेच स्वातंत्र्यदिन नि प्रजासत्ताकदिन हुकले. मग दिवसभरात कुठल्या ना कुठल्या शाळेवर, सरकारी इमारतीवर, चौकातल्या तरुण मंडळाच्या मंडपावर डौलात फडकणारा तिरंगा दिसायचा. तो ओशाळेपणा पुन्हा जागा व्हायचा.
एरवी रस्त्यानं जाताना एखाद्या शाळेत प्रार्थना नि राष्ट्रगीत चालू असलेलं ऐकायला आलं की, आपोआप थांबतो. पाय जुळवून पावलांमध्ये पंचेचाळीस अंशांचा कोन, हात सरळ नि मुठी वळलेल्या. किती वेळ थांबावं लागतं? फार फार तर ५२ सेकंद. असं अचानक थांबल्याचं पाहून रस्त्याने जाणारे-येणारे काही जण थोडं आश्चर्यानं बघतात. काही जण थांबतात. शाळेला उशीर झाला असलेले विद्यार्थी धावत-पळत असतात. पण ‘जन गण मन...’ ऐकू आलं की, अर्जंट ब्रेक लावल्यासारखी तोल संभाळत थांबतात. जागेवरच. ‘सावधान’मध्ये!
टीव्ही.वर अधिकृत सरकारी कार्यक्रमाचं थेट प्रसारण असलं की, राष्ट्रगीताचा समावेश असतोच. मंत्रिमंडळाचा शपथविधी, विस्तार असला की, कार्यक्रमाची सुरुवात नि शेवट त्यानंच होतो. कितीही लोळत पडून पाहत असलो, तरी लष्करी बँडच्या सुरावटीवर राष्ट्रगीत वाजू लागताक्षणी ताठ उभं राहतो. डोळे बंद करतो. असं खूप जण करत असतील... माझ्यासारखं सांगत नसतील, एवढंच!
सैन्यदलाच्या सायकलिंग संघाचं प्रशिक्षण नगरमध्ये होतं. बऱ्याच वर्षांपासून. त्या संघाचे मुख्य प्रशिक्षक होते सुभेदार सुमेरसिंग. (खरं तर आधी त्यांचं नाव ‘सुमेरसिंह’ असंच लिहीत होतो. कारण पंजाबी असेल तर ‘सिंग’ आणि हरयाणवी, राजस्तानी, उत्तर प्रदेशी असेल तर ‘सिंह’, अशी वृत्तपत्रीय सवय भिनलेली. पण सुमेरसरांचा आग्रह ‘सिंग’ असंच म्हणा, लिहा.) त्यांनी अलीकडंच निवृत्ती स्वीकारली आणि सैन्यभरतीसाठी प्रशिक्षण देणारी स्वतःची संस्था उभी केली. भिंगारच्या थोडं पुढं, सलाबतखानाच्या कबरीच्या ऊर्फ चांदबीबी महालाच्या अलीकडं त्यांची ‘सोल्जर्स डिफेन्स एकेडमी’ आहे.
सुमेरसरांनी चार-पाच दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, ‘सर, अपनी एकेडमीमे स्वतंत्रता दिन मनाना है। आपको आना होगा। आपके हाथ से झंडा फहराएंगे...’ कार्यक्रमाची आठवण करून देण्यासाठी रविवारी रात्री पुन्हा त्यांचा फोन. ‘माझ्या हस्ते कशाला ध्वजवंदन? मी येतो की नुसता...’ माझा गुळमुळीत शब्दांत विरोध. हरयाणवी हिंदीत ते म्हणाले, ‘‘आप आओ तो सही... देखेंगे किस के हाथ से झंडा फहराना है!’’
सुमेरसर भिवानी जिल्ह्यातले. सैन्यभरतीसाठी नगरला आले. इथं भरती झाले आणि २८ वर्षांची सेवा इथंच केली. सैन्यदलाच्या संघाला त्यांनी जागतिक स्पर्धेत पदकं मिळवून दिलेली आहेत. तर त्यांच्या बोलण्यातला ‘मैं देख्या...’, ‘मैं बोल्या...’ हा हरयाणवी ढंग तीन दशकांमध्ये काही गेलेला नाही. त्याबद्दल पुन्हा कधी तरी.
गजर लावून वेळेवर उठलो. ‘अजून फक्त पाचच मिनिटं...’ असं नेहमीसारखं मनाला सांगत लोळलो नाही. आळस केला नाही. पटापट आवरलं. नऊ वाजता तिथं पोहोचायचं होतं. घराच्या खिडकीत ध्वज लावला. त्या आधी त्याला कडक इस्त्री केली. सॅल्युट वगैरे न ठोकता नेहमीसारखाच दोन हात जोडून नमस्कार केला.
गाडी घेऊन निर्मल थोरात येणार होता. तिथपर्यंतचं एक-सव्वा किलोमीटर चालत जायचं होतं. घराबाहेर पडताक्षणी वातावरणातला सळसळता उत्साह जाणवला. बहुतेक घरांच्या सज्जात, खिडक्यांमध्ये किंवा गच्चीवर राष्ट्रध्वज फडकत होता. धावणाऱ्या रिक्षांवर झेंडे दिसत होते. आळसावलेले पालक मुलांना शाळेतून घेऊन घरी परतत होते. कडक गणवेषातली, तिरंग्याचा बिल्ला छातीवर लावलेली किंवा हातात छोटा झेंडा घेतलेली ही मुलं मोठ्या उत्साहात दिसत होती.
![]() |
भेळेची गाडीवर अभिमानाचा झेंडा! |
दोन-तीन फोटो काढले. मालकानं खुशीत विचारलं, ‘भारी लागलाय ना आपला झेंडा? चांगलं दिसतंय ना!’ त्याच्या उत्साहाला एका जोरदार हास्याची पावती देऊन पुढे निघालो.
![]() |
‘काढा की फोटा... त्यात काय इचारायचं राव!’ |
बाजूलाच असलेल्या टपरीमध्ये गॅसवर चहा उकळत होता. इकडे-तिकडे हवेनं टम्म भरलेल्या खाद्यपदार्थांच्या पिशव्यांच्या माळा लागलेल्या. त्या साऱ्याच्या वर होता तिरंगा. एका झाडाच्या फांद्यांमधून अलगदपणे वाट काढत सहज ताठपणे उभा असलेला.
निर्मलसरांच्या गाडीत बसून अकादमीकडं निघालो. भिंगारच्या आधी प्रसिद्ध भुईकोट किल्ला. तिथं तोबा गर्दी. वेगवेगळ्या वस्तू, फुगे, खेळणी विकणाऱ्या अनेक गाड्या. खाद्यपदार्थांच्याही गाड्या. प्रभाकर भेळवाले सकाळी सकाळी कुठं चालले होते, ह्याचा उलगडा झाला.
सैन्यात भरती होण्यासाठी उत्सुक असलेले ‘कैडेट’ तयारच होते. प्रत्येकाची ‘पाय लागू’ची घाई... त्यांना आवरता आवरता दमछाक. अकादमी अलीकडेच सुरू झालेली. पण छान व्यवस्था असलेली. पावसामुळं नजर टाकावी तिकडे हिरवाई दिसत होती. मुलं, त्यांचे पालक आले. सुमेरसरांच्या जिवाभावाची आर्मीमधले कोचमंडळी आली. त्यातल्या धर्मेंद्र यांनी पांढरा सुळसुळीत झब्बा आणि पायजमा चढवला होता. पायात राजस्तानी मोजडी. बाकीचे त्यांना ‘एमएलए साब’ म्हणून चिडवत होते. सायकलिंग संघाचे प्रशिक्षक सतीशकुमार होते. रग्बीचे प्रशिक्षक अश्विनीकुमार, चरणजितसिंग आणि सेंदिलकुमार होते. रग्बीबद्दल सेंदीलकुमार ह्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आता एकदा खेळ बघायला जायचंय.
![]() |
अस्मादिकांच्या हस्ते ध्वजवंदन. रोमांचकारक... |
सैन्यातल्या नोकरीनंतर आता पोलीस सेवेत असलेला खो-खोपटू राजू गालफाडेनं ध्वजवंदनाची सगळी चोख व्यवस्था केली. पुन्हा तपासून खातरी केली आणि मगच माझ्या हाती दोरी दिली. ध्वज हळुहळू वर चढत गेला. राष्ट्रगीत म्हणताना सवयीनंच माझे डोळे बंद झाले...
......
खूप वर्षांची रुखरुख दूर झाली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेचा मुहूर्त त्याला लाभला. लक्षात राहील असा अमृतमहोत्सव.
......
मन्ना डे ह्यांच्या दमदार आवाजातलं ‘ए मेरे प्यारे वतन...’ कधीही, कुठंही कानी पडलं की, ते ऐकतोच. ‘ए मेरे वतन के लोगों...’एवढंच ते प्रिय. ह्या गाण्याची आठवण स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाशी जोडली गेलेली आहे.
ते वर्ष १९९७. ऑगस्टची १४ तारीख. वर्तमानपत्रांना त्या काळात वर्षभरातून जेमतेम चार सुट्या असत. त्यातली एक उद्या होती. काम जवळपास साडेनऊलाच संपलं होतं. पण साडेअकरापर्यंत थांबणं भाग होतं. वार्ताहर मंडळी निघून गेली सारी. एक कम्प्युटर ऑपरेटर, एक उपसंपादक आणि एक शिपाई.
पुण्यातून पावणेअकरा वाजता फोन आला - ‘अरे, उद्या स्वातंत्र्यदिन. सुवर्णमहोत्सवाची सांगता. नगरमध्ये काही कार्यक्रम नाहीत का? बातमी नाही दिली तुम्ही...’
कुणीच वार्ताहर नव्हता. सांगितलं, ‘दहा मिनिटांत देतो.’ वार्ताहरांच्या ट्रेमध्ये पाहिलं, काही पत्रकं होती. स्वातंत्र्यदिनानिमित्तचे कार्यक्रम. त्या मध्यरात्री भुईकोट किल्ल्यावर एक मिरवणूक जाणार, हे माहीत होतं. मेणबत्त्या किंवा मशाली हाती घेऊन. दहा मिनिटांत बातमी तयार. पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिद्ध होण्यासाठी. तिचं कात्रण अजून आहे. कधी वाचतो, तेव्हा वाटतं की, (टेबलावर बसून) लिहिलेल्या ह्या बातमीला आपण ‘बाय-लाईन’ घ्यायला हवी होती. तिची भट्टीच तेवढी जमून गेली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर गावाला जायचं होतं. झोपलो तर पहाटे जाग येण्याची शक्यता जवळपास शून्यात. ‘चला, उठा...’ असं सांगायला कुणी नव्हतं. मग रेडिओ लावला. मध्यरात्री बारापासून पहाटे पाच वाजेपर्यंत. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव आकाशवाणी मोठ्या उत्साहानं साजरा करीत होती. थोडं वर्णन, मग गाणं... असा छान कार्यक्रम चालला. एकाहून एक सुंदर गाणी ऐकली त्या रात्री. त्या कार्यक्रमाचं नाव होतं, ‘ए मेरे प्यारे वतन...’ पाच-सात मिनिटांनी एक छोटीशी विश्रांती व्हायची आणि मन्नादा आर्तपणे एकच ओळ गायचे - ‘ए मेरे प्यारे वतन...’ आधी अनेकदा ऐकलेलं आणि आवडलेलं गाणं. पण त्या रात्रीपासून ‘तुझपे दिल कुर्बान!’ अशी अवस्था झाली, ती अजून संपलेली नाही.
......
स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनाच्या अनेक आठवणी आहेत. इतरांप्रमाणेच. इस्त्रीचा गणवेश, ती कवायत... त्यात वेगळं काही नाही. एका प्रजासत्ताकदिनाला गेलो नव्हतो. त्याबद्दल वाटणारी खंत नंतर लेख लिहून आणि आमचं छान संचलन बसवणाऱ्या क्रीडाशिक्षकांची त्या लेखातून माफी मागून व्यक्त केली. मोकळं वाटलं ते लिहिल्यानंतर. एक ओझं कमी झालं मनावरचं.
स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा झाला, तेव्हाचं फार काही आठवत नाही. बांगला देशाला मुक्त करणारी लढाई आपण मोठ्या थाटात जिंकली होती. त्यामुळे तेव्हा मोठाच उत्साह असणार. आमच्या घरात एक महाराष्ट्र सरकारनं प्रकाशित केलेलं एक पुस्तक होतं. त्यात राष्ट्रध्वजाचा आकार व रंग, तो फडकावण्याची आचारसंहिता, विद्यार्थ्यांच्या उभ्या नि बैठ्या कवायतींचे प्रकार, लेझीम-डंबेल्स-काठीचे डाव... अशी खूप माहिती होती. शेवटच्या काही पानांमध्ये देशभक्तिपर गीतं होती. सानेगुरुजींचं ‘बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो...’ हे गीत त्या पुस्तकात वाचून वाचूनच पाठ झालं.
खूप दिवसांनी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला जाता आलं आणि काही आठवणी मनाच्या तळातून वर आल्या.
........................
#स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव #तिरंगा #राष्ट्रध्वज #सुमेरसिंग #ए_मेरे_प्यारे_वतन #मन्ना_डे #सोल्जर्स_डिफेन्स_एकेडमी
खूप छान.तो दिवसच पूर्ण भारल्यासारखा असतो.आतून आणि खूप आतून एक चैतन्य सळसळत असतं.शब्दातीत
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर लेख
उत्तर द्याहटवासतिश लेख नेहमीप्रमाणेच छान जमला आहे. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.
उत्तर द्याहटवाखूपच मस्त जमून आलाय लेख ...!! तुम्हाला आजही ९७ सालचे रेफरन्स आठवतात - hats off to you sir.!! खरंच या वेळी खूप भारावलेले वातावरण होते स्वातंत्र्यदिनाचे; अगदी दसऱ्याच्या संचलनाच्या वेळी स्वयंसेवकांमध्ये असते अगदी तसं! स्वातंत्र्य दिन चिरायू होवो 🌹🌹🥰😍
उत्तर द्याहटवा- हृषीकेश आगरकर, नगर
तूही मेरी आरजू
उत्तर द्याहटवातूही मेरी आबरू
तूही मेरी जान ....!!!!💐
- जयंत दिवाण, औरंगाबाद
खूपच छान लेख. स्वातंत्र्यदिनाची आठवण आणि उजाळा. 👍👌👌
उत्तर द्याहटवा- अजय कविटकर, नगर
आठवणी जाग्या करणारा लेख. छान झालाय.
उत्तर द्याहटवा- अनिल पवार, पुणे
अप्रतिम... 🙏🙏नेहमीसारखंच पण जास्त👍
उत्तर द्याहटवा- मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली
फारच भारी. भिडणारं लिहिलं आहेस...
उत्तर द्याहटवा- उमेश आठलेकर, पुणे
खरंय् ...
उत्तर द्याहटवा‘काबुलीवाला’मधलं हृदयाला भिडणारं गीत.
- राहुल घोरपडे, पुणे
Absolutely right Satish. Ever keep on sending such messages.
उत्तर द्याहटवा- Pradeep Rashinkar, Pune
जी गाणी ऐकताना प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यांत पाणी येते, अशी तीनच गाणी आहेत : १) ऐ मेरे प्यारे वतन २) बांगलादेशाचे राष्ट्रगीत : आमार सोनार बांगला - मन्ना डे यांनी गायिलेले ;आणि ३) आशा भोसले यांचे ‘अबके बरस भेज भैया को बाबुल...’ म्हणजे तीनपैकी दोन गाणी मन्ना डे यांनी गायलेली आहेत. त्यांनी गायिलेल्या ‘आमार सोनार बांगला’ या गीताची लिंक पाठवीत आहे.
उत्तर द्याहटवा- विलास गिते, नगर
Thanks a lot sir ji! You are owner, i am only your younger brother. 🙏🙏
उत्तर द्याहटवा- Sumer Singh
सतीश, नेहमीप्रमाणे सुंदर लेख. खास तुझ्या नजरेतून टिपलेला. १५ ऑगस्ट एक आनंदोत्सव आपल्या दृष्टीने; पण त्याला दुसरीही बाजू आहे. ती म्हणजे झालेली देशाची फाळणी. त्या वेळी आपल्या शीख व सिंधी बांधवांवर झालेले अत्याचार...
उत्तर द्याहटवा- विकास पटवर्धन, नगर